Wednesday, June 24, 2015

डिग्र्या बोगस?

सध्या देशभर अनेक नेत्यांच्या डिग्र्यांबद्दल बरीच वादंगे होत आहेत. काहींच्या डिग्र्या बोगस आहेत तर काहींबाबत संशय आहे. माझे म्हणने जरा वेगळे आहे.
अपवाद वगळता भारतातील बहुसंख्य विद्यापीठांच्या डिग्र्या बोगसच आहेत. त्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे मिळवल्या म्हणून त्या डिग्र्यांचे महत्व काडीएवढेही वाढत नाही. त्या कचराकुंडीच्या फेकायच्या लायकीच्या असतात. नोक-या मिळवायच्या तर या डिग्र्या शिडीसारख्या कामाला येतातही, पण नोकरी मिळवायला स्पर्धा परिक्षा द्याव्याच लागतात. याचाच अर्थ डिग्र्यांमुळे विद्यार्थी सक्षम व ज्ञानवंत-ज्ञानार्थी होतो हे खुद्द सरकारलाच मान्य नाही.
मी पुणे विद्यापीठाचा एम. कोम. चा डिग्री होल्डर आहे. त्या पदवीचा मला जीवनातील उपयोग शुन्य. मला या पदवीने कणभरही व्यवहारज्ञान शिकवले नाही. म्हणजे ती कुचकामीच कि!
पदव्या हव्या असतात कारण समाज अकारण त्याला महत्व देतो. व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या पदवीने ठरवतो.
आम्ही आमची दृष्टी स्वच्छ केली तर कोणि अशा लबाड्या मुळात करणार नाही. आमची शिक्षणपद्धतीच मुळात बोगस आहे...त्याचे काय करायचे हा आमच्यापुढील खरा प्रश्न असला पाहिजे!

1 comment:

  1. आप्पा - बर झालं रे बाप्पा - अगदी वेळेत आलास संजय अगदीच हिरमुसलाय !
    बाप्पा - काय झालं ? आपण बांगला देश मध्ये हरलो ना ?
    आप्पा - नाही रे ,ते चालायचंच . क्रिकेट जिवंत ठेवायची तर अस लुटुपुटूच हरावच लागत , नाहीतर त्यांच्याशी कुणी खेळेल का ? हा वेगळाच विषय आहे . ब्रेकिंग न्यूज -संजयचा आत्ताच्या शिक्षणावर विश्वासच नाहीये ! किती वाईट लिहितोय तो , अरेरे ! सांगा कुणीतरी , असे निराश होऊ नकोस !
    बाप्पा - म्हणजे ? मला नाही समजल , आपल्याकडचे डॉक्टर अमेरिकेत बस्तान बसवतात , आपल्याकडले एनडीए मधील सैनिकी शिक्षण जागतिक दर्जाचे असते . आपल्या आय आय टी ला जगन्मान्यता आहे . आपली आय आय एम आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे .त्यांच्या प्लेसमेंट जगाच्या नकाशावर होतात ते काय उगीच की काय ?
    आप्पा - त्याचे म्हणणे असे की त्याच्या एम कॉम मधून त्याला काहीही व्यवहार ज्ञान मिळाले नाही .
    बाप्पा - अरे संजय . न्युटनला तरी इतके संशोधन करत असताना व्यवहार ज्ञान कुठे होते ? त्यानेपण मांजरी आणि मांजराचे पिल्लू याना यायला जायला वेगवेगळी दोन भोके ठेवलीच ना ? ती गोष्ट तर प्रसिद्धच आहे .त्याला व्यवहारानेच कळले ना की आपण चुकलो , आईबरोबर पिल्लू जाणार हे व्यवहार ज्ञान त्याला मांजरीने शिकवले - हो कि नाही ?
    आप्पा - तूच जर अशी नकारात्मक भूमिका घेतलीस तर कसे होणार ? आज अनेक बालके
    १०वी , १२ वी च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या दमाने पुढील वाटचाल करणार आहेत , त्याना काय वाटेल ? तू तर पतंगराव कदम आणि डी वाय पाटील आणि नवले प्रभूतीना चक्कर येईल असेच लिहित आहेस - असे नको करूस . आपल्या पंतप्रधानांकडे बघ आणि तसे वाग! योगा कर ! तुझे भिरभिरणारे मन शांत होईल ! योगाने ते बघ कुठून कुठे पोचले .
    बाप्पा - नारेन्द्र्भाई बघ ! ते योगा करतात . अरे व्यवहार ध्यान हवेच कशाला ? हा विशाल भारत आपली कर्मभूमी आहे , ही भारतमाता आपली माता आहे , त्या साठी आपल्याला वेळ आली तर प्राण द्यायचे आहेत . किती छान बोलतात - नाही का ?
    आप्पा - त्यापेक्षा संजय तू सर्वाना संघात जायला सांग . तिथे व्यवहार ज्ञान चालत नाही . तिथे उत्तम सांगकामे तयार होतात . आपल्याला त्याचीच गरज आहे . झोपेतून जागे झाले की दिवसभर ते हिंदू धर्माचे रक्षण करत हिंडत असतात . त्यासाठी व्यवहार ज्ञान लागत नाही .
    बाप्पा - पूर्वी हिंदू महासभावाले आपल्या कुत्र्यांचे नाव एलिझाबेथ ठेवून आंग्ल सत्तेवर सूड उगवत असत आता संघवाले आपल्या कुत्र्यांचे नाव हसन हुसेन ठेवतात आणि त्याना शिळी भाकरी घालतात हे त्यांचे धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम ! तिथे व्यवहार ज्ञान कशाला ?
    आप्पा - हे बघ संजय लहान मुले ही देवाघरची फुले असतात .
    बाप्पा - मूल म्हणजे मातीच गोळा , जसा घडवावा तसा घडतो .
    आप्पा - मुले घाबरतील असे लिहू नकोस , बोलू नकोस !
    बाप्पा - नरेंद्र भाई सांगत आहेत बघ . २०२५ साली आपल्या देशाला ४० लाख सी ए हवे असणार आहेत , ४ कोटी इंजिनियर आणि ७ कोटी डॉक्टर तयार ठेवावे लागणार आहेत
    आप्पा - म्हणजे चारावर किती रे शून्य बाप्पा ? - हे बघ असले विचार करायचे नसतात . फक्त म्हणायचं असत - बापरे कित्ती कित्ती काय काय सांगताहेत ना आपले नरेन्द्र्भाई - किती हुशार , आपले भाग्य म्हणून आपल्याला असा पंतप्रधान मिळाला . किती हिंडत असतो आपल्यासाठी , आणि कुठेकुठे ? आज इकडे तर उद्या तिकडे - कधी बर्फातून जातो तर कधी वाळवंटातून जातो ,
    सगळ जग त्याना नाही म्हणत नाही - होच म्हणते !
    बाप्पा - व्यवहार ज्ञान येते हळूहळू ! , चला मी जातो मारुतीच्या देवळात , तिथे सभा आहे , इस्लाम खतरेमे है म्हणतात त्यांचा निषेध करायचा आहे आणि स्नेहभोजन आहे मुस्लिम आणि हिंदू तांबोळी समाजाचे ! शेवटी जातच धर्म राखते हे त्यांनापण पटलय आणि आपल्याला तर माहीतच आहे !
    आप्पा - नाही का रे संजय ? बोल ना ! !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...