भारताचा विविध उत्खननांतून मिळणारा पुराइतिहास हा किमान ८० हजार वर्ष जुना आहे. तत्कालीन दगडी हत्यारे, दगडी हत्यारे-तासण्या-टोचण्या यातून या शिकारी मानवाची आपल्याला ओळख होते. पुढची ३०-४० हजार वर्ष ही याच मानवाच्या हत्यार कौशल्यातील उत्क्रांतीचीही नोंद ठेवतो. महाराष्ट्रात तर अशा हत्यार/दगडी वस्तू बनवायचे कारखानेही सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकांच्या विपूलतेमुळे हे होणे स्वाभाविक आहे. गारगोट्यांपासून ते हाडांपासूनही बनवली गेलेली हत्यारे आहेत. भारतातील पुरापर्यावरणही कसे बदलत गेले याचे पुरावे उत्खननांतून समोर आलेले आहेत. उदा. महाराष्ट्रात तीस-चाळीस हजार वर्षांपुर्वी पानथळ जमीनी मोठ्या प्रमाणात होत्या. जंगली हत्ती, गेंडा, पाणघोड्यांसारखे प्राणी तर शहामृगासारखे पक्षीही येथे विपूल प्रमाणात असल्याचे पुरावे मिळतात. वीस हजार वर्षांपुर्वी मात्र कोरडे वायुमान सुरु झाले. हिमखंड वितळू लागल्यने सागराची पातळी वढायलअ सुरुवात झाली. या हवामान बदलांमुळे मानवी जगण्याच्या पद्धतींतही बदल होत गेला.
जेथून कलेची अभिव्यक्ती सुरु झाली तेथून मानवी संस्क्रुतीचा प्रकट उद्गार सुरु झाला असे मानले जाते. सरासरी ३५ हजार ते १०००० वर्षांपुर्वीपासूनची भीमबेटका येथे मिळणा-या गुंफाचित्रे या भारतीय अभिव्यक्तीची उदाहरणे आहेत. अशाच प्रकारची गुंफाचित्रे विदर्भातही मिळून येतात. तत्कालीन मानवाच्या जगण्याची पद्धत, नृत्य-कला, शिकारी ईत्यादि बाबी त्या चित्रांतून स्पष्ट होतात.
सरासरी दहा हजार वर्षांपुर्वीपासून भारतीयांना शेतीचा शोध लागला असे मानले जाते. मेहरगढ येथे ९००० वर्षांपुर्वीच्या शेतीचा शोध लागला आहे. अर्थात हा भाग तुलनेने कोरडा व कमी लोकवस्तीचा असल्याने हा पुरावा समोर आला असला तरी शेतीच्या शोध याहीपुर्वीचा असणार हे उघड आहे. अधिक लोकवस्तीच्या प्रदेशांत बव्हंशी जमीनी पुनर्लागवडी होत आल्या असल्याने पुरातन पुरावे मिळणे जवळपास अशक्य असेच आहे. जगभरातही शेतीचा शोध याच काळात लागला. झार्गोस परवताच्या परिसरात १२ हजार वर्ष जुने शेतीचे स्थळ सापडले आहे.
शेतीच्या शोधाने शिकारी-पशुपालक माणूस अधिक स्थिर झाला. त्याच्या जगण्याची पद्धत बदलली. शेतीसाठी आवश्यक अशी अवजारे व खाद्य पीकांचे-फळे व भाज्यांचे "मानसाळवणे" सुरु झाले. संकर करुन नव्या प्रजाती बनवायची कला भारतीयांनी दहा हजार वर्षांपुर्वीच वापरात आणली. सिंधू संस्कृतीचा नागर संस्कृतीचा काळ सनपुर्व ३२०० मद्ध्ये सुरु होत असला तरी पुर्व-सिंधू संस्कृती ही छोटी खेडी करुन फुलत होती याचे पुरावे मिळालेले आहेत. हे लोक अन्यत्रहून कोठून आलेले नव्हते तर जे लोक ज्या-त्या परिसरात शिकार व पशुपालन करुन हजारो वर्ष जगत आले होते त्यांनीच कृषीप्रधान जीवनाचा अंगिकार करत नवीन संस्कृती फुलवली असे प्रसिद्ध पुरात्तत्ववेत्ते जोनाथन मार्क केनोयेर म्हणतात आणि ते संयुक्तिकही आहे. सिंधू व गंगेच्या खो-यांत गाळाच्या जमीनी असल्याने शेतीने तिथे जशी मुळे रुजवली तशीच ती ब्यारतात अन्यत्र, म्हणजे ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कावेरी...कृष्णा अशा अगणित नद्यांच्या खो-यांत रुजवली.
या काळात भारतातील जलवयुमान (इसपू ६००० ते इसपू १८००) पावसाळी होते. अनुकूल पावसामुळे शेतीची भरभराट झाली. तिबार पीके घेण्याइतपत मजल गाठली गेली. नद्यांवर बांध घालत कालव्यांनी पाणी दुरवर शेतीसाठी वाहून नेण्याचे तंत्र भारतीयांनी शोधले. जलव्यवस्थापनात त्यांनी केवढे झेप घेतली होती हे ढोलावीरा येथील अवाढव्य अवशेषांवरून समजते.
सुबत्तेबरोबरच अन्य गरजा वाढतात. त्या गरजा उपलब्ध सामग्री वापरत नवीन शोध लावत भागवल्या जातात. कलादिंच्या आविष्कारांना वाव मिळतो. सिंधू संस्कृतीचा जागतिक व्यापार इसपू ७००० मद्ध्येच सुरु झाला असे केनोयेर प्रत्यक्ष पुराव्यांनी दाखवून देतात. अफ़गाणिस्तान, इराण, तुर्कस्थान, इजिप्त ते अरबी देशांशी भारताचा व्यापार एवढा पुरातन आहे. त्यात अन्नधान्यापासून ते विविध अलंकार, तांबे, सागवानी लाकडॆ यांची निर्यात समुद्रमार्गे व खुष्कीच्या मार्गाने होत असे. इजिप्तमद्ध्ये भारतीय व्यापा-यांनी वसाहती बनवल्याचे पुरावे आढळून आले आहेत. भारताला तेंव्हा मेलुहा म्हटले जायचे हे तेथील लेखांवरुन स्पष्ट झाले आहे. भारतातील अंतर्गत व्यापारही सर्व प्रदेशांत होत असे. उदाहरणार्थ बराच कच्चामाल (उदा. खनिजे) विंध्याद्रीच्या प्रदेशापासून ते आंध्रातून आणली जात. आंध्र प्रदेशातील मृद्भांडी बनवण्याची पद्धत, महाराष्ट्रातील दायमाबाद येथे सापडलेली अग्नी हवा तेंव्हा उपलब्ध असावा म्हणून तेवत ठेवायची पद्धत आणि सिंधू खो-यातील पद्धत यात साम्य दिसून येते ते यामुळेच. थोडक्यात देशांतर्गत दळण-वळण व व्यापारही मोठ्या प्रमाणावर चालु होता.
सांस्कृतिक जीवन
सिंधू संस्कृती (ज्याला आपण भारतीय म्हणुयात कारण जरी आधी अवशेष सिंधु खो-यात सापडले असले तरी आता ते सर्वत्र मिळाले आहेत व अजुनही उत्खनने सुरु आहेत.) ही कृषी व व्यापारप्रधान संस्कृती होती. ती इसपू २६०० पर्यंत कळसाला पोहोचली. या काळात जलवायुमान उत्तम होते. गंगेच्या खो-यात पाऊस त्या काळात खुपच जास्त असल्याने अरण्ये व पानथळ जागा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे मानवी वस्ती असली व तिच्यात व सिंधु खो-यातील लोकांत सांस्कृतिक व ऐहिक व्यवहार होत असले तरी तेथील वाढीवर मर्यादा होती. परंतू या काळातील देशव्यापी धर्मश्रद्धा या शिव-शक्ती प्रधान व मुर्तीपुजक होत्या याचे मात्र सर्वत्रच मुबलक पुरावे मिळाले आहेत. सिंधु खो-यात इसपू २६०० मधील शिवलिंग तर सापडले आहेच पण त्रिमुखी योगध्यानात बसलेल्या आदिशिवमुद्राही सापडलेल्या आहेत. दायमाबाद येथे इसफु २४०० मधील गारगोटीपासून बनवलेले शिवलिंग सापडले असून अनेक मातृदेवतांच्या प्रतिमा आढळुय्न आलेल्या आहेत असे प्रसिद्ध पुरातत्ववेत्ते दिलीप चक्रवर्ती सांगतात. वृषभाच्या मुद्रा सिंधू संस्कृतीत विपुल तर सापडलेल्या आहेतच पण बंगाल, आंध्र व महाराष्ट्रातील विविध उत्खननांतही लिंग, मतृदेवता आणि वृषभ प्रतिमा मिळालेल्या आहेत. शिव-शक्ती आणि बैलाचे भारतीय संस्कृतीतील महत्व व पुज्यभाव आजही टिकून आहे हे तर स्पष्टच आहे. म्हणजे आजही आपण त्याच संस्कृतीच्या विकसीत धारेचे प्रवासी आहोत.
य संदर्भात डा. रा. ना. दांडेकर म्हणतात कि आदिशिवाचा धर्म आर्यपुर्व काळात भारतात सर्वव्यापी होता. वैदिक धर्मामुळे या धर्माची तात्पुरत्या स्वरुपाची पिछेहाट झाली असली तरी वैदिक धर्म जनमानसाची पकड घेऊ शकला नाही. उलट वैदिकांनाच आपल्या देवता त्यागत अनार्यांच्या देवता स्विकारावे लागले.
बी. बी. लाल यांनी गंगेच्या खो-यात जाखेरा येथे केलेल्या उत्खनांतून तेथील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. गंगेच्या खो-यातील लोक इसपू २००० च्या काळात शेती, पशुपालन व हस्तोद्योगांच्या आधारे जगत असत. ते मासेमारीही करत. येथे सापडलेल्या भांड्यांत पितळ्या, लोटा, माठ व वाट्याही अगदी आपल्याकडे आताआतापर्यंत जशा वापरल्या जात तशाच होत्या. येथे काच व पितळाच्या बांगड्या तर सापडल्याच पण भाजक्या भांड्यांवरील कोरीव आकृत्यांवरून त्यांना त्रिकोण, वर्तुळ याचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते. करकटकासारखी भौमितीक अवजारे, ओळंबे इत्यादि अवजारेही सापडली आहेत.
त्या काळात (सनपुर्व ३१०० नंतर) सिंधु खो-यात अनेक शहरे व्यापार-उदीमामुळे बनली असली तरी बव्हंशी लोक खेड्यांतच राहत असत. स्त्री-पुरुषांना वैविध्यपुर्ण अलंकारांचे वेड होते असे म्हटले तरी चालेल. अजही गुजराथ, राजस्थन, सिंध प्रांतातील ग्रामीण लोक जवळपास तसेच अलंकार-बांगड्या वापरतांना दिसतात. खेड्यांचे महत्व भारतात आताआतापर्यंत होतेच.
इसपु १८०० च्या आसपास मात्र जागतिक हवामान बदलायला सुरुवात झाली. सुदूर पश्चिमेतील मेसोपोटेमिया ते चीनपर्यंतच्या संस्कृत्या व जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम झाला. पर्जन्यमान कमी होत गेले. त्यामुळे अर्थव्यवस्थाही गडगडल्या. भारतीय संस्कृतीचा विदेश व्यापार यामुळे ठप्प तर झालाच पीकांवरही त्याचा विपरित परिणाम झाला. नद्याही आक्रसल्या. गंगेच्या खो-यातील पाऊसही कमी झाला असला तरी तो पुर्वीच्या तुलनेत उत्तम म्हणता येईल असा होता म्हणून संस्कृतीचे केंद्र गंगेच्या खो-याकडे सरकले. याच काळात भारताने स्वतंत्रपणे काचेचा शोध लावला हे आता सर्व पुरातत्त्ववेत्ते मान्य करतात.
वैदिक संस्कृती
ऋग्वेदाचा काळ हा कोणीही जागतिक विद्वान इसपू १५०० च्या पुर्वी नेत नाही. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा सनपुर्व ७००० पासून उत्कर्ष होत ती जलवायुमानातील बदलाने गडगडली त्या काळात वैदिक धर्माचा आरंभ नुकताच झाला होता. वैदिक धर्म हा आक्रमक आर्यांचा असे मानायची प्रथा होती. पण पुरातत्वीय अवशेषांवरुन हा सिद्धांत कधीच बाद झाला आहे. ऋग्वेद रचला गेला तो आताच्या अफगाणिस्तानातील हरहवती (सरस्वती) नदीच्या काठावर. तो इसपू १००० च्या आसपास भारतात आला तो धर्मप्रचारकांच्या माध्यमातून. शतपथ ब्राह्मणातील विदेघ माथवाची पुराकथा ही प्रचारकांचा प्रवास दाखवते. या काळात उत्तर भारतात संस्कृतीचे केंद्र गंगेचे खोरे बनलेले होते. पुढील वैदिक वाड्मय कुरुक्षेत्राच्या परिसरात लिहिले गेले व तेथुन प्रचारकार्य सुरु झाले. त्या वेळीस भारतात योग, श्रमण, संन्यास अशा अवैदिक तात्विक संस्कृत्या पुरेपुर रुजलेल्या होत्या व तत्वज्ञानातही मोठे कार्य होत होते. शैवप्रधान धर्म हाच याही काळात प्रबळ होता. दक्षीणेत तर वैदिक धर्माला खूप उशीरा, म्हणजे इसपु दुस-०या शतकाच्या आसपास प्रवेश मिळाला असे वि. का. राजवाडे सांगतात.
वैदिक संस्क्टृतीचे स्तोम कितीही आज वाढले असले तरी वास्तवे खूप वेगळी आहेत. उदाहरणार्थ भारतात इसपू सातव्या शतकापासूनची चिन्हांकित नाणी मिळतात. प्रत्येक नाण्यावर प्रत्येक जानपदाचे स्वतंत्र चिन्ह आहे. यात कोठेही वैदिक चिन्ह येत नाही. इसपु तिस-या शतकापासुनचे अगणित शिलालेख उपलब्ध आहेत. त्यातील सर्वत्र भाषा प्राकृत तर चिन्हे पुन्हा शैव, बुद्धिस्ट, जैन अथवा परकीय सत्ताधा-यांच्या देवतांची आहेत. गणराज्ये अथवा जानपद हे उल्लेख ऋग्वेदात कोठेही येत नाहीत. पौराणिक वाड्मयात राजांनी खूप यज्ञ केले असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात यज्ञ केल्याचे फक्त दोन शिलालेखीय उल्लेख आहेत. त्यातील एक पुष्यमित्र शृंगाचा आहे तर दुसरा सातवाहनांचा. हे उल्लेखही प्राकृत भाषेत केले गेले आहेत हेही विशेष. एकाही नाण्यावर अथवा शिलालेखांत वैदिक अथवा संस्कृत भाषा येत नही याचा अर्थ एवढाच कि वैदिक संस्कृती ही अत्यंत मर्यादित होती, व आजही मर्यादित आहे.
त्यामुळे वैदिक धर्मियांपासून भारतीय संस्कृतीचा इतिहास सुरु होतो हे मत निखालस खोटे आहे. गुप्तकाळात (इ.स. चवथे शतक) वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला व तेथुनच नवनिर्मित संस्कृत भाषेत वैदिकांचा बोलबाला सुरु झाला. त्यापुर्वी वैदिक धर्माच्या प्रबळ अस्तित्वाचे पुरावे इसपु १००० ते तिसरे शतक केवळ आणि केवळ मगध प्रांतातील आहेत. अन्यत्रचे नव्हेत. या धर्माला विरोध करणारे शाक्यमुनी भगवान बौद्ध व महावीरही याच प्रांताशी संलग्न होते हे येथे लक्षत घ्यायला पाहिजे. अन्यत्र हा धर्म विशेष नव्हताच त्यामुळे अन्यत्र विरोधाचा सुरही उमटायचे कारण नव्हते.
म्हणजे वैदिक धर्म हा आयात झालेला. येथीलच मुळच्या अनेकांने धर्मांतर केले यातुन हा धर्म पसरला असला तरी पुजाप्रधान शैव धर्माला हा धर्म कधीच आव्हान देवू शकला नाही. उलट पश्चिमेपासुन पुर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत शिव आणी देवी संस्कृतीने मात्र पुरातन काळापासून ते आजतागायत आपले गारुड कायम ठेवलेले दिसते.
भारत हा एवढ्या भाषांचा, प्रादेशिक संस्कृत्यांचा देश असुनही त्यात नेहमीच भावनिक ऐक्य राहिले याचे कारण देशभर विखुरलेली ज्योतिर्लिंगे आणि शक्तीपीठे याचे भान असायला हवे. सिंधू काळापासून चालत आलेला हा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. डा. रा. ना. दांडॆकर म्हणतात त्याप्रमाणे वैदिक दैवते कोणीही कधीही पुजत नव्हते. पण आदिम शिव-शक्तीपुजा मात्र आजही कायम आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती ही पुरातन काळापासुनच शैव होती व आजही शैवच आहे. वैदिक धर्म व संस्कृती या मातीत रुजली नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा विचार करतांना वैदिक धर्म व संस्कृतीला चवथ्या-पाचव्या स्थानावर ठेवावे लागते. ते का यावर आपण स्वतंण्त्रपणे विचार करुयात!