मी हिंदू आहे. हिंदू असल्याचा जेवढा अभिमान असायला हवा तेवढा मी बाळगतोच. किंबहुना हिंदू धर्मात घुसखोरी करत विषमतेची वैदिक अहंता जे बाळगतात आणि स्वत:ला हिंदू समजतात त्यांचा विरोध करतो. मी कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. अनेक लोक विरोधाला द्वेष समजतात त्यांची कीव वाटते. शिक्षणाचे भारतियीकरण कि वैदिकीकरण हा प्रश्न मी उपस्थित केल्यावर माधव भंडारींसारख्या खंद्या लढवैय्याला केवढे सारवासारव करावी लागली याचे राकेश शिर्के, राजा कांदलकर आणि राकेश पाटील साक्षीदार आहेत. मला छुपे अजेंडावाले आवडत नाहीत. तुम्ही जे आहात ते खरे रुप दाखवा. मला मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध जास्त आवडतात कारण ते जे आहेत त्याशी जाहिर प्रतारणा करत नाहीत. घरात वैदिक बाहेर हिंदू, वर्तनात वैदिक...म्हणायला हिंदू असले उपद्व्याप या देशातील त्रैवर्णिक वैदिक करत आले आहेत.
कोणीतरी काल प्रतिक्रियेत म्हणाले कि मी वेदांचा द्वेष करतो. म्हणजेच ब्राह्मणांचाही द्वेष करतो. वेद ही फक्त ब्राह्मणांची मालमत्ता नव्हती तर क्षत्रियांचीही होती. वेदांतील नासदीय, भूमी सुक्तांसारखी अनेक सुक्ते मला प्रिय आहेत. ऋग्वैदिक ऋषींच्या भावनिक, श्रधाळू आणि कुतुहलशील सुक्तांबद्दल मला नितांत्य आदर आहे. माझा त्या धर्मातील वर्ण संकल्पनेने निर्माण केलेल्या मानवी विषमतेला विरोध होता आणि आहे. हिंदुंमद्ध्ये (वैदिक स्वत:ला हिंदु समजु लागल्यापासुन) ही वर्णीक उतरंड त्यांच्यातही घुसली आणि विषमतेचे त्यांच्यात नसलेले तत्व तेही पाळू लागले. ते पाळू नये एवढ्यापुरताच वैदिक धर्माशी विरोध आहे.
खूप ब्राह्मण आणि क्षत्रीयही (कलियुगी क्षत्रीय नाहीत असे वैदिकच म्हणतात, पण खूप लोक स्वत:ला क्षत्रीय म्हणवुन घेतात आणी गर्वाने मिरवतात) आजही या वैदिक विकारांनी ग्रस्त आहेत. याच वेळीस खूप लोक असे आहेत कि त्यांनी वैदिक धर्माने दिलेली मक्तेदारी नाकारत समतेचा उद्घोष केला आहे. अशा लोकांना मी वैदिक समजत नाही. धर्म हा नुसता ज्यात तुम्ही जन्माला आलो याने ठरत नसून जे धर्माचे तत्वज्ञान पाळता अथवा नाकारता यावरुन ठरतो. आम्ही ६०% ख्रिस्ती आजच आचरणाने बनलो आहोत. ते बनण्यासाठी धर्म बदलावा लागलेला नाही. आमचा पेहराव ते जीवनपद्धती व विचारसरणी ख्रिस्ती बनलेली आहे, अगदी मुस्लिमांचीही. पण ते स्विकारायचे साहस कोणात दिसणार नाही. संस्कृती व धर्म हा नेहमीच सबलांचा असतो, दुबळ्यांचा नव्हे. आणि सबलता तुमच्याकडे किती शस्त्रे आहेत व तुमची विध्वंसकता केवढी केवळ यावर ठरत नसून आर्थिक आणि मानवी प्रेरणांना प्रोत्साहन देणारे तुमच्या धर्मात काय आहे यावरुन ठरते. तुमच्या धर्मातच मुळात माणसाला माणुस समजायचे तत्व नसेल आणि कळत-नकळत इतरांवर तेच तत्व लादत आले असाल आणी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लादायचा प्रयत्न करत असाल तर तो धर्म स्विकारार्ह असणार नाही. त्याचे सहास्तित्वही ते हिंदु म्हणवुन घेत असल्याने मान्य होणार नाही.
आज सर्व विद्रोही हिंदु धर्माला शिव्या-शाप देत असतील तर नेमक्या कोनामुळे याचा विचार करणे माझ्यासारख्या सामान्य हिंदुला भाग आहे. ज्या धर्माचा एवढा तिरस्कार केला जातो तो जर जे हिंदुच नाहीत पण हिंदु म्हणवतात त्यांच्यामुळे तर मनाला वेदना होणे अपरिहार्य आहे. स्वत:चे वैदिकत्व दूर सारत जे हिंदू होतील व आहेत त्यांच्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. पण वैदिकांनी आपली स्वधार्मिकता जपत हिंदुंच्या कळपात येत शास्ते होण्याच्या प्रयत्नांना विरोध होता व आहे.
विरोध म्हणजे द्वेष नव्हे हे काही मुढांना सांगितलेच पाहिजे. त्यांच्या लबाड्या आम्हाला समजतच नाहीत या भ्रमातही कोणी राहु नये. वैदिक वेगळे आणि हिंदू वेगळे हे धार्मिक तथ्य आहे. हिंदुंचा धर्मग्रंथ कोणता असाही प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे. धर्मग्रंथ असणे हा जर निकश असेल तर वैदिक, बौद्ध आणि जैनांचाही एकमेव असा धर्मग्रंथ नाही. पण ते धर्म आहेत. त्यांचे स्वत:चे विविधतापुर्ण तत्वज्ञान नि कर्मकांड आहे. अगदी.बायबल नि कुराणही, पहायला गेलो तर, धर्मग्रंथ नाहीत तर प्रसंगी विरोधाभासात्मक असलेल्या विचार व तत्वज्ञानांचे संग्रहण आहे. कोणत्याही धर्माला एकवाक्यता देणारा धर्मग्रंथ मुळात अस्तित्वात नाही. असते तर त्या-त्या धर्मांत एवढे विरोधाभास दिसले नसते. फाटे फुटत पंथोपपंथ निर्माण झाले नसते.
मी हिंदु आहे. मी वैदिक नाही. माझ्याप्रमाणेच किमान हिंदू धर्मात असलेले ८५% लोक वैदिक नाहीत. उरलेल्या वैदिकांनी आपली स्वतंत्र धार्मिक मांडणी वेळोवेळी केलेलीच आहे. त्यात हिंदुंना गोवण्याचे व आपले वर्चस्व दाखवण्याचे कारण नाही. मी या बाबतीत स्पष्ट आहे. माझ्या धर्माला माझ्या धर्मातील चुकांबद्दल बोलायचा, टीका करायचा अधिकार आहे. माझ्या धर्मात जे नाहित तेही टिका अवश्य करु शकतात, त्यामुळे वैचारिक दृष्ट्या माझा धर्म पुढे जाईल. पण जे हिंदु नसुनही हिंदुंचा कैवार घेण्याचे नाटक करत आपली वैदिकता जपतील त्यांना तीव्र विरोध सारेच हिंदू करत राहतील.
मला धर्मात फुट पाडत असल्याच्या आरोपांनाही सामोरे जावे लागते. फुट होती आणि आहे तर मी काय बिचारा फुट पाडणार? मी फक्त धर्मेतिहासाचे वास्तव मांडत आलो आहे. त्याला काही भयभीत लोक "फुट" म्हणत असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. आहे ते वास्तव सांगण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझ्या धर्माचे अनिवार नुकसान ज्यांनी केले त्यांबद्दल मला खेद अवश्य आहे. भविष्यातील पिढ्या स्वत:चे हिंदुपण, वैदिकवर्चस्व झुगारुन, जपतील अशी आशा मात्र मला नक्कीच आहे. वैदिकांनी त्यांचा धर्म, वेदादि धार्मिक साहित्य अवश्य जपावे, त्यातील ज्ञान-विज्ञन जगाला अवश्य सांगत रहावे....
फक्त स्वत:ला हिंदू म्हणवत हिंदुंचा बुद्धीभेद करु नये एवढेच!