
मोलाने काम करायला जी स्त्री अथवा मुलगी ठेवली जाते तिला मोलकरीण असे म्हटले जाते. म्हणजे तिचे श्रम खरेदी केले जातात. आजकाल मोलकरणी घरकामासाठी असतात व एक मोलकरीण अनेक घरांचे घरकाम सांभाळते तशी स्थिती पुर्वी नव्हती. स्त्रीयांनाच नव्हे तर पुरुषांनाही घरकाम ते शेतकाम करण्यासाठी ठेवले जाई. त्यांना घरगडी असे म्हटले जाई. शेतात कामासाठी सालावरही माणसे घ्यायची प्रथा होती (आज ती अत्यंत तुरळक झाली आहे.). त्या गड्याला सालगडी म्हटले जाई. अर्थात पुरुष आणि स्त्रीयांच्या कामाची विभागणी वेगळी असे. मोलाने काम करणा-या स्त्रीया वीणकाम, शिवणकाम इत्यादि कामांबरोबरच घरकामेही करीत असत. मुळात मोलाने कामाला स्त्री अथवा पुरुष घेण्याची प्रथा कशी सुरु झाली याचा इतिहास अत्यंत रंजक असला तरी वेदनादायक आहे. संत जनाबाई ज्या काळात, म्हणजे तेराव्ह्या शतकात, जन्माला आल्या त्या काळातील ही संस्था पाहण्यापुर्वी आपण अजुन दुरच्या इतिहासात या व्यवस्थेची पाळेमुळे शोधण्यासाठी जायला हवे.
गडी ते मोलकरीण या व्यवस्थेची पाळेमुळे गुलाम प्रथेत जातात. ४०-५० हजार वर्षांपुर्वी माणूस जेंव्हा पृथ्वीवर अन्न व शिकारीच्या शोधात टोळ्या करुन भटकत असे त्या काळात अन्य टोळ्यांशी त्याचा संघर्ष होणे स्वाभाविक होते. टोळ्यांमद्ध्ये युद्धेही होत. युद्धात हरलेल्या टोळीतील पुरुषांना मारुन टाकत स्त्रीयांना मात्र गुलाम केले जाई. याचे कारण पुरुष गुलामांना सर्वकाळ बंधकतेत ठेवणे अशक्य असे. स्त्रीया मात्र टोळीची जनसंख्या वाढवण्यात हातभार लावू शकत. अशा गुलाम स्त्रीयांची संतती ही टोळीचाच भाग व मालमत्ता असल्याने त्यात प्रत्यवाय नसे. माणूस प्रगती करत नंतर पशुपालक मानव बनला. आता त्याचा अन्य टोळ्यांशीचा संघर्ष हा चराऊ कुरणांसाठी होऊ लागला. याही काळात गुलामी प्रथा चालुच होती.
शेतीचा शोध माणसाला इसपू १२००० वर्षांपुर्वी लागला असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील ठिकाण एवढे जुने आहे. प्रत्यक्षात याहीपुर्वी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीने मानवी जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवला. पहिला बदल म्हणजे आजवर भुमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा जो विषयच नव्हता तो आला. प्रत्येकाने आपल्याला सोयीची व उपजावू जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातुनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. स्त्रीवरीलही व्यक्तिगत अधिकार एका व्यक्तिच्याच वारसाचा प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झाला. त्या अधिकाराला वैधता देणारी संस्था म्हणजे विवाह संस्था.
शेतीच्या शोधाने माणूस स्थिर झाला म्हणून त्याची युद्धायमानताही संपली नाही. नद्या, जलाशये इत्यादिकाठच्या सुपीक जमीनींसाठीचे संघर्ष सुरुच राहिले. शेतीसाठी आरंभकाळात मानवी श्रमाची नितांत आवश्यकता असल्याने गुलामांचीही गरज पडॆ. ते मिळवण्यासाठीही दूरदुरवर आक्रमणे होत. युद्धात जिंकलेल्या, आता नुसत्या स्त्रीयाच नव्हेत तर पुरुषांनाही पकडून आणले जाऊ लागले. पुरुष व स्त्री गुलामांचे जीवन अर्थातच अत्यंत दयनीय व कष्टप्रद असे. ही अत्यंत अमानवी प्रथा होती. आधुनिक काळापर्यंत ती अमेरिका व अन्य देशांत सुरुच राहिली.
गुलामांची खरेदी-विक्री जवळपास जगभर खुलेआम सुरु असे. ती वैध होती. किंबहुना अर्थव्यवस्थेचा ती आधार होती. राजे लोक त्यावर कर वसूल करत. भारतातही ही प्रथा होतीच. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात याबाबत विस्तृत वर्णन आहे. त्या काळात चार प्रकारचे गुलाम असत. घरातल्या गुलामापासून जन्मलेले, वारसाहक्काने मिळालेले, खरेदी केलेले अथवा जिंकून आणलेले असे ते प्रकार होत. काही लोक कर्ज चुकवण्यासाठीही स्वत:हून गुलाम होत अथवा आपले गुलाम अथवा मुले गुलाम म्हणून देत. त्रैवर्णिकांना (म्हणजे वैदिक ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्यांना) मात्र गुलाम करता येत नसे. युद्धात जिंकलेल्या या त्रैवर्णिकांना मात्र दंड भरला नाही तरच गुलाम करण्याची परवानगी असे. गुलामांची खरेदी विशिष्ट कालावधीसाठीही असे. अशा गुलामांना गहाण पडलेले गुलाम म्हणत. अशा गहाण गुलामांचा तो कालावधी संपला कि मुक्त होत असत. मोबदला देऊनही गुलामीतुन मुक्तता मिळविता येत असे. मोबदला देऊनही गुलामीतुन मुक्त केले नाही तर असे कृत्य करणा-या मालकास गुलामास जोवर मुक्त केले जात नाही तोवर कैदेत टाकण्याची प्रथा होती. गुलामांची पुनर्विक्री अथवा गहाणवट गुलामाच्या मर्जीनुसार करु नये असेही कौटिल्य म्हणतो. गुलामाची व्यक्तिगत संपत्ती (जी अर्थातच नगण्य असे) ती त्याच्या वारसांना/नातलगांना देण्यात यावी, पण असे कोणी नसले तरच ती मालकाला ठेवता येई.
अर्थात हे झाले कायदे. प्रत्यक्षातील जीवन कसे असेल याची आपण कल्पना करु शकतो. गुलामी प्रथेमुळे मोलावर कामाला घेणे ही प्रथा अस्तित्वात असली तरी कमी होती. नागरी जीवनामुळे सुस्थितील लोकांना आपल्या घरातील कामांसाठी स्त्रीयांची गरज पडे. त्या मोलाने काम करत. घरगडी अथवा सालगड्याची प्रथाही जुनीच आहे. असे असले तरी स्त्रीयांची खरेदी-विक्री मात्र पेशवेकालापर्यंत चालू असलेली दिसते. दुष्काळ/दारिद्र्य यामुळे अनेक स्त्रीयां-मुलांना कुटुंबियच विकत असत. जगण्याचा संघर्षच एवढा तीव्र असे.
मध्य्युगात, म्हणजे संत जनाबाईच्या काळात, यादवांचे स्थिर राज्य जवळपास तिनशे वर्ष लाभल्यामुळे सांस्कृतिक जीवनाला बहर आला होता. या काळातील गुलामपद्धतीची वर्णने मिळत नाहीत. त्यामुळे गुलाम पद्धती असली तरी ती अल्प प्रमाणात असावी. संत साहित्यात "दास" हा शब्द येतो. तसेच अनेक शिलालेखांत वा दानपट्ट्यांत दान देणा-यांच्या नांवात नमीदास, चमीदास अशी दासांत नांवे येतात. दास म्हणजे आर्यांनी हरवलेल्या दास-दस्यू जमातींचे लोक असा एक सर्वसाधारण समज आहे, त्यामुळे यावरही चर्चा करणे येथे गरजेचे आहे.
दास हा शब्द प्रथम ऋग्वेदात येतो. ऋग्वेद हा आक्रमक अथवा स्थलांतरित वैदिक आर्य टोळ्यांनी भारतात आल्यावर येथील दास-दस्यु जमातींना हरवल्यानंतर लिहिला असा सार्वत्रिक समज आहे. पण ते वास्तव नाही. दास/दस्यु लोक भारतातील नव्हेत. हा समाज मुळचा इराण-अफगाणिस्तानमधील. दास हे समाजनाम ावमानकारक नव्हते. खुद्द ऋग्वेद ज्या राजांच्या काळात रचला गेला त्यांच्याच नांवात "सुदास" (चांगला दास), "त्रसदस्यु" (इतरांना त्रस्त करणारा दस्यु) अशी नांवे येतात. दास हा समाज खूप मोठा होता. पारशी धर्माचा प्रेषित झरथुस्ट्र हा स्वत: दास समाजातील होता. त्याला अत्यंत आदराने "दख्युमा" असे म्हतले जाई. दख्युमा म्हणजे दस्युंमधील श्रेष्ठ. संस्कृतातील स हा पर्शियन भाषेत ह अथवा ख असा उच्चारला जातो. दास समाजाला "दाहवे" असे अवेस्त्यातील नांव आहे. ऋग्वेदाची रचना भारतात नव्हे तर दक्षीण अफगाणिस्तानातील हरस्वैती (संस्कृत- सरस्वती) नदीच्या खो-यात झाली. दास हा शब्द सन्मानकारक असला तरी दास समाजाशी (म्हणजेच पारशी धर्माशी) संघर्ष असल्याने पुढे दास हा शब्द वैदिक लोकांनी अवमानकारक बनवला. तरीही दासांचे प्रसंगी सहाय्यही ते घेत असत असे ऋग्वेदावरुनच दिसते. आणि ते स्वाभाविकही आहे. अनेक दासांनी ऋग्वेदिक मंत्ररचनाकारांना दानेही दिलेली दिसतात.
हा समाज इराण/अफगाणिस्तानातीलच असल्याचे मुख्य पुरावे म्हणजे अजुनही कही विभागांची व शहरांची नावे दास शब्दापासुनच बनलेली आहेत. उदाहरणार्थ दाह ई घुल्मन (दाह=दास) ही साईट सिस्टान या अफगाणिस्तानातील प्रांतात आहे. या स्थानावर पारशी अग्नीमंदिरे सापडलेली आहेत. दाहरदेह (दास-देश) असणारी एक जमात अजुनही याच प्रभागात राहते असे. अशी अनेक उदाहरणे मिळतात. गोव्यातील विद्या प्रबोधिनीचे प्रपाठक प्रमोद पाठक यांनी ही साम्यस्थळे दाखवून स्पष्ट शब्दांत नोंदवले आहे कि दास हे भारताचे कधीच रहिवासी नव्हते हे आर्य आक्रमण/विस्थापन सिद्धांतक कधीच लक्षात घेत नाहीत.
म्हणजेच दास म्हणजे गुलाम हा अर्थ नव्हता. वैदिक धर्मियांचे त्यांच्याशी शत्रुत्व असल्याने त्यांनी दास हा शब्द अवमानकारक बनवला. भारतात दास (अथवा दस्यु) हे समाजाचे नांव कधीच नव्हते. पुढे पारशी धर्मच्या प्रभावामुळे वैदिक धर्माला अफगाणिस्तानात आहोटी लागल्यानंतर या धर्माचे काही लोक विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात येऊल सदानीरा नदीच्या परिसरात येत स्थायिक झाले. तेथुन त्यांनी वैदिक धर्माचा प्रचार सुरु केला. इराणमधील आणलेल्या संज्ञा त्यांनी काही अपरिचित जमातींना वापरल्या. विशेष्त: अरण्यात राहणा-या लोकांना ते दस्यु म्हणत. हे नांव त्यांनी दिलेले, येथील नव्हे.
पुढे दास हा शब्द अध्यात्मिक क्षेत्रात घुसला. त्यामुळे अनेक नांवे दासांत बनली. या दास भावात परमेश्वराचा सेवक अथवा राजाचा / धन्याचा सेवक अशीही अर्थछटा घुसली. म्हणजे दास हे समाज नाम न बनता व्यक्तीनाम बनले. दास म्हणजे गुलाम नव्हे. दास म्हणजे सेवक. दासी हे संबोधन सेविकांना अर्थातच चिकटले. पण त्यात अवमानभाव सहसा नव्हता. दासी म्हणजे सेविका, गुलाम नव्हे हा भाव सर्वमान्य होता.
जनाबाई कोण होती यावर येथे आता थोडक्यात चर्चा करु. जनाबाई ही गंगाखेड (जि. परभणी) येथील दमा-कुरुंड या दांपत्याची कन्या. दमा हा पंढरीचा वारकरी होता. त्यांना आरंभी अपत्य नव्हते त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी पांडुरंगाला साकडे घातले. पांडुरंगाने स्वप्नात दमास दर्शन देऊन सांगितले कि "तुला कन्या होईल, पण ती पाच वर्षाची होताच तिला तू पंढरीत राहणा-या दामाजी शिंप्याच्या स्वाधीन कर." पांडुरंगाच्या आशिर्वादाने तिचा जन्म झाला. ती पाच वर्षांची झाल्यानंतर देवाच्या आदेशाप्रमाणे तिला दामाजीच्या घरी पोहोचवले. तेथेच ती नामदेवांच्या संगतीत लहानाची मोठी झाली.
या आख्याईकेबरोबरच अजून एक आख्याईका आहे कि पंढरपुरला गेले असता जनीचे आई-वडील एकाएकी मरण पावले. जनाबाई अनाथ झाली. मंदिरात गेलेल्या दामाजीशेठ यांना ती दिसली. दया येऊन त्यांनी तिला आपल्या घरी नेले.
या दोन्ही आख्याईका असल्या व त्यातील सत्यासत्यता तपासण्याचे कोणतेही साधन आपल्या हाती नसले तरी महत्वाचा भाग असा कि जनाबाई दामाजीपंतांची आश्रीत होती, दासी अथवा मोलकरीण नव्हे. नामदेवाघरी तिला जे काम पडे ते सर्वसामान्य कोणत्याही गृहस्त्रीला करावे लागे तेच. त्या काळी स्त्रीयांची सामाजिक स्थिती, मग ती विवाहित असली तरी, काबाडकष्टांचे असे. दळण दळणे, पाणी भरणे, शेण्या थापणे ते स्वयंपाक करणे अशी अनेक प्रकारची कामे करावी लागत. जनाबाईलाही ही कामे करावी लागत असल्यास नवल नाही. पण जनाबाईचा पिंड हा मनस्वी. विठुरायाच्या भक्तीभावाने ती ओथंबलेली महान संतकवी. हा भक्तीभाव तिच्यात स्वाभाविकपणे संत नामदेवांमुळे आला. नामदेवांनी तिला समकालीन ज्ञानेश्वर ते चोखा मेळ्यासारख्या संतांच्या मांदियाळीत आणले. तिला सर्वच संतांनी सन्मान दिला. स्त्रीयांना हीन लेखणा-या काळात जनाबाईला मुखरित करण्याची, संतपरिचय घडवण्याचीच नव्हे तर जनाबाईला अढळ संतपद देण्याची कामगिरी नामदेवच करु जानोत. भारतीय इतिहासातील ही लोकविलक्षण घटना आहे.
स्वभाव कवयित्रीचा आणि प्रत्यक्ष ऐहिक काम निरस काबाडकष्टाचे या द्वंद्वातून जनाबाई जात होती. याची वेदना जनाबाईच्या अभंगातुन जाणवते. पण तिने यावर विलक्षण तोडगा काढला. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ असे म्हणत जनाबाई येथेच थांबत नाही तर तिच्या कामांत प्रत्यक्ष विठुरायाही तिला मदत करतो असा तिचा भाव आहे. कांदा-मुळ भाजी...अवघी विठाई माझी असे सावता माळी म्हणतात तसा प्रत्यक्ष कामात जनाबाईला पांडुरंग दिसतो...तो तिला मदत करतो. दळू लागतो...तिची वेणी-फणी करतो. हा पांडुरंगाशी जनाबाईचा एकात्मभाव दर्शवतो.
जनाबाई आपल्या अभंगांत स्वत:ला अनेकदा दासी म्हणवून घेते. त्यामुळे ती खरेच ऐहिकार्थाने दासी होती असा अर्थ काही लोक करतात. पण ते खरे नाही. दासी ही सेविका असते आणि ती मोबदल्यात काम करते. अनाथ जनाबाई दासी नव्हती तर ती दामाजीपंतांची आश्रीत होती असेच आख्याईका दर्शवतात. आश्रीताचे पालन-पोषण करणे, स्वत:च्या कुटुंबापैकी मानणे हे सत्कार्य दामाजीपंतांनी केले. नामदेवांठायी असलेला तिचा भाव पाहता आणि नामदेवांनी तिला दिलेली महत्ता ही एक स्नेहल भगिनी आणि आपल्याच पावलांवर पाऊल ठेवत चाललेली शिष्या या अर्थानेच आहे हे तिच्या अभंगांवरुनही दिसते. "म्हणे नामयाची जनी" यात आध्यात्मिक पातळीवर नामदेवांचा विराट मनुष्यतावाद आणि जनीचा तेवढाच उत्कट प्रतिसाद याचा पडसाद दिसतो. दासी हा शब्द येथे आध्यात्मिक अर्थाने येतो. पांडुरंगशरणता...नामाशरणता या दासीभावात आहे. ऐहिक अर्थाने जनाबाई दासी होती असा नाही. दासी असल्याने तिला कष्ट सोसावे लागले हे दामाजीपंत आणि खुद्द नामदेवांवर अन्याय करणारे आहे. ती दामाजीशेटी-नामदेवांच्या परिवारातील अविभाज्ज्य हिस्सा होती हेच काय ते खरे आहे.
नामदेव पुढे उत्तरेत गेले. राष्ट्रव्यापी कार्य हाती घेतले, तेंव्हा जनाबाई काय करत होती? ती त्यांच्याच घरी राहत होती कि ती वेगळी रहायला गेली? तिच्या अभंगांवरुन असे दिसते कि बहुदा या कळात ती स्वतंत्र वेगळी राहत होती. पांडुरंग मंदिरासमोर ती झोपडी बांधुन रहात असावी. या काळात ती विपन्नावस्थेत असावी. जनाबाईने लग्न केले नाही, पण तिच्व्ह्या मनातील वात्सल्यभाव मात्र जागा होता. श्रीविठ्ठलच तिचा पुत्र! ती मातेच्या महन्मंगल वात्सल्याने विठुरायाला म्हणते ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’!
"पक्षी जाय दिगंतरा..." हे जनाबाईचे अत्युत्कृष्ठ भावकाव्यच म्हणावे लागेल. जनाबाईच्या अंत:करणातील मातृभावना यात ओथंबुन भरलेली दिसते. नामदेव दिगंतात विलीन होताच जनाबाईचा आत्मपक्षीही दिगंतरात उडून गेला....
कधीही परत न येण्यासाठी!
-संजय सोनवणी
(मा. सचीन परब संपादित "रिंगण" या आषाढी विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख)