Thursday, August 27, 2015

शूद्र म्हणजे कोण?

शूद्र म्हटले कि हा अवहेलनेचा, समाजातील दुय्यमत्व दर्शवणारा शब्द वाटतो. . शूद्र हा हिंदू धर्मातील चवथा वर्ण समजायची एक प्रथा आहे. पण मुळात सत्य काय आहे हे तपासायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. वैदिक्धर्मात फक्त आणि फक्त तीनच वर्ण आहेत व ते म्हणजे ब्राह्मण, राजन्य (क्षत्रिय) आणि वैश्य. ऋग्वेदात पुरुषसुक्त वगळता शूद्र हा शब्द  कोठेही येत  नाही. पुरुषसुक्तात क्षत्रिय हा शब्दही येत नाही. येतो तो "राजन्य". अन्य अवैदिक समाजांची दास, दस्यू, अशीही  नांवे येतात. पण ऋग्वेतोत्तर काळात ही समाजनामे अचानक गायब होतात. मग अचानक वैदिक ग्रंथांत शूद्र हे नांव कोठूण आले?

वैदिक संस्कार, वेदांचे अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहेत हे सत्य सर्वांना माहित आहे. म्हणजेच हे तीनच वर्ण वैदिक धर्माचे आहेत. शूद्र वैदिक असते तर त्यांनाही हे अधिकार काही प्रमाणात का होईना असते हे उघड आहे. पण तसे धार्मिक वास्तव नव्हते व नाही. मग शूद्र नेमके कोण आहेत, त्यांचा धर्म काय हे पहायला पाहिजे.

यासाठी आपण अन्य विद्वानांनी शूद्र कोण याबद्दल काय मत दिले आहे हे पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी,  Indian Caste System, edited by R.K. Pruthi, Discovery Publishing House, 2004, page 72.
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." - वि. का. राजवाडॆ, राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना.
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे वतीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर, Some Aspects of Ancient Indian Culture, By D. R. Bhandarkar, 1989, page 12.
४) "शूद्र हे मुळचे क्षत्रीय होते. ब्राह्मणांनी त्यांचे उपनयन करणे बंद केल्याने शूद्र हा चवथा वर्ण बनला."- डा. बाबासाहेब आंबेडकर, शूद्र पुर्वी कोण होते?

आपण आधीच पाहिले आहे कि ऋग्वेदात शूद्र हा शब्द  एकदाच व सर्वात उशीराची रचना असलेल्या पुरुषसुक्तात येतो. हा धर्म स्थापन झाला तो दक्षीण अफगाणिस्तानात. भारतात हा धर्म आला तो प्रचाराच्या माध्यमातुन. दास-दस्यु हे अफगाणिस्तान-इराणातील लोक. ते मागेच राहिल्याने भारतिय समाजांना काहीतरी संबोधन देणे आवश्यक होते. ते शूद्र या शब्दाने साधले.

सर्वात महत्वाची बाब अशी कि शूद्र या शब्दाला कोणत्याही भाषेत (वैदिकही) काहीच अर्थ नाही. या शब्दाच्या व्युत्पत्ती कोणत्याही भाषेतुन साधता आलेली नाही. त्यामुळे हा शब्द कोणत्यतरी मूळ प्राकृत शब्दाचा अपभ्रंश असावा असे स्पष्ट दिसते. म्लेंच्छ हा शब्द  मेलुहा या शब्दाचा वैदिक अपभ्रंश आहे असे पुरातत्ववेत्ते अहमद हसन दानी व थापर यांनी दाखवून दिले आहे. (The Indus Civilization, by A. H. Dani and B. K. Thapar, page 274,)शूद्र या शब्दाचेही असेच असणार हे उघड आहे. अर्थात आपल्याला आज मूळ शब्द माहित नाही. परंतु "असुरद्र" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकेल असे माझे मत आहे.

शूद्र हे तीन वर्णांबाहेरचे लोक हे मत, अगदी बाबासाहेबांचे मत गृहित धरले तरी स्पष्ट होते. ब्राह्मण एवढे प्रबळ होते कि ते अगदी सर्वच (संख्या कितीही असो) क्षत्रियांचे उपनयन करायचे थांबवतील एवढे शक्तीशाली होते हे मत आता पुराव्यांवरुन टिकत नाही. वैदिक साहित्याने, स्मृती-सुत्रांनी  शुद्रंवर बंधने लादली असे साधारणपणे मानले जाते. ते प्रत्यक्षात पाळले गेले काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यातच आपल्या सांस्कृतिक प्रश्नाचे मूळ आहे.

शिशूनाग, नंद व सम्राट चंद्रगुप्त (व त्याचे वंशज) हे शूद्र (अवैदिक) होते हे सर्वमान्य आहे. सातवाहन ते यादव या सत्ताही शूद्र होत्या. दक्षीणेत व पुर्वोत्तर बलीदेशात शुद्र राजेच राज्य  करतात हे ब्राह्मण ग्रंथांनी स्पष्ट म्हणून ठेवले आहे. याचाच अर्थ असा कि वैदिक धर्माला लागू असलेल्या धार्मिक बंधने शुद्रांना लागू नव्हती व ती त्यांनी कधी पाळलेली दिसतही नाही. याचे कारण हा भारतातील मुळचा अवाढव्य समाज होता. या पुर्वापार शैवप्रधान धर्म पाळणा-या लोकांना वैदिकांनी शूद्र हे नांव दिले. यापलीकडे शूद्र या शब्दातुन अवहेलना अथवा हरलेले लोक असा अर्थ काढणे अनैतिकासिक आहे. उलट सर्वच महान सम्राट शुद्रांतुन निर्माण झाले हे सत्य आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नंदांनी नाश केल्याने भविष्यात भारतात सर्वच शूद्र राजे राज्य करतील हे पुराणांतरी येणारे विधान लक्षात घायला हवे.

पाली सहित्यात येणारा "खतिय" हा शब्द क्षत्रियवाचक आहे असे मानण्याचाही प्रघात आहे. वि. का. राजवाडे गौतम बुद्धस "व्रात्य" क्षत्रीय (म्हणजे क्षत्रियत्वाचे वैदिक संस्कार न झालेला) म्हणतात. याचाही अर्थ अवैदिक क्षत्रीय असा होतो. पण खतीय म्हणजे क्षत्रीय नव्हे. मोठ्या प्रमाणात शेती करणा-या लोकांना खतीय (क्षेत्रिय) म्हणत असे डा. आ. ह. साळुंखे यांनी सप्रमाण दाखवुन दिले आहे. हे सत्यही आहे. शुद्धोदनाकडॆ हजार नांगरांनी नांगरावी लागेल एवढी शेती होती त्यामुळे त्याला (व बुद्धालाही) खतीय म्हटले गेले आहे. उत्तरेत शेताला अजुनही खेत म्हणतात. खेतीय-खतीय म्हणजे शेतजमीनींचे मालक. शेतकरी. याचा क्षत्रिय शब्दाशी संबंध नाही.

थोडक्यात शूद्र शब्दातुन काही शोधत बसत, अवहेलनात्मक वापरत बसत आपली फसवणूक करुन घेण्याची आवश्यकता नाही. आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो कथित शुद्रांचा धर्म आहे. वैदिक धर्म अजुनही स्वतंत्र असून त्याच्या धर्मप्रथाही स्वतंत्र आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.


Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...