Tuesday, October 6, 2015

बरोबर?

आम्हाला, कोणीही काही सांगो-लिहो...त्यात तथ्य आहे कि नाही हे तपासून पहायची इच्छा का होत नाही? आम्ही आंधळेपणाने साताठशे वर्ष ठार अडाणीपणाने , जे वाचायलाही मिळत नाही आणि जे ऐकायलाही...त्याच्या लबाडीने निर्माण केल्या गेलेल्या गारुडाखाली आलो...पण आम्ही प्रश्न विचारले नाहित. स्वत:लाही नाही कि कोणालाही नाही. वैचारिक गुलामी कोणी भले लादण्याचा प्रयत्न करत असेल...पण आम्ही त्या गुलामीला आव्हानच दिले नसल्याने ती गुलामी आमची स्वेच्छा होती हे अमान्य करण्याचा मुर्खपणा आम्ही जर करत असू तर पुढच्याही काळात तीच आणि तीच गुलामी अटळ आहे हे निश्चित समजून चला.
जोवर आम्ही जिज्ञासुपणे "हे असे का...ते तसे का?" हे प्रश्न विचारत रातंदिस मेहनत घेत अभ्यास करत नाही तोवर मानसिक गुलामीतून सुटका नाही. याच जिज्ञासुपणाने सर्व ज्ञानशाखांत नवे भर घालत, नव्या ज्ञानशाखा निर्माण करायची आकांक्षा आमच्या हृदयात जन्मत नाही तोवर आम्ही वैश्विक परिप्रेक्षात दुर्लक्षणीय आणि धरतीवरचे ओझेच बनून राहणार यातही शंका नाही. पोट भरणे आणि पुढील नाकर्त्या पिढ्यांना वाढवत त्यांची सोय लावण्याच्या मुर्ख नादात कुतरओढ करत एक दिवस मरण्याला काही केल्या जगणे म्हणता येणार नाही.
जगणे हा एक सोहळा बनवावा लागतो. ज्ञानाखेरीज आणि त्यात भर घातल्याखेरीज जगणे सुंदर होत नाही. मग ते कशातीलही असो. आम्हाला जीवन सुंदर आहे हेच मुळात समजत नसेल तर आम्ही त्याला सुंदर कसे करणार? आम्ही जीवंत आहोत हेच समजत नसेल तर कसे जगणार? लबाड्या करत गुलामी लादणारे शतमुर्ख होते हे कसे सिद्ध करणार? ते सिद्ध केल्याखेरीज आमच्या ऐहिक मुक्तीचा कोणता मार्ग आहे?
मीही प्रश्न विचारले आहेत. मला माझे उत्तर माहित आहे. पण ते मी तुमच्यावर लादणार नाही.
प्रत्येकाने स्वतंत्र प्रज्ञेने उत्तरे शोधायला हवीत...
बरोबर?

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...