Monday, October 19, 2015

...आणि पानिपत.



...आणि पानिपत.

- राकेश पाटील





हि एक समाजैतीहासिक कादंबरी. वरुडे गावातील महार समाजाच्या चार पिढ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास लेखक संजय सोनवणी ह्यांनी तत्कालीन राजकीय इतिहासाच्या एक विस्तृत कालखंडाच्या पार्श्वभूमीवर चितारला आहे. साधारणता: शिवकालीन काळात शेवटच्या टप्प्यात हा इतिहासपट सुरु होतो. पुढे शिवरायांच्या स्वराज्याच्या न्याय्य आणि प्रजाहितदक्ष सामाजिक व्यवस्थेच्या आठवणी तेवढ्या उरत जातात. उत्तरोत्तर मराठेशाहीतील सामाजिक व्यवस्था कशी मोंगली रूप धारण करते आणि पेशवाईत अक्षरश: विषमतेचा कडेलोट होत जातो. त्या सामाजिक स्थित्यंतराचा हा विस्तृत काळपट. भिमनाक - रायनाक आणि येळ्नाक उर्फ हसन - सिदनाक - पुन्हा भीमनाक असा हा चार पिढ्यांचा सामाजिक इतिहास. सुमारे १०० वर्षांचा ह्या सामाजिक इतिहासाची सुरुवात शिवाजीमहाराजांच्या निधनाच्या आसपास होते आणि शेवट पानिपतावर!

औरंगजेब महाराष्ट्रात उतरतो आणि स्वराज्याच्या पडझडीला सुरुवात होते. संभाजीची हत्या , राजारामाचे पलायन, शाहू-येसूबाईला अटक अशा त्या कोसळत्या काळात मोगलांच्या वरवंट्याखाली स्वराज्याची व्यवस्था पार भरडली जाते. तरीही शिवाजीच्या प्रेरणेने भरलेला माणूस त्या मोगलाइचे आव्हान पेलून उभा राहतो. परंतु राजकीय व्यवस्था रंग बदलू लागते. एके काळी औरंग्झेबाची झोप उडवणारे संताजी-धनाजीमध्ये यादवी माजते. शाहुच्या सुटकेने स्वराज्यामाध्येच अंदागोंदी माजते आणि शाहू-ताराबाई, सातारा-कोल्हापूर अशी उभी फुट मराठेशाहीत पडते. त्याची परिणीती पुढे पेशवाईच्या वर्चस्वात होऊन शेवटी ह्या व्यवस्थेची शंभरी पानिपतावर भरते. असा साधारण इतिहास राजकीय इतिहास आहे. कादंबरीत हा इत्यंभूत इतिहास दक्खन-महाराष्ट्रापासून ते उत्तरेत दिल्लीपर्यंत अवघ्या हिंदुस्तानच्या पार्श्वभूमीवर अत्यंत बारीकसारीक तपशिलासह वावरत असतो. ह्या राजकीय इतिहासाचा वापर एका पार्श्वाभूमिसारखाच ठेवून लेखकाने त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सामाजिक इतिहासाची अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे.

एकीकडे हिंदुस्तानांत मोगल साम्राज्याचे विघटन. नवाब-निजाम-वजीर-उमराव ह्यांनी पोखरून काढलेले दिल्लीचे साम्राज्य. मुल्लामौलवीनि अब्दाली-नादीरशहा अशा परकीयांशी संधान बांधून नामधारी केलेलं दिल्लीच्या बादशहाचं तख्त. तर दुसरीकडे दख्खनेत नामधारी झालेलि मराठ्यांची छत्रपतीची गादी. पेशवा-सरदार-सुभेदार आणि ब्राह्मणी व्यवस्थेने नामशेष केलेलि शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना. दिल्लीपासून ते दख्खनेपर्यंत झालेलं हे राजकीय पानिपत. त्यातून निर्माण झालेली सामाजिक अनागोंदी, रयतेची लुटालूट, नासधूस...म्हणजेच सामाजिक पानिपत!

कादंबरी मुख्यत: वरुडे गाव आणि गावकरी ह्यांच्या दैनंदिन जीवनावर बेतलेली आहे. गावातील पाटीलकी, त्या पाटीलकिसाठीची साठमारी, गावातील मोरबा बामण, बलुतेदारी, महार-येसकरी, त्यांची म्हारकी, भावकी...आणि ह्या सर्वांचा मिळून चाललेला गावगाडा... लेखकाने वरुड्यातील ह्या समाजव्यवस्थेला कादंबरीत मध्यवर्ती स्थान दिले आहे. आणि ह्या गावगाड्याचे बदलत्या राजकीय व्यवस्थेने बदललेले रंगरूप ह्याचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे ...आणि पानिपत.
रायानक महार हा कादंबरीतला मध्यवर्ती नायक. त्याचा बाप भिमनाक महार हे वरुड्यातील एक शहाणपण. शिवाजी राजांच्या काळातील महार समाजाच्या सामाजिक अधिकारांवर आणि त्याआधी बिदरच्या बादशाहने विठू महाराला बहाल केलेल्या सनदेवर भाष्य करणारा म्हातारा भिमनाक आणि पुढे चिंध्या रामोशी आणि महार पोरांनी दरोडेखोरी चालू केली तेव्हा बदलत्या काळात त्याला पाठींबा देणारा भिमनाक कादंबरीच्या सुरुवातीच्या काळातील सामाजिक व्यवस्थेचा साक्षीदार असतो. ह्या भिमनाक महाराची पुढची पिढी म्हणजे त्याची दोन मुले रायनाक आणि येळ्नाक. हा रायनाक कादंबरीचा मूळ नायक असावा अशी त्याची मध्यवर्ती भूमिका आहे. कधीकाळी रायनाक संताजीच्या लष्करात पाइक होता. स्वराज्यासाठी शौर्याने लढताना तो जायबंदी होऊन पुन्हा गावात येउन म्हारकीची कामे इमानेइतबारे करतोय. जी धर्म व्यवस्था, जी समाज व्यवस्था रायनाकला पदोपदी तुडवत राहते तिच्याशी तो इमानदारीने निभावत राहतो. कधी बंड करून उठतो आणि आपल्या मित्राच्या बायकोवर वंगाळ नजर टाकणाऱ्या शिंप्याचा खून देखील करतो. कधीतरी दरोडेखोर बनायचं स्वप्न उरी बाळगतो. पण शेवटी त्याच्यातला माणूस ह्या क्षणिक हैवानीवर मात करून उरतो. त्याची बायकोच्या बाळंतपानात गुदारल्याने मेल्या भावाची बायको सिदनाकचा साभाळ करताना रायनाककडे ओढली जाते. गावातही तशी कुजबुज चालते. पण ह्या दुनियादारीला रायानाक आपल्या जन्मजात माणुसकीने जिंकून उरतो. कधी मोघली सैन्याचा मार खाऊन गावाशी बेईमानी न करणारा रायानाक . कधी येलणाकने दिलेल्या अशर्फ्या महारवाड्याला जगविण्यासाठी वापरणारा रायानाक . कधी दुष्काळात गांजलेला रायनाक. चिंध्या रामोशी आणि महार दरोडेखोर पकडले गेले तेव्हा हकनाक मार पडलेला रायनाक. निजामाने गाव जाळलं तेव्हा ढसाढसा रडणारा रायनाक. पाटलाच्या मळ्यावर राबणारा रायनाक. अशा अनेक रूपांत रायनाक महार कादंबरीत वावरतो. अश्रुनी भिजलेला इतिहास सांगत राहतो!

दुसरीकडे ह्या सामाजिक पडझडीच्या काळात विषमतेला आव्हान देणारे आणखी एक स्थित्यंतर घडून येते. ते म्हणजे रायनाकच्या भावाचे, येलनाकचे धर्मांतर. राजगडावरील लढाईत अशार्फिखान बहादुरीने लढणाऱ्या येलनाकला गिरफ्तार करतो. त्याला इस्लामच्या समानतेत आणतो आणि येलनाकचा हसन बनतो. हा अशार्फिखान सुद्धा मोरबा ब्राह्मणाचा बाटलेला चुलता अन्ता जीवाजी असतो. हसन अशर्फिखान सोबत मोगली साम्राज्यात परततो. हसनला अमिना बिवी प्राप्त होते आणि बख्तियार नावाचा त्याचा शहजादा! कादंबरी इथे मुस्लिम धर्मांतराच्या विषयाला हात घालते. इस्लाम स्वीकारणारे अशर्फिखानासारखे सवर्ण हिंदू तसेच हसनसारखे दलित हिंदू ह्यांच्यामाध्यमातून तत्कालीन हिंदू-मुस्लिम धर्मांतरे आणि त्यातील सामाजिक व्यवस्थेतील अभिसरणावर कादंबरी भाष्य करीत राहते.

ऊतरेत मोगल बादशाहीच्या धामधुमीत हसन एका महत्वाच्या लढाईत खुद्द जुल्फीकारखानाला ठार करण्याचा पराक्रम गाजवतो. अशर्फिखान हसनला त्याच्या लढाईच्या तंत्राबद्दल विचारतो तेव्हा हसन शिवाजीराजाची आठवण काढतो. शिवरायांच्या प्रजाहीताची वृत्ती हसन त्याच्या जहागिरीच्या कारभारात बाळगताना दिसतो. ह्याउलट त्याचा मुलगा बख्तियार अत्यंत अय्याश निपजतो. अशर्फिखान आणि सय्यद बंधूंशी संधान बांधून तर त्यांच्यानंतर नजीबखान रोहील्याच्या साथीने हसन आणि बख्तियार उत्तरेत नावारूपाला येतात. येळनाक उर्फ हसनच्या माध्यमातून कादंबरी उत्तर हिंदुस्तानातील आणि दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक इतिहासावर भाष्य करते. त्यातून पुढे अब्दाली, मराठे शिंदे-होळकर, जाट-राजपूत-नवाब ह्यांचे राजकीय डावपेच आणि त्यातून घडलेले पानिपतचे युद्ध हा कादंबरीचा उत्तरार्ध आहे.
मराठेशाहीच्या अंतर्गत यादवीने, शाहुच्या मोगली मांडलीकत्वाने, पेशव्यांच्या बामणशाहीने शिवरायांच्या स्वराज्याच्या मुलभूत संकल्पनेलाच सुरुंग लागल्याने सामाजिक व्यवस्था पार ढेपाळत गेलेली असते. राजकीय व्यवस्था देखील तशीच अध:पतित होत जाते. गावगाड्यावर ह्या बदलत्या सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे ओरखडे उठत राहतात. सत्तासंघर्ष, दुष्काळ, वतनदारी, आपसातील यादवी, वेठबिगारी, महारांचे नरबळी, तामाशाबाजी अशा विविध स्तरांवर सामाजिक अध:पतन घडत राहते. ह्या सामाजिक पानिपताचा थेट महाराष्ट्रातून पार दिल्लीपर्यंत एका विशाल भौगोलिक आणि राजकीय परिप्रेक्षात वेध घेण्याचे काम कादंबरीने केले आहे.

गावातली पाटीलकी आणि त्यासाठीच्या काळेपाटील , पवारपाटील ह्यांच्यातील सत्तासंघर्ष देखील गावगाड्याच्या पाचवीला पुजलेली व्यवस्था. शाहू-ताराबाई संघर्षात भवानराव पाटील स्वत: रायनाकसोबत धनाजीजाधवला जाऊन मिळतो... आणि त्या खोट्या लढाईत भवानराव हकनाक बळी जातो. मराठ्यांच्या आपसातील बेबनावाचा असा फटका गावावर पडतो. पाटलाची बायको सती जाते तेव्हा अवघ्या काही ओळीत लेखकाने सतीचा जो हृदयद्रावक थरार उभा केलाय...! 

.. अमृत पाटलाची बटिक चांगुणा आणि तिचा मुलगा संताजी. संताजी आणि भिमनाकची दोस्ती. चांगुणा एक म्हारीण असल्याचे समजल्याने पाटलाचे झालेले अध:पतन. ह्या सर्व मानवी भावभावनांचा गुंता कादंबरी उलगडत राहते.
एकेकाळी गावात ब्राह्मणी व्यवस्थेचा कट्टर समर्थक असलेला मोरबा ब्राह्मण स्वत:च ह्या सामाजिक पानिपताने हादरून जातो आणि उतारवयात तो ह्या भटकुलशाहीविरोधात बंड करून उठतो. गावात सतीची चाल विरोध करून बंद पाडतो! त्यासाठी ब्रह्मवृंद मोरबालाच वाळीत टाकतो. मानवी भाव-भावनांना लेखकाने किती टोकावर नेउन ठेवलेय, ते कादंबरीच्या पानापानात जाणवत राहते.

रायनाकचा मुलगा सिदनाक महार हा कादंबरीच्या सुरुवातीला अवतरतो खरा, परंतु तेव्हा म्हातारा झालेला रायानाक कथानकाचा ताबा घेत जातो. कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात पेशवाइतिल निघृण जातीय विषमतेच्या व्यवस्थेचा सिदनाक बळी ठरतो. शिवाशिविच्या बामणशाहीने पुण्यात महारांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यास मज्जाव केलेला असतो. त्यात मोरबा ब्राह्मण निवर्तल्याचा सांगावा घेवून पुण्यात आलेला सिदनाकची सावली ब्राह्मणावर पडली. सिदनाकचा निघ्रून शिरच्छेद करून त्याच्या मुंडक्याचा चेंडू करून खेळवला गेला. शिवरायांच्या स्वराज्यातील सामाजिक सलोख्याचे आणि न्यायव्यवस्थेचे इथे खर्या अर्थाने पानिपत होते !

इतपत बदलत्या व्यवस्थेचे अन्याय सहन करून उभा राहिलेला रायनाक सिदनाकच्या ह्या अमानुष हत्येने पुरता कोसळतो. सिदनाकचा मुलगा भीमनाक बापाची वेडी धर्मनिष्ठा सोडून आपल्या आज्जाच्या वळणावर गेलेला. रायनाक त्याला उत्तरेत येळ्नाककडे जाऊन धर्मांतर करण्याचा सल्ला देतो. स्वत: कितीही निष्ठेने ह्या धर्मव्यवस्थेत पिचून राहिलो तरीही शेवटी येळ्नाकने हसन होऊन जे धर्मांतर केले त्या निर्णयापुढे त्याने शरणागती पत्करली, ती अशी.

रायनाकचा नातू भिमनाक आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठतो. आयुष्यभर हिंदू राहून पिचत राहिलेला रायनाक त्याला मुस्लिम होण्याची प्रेरणा देतो. उत्तरेत हसन-बख्तियारकडे पाठवून देतो. भीमनाकचा बालमित्र पाटलाचा लेकावळा संताजी मराठी सैन्यात होता. त्याच्या ओळखीने भीमनाक आणि त्याची बायको सुंद्री दोघे उत्तरेत निघालेल्या भाऊच्या मराठी सैन्यात बुणगे बनून सामील होतात. ऐन पानिपतावर तो बालमित्रच सुन्द्रीला घेवून चक्क पळून जातो. भिमनाक अगतिक तरीही सुडाने पेटलेला.

भीमनाक आपला सूड उगविण्यासाठी भाऊची , पेशव्याची गर्दन मारण्याच्या तयारीत. त्यासाठी तो भाऊच्या शामियाण्यापर्यंत पोहोचतो पण... तसाच तो दुसरीकडे बख्तियारपर्यंत पोहोचतो. त्याला मराठी लष्करातील खबरा पुरवतो. बख्तियार त्याला वापरून घेतो पण दोघांमध्ये कोणतीही आपलेपणाची भावना उरलेली नाही. बख्तियारचाचा म्हणजे काही येलनाक नव्हे. अमिरजादा बख्तियारलां भिमनाक मध्ये स्वारस्य उरलेले नाही. काही ऋणानुबंध उरलेले नाहीत. भिमनाकला बख्तियारचाचा आणि इस्लाम मध्ये स्वारस्य उरलेले नाहीये. मानवी भावभावनांचा हा कल्लोळ लेखकाने कादंबरीभर पेरून ठेवलाय...

अखेर पानिपत घडते. मराठी लष्कर उद्ध्वस्त होते. पखाल घेऊन फिरणारा भिमनाक देखील युद्धाच्या भीषणतेणे पुरता कोसळतो. त्याच्या हाती जखमी भाऊ सापडतो. पण आता सूडच शील्लक राहिलेला नाही. माणुसकी पुन्हा एकदा सर्व अध:पतनातून जिंकून उरते. तो भाऊला वाचवतो. जीवावर खेळून यमुनापार करतो. महिनाभर त्याची सेवा करून भाऊला जगवतो. भाऊला त्याच्या सुडाची कहाणी सांगतो. भाऊ हेलावून जातो आणि क्षमा मागतो! पुरता हरलेला भाऊ मन:शांतीसाठी उत्तरेकडे निघून जातो.

मागे उरतो एकाकी भिमनाक... तसाच वरुड्यात एकाकी रायनाक...आणि उरते ते पानिपत, चार पिढ्यांच्या सामाजिक इतिहासाचे. राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर चितारलेली सामाजिक इतिहासाची हि एक सामाजैतिहासिक कादंबरी. मराठी कादंबरीतला एक मैलाचा दगड. ...आणि पानिपत.


---राकेश पाटील

...आणि पानिपत 
लेखक : संजय सोनवणी
प्राजक्त प्रकाशन 
मुल्य : ४००/-

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...