Saturday, July 1, 2017

तिसरे महायुद्ध होणार?


Inline image 1


खरे म्हणजे जगात, मनात कधीच शांतता नसते. सातत्याने आपण युद्धात मग्न असतो. काही युद्धे माणसाला सकारात्मक भवितव्याकडे नेतात तर बव्हंशी हिंसा आणि विध्वंसाकडे नेतात. जगाचा इतिहास म्हणजे युद्धांचा इतिहास असे म्हणतात ते वावगे नाही. म्हणजे निर्माणकर्ता समाज सतत्याने सृजन करत संस्कृत्या घडवत जातो तर विनाशक प्रवृत्ती त्याचा कसा नाश करता येईल हे पाहतात. असंख्य संस्कृत्या मानवाने उभारल्या आणि मानवानेच त्या उध्वस्त केल्या. अलेक्झांड्रियातील ग्रंथालय रोमनांनी जाळून टाकले तेंव्हा एक संस्कृती नष्ट झाली तर भारतातील विद्यापीठे व ग्रंथालये आक्रमकांनी उध्वस्त करत जाळली तेंव्हाही संस्कृतीच नष्ट झाली. आज इसिसचा भस्मासूर इराक-सिरियातील पुरातन अवशेषांना नष्ट करत संस्कृतीची आठवण मिटवत आहे. बामियानच्या बुद्धमुर्त्या तोफगोळ्यांनी उध्वस्त केल्या गेल्या तेंव्हा संस्कृतीचाच विध्वंस झाला. 

संस्कृती विध्वंसनाचा इतिहास जुना आहे. प्रगतीमुळे मागची संस्कृती बदलत नवी आली तर ती आपण स्वागतार्ह मानू शकतो, पण विध्वंसक प्रेरणांनी झपाटलेल्या सत्तांध/धर्मांध जेंव्हा आपल्याला विरोधी जाणारी संस्कृतीच नष्ट करू पाहतात वा नष्ट करतात तेंव्हा त्यांच्या प्रेरणांबाबत गांभिर्याने विचार करावा लागतो तो संपुर्ण जागतीक समुदायाला. जेंव्हा दोन अथवा तीन गटांतील सत्ता संघर्ष पराकोटीच्या अवस्थेला पोहोचतो आणि हिंसेनेच कोणत्यातरी संस्कृतीचा (मग ती मानवी संस्कृती असो, राजकीय असो कि अर्थसंस्कृती असो) नारनाट करत आपल्या संस्कृतीचे सार्वभौम अस्तित्व निर्माण करता येईल हा गंड वाढतो तेंव्हा युद्धे/महायुद्धे होणे क्रमप्राप्त असते. द्वितीय महायुद्धानंतर जगात आजवर दिडशेपेक्षा युद्धे लढली गेली आहेत. व्हिएटनाम युद्ध तर सर्वात अधिक काळ म्हणजे तब्बल वीस वर्ष चालले. भारत पाकमधीत तीन युद्धेही यात आहेत. द्वितीय महायुद्धोत्तर कालीन युद्धांत दीड कोटीहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले आहेत. आजही अनेक राष्ट्रे युद्धाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. इसिसविरुद्ध युद्ध लवकरच पुकारले जाईल अशी चिन्हे आताच दिसत आहेत.  

जगाने अतिविध्वंसक अशी दोन महायुद्धे पाहिली ती गेल्याच शतकात. शितयुद्धाच्या रुपाने रशिया व अमेरिका (आणि त्यांची समर्थक राष्ट्रे) यांत झालेले शितयुद्ध हे तिसरे महायुद्धच होते असे काही तज्ञ मानतात. या युद्धांत सामील झालेल्या राष्ट्रांची संख्या व ते अनेक राष्ट्रांतील रणभुम्यांवर एकाच वेळीस खेळले गेले म्हणून आपण "महायुद्ध" म्हणतो. सर्वविनाशक तिसरे महायुद्धही याच शतकात, तेही लवकरच खेळले जाईल असे भाकीत तज्ञ वारंवार व्यक्त करत असतात. हे युद्ध सर्वविनाशक अशासाठी होईल कि जगात आज एवढी अण्वस्त्रे आहेत की ती पृथ्वी कैकवेळा नष्ट करू शकतात. दुस-या महायुद्धाची अखेर दोन अण्वस्त्रे जपानवर टाकून अमेरिकेने केली. निर्णायक विजयाचे मार्ग क्षणार्धात खुले झाले. भविष्यात जर अशी वेळ आलीच तर अण्वस्त्रांचा आत्मघातकी मार्ग वापरायची सुरुवात कोणतेतरी माथेफिरू राष्ट्र करनारच नाही याचीही खात्री देता येत नाही. आजकाल अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान एवढे व्यापक पसरले आहे की इसिस व अन्य दहशतवादी संघटनांकडे ते असावे अशी शंका आहे आणि आजच्या जागतिक तणावाचे केंद्रबिंदुही तेच आहे.

गेल्या लेखात आपण मानवजातीच्या भवितव्याबाबत चर्चा केली होती. ते भाकीतही तज्ञ वर्तवत आहेत ते माणसाच्या अतिहव्यासापायी त्याला पृथ्वीचा विनाश झाल्यानंतर परग्रह शोधावा लागतो की काय यावर आधारित आहे. त्याच वेळीस तिस-या महायुद्धाचा टांगता धोकाही संपुर्ण मानवजात व जीवसृष्टी नष्ट तर होणार नाही ना हा प्रश्न आ वासून पुढे आहे तो आहेच. खरे म्हणजे जागतिक स्थिती अशी आहे की एकीकडे आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रत्येक राष्ट्र धडपडत असतांना आपली राजकीय व आर्थिक सत्ताही वाढावी यासाठी भलेबुरे सर्व मार्ग वापरायला मागेपुढे पहात नाही. तिस-या महायुद्धाची शक्यता कोणतेही राष्ट्र नाकारत नाही. किंबहुना असे काही घडले तर आपापली रणनीति काय असावी याचाही विचार केला जात आहे. अमेरिका व रशिया यात आघाडीवर राहिले आहेत. शितयुद्धाच्या काळात तर हे भय सर्वाधिक होते. पण सोव्हिएट रशियाचे विघटन अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाने झाले आणि विनाशक सर्वराष्ट्रीय युद्धाला वीराम बसला. असे असले तरी आजचे राष्ट्रा-राष्ट्रांतले धर्म-अर्थ व राजकीय प्रणालीचे वाद टोकाला गेले आहेत असे आपल्याला दिसते. अनेक राष्ट्रे, जी सहिष्णुता आणि मानवतावादाची मुल्ये जपत आली होती तीही धर्मांध शक्तींच्या आहारी जाऊ लागली आहेत किंवा गेली आहेत असे चित्र आपल्याला जागतिक पातळीवर पहायला मिळते. नवीन अर्थरचनावादही संघर्षाचे कधी सूप्त तर कधी उघड प्रवाह दाखवतो. अर्थसत्ता व राजकीय सत्ता गाजवण्यासाठी धर्मसत्तेचाही आधार घेतला जाणे वा तसे प्रयत्न होणे यातुनच वर्चस्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. जागतिक संघर्षांचे मूळ तेच आहे.

मुळात कोणताही धर्म अथवा अर्थ-राजकीय तत्वज्ञान हे वाईट नसून त्याप्रमाणे व कालसुसंगत अधिक चांगला बदल घडवून न आणण्याची मानवी सनातनी प्रवृत्ती वाईट असते. सर्व जगातील विद्वानांचा व नागरिकांचा ओढा आपला इतिहास किती उज्वल व आमचा वंश कसा श्रेष्ठ अशा पोकळ वल्गना करण्याकडे अधिक असतो. जगाचा इतिहास हा सर्व मानवाचा इतिहास आहे, कोणा एका राष्ट्राचा, संस्कृतीचा अथवा वंशाचा नाही व सर्व भलेबुरे माणसात सर्वत्र आहे हे त्याला समजत नाही. तो पोथीनिष्ठ व व्यक्तीपुजेत रममाण होण्यात धन्यता मानतो. त्याचे राष्ट्रप्रेमही अशाच कृत्रीम भावनांवर उभे असते. त्यामुळे दोन अस्मितांतील संघर्ष अटळ होत जातो. युद्ध सुरुच राहते ते असे.

सर्वकश असे हिंसक तिसरे महायुद्ध झाले आणि त्यात समजा मानवजातच काय सारी जीवसृष्टीही नाश पावली तरी पृथ्वीला वा या विश्वाला काही फरक पडत नाही. ते निर्विकार आहे. मनुष्य ज्याला परमेश्वर/अल्ला/देव वगैरे मानतो तोही निर्विकार आहे. फरक पडेल तो माणसालाच कारण तो भावनिक आहे. भाव-भावना या जशा त्याच्या तो असेपर्यंत शाश्वत प्रेरणा  आहेत तशाच याच भाव-भावना त्याच्या विनाशाचेही कारण आहेत. युद्ध आजही निरंतर सुरु आहे. मनात आणि जगात. कोठे ते सामुहिक विध्वंसाचे रुप घेते तर कोठे व्यक्तीगत हिंसेचे. हिंसेचे वर्गीकरण करता येत नाही. सर्वच हिंसा विकृत असतात. आज युद्धांचे आयाम बदलले असले तरी प्रेरणा त्याच आदिम आहेत. माणुस तसा रोजच या हिंसेचा शिकार होत आहे. तिसरे महायुद्ध झाले तर सर्वांचाच विनाश एका क्षणात होऊन जाईल आणि मग त्यावर खेद-खंत करायला अथवा विजयाच्या ख-या खोट्या गाथा लिहायलाही कोणी राहणार नाही. कोणता मानवी वंश/जात/धर्म/संस्कृती श्रेष्ठ हे ठरवायलाही कोणी नसेल. खरे तर पृथ्वी या कटकट्या मानवापासून वाचेल! 

आम्हाला तिस-या महायुद्धाकडे जायला तसा वेळ लागणार नाही. आणि आम्हीच आमचा रस्ता पुरेपूर बदलवत शाश्वत शांतीकडे जायलाही आम्हाला वेळ लागणार नाही. प्रश्न आमच्या प्रेरणांत आम्ही मानवाधिष्ठित बदल करू शकतो की नाही हा आहे!

(Published in dainik Sanchar, Indradhanu supplement)

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...