
तंत्रशास्त्रांबद्दल भारतात खुद्द हिंदुंचेही गैरसमज आहेत. तंत्रे म्हणजे जादुटोणा, जारण-मारण, वामाचार अशी धारणा अनेकांची आहे. दुसरी धारणा अशी की तंत्रांचा प्रसार केवळ ग्रामीण जनांत होता आणि नागरजन मात्र सभ्य वैदिकप्रधान धर्म पाळत होते. तंत्रे ही वेद व वर्णाश्रमधर्म विरोधी असल्याने त्यांची निंदा जमेल त्या मार्गाने कशी केली गेली हे आपण नंतर पाहुच पण आपण तंत्रोक्त हिंदू धर्माचा उगम कसा झाला हे पाहुयात. तंत्रोक्त धर्माला आगमिक धर्म असेही म्हणतात. आगम म्हणजे आधीचे तर निगम म्हणजे नंतरचे. वेदांना निगम, म्हणजे नंतरचे मानण्यात येते हे येथे उल्लेखनीय आहे. दोनही धर्म धारांत तात्विक व कर्मकांडात्मक पद्धतीत दोन ध्रुवांएवढे अंतर आहे व आज ८५ टक्के हिंदू तंत्रोक्तच धर्म पाळत असतात हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारतातील तंत्रांचे अस्तित्व सिंधू काळापासून सापडलेल्या मुद्रांमधून आपल्याला दिसते. तंत्रे ही प्रामुख्याने प्रतीकात्मक असून विविध भौमितीक आकारांत ही प्रतीके रचली गेली असून त्यांना अप्रकट पण जाणवणारा अर्थ असतो. सिंधू काळातील लिखित साधने नसल्याने त्या प्रतीकांची अथवा धर्माची मांडणी नेमकी काय होती, त्यांचे तत्कालीन आचार्य कोण होते याची माहिती जरी उपलब्ध नसली तरी जी प्रतीके आपल्याला आज मिळतात त्यावरून तत्कालीन धर्मकल्पनांचे तंत्रोक्त स्वरुप मात्र स्पष्ट होते.
तंत्रांचा जन्म सुफलनताविधीतून झाला असे मानले जाते. शेतीचा शोध आणि सुफलनताविधीचा जन्म समकालीन मानला जातो. सुफलनता विधी म्हणजे एक प्रकारे सर्जनाचा विधी. शेतीत नांगरणी, बीजारोपन ते पीक काढणे या नैसर्गिक सर्जक प्रक्रियेत पुरातन मानवाने एक गुढार्थ शोधला. तोच गुढार्थ स्त्रीच्या प्रजननशक्तीशी जोडला जाणे साहजिकच होते. तंत्रे ही प्राय: शक्ती-प्रधान असतात याचे कारण हेच आहे. पुरुषलिंग व योनी याची पूजा जगातील आद्य समाजांनी सुरु केली याचे कारण याच गुढ सर्जनशील शक्तीच्या भावनेतून. स्त्रीचा मासिक धर्मही पुरातन मानवाला आधी चमत्कार स्वरुप वाटला तो या मासिक धर्माचा संबंध चंद्रकलांशी आहे हे लक्षात आल्यामुळे. त्यामुळे माणसाने स्त्री-योनीला सर्जनाचे मुळ मानले व कारण लिंगास मानले. सिंधू संस्कृतीत योनीस्वरुप व लिंगस्वरुप प्रस्तरखंड पुजले जात होते हे पुरातत्वीय पुराव्यांवरून समोर आले आहे. एवढेच नव्हे तर कालीबंगन येथे आपण आज पुजतो तसेच्या तसे शिवलिंगही सापडले आहे. द्वैताकडून अद्वैताकडे होणारा प्रवास स्त्री-पुरुष लिंगांच्या एकीकरणातून झालेला आहे. येथे लिग या शब्दाचा अर्थ चिन्ह असा असून आपण वापरतो तसा जननेंद्रिय असा सरधोपट नाही. चिन्ह हे प्रतीकात्मकच असते हे आपल्याला माहितच आहे.
तंत्रांत प्रत्यक्ष व्यक्तीरुप देवता पुजल्या न जाता निसर्गशक्तीची अथवा देवतांच्वी प्रतीके कल्पिली जातात व त्या प्रतीकांनाच गुढात्मक भाव देत त्याशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न केला जातो. शिवलिंग हे मुळात शिव नांवाच्या कोणत्या देवाचे प्रतीक नव्हते तर ते सर्जक लिंग व योनीचिन्हाच्या एकात्म भावाचे प्रतीकस्वरूप प्रकटीकरण होते. भारतातील बव्हंशे स्वयंभू मानली जाणारी शक्तीस्थाने ही तांदळा स्वरुपात असतात. आजही भारतात शिवाच्या मानवमुर्तीची नव्हे तर शिवलिंगांची अर्चना केली जाते. शिव व अन्य हिंदू देवतांच्या मानवरुपातील प्रतिमा आपल्याला आढळतात त्या कुशाण काळानंतरच्या. तत्पुर्वीच्या नाण्यांवर आपल्याला फक्त तांत्रिक प्रतिमा आढळतात, देवतांच्या मानवाकार प्रतिमा नव्हेत हे लक्षात घेतले पाहिजे.
सिंधू काळातील, म्हणजे सनपुर्व ३१००, संपुर्ण भारतातील अनेक पुराऐतिहासिक स्थळांत मातृदेवता व शिवलिंगांच्या प्रतिमा उत्खननांत मिळालेल्या आहेत. अगदी महाराष्ट्रातही दायमाबाद येथे इसफु २००० मधील; स्फटिकाचे शिवलिंग आणि छिन्नमस्ता मातृदेवतांच्या प्रतिमा आढळून आलेल्या आहेत हे पुरातत्वविद दिलीप चक्रवर्ती यांनी दाखवून दिले आहे. या छिन्नमस्ता देवीप्रतिमांना लज्जागौरी असे म्हटले जाते व या जनधर्मातील समजुतींतून आलेल्या प्रतिमा आहेत असे रा. चिं. ढेरेंसहित बहुतेक विद्वानांचे मत आहे. सिंधू संस्कृतीत वृषभाच्या असंख्य प्रतिमा मिळालेल्या आहेत व वृषभ हा पौरुषाचे प्रतीक मानले जातो. योग हा तंत्रांनीच विकसित केला व योगमुद्रेतील उत्थितलिंग त्रिमुखी योग्याच्या प्रतिमा सिंधू संस्कृतीत मिळालेल्या आहेत. या प्रतीमांना आदिशिव मानले जाते. या संदर्भात डा. रा. ना. दांडेकर म्हणतात कि आदिशिवाचा धर्म आर्यपुर्व काळात भारतात सर्वव्यापी होता. वैदिक धर्मामुळे या धर्माची तात्पुरत्या स्वरुपाची पिछेहाट झाली असली तरी वैदिक धर्म जनमानसाची पकड घेऊ शकला नाही. उलट वैदिक आर्यांनाच आपल्या देवता त्यागत अनार्यांच्या देवतांना स्विकारावे लागले. आर्य-अनार्य वाद हा वांशिक विभेद दर्शवत असल्याने मी वैदिक व अवैदिक या धर्मात्मक विभेद दर्शवणा-या संज्ञा येथे वापरत आहे हे लक्षात घ्यावे.
सिंधू संस्कृती ही अत्यंत प्रगल्भ संस्कृती होती याबाबत कोणत्याही विद्वानाच्या मनात शंका नाही. मुद्रांवर मिळालेल्या तांत्रिक प्रतिमांमुळे येथील धर्म हा शिव-शक्तीप्रधान तांत्रिक धर्म होता. या काळातील लिखित साहित्य मिळत नसले तरी परंपरेत तांत्रिक प्रभाव सर्वव्यापी कसा होता याचे मात्र अगणित भौतिक पुरावे मिळाले आहेत. ही असूर संस्कृती होती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे गंगेच्या खो-यातील यक्ष संस्कृती. असूर म्हणजे सुर्याचेच एक प्राचीन नांव हे मी आधी साहित्य चपराकमधील एका लेखात दाखवून दिले आहे. सुर्याचे मानवी जीवनाशी असणारे दृढ नाते हे सुर्याच्या तांत्रिक प्रतिमांत आजही वापरले जाते. या प्रगल्भ संस्कृतीचे धर्म-तत्वज्ञान होतेच व ते साहित्यरुपात उपलब्ध नसले तरी प्रतीक-चिन्हांच्या मदतीने आपल्यापर्यंत अव्याहत वहात आले आहे. प्राचीन संगम (अथवा चंकम) वाड्मयातही आपल्याला तांत्रिक प्रभावाचे चित्र पहावयास मिळते.
सिंधू संस्कृतीमधील मिळालेल्या प्रतिमा तांत्रिकच आहेत असे सिंधू संस्कृतीचे अभ्यासक निक डग्लस यांनी म्हटले असून सिंधु संस्कृतीतीच्या कालची भारतीय समाजव्यवस्था मातृपूजक होती असे "तंत्रा इन अर्काईक इंडिया" या लेखात नमूद केले आहे. अन्य मुद्रांवरील तांत्रिक मुळ दाखवतांना डग्लस म्हणतो की मोहेंजोदरो येथे सापडलेल्या नर्तकीच्या जगप्रसिद्ध नर्तकीच्या पुतळ्यात तंत्राच्या उमलत्या कमळाचे प्रतीक निर्माण करण्यात आले आहे. कमळ हे योनीचे प्रतीक मानले जाते हेही येथे लक्षात ठेवायला हवे. या नर्तिकेची योनीही उठावदार दाखवली असून तिच्या नृत्यमय आविर्भावात ती मातृदेवता स्वरुपात पाहिली गेली असावी असे डग्लस म्हणतात.
सनपुर्व सहाव्या शतकापासून भारतातील विविध जानपदांची नाणी आपल्याला मिळतात. प्रत्येक जानपदाचे स्वत:चे असे प्रतीक चिन्ह असे. ते चिन्ह त्या त्या जानपदांनी जवळपास इसवी सनाच्या दुस-या शतकातील नाण्यांपर्यंत अव्याहत वापरल्याचे पुरावे आपल्याला मिळतात. उदा. गांधार जानपदाच्या नाण्यांवर सहा त्रिशुळासारख्या पाकळ्या व मध्ये बिंदू असलेला सूर्य दाखवण्यात आला आहे. अशीच समान चिन्हे असलेल्या मुद्रा कोट दिजी येथे मिळाल्या असून त्यांचा काळ इसवी सन पुर्व २६०० असा अनुमानण्यात आला आहे. हे सुफलनाचे चिन्ह म्हणून पुरातन काळापासून वापरण्यात आले आहे. कोट दिजी हे सिंधू संस्कृतीतील एक स्थान असून गांधार प्रांताच्या जवळ आहे. हे चिन्ह गांधार जानपदाचे चिन्ह नंतरही दोन हजार वर्ष तसेच राहिले ही योगायोगाची बाब नव्हे. कुरू जानपदाच्या नाण्यांवर इसपू ४५० पासून जे प्रतीक चिन्ह सर्व नाण्यांवर सातत्याने वापरले गेले ते गतीमान उर्जामय गोलातून दुहेरी आ-यांतून निघालेल्या भरीव गोलांचे. हे चिन्ह तंत्रांत गतीसातत्याचे व सर्जनाचे प्रतीक मानले जाते. कुरु जानपदाच्या नाण्यांवर बिंदुमय गोलाभोवती तीन बाणाकृती व दुस-या बाजुला भरीव बिंदू असलेले त्रिकोण आहेत. त्रिकोण हे तांत्रिकांत योनीचे प्रतीक मानले जाते तर बाणाकृती लिंगाची प्रतिके असतात. आजही ज्या तांत्रिक प्रतिमा (यंत्रे) आपण पाहतो त्यात कमळ व त्रिकोणांचे आकृतीबंध असतात. हे सारे सुफलन विधीतून आले आहेत. जेथे भगवान बुद्धाचा जन्म झाला त्या शाक्य जानपदात सापडलेल्या नाण्यांवर भरीव बिंदुमय पंचकोणाची प्रतिमा आहे. हेही तंत्रांमधील प्रतीक असून त्यातून पंचमुखी तांत्रिक शिव व पंचमहाभुतांचा मुलार्थ अभिप्रेत असतो. किंबहुना तत्कालीन उत्तर ते दक्षीणेत मिळालेल्या सर्व नाण्यांवर तांत्रिक प्रतिमांची रेलचेल आहे. याचाच दुसरा अर्थ असा कि सिंधू संस्कृतीपासून अव्याहतपणे तांत्रिक धारा भारतात प्रबळ राहिली आहे.
तंत्रे म्हणजे केवळ प्रतीके नव्हेत. तंत्रे म्हणजे जादुटोणा नव्हेत. कोणत्याही आदिम समाजात असतात त्या प्रमाणात जादु-टोणा, जारण-मारण, अभिचारादि बाबी तंत्रांत होत्या व आहेतच पण तीच म्हणजे तंत्रे नव्हेत तर जडाचे व चित्शक्तीचे सामरस्य हा तंत्रांचा मुख्य उद्देश्य बनत गेला. आजकाल तंत्रे ही प्राय: वाममार्गी मानली जातात, पण ते तसे नाही. वामाचार अथवा दक्षीणाचार हा तंत्रांचा प्रत्यक्ष साधनेचा एक भाग आहे आणि तो मध्ययुगात उदयाला आला. तंत्रे ही निखळ स्त्री केंद्री आहेत असेही नाही तर शिव-शक्तीतील अद्वैतात कधी शिव तर कधी शक्ती प्राधान्य घेते. या प्राधान्यानुसार शैव कि शाक्त हे भेद निर्माण केले जातात. पण हा भेद वरकरणीचा आहे. शैव व शाक्त यात अंतर्गत सामरस्यच आपल्याला पहायला मिळते. किंबहुना स्त्री-पुरुषाचे सृजनासाठीचे अभिन्नत्व हे शिव-शक्ती या प्रतीकांमधून कल्पिले गेले आहे. पुढे हीच तांत्रिक कल्पना विकसित होत शक्ती ही विश्वजननी तर शिवाला जनकाचे स्थान मिळाले. अर्थात हे सारे प्रतीकात्मक होते. शिव हा कोणी आदिम अलौकिक शक्ती असलेला देव होता असला आविर्भाव त्यात नाही. शक्तीचेही स्थान तसेच आहे. त्या अर्थाने या देवता अजन्मा आहेत असे म्हटले तरी चालेल. किंबहुना या प्रतीकात्मकतेतुनच जे तत्वज्ञान पुढे आले ते चिंतनीय आहे. तंत्रे ही प्राय: इहवादी असून ऐहिक साधनांतुनच मोक्षाप्रत जायचा मार्ग तंत्रे सांगत असते. त्यामुळे ऐहिकता व परमार्थवाद तंत्रांचा पाया बनला. किंबहुना आत्मा ही तंत्रांची मुळची बाबच नाही. देहापेक्षा आत्मा वेगळा आहे ही वैदिक कल्पना तंत्रांना मान्य नाही. त्यामुळे तंत्रांना देहात्मवादी म्हटले जाते. त्यामुळे योगादि शारीरीक क्रियांतूनच दैहिक शक्तीला चिद्शक्तीत बदलवणे हे तंत्रांचे ध्येय मानले जाते.
पुरातन तत्वज्ञाने
वर आपण पाहिले ती प्रतीकात्मकता जी आपल्याला उत्खनित पुराव्यांवरून दिसून येते. आपल्याला वेदपुर्व काळात आरंभ झालेली सर्वच नसली तरी काही तत्वज्ञाने सुदैवाने आज उपलब्ध आहे. अर्थत ती वेदपूर्व आहेत हे आपल्याला सहसा माहित नसते. सर्वात जुने आहे ते सांख्य तत्वज्ञान. हे तत्वज्ञान असूर संस्कृतीतील कपिल मुनीने प्रचलित केले असे मानले जाते. सहा दर्शनांपैकी या दर्शनाला मानले जात असून वेदप्रामाण्य मानल्यामुळे हेहे वैदिक दर्शन आहे असे म्हटले जाते पण त्यात तथ्य नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वेद किमान ६४५ देवता मान्य करतात व सांख्य दर्शन मुळात देवताच काय, सार्वभौम ईश्वरही मान्य करत नाही. किंबहुना सांख्य तत्वज्ञानाला सहमती दर्शवेल असे एकही तात्विक विवेचन वेदांत नाही. गीतेत कृष्णाने विभुतीयोगात कपिलाला अभिवादन केले आहे. कपिल मुनी स्पष्टपणे असूर संस्कृतीतील होता. याचा मुख्य शिष्य आसुरी. हाही अर्थात असूर संस्कृतीमधील होता. सांख्य तत्वज्ञान शिव-शक्ती या आस्तिक द्वैताकडून प्रकृती-पुरुष या तात्विक द्वैताकडे जाते त्यामुळे त्याला नास्तिक म्हनता येत नाही. ते एकमेवाद्वितीय अशा ईश्वराचीचे अस्तित्व व सार्वभौम सत्ता मानत नाही तर तत्वेच विश्वाच्या निर्मितीचे कारण आहेत असे मानते. विश्वनिर्मितीसाठी प्रकृती व पुरुष ही दोन मुख्य तत्वे यात मानली गेली आहेत. प्रकृती ही जड असून पुरुष हा चेतन आहे असे मानले गेले जे तंत्रशास्त्राचे मुलतत्व आहे. सांख्य दर्शन इसपू किमान दोन हजार वर्ष जुने आहे असे या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर सहज जाणवते. तंत्र तत्वज्ञानाचा विकास म्हणून सांख्य तत्वज्ञानाकडे पाहण्यात येते. सांख्य दर्शनात अगदी चवदाव्या शतकापर्यंत भर पडत राहिलेले आहे त्यामुळे नंतरच्या काळातील एखाद्याने तत्कालेन समजुतींनुसार वेदप्रामाण्य मान्य केले असले तरी या दर्शनाचे मुळ त्यावरून वैदिक ठरवता येत नाही. मुळात यातील तत्वज्ञान वेदांशी कसलाही संबंध दाखवत नाही. आदि शंकराचार्यांनी सांख्य दर्शनाला "कपिलस्य तंत्र:" असे म्हटले आहे. सांख्य दर्शन अवैदिक तांत्रिक स्त्रोतांतून आले आहे असे भारतीय संस्कृती कोशातही स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. याच्या मुळ गाभ्यावर वैदिक तत्वज्ञानाचा किंचितही ठसा नसून त्या काळात एक तर वैदिक धर्माचा जन्म तरी झालेला नव्हता किंवा तो भारतात अद्याप यायचाच होता. थोडक्यात सांख्य दर्शन हे असूर संस्कृतीतून व तांत्रिक धर्मातून निर्माण झालेले व तंत्रांशीच सुसंगत असे सांख्य तत्वज्ञान आहे.
योगदर्शन अर्थातच तंत्रांचीच निर्मिती आहे. योग आधी की सांख्य आधी असा विवाद विद्वानांत होत असतो. पण योगाचे अस्तित्व आपल्याला सिंधू काळातील यौगिक मुद्रांपासून दिसते. ऋग्वेदात योग कोठेच येत नाही. किंबहुना हा शब्दच त्यात सापडत नाही. देह आणि चिद्शक्तीचे मिलन होण्यासाठी ज्या विवक्षित शारीर मुद्रा कल्पिल्या गेलेल्या आहेत त्याचे शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योग या शब्दाचा अर्थही जोडने असाच होतो. योग हे तत्वज्ञान नसून साधनाशास्त्र आहे असे मानले जाते. योग आणि सांख्य यांचे नांव जोडीनेच घेतले जाते. किंबहुना सांख्ययोग असेच नांव जोडीने घेतले जाते. त्यामुळे दोन्ही तत्वांचा उगम समांतर असण्याची शक्यता अधिक आहे. पतंजलीच्या योगसूत्रात ’योगशास्त्रे सांख्यप्रवचने’ असाच शेवट केलेला आहे. भारतातील सर्वच धर्मात नंतरच्या काळात योगाला महत्व आल्याने योगशास्त्र हे या देशात वेदाच्याही आधी असावे असे डा. सुधाकर देशमूख आपल्या ’मध्ययुगीन धर्मकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती’ या ग्रंथात म्हणतात. (पृष्ठ १८५) योग हे तत्वज्ञान नसले, प्रत्यक्ष साधनामार्ग असला तरी सांख्य संकल्पनेप्रमाणे प्रकृती व पुरुषाच्या विश्वसर्जक समागमातून सृष्टीची निर्मिती होते या तत्वातुनच देहाच्या व चित्शक्तीच्या समागमातून शिव-शक्तीचे सामरस्य होते अशी मुळ कल्पना योगशास्त्राची आहे व तीही तंत्रांशी सुसंगत आहे. पतंजलीने योगशास्त्र सांगितले तेही शिवाच्या आशिर्वादाने. एवढेच नव्हे तर पतंजली हा शिवाच्या ओंजळीतून जन्माला आला म्हणून त्याचे नांव पतंजली पडले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. किंबहुना सांख्य तत्वज्ञानातूनच योगाला शास्त्राचे स्वरूप आले असे विद्वानांचे मत आहे. पाशुपत मतातही जीव व ईश्वर यांच्या ऐक्यालाच योग मानले आहे. थोडक्यात योग आणि सांख्य ही तंत्राच्या पायावर उभी आहेत. पतंजली हा योग दर्शनाचा प्रवर्तक नसून तो त्या परंपरेतील एक भाष्यकार आहे हेही येथे लक्षात घ्यावे लागते.
देहात्मवाद हा तंत्रांचा पाया असल्याने स्त्री-पुरुष समागमातही त्यांनी आध्यात्मिक अर्थ शोधकला. समागम हे सर्जनाचे निव्वळ साधन नव्हे तर साधनेचेही साधन बनले. अनेक संभोगमुद्रांचा विकास योगातून झाला व ते पुढे वात्स्यायनाच्या कामसुत्रांतून आपल्यापुढे आले. असे असले तरी वात्स्यायनापुर्वीही अनेकांनी या विषयावर लिहिले होते. किंबहुना वात्स्यायनाचे कामशास्त्र नंदीच्या मुखातून साकारले आहे. नंदी हा कामशास्त्राचा आद्य प्रवर्तक परंपरेने मानला जातो. तंत्रांमुळे संभोगाला वासनापुर्तीचे नव्हे तर एका साधनाशास्त्राचे स्वरूप आले. स्त्री-पुरुष समागमातून परम-ऐक्य प्रस्थापित करणे हा मुख्य हेतू बनून संभोगाला एका उदात्त पातळीवर नेले गेले. त्याआधारीत अनेक तंत्रे तर बनलीच व स्वाभाविकपणे अनेक संप्रदायही निर्माण झाले. त्यात काही अश्लील आहे असा तंत्रधर्माच्या प्रभावकाळात कोणाला वाटत नव्हते.
किंबहुना मंदिरांची निर्मिती तंत्रांना समोर ठेऊनच करण्यात आली. गर्भगृह ते शिखर ही तांत्रिक प्रतीके मंदिरांच्या माध्यमातून विलसित झाली. पूजा ही अवैदिक आहे हे सर्वज्ञात आहेच. प्राणप्रतिष्ठेपासून ते पुजेच्या पद्धती या तंत्रांनीच आखुन दिल्या. आजही शैव मंदिरांतील पुजा या कोणत्या ना कोणत्या तांत्रिक शाखेशीच संबंधित असतात. बव्हंशी शैव मंदिरांत मिथुनशिल्पे असतत याचे कारण स्त्री-पुरुष समागमातून कैवल्याचा अनुभव ही तांत्रिक कल्पना त्यामागे आहे. जगन्नाथ मंदिराच्या छतावरही मिथुन शिल्पे आहेत व ती तंत्राच्या प्रभावातून आली आहेत हे उघड आहे.
आदि शंकराचार्य हे वैदिक होते असे सध्या मानण्याची पद्धत असली तरी ते वास्तव नाही. तंत्रशास्त्रांच्या अधिका-यांत त्यांचे नांव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्मच मुळात शाक्त परंपरा पाळणा-या घरात झाला. श्री विद्यार्णव, सौंदर्यलहरी व दक्षिणामूर्तिस्तोत्र हे त्यांचे ग्रंथ तंत्रांना वाहिलेले असून श्रीचक्र पुजेचे प्रवर्तक ते आहेत. वेदांतावर भाष्य करणारे शंकराचार्य आणि सौंदर्यलहरी लिहिणारे शंकराचार्य एकच की दोन वेगळे आहेत ही शंका अभ्यासकांनी अनेकदा घेतली आहे. खरे तर वेदांत साहित्य हे वैदिक नसून "वेदांचा अंत घडवून आणणारे साहित्य’ म्हणून त्यांना वेदांत साहित्य असे म्हटले जाते. बरीच प्राचीन उपनिषदे व खुद्द ब्रह्मसूत्र हे वैदिक सिद्धांतांच्या पुर्ण विरोधी जात तंत्र सिद्धांतांनाच आधार घेत तत्वज्ञान मांडतात. शंकराचार्यांनी कोठेही वेदांवर भाष्य केलेले नाही हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. पण भारतीयांचा इतिहास विकृतीकरणाच्या छंदामुळे अनेकांचे असे वैदिकीकरण करण्यात आले आहे, पण त्यांचे साहित्य प्रत्यक्षात तसे काहीही दर्शवत नाही. अर्थात नंतरच्या काळात शंकराचार्यांचे मठ वैदिकाश्रयी झाल्याने शंकराचार्यांच्या व्यक्तित्वावर वैदिक स्तर चढवण्यात आले. पण त्यांचे तांत्रिक मुळ मात्र पुसटले गेले नाही. वैदिक धर्मप्रभाव निर्माण करण्यासाठी अनेकांचे असे वैदिकीकरण करण्यात आले आहे. पण वास्तव हे आहे की अथर्ववेदावर तंत्रांची दाट छाया आहे. वैदिकंवरील तांत्रिक प्रभाव म्हणून या आद्य घटनेकडे पहाता येईल. पण त्यामुळेच की काय अगदी मनुस्मृतीही अथर्ववेदाला चवथा वेद म्हणून मान्यता देत नव्हती. इसपू पहिल्या-दुस-या शतकापर्यंत हा तांत्रिक प्रभावाखालचा पण वैदिक देवतांना मुख्य मानणारा वेद व त्याचे अनुयायी दुर्लक्षितच राहिले. वेदत्रयी हाच शब्द रुढ राहिला. अथर्ववेदात तांत्रिकांतील काही पंथांत लोकप्रिय असलेल्या जारण-मारण, शत्रुनाश ते आजारांचा नाश यासाठी मंत्र दिलेले आहेत. तंत्रांतील हा तसा दुय्यम व अप्रगल्भ लोकांकडून वापरला जाणारा भाग. वैदिकांमध्ये अथर्वन शाखा आज इतकी दुर्लक्षित आहे की या शाखेचे अनुयायी आज जवळपास लुप्तप्राय आहेत. कारण यातील मुख्य भाग हा वैदिक तत्वज्ञानाशी व कर्मकांडाशी विसंगत आहे. पण वैदिक धर्माने आगमिक तंत्रांना पर्याय देण्यासाठी व उपनिषदांचा प्रतिवाद करण्यासाठी जी उपनिषदे निर्माण केली त्यात मात्र यज्ञ हीच योनी आहे व समीधा हे लिंग असून अग्नी हे वीर्य आहे अशी कल्पना मांडायला सुरुवात करत नव-प्रतिकात्मकता आणली. पण ती फारशी यशस्वी झाली नाही. मुळ तंत्रधारेला वैदिक तंत्रे तोंड देवू शकली नाहीत.
हीच बाब उपनिषदांची आहे. उपनिषदीय तत्वज्ञानाचा पाया सांख्य आहे हे विद्वानांनी मान्य केले आहे. वैदिक धर्माच्या प्रसार विदेह व मगध प्रांतात झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी जी तत्वपरंपरा निर्माण झाली ती म्हणजे उपनिषदे. उपनिषदांनी उघड उघड वेदांचा व यज्ञांचा निषेध केला आहे. वेद हे तरुन जायला निरुपयोगी आहेत कारण त्या फुटक्या नावा आहेत असे मुंडकोपनिषद म्हणते. उपनिषदांची निर्मिती असूर संस्कृतीची उपसंस्कृती असलेल्या गंगेच्या खो-यातील यक्ष संस्कृतीमधून झाली. औपनिषदिक "ब्रह्म" आणि वैदिक "ब्रह्म" हे समानार्थी नाहीत. औपनिषदिक ब्रह्म व यक्ष हे सामानार्थी शब्द असून ’उत्पत्तीचे अद्भूत कारण’ असा त्याचा अर्थ आहे तर वैदिक ब्रह्म या शब्दाचा अर्थ वैदिक ऋचा (अथवा मंत्र) असा होतो. मंत्र जेथे रचले गेले ते ब्रह्मावर्त व वैदिक मंत्रांचे अर्थस्पष्टिकरण करतात ते ब्राह्मण ग्रंथ. याचा औपनिषदिक ब्रह्माशी संबंध नाही. उपनिषदे योग व सांख्य तत्वज्ञानानुसार जातात. डा. मालती शेंडगे यांनी हा यक्ष व ब्रह्म संबंध त्यांच्या "The Language of the Harappans: From Akkadian to Sanskrit" ग्रंथात विस्ताराने विषद केला आहे. अगदी गीतेतील काही प्रक्षिप्तता सोडली तर ती ब्रह्मसुत्रे व सांख्य तत्वज्ञानावर आधारित आहे हे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे. या आद्य तांत्रिक उपनिषदांना प्रत्युत्तर देण्यासाठी नंतर वैदिक उपनिषदेही लिहिली गेलेली आहेत. त्या उपनिषदांनी अनेक सांख्य संकल्पनांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करीत वेदमाहात्म्य प्रतिपादित केले. पण हा उपनिषदे लिहिण्यातील परस्परविरोध लक्षात न घेतल्याने उपनिषदे तात्विक गोंधळ माजवतात असा आरोप उपनिषदांवर विद्वानांनी केला. मुळात उपनिषदे दोन धर्मधारांमधीत वाद-प्रतिवाद आहे हे लक्षात घेतले व मग उपनिषदांचे परिशिलन केले की हा संभर्म दूर होतो हे अभ्यासकांनीही लक्षात घ्यायला हवे.
तंत्रे एकीकडे प्रतीकपुजेतून, स्त्री-पुरुष सामरस्याकदून वैश्विक सामरस्याचा प्रयत्न साधत असतांना त्याच तत्वांच्या आधारावर तत्वज्ञान व साधनात्मक पद्धतींच्या पूजा ते योग या पद्धती विकसीत करत राहिली. भक्तीला प्राधान्य दिले ते अतिप्राचीन मानल्या जाना-या पांचरात्र या संप्रदायाने. हा संप्रदाय कृष्णाच्या सात्वत वंशात जन्माला आला व तो अत्यंत लोकप्रियही होता. अगदी पहिल्या शतकापर्यंत या संप्रदायाचा विस्तार व मान्यता लक्षात येईल एवढे पुरावे आज उपलब्ध आहेत. हा सगुण भक्तीला प्राधान्य देनारा तांत्रिक संप्रदाय होता. महाभारताने या संप्रदायाच्या मताला जास्त प्राधान्य दिले आहे. तंत्रांतील प्रतीकपुजा या संप्रदायाने भक्तीकडे वळवली. पांचरात्र संप्रदायात दर्शन, मंत्र, यंत्र, माया, योग, मंदिरनिर्माण वगैरे तांत्रिक कर्मकांदात्मक चर्चा असून पंचमुखी शिव या तांत्रिक संकल्पनेलाच पाच व्यूह म्हणून पांचरात्र (येथे रात्र या शब्दाचा अर्थ महाभुते असा आहे.) असे नांव या संप्रदायाला पडले. कृष्ण हा अवैदिक होता याबद्दल शंका रहात नाही. महाभारताच्या तिस-या शतकातील संस्करनांत पांचरात्र संप्रदायाचे वैदिकीकरण करण्याचे प्रयत्न केले गेले असले व कृष्णाला वैष्णव ठरवण्याचे प्रयत्न केले गेले असले तरी पांचरात्र मताच्या लोकांना वैदिक पंक्तीला घेत नसत असे भारतेय संस्कृती कोशात (खंड पाच, पृष्ठ-४७७) सांगितले आहे. पांचरात्रिक लोक यज्ञाच्या विरोधात होते. पुराणांनीही पांचरात्र मताचा निषेधच केला. कुर्मपुराण तर म्हणते की गेल्या जन्मी ज्याने गोवधाचे पातक केले आहे तो या जन्मी पांचरात्रिक होतो. असो. दोन धर्मधारांत असा एकमेकांचा विरोध स्वाभाविकच म्हणावा लागेल. पण पांचरात्रांत जी व्युहकल्पना आहे त्यात वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध आहेत व हे सारे कृष्णाचे निकटसंबंधी आहेत. या संप्रदायाचा जन्म कृष्णानेच घातला की त्याच्या घराण्यात तो पुर्वीपासून चालत आलेला होता हे सांगता येणे मात्र अवघड आहे. कारण ही समान नांवे असलेले कृष्णाचे पुर्वजही असू ्शकतील कारण कृष्णाच्या हयातीतच हा पंथ दखलपात्र बनला होता हे उघड आहे. परंतू कृष्णाचेच नंतर वैदिकीकरण झाले. त्याला गुप्तकालात विष्णुचा अवतार बनवण्यात आले व कृष्णाचे तंत्रमार्गी अवैदिक स्वरूप जनमानसात पुरते बदलत गेले. खरे तर नारायण व विष्णुचा काहीएक संबंध नाही. ऋग्वेदात नारायण नांवाचा देव नसून एक ऋषी आहे व त्यानेच पुरुषसुक्ताची रचना केली आहे. अन्यत्र हे नांव विष्णुचे अथवा कोणा देवतेचे म्हणून एकदाही आलेले नाही. पण तरीही उत्तरकाळात ही सांगड घालत नारायणाचे मुळचे रुपही पुसटून टाकण्यात आले. अर्थात पांचरात्र संप्रदाय जरी यामुळे मागे पडला असला तरी या संप्रदायाने दिलेले भक्तीचे तंत्र मात्र भारतात एवढे लोकप्रिय झाले की त्यातून वैदिक धर्मीयही सुटले नाहीत.
तंत्रे ही प्राय: इहवादी आहेत हे आपण पाहिले. देहात्मवादी आहेत. ते बाह्य जग व चित्शक्तीची सांगड घालतात. सुरतक्रीडा हे तंत्राचे एक अंग आहे. असे असले तरी पंचमकार साधनेला वेठीला धरत तंत्रांना बदनाम करण्याची मोहिम दहाव्या शतकानंतर सुरु झाली. तंत्रात स्त्री-पुरुष समागम (सर्वच धर्मियांत असतो त्याप्रमाणे) अपरिहार्य असला तरी त्याचे आध्यात्मीकरण तंत्रांनी केले. नंतर हे अध्यात्म बौद्ध व वैष्णव पंथातही आले. तांत्रिक ज्याला शिव-शक्ती समजतात त्यालाच बौद्धांत प्रज्ञा व उपाय असे म्हटले जाते तर वैष्णवांत राधा-कृष्ण हे रस व रती असे समजले जातात. पण पंचमकार साधना म्हणजे मांस, मद्य, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन असे प्रत्यक्षार्थाने मानले जाते हे मात्र खरे नाही. तंत्रांत जशी प्रतिकात्मकता महत्वाची आहे तसेच सांकेतिकताही. कुलार्णवतंत्र व महानिर्वाण तंत्राने ही सांकेतिकता उलगडून दाखवली आहे. मद्य म्हणजे तेज, मांस म्हणजे वायू, मत्स्य म्हणजे आप, मुद्रा म्हणजे पृथ्वी तर मैथून म्हणजे जगताला आधारभूत असे आकाश. (महानिर्वाण तंत्र, ७.१०९-१११) तर कुलार्णवतंत्र म्हणते "ब्रह्मरंध्राच्या ठायी असलेल्या सहस्त्रदल कमलातून जो द्रव गळतो तो मद्य म्हणून प्राशन करतो तो मधुपायी असून अन्य सर्व मद्यपी आहेत." शिवाय पंचमकार व पंच महाभुते या संकल्पना पंचमुखी शिवाशी संबंधित आहेत हेही येथे लक्षात घ्यायला हवे. तंत्रांत बराचसा भाग जाणीवपुर्वक सांकेतिक बनल्याने जसे गुढ वलय त्यांना प्राप्त झाले तसेच बदनामकर्त्यांना संधीही देणारे झाले. अर्थात प्रत्यक्ष स्त्री-पुरुष संभोगालाही तंत्रांनी उच्च दर्जाचे आध्यात्मिक रुप दिले हे आपण वर पाहिलेच आहे. पण त्याचा गैरवापर करणारे भामटे जसे सर्व धर्मात असतात तसेच आगमिक धर्मातही होतेच.
त्यातून ज्यांना ही सांकेतिकता समजत नाही अशा सामान्य पंथांनी पंचमकाराचा शब्दश: अर्थ घेत काही गूह्य संप्रदाय स्थापन केले. बौद्ध धर्मातील वामाचारातही असेच घडले व त्यांच्यामुळेच तंत्रांना बदनाम करण्याची संधी मिळाली व त्याविरोधात मोहिम उघडली गेली हे येथे लक्षात घेतले पाहिजे. या बदनामीतून संभाजी महाराजही सुटले नाहीत. पंचमकाराचा तात्विक अर्थ शब्दश: घेत ही बदनामी केली गेली हे उघड आहे. खुद्द तंत्रांनीच त्यातील सांकेतिकता समजावून सांगुनही असे झाले हे दुर्दैवच आहे.
खरे तर बव्हंशी पुराणे तंत्राधारित आहेत. ज्यांना आपण शुद्रांसाठीचे "पौराणिक संस्कार" म्हणतो ते तंत्रांतुनच आलेले आहेत. पौराणिक धर्म म्हणजे नंतरचा धर्म अशी जी मान्यता आहे तीच समूळ चुकीची आहे. शुद्रांसाठी वैदिक संस्कार नसण्याचे कारण म्हणजे ते वैदिक धर्मीय नव्हते तर तंत्र (अथवा आगमिक) धर्मीय होते म्हणून त्यांच्यासाठी तंत्रोक्त संस्कार असणे स्वाभाविक होते. उदाहणार्थ गरुड पुराणातील अनेक विधी तंत्रांमधून (शैव आगमे) आलेले आहेत. पुराणांवरील शैव आगमांचा प्रभाव मार्क एस. जी. डिझ्कोव्स्की यांनी आपल्या "The Canon of the Saivagama and the Kubjika Tantras of the Western Kaula" या ग्रंथात विस्ताराने दाखवून दिला आहे.
तंत्रे एवढी पुरातन असल्याने त्यात अनेक प्रादेशिक अथवा तात्विक पंथ असने स्वाभाविक होते. तंत्रांचे पुरातन तत्वज्ञानात्मक ग्रंथ मिळत असले तरी पुरातन कर्मकांडात्मक ग्रंथ मिळत नाहीत याचे कारण मुळात तंत्रे ही इहवादी व व्यक्तीवादी आहेत. यज्ञकर्म जसे सामुहिक कर्मकांड होते तसे पुजा, योग हे काही सामुहिक कृत्य नव्हते. त्यात सोपेपणा होता. इहवादी असल्याने तंत्रांनी कृषी, रसायनशास्त्र, मंदिरांसह वास्तुरचनाशास्त्र, देहशास्त्र इत्यादि भौतिक शास्त्रांचा तंत्रात्मक पाया घातला. सुश्रुत संहिता अथवा चरक संहिता हा वैदिक नव्हे तर तंत्रांचाच भाग होता असे डा. सुधाकर देशमुखांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. शरीरोत्पत्तीक्रम, शरीरस्थान निर्णय, शरीरातील वायुंची माहिती, स्नायुंची माहिती या सर्व बाबी या ग्रंथात तांत्रिक बाजु मांडत सांगितल्या आहेत. शवसाधनेतून अघोरपंथीय मानल्या जाणा-या तांत्रिकांनी प्रेतांच्या शवविच्छेदनातून हे शास्त्र मांडले व त्यांचा प्रत्यक्ष विकार बरे करायला वापरले. शल्यतंत्र, भूतविद्यातंत्र, अगादतंत्र ते रसायनतंत्र एवढी तंत्रे एकट्या शल्यतंत्राचे भाग पडले. अर्थात त्याला आजच्या अर्थाने विज्ञान म्हणता येणार नाहे कारण त्यात भुत-प्रेतादि व्याधींचेही उपाय दिले आहेत. तरीही तंत्रांनी आधुनिक शरीरविज्ञानाचा पाया घातला असे श्री. एन. एन. भट्टाचार्य आपल्या "History of the Tantrik Religion" या ग्रंथात म्हणतात. मनाचे ठिकाण हृदय नव्हे तर मेंदू आहे असे तंत्रांनीच प्रथम स्पष्ट केले हे शरीरशास्त्राच्या अभ्यासातुनच साध्य झाले असावे असे मत विद्वानांचे मत आहे.
मानवी देह हा विश्वाचे लघुत्तम अथवा अंशरुप आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे अद्वैतत्व येथे अभिप्रेत असते. शिव-शक्तीच्या वैश्विक मिलनाचे, म्हणजेच द्वैताकडून अद्वैताकडे नेणारे प्रतीक शिवलिंग म्हणून पुरातन काळापासून पुजले जाते. शक्तिस्वरूप शिव हेच अंतिम सत्य तंत्रे मानतात. तांत्रिकांच्या सर्व पंथांत थोड्याफार फरकाने हेच अंतिम सत्य मानले आहे. किंबहुना भारतीय तत्वज्ञानाचा उदय व विकास हा बव्हंशी तंत्रांमधून झालेला आहे.
तंत्रानी वेद व वर्णाश्रमयुक्त सामाजिक उतरंडीची व्यवस्था वैदिक धर्मप्रचार जोशात सुरु असतांनाही मान्य केली नाही. त्यांचा हिरीरीने विरोध केला. कारण मुळात विषमता हा त्यांचा पायाच नव्हता. स्त्री-पुरुषातील समानता हा तर तंत्रांचा पायाच. त्याचे प्रतिबिंब समाजजीवनावर केवढे प्रबळ होते हे आपल्याला महाभारताच्या मुळ कथेवरुनच दिसते. सत्यवती, कुंती, द्रौपदी, हिडिंबा अशा स्त्रीया घडू शकल्या त्या तांत्रिक (अथवा आगमिक, कारण तंत्रग्रंथांना आगमे मानले जाते.) वातावरणातच. वैदिक स्मृतीबंदिस्त वातावरणात असे होणे अशक्यप्राय होते हे कोणाही अभ्यासकाच्या सहज लक्षात येईल. मुळात रामायण व महाभारताची मुळ कथा ही वेदपूर्व आहे हे अंतर्गत प्रमाणांवरुनच सिद्ध होते.
पण आपल्या इतिहासाची मांडंणीच अज्ञानाने वेदांपासून सुरु केली जात असल्याने अन्य घटनांना वेदोत्तर कालक्रमात बसवण्याच्या नादात असंख्य विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या सामाजिक इतिहासाचेही आपले आकलन दुषित राहिले आहे. सातवाहन काळातही तंत्रांचेच प्राबल्य होते हे जसे गाथासप्तशतीवरून सिद्ध होते तसेच शिलालेखांवरुनही. सातवाहन स्वत:ला "आगमान निलया" म्हणजे आगमांचे आश्रयस्थान असे म्हणवून घेतात. तत्कालीन समाजजीवन अत्यंत मोकळे ढाकळे व समताप्रणित दिसते ते तंत्रप्रभावामुळे. गाथासप्तशतीत कोठेही समाजात वर्णव्यवस्थेला मान्यता असल्याचे पुसटशेही संकेत मिळत नाहीत व याचे गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. इसवी सनाच्या दुस-या शतकातील अंगविज्जा या ग्रंथातही तत्कालीन समाजाचे जे चित्र मिळते तेही अभेदात्मक आहे. नंतरच्या काळातील अभिजात नाटकांतुनही आपल्याला जसे मुक्त समाजाचे चित्र मिळते. वसंतोत्सव अथवा मदनोत्सवात तरुण-तरुणींना दिली जानारी मोकळीक आजच्या स्वतंत्रतावादी म्हणवणा-यांनाही चकित करेल अशी आहे. मंदिरांत कलांचा आविष्कार झाला तो तंत्रांमुळे. मिथुनशिल्पे ही केवळ वासना उद्दिपित करण्यासाठी नसून स्त्री-पुरुष कलात्मक सामरस्यातून वैश्विक सामरस्य साधण्याची प्रेरना देण्यासाठी बनवण्यात आली होती. तत्कालीन लोकांना त्यात अश्लील काही वाटण्याची शक्यता नव्हती. पण पुरुषप्रधान उतरंडीयुक्त समाजरचना मानणा-या वैदिक धर्माचा प्रभाव नंतर हळूहळू राजाश्रयांमुळे वाढू लागला.
गुप्त राजवटीने या राजाश्रयाची सुरुवात केली व क्रमश: देशभर अत्यंत वेगळे तत्वज्ञान प्रसृत झाले व तसा मोकळा समाज दहाव्या शतकानंतर संपुष्टात येत गेला. अर्थात याला केवळ वैदिक प्रभाव हे एकमेव कारण नसून श्रेणी संस्थेच्या राजसंस्थांच्या हस्तक्षेपाने, लागोपाठ पडलेल्या दुष्काळांमुळे व मुस्लिम आक्रमणांमुळे झालेला -हास व तिचे झालेले जातिव्यवस्थेत रुपांतरण हेही एक कारण होते. अर्थसत्ताच धर्म व संस्कृती यांचे अस्तित्व टुइकवते. अवनतीचा काळ आला की समाजव्यवस्थेवरही एक दौर्बल्य येवू लागते. तसेच आगमिक धर्माबद्दल झाले.
गुप्त राजवटीने या राजाश्रयाची सुरुवात केली व क्रमश: देशभर अत्यंत वेगळे तत्वज्ञान प्रसृत झाले व तसा मोकळा समाज दहाव्या शतकानंतर संपुष्टात येत गेला. अर्थात याला केवळ वैदिक प्रभाव हे एकमेव कारण नसून श्रेणी संस्थेच्या राजसंस्थांच्या हस्तक्षेपाने, लागोपाठ पडलेल्या दुष्काळांमुळे व मुस्लिम आक्रमणांमुळे झालेला -हास व तिचे झालेले जातिव्यवस्थेत रुपांतरण हेही एक कारण होते. अर्थसत्ताच धर्म व संस्कृती यांचे अस्तित्व टुइकवते. अवनतीचा काळ आला की समाजव्यवस्थेवरही एक दौर्बल्य येवू लागते. तसेच आगमिक धर्माबद्दल झाले.
असे असले तरी आठव्या-नवव्या शतकापासुनच काश्मिरी अभिनवगुप्तप्रणित शैव तंत्रांपासून ते नाथ, वीरशैव इत्यादि असंख्य पंथांनी उत्तर व दक्षीणेत तांत्रिक समतेचे तत्व समाजात जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात विसोबा खेचरांनी ’षड्स्थळी’ ग्रंथ लिहून वीरशैव व नाथ संप्रदायात एकवाक्यता साधण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांनीही नाथ संप्रदायाचे तत्वज्ञान अमृतानुभवातून मांडले. परंतू या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नाही. वैदिक प्रभावातून समाज कधीच बाहेर आला नाही व आजही त्या परिस्थितीत काही बदल घडला आहे असे दिसत नाही.
याचे मुख्य कारण असे की तेराव्या शतकानंतर तंत्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास लयाला गेला. तंत्र-ग्रंथांची आज संख्या दीड लाखाहून जास्त असली तरी त्यांचा संगतवार अभ्यास केला गेला नाही. नंतरच्या तंत्रांत व तांत्रिक तत्वज्ञानांत वेदांचे उल्लेख असणे स्वाभाविक असले तरी त्यांचे सर्वस्वी अवैदिक स्वरुप व समाजसंस्थेचे दिग्दर्शन या बाबी हळू हळू वैदिक प्रभावाखाली विस्मरणात गेल्या. पाश्चात्य पंडितांची पहिली नजर वैदिक साहित्याकडे पडली व त्यांनी त्यांचा सखोल अभ्यासही केला पण तंत्रांकडे त्यांनी दुर्लक्षच केले कारण ती त्यांच्यापर्यंत आधी पोहोचलीच नाहीत. त्यामुळे वेद हेच भारतीय संस्कृतीचे मुलस्त्रोत आहेत असे मानण्याकडे कल वाढला व त्यातून आपले विद्वान अजून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे आपण आपलीच मुळ धारा विसरलो. वैदिकांना तांत्रिक धर्माचे आकर्षण नव्हते असे नाही. अनेकांनी त्यात प्रवेश केला व अनेकदा आचार्यही बनले पण वैदिकांनी त्यांचे धार्मिक स्थान घटवून टाकले. संभाजी महाराजांबरोबर बलिदान करणारा कवी कलश कोणाला आदर्श मित्र वाटत नाही यामागे हेच कारण आहे.
तंत्रांचा उगम शिवापासून झाला. त्याच्य पाच मुखातून आद्य पाच तंत्रे प्रकटली. पांचरात्र संप्रदाय हा आज माहित असलेला पहिला संप्रदाय या पंचतत्वातुनच निर्माण झाला. पंचमहाभुते ही कल्पनाही तांत्रिकच. पुढे देशभर तांत्रिकांचे असंख्य आचार्य व संप्रदाय निर्माण झाले. समतेमुले स्त्रीयाही तंत्रमार्गात अधिकारी होत असल्याने योगिनींची संख्याही मोठी होती. त्या गुरुही बनू शकत होत्या. मुक्ताई चांगा वटेश्वर व विसोबा खेचरांच्या गुरुपरंपरेत येते ते उगाच नाही. ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताईही तंत्रयोगातील अधिकारी होती हे तिच्या उपलब्ध असलेल्या काही अभंगांवरून सिद्ध होते. तंत्रांचा पसारा एवढा अवाढव्य आहे की त्याचे समग्र विवेचन एक ग्रंथ लिहुनही पुर्ण होणार नाही. सिंधू काळापासून आजतागायत वेदपूर्व तंत्रांचाच मुख्य प्रवाह वाहत आहे पण ती तंत्रे आहेत याची आपल्याला जाणीव नाही. फार कशाला, दिवाळीचा सण हा मुळचा यक्षरात्री व पुजा केली जायची ती कुबेराची हे आपल्याला आज माहितही नसते. आगमिक धर्म हा समतेचा, स्त्रीस बरोबरीचे तर कधी श्रेष्ठ स्थान देणारा धर्म आहे हे आम्हाला आजच्या विषमतेने गजबजून नष्टप्राय होऊ पाहणा-या समाजाला समजणे आवश्यक आहे. पुजेपासून सांख्यादि तत्वज्ञानांची परंपरा असलेला हा धर्म आज वैदिक छायेत आलेला आहे व त्यापासून दुर होत समतेचा भारत निर्माण करायचा तर पुन्हा तंत्रांकडेच वळावे लागेल!
-संजय सोनवणी
(Published in Deepavali issue of Sahitya Chaprak, 2017)