मला तसं काहीच व्हायचं नव्हतं. त्यामुळे काहीच न झाल्याचे सुखही नाही किंवा दु:खही नाही. मला चालायचच होतं असही नाही....वाटलं तर चाललो....थांबलो तर थांबलो....मी मलाच स्वत:चा नियंत्रक होऊ दिले नाही त्यामुळे इतर कोणालाही माझा नियंत्रक कसा होऊ देईल? अगदी देवालाही नाही कि ईश्वरालाही नाही.
आणि एखाद्या दिशेने, बेभान, यशासाठी दौडत राहिल्याने यश मिळते, सुख मिळते यावर ज्यांचा विश्वास असेल त्यांचा असेल....
माझा माझ्यावर सोडला तर दौडण्यावर नाही कि थांबण्यावरही कधीच विश्वास नव्हता.
सुखद हवेसोबत...निर्झरांच्या कलकलाटासोबत....पाखरांच्या चिवचिवाटासोबत
आणि माणसाच्या अनंत काळाच्या साकळलेल्या वेदनांसोबत...
घोंगावत्या वादळांसोबत....
कधी कधी थांबलो...
फक्त पाहत विश्वाचे अनुपम विभ्रम....
त्याचाच एक हिस्सा बनत.
मला काहीच व्हायचे नाही...कोणीही बनायचे नाही....!
-Sanjay Sonawani