Saturday, January 6, 2024

आक्रमणे आणि वसाहतवादाचा इतिहास

 बेरीज-वजाबाकी

प्राचीन काळापासून भारतीय उपखंडावर अनेक आक्रमणे झाली. ग्रीकांपासून अनेक आक्रमक जमातींनी किंवा इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीजांसारख्या देशांनी भारतात वसाहती स्थापन केल्या. इंग्रजांनी जवळपास संपूर्ण देशावर राज्य केले. या परकीय आणि साम्राज्यवादी आक्रमणे आणि त्यांच्या भारतातील सत्तेमुळे भारतीयांवर नेमके काय भलेबुरे परिणाम झाले आणि आज त्यातून आम्ही काय शिकायचे याचा सविस्तर आढावा या सदरामधून नियमित घेतला जाईल.

आक्रमणे आणि वसाहतवादाचा इतिहास

आक्रमणे आणि वसाहतवादाचा इतिहास जागतिक आहे. हा इतिहास मानवाच्या आदिम काळापर्यंत मागे जातो. अन्न, स्त्रिया, चरावू कुरणे, नदीकाठचा प्रदेश ताब्यात ठेवणे यासाठी आदिम टोळीमानव दुस-या टोळ्यांशी संघर्ष करत असे. हा संघर्ष अर्थात रक्तरंजित असायचा. हरलेल्या लोकांना, स्त्रीयांना गुलाम करणे व त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणे हा “टोळीधर्म” प्राचीन जगामध्ये निरलसपणे पाळला जायचा. जगणे महत्वाचे असल्याने या धर्माला सर्वोच्च महत्व होते. ऋग्वेद आणि अवेस्तामध्ये पाहिले तर आजच्या अफगानिस्तांच्या भूमीवर किमान ४८ टोळ्या वावरत होत्या. त्या आपापसात किती रक्तरंजित युद्धे करत असत याची वर्णने ऋग्वेदात आलेली आहेत. किंबहुना ऋग्वेदातील असंख्य मंत्र शत्रूच्या नाशासाठी आणि आपल्या उन्नतीसाठी प्रार्थना करणारे आहेत. मुळात प्राचीन जग हे संघर्षरत असल्याने त्यांचे देवही शस्त्रसज्ज असणे स्वाभाविक होते. उदा. वैदिक आर्यांची मुख्य देवता इंद्र ही युद्धात आपले नेतृत्व करते अशी वैदिक आर्यांची भावना होती. अर्थात राष्ट्र या संकल्पनेचा मुळात उदयच झालेला नसल्याने “राष्ट्रवाद” हा हेतू या संघर्षामागे नव्हता.  ज्या भागावर आणि जोवर आपले नियंत्रण तोवरच त्या प्रदेशाला आर्य “राष्ट्र” म्हणत. स्थलांतर झाले कि राष्ट्रस्थानही बदलत असे.

भारतीय उपखंडातही असंख्य टोळ्या प्राचीन काळापासून राहत आलेल्या आहेत. त्यात काश्मीरमधील नाग, पिशाच्चसारख्या टोळ्या असोत कि अंग, वंग, कोसल, वत्स, मत्स्य, पुंड्र, शुद्र, अभिर इत्यादीसारख्या उत्तर भारतातील टोळ्या असोत. दक्षिण भारतातही औंद्र, पौंड्र, शबर, मुतीब, अहिर  यासारख्या जवळपास ५० टोळ्या होत्या याची माहिती आपल्याला भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या वैदिक आर्यांच्या शतपथ ब्राह्मण या ग्रंथातून मिळते. याही टोळ्या आपापसात लढत असत. एकमेकांना त्यांच्या प्रदेशांतून हुसकावून लावायचा प्रयत्न करत असत. कधीकधी त्यांचे संबंध मैत्रीपूर्णही असत. यामुळे कधी उत्तरेच्या टोळ्या दक्षिणेत तर कधी दक्षिणेच्या टोळ्या उत्तरेत घुसण्याचा इतिहासही पुरातन आहे. त्यामुळे भारतात पुरातन कालापासून सांस्कृतिक, वांशिक सरमिसळ होत गेली हीही बाब महत्वाची आहे. धर्मश्रद्धांचेही आदानप्रदान होत शिव-शक्ती हे देशभरचे आदिम आराध्य त्यातूनच निर्माण झाल्याचे आपल्या लक्षात येईल.

याच काळात मध्य आशियातूनही अनेक स्थलांतरे व आक्रमणे झाली. काश्मीरमधील पिशाच्च समुदाय हा मध्य आशियातून हिमालयीन घाटरस्त्याने आलेला होता. सुरुवातीला काश्मीरचे नाग लोक या पिशाच्च समुदायाशी युद्धरत होते. पुढे त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले आणि पिशाच्च समुदाय काश्मीर खो-याचा नियमित रहिवासी झाला. सिंध प्रांतातील व काश्मीरमधील भारतीयांनीही मध्य आशियात जाऊन तेथे आपले राज्य वसवले होते असा वृत्तांत आपल्याला युवान श्वांग या चीनी प्रवाशाने दिलेल्या माहितीवरून कळते. कुरु टोळी किरगीझस्तानातून भारतात आली आणि कुरु-पांचाल परिसरात स्थायिक झाली. हे कुरु म्हणजेच महाभारत प्रसिद्ध कुरु असे अनेक विद्वान मानतात. ते आपल्या मुलप्रदेशाला उत्तर-कुरु म्हणत तर स्वता:ला दक्षिण-कुरु असे म्हणत असत. थोडक्यात ही सारीच टोळीराज्ये होती आणि कोणती टोळी मुळची कोठली हे सांगता येईल अशी पुराव्याने सिद्ध होणारी उदाहरणे फार क्वचित आहेत. वैदिक आर्य भारतात शरणार्थी म्हणून आले व ज्या भागात वसले त्याला ते आर्यावर्त म्हणून लागले. पूर्वोत्तर राज्यांतही अशा अनेक स्थलांतरीत टोळ्या आल्या आणि त्यांनी तेथे राज्ये वसवली. पुढे तेराव्या शतकात अशाच स्थलांतरीत जातीपैकी अहोम जमातीने आपली सत्ता स्थापन केली व ती जवळपास साडेपाचशे वर्ष टिकली. ही हे लोक चीनमधील युनान प्रांतातून स्थलांतरित झालेले लोक होत. किंबहुना उत्तरपूर्व राज्यांतील बव्हंशी जमाती चीन-ब्रम्हदेशातून आलेल्या आहेत व यामुळे तेथील संस्कृतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

प्राचीन भारतीयांनीही देशाबाहेर अनेक वसाहती स्थापन केलेल्या आहेत. सनपूर्व २२०० मधील ऑक्सस नदीकाठावरील शोर्तुगाई येथे १९७५ मध्ये सापडलेली सिंधू संस्कृतीच्या लोकांनी वसवलेली व्यापारी वसाहत एका उत्खननात सापडली. पुढे अशीच वसाहत कंदाहार प्रांतात मुदिगाक येथे सापडली. याच काळात सुमेरीयातील गुआब्बा शहरानजीक सिंधू खो-यातील लोकांनी व्यापारी वसाहत स्थापन केली होती व त्यांनी सुमेरियन राजांशी काही युद्धे केल्याचाही इतिहास इष्टीकालेखांत मिळतो. या वसाहतींचा उपयोग अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्यात व कच्च्या मालाची आयात करण्यासाठी केला जायचा. किंबहुना सिंधू खो-यातील लोकांना पूर्व आणि पश्चिम आशिया ते सुदूर इजिप्तपर्यंत व्यापार नियंत्रित करण्यासाठी या वसाहतीन्चा खूप उपयोग झाला. इजिप्तच्या फराओंच्या दफनात सिंधू खो-यातील वैडूर्याचे पुरावे मिळालेले आहेत. नैसगिक साधनसामग्रीसोबतच सांस्कृतिक देवाण-घेवाणी होतच राहिल्या. इराण व मध्य आशियातून या भागात प्रक्रिया केलेले तांबे आयात केले जाई. सिंधू संस्कृतीचा उत्तर व मध्य अफगानिस्तानशीचा व्यापारी व सांस्कृतिक संबंध वसाहती प्रत्यक्षात स्थापन करण्याआधीपासून अनेक शतके असला पाहिजे हे उघड आहे. पुढे भारतीय उपखंडातील कोणत्या ना कोणत्या टोळीच्या (वंशाच्या) लोकांनी समुद्रमार्गे जावा, सुमात्रा, बाली, श्रीलंका  सारख्या बेटावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केलेली आहे. भारतीयांनी देशाबाहेर आक्रमण केले नाही हा सिद्द्धांत समूळ चुकीचा आहे. ज्ञात इतिहासात चंद्रगुप्त मौर्याने तर आठव्या शतकात काश्मीरच्या ललितादित्याने आपली सत्ता पश्चिम व मध्य आशियात विस्तारल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. पूर्व इराणमध्ये अनेक शतके भारतीय राजांच्या सत्ता होत्या हेही पुराव्याने सिद्ध झालेले आहे. इराणमधील सायरस राजापासून पश्चिमोत्तर भारतावर पर्शियन सत्ताही स्थापन झाली. हूण, शक, कुशाण, तुर्क अफगाणसारख्या टोळ्यांनीही उत्तर भारतात स्थलांतर अथवा आक्रमण करून सत्ता स्थापन केल्या. हा सविस्तर इतिहास आपण या लेखमालिकेत पाहणारच आहोत. पण येथे लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट म्हणजे ही स्थलांतरे आणि आक्रमणे जगण्याच्या संघर्षातील भाग होती. मुळात “राष्ट्र” ही संकल्पनाच नसल्याने ही कोणती “राष्ट्रीय” आक्रमणे नव्हती.

-संजय सोनवणी  

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...