या भागात आपल्याला पाणिनीचा काळ निश्चित करावयाचा आहे. गोल्डस्टकर
यांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीत शाक्यमुनीचा उल्लेख नाही यावरुन पाणिनी हा बुद्धपुर्व काळातील असला पाहिजे असा नि:ष्कर्ष काढला आहे हे आपण दुस-या भागात पाहिले आहे. पण हे खरे नाही. ते कसे हे पाहण्यासाठी अष्टाध्यायीतील खालील उल्लेख पाहुयात.
१.१.१६ : संबुद्धौ शाकल्यस्येतावनार्षे I
१.२.३३: एकश्रुति दुरात सम्बुद्धौ !
वरील दोन्ही सुत्रांत पाणिनीने संबुद्ध व सम्बुद्ध हे शब्द योजिले आहेत. हे दोन्ही शब्द बौद्ध वाड्मयात फक्त गौतम बुद्धाला उद्देशुन विपुल प्रमानात येतात. उदा.
"९९४: संबुद्धो ति वचो सुत्वा उदग्गो बावरि अहु।
सोकस्स तनुको आसि पीतिं च विपुलं लभि।।१९।।
९९५: सो बावरि अत्तमनो उदग्गो। तं देवतं पुच्छति वेदजातो।
कतमम्हि गामे निगमम्हि वा पुन। कतमम्हि वा जनपदे लोकनाथो
यत्थ गन्त्वा नमस्सेमु१(१म.-नमस्सेम.) संबुद्धं दिपदुत्तमं२(२म.-द्वि.)।।२०।।
९९६: सावत्थियं कोसलमन्दिरे जिनो। पहूतपञ्ञो वरभूरिमेधसो।
सो सक्यपुत्तो विधुरो अनासवो। मुद्धाधिपातस्स विदू नरासभो।।२१।।
मराठीत अनुवाद :-
९९४. संबुद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर बावरि हर्षित झाला, त्याचा शोक कमी झाला, आणि त्याला अत्यन्त आनंद वाटला. (१९)
९९५ त्या हर्षित, आनंदित आणि सन्तुष्ट बावरीनें त्या देवतेला विचारलें, ‘तो लोकनायक कोणत्या गांवांत, शहरांत किंवा प्रदेशांत राहतो कीं, जेथें जाऊन त्या द्विपदोत्तम संबुद्धाला आम्ही नमस्कार करूं शकूं? (२०)
९९६ तो विपुलप्रज्ञ, विपुलश्रेष्ठबुद्धि, अप्रतिम धुरीण, अनाश्रव, मूर्धाधिपात जाणणारा, मनुष्यर्षभ, शाक्यपुत्र, जिन कोसल देशांतील पवित्र ठिकाणीं श्रावस्ती येथें राहतो.(२१) - (सुत्तनिपात)
मुळात "बुद्ध" हा शब्द ही बौद्ध ध्रर्माची देणगी आहे. "संबुद्ध" ही बुद्धाची विशेष अशी उपाधी आहे जी अन्य कोणासाठीही वापरली गेलेली नाही. असे असतांना गोल्डस्टकर यांच्या नजरेतुन ही दोन सुत्रे कशी सुटली याचे आश्चर्य वाटते. या सुत्रांवरुन पाणिनीचा काळ निश्चयाने बुद्धोत्तर ठरतो व तो ज्या स्तुपांचा उल्लेख करतो तो उल्लेख बौद्ध स्तुपांना उद्देशुनच आहे हेही येथे स्पष्ट होते. म्हणजे गोल्डस्टकर, म्यक्समुल्लर, अल्विस प्रभुतींनी अनुमानिलेला काळ चुकीचा आहे हे स्पष्ट आहे.
प्रो. वेबर यांनी ह्यु-एन-त्संगच्या विवरणाच्या आधारे इ.स. १४० हा काळ अनुमानिला आहे हे आपण पाहिले आहेच. वेबर यांचे काळाचे अनुमान जवळपास बरोबर आहे, परंतु त्यांनी फक्त ह्यु-एन-त्संगवरच अवलंबुन हा काळ काढला आहे, ते मात्र योग्य वाटत नाही. ह्यु-एन-त्संग ज्या पद्धतीने पाणिनीची कथा वर्णितो ती मित्थकथेच्या स्वरुपातील आहे. मित्थकथा या सर्वस्वी फेटाळता येत नसल्या तरी एकाच पुराव्यावर अवलंबुन अनुमान काढणे हे धाडसाचेच कार्य ठरेल यात शंका नाही.
आत येथे आपण कथासरित्सागराच्या अधाराने पाणिनीचा काळ निश्चित करता येतो काय हेही सकारात्मक द्रुष्टीने तपासुन पाहुयात. कथासरित्सागरात पाणिनी व कात्यायनाचे एकत्र नांव येते. कथासरित्सागर हे मुळ गुणाढ्याच्या ब्रुहत्कथेचे संस्कृत असले तरी गुणाढ्य, वररुची व पाणिनीची माहिती कथासरित्सागराच्या पहिल्याच कथापीठात येते व ह भाग गुणाढ्याने रचलेला नसुन ती सोमदेवाची निर्मिती आहे. कथापीठात सोमदेव आपल्याला गुणाढ्यासंबंधीच्या (व वररुचीव पाणिनीच्या) ज्याही दंतकथा ऐकल्या वा मिळवल्या त्या येथे मांडत त्याने ब्रुहत्कथेची निर्मिती कशी झाली हे सांगितले आहे. सोमदेवाने कथासरित्सागर लिहिला तो अकराव्या-बाराव्या शतकात. त्यानुसार पाणिनी व वररुची. (कात्यायन) हे एकाच हर्ष नामक गुरुचे शिष्य होते. व दोघेही नंदकाळातील होते. पण येथेच सोमदेव सांगतो कि वररुचीच्या मृत्युनंतर लगेच गुणाढ्याचा जन्म झाला व तो सातवाहन राजसभेतील महत्वाचा कवि होता. सातवाहन घराण्यात सुनंदन नामक एक सातवाहन राजा होवून गेलेला आहे. समजा हाच तो नंद राजा सोमदेवाला अभिप्रेत असेल तर पुढील चर्चा करता येवू शकते.
सातवाहन काळ हा इसपु २२० ते इसवी सन २३० असा आहे. गुणाढ्य नेमक्या कोणत्या सातवाहन राजाच्या कालातील होता हे सोमदेवाने उल्लेखिलेले नाही त्यामुळे हा सातवाहन राजा नेमका कोण याबाबत निश्चयाने सांगता येत नाही, पण तो हाल सातवाहनाच्या दरबारातील कवि असावा असे एक अनुमान आहे, कारण स्वत: हाल हा काव्यप्रेमी होता. हाल सातवाहन हा सातवाहन राजघराण्यातील सतरावा राजा होता. त्याचा काळ हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या आधी ९ वर्ष एवढा येतो, म्हणजे हाल सातवाहन हा इस. ५०च्या आसपास सत्तेत आला. त्याने पाच वर्ष राज्य केले असे मत्स्यपुराण म्हणते. कथासरित्सागरातील माहिती पाहता गुणाढ्य हासुद्धा पाणिनीच्या जवळपास समकालीन ठरतो, वा फारतर एका पिढेचे अंतर असू शकते. परंतु कात्यायन व वररुची हे एकच असेही कथासरित्सागरवरुन दिसते, पण हे इतिहासाला धरुन नाही.
. कात्यायन व वररुची हे एकच आहेत असे कथासरित्सागरावरुन दिसते. प्रत्यक्षात प्राक्रुत प्रकाश रचणारा वररुची तर पाणिनीच्या सुत्रांवर "वार्तिका" लिहिणारा कात्यायन अशी विभागणी पाश्चात्य विद्वानांनी केलेली आहे. ही विभाजणी करण्याचे कारण म्हनजे हेमचंद्राने नवव्या शतकात जेथे जेथे प्राक्रुत प्रकाशचा उल्लेख केला आहे तेथे तेथे त्याचे श्रेय वररुचीला तर जेथे जेथे वार्तिकांचा प्रश्न येतो तेथेतेथे कात्यायनाला त्याचा कर्ता मानले आहे. सबब या दोन व्यक्ती भिन्न आहेत असे गोल्डस्टकर यांचे मत आहे, आणि ते मान्य करण्यासारखेच आहे.
गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक क्षत्रपाचा पराभव केला हा इतिहास आपल्याला माहितच आहे. याच नहपानाला जैन साहित्यात "नरवाहन" व कोठे "नहवाहन" असेही संबोधले गेले आहे. (संदर्भासाठी पहा: "Problems of Shak satvahana's History" by Dr. K.P. Jayaswal) "दत्त" ही उपाधी क्षत्रपच घेत असत. उदा. व्रुषभदत्त हे नहपानाच्या जावयाचे नांव होते. "अधुदक इयन" हा क्षहरात वंशाचा संस्थापक मानला जातो. अधुदक इयन या नांवाचे संस्कृतीकरण म्हणजे उदयन असे होवू शकते. कथासरित्सागराच्या संपुर्ण कथेचा डोलारा हा राजा उदयनाचा पुत्र नरवाहनदत्तावर उभा आहे. नहपान आपल्या हयातीत अत्यंत पराक्रमी राजा म्हणुन प्रसिद्ध असून त्याने सातवाहनांचे जवळपास सर्वच साम्राज्य गिळंकृत केले होते जे गौतमीपुत्राने पुन्हा जिंकुन घेतले. प्रत्यक्ष इतिहासावरुन अधुदक इयन हा नहपानाचा पिता अथवा (जर अधुदक इयन नंतर त्याचाच धाकटा भाऊ प्रथम सत्तेवर आला नसेल तर) आजोबा होता. परंतु यावरुन कथासरित्सागराचे नायक हे नहपान तथा नरवाहनदत्त व अधुदक इयन तथा उदयन होते व ही ऐतिहासिक पात्रे होती हे दुर्दैवाने सिद्ध होत नाही. याचे कारण म्हणजे नहपान हा क्षत्रप उज्जैनीचा राजा होता तर ब्रुहत्कथेचा नायक नरवाहनदत्त हा वत्स देशाचा राजा होता. योगंधरायन हा नरवाहनदत्ताचा आजोबा होय. वत्सराज उदयन, योगंधरायन व नरवाहन दत्तावर अनेक नाटके तसेच अन्य कल्पनारम्य लेखन झालेले आहे.
त्यामुळे आपल्याला कथासरित्सागराचा उपयोग पाणिनीचा काळ निश्चित करण्यासाठी होत नाही हे उघड आहे. आता पाणिनीचा काळ निश्चित करण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे ग्रंथार्गत प्रमाणे आणि दुसरा म्हणजे बाह्य प्रमाणे.
ग्रंथार्गत प्रमाणांवरुन एक बाब आपण सिद्ध केली आहे व ती म्हणजे पाणिनी हा बुद्धोत्तर काळातील आहे. बौद्ध स्तुपांची निर्मिती ही अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली हे आपणास माहित आहेच. अशोकाचा काळ हा सनपुर्व ३०४ ते २३२ असा मानला गेला आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो कि स्तुपांची निर्मिती ही अशोक सत्तेवर आल्यानंतर व बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सनपुर्व २७० ते २५० च्या आसपास सुरु झाली असावी. यावरुन पाणिनी हा त्या काळात...म्हणजे इसपु २५० ते त्यानंतर कधीही झालेला असू शकतो हे उघड आहे.
आता सर्वात महत्वाचे बाह्य प्रमाण विचारात घेवू. (ग्रंथार्गत अजुन काही महत्वाची प्रमाणे आहेत, पण त्याबद्दल पुढे.)
पाणिनीपुर्व मानले जाणारे ग्रंथ व पाणिनीय व्याकरणावर आधारीत अभिजात ग्रंथ आपण येथे विचारात घेवुयात. पाणिनी जर सनपुर्व ८००, ४५० वा २५० मद्धे झाला असेल तर त्या काळानंतरच्या साहित्यावर पाणिनीय व्याकरणाचाच प्रभाव असला पाहिजे हे उघड आहे. पाणिनीय व्याकरण सिद्ध होण्यापुर्वीच्या साहित्याला वैदिक, ब्राह्मणकाळ अशा संद्न्या आहेत. महाकाव्य काळाला आर्षकाळ मानण्याची प्रथा आहे. रामायण-महाभारताला आर्ष साहित्य मानले जात असुन त्यावर पाणिनीय व्यकरणाचा प्रभाव नाही, उलट या दोन्ही महाकाव्यांवर प्राक्रुत भाषांचा व व्याकरणाचाही प्रभाव मोठा असल्यानचे स्पष्ट दिसते. रामायण-महाभारतावर प्राक्रुताचा एवढा प्रभाव का, याबद्दल आपण पुढे स्वतंत्र चर्चा करणार असल्याने येथे एवढेच पुरेसे आहे. पाणिनीय व्याकरणाधारित साहित्य निर्मितीचा काळ हा "अभिजात संस्कृत" चा काळ मानला जातो.
अभिजात संस्कृतमधील साहित्याची निर्मिती गुप्तकाळात सुरु झाली, हे सर्वमान्य मत आहे. हा काळ तिसरे ते सहावे शतक असा आहे. याच काळात पाणिनीय संस्क्रुताधारित नाटके, शास्त्रीय, गणीतीय, तंत्रद्न्याने, आयुर्वेद आदि विविध क्षेत्रातील विषयांना वाहिलेले असंख्य ग्रंथ निर्माण होवू लागले भास, कालिदास, आर्यभट्ट, वराहमिहिर, विष्णु शर्मा, वात्स्यायन आदि दिग्गज लेखकांनी पाणिनीय संस्कृतमद्धे विविधांगी रचना केल्या वा त्या मुळच्या प्राकृत कृती अभिजात संस्कृतात अनुवादित करण्यात आल्या. याच काळात ब्रह्मसुत्रे, कल्पसुत्रे आदि सुत्र-साहित्यही निर्माण झाले.
पाणिनी हा "सुत्र" या शैलीचा आद्य प्रणेता होय. "अष्टाध्यायी" हा सुत्रप्रकाराचा सर्वश्रेष्ठ व आद्य ग्रंथ होय. "सुत्र" म्हणजे अत्यंत अल्पाक्षरी, अक्षरश: गणिती पद्धतीने मांडलेले सुत्ररुपी सिद्धांत होत. दोन ते चार-सहा शब्दांत विपुल अर्थ-विस्तार होईल अशा पद्धतीने सुत्ररचना केलेली असते. यातुन अवाढव्य साहित्य अत्यंत थोडक्यात शब्दबद्ध होते. असे असले तरी सर्वसामान्य वाचकांना ती समजणे जवळपास अशक्य असेच असल्याने भाष्यांच्या मदतीखेरीज त्यांचा अर्थ लागत नाही. त्यामुळेच कात्यायनाने "वार्तिका" व पतंजलीने "महाभाष्य" व सतराव्या शतकातील भट्टॊजी दीक्षितांनी "सिद्धांतकौमुदी" लिहुन पाणीनीय व्याकरण सुलभपणे समजावे यासाठी भाष्ये लिहिली. ब्रह्मसुत्रांवरचे पहिले भाष्य सातव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी लिहिले. असो.
पाणिनीचा काळ सनपुर्व कोणत्याही शतकातील असता तरी त्या व्याकरणाधारित साहित्यसृजन किमान शतकभराच्या काळात सुरू व्हायला हवे होते. पण आपण कालिदासाच्या नाटकांचा काळ विचारात घेतला तर तसे झाल्याचे दिसुन येत नाही.
ऐहोळे प्रशस्तीवरुन कालिदास सन ६३४ पुर्वीचा आहे हे सिद्ध झालेले आहे. त्याच्या नाटकांतील भाषेवरुन व क्षुल्लक पात्रे जी प्राकृत बोलतात त्यावरुन कालिदासाचा काळ इसपु तिस-या शतकापार जावु शकत नाही हे श्री ए.ए. म्यक्डोनेल यांनी आपल्या कालिदासावरील ब्रिटानिका द्न्यानकोशात लिहिलेल्या लेखात स्पष्ट केले आहे. संस्कृतचे तद्न्य डा. रामचंद्र तिवारी यांनी शेकडो पुरावे (भाषाशास्त्रीय, पुरातत्वीय व तत्कालीन सामाजिक) अभ्यासुन कालिदासाचा काळ सन ३०० ते ४७० असा अंदाजिला आहे. थोडक्यात कालिदासाचा काळ हा कसल्याही स्थितीत इसवी सनाच्या तिस-या शतकाच्या पलीकडे जावु शकत नाही हे उघड आहे. उलट तो सन ४०० ते ५०० यामधील काळात झाला असावा असे माझे अनुमान आहे. अभिजात संस्क्रुतचा आद्य नाटककार भास हा इसच्या तिस-या शतकात झाला. त्यामुळे कालिदासाच्या क्रुतींचा काळ हा किमान शंभर वर्षांनी अर्वाचीन ठरतो. म्हणजेच कालिदासक्रुतींचा काळ इसचे चवथे ते पाचवे शतक हाच बरोबर आहे.
परंतु तो समजा तिस-या शतकातच झाला असे मानले तरी पाणिनी त्याच्यापुर्वी चार-पाचशे वर्ष आधी होवून गेला हे मत टिकत नाही, कारण या मधल्या काळात पाणिनीय संस्कृताधरीत एकही रचना, धार्मिक असो कि तत्वद्न्यानात्मक, मिळत नाही. रामायण व महाभारताचे शेवटचे संस्कृत संस्करण हे इसवी सनाच्या दुस-या ते चवथ्या शतकातील मानले जाते. (संदर्भ: भारतीय संस्क्रुती कोश, संपादक-पं. महादेवशास्त्री जोशी) परंतु व्याकरणकारांची जी नांवे महाभारतात येतात त्यात पाणिनीचे नांव येत नाही. याचाच अर्थ असा कि महाभारत कर्त्याला पाणिनी माहित नव्हता, कारण तो तोवर झालेलाच नव्हता.
याचाच अर्थ असा कि पाणिनीचा काळ हा सरासरी दुसरे शतक एवढा येतो. पुढच्या शंभर वर्षांत कात्यायनाच्या वार्तिकांमुळे पाणिनीय व्याकरणाचा प्रसार झाला व सरासरी तिस-या शतकापासून पणिनीय व्याकरणावर आधारीत सहित्यसृजन होवू लागले असे स्पष्ट दिसते.
अर्थात एवढाच पुरावा पुरेसा नाही याची मला पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे अष्टाध्यायीतीलच काही अंतर्गत प्रमाणे आपण तपासुन पाहुयात.
१. 1.2.37: न सुब्रह्मण्यायां स्वरितस्य तूदात्त: I हे सुत्र आपल्याला तपासून पहायचे आहे. "सुब्रह्मण्य" ही निविद कुमार कार्तिकेयाची आहे हे जगप्रसिद्धच आहे. कार्तिकेयाला "सुब्रह्मण्य" हा शब्द फक्त दक्षीण भारतातच वापरला जातो. सुब्बर (सर्प)+मणि या शब्दांची जोड होवून सुब्रह्मण्य हा शब्द निर्माण झाला आहे हे डा. रा. चिं. ढेरे यांनी मार्च १९७४ च्या आनंदवन मासिकाच्या अंकात लिहिलेल्या निबंधात स्पष्ट केले आहे. दक्षीणेत सुब्रह्मण्याची पुजा नागरुपातच केली जाते असेही त्यांनी नमुद केले आहे.
आता सुब्रह्मण्य ही देवता दक्षीणेत कधी लोकप्रिय झाली कि पाणिनीने तिचा उल्लेख अष्टाध्यायीत करावा? सुब्रह्मण्य म्हनजे स्कंद कार्तिकेय असे मानण्याची प्रथा असली तरी कार्तिकेय हा अविवाहित आहे अशी उत्तरेतील परंपरागत समजुत आहे. परंतु दक्षीणेतील सुब्रह्मण्य हा मात्र विवाहित असुन वल्लियम्म ही त्याची पत्नी आहे. सुब्रह्मण्य ही देवता दक्षीणेत सरासरी इसपुचे पहिले शतक ते इसचे दुसरे शतक या काळात लोकप्रिय झाली असे सुब्रह्मण्य या देवतेच्या इतिहासावरुन व शिल्पसार या ग्रंथावरुन दिसते. सुब्रह्मण्याचे वाहन कार्तिकेयाप्रमनेच मयुर मानले गेले असले तरी कुशाणकालीन योधेय गणाच्या नाण्यांवर कार्तिकेयाचे वाहन कोंबडा दर्शवले आहे. महाभारतातील वनपर्वातही कार्तिकेयचे वाहन म्हणुन कुक्कुटाचाच उल्लेख केला गेलेला आहे. (वनपर्व-२२९). म्हणजे इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत कार्तिकेय हा कुक्कुटवाहन असावा असा तर्क करता येतो. कार्तिकेय व सुब्रह्मण्य देवतांत बरेच साम्य असले तरी दोन्ही देवता एकच नव्हेत. मुळ सुब्रह्मण्य ही क्षेत्रपाल श्रेणीतील देवता असावी असा डा. रा. चिं. ढेरे यांचा तर्क आहे. आता सुब्रह्मण्य आणि कार्तिकेयाचे तादात्म्य दक्षीणेत साधले गेले ते इसपुच्या दुस-या शतकाच्या आसपास. सुब्रह्मण्य हा मयुरवाहनच मानला गेलेला आहे हेही येथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सुब्रह्मण्याचा पाणिनीच्या व्याकरणातील उल्लेख हा दोन बाबी स्पष्ट करतो. पहिली म्हनजे पाणिनी हा मुलचा दाक्षीणात्यच होता ही. आणि दुसरी बाब म्हणजे पाणिनी हा दुस-या शतकाच्या मध्यात कधीतरी होवुन गेला असणार ही. कारण याच कालात सुब्रह्मण्य देवतेची प्रतिष्ठा अलौकिकपणे, पण फक्त दक्षिणेत वाढलेली होती. तसे नसते तर सुब्रह्मण्याचा उल्लेख पाणिनीने केला नसता.
२. ४.१.११४: ऋष्यन्धकवृष्णिकुरुभ्यश्च!
४.१.१७६: स्त्रियामवन्तिकुन्तिकुरुभ्यश्च ! (अष्टाध्यायी)
आता ही वरील सुत्रे पाहिली असता व अन्य सर्वच सुत्रांशी तुलना केली असता एक बाब स्पष्ट होते ती ही कि जरी पाणिनीने महाभारतातील व्यक्तींचा उल्लेख केला असला तरी रामायणातील एकाही व्यक्तीरेखेचा विचार वा नामोल्लेख कोठेही केलेला दिसून येत नाही. रामायनाची जुन्यातील जुनी प्रत ही अकराव्या शतकातील आहे. रामायणाचे शेवटचे संस्करण (संस्कृत) इसवी सनाच्या तिस-या वा चवथ्या शतकात झाले अशी मान्यता आहे. याचा अर्थ असा नव्हे कि रामायण कथा कोणत्या ना कोणत्या रुपात प्रचलित नव्हती. परंतु आर्ष संस्क्रुतमद्धे महाभारत आधी अनुवादित झाले असल्याने व ते पाणिनीपुर्व असल्याने भाषेचे नियम बनवतांना पाणिनीने महाभारतीय संद्न्या घेतल्या असने स्वाभाविक आहे. यावरुनही पाणिनीचा काळ हा इसच्या दुस-या शतकानंतरचाच येतो.
३. "न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारम I
उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम II
अष्टाध्यायीतील हे शिवसुत्र आहे. (यालाच महेश्वर सूत्र असेही म्हणतात.) पाणिनी हा शैव होता हे अष्टाध्यायीतील काही सुत्रांवरुनही स्पष्ट होते. उदा. शिवादिभ्योSण !( ४.१.११२). वरील श्लोकात पाणिनीला शिवाने केलेल्या तांडव नृत्यानंतर जो चवदा वेळा डमरु वाजवला त्यातुन जे ध्वनी निघाले त्यावर आधारीत पाणिनीचे समग्र व्याकरण अवलंबुन आहे. आता आपण या श्लोकाचे परिशिलन करूयात.
शिवाला नटराज स्वरुपात भजले जाते ते फक्त दक्षीणेत हे सर्वांना माहितच आहे. शिवाला नृत्याचा जनक व सम्राट मानले जाते. पणिनीय व्याकरणानुसार खरे तर हे रुप "नटराज" न होता "नृत्तराज" असे व्हायला हवे. परंतु पाणिनीने तत्कालीन दक्षीणेत प्रचलित असलेला "नतराज" हाच शब्द कटाक्षाने वापरलेला आहे, असे स्पष्ट दिसते.
आता दक्षीणेत नटराज स्वरुपात शिवपुजा कधी सुरु झाली हे तपासुन पहायला हवे. दक्षीणेत शिवाच्या नटराज स्वरुपातील विपुल मुर्ती बनु लागल्या त्या नवव्या शतकात चोल राजघराण्याच्या काळात. शिवाचे नटराज रुप ही खास दक्षीणी देणगी आहे. या संकल्पनेचा उदय संगम साहित्य काळात (इसपु ३०० ते इस. ३००) झाला. पाणिनी हा नटराजाची संकल्पना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याच्या, म्हनजे इस. दुसरे ते तिसरे शतक याच काळात झाला असावा असे याही पुराव्यावरुन अनुमानिता येते.
नटराजाने आपले तांडव नृत्य तमिळनाडु येथील चिदंबरम या ठिकाणी केले अशी मान्यता आहे. पतंजलीनेही आपले महाभाष्य चिदंबरम येथेच लिहिले. हे वास्तव लक्षात घेता पाणिनीही मुळचा दाक्षीणात्यच होता असे अनुमानिता येते.
थोडक्यात आपण जी ग्रंथार्गतची आणि बाह्य प्रमाने तपासली असता खालील बाबी स्पष्ट होतात.
१. पाणिनीय व्याकरणाधारित अभिजात साहित्याची निर्मिती ही तिस-या शतकानंतर सुरु झालेली आहे, म्हणजेच त्याचा काळ हा दुस-या शतकाची सुरुवात ते दुस-या शतकाचा मध्य यापेक्षा अधिक मागे जावु शकत नाही.
२. पाणिनी हा मुळचा दाक्षिणात्य व शैव होता.
३. पाणिनी व कात्यायन समकालीन असल्याने त्याचाही काळ तोच अनुमानिता येतो. तक्षशिला येथे पाणिनी पुढील अध्ययनासाठी गेला असण्याची शक्यता ह्यु-एन-त्संगाच्या वर्णनावरुन ग्रुहीत धरता येते. तेथेच त्याची व कात्यायनाची भेट होवून अष्टाध्यायीची रचना होताच कात्यायनाने वार्तिका लिहिल्या असाव्यात. तक्षशिलेचे विद्यापीठ हे इस. ४७० मद्धे ते हेफालिट्सने उद्ध्वस्त करेपर्यंत आस्तित्वात होते.
४. पाणिनी हे त्याचे कुलनाम असून त्याचे मुळ नांव शालंकी असे होते.
५. तक्षशिलेला असतांनाच कच्छायनाच्या पाली व्याकरणाशी पाणिनी परिचित झाला असावा व त्याचाच आदर्श घेत पाणिनीने नुकताच आकार घेत असलेल्या संस्कृतचे व्याकरण लिहिण्याचा विचार केला असावा.