Monday, June 30, 2014

चोख्याचा काळ...




भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळनार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मित्थकथा, कालविपर्यास आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुण-दोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणे स्वाभाविकपणेच कठीण जाते.

चोखामेळा ज्या काळात झाले तो काळ आपण तपासून पाहुयात. चोख्याला व त्याच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता. याच काळात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे व गोरोबां-सावतांसारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चवदावे शतक हा या संतांचा काळ होय. या संतांनी पंढरीच्या, अवैदिक परंपरेतील  व तशा अप्रसिद्ध देवतेला समतेचे आराध्य म्हणून स्विकारले. तेराव्या-चवदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी? अशा कोणत्या प्रेरणा माहाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या कि ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली?

चोखामेळा व त्याचा परिवार ज्या जातीघटकातून संतत्वाला पोहोचला त्याचा विचार करता तत्कालीन समाजस्थिती नेमकी काय होती याबाबत कुतुहल वाटणे स्वाभाविक आहे. त्याच निमित्ताने महाराष्ट्रात अस्पृष्यतेच्या मानवताविहिन संकल्पनेचे गारुड समाजाला नेमके कधीपासून ग्रासू लागले, नेमक्या काही विशिष्ट जातीच अस्पृष्य़ का ठरवल्या गेल्या याचाही धांडोळा घेणे आवश्यक बनून जाते.

देवगिरीचे यादव

देवगिरीच्या यादवांची सत्ता सन ८५० मद्धेच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. ही सत्ता सन १३१७ साली शेवटचे आचके घेत संपुष्टात आली व इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर कायम झाली. म्हणजेच यादवांच्या उतरणीच्या काळात संतांचा उदय झाल्याचे आपल्याला दिसून येते. खरे पाहिले तर १२९६ सालीच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीचा पाडाव केला होता. तात्पुरत्या स्वरुपात रामचंद्र यादवाची पुनर्स्थापना झाली असली तरी खंडणी न भरल्याने मलिक काफरने १३०७ साली पुन्हा आक्रमण केले होते. १३१७ मद्धे खिल्जीने तेंव्हाचा शासक तिस-या सिंघनला ठार मारून देवगिरीचे राज्य त्याच्या साम्राज्याला जोडून घेतले. ही उलथापालथ आणि रक्तपात महाराष्ट्राने अनेक शतके पाहिलेलाही नव्हता. यामुळे जनजीवन विस्कळीत होणे व काहीतरी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक समजायला हवे. पण तसे झाल्याचे चित्र दिसून येत नाही.

ही राजकीय अंदाधुंद चालु असतांनाच संतांचा उदय झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रामचंद्र यादवाच्या कालातच नरेंद्र कवीचे रुक्मीणी स्वयंवर व नागदेव चरित, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले गेले अथवा तेंव्हा लेखन चालुच होते. संत नामदेव ते चोखा हे बहुजनीय संत याच काळात बहराला येत होते. खरे तर त्यांच्या काळातील ही राजकीय उलथापालथ सामान्य नव्हती. जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर अव्याहत राज्य करणा-या राजवंशाचा उच्छेद व्हावा आणि त्याचे कसलेही प्रतिबिंब ज्ञानेश्वर ते चोख्याच्या एकाही अभंगात वा लेखनात पडू नये हे विस्मयकारक आहे. केंद्रीय राजकीय व्यवस्था आणि सामान्य नागरिकांत त्या काळात फारसा संबंध नसे हे खरे आहे. खेड्यांतील प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवले जात. गांवचा पाटील सोडला तर इतरांचा राजसत्तेशी काही संबंध येत नसे. हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमणे होतात, भिषण युद्धे होतात आणि प्रदिर्घ काळ राज्य करणारी सत्ता उध्वस्त होते पण त्याचे पडसाद तत्कालीन व नंतरच्याही संतांच्या अभंगात पडू नयेत हे मात्र विलक्षणच होय!

परंतु विषय पंढरीचा आणि श्रीविठ्ठलाचा असल्याने यादवांची अल्प का होईना चर्चा अत्यावश्यकच आहे. पंढरीच्या श्री विठ्ठलाची मुर्ती चंद्रभागेतिरी पुर्वी उघड्यावर होती. बाराव्या शतकात यादवांच्या विठ्ठलदेव नायक नामक पंढरपूरच्या सामंताने यादवांच्या अनुमतीने विठ्ठलाचे पहिले मंदिर बांधले. तत्पुर्वी विठ्ठलाचे भक्तजन हे बव्हंशी धनगर-कुरुब-कोळी होते हे डा. रा. चिं. ढेरे यांनी साधार सिद्ध करून दाखवले आहे तसेच माणिकराव धनपलवार यांनी विठ्ठलाचे मुळचे रूप शैव होते हेही सिद्ध करुन दाखवले आहे. एका दैवताच्या मुळ स्वरुपात झालेले हे बदल यादवकाळातच झाले आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे. यामागील कारणांचाही शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.

तत्कालीन धर्मस्थिती

तेराव्या-चवदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात अनेक धार्मिक चळवळी झालेल्या दिसतात. एकीकडे समतेचा पुरस्कार करणारे नाथ, वीरशैव आणि महानुभाव पंथांनी महाराष्ट्र भुमी व्यापली असतांनाच वैदिक धर्माचा जोरही राजाश्रयाने वाढत असल्याचे दिसते. मध्यंतरी लुप्तप्राय होऊ पाहणा-या वैदिक धर्माने महाराष्ट्रात उचल खाल्लेली दिसते. याचे कारण म्हणजे मनुस्मृतीच्या दरतीवर देवल स्मृती महाराष्ट्रात यादवकाळातच लिहिली गेली. यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री पंताचा जवळपास साडेचार हजार व्रते सांगणारा "चतुर्वर्ग चिंतामणी" हा ग्रंथही याच राजवटीत आकाराला आला. पुर्वी व्रते नव्हती असे नाही, पण त्यांची संख्या अत्यल्प अशीच होती. उदा. शंकरभट्टाच्या "व्रतार्क" मद्धे फक्त ११३ व्रते दिली गेली आहेत. शैव विठ्ठलाचे वैदिक वैष्णवीकरणही याच काळात झाले. प्रशासनातील वैदिकांचे प्रमाणही याच कालात क्रमश: वाढत गेल्याचे डा. मालती महाजन म्हणतात. शुद्रांवरील बंधने या साडेचारशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात वाढतच गेली आहेत.

खरे तर यादव हे यदुवंशी गोपालक समाजातून आलेले राज्यकर्ते. वैदिक धर्मानुसार शूद्रच. यादव वंशाच्या कारकिर्दीत यादवांनी कसलेही यज्ञ केल्याची नोंद नाही, कारण त्यांना अवैदिक असल्याने तो अधिकारच नव्हता. यादव काळात शैव मंदिरांची संख्या सर्वाधिक असून बव्हंशी लोक शैवप्रधान धर्माचे अनुसरण करत असत. (इतिहास: प्राचीन काळ: सांस्कृतिक इतिहास)

देवल स्मृतीच्या माध्यमातून वर्नव्यवस्थेचे व जन्माधारित्य उच्चनीचतेचे स्तोम महाराष्ट्रात पसरलेले दिसते. बाकी सर्व स्मृत्यांची रचना उत्तरेत झाली असली तरी या स्मृतीची रचना महाराष्ट्रात व यादवकाळातच दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या स्मृतीत वर्णाश्रम-धर्म, शुद्धी-प्रायश्चिते व धर्मांतरितांना परत धर्मात घ्यायची सोय होती असे मानले जाते. त्यामुळे या कालात धर्मांतरांचे प्रमाण वाढले असावे असा तर्क बांधता येतो. राज्यकर्त्यांची साथ असल्याखेरीज धर्मविषयक मतांचा बोलबाला सहजी वाढत नाही. त्यामुळे यादव घराण्यानेही त्यांना प्रोत्साहन दिले असेल अशीही शक्यता आहे.

याच काळात वैदिक धर्माला प्रतिक्रिया म्हणून शैवांनीही वैचारिक आणि समतेची पुन्हा क्रांती सुरु केली. त्यात अग्रभागी होते नाथ, महानुभाव व वीरशैव पंथ. यात नाथपंथ जुना आणि आघाडीवरचा म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे मुळची नाथ संप्रदायाशीच निगडित होती. ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव हा शैव नाथपंथीय तत्वज्ञानात मोलाची भर घालणारा ग्रंथ आहे. उपनयन नाकारले गेल्याने वैदिक धर्मानुसारही ते शूद्रच होते. नाथ पंथ त्यांना अधिक आपलासा वाटला असल्यास त्यात काही आश्चर्य नाही. 

अद्वैत शैव सिद्धांतातून प्रगत पावलेला नाथ संप्रदाय नक्की कधी स्थापन झाला याची ऐतिहासिक नोंद मिळत नसली तरी दहाव्या-अकराव्या शतकात गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असावी असा मतप्रवाह आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात निवृत्तीनाथांनी वयाच्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असे सांप्रदायिक वाड्मयानुसार दिसते. विषेष म्हणजे चारही भावंडांची नांवे ही नाथ संप्रदायाच्या परंपरेतील आहेत. इतकेच नव्हे तर "समाधी" या नाथ संप्रदायातील प्रथेच्या वापर समाधी घेऊन चारही भावंडांनी केला.

नाथ संप्रदाय हा समानतेचा (स्त्री-पुरुषही) पंथ. या पंथाने वैदिक उत्थानसमयीच उचल खावी याचा अर्थ वैदिक विषमतेचे गारुड समाजाला ग्रासू लागले होते. यामुळेच कि काय बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कर्नाटकात वीरशैव (लिंगायत) पंथाची स्थापना केली. वेद व वैदिक कर्मकांड नाकारत समतेची अवाढव्य चळवळ त्यांनी उभी केली. महाराष्ट्र निकटचा असल्याने, विशेषत: सोलापूर व नजिकच्या भागात हा पंथ पसरुन ज्ञानेश्वर-चोख्याच्या काळापर्यंत सुस्थापित झाल्याचे दिसते.

चक्रधरांचा महानुभाव पंथ १२६७ मद्ध्ये कृष्णाला आराध्य मानत समतेचाच संदेश देणारा पंथ स्थापन झाला. चक्रधर जरी गुर्जर देशातून आले असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ, मराठवाडा व खानदेश ही प्रामुख्याने राहिली. याही पंथाने समतेच्या सिद्धांताला चालना दिली.

वारकरी पंथ

एकंदरीत महाराष्ट्रात वैदिक विरुद्ध अवैदिक हा धर्म-संस्कृती संघर्ष यादवकाळात प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो. समतेचे आकर्षण हा मानवी समाजाचा मुलगाभा आहे. वैदिक वर्णव्यवस्था मात्र ती नाकारते त्यामुळे वैदिक प्राबल्य झुगारण्यासाठी वेदनिषेध केला जाने स्वाभाविक होते.

विठ्ठलभक्ती महाराष्ट्रात अल्प असली तरीही तेंव्हाही नवीन नव्हती. तसा हा अवैदिक देव. माणिकराव धनपलवारांच्या मते हे मुळचे शैव स्थान होते. पुंडरिकाचे मंदिर हे प्रत्यक्षात शिवालय आणि त्यासमोर करकटी ठेवून उभा श्री विठ्ठल हे वास्तव पाहता हे मुळचे शिवस्थानच याबाबत शंका घेता येत नाही. विठ्ठलाची मुर्ती ही आधी उघड्यावरच होती व यादव काळात पहिले मंदीर झाले हे आपण वर बघितले. येथे आजवर विद्वानांच्या साक्षेपी नजरेतुन सुटलेला महत्वाचा भाग असा कि यादवकाळात एकीकडे अवैदिक शैव पंथांचा समतेचा बोलबाला चालु असतांना एक दुर्लक्षीत शैव स्थानाचे रुपांतर चक्क वैदिक वैष्णव स्थानात नेमके का केले गेले असावे हा.

विठ्ठल हा विष्णुच्या सहस्त्रनामांत अथवा चोवीस अवतारांतही न सापडणारा देव. संतांनाही त्याचेच एक आगळे कुतुहल असल्याचे त्यांच्या अभंगांवरून जाणवते. तरीही तो विष्णु अथवा कृष्ण या रुपात पुढे आनला गेला. असे असले तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. "विष्णूसहित शिव...आणिला पंढरी" असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केले गेले, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोख्याने ते स्विकारले आणि त्यालाच आपले आराध्य बनवले हे एक वास्तव आहे.

खरे तर हा लढा वैष्णव कि शैव असा नसून वैदिक कि अवैदिक असा होता आणि त्याच अनुषंगाने तत्कालीन सांस्कृतिक संघर्षाकडे पाहिले पाहिजे. विष्णू ही ऋग्वेदातील, अवघी साडेतीन सूक्त अर्पण केलेली देवता. तो ऋग्वेदात इंद्राचा दुय्यम मित्र (उपेंद्र) म्हणून पुढे येतो. ऋग्वेदात अवतार संकल्पना आहे...पण अवतार घेण्याचे कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णूकडे नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. विष्णू ही देवता गुप्तकाळात नवीन चरित्र बहाल करत पुढे आणली गेली. त्याला सागरशयनी व लक्ष्मीपती बनवण्यात आले. (ऋग्वेदात त्याला पत्नी असल्याचा उल्लेख नाही अथवा तो सागरशयनीही नाही.) गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला होता. गुप्त नाण्यांवर सर्वप्रथम लक्ष्मी व विष्णू अवतरतात. ऋग्वेदातील अवतार घेण्याचे कार्य आता विष्णूवर सोपवण्यात आले. पुरातन काळातील महनीय व्यक्तित्वे (राम-कृष्ण) विष्णुचे अवतार घोषित करत त्यांची चरित्रेही वैष्णव बनवण्यात आली. इतकी की गौतम बुद्धाला, जो वेदविरोधी होता, त्यालाही विष्णुचा अवतार ठरवण्यात आले.

खरे तर मुर्तीपूजा ही संकल्पना मुळात वैदिक नाही. यज्ञांतील आहुतींद्वारे हवन करत इंद्र-वरुणादि अमूर्त वैदिक देवतांना आवाहने करत संतुष्ट करणे हे वैदिक कर्मकांड. परंतू बुद्धाच्या उदयापासूनच त्याने हिंसात्मक यज्ञांना विरोध सुरु केल्याने यज्ञ मावळू लागले होते. शिवाय ते खर्चिक, गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ (काही यज्ञ १२-१२ वर्ष चालत) बनल्याने यजमान सापडण्याचीही मारामार होऊ लागली होती. त्यामुळे मुर्तीपुजेला शरण जाण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. पण तसे करतांना त्यांनी अवैदिक देवता न निवडता विष्णू हीच वैदिक देवता निवडली. पांचरात्र या अवैदिक संप्रदायातील भक्तीतत्व उचलले आणि वैष्णव पंथ जोमाने वाढवला जावू लागला. पण या पंथातील वैदिक वर्णव्यवस्थेची मुलतत्वे मात्र कायम ठेवण्यात आली.

महाराष्ट्रात समतेच्या शैव पंथांचा जागर सुरु असतांना एक अप्रसिद्ध शैवस्थान वैष्णव स्थान म्हणून पुढे का आनले गेले याचे कारण वैदिक-अवैदिक संघर्षात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शैव पंथांना मात दिल्याखेरीज वैदिक महत्ता वाढणार नाही ही यामागची व्यूहनिती होती. त्यामुळे विठ्ठलाला वैष्णव साज चढवण्यात आले. विठ्ठलाचा पुर्व-दैवतेतिहास हा अत्यंत धूसर असल्याने हे वैष्णव चरित्र चढवता येणे सोपेही होते. तसे ते झालेही. आद्य संतांनी विठ्ठलाला विष्णू-कृष्ण याच रुपात पाहिले असल्याने हा चरित्रबदल स्विकारलाही गेला होता असे स्पष्ट दिसते. मात्र चक्रधर जरी कृष्णोपासक असले तरी त्यांनी विठ्ठलाला कधीही कृष्णाचे रूप मान्य केले नाही. उलट ते विठ्ठलाला "गोचोर", "भडखंभा" अशा विशेषणानी हिणावत असल्याचे दिसते.

म्हणजे यादव काळातील ही जी धर्मविषयक उलथापालथ घडत होती तिचेच अनावर आकर्षण संतांना होते असे दिसून येते. त्याचमुळे कि काय अन्य राजकीय उलथापालथी, रक्तपात याबाबत ते उदासीन राहिले एवढाच तर्क काढता येईल. अर्थात सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथी होत असतांना त्याचे मानसिक परिणाम जनसमुदायावर होणे स्वाभाविक आहे.

विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारले होते ते, कायम प्रस्थापित झाले. विठ्ठलाचे वर्णन करतांना संतांच्या शब्दांत वेद-तूल्य अशा शब्दकळा पाझरतांना दिसतात. "वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही..." ते "वेदांचा अर्थ आम्हासही ठावा..." अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हनजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत हे मान्य करतांना दिसतात. "अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ...परब्रह्म सोज्वळ विटेवरी", "ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती...तो हा रमापती पंढरिये.." असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळे आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा व त्यांचा परिवारही मान्य करतांना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृष्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो...त्याविरुद्ध बंड करत नाही हे वैष्नव संप्रदायच मुळात वैदिक असल्याने असे झाले असे म्हणता येणार नाही काय?

येथे महत्वाचे पुन्हा लक्षात घेतले पाहिजे, शैव पंथ वेद मान्य करत नाहीत आणि म्हनूणच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ-सिद्ध-दत्त आदि संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकेच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायातीलच होती. "अमृतानुभव" हे स्वतंत्र प्रज्ञेचे शैव तत्वज्ञान मांडते.असे असतांनाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातील कोडे आहे.

परंतू संतांच्या समतेच्या चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही याची कारणे आपल्याला वैदिक तत्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील व व्यवहारातील जन्माधारित जातीने आलेला हीणभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोख्याला आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. कारण ज्या मुलभूत तत्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचे तत्वज्ञानच जन्माधारित विषमतेचे होते.

आजही विठ्ठलाच्या पुजेत विषमतेचे आदि कारण मानले गेलेले पुरुषसूक्त म्हटले जाते यावरून मला काय म्हनायचे आहे ते लक्षात यावे. समतेची चळवळ पायाच चुकीचा असल्याने फसली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अस्पृष्यता

अस्पृष्यता हा भारतातील एक मोठा कलंक आहे याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. परंतू ती नेमकी सुरु कधी झाली आणि का याची कारणे मात्र अत्यंत वेगवेगळी दिली जातात. वैदिक धर्मग्रंथांत चांडाळ-श्वपच-धिग्वन ई. काही जाती अस्पृष्य मानल्या गेल्याचे दिसत असले तरी महार या जातीचा कोठेही उल्लेख मिळत नाही. महार समाज हा मुळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करनारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगर अंगरक्षक म्हनून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हीणकस कामांचा, म्हनजे मृत जनावर ओश्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे ई. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृष्य़ का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरे ही अस्पृष्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते कि सैन्यातील महारांबाबत अस्पृष्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमीनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. आपल्याकडील स्थितीस्थापकता पाहिली तर चोख्याच्या काळातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असावी असा अंदाज बांधता येतो. म्हणजे महारांवरील अस्पृष्यता ही सार्वत्रिक होती काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. असे असले तरी गांवकामगार महार तरी का अस्पृष्य़ मानला जात होता याचे निराकरण होत नाही.

महारांना जन्म-मृत्युच्या नोंदी ठेवणे, जमीनींच्या सीमा आखणे, सारा मुख्य ठाण्याला पोहोचवणे ई. कामे करावी लागत असल्याने त्यांनी साक्षर असने क्रमप्राप्त होते. चोखा व त्याचा परिवार अभंग रचून लिहित होता ते त्यामुळेच असे म्हनायला प्रत्यवाय नाही. चोखा व त्याचा परिवार मात्र अस्पृष्य़ मानला गेला. संतत्वाला जाऊनही अस्पृष्याचा विटाळ तर गेला नाहीच पण गांवगाड्याचा भारही गेला नाही.

वेठ म्हणजे सरकारी कामे प्रजेकडून मोफत वा अत्यल्प मोबदल्यात करून घेणे. मंगळवेढ्याच्या वेशीचे काम वेठीवर करत असतांना भिंत कोसळून चोख्याला मरण आले. विषमतेच्या काळोखातून विषमतेच्या काळोखात चोखा विलीन झाला.

दुर्दैवाने वारकरी चळवळ त्या अंधारातून बाहेर पडली असे आजही म्हणता येणार नाही!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...