
संभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे. एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती. त्यालाही जबाबदार तेंव्हा उपलब्ध असलेली मर्यादित ऐतिहासिक साधने होती. पुढे नवनवी साधने प्राप्त झाली आणि संभाजी महाराजांची प्रतिमा जशी छंदीफंदी रंगवली जाते तशी वास्तवात नाही हे इतिहासकारांमुळे लक्षात येवू लागले. वा. सी. बेंद्रे व कमल गोखले यांनी केलेल्या महत्वपुर्ण संशोधनामुळे संभाजे महाराजांवरचे बरेच आरोप बिनबुडाचे होते हे सिद्ध झाले.
येथे आपल्याला संभाजी महाराजांच्या जीवनातील दिलेरखानाला जावून मिळण्याचा जो प्रसंग घडला त्या प्रसंगाची चिकित्सा उपलब्ध पुराव्यांवरून करायची आहे. आजवरच्या इतिहासकारांनी या प्रसंगाबाबत ही संभाजीची चुकच होती असे म्हटले आहे. कमल गोखले तर म्हणतात, "कारणे काही का असेनात संभाजी मुघलांना मिळाला ही त्याने आपल्या आयुष्यात एक घोडचुकच केली यात काही शंका नाही." थोडक्यात दिलेरखान प्रकरण संभाजी महाराजांच्या आयुष्याला आजही चिकटलेला काळा डाग आहे असे म्हणायला हरकत नाही. या प्रकरणाचे कसलेही स्पष्टीकरण इतिहासकार देवू शकलेले नाहीत याचे कारण त्यांची चूक नसून त्यांनी उपलब्ध पुराव्यांची एका अन्वेषकाच्या दृष्टीकोणातून छाननी केली नाही असे दिसते. ते कसे हे आपण येथे पाहू. सर्व घटनाक्रम व पुरावेही त्यासाठी तपासून पाहू.
१६७० साली सोयराबाईला मुलगा झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात गृहकलहाचे पर्व सुरु झाले असे मानले जाते. राज्याभिषेक झाला तेंव्हा संभाजी महाराज १७ वर्षांचे होते तर राजाराम चार वर्षांचा. राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यू झाला. राज्याभिषेकामुळे गादीच्या वारसा हक्काचा प्रश्न निर्माण झाला असे कमल गोखले म्हणतात. पण यात गफलत अशी आहे, की जरी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला नसता तरी राज्य अस्तित्वात होतेच. वारसाचा प्रश्न राज्याभिषेकाशिवायही निर्माण झाला असताच. राज्याभिषेकाच्या नियमाप्रमाणे थोरल्या पुत्राला युवराजपद मिळणे व त्याचा तसा अभिषेक होणेही क्रमप्राप्तच होते. सोयराबाई कितीही महत्वाकांक्षी असल्या, आता पट्टराणी झाल्या असल्या तरी युवराजपद राजारामाला मिळणे शक्य नव्हते. हे वास्तव पचायला जड गेले तरी सोयराबाईला ते मान्यच करणे भाग होते. सत्तेचे वाटप व्हायला ही जहागिर नव्हती तर राज्य होते व राज्याला राज्याच्याच नियमाने पुढे जावे लागते. सोयराबाईला यात काय वाटते याला महत्व नव्हते. परंतू इतिहासकार म्हणतात की राजारामाला गादी मिळावी म्हणून सोयराबाईने याच काळात हट्ट सुरु केला. इतकेच नाही तर शिवदिग्वीजय बखरीचा हवाला देवून सोयराबाई स्वार्थासाठी कोनतेही कृत्य करावयास धजणार नाही म्हणून "हस्ताक्षर पाहून करणे तरी करावे स्वदस्तूर असेल तर मान्य करावे" असा आदेश शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजीकडून सर्व किल्ल्यांवर कळवला. म्हणजेच गृहकलह एवढ्या टोकाला गेला होता. यासाठी इतिहासकारांनी शिवदिग्वीजय बखरीचा व अनूपुराणाचा संदर्भ म्हणून वापर केला आहे. अन्य संदर्भ नाही.
शिवदिग्विजय बखर लिहिली गेली ती सन १८१८ मध्ये. हिचा कर्ताही अज्ञात आहे, पण ती बडोदे येथील चिटणीस घराण्यातील कोणीतरी लिहिली असावी असा तर्क आहे. या बखरीच्या लेखनाला अन्य एखाद्या जुन्या बखरीचा आधार असेल असे अंदाज दिले जातात, पण ती कोणती याचे मात्र माहिती नाही. अनुपुराणाबाबत त्र्यं. शं. शेजवलकर यांनी जोरदार टीका केली असून ही परमानंदाने रचलेली नसून पुढे त्याच्या देवदत्त नावाच्या मुलाने काही भाग रचला व पुढे त्याचा मुलगा गोविंदाने उर्वरीत भाग शाहू महाराजांच्या काळात रचला असे म्हटले आहे. एकंदरीत हे दोन पुरावे एकतर मुळात समकालीन नाहीत व अनुपुराणकर्त्यांचा उद्देश्य हयात राजांची भलामण करत स्वार्थ साधण्याचा असल्याने त्यातील माहिती विश्वसनीय मानता येत नाही. याचा अर्थ असा नाही की सोयराबाईच्या मनात आपलाच मुलगा पुढे राजा व्हावा असे वाटले नसेल. किंबहुना वाटलेच असेल, पण राज्याभिषेकानंतर लगेचच गृहकलह करुन काही साध्य होण्यासारखे नव्हते. शिवाजी महाराजांचे वय या वेळीस ४४, म्हणजे अगदीच तरुण होते हेही येथे लक्षात ठेवायला पाहिजे. या काळात राज्यवाटपाचा प्रश्न लगेचच उपस्थित होण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नव्हते. सभासदही अशा काही कलहाची साधी नोंदही करत नाही. शिवाय राज्याभिषेकानंतर लगेचच गनीमी काव्याने बहादुरखानाची पेडगांच्या छावणीवर हल्ला करुन एक कोटी रुपयाची लूट मिळवली होती यानंतर मराठ्यांनी औरंगाबादेजवळची अनेक शहरे लुटली व पार बागलानपर्यंत हल्ले करत गेले. धरणगांवची इंग्रजांची वखारही उध्वस्त करत लुटली. या मोहिमेत शिवाजी महाराज स्वत: सामील होते. कौटुंबिक कलहाने बेजार राजा असे वातावरण निर्माण झाल्याचे शिवाजी महाराजांच्या कृतीतून दिसत नाही.
पण या गृहकलहामुळे मिळालेले राज्य राजारामाला द्यावे व संभाजीसाठी दुसरे निर्माण करावे असे सोयराबाईने सुचवले असे परमानंद काव्य म्हणते. यानंतरच शिवाजी महाराजांनी कर्नाटक स्वारीवर जायचे ठरवले असे मानले जाते. या मानण्याला घेता येणारा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे स्वारीवरून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षीणेकडील जिंकलेले प्रदेश संभाजीने सांभाळावेत अशी कसलीही सुचना दिलेली नाही. त्यामुळे हे तर्क नंतर बनवले गेले असावेत अथवा त्या काळी मुद्दाम उडवण्यात आलेल्या वावड्यांनाच नंतरच्या बखर/काव्यकारांनी खरे मानून आपली रचना केली असावी असेच स्पष्ट दिसते. याचे कारण म्हणजे त्यानंतर ज्या अतर्क्य घटना घडल्या त्यांचा ठाव तत्कालीन मुत्सद्द्यांनाही लागलेला दिसत नाही. मुळात ती वेळच राज्याच्या वाटनीची चर्चा करण्याचे नव्हती. शिवाजी महाराज अजून तरुण होते, दिग्विजयाला निघण्यासाठी सज्ज झालेले होते. अंतकाळ दिसायला लागल्यावर निरवानिरवी करावी अशी वेळही नव्हती. सोयराबाईला लगेच तटून बसण्याचीही गरज नव्हती. सोयराबाई जरी समजा संभाजीचा दुस्वास करत होती हा भाग खरा मानला तरी या संदर्भातील अन्य सर्व तर्क हे अदखलपात्र आहेत अथवा जाणीवपुर्वक आतल्या गोटातून उडवल्या गेलेल्या वावड्या होत्या ज्या दुरस्थ लोकांना ख-याच वाटल्या असे म्हणावे लागेल.
याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण कर्नाटक स्वारीवर गेलो असता आपल्या अनुपस्थितीत मोगलांनी स्वारी केली तर काय याचे भान शिवाजी महाराजांना होते. मोगल सरदार बहादूरखान तसाही शिवाजी महाराजांच्या मैत्रीसाठी अनुनय करतच होता. त्याच वेळी विजापुरकरही शिवाजी महाराजांची मदत मागतच होते. याचा फायदा घेत शिवाजी महाराजांनी दोघांनाही आपल्या बाजुला वळवून घेतले ही शिवाजी महाराजांची मोठी कुटनीति होती असे जदुनाथ सरकार म्हणतात. कर्नाटक स्वारीवर जाण्याआधी बहादूरखान तटस्थ राहील असे वचन मिळवल्यानंतरच कर्नाटक स्वारीला प्रारंभ झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. असलाच तर गृहकलहाचा या पार्श्वभुमीवरही विचार केला पाहिजे.
शृंगारपुरला का?
६-१०-१६७६ रोजी शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर निघाले. बापलेक सोबतच निघाले असे कमल देसाई म्हणतात. बापलेकात या काळात नेमके काय बोलणे झाले याचा तपशील उपलब्ध नाही. खरे तर सोयराबाईशी तंटे होतील म्हणून दक्षीण स्वारीवर जातांना संभाजी महाराजांना शृंगारपुरला पाठवले असे असेल तर त्याऐवजी संभाजी महाराजांना सोबतच का नेले नाही हा प्रश्न उपस्थित होतो. परमानंदाचे काव्य सोडले तर शृंगारपुर का याचे उत्तर कोणत्याही अन्य साधनात मिळत नाही. परमानंद काव्य विश्वसनीय मानता येत नाही हे आपण पाहिलेच आहे.
शृंगारपुरात संभाजी महाराज येताच त्यांचा दिलेरखानाशी पत्रव्यवहार चालू झाला. दिलेरखानापर्यंत नेमके काय माहिती गेली होती की ज्यामुळे संभाजी आपल्या बाजुला येईल असे दिलेरखानाला वाटले? पत्रव्यवहारची सुरुवात कोणी केली? संभाजी महाराजांनी की दिलेरखानाने? परमानंद काव्य सांगते की सुरुवात दिलेरखानाने केली. पण त्यानुसार दिलेरखानने संभाजीला असे लिहिल्याचे म्हटले आहे की "औरंगजेबाने तुझ्यासाठी सैन्य, संपत्ती व पत्र दिले आहे." दिलेरखान महाराष्ट्रात आल्यानंतर जर दोहोंत पत्रव्यवहार सुरु झाला असेल तर त्याच्याकडे आधीच औरंगजेबाचे पत्र कसे? समजा असेल तर संभाजी फुटू शकतो याची पुर्वकल्पना औरंगजेबाला असली पाहिजे. औरंगजेबाचे हेरखाते तत्पर होते हेही खरे आहे. पण दिलेरखान व संभाजीत पत्रव्यवहार याच काळात कधीतरी सुरु झाला असावा. अर्थात औरंगजेबाच्या संमतीशिवाय संभाजीला मोगलांच्या गोटात सामील करून घेण्याची तयारी दिलेरखानाने दाखवली नसती.
शिवाजी महाराज १६७८ च्या मध्यात कर्नाटक स्वारीवरुन परत आले. यानंतरही मोरोपंत व शिवाजी महाराजांमध्ये संभाजी व राजारामात राज्यवाटपाची चर्चा झाली असे परमानंदच सांगतो. पण चर्चेची परिणती प्रत्यक्ष वाटणीत झाली नाही. शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात तसे काही न करता संभाजीला सज्जनगडावर जायचा आदेश दिला. परमानंदाच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांना व मोरोपंतांना संभाजीची मोगलांशी चाललेली गुप्त चर्चेचा अंदाज होता. संभाजी मोगलांना जावून मिळण्याची शक्यताही माहित होती. शृंगारपूर खरे तर अत्यंत सुरक्षित ठिकाण होते. येसूबाईंचे हे माहेरघर. संगमेश्वराच्या निकट. प्रचितगड याला लागुनच. संभाजी मोगलांना जावून मिळणार व ते आपल्या मनाविरुद्ध आहे असे माहित असतांनाही शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सज्जनगडावर जायची आज्ञा देणे म्हणजे दिलेरखानाच्या खूप निकट पाठवण्यासारखे होते. शृंगारपुरवरुन संभाजी महाराजांना निसटून दिलेरखानाकडे जाणे एवढे सोपे नव्हते. बरे, सज्जनगड रामदासांमुळे पुनीतपावन म्हटले तरी तो काही लष्करी तळ नव्हे जेथून जातांना संभाजी महाराजांना बळाने रोखता येईल. परंतू शिवाजी महाराजांनी संभाजीला सज्जनगडावर पाठवले हे खरे. तेथे रामदास स्वामी त्यावेळी वास्तव्याला नव्हते हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या उपदेशांनी संभाजीत काही बदल घडेल अशी अपेक्षा शिवाजी महाराजांनी बाळगली असेल असेही म्हणता येत नाही. कर्नातक स्वारीवर जातांना बारीक सारीक बाबींचे भान ठेवणारे शिवाजी महाराज अशी गफलत कशी करतील हाही प्रश्न निर्माण होतो.
३.११.१६७८ रोजी सज्जनगडावर संभाजी महाराजांचे आगमन झाले. यानंतर बरोबर एक महिन्याने, म्हणजे ३.१२.१६७८ रोजी सज्जनगडावरुन माहुलीला जाण्याचे निमित्त करून संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळण्याकरता निघाले. जेधे शकावली व सभासद बखर संभाजी रुसुन मुघलांकडे गेला असे म्हणते. पण कारणपरंपरा स्पष्ट करत नाही. पण संभाजी व शिवाजीत वितुष्ट आल्याने ही घटना घडली असे फ्रेंच गव्हर्नरनेही म्हटले आहे. म्हणजेच पिता-पुत्रातील बेबनाव दुरवर पोहोचला होता. या पार्श्वभुमीवर शिवाजी महाराजांनी संभाजीच्या संभाव्य फितुरीची कल्पना असुनही त्याला अटकाव करण्याची कसलीही योजना बनवल्याचे दिसत नाही. किंबहुना संभाजी महाराजांनी असे केलेच तर त्यांना अटकाव करण्याचीही योजना बनवल्याचे दिसत नाही. उलट शृंगारपूरवरून सज्जनगडावर पाठवून संभाजीमहाराजांच्या मोगलांना मिळण्याच्या योजनेला अप्रत्यक्षपणे मदतच केल्याचे दिसते. दिलेरखानाची छावणी तेथून जवळच होती. त्यामुळेच शृंगारपुरवरुन सज्जनगडावर येताच महिन्याभरात संभाजी महाराज मोगलांना जावून मिळाले. शत्रूच्या इतक्या निकट जायचा आदेश शिवाजी महाराज देतात हेच विसंगत आहे.
आपला मुलगा आपल्या वै-याला जावून मिळनार आहे याची पुर्वकल्पना असुनही त्याला थांबवण्याचा, अडवण्याचा कसलाही प्रयत्न न करणे हे शिवाजी महाराजांच्या राजनीतिविरुद्ध जाते. युवराजच शत्रूला सामील झाला तर काय अनर्थ होऊ शकतो हे त्यांना समजत नव्हते असे म्हणता येत नाही. तरीही हे असे घडले आहे आणि त्याचा अर्थ पुढील घटनांवरून लागू शकतो.
दिलेरखानासोबत संभाजी महाराज
संभाजी दिलेरखानाकडे गेल्याचे समजताच शिवाजी महाराजांनी त्याला परत आणण्यासाठी एक तुकडी पाठवली असे तारीखे दिलकुशा सांगतेे, पण तिला खाली हात परत जावे लागले. शिवाजी महाराजांना ही खबर मिळुन तुकडी पाठवेपर्यंत संभाजी महाराज मोठी मजल मारुन गेले असते, त्यामुळे यात कितपत सत्यता आहे हे सांगता येत नाही. प्रत्यक्षात सुप्यापासून चार कोसावरच एखलासखानाने संभाजीचे स्वागत केले. १३.१२. ७८ रोजी संभाजीची दिलेरखानाशी समारंभपुर्वक भेट झाली. येथे संभाजीला मनसबीसोबत सैन्यही देण्यात आले.
येथवर सारे समजा ठीक आहे. दिलेरखानासारख्या मुत्सद्द्याला व औरंगजेबासारख्या कुटनीतीज्ञाला संभाजी खरेच स्वेच्छेने आणि आमिषापोटी फितूर होतो आहे याचा विश्वास कसा बसला? केवळ संभाजी महाराजांनी दिलेरखानासोबत केलेला पत्रव्यवहार या विश्वासाचे कारण असू शकत नाही. औरंगजेबाचे हेरखाते किती प्रबळ होते हे संभाजीमहाराजांच्या सर्व हालचाली माहित असल्यानेच संगमेश्वरी कसे त्याच्या हाती लागले यावरुनच सिद्ध होते. बाप-लेकात खरेच बेबनाव आहे की नाही याची त्याने दिर्घकाळ चौकशी केली असलीच पाहिजे. संभाजी महाराजांनीही कसलीही घाई केलेली दिसत नाही. भावनाविवश होत झालेला हा निर्णय नाही. तसे असते तर शिवाजी महाराज दक्षीणेत गेले तेंव्हाच संभाजी मोगलांना जावून मिळू शकत होता. शिवाजी महाराज परत आल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी संभाजी मोगलांना जाऊन मिळाला आहे हेही वास्तव आहे.
बरे, संभाजी दिलेरखानाला जाऊन मिळाल्यामुळे मोगलांचा काय फायदा झाला? मराठी राज्याच्या सीमावर्ती प्रदेशात जरा धामधुम झाली. भुपाळगडासारखा दुय्यम गड तेवढा दिलेरखानाला संभाजी महाराजांना जिंकता आला. दोन प्रहरभर झालेल्या या लढाईत पकडलेल्या ७०० सैनिकांचे एकेक हात कापून सोडून देण्यात आले. दिलेरखानाने हा किल्ला पाडून टाकला. हा गड दुर्बळ आहे याची दिलेरखानालाही कल्पना होती. त्याचे लक्ष अर्थातच संभाजीमुळे आपल्याला मोठे किल्ले व प्रदेश जिंकत यावेत अशेच असणार. संभाजी महाराजांनी तर न लढता हा किल्ला स्वाधीन करावा म्हणून युद्धाआधी गडावर निरोप पाठवला होता. खरेच जर झाले असते तर ते जास्त संशयास्पद ठरले असते. किल्लेदाराने शिवाजीमहाराजांचा मुलगा समोर असतांनाही लढायची तयारी दाखवल्याने दिलेरखानाचा संभाजीवर विश्वास बसणे स्वाभाविक होते. चाकणचा भुईकोट किल्ला शाइस्तेखानाविरुद्ध दोन महिने लढवलेला फिरंगोजी नरसाळा दोन प्रहरांत हार पत्करतो याचा दुसरा अन्वयार्थ लागत नाही.
यानंतर मे १६७९ च्या सुमाराला औरंगजेबाचा मुलगा शाहजादा मुअज्जमला दक्षीणेचा सुभेदार नेमण्यात आले. दिलेरखानाचा उद्देश पन्हाळ्याला वेढा घालण्याचा होता. पण प्रत्यक्षात हा वेढा पडलाच नाही. उलट दिलेरखानाचा मोहोरा संभाजीने अत्यंत कौशल्याने आदिलशाहीकडे वळवला. आदिलशाही सरदार मसूदखानावर दोघे स्वारी करणार तोवर शिवाजी महाराजांनी वीजापुरशी तह करून टाकला. दिलेरखानाला मंगलवेढे जिंकता आले पण ते विजापुरी राज्यात येत होते, स्वराज्यात नाही. दिलेरखान व संभाजी विजापुरच्या दिशेने निघाले तर शिवाजी महाराजांनी दिलेरखानाचे लक्ष वळवण्यासाठी मोगली प्रांतात धुमाकुळ घालायला मराठ्यांची तुकडी पाठवली. दुसरी तुकडी विजापुरच्या मदतीसाठी गेली. त्यामुळे दिलेरखानाला विजापुरही मिळाले नाही. दिलेरखानाने हताश होऊन आपला मोर्चा पुन्हा पन्हाळ्याकडे वळवला. जालगिरी-तिकोटामार्गे ते अथणीला मुक्कामास असतांनाच संभाजी महाराज दिलेरखानाच्या छावणीतून सटकले आणि विजापुरमार्गे पन्हाळ्याला आले. शिवाजी महाराज पुरंदरवरून पन्हाळ्याला आले. बापलेकाची भेट झाल्यावर संभाजीकडे पुर्ववत अधिकारही दिले. म्हणजे संभाजी २१-१२-७९ रोजी पन्हाळ्याला आला आणि जानेवरी ८० मध्ये संभाजीला फ्रेंचांशी वाटघाटी करायचा अधिकार दिला.
कसे व का पळाले?
संभाजी महाराज अथणीच्या छावणीतून सटकले. तत्पुर्वी दिलेरखानाशी संभाजीचे मतभेद झाले होते. दिलेरखानाने व सर्जाखानाने वाटेत हिंदुंचे हाल केले ते संभाजीला सहन झाले नाही असे मतभेदांचे कारण दिले जाते. मतभेद होणे शक्य असले तरी त्यामुळे संभाजी महाराज दिलेरखानाच्या छावणीतून निसटलेले नाहीत. औरंगजेबाने संभाजीला अटक करण्याची आज्ञा दिलेरखानाला पाठवलेली होती. त्याची सुचना दिलेरखानाला मिळाल्यामुळे दिलेरखानाने संभाजी महाराजांना सुचना करून पळवले असे सभासद सांगतो. संभाजी महाराजांनी दिलेरखानाला मिळतांना आपल्या सुरक्षिततेची हमी दिलेरखानाकडे मागितलेलीच असणार. आग्रा प्रकरणातही जयसिंगाकडून शिवाजी महाराजांनी आपल्या सुरक्षेची हमी घेतलेलीच होती. औरंगजेबाने संभाजीला अटक करायला लावली तर संभाजीचे भविष्य काय असेल याची कल्पना दिलेरखानाला असणारच. त्यामुळे या अटकेच्या आदेशाची माहिती संभाजीला देवून त्याला पळून जायला सांगणे अगदी अतार्किक नाही. शिवाजी महाराजांच्या माणसांनीच एके संध्याकाळी संभाजीला युक्तीने बाहेर काढले असे म्हटले तरी एवढ्या बंदोबस्तातून दिलेरखानाच्या सहाय्याशिवाय सटकणे अवघडच होते. इतक्या मोठ्या फौजेतून संभाजी कसा निसटला याबद्दल मोगलही संभ्रमात राहिले ते यामुळेच.
दुसरे असे की, शिवाजी महाराजांचे लोक दिलेरखानाच्या छावणीत येवून गुप्तपणे त्यांना भेटत असत असे तारीखे दिल्कुशामध्ये नमूद असल्याचे सेतू माधवराव पगडींनी सांगितले आहे. या गुप्त भेटी संभाजी महाराजांना परत आणण्यासाठी होत होत्या की मोगलांच्या गोटातील आतली माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्यासाठी होत होत्या? संभाजी महाराजांना पळून जाण्यासाठी मोकळे रान देणारे शिवाजी महाराज पार दिलेरखानाच्या गोटात आपली माणसे गुप्तपणे घुसवून संभाजी महाराजांना परत आणण्याचा प्रयत्न करत असतील असे दिसत नाही. बरे, संभाजीमुळे एक भुपाळगडाचा उपद्रव सोडला तर अन्य कोणताही उपद्रव संभाजीमुळे झाला नव्हता. इतकेच काय, विजापुरलाही विशेष क्षती पोहोचली नव्हती. मग या गूप्त गाठीभेटींचे कारण नेमके काय असावे?
आणि औरंगजेबाने संभाजीच्या अटकेचा विचार का केला असावा? खरे तर स्वराज्याचा राजपुत्र त्यांना येवून मिळालेला होता. तसाही तो त्यांच्याच ताबेदारीत होता. पण तरीही औरंगजेबाने संभाजेला अटक करून घेऊन यावे असे फर्मान काढले, याचे काय कारण होते?
सभासद बखर याबद्दल म्हणते, "...त्याजवरून पातशहांनी विचार केला, की राजियांचा पुत्र आला आहे., त्यास नावाजिता पातशाहीत फितवा करून पातशाही बुडवतील. नावाजू नये. हुजूर आणून कैदेत ठेवावा..."
संभाजी आपल्याला मिळाल्याने स्वराज्यात दुही निर्माण होईल व त्याचा मोगलांना फायदा मिळेल हा औरंगजेबाचा अंदाज फोल गेला हे आपण पाहिले. शिवाय त्याच्यामुळे लढाया करुनतरी स्वराज्याचा घास घेता येईल असेही लक्षण दिसेना. इतकेच काय, विजापुरकरांनाही हरवता येईना. म्हणजे संभाजी त्यांच्या बाजुला असुनही कसलाही फायदा दृष्टीपथात दिसत नव्हती. सभासद आपल्या बखरीत "फितवा" हा शब्द वापरतो तो महत्वाचा आहे. पातशाहीत घुसखोरी करून, त्याची माणसे आपल्या बाजुला वळवून पातशाही बुडवायचा प्रयत्न करणे व शिवाजी महाराजांनी बाहेरून त्याला बळ देणे हा एकमेव उद्देश या सा-या प्रकरणामागे असण्याची शक्यता या प्रकरणाचा अभ्यास करता प्रकर्षाने समोर येते.
मोगल सत्ता या काळत दुर्बळ होत होती. खैबर प्रदेशातील अफगाण उठावाने औरंगजेबाला त्रस्त केले होते. त्याच्याही घरात आलबेल नव्हते. शाहजाद्यांचा आपसी सत्तासंघर्ष डोके वर काढतच होता. दक्षीणेतही मोगलांचे प्राबल्य कमी होत चालले होते. शिवाजी महाराजांनी दक्षीण भक्कम करत नंतर उत्तरेकडे लक्ष पुरवण्याचे ठरवले असणे त्यांच्या महत्वाकांक्षी मनोवृत्तीला ते साजेसेच होते. पुर्वीची आग्रा भेट खरे तर त्याच उद्देशाचा एक भाग होती. संभाजी महाराज मोगली मनसबदार होतेच. किंबहुना दिलेरखानाकडे जाण्याआधीही ते मोगलांशी वाटाघाटी करत ते त्याच नात्याने.
मोगल शाहजादे व सरदार यांच्यात फूट पाडता आली तर उत्तरेकडील राजकारण सोपे जाईल असे शिवाजी व संभाजीला वाटणे सहज शक्य होते. शाहजादा मोअज्जम, अकबर वगैरेंशी संभाजी महाराजांची मैत्री होतीच. दिलेरखानाकडे आल्यानंतरही दिलेरखानाला एकही मोठे यश मिळाले नाही याचे कारण संभाजी महाराज त्याची दिशाभूल करत होते हे तर उघडच आहे. पन्हाळ्याकडे त्याला संभाजीने जाऊ दिले नाही. विजापूर मिळू दिले नाही. या बातम्या औरंगजेब ठेवतच असल्याने संभाजी हा आपल्याला बापावर नाराज होऊन मिळाला यावरील विश्वास उठणे स्वाभाविक होते. हा अधिक काळ आपल्याच छावणीत राहिला तर दक्खनेतील आपले अस्तित्व उध्वस्त होईल हे न कळण्याइतका तो मुर्ख नक्कीच नव्हता.
त्यामुळे आपल्याला संभाजीचा उपयोग होऊन स्वराज्य बुडवता येईल हा आधीचा विचार चुकीचा आहे, उलट संभाजीच आपल्यातच फितवा निर्माण करून पातशाही बुडवेल ही शंका येताच त्याने संभाजीला घेऊन येण्याचा आदेश दिला. पण याची अखेर अटकेतच होणार हे दिलेरखानाच्या पातशहाजवळ असलेल्या वकीलाने कळवल्यामुळे दिलेरखान द्विधेत पडणे स्वाभाविक होते.
संभाजीला छावणीतून बाहेर काढायला शिवाजी महाराजांची माणसेही दिलेरखानाच्या छावणीच्या आसपास घिरट्या घालत होती. यावरून औरंगजेबाच्या मनात काय चालले आहे याची कल्पना शिवाजी महाराजांनाही आधीच आली असण्याचीही शक्यता आहे. दिलेरखानाचीही मदत संभाजीला सावध करण्याबाबतीत तरी किमान झाली असेल असेच एकंदरीत घटनाक्रम पाहता दिसते. थोडक्यात आपले कट-कारस्थान पुर्णत्वाला जाण्याआधीच संभाजी महाराजांना दिलेरखानाची छावणी सोडावी लागली. सर्व संभाव्य घटकांचा विचार करून शिवाजी महाराजांनी विजापुरकरांशीही सख्य निर्माण केलेलेच होते.
दुसरे महत्वाचे असे की संभाजी महाराज दिलेरखानाच्या छावणीत असेपर्यंत शिवाजी महाराजांनी दिलेरखानाविरुद्धात कोणतीही आक्रमक आघाडी उघडली नाही. युद्ध करून आपल्या मुलाला सोडवावे असा प्रयत्नही त्यांनी केला नाही. आणि मुलगा समजा दुरावलेलाच होता तर त्याच्याशीही युद्ध करायला शिवाजी महाराजांनी मागेपुढे पाहिले नसते. पण तसे एकदाही झाले नाही. विजापुरकरांना संरक्षणात्मक मदत त्यांनी केली पण स्वत: कोणतीही आघाडी उघडली नाही.
औरंगजेबाच्या संभाजीच्या अटकेच्या आदेशाची शिवाजी महाराजांना कल्पना असावी असे दिसते. पन्हाळ्याला संभाजीचे भेट झाल्यावर त्यांनी औरंगजेबाला संभाजीशी दगा करायचा होता या अर्थाचे उद्गार सभासद बखरीत आले आहेत.
हा एक फसलेला कट
दिलेरखान प्रकरणाची तर्काधिष्ठित व उपलब्ध माहितीनुसार छानणी केली असता असे दिसते की हा एक पितापुत्रात प्रदिर्घकाळ शिजलेला कट होता. याला एक प्रकारचा गनीमी कावाच म्हणता येईल. या कटाच्या सिद्धतेसाठी गर होती ती शिवाजी व संभाजीत बेबनाव झाल्याची हूल उठवण्याची. अशा हुली शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक वेळा उठवलेल्या आहेत. बहादूरखानाची छावणी लुटतांनाही अशाच हुलीचा वापर केला होता. राज्याभिषेकाने हुलीला कारण दिले. सोयराबाईंच्या महत्वाकांक्षी स्वभावाची जोड घेण्यात आली. आधीच म्हटल्याप्रमाणे मुळात शिवाजी महाराज अदयाप तरुण असतांना वारसाचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण नव्हते. संभाजी महाराजांचा युवराज्याभिषेक झाला असल्याने वारसाचा प्रश्न तसाही निकाली निघला होता. आता धर्मानेही संभाजीच राज्याचा वारस होता. परंतू बेबनावाच्या वावड्या उठवल्या तर गेल्या. या कटात शिवाजी महाराजांनी मोरोपंतासारख्या एखाद-दुस-याच मंत्र्याला सामील केले असेल. बाकी लोकांच्या कानावर पडल्या त्या फक्त वावड्या. पण त्या वावड्यांपासून नंतर संभाजी महाराजांची मुक्तता झाली नाही. त्यात लवकरच शिवाजी महाराजही गेल्यामुळे त्या वावड्या सत्य आहेत अशी कल्पना बखरकारांची होणे स्वाभाविक होते.
संभाजीला शृंगारपुरला पाठवणे हा त्या कटाचाच भाग होता. बेबनावाची कहाणी खरी त्यामुळेच वाटली. असे असले तरी संभाजी महाराजांचे कोणतेही अधिकार कमी झालेले नव्हते. दिलेरखान व पातशहाला संभाजी एक सावज वाटला असणार कारण दिलेरखानाशी संवाद साधायला सुरुवात संभाजी महाराजांनीच केली असावी. पण त्यांनीही उतावळेपणा कोठे दाखवला नाही. खरेच नाराज राजपूत्र असते तर संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीतच पलायन केले असते. पण तसे झालेले नाही. शिवाजी महाराज कर्नाटकाहून परत आल्यानंतर ताजी राजकीय स्थिती पाहुन व भावी योजनेला यशाकडे नेता येईल अशी व्यवस्था करून मग संभाजी महाराजांना अत्यंत सोयीच्या सज्जनगडावर जायचा आदेश झाला. तेथून दिलेरखानाची छावणी जवळ होती. संभाजी दिलेरखानाला जाऊन मिळनार ही कल्पना असतांनाही शिवाजी महाराजांनी कोणतीही प्रतिबंधक व्यवस्था केली नाही. कारण दिलेरखानाला जाऊन मिळणे हाच तर उद्देश्य होता. उलट तो पुर्ण होईल असे वातावरण व संधी निर्माण करायला शिवाजी महाराजांने संधी दिली असेच एकंदरीत दिसते.
भुपाळगड मिळवून देणे संभाजीच्या दृष्टीने विश्वास मिळवण्यासाठी आवश्यक होते. तसे झालेही. पण नंतर दिलेरखानाला एकही यश मिळाले नाही. विजापूरचे स्वप्नही साकार झाले नाही. शाहजादा मोअज्जम दक्खनेचा सुभेदार म्हणून पहिल्याच पावलात तोंडघशी पडला. दिलेरखानाच्या छावणीतही सरदारांत मतभेद वाढू लागले. सर्व बाबींची खबर घेणा-या चाणाक्ष औरंगजेबाच्या लक्षात हा प्रकार येणे क्रमप्राप्तच होते. ते तसे झालेही. संभाजी दिलेरखानाच्या छावणीतच होता. त्याला काहीतरी बहाणे बनवून आग-याला पुन्हा आनण्याचा त्याचा प्रत्यत्न दिलेरखानाम्नुळे वा शिवाजी महाराजांच्या हेरांमुळे फसला. कट फसलाय हे लक्षात येताच संभाजी महाराज सटकले. हा सारा प्रकार ठरवल्याप्रमाणेच झाल्याचे दिसते. शिवाजी महाराजांनी संभाजीवर कसलीही अवकृपा केली नाही. फितूर झाल्याबद्दल बोल लावले नाही. राज्याची वाटणीही केली नाही. संभाजी महाराजांना पित्यावर रागावून स्वत:चे राज्यच्घ बनवायचे असते तर ते बलाढ्य़ मोगलांच्या आश्रयाला न जाता दुर्बल अशा दक्षीणेतील कोणत्याही शाहीला मिळू शकत होते. पण तसेही झालेले नाही.
उत्तरेचे शिवाजी महाराजांचे धोरण संभाजी महाराजांना मान्यच होते. अन्यथा त्यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाशी वैर घेत शाहजादा अकबराला आसरा दिला नसता. राजपुतांशी पत्रव्यवहार करत औरंगजेबाला नेस्तनाबूत करत पार त्याला अटक करून शाहजाद्याला तख्तावर बसवण्याचा विचार केला नसता. तसे झाले तर अप्रत्यक्ष सत्ता मराठे-राजपुतांच्या हाती आली असती. अदूरदृष्टीच्या राजपुतांमुळे तोही प्रयत्न फसला हे आपल्याला माहितच आहे. तो तरी यशस्वी होता तर भारताचा इतिहास बदलला असता.
औरंगजेबाच्या मनात संभाजी केवढा सलत असेल याची कल्पना येण्यासाठीही दिलेरखान प्रकरण त्या वेळच्या वावड्या दूर सारत पाहिले नाही तर समजणार नाही. त्या वावड्या मुळात कट सिद्धीला नेण्यासाठीचे साधन होते. त्यात तथ्य असण्यासारखी स्थिती दिसत नाही. पण नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्युनंतर त्या वावड्या याच सत्य बनल्या व त्याधारित राजकारण घडले.
पण औरंगजेब सावध होता. मराठ्यांमध्ये त्यानेच शेवटी फूट पाडली. त्याने संभाजी हे आपले जीवित-लक्ष्य बनवले होते. त्यानेच शेवटी "फितवा" करून संभाजी महाराजांना कसे अनपेक्षीत पकडले व हाल हाल करून ठार मारले यावरून त्याच्या मनात केवढा द्वेष भरला असेल याची कल्पना येते. या घटनेकडे नेणारा आरंभ बिंदू म्हणजे दिलेरखानाला जाऊन मिळणे, शाहजादा अकबराला आश्रय देत औरंगजेबालाच पदच्युत करत शाहजाद्याला नामधारी पातशहा बनवण्यासाठी सर्वात मोठा कट शिजवणे. हे सारे जीवावरचे खेळ होते. शिवाजी महाराजांच्या या छाव्याने कणभरही मागे न हटता ते खेळले. समकालीन मराठा मंत्री व सरदारांना हे सारे समजायची दूरदृष्टी नव्हती. सोयराबाई पुत्रप्रेमाने अंध बनून गेल्या होत्या. आपला पूत्र वयात येताच सावत्र मुलाविरुद्ध कारस्थाने करण्यात त्यांनी महत्वाचा काळ बरबाद केला. दिल्लीचे तख्त मराठ्यांचे बाहुले बनले पण ते फार नंतर... पेशवाईत.
दिलेरखानाला जाऊन मिळणे ही "घोडचूक" नव्हती. ती योजनाबद्ध चाल होती. हा महत्वाकांक्षी कट फसला हे खरे पण म्हणून या राजकीय कटाचे महत्व कमी होत नाही. किंबहुना या कटामुळेच संभाजी महाराजांवर फितुरीचाही कलंक लागला. पण त्याचे पर्वा न करता शाहजादा अकबराचा प्यादे म्हणून उपयोग करून घेत त्यांनी तेच सूत्र कायम ठेवले. पण त्याची नीटशी चिकित्सा इतिहासकारांनी केली नाही. संभाजी महाराज एक शापित यक्ष होते हेच खरे!