आपल्याकडे सांस्कृतिक अभ्यासाबद्दल व त्यानुषंगिक साहित्याबद्दल फारच बाळबोध कल्पना आहेत. किंबहुना सांस्कृतिक साहित्याचे वाचन एकतर धार्मिक श्रद्धाळू मंडळी तरी करते किंवा काही प्रमाणात धर्म-संस्कृतीचे अभ्यासक तरी करतात. अभ्यासकांचे लेखन बव्हंशी अकारण तत्वज्जड असणे स्वाभाविक आहे आणि मग सामान्य माणूस त्यापासून दूर पळणेच पसंत करतो. शिवाय आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या इतिहासाकडे पाहण्याचे ठराविक दृष्टीकोण आहेत व ते ब्राह्मण-ब्राह्मणेतर परिघात फिरतांना दिसतात. त्यामुळे होणारे आकलन हे कसेही झाले तरी एकांगीच ठरते. त्यातून भरीव काही हाती लागण्याचा संभव नसतो.
मी गेली ३०-३५ वर्ष भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाला वाहून घेतलेली आहेत. मी स्थितीवादी संशोधक नसल्याने माझ्या विचारांत व निष्कर्षांत जसजसे नवनवे पुरावे समोर येत गेले तसतसे बदलही झाले आहेत. ते बदल माझ्या आजवरच्या या विषयावरील पुस्तके व लेख यातून सहज टिपता येतात. भारतातील सामाजिक संघर्ष ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाभोवती फिरता ठेवण्यात काही जणांचे स्वार्थ दडलेले आहेत हे माझ्या लक्षात आले. हा वाद ब्राह्मण-ब्राह्मणेतर नसून असला तर तो वैदिक-वैदिकेतर वाद आहे व असे असुनही काहीना राजकीय व सामाजित स्वार्थापोटी केवळ ब्राह्मण द्वेष हाच केंद्रबिंदू बनवत स्वत:ला मात्र त्यापासून बाजुला ठेवायचे आहे हेही माझ्या लक्षात आले. त्यानुसार माझी पुढची मांडणी झाली. या विषयांवर लिहित असतांना अनेकांनी मला वैदिकेतरांचे धार्मिक साहित्य काय असे प्रश्न उपहासाने विचारायला सुरुवात केली. त्याची मी उत्तरे दिली असली तरी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे सोपे नव्हते. त्यासाठी मी सांस्कृतीक थरार कादंबरी लिहिण्याचा घाट घातला.
भारतातील प्राचीन संस्कृती म्हणजे असूर-यक्षादि संस्कृती. वेद हा शब्द फक्त वैदिकांच्या चार वेदांपुरता मर्यादित नसून वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा असल्याने चार वेदांनाच प्रमाण मानणारा तो वैदिक असा समज असला तरी वैदिकेतर संस्कृतीचेही वेद होते याचे पुरावे मला मिळत गेले. गोपथ ब्राह्मणाने या वेदांचा "उपवेद" म्हणून उल्लेख केला असला तरी त्यांच्या शिर्षकावरुनच ते वैदिकेतर यज्ञसंस्कृतीपुर्व लोकांचे वेद होते हे सहज लक्षात येते. पिशाच्च, गंधर्व, सर्प या वेदांबरोबरच महत्वाचा एक वेद होता व तो म्हणजे असूरवेद! आज तो अस्तित्वात नाही. हाच काय, अन्य कोणताही वेद अस्तित्वात नाही. समजा अलीकडच्या काळातील कोणा संशोधकाला "असूरवेद" सापडलाच तर आधुनिक भारतात काय उत्पात माजेल या कल्पनेवर आधारीत ही कादंबरी. कादंबरीचा नायक नवबौद्ध गौतम कांबळे तर आपल्या संशोधक वडिलांच्या खुन्यांचा शोध घेण्यासाठी आटापिटा करणारी सायली जोशी. सर्व प्रकारच्या संघटना कोणत्या जहरी संघर्षात जातात याचा आलेख म्हणजे ही कादंबरी.
ही कादंबरी प्रचंड यशस्वी ठरली. या कादंबरीवर एका ओळीचेही परिक्षण कोठे आले नसतांनाही याच्या पाच वर्षत तीन आवृत्त्या झाल्या. चवथी आवृत्ती आता प्राजक्त प्रकाशनातर्फे येते आहे. या कादंबरीचे नाट्य रुपांतरही झाले आणि राज्य नाट्य स्पर्धेत त्याला पहिले पारितोषिकही मिळाले. सुनील हरिश्चन्द्र या तरुणाने संहितेवर खुपच मेहनत घेतली होती व सारे विरोध धुत्कारण्याचे साहसही त्याच्यात होते. नाटकावर मात्र विस्तृत चर्चा झाली. या कादंबरीवर चित्रपट करण्याची अनेकांची इच्छा असली तरी साहसाअभावी ते अजून तरी झाले नसले तरी लवकरच या कादंबरीवर चित्रपट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असूरवेदात काय होते हे समजण्याची आज तरी शक्यता नाही. पण इतिहासात असे अनेक बहुमोल ग्रंथ, जे सांस्कृतिक इतिहास समजावून घ्यायला उपयुक्त ठरले असते, धार्मिक संघर्षांत ते नष्ट झालेले आहेत. ते जाऊद्या, जुना इतिहास जपणरी स्थानेही आज आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहेत आणि तरीही आपण इतिहास-संस्कृतीबद्दल हिरीरीने बोलतो हाही एक विरोधाभास आहे. असो. असूरवेदने मराठी साहित्यात एका नव्या साहित्यप्रकाराचे थरारक दालन उघडले हे मात्र खरे.