Friday, March 4, 2011

चळवळींचा म्रुत्यु कसा होतो? -३चळवळीचा नेमका हेतु काय आहे, उद्दिष्ट्ये काय आहेत आणि त्यासाठी साधने काय वापरायची आहेत, ज्याविरुद्ध चळवळ आहे त्या बाजुने प्रतिहल्ले केले तर त्याचे प्रत्युत्तर कसे द्यायचे याची जाणीव चळवळ धुरीणांना असावी ही अपेक्षा असतेच. चळवळ, मग ती कोनतीही असो, कोणत्यातरी फलनिष्पत्तीसाठी असते. साधने त्या-त्या वेळची परिस्थिती पाहुन बदलण्याची क्षमताही अपेक्षित असते. असे असेल तरच चळवळ पुर्णतया नाही तर किमान अंशता: तरी सफल होण्याची थोडीबहुत शक्यता असते.

"हटाव लुंगी-बजाव पुंगी" करत शिवसेनेने परप्रांतीयांविरुद्ध एक चळवळ उभारली...प्रादेशिक अस्मितेचा आणि तत्कालीन स्थानिकांच्या बेरोजगारीचा संदर्भ त्या चळवळीला होता, त्यामुळे शिवसेना फोफावली. पण मुळ उद्दिष्ट सफल झाले नाही. शिवसेना नंतर हिंदुत्ववाद आणि त्याआधारित राजकारणात अडकुन बसली. त्या अर्थाने चळवळ म्हणुन शिवसेना अपेशी ठरली असेच म्हनावे लागते. त्या संघटनेत नंतर फुटीही पडल्या आणि अलीकडेच एक भले थोरले भगदाडही पडले. ज्या उद्दिष्टाने चळवळ सुरु झाली ते दुरच राहिले आणि चलवळीचा म्रुत्यु झाला.

अलीकडे ब्राह्मणी वर्चस्ववादाविरुद्ध महाराष्ट्रात दोन महत्वाच्या चळवळी सुरु आहेत असे दिसते. एक आहे मराठा सेवा संघ प्रणित ज्याची लढावु बाजु संभाजी ब्रिगेड सांभाळते. दुसरी आहे भारत मुक्ती मोर्चा प्रणित चळवळ. ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास खोटा असुन त्याचे पुनर्लेखन केले पाहिजे असा आग्रह या दोन्ही संघटनांचा आहे आणि त्या द्रुष्टीने असंख्य पुस्तकेही प्रकाशित केली जात आहेत. या पुस्तकांचा वाचकवर्ग चळवळीतील जसा आहे तसाच विरोधी गटही काही प्रमानात आहे. अर्थात या पुस्तकांची दखल-समीक्षा तथाकथित उच्चवर्णीय समीक्षक-इतिहासकार करत नाहीत...अनेकदा दखलही घेत नाहीत असे चित्र आहे. म्हनजे दखल घ्यावी असा आग्रह असु शकत नाही, पण आपल्याच समाजातील विचारप्रवाह नेमके कोनत्या दिशेने जात आहेत याची जाणीव व भान येण्यासाठी ते आवश्यक असते.

ब्राह्मण हे युरेशियन रक्ताचे असुन ते परकीय आहेत असा दोन्ही संघटनांचा दावा आहे आणि किंबहुना ब्राह्मण द्वेष हा जातीय स्वरुपाचा नसुन वांशिक स्वरुपाचा आहे असा तो तर्क आहे आणि त्याला मायकेल बामशाद सारख्याच्या जेनेटिकल अहवालाचा आधार घेतला जातो. एके काळी (व आजही अनेक) ब्राह्मण "आम्ही उत्तर ध्रुवावरुन आलो आणि येथील रानटी-मागास जमातींना जिंकुन त्यांना वैदिक धर्मात सामावुन घेतले." असा जयघोष करत होते व आहेत. या प्रश्नावर दोन्ही बाजु चुकिच्या होत्या व आहेत. ब्राह्मणांनी काही प्रमानात
आपले विदेशी मुळ नाकारायला सुरुवात केली असली तरी सिंधु संस्क्रुतीचे आम्हीच निर्माते आहोत असे सांगायला सुरुवात केल्याने एक नवा खोटारडेपणा समोर येत आहे. दादोजी कोंड्देव प्रकरणीही अशीच हटवादी भुमिका घेतल्याने संभाजी ब्रिगेडच्या चळवळीला यश मिळाले हे ब्रिगेडवर टीका करणार्या ब्राह्मण समुदायाने लक्षात घ्यायला हवे. पण तसे झालेले दिसत नाही. या यशात भारत मुक्ती मोर्चानेही हात धुवुन घेतला असुन आता रायगडावरील महाराजांच्या कुत्र्याची समाधी ही मुलत: सईबाईंची आहे असा नवा शोध त्यांनी लावला आहे आणि तो पुतळा उखडुन फेकण्याची भाषा सुरु झाली आहे. तसेच शनिवारवाडा म्हनजेच लाल महाल होता असेही तर्कट कोणी दारवटकर नावाच्या स्वता:ला इतिहास संशोधक म्हणवनार्या ग्रुहस्थांनी लढवले आहे. हे दोन्ही दावे अनैतिहासिक आहेत, त्याला सत्याचा, पुराव्याचा एकही आधार नाही हे खरे आहे. पण एके ठिकाणी बाजु सत्य असल्याने विजय मिळाला म्हणुन आता काहीही खोटे सांगितले तर तेथेही विजय मिळेल अशी भावना निर्माण होते तेथे चळवळीचा अंत सुरु होतो.

ब्राह्मण पक्षाने इतिहासात वारंवार खोटेपणा केला आहे हे खरे. पण त्याला प्रत्युत्तर म्हणुन नवा खोटेपणा समाज स्वीकारेल अशी अपेक्षा बाळगता येत नाही. खरा इतिहास लिहायचा असेल तर ज्याचे त्याचे खरे माप त्याच्या पदरात घालावे लागते, मग तो स्वजातीय असो कि भिन्न-जातीय. या दोन्ही संघटनांच्या प्रकाशनांत सत्यान्वेषनाऐवजी जहरी टीका आणि द्वेषभावनेचे अधिक प्राबल्य असल्याने विचारी मंडळी (कोनत्याही जातीतील असोत) ते लेखन गंभीरपणे घेत नाहित. एवढेच नव्हे तर त्यामुळे खरे आणि रास्त मुद्देही टीकेच्या भोवर्यात सापडतात. हे चळवळीसाठी मारक आहे याचे कितपत भान या नेत्यांना आहे हा प्रश्नच आहे.

शिवाजी महाराज यांचा खरा अपमान जर कोणी केला असेल तर गेल्या दीड शतकातील सर्वच जातींच्या, आम्हालाच शिवाजी महाराज समजले असा आव आणनार्या इतिहास संशोधकांनी आणि चलवळ्वाल्यांनी. ब्राह्मणांनी त्यांचे चित्रण त्यांच्या सोइचे केले तर चळवळवाले त्यांच्या सोइचे चित्रण करत आहेत. या चित्रणांना जातीय रंग असल्याने ते प्रामाणिक चित्रण असु शकत नाही. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारले तसेच क्रुश्णाजी भास्करलाही मारले. खंडोजी खोपडेला ठार मारले तसेच रांझ्याच्या पाटलाचेही हात तोडले. एक राजा म्हणुन जेही द्रोही होते वा त्यांचे शत्रु होते वा दगाबाज होते वा अपराधी होते त्यांना जर ठार मारले असेल तर ज्यांना ठार मारले त्यांची जात बघुन आज त्याचा गवगवा करत जातीय द्वेष निर्माण करणे हे काही कोनत्याही चलवळीचे नैतिक ध्येय असु शकत नाही. त्याच वेळीस अफजलखानाच्या वधाचीच तेवढी पोस्टर्स फडकावत हिंदुत्ववादी संघटना जो मुर्खपणा करतात त्याला तर तोडच नाही. कोणी महाराजांना हिंदुत्ववादी चष्म्यातुन पहातो तर कोणी मराठावादी भुमिकेतुन. त्यातुन शिवाजी महाराज समजणे कालत्रयी शक्य नाही. तसा अट्टाहासही करु नये. शिवाजी महाराजांना ब्राह्मनांनी घडवले असा ब्राह्मणी दावा तर पराकोटीचा अद्न्यानाधारित आहे...कारण मग महाराजांपुर्वी आणि नंतर महाराजांच्या तोलामोलाची एकही व्यक्ति ७०० वर्षांत का निर्माण करता आली नाही? थोडक्यात दोन्ही बाजु एका निरर्थक वादांत समाजाला गोवत आहेत आणि त्यातुन उभयपक्षाची हानीच होणार आहे. मुळात शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचीही ज्यांची लायकी नाही ते स्वत:ला इतिहास संशोधक समजत एक विपर्यस्त इतिहास मांडत आहेत...ही काळजीची बाब आहे.
असे जेंव्हा घडते तेंव्हा चळवळी समाजाची सहानुभुती गमवायला लागते आणि त्यातुन चळवळीचा अंत होतो.
चळवळीचे अंत व्हायला अजुनही काही घटक हातभार लावत असतात. मी येथे वरील उदाहरणे घेतली ती माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी.

चलवळ उभी होण्यामागे एक विशिष्ट तत्वद्न्यान असते. त्या तत्वद्न्यानाला समतोल नि:पक्ष आणि न्याय्य संशोधनाच्या पाठबळाची गरज असते. नेमके मुद्दे समाजासमोर मांडत राहण्यासाठी तशाच वक्त्यांची गरज असते. प्रत्यक्षात भारतातील चलवळी या बव्हंशी व्यक्तिकेन्द्रित होत्या व आहेत हे सत्य तुम्हालाही माहितच आहे. व्यक्तिकेंद्रित चलवळी या नेत्यांभोवतीच फिरत असतात. चळवळीतील विओचारवंतांनी/वक्त्यांनी नेत्याला मान्य असनारीच भाषा वापरावी, तेच तत्वद्न्यान वापरावे व त्यांना मान्य असनारेच संशोधन मांडावे अशी अपेक्षा असते. रा.स्व. संघाची बौद्धिके त्यासाठीच असतात. स्वतंत्र प्रतिभा आणि विचाराचे स्वातंत्र्य अशा चलवळींत मिळण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे चळवळ स्थिती-स्थापक होत एक वैचारिक डबके बनु लागते आणि तीची बौद्धिक वाढच खुंटते. अशा स्थितीत एखादा चळवळीतील विचारवंत पुढचे विचार मांडु लागला वा नवीन नीतिची मांडणी करु लागला तर अशांना बाजुला सारण्यात येते...त्याला संपवण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले जातात...त्यासाठी अविरत बदनामी, हल्ले, कुजबुज मोहिमांचा अविरत वापर केला जातो. महात्मा गांधींनी एवढे खालचे टोक गाठले नसले तरी विधी-वत कोन्ग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडुन आलेल्या सुभाषचंद्र बोस यांना लगोलग राजीनामा देण्यास भाग पाडले होते व राष्ट्रीय प्रवाहतुन दुर करण्याचा प्रयत्न केला होता हे सर्वविदित आहेच. वरील संदर्भात प्रा. हरी नरके यांच्याविरुद्ध भारत मुक्ती मोर्चाच्या मुखपत्रात गेली ३-४ महिने जी अश्लाघ्य भाषेतील बदनामी मोहीम सुरु आहे ती पहाता माझ्या या लेखातील विवेचनाचा अन्वयार्थ लक्षात येइल. आणि त्यायुन ठळक होणारा मुद्दा म्हनजे या पद्धतीने चळवळ म्रुत्युपंथाकडे वाट चालु लागते आणि जीही काही ध्येये असतात ती दुरच राहतात....निर्माण होते ती एक न सांधली जाणारी सामाजिक दरी. होते फक्त कार्यकर्त्यांची घोर फसवणुक...आणि ससेहोलपट.

चळवळी या सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असतातच. त्याशिवाय समाजात वैचारिक मंथन होवु शकत नाही व प्रत्येक पक्षाला आपापल्या भुमिका तपासुन त्या दुरुस्त करुन घेता येत नाहीत. प्रत्येक चळवळीने आत्मपरिक्षण करतच पुढील वाटचाल...तीही द्वेषविरहित...करायला हवी...तरच अशा चळवळी दीर्घ काळ टिकु शकतील...

अन्यथा त्यांचा म्रुत्यु अटळ आहे.

7 comments:

 1. वास्तवास धरून आसे, प्रस्तापितांचे कान उपडणारे लेखन आहे समाजात परत जातिवाद वाढवणाऱ्या शक्तींनी याचा बोध घ्यावा संजय साहेब तुमचे आभार आणि आभिनंदन

  ReplyDelete
 2. 'मुलनिवासी नायक' मध्ये सध्या हाच प्रकार घडतोय..... नरके सरांविरुध्द या दैनिकाने मोहीमच उघडलेली दिसते.....या मुळे माझ्यासारख्या अनेकांचा गोंधळ उडतो ...........हा उडालेला गोंधळ बऱ्याच प्रमाणात कमी केल्या बद्दल धन्यवाद......
  याच विषयवार आणखी प्रकाशाची अपेक्षा .........

  ReplyDelete
 3. छान सोनवणी साहेब,

  गेल्या बर्याच दिवसा पासून आपण वेग वेगळ्या मुद्दया वर चर्चा केल्या आहेत, भारत मुक्ती मोर्चा चा कार्यकर्ता म्हणून मी बर्याच गोष्टी तुम्हाला चर्चे द्वारे समजून सांगितल्या आहेत ......... पण आज मला असे वाटते त्याचा काहीच फायदा झाला नाही.

  आपण समीक्षा करतात याचे सर्व प्रथम आपले अभिनंदन.... पण समीक्षा करायला सुद्धा त्या गोष्टी मध्ये सक्रीय सहभाग घ्यावा लागतो ....... मला आपल्याला हेच सांगायचे आहे कि "फक्त" काही पुस्तक लिहून किंवा लेख लिहून चळवळ चालत नाही, त्यासाठी समाजात जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो, लोकांना झोपेतून जागे करावे लागते, लढाई साठी त्यांची मानसिक तयारी करावी लागते. भारत मुक्ती मोर्चा ने जे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केले आहे ते परिवर्तन वादी विचारावर निर्माण केले आहे, अर्थात आपला यावर विश्वास नाही, सोडून द्या ......
  आपण जे लिहिता ते आपले स्वताचे काहीच नसते ते सुद्धा कोणाच्या तरी संदर्भाला पुरावा मानून लिहिता ....... त्यामुळे कृपया दुसर्या कोणी संशोधन केलेल्या गोष्टी वर टीका करण्याच्या आधी त्या व्यक्ती किंवा संघटनेने कुठच्या गोष्टी ला आधार मानला आहे याची कृपया तपासणी करावी ............. अशी माझी पुन्हा पुन्हा विनंती

  राहिला ब्राह्मण "विदेशी युरेशिअन" असल्याचा पुरावा, हे तर ब्राह्मणाच स्वताला विदेशी असल्याचे सांगतो (तुमीही तुमच्या लेखात नमूद केले आहे) ........ मायकल बामशाद चा रिपोर्ट ... हा तर मीच आपल्याला दिला होता २१ मे २००१ च्या "Times ऑफ इंडिया" मध्ये तो छापुन आला आहे ...... हे आपण आपल्या लेखात सांगत नाहीत ..... असे का ??

  आता चळवळ म्हंटली कि त्याचे ध्येय काय आहे ..... हे निश्चित असायला हवे तसे ... "भारत मुक्ती मोर्चा" चे ध्येय आणि उद्दिष्ट "व्यवस्था परिवर्तन" चे आहे ......

  तुम्ही जी "चळवळींचा म्रुत्यु कसा होतो?" हि जी "भारत मुक्ती मोर्चा" ला विरोध करण्यासाठी लेखमाला सुरु केली आहे ........ मला माहित नाही याचा उद्देश काय आहे ...... पण तुम्हाला जी चळवळ अपेक्षित आहे त्याचे आपण "ध्येय" "उद्देश" सांगू शकता काय ........... ते ध्येय उद्देश प्राप्ती साठी काय धोरणे आहेत ते सांगू शकता काय .........

  कृपया दरवेळी प्रमाणे माझी कॅमेंट डिलीट न करता त्याची उत्तरे द्या .................... कृपया

  ReplyDelete
 4. I am surprise, I will go for this

  ReplyDelete
 5. फक्त एक दिवस समाजात जाऊन फिल्ड वर्क करा आणि ह्या गोष्टी दुसर्‍यांना पटवून द्या, तर कळेल कि चळवळ फक्त शाब्दिक बुडबुडे सोडून चालत नसते. घरात बसून तलवार चालवणे शिकणे सोपे असते, पण रणांगणात उतरल्याशिवाय कळत नाही कि लढाई काय असते.

  तुम्हाला जर एवढाच बहुजनांचा पुळका येत असेल तुम्ही एखादी चळवळ का नाही उभी करत? मराठा सेवा संघाला जेवढे जनसमर्थन आहे तेवढे लोक नासमज आहेत असे तुम्हाला वाटते का? जोपर्यंत मराठे कोणताही प्रश्न न विचारता कुणाच्या मागे जात होते तेंव्हा ते चांगले, आणि आता त्यांनी स्वतःचे डोके वापरले कि चळवळीचा मृत्यू होतो?

  आणि तुम्ही कृष्णा कुलकर्ण्याचा उल्लेख कृष्णाजी भास्कर करून अर्धसत्य सांगत नाही आहात का? शाब्दिक बुडबुडे सोडून बुद्धिभेद करणे सोपे असते. संभाजी ब्रिगेड ला सत्याची बाजू घेतल्यामुळे यश मिळालेले आहे. आणि ब्राम्हण इथले आहेत याचे पुरावे तुम्ही जाहीरपणे मांडत का नाही? दारवटकर हे इतिहास संशोधक आहेत, त्यांचे अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक वाचा.

  आजकाल कादंबर्‍या लिहिणारे इतिहासकार, विचारवंत असल्याचा आव आणू लागले आहेत. जर खरेच तुम्हाला चळवळीची काळजी असेल तर त्यावर उपाय सुचवा. फक्त हे करायला हवे-ते करायला हवे असे सांगू नका. कृतीतून दाखवा.

  ReplyDelete
 6. एकलव्यजी, प्रथम काही संभ्रम दुर करतो. पहिली बाब म्हणजे मी आर्यवादावर १९८४ पासुन संशोधन करत आलो आहे...माझा पहिला प्रबंध "अन अन्शिएन्ट आर्यन्स मिथ अन्ड ओरिजिन" १९८६ साली प्रसिद्ध झाला होता. बामशाद मला तुम्ही दिलेल्या लिंकमुळे समजला हा आपला गैरसमज आहे. हाच बामशाद २००४ साली काय म्हणतो ते मी माझ्या भारत मुक्ती मोर्चावरील लेखात दिलेले आहे आणि त्यानंतरची संशोधनेही दिली आहेत. प्रथम आपण वांशिकी आणि अनुवांशिकी यातील फरक समजावुन घ्यावा. डी. एन. ए. चाचण्या या आनुवांशिकी ठरवण्यासाठी आहेत...वांशिकी नव्हेत. दुसरे असे मी भारत मुक्ती मोर्चा विरुद्ध लिहितो असा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. वर्तमान कालात चलवळींच्या संदर्भात विवेचन करत असता त्या संघटनांची व कार्यप्रनालीची माहिती व मते येणारच. मी आर. एस. एस. ते महात्मा गांधींवरही टीका केली आहे हे तुम्ही पुन्हा वाचुन पहा. ब्राह्मण स्वत:ला विदेशी आर्य समजतात हा त्यांचा प्रोब्लेम आहे...माझा नाही. आणि द्वेषाधारीत समाजपरिवर्तन होवु शकते असा सिद्धांत ज्याही कोणाला मान्य आहे मी त्यांचा विरोध करतच राहणार...मग ते कोणीही असोत. भारत मुक्ती मोर्चाने राष्ट्रव्यापी संघटन केले आहे हे खरेच आहे...पण त्याचे समालोचन करु नये असा अर्थ होत नाही. लेखाचा उद्देश समजावुन घेतला तर या टीकेला अर्थ रहात नाही. तिसरे असे कि तुम्ही म्हणता मी फक्त लिहितो...प्रत्यक्ष सक्रीय सहभाग घ्या मग बोला...मी म्हनतो तसे करायचे ठरवले तर मला सर्वच संघटनांत भाग घ्यायला हवा...भारत मुक्ती मोर्चा ही काही एकमेव संघटना नाही. संघटना यशस्वी/अपेशी का ठरतात हा माझा विषय आहे आणि त्यावर माझे विचार मांडत राहणार. तुम्ही स्वत: समाज-राजनीतिशास्त्राचे अभ्यासक आहात त्यामुळे हे समजायला जड जाणार नाही अशी आशा आहे. राहीली गोष्ट दुसर्यांच्या संशोधनाची...संशोधन किमान पुराव्यांवर आधारित तर असायला नको का? अंदाज आणि तर्कांना इतिहास संशोधनात स्थान असते का? तुम्हीच पुन्हा मुलनिवासीमधील सईबाईंवरील लेख वाचा आणि त्यात किती पुरावे आहेत हे स्पष्ट करुन सांगा. असो...ही चांगली चर्चा सुरु करुन दिल्याबद्दल खरेच धन्यवाद.

  ReplyDelete
 7. बुद्ध ने तर्कशास्त्र को आगे बढाया और बुद्धि का विकास हुवा और तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला दुनिया के पहले विश्व विद्यापीठ बनगए
  जब तक आप पानी में तैरते नहीं तब तक किनारे पर रहकर जितने भी बाते आप करोगे ओ सब हवा की बाते होंगी या उसे जितना चाहे उतना सहाय्य नहीं होगा
  जब आप आन्दोलन चलाओगे तब आप सही मायने से आन्दोलन सही है या गलत है इसके ऊपर बहस कर सकते हो
  वर्ना आपको संभाजी ब्रिग्रेड और भारत मुक्ति मोर्चा के ऊपर बोलने का हक्का और अधिकार ही नहीं क्योंकि ये दोनों संघटन घर घर में जाकर लोगो को जगाने की कोशिश कर रही है और आप हवा में बाते करते हुए इन दो संघटन के ऊपर सही और गलत का बहस कर के बदनाम कर रहे हो
  आप ऐसा करने के पहले समाज में घुमो और लोगो को जाके बताव ये दो संघटन देशद्रोही है तो सही पता चलेगा कोण देशद्रोही है
  घर में बैठे फालतू बाते मत बताव देश में कितने लोगो से मिले और उनके अनुभव सही बाबासाहब को साक्षी मनाकर लिखते रहो हम भी का उनका आदर करेंगे और सही देशद्रोही को लोगोके सामने भर चौराहपर फासी देने के हम अपील करेंगे

  ReplyDelete