Sunday, April 24, 2011

समाजाचे एकुणात भले व्हावे यासाठी?

वांशिक/धार्मिक/प्रांतिक आणि जातीय नागांचा एक विखारी डंख भारतीय समाजाला बसलेला आहे आणि त्यामुळेच जी ऐहिक प्रगती एव्हाना साधता आली असती ती एका संभ्रमाच्या तिठ्य़ावर रेंगाळलेली आहे. या संभ्रमांना अनेकविध आयामे आहेत. परिमाणे आहेत. ब्राह्मणांमुळे बहुजनांची प्रगती झालेली नाही असा बहुजनांचा (?) आरोप आहे तसाच मराठा या राज्यकर्त्या समाजामुळे मराठेतर बहुजनांची प्रगती झाली नाही असा आरोप आहे. दलित -भटके-विमुक्त-आदिवासींची परगती झाली नाही यामागे सर्वच सवर्ण जबाबदार आहेत असा आक्रोश आहेच. मुस्लिम-ख्रिस्ती हेच हिंदुंचे शत्रु असुन त्यांच्यामुळे हिंदुंना सापत्नभाव मिळतो आणि पर्यायाने त्यांचे शोषण होते हाही आरोप आहेच. बहुसंख्य हिंदुंमुळे आम्ही असुरक्षित बनलो आहोत असाही उलटपक्षी आरोप आहेच. या आरोप-प्रत्यारोपात तथ्य नाही असे म्हणता येणे अवघड आहे कारण समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी, समस्येची मुलभुत कारणे शोधण्याऐवजी, वरकरणी सोपी वाटणारी उत्तरे शोधणे हेच कार्य या सर्वांनीच केले आहे असे स्पष्ट दिसते. आणि हेच कार्य स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात आजही सातत्याने होत असेल तर कोणीही कसलीही मानसिक/वैचारिक/बौद्धिक प्रगती केलेली नाही असे सिद्ध होते असे नाइलाजाने म्हणावे लागते.

आपण सारेच आरोप-प्रत्यारोपांच्या दलदलीत अपरिहार्यपणे अडकुन पडलो आहोत.

यात उद्याचा सुर्य कोठे आहे?

कि या घनतमात हिंस्त्र श्वापदांच्या गुरगुरी आणि कुरबुरी ऐकत असेच भयभीत-असुरक्षित जीवन जगायचे आहे? मानवी समुदायांना वास्तव वा काल्पनिक भयात ठेवले कि जसे धर्ममार्तंडांचे फावते तसेच राजकारण्यांचेही. एक भय पारलौकिक असते तर दुसरे ऐहिक. एक आर्थिक भय असते तर दुसरे सुरक्षिततेचे. भयाच्या सावटाखाली मानवी समुदायांना ठेवत आपापले स्वर्थ साधणे हे चतुर लोकांचे अव्याहत कार्य असते. राजसत्ता, धर्मसत्ता, जातीय सत्ता, प्रांतीय महत्ता, वांशिक सत्ता.......कोणत्याही प्रकारची असो सत्ता...ती शेवटी मानवी समाजाला एका आंतर-कलहात ढकलत वास्तव प्रश्नांपासुन दूर ढकलत असते. जीना हा कधीच कट्टर मुस्लिम नव्हता पण तो एक नव्हे तर दोन कट्टर मुस्लिम राष्ट्रे निर्माण होण्यास कारणीभुत झाला. येथील जातीय समुदायांचे महानायकही ज्यांचा द्वेष करायला अनुयायांना सांगतात त्यांच्या दावणीला आपापले घोडे बांधुन मस्तीत असतात. हे अनुयायी कधीच समजावुन घेत नाहीत...किंबहुना तेवढी वैचारिक योग्यताही नसते..वा एवढे त्यांचे brain washing झालेले असते कि ते आपली स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरपुन बसलेले असतात.

भारतीय समाजापुरते बोलत असतांना त्याचे एवढे मानसिक स्खलन झाल्याचे दिसते कि त्यांना आपला नेमका अभ्युदय कशात आहे हेच कळेनासे झाले आहे. विवेकी लोक एकाकी पडलेले असुन सांस्क्रुतीक/जातीय/आर्थिक माफिया त्यांचे सर्वस्व हरपुन घ्यायला नित्यशा: सज्ज झालेले दिसतात. विकावु/भाडोत्री तथाकथित साहित्य-विचारवाले मात्र सोयिचे असल्याने त्यांना हवे तेंव्हा प्रोजेच्ट केले जाते आणि हवे तेंव्हा घरी बसवले जाते. मुळात हा सारा व्यवहारच असल्याने कोणी कोणाविरुद्ध बोंब मारण्याची शक्यता नसते आणि मारली तर त्याला पुरेपुर बदनाम करण्याची सर्वच साधने या माफियांकडे असल्याने आणि समाज सर्वच पातळीवर भयभीत असल्याने तर त्यांना कोण पुसतो?

भारतीय मानसिकता एबढ्या रसातळाला जावुन पोहोचली आहे कि विवेक हा शब्द फक्त शब्दकोशातच उरलेला आहे. स्वर्थाच्या दलदलीत समाज एवढा अडकलेला आहे कि आपले बहुमोल मतही विकले जाते. आणि ते विकले याची लाज कोणालाही वाटत नाही. कोणी पैशांच्या मोबदल्यात मत विकतो तर कोणी आश्वासनांच्या. कोणी धर्माच्या नावावर विकतो तर कोणी जातीच्या. पण विकासासाठी कोणी सहसा मत देत नाही. ही मानसिकता राजकिय माफियांनी ओळक्खली आहे. मग मनातील सुप्त क्रांतीच्या वांझ अपेक्षांपोटी स्वत:ला एक्स्पोज होवु न देता अशांविरुद्ध आंदोलने होतात तेंव्हा त्यांचा आत्मा थोडाफार जागा होतो...पण ज्यासाठी आंदोलने होतात वा ज्यासाठी केली जातात त्याचे आकलन असते काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारुन पहावा. कोठेतरी guilt कोन्शंस असतो...कोठेतरी टोचतेय...पण व्यवस्था बदलत नाही...बदलणार नाही...एवढी बदलुही नये असा विचार सुप्तपणे जागा असतो आणि समाज-मानसशास्त्रीय प्रयोगांत एक्स्पर्ट जे आहेत त्यांना ते चांगलेच माहित असते.

येथे एक उदाहरण देणे गरजेचे आहे. ब्राह्मणांचे आहे ते सारे नाकारा असा कथित बहुजनीय संघटना सांगत असतात. कारण ब्राह्मण हे भारताबाहेरचे असुन युरेशियन आहेत असा त्यांचा, खुद्द ब्राहमणांनीच खतपानी घातलेला दावा असतो. तो मान्य केला तर ब्राह्मणांचे नाकारतांना तुम्ही पाशात्यांचे सर्वच काही का स्वीकारत आहात? पास्चात्य हे युरेशियन नाहीत का?

मग जर पाशात्य आजही युरेशियन आहेत तर त्यांची पेहराव पद्धती, वाढदिवस साजरे करण्याची पद्धती, त्यांचे तंत्रद्न्यान, त्यांचे विवाहोत्तर reception , हन्नीमुनादि असंख्य बाबी पाळता तर मग तुम्ही कोण? युरेशियनांचे मानसिक/सांस्क्रुती गुलाम असा शब्द येथे अयोग्य आहे का? पास्चात्य कंपन्यांचे नोकर होतांना लाज का वाटत नाही कि मग तुम्ही स्व-निर्मितीची योग्यताच हरपुन बसला आहात? त्यांची गुलामी हवी पण जे स्वता:च नेहमीच गुलाम राहिले त्या ब्राह्मणांची गुलामी तुम्हाला जास्त टोचते? जेवढे तुम्ही ब्राह्मणांचे गुलाम होतात ते ब्राह्मनही प्रत्य्येक सत्तेचे गुलाम होतेच कि! शक/हुण/पारद/मुस्लिम/ख्रिस्ती इइइइ सतांचे ते नोकरच होते. मग तुम्ही आजही नोकरांचे नोकर/गुलाम म्हणुन आक्रंदन करत असाल तर ती तुमची नालायकी आहे. एवढेच नव्हे तर तुमच्या वास्तुशांत्या/विवाह/सत्यनारायणादि विधी ब्राह्मण नसेल तर अपवाद वगळता तुम्हालाच चालत नाही. नव्य-शिव धर्म मानणारे गुपचुप अनेक विधी ब्राह्मणाहातीच करुन घेता ही तुमची गुलामांची गुलामी नाही काय? असंख्य नवबौद्ध सुद्धा काळुबाई ते रेणुकेपर्यंत जातात कि नाही? का बरे?

ब्राह्मण हा घटक नेहमीच सत्ताश्रयी राहिलेला आहे. ज्याची सत्ता त्याची मत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. पण मग तुम्हीही वेगळे काय केले आहे? एक शिवाजी महाराजांचे उदाहरण पुरेसे नाही. अपवादानेच नियम सिद्ध होतो. बसवेश्वर माहात्म्य गाणारेही जाती जपतात...शिख धर्मातही जाती आहेत...मराठा म्हनवणारेही (आणि आजकाल आम्ही कुणबी आहोत ते नागवंशीय असल्यामुळे महारच आहोत) प्रत्यक्षात जाती जपतात...( आणि हे खरे आहे अशी मराठा समाजाची खात्री आहे वा त्या संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांची खात्री आहे, तर किती कार्यकर्त्यांच्या घरात बुद्ध आणि आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत?...जावुद्या हा मोठा शोधाचा विषय आहे.)

प्रतिपाद्य विषय हा आहे कि भावनिक पायावर देशाचे भवितव्य उभे राहु शकत नाही. सर्वच सर्वांचे शत्रु अशी दांभिक भुमिका घेत एकही चळवळ चालु शकत नाही. ती तात्पुरती एखाद-दुस-या इश्युवर यशस्वी झाली आहे असा अभास निर्माण होईल पण ते काही चिरकाळ टिकणारे सत्य नव्हे वास्तवही नव्हे. यातुन चळवळींची वैचारिक दुर्दशाच स्पष्ट होते. द्रविड मुन्नेत्र कळघम ही संघ्हतना मुळात आर्य द्वेष करण्यासाठी उभी राहीली....पार स्वतंत्र द्राविडिस्तान मागण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हिंदी ही संस्क्रुओत्भव भाषा असल्याचे सांगत हिंदीविरोधी त्यांनी जी हिंसक आंदोलने केली त्याला तोड नाही. एका विचारवंताने (बहुदा डा. य.दि. फडके) महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र बनायला हवे असा लेख एका दिवाळी अंकात २५-३० वर्षांपुर्वी लिहिला होता. असे विघटनकारी घटक कालौघात जन्माला येतात. आताही खुप आहेत.

नवे काहीएक नाही. समाजाचे एकुणात भले व्हावे यासाठी मात्र प्रयत्न करणा-या संघटना सहजी दिसत नाहीत हेच काय ते सध्याचे वास्तव आहे.

3 comments:

  1. श्री.सन्जय सोनवनी यान्नी लिहिलेला लेख कालजाला स्पर्शुन गेला.विवेकीलोक गप्प आहेत हे दुक्ख ले विखारी लोकान्चे फ़ावते.शिवाजी महाराज यान्ना वेथीला धरले जात आहे.

    ReplyDelete
  2. सत्तेच्या संकल्पनेचे विशद केलेले स्वरूप आणि त्यास जीनाचे दिलेले उदाहरण अगदी संयुक्तिक आहे.. एकुणच संपूर्ण लेख सुंदर झालाय ..

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी यांचा लेख व त्याच्यावर प्रतिक्रियाही वाचल्या. लेख तर अतिशय सुंदर आणि विचारोत्तेजक आहेच पण प्रतिक्रियांमधून लोकांना ते पटत आहे हे ही दिसते. आज समाजाला संजयजी सारख्या नेतृत्वाची गरज आहे आणि विशेष करून तथाकथित दलित आंदोलनाला. जातीपातीन्वरून आपापसात तेढ वाढवून आपल्या पोळी वर तूप ओढणारे नेतेच आज दिसतात. खरं तर या अशा नेत्यांविरुध्ध चवताळून उठण्याची वेळ आलेली आहे. पण आज ही आपण सर्व ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर, मराठा-मराठेत्तर, हिंदू-मुस्लीम, हिंदी-तमिळ इ आभासी वादांमध्ये मश्गुल झालेले दिसतो. सर्वानी एकजूट होवून या जाती-पातीच्या संघर्षाला मूठ माती देवूया.

    ReplyDelete