Monday, April 25, 2011

पण म्हणुन समाजातील मानवाचा म्हणुन....

मनुष्य प्राणी हा मुलत: भावनीक आहे. त्याचे जीवनसिद्धांत/धर्मसिद्धांत/राजकीय सिद्धांत/सामाजिक सिद्धांत हे भावनेच्या बळावरच हेलकावत असतात. त्यामुळे मुलभुत तत्वे निरलसपणे आकलन करण्याची क्षमता तो अनेकदा हरपुन बसलेला असतो. चतूर लोक हे ओळखुन असल्याने भावनांच्या लाटा कशा उत्पन्न करायच्या आणि त्या ओघात समाजाला वाहवत नेत आपापले स्वर्थ कसे साध्य करायचे हे त्यांना चांगलेच माहित असते. आजवरच्या अनेक क्रांत्या, चळवळी, आंदोलने ही वास्तवतेच्या मार्गाने न जाता भावनीक होत गेली आहेत आणि म्हणुनच त्यातुन कोणत्याही समाजाचे शाश्वत कल्याण झाले आहे असे दिसून येत नाही. हा जगभरचा प्रश्न आहे.

खरा प्रश्न हा नेहमीच नेत्रुत्त्वाचा असतो. डा. बाबासाहेब, मार्टिन ल्युथर किंगादि नेत्यांनी त्यांच्या चळवळीला भावनिकतेपेक्षा वैचारिकतेचा सखोल पाया दिला. त्यामुळेच त्यांना व्यापक यशही मिळाले. पण ते यश टिकवून चळवळ अधिक व्यापक मानवी हितासाठी पुढे नेण्याची जबाबदारी ही अनुयायांवर असते. पण तसे झाल्याचे आपल्याला भारतात तरी दिसत नाही. गांधीविचारांची होळी गांधीवाद्यांनीच कशी पेटवली आणि आज कसा धुडगुस चालु आहे हे आपण पहातोच आहोत. समाजाच्या गरजेतुन नेते निर्माण होतात, नेते समाज घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात...पण जसा काळ पुढे सरकतो तशी त्या-त्या काळातील सर्वच तत्वे कालबाह्य होवू लागतात हे भावनांच्या लाटांवर स्वार होणा-यांना...स्वार करवणा-यांच्या लक्षात येत नाही. वर्तमान आणि भविष्याच्या परिप्रेक्षात तत्वद्न्यानांची नव्याने मांडणी करणे आवश्यकच असते हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे या चळवळी ख-या अर्थाने सामाजिक होत नसुन मानवी समाजाला प्रतिगामी बनवण्यासच हातभार लावतांना दिसतात.

वैचारीकतेचा अभाव हे एक कारण आहेच पण त्याचवेळीस जेवढा पुरातनवाद अधिक तेवढे स्वश्रेष्ठत्व अधिक असा एक गंड निर्माण होवू लागतो. भारतातील सारेच मिश्रवंशीय असून शुद्ध म्हणता येईल असा एकही मानवी गट आस्तित्वात नाही असे खुद्द डा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतले असतानाही अजुनही आर्य वंशीय, नागवंशीय, मुलनिवासी अशी सरधोपट मांडणी केली जात आहे. ती बाबासाहेबांची उंची खुजी करणारी आहे हे या मंडळीच्या लक्षात येत नाही. भारतात नाग, गरुड, कासव, वानर, सिंह, व्याघ्र अशी असंख्य प्राणी/व्रुक्षादिंना प्रतीके (Totems) मानणारे जनसमुदाय रहात होते. त्यांच्यात कधी वैर तर कधी मित्रत्व असे संबंध होते. भारतीय शैवप्रधान धर्म त्यातुनच अनेक जमातींची प्रतीके स्वीकारत झाला. ही ऐक्याची एक उदात्त सुरुवात होती. नागवंशीयांचा नव्हे तर नाग प्रतीक मानणा-यांना पुरातन इतिहासात (किमान खांडववन भागात) संहार करण्याचे कार्य क्रुष्णाने महाभारतात पार पाडले व त्याला अर्जुनाची मदत झाली हे विख्यातच आहे. क्रुष्ण स्वता:ला यदुवंशीय म्हनवून घेत असे तर अर्जुन कथित अर्थाने माअत्रुसत्तक पद्धतीचा पाईक होता. (एका स्त्रीशी पाच भावांचा विवाह किंवा विविध पुरुषांकडुन कर्ण ते नकुल-सहदेव यांची निर्मिती करुन घेणारी कुंती ही उदाहरणे या गटात मात्रुसत्ताक पद्धतीचे अवशेष दाखवतात.) मग हे पुरातन (वैदिक नव्हे) संस्क्रुतीचे पाईक नागांच्या जीवावर उठले ते काही भिन्न वंशीय म्हणुन नव्हेत तर त्यामागील तत्कालीन राजकीय कारणे पहावी लागतात.

भिन्न देवके, भिन्न जीवनपद्धती असणारे असंख्य सामाजिक घटक तेंव्हा होतेच. ते कोणत्याही धारणेने एकवंशीय नसून मिश्रवंशीय (समाजगट या अर्थाने) होते. नाग जरत्कारु या स्त्रीने जरत्कारु नावाच्या ब्राह्मण पुरुषाशी विवाह केला ही महाभारतातील घटना या अर्थाने बोलकी आहे. महाभारतातच युधिष्ठीर तत्कालीन स्थितीत ब्राह्मण कोणाला म्हनावे कारण वर्णसंकर स्थितीमुळे शुद्ध रक्ताचे कोणी रहिले नाही याबद्दल चिंतीत तर दिसतोच पण तो उत्तरही देतो कि ज्याच्या अंगी द्न्यान, दया, शील आणि करुणा असेल त्यालाच ब्राह्मण म्हणावे. पण हाच युधिष्ठीर मात्र क्षत्रियांच्या संदर्भात कसलेही विधान करत नाही हेही येथे लक्षात घ्यावे लागते. वैष्य आणि शुद्र तर फार दुरची बाब झाली. कर्णाला गुण बघुन क्षत्रिय माना असे तो कोठेही म्हणत नाही. महाभारत हे ब्राह्मण माहात्म्याने अतिरंजित बनले आहे हे मान्य केले तरी वर्णसंकर ही फार मोठी समस्या बनली होती आणि कोणीही कोणाशी वर्णापार जात विवाह करत होते हे सामाजिक वास्तव होते एवढेच येथे लक्षात घ्यायचे आहे.

अशा विराट सामाजिक इतिहासाच्या पार्श्वभुमीवर आज वांशिक भाग हा हद्दपार झालेला आहे असेच म्हणावे लागते. असे असतांनाही, ज्या महानायकांनी व्यापक विचारांची बैठक दिली ती पुढे विस्तारित करण्याचे, त्यांना नवे आयाम देण्याचे आणि ते वास्तवात आणित समाजाचे व्यापक हित घदवुन आनण्याचे कार्य करण्याऐवजी वैदिकांप्रमाणेच वेद वाक्य प्रमाणम अशी अविवेकी/अप्रागतीक भुमिका घेणारे जी चूक करत आले आहेत तीच नेमकी चुक बहुजनीय नेत्यांच्या/आदर्शांच्या वैचारिकतेबाबत केली जाते. सोयीचे तेवढे घ्यायचे, गैरसोयिचे दुर्लक्षित करायला भाग पाडायचे हा नव-पुरोहितांचा धंदा आहे. उदा. बाबासाहेबांनी शेतकरी प्रश्न व ते दुर न झाल्यास संभाव्य आत्महत्त्या, वीजेचा, पाण्याचा प्रश्न, नदीजोड करण्याची संकल्पना, स्त्रीयांचा प्रश्न, कुटुंबनियाजनाची गरज, जेंव्हा भारताची लोकसंख्या ३५ कोटींवर नव्हती तेंव्हा वारंवार मांडली....हे प्रश्न फक्त दलितांचे नव्हते. आज ते वास्तव आपण पहात आहोत. एवढी सर्वसमावेशक समाजव्यापक भुमिका घेतलेली असुनही आंबेडकरवादी म्हणनारे गेल्या ७०-८० वर्षात कोणताच धडा घेवू शकले नाहीत हे कोणाचे दुर्दैव आहे?
बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते बनवून हे महाभाग मोकळे झाले. त्यांच्या जयंत्यांना दारु पिवुन ओंगळ नाचत ओर्केस्ट्रा पार्ट्या करायला हे मोकळे झाले. हे एक उदाहरण मी देतो आहे तश्याच प्रकारे अनुयायी अन्य महनीय नेत्यांबद्दल वागतांना दिसतात. त्यांच्या नावाला देवत्व देवून टाकायचे...त्यांची साररुपातील, बीजरुपातील विचार विसरुन जायचे वा विसरायला भाग पाडायचे, त्या विचारांना पुढती न्यायचेच नाहीत कारण मग त्यांच्या नावावर धंदे कसे चालणार?

या महनियांच्या नावावर दैवत्व चढवुन तो विचार पुढे नेण्याची, त्या विचाराला बदलत्या काळपरिप्रेक्ष्यात सुसंगत बनवत त्यातील महनीयता वाढवायची असे करायला वैचारिक प्रगल्भता लागते आणि त्याच्या पुरेपुर अभाव या मंडळीत आहे. शिवाजी महाराजांचा विचार/क्रुती कालसुसंगत स्थितीत प्रगल्भ करण्याऐवजी स्वर्थासाठी ते नागवंशीय होते असा सिद्धांत मांडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होत केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याला ऐतिहासिक पार्श्वभुमीवर कसलाही पुरावा नाही असे कोणी सिद्ध करु लागले कि या भावनिक अद्न्यांचा तिळपापड होतो. पण त्यातून त्यांच्याच लेखन/संशोधनांतुन निर्माण होणारे प्रश्न उपस्तित केले कि लिहिणारा हा बाबासाहेबांचा, (म्हणजेच पर्यायाने बौद्धांचा), शिवाजी महाराजांचा अवमान करणारा ठरवून शरसंधान केले जाते. पण महाराज नागवंशीय होते आणि दलित हेही नागवंशीयच होते यातील पुरावे देत कोणी सिद्ध करायचे? हा जावईशोध मी तर लावलेला नाही. ज्यांनी लावला ते उत्तरदायी नव्हेत का? ही संशोधनाची पद्धत असते का? आणि जर शिवाजी महाराज नागवंशीय होते...म्हणजे त्यांच्या भाषेत मुलनिवासी होते तर मग त्यांनी क्षत्रियत्वाचा अधिकार मागितला याचे नेमके स्पष्टीकरण काय? म्हनजे तीढ्यातील खोटे तुम्हीच सांगायचे, ते नागवंशीय आहेत असेही बिनदिक्कतपणे सांगायचे...आणि दलितही नागवंशीयच असेही सांगुन त्यांनाही तिढ्यात पाडायचे याचा नेमका अर्थ काय होतो? (या प्रश्नांची उत्तरे मिलतील अशी आशा आहे...न मिळाल्यास मी ती नंतर देईलच.)

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातुन काय साध्य होणार आहे? मराठे आणि दलितांत ऐक्य प्रस्थापित होवून रोटी-बेटी व्यवहार सुरु होणार आहे कि काय?

असे जर घडले तर तो या देशातील सर्वात गौरवशाली इतिहास लिहिणारा अध्याय असेल यात शंकाच नाही. पण हे असे घडवून आनण्यासाठी इतिहासाला वेठीला धरायची काय गरज आहे? त्याची असंयुक्तिक तोडमोड करण्याची काय गरज आहे?

असे असंख्य प्रश्न आहेत आणि ते चर्चौघात मी विचारतच राहील आणि उत्तरांची अपेक्षा ठेवतच जाईल. ही सुर्यावर थुंकण्याची बाब नव्हे तर सुर्यालाच वेठीला धरणा-यांना जाब विचारायची बाब आहे.

पण या क्षणी प्रतिपाद्य विषय आहे तो हा कि नवी महनीये निर्माण करायची नाहीत, गतकाळांतील महनीयांना देव्हा-यात बसवून त्यांचे पुतळे-विहार-मंदिरे बांधुन पुजणीय करणारे भाट प्रत्येक समाजात असतात आणि ते केवळ स्व-स्वार्थसिद्धीसाठी समाजाला/स्वजातीयांना आणि जेही कोणी स्वजातीयांचे राजकीय हीत साध्य करण्यात मदतगार ठरु शकतात त्यांना बहकवण्यासाठी आहे.

आणि त्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे शस्त्र म्हनजे भावना...
चिकित्सा नाकारणे...
आणि चिकित्सकांचा सरळ घात करणे...
आणि बव्हंशी सर्वसामान्य समाज हा नेहमीच भेकड असतो. किंबहुना त्याने नेहमीच या ना त्या भीतीत जगावे यासाठी सर्वच यंत्रणा काम करत असतात.
भयाच्या अखंडित जोखडाखाली समाज पिचलेला असतो.
तोही भयभीत भावनेचा बळी असतो.
पण म्हणुन समाजातील मानवाचा म्हणुन जोही काही विवेक आहे तो संपलेला नसतो.

पुन्हा भेटुयात.

4 comments:

 1. लेख अत्यंत सुंदर झालाय .. कालौघात ज्या चुका आज मानव समाज पुन्हा पुन्हा गिरवत आहे त्यांना मुळीच क्षमा नाही.. बाबासाहेबांनी म्हटले होते. शिकलेले लोकच माझ्या समाजाचा प्रगतीचा गाडा मागे ढकलतील.. आणि आज तेच आपण वंशश्रेष्ठत्वाच्या वायफळ बाता मारणार्‍यांच्या तद्दन टुकार लेखनातून जाणवतेय ..

  ReplyDelete
 2. Vitthal Khandave :


  Dear Sanjay

  I like your post. Your thoughts are basic & perfect. But noone has interested in to think root level all are making opinions on emotions . AT that situatation peoples like you are writing such type it is very appreciable from my view. this is very necessary someone bring truth & facts before society. YOU continue your writing throgh facebook & use this modern communication system. Again appreciate your post.

  ReplyDelete
 3. बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते बनवून हे महाभाग मोकळे झाले. त्यांच्या जयंत्यांना-पुण्यतीथींना दारु पिवुन ओंगळ नाचत ओर्केस्ट्रा पार्ट्या करायला हे मोकळे झाले.

  हे एक वाक्य सोडले तर लेख अप्रतिम झाला आहे. कोणताही आंबेडकरी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी ओंगळ नाच करत नाही.

  ReplyDelete
 4. @Nitin...maph karaa...mi chukichee durustee keli ahe. Dhanyavad.

  ReplyDelete