Tuesday, May 24, 2011

इतिहासाची पुनर्रचना म्हणजे फक्त तोडफोड नव्हे.

१. बहुजनीय चळवळ सुरु होवून आता जवळपास १२५ वर्ष झाली आहेत. ब्राह्मणी-सावकारी व्यवस्था, वर्चस्व नाकारत स्वत:ची पाळेमुळे शोधणे आणि बहुजनांची प्रगती जाती-भेदातीत पायावर साध्य करणे हा तिचा हेतू होता. हा हेतू उदात्त आहे यात शंका असण्याचे कारण नाही. परंतु अलीकडे बहुजनीय चळवळ म्हणजे फक्त ब्राह्मणांना शिव्या देणे येथेच अडकली आहे. ब्राह्मणांना शिव्या दिल्याने कोणाचे पोट भरणार असेल तर त्यालाही हरकत नाही, पण तसे सामाजिक=समाजार्थिक वास्तव नाही. खरे तर बहुजनांना पुढची प्रगती साधायची असेल, ब्राह्मणी वर्चस्व खरोखर फेकून द्यायचे असेल तर ब्राह्मणातील "ब्र" सुद्धा न काढता द्न्यानाची व प्रगतीची नवी शिखरे ढुंढाळली पाहिजेत. त्यासाठी तरुणांत व्यापक प्रबोधन घडवून आणले पाहिजे. हे कार्य खरे चळवळीचे उद्दिष्ट असले पाहिजे.

२. इतिहासाचे पुनर्लेखन हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. ब्राह्मण इतिहासकार अपवाद वगळता ब्राह्मण-पुर्वग्रहाने भरलेला इतिहास लिहितात हे वास्तव आहे. मग तो सिंधु संस्क्रुतीचा कौरव-पांडवांचा...रामाचा वा...सातवाहनांचा असो कि झाशीच्या राणीचा. रामायण-महाभारत ते पुराणे या तर ब्राह्मणमाहात्म्यानेच भरलेल्या आहेत. श्रुती-स्म्रुतींची तर गोष्टच विचारायला नको. आजही मनुस्म्रुती ही समाजधारणेसाठी योग्य आहे असे विद्वान सांगतच असतात. परंतू याची प्रतिक्रिया म्हणुन जो पुर्वग्रहविरहित सत्येतिहास बहुजनीय संशोधकांनी मांडायला हवा तसे होत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे. झोकून देवून कठोर परिश्रम घेत एकेका विषयाला तडीस नेण्याऐवजी पुन्हा नवे पुर्वग्रहदुषित इतिहास लेखन झटपट करून पटापट प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास बहुजनीय संशोधकांना होतो आहे आणि ही चांगली बाब नाही. या संशोधनामागील हेतू निर्मळ नसतात तर केवळ ब्राह्मणांना शिव्या देणे हीच इतिकर्तव्यता त्यात सामावलेली दिसते. एवढेच नव्हे तर हे दुश्क्रुत्य करत असता आपण नकळत बहुजनांचाही इतिहास पुसत असतो याचे भान उरलेले नाही. याला इतिहासाचे शुद्धीकरण म्हणता येत नाही. उलट ते अनेकदा हास्यास्पद बनून जाते. खरे तर सत्येतिहासाच्या शोधासाठी खूप मोठा वाव आहे. पण त्यासाठी किती बहुजनीय ग्रंथालये, संशोधन संस्था आणि संशोधक आहेत हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावर बहुजनीयांनी साकल्याने विचार केला पाहिजे.

३. प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांनी वर्चस्व निर्माण केले असल्याने बहुजनीय प्रतिभेला वाव मिळत नाही हा आक्षेप घेतला जातो. बहुजनांना मुद्दाम डावलले जाते असेही म्हटले जाते. पण येथे एक प्रश्न असा उद्भवतो कि चळवळीने किती कलाकार घडवले, जोपासले? दुसरा प्रश्न असा कि त्यासाठी किती मंच उपलब्ध करुन दिले? आपण साहित्य-संस्क्रुती चलवळ घडवण्यात किती हातभार लावला? बहुजनीय साहित्य सम्मेलने ही जातीधारित आहेत. त्या-त्या जातीचेच लेखक (लायकी काहीही असो) अध्यक्ष म्हणुन निवडले जातात. हे बहुजनीय चळवळीचे अपयश नव्हे काय? जातीयवाद संपवायची भाषा करणारेच जातीयवाद अगदी खुलेपणे जपत असतील तर चलवळ ही बहुजनीय न होता त्या-त्या जातीच्या परिघापुरती-स्वार्थापुरती मर्यादित झाली आहे असेच म्हणावे लागेल. आणि हा फुले-आंबेडकर-शाहुवाद्यांचा-वादाचा पराभव आहे.

दुसरे असे कि द्न्यानलालसा आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यातुनच समाजाची प्रगती होते. एकीकडे शेतक-यांच्या आत्महत्त्या होतात. चळवळीने यावर काय समाजकार्य केले हा प्रश्न विचारला तर काहीही नाही असेच उत्तर समोर येते. शेतकरी हे बहुजन नाहीत काय? जात कोणतीही असो. अर्ध शिक्षित बेरोजगारांच्या फौजा गावोगावी निर्माण होत आहेत. त्यांना शेतीतही रस नाही आणि नोक-याही मिळत नाहीत. नैराश्याने घेरलेल्या या तरुणांना समोचित मार्गदर्शन करणे, छोट्या-मोठया व्यवसायांसाठी प्रेरीत करणे हे चळवळीचे कार्य नाही काय? अशा प्रबोधनासाठी चळवळी राबल्या तर सारेच त्यांचा आदर करतील...धन्यवाद देतील.

४. इतिहासाची पुनर्रचना म्हणजे फक्त तोडफोड नव्हे. तोडफोडींची भाषा झटपट प्रसिद्धी देते...दहशत निर्माण करते हे खरे आहे पण अशा भाषेचा अंतही लवकरच होतो कारण शेवटी उशीरा का होईना तिच्यावर प्रतिक्रिया यायला लागते. आणि त्यातून एक नकारात्मक भावना समाजात निर्माण होते...अगदी बहुजनीयांतही, याचे भान चळवळीने ठेवले पाहिजे. पण ते तसे असल्याचे दुर्दैवाने दिसत नाही. पराकोटीचा हिंदुत्ववाद हा आता विध्वंसक-दहशतवादीही होवू लागला आहे. या हिंदुत्ववादाच्या आहारी असंख्य बहुजनीय तरुण धर्माच्या नावावर जात आहेत. इस्लाम/ख्रिस्ती हे त्यांना शत्रू म्हणुन दाखवले जातात....त्या विखारी प्रचाराला ही तरुण पोरे बळी पडतात. त्यांना पेटवण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी भडकपणे सांगण्यात येतात. सनातन प्रभात हे एक त्याचे उदाहरण आहे. पण तसेच दुष्कार्य बहुजनीय संघटना करत असतील तर ते क्षम्य नाही. उलट अशा हिंसकतेकडे वाटचाल करू पाहणा-या समाजाला वैचारिकतेच्या पायावर, सत्य मांडत रोखण्याचे प्रयत्न करण्या ऐवजी बहुजनीय संघटनाही ब्राह्मणांबाबत तसाच विखार पसरवत असतील तर त्याचा निषेध करणे आणि त्यांच्यात आणि आपल्यात काहीएक फरक नाही असे म्हणने क्रमप्राप्त आहे. आणि तसेच असेल तर ब्राह्मण हा एकमेव शत्रू असे दर्शवण्याचा कसलाही अधिकार नाही कारण क्ट्टरतावादी ब्राह्मण आणि आपल्यात काहीएक फरक दाखवता येणार नाही. पण तसे होते आहे आणि हे बहुजनीय चळवळीचे घोर पतन आहे.

५. बहुजनांत पुर्वास्प्रुश्य, भटके-विमुक्त-आदिवासी येतात कि नाही असा प्रश्न काही विचारतात. हा प्रश्न एका साम्जेतिहासाच्या अर्थाने बरोबर आहे. कारण या शोषित-वंचित वर्गावर अन्याय-अत्याचार करण्यात बहुजनही अग्रेसरच राहिले आहेत. हे सारे ब्राह्मणी डोक्याचा आणि बहुजनीय मनगटांचा वापर करून झाले त्यामुळे मुख्य दोष ब्राह्मणांवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या चातुर्वर्ण्य पद्धतीवर जातो असा युक्तिवाद केला जातो....आणि आम्ही दोषमुक्त आहोत असा स्वयं-निकालही दिला जातो. पण ते पुर्णपणे खरे नाही. मानवताहीण-धर्मशरण आणि स्वार्थपरायण लोक नेहमीच शोषिताला पुर्णशोषित तर वंचिताला देशोधडीला लावण्याचे कार्य करण्यात अग्रेसर असतात. करुणेचा उदात्त क्षण या वर्गाला कधीही अनुभवता येत नाही. आला नाही. सारी पापे ब्राह्म्णांच्या बोकांडी टाकून पापक्षालन होत नसते. आजही या शोषित वंचितांचा वापर आपली मनगटशाही दाखब्वण्यासाठी होत असेल तर चळवळ कोठेतरी फसली आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. दलितांवरील अत्याचार आजही कमी झालेले नाहीत. आपल्यापेक्षा सामाजिक स्तरावरील कनिष्ठ वा गरीब वर्गावर हुकुमत गाजवण्याचे प्रयत्न जगभर होत असतात आणि आपण पुरोगामी म्हनवणारे त्यात अग्रेसर आहोत ही आपल्यालाच शरम वाटण्याची बाब आहे. या द्रुष्टीने बहुजनीय चळवळ सपशेल फसली आहे असेच म्हणावे लागते आणि त्यावर नि:पक्षपाती चिंतन करण्याची गरज आहे. ते होण्याची शक्यता मला फारच धुसर दिसते आहे.

६. अर्थात निराश व्हावे अशी स्थीति आहे असेही नाही. व्यक्तिगत पातळीवर असंख्य बहुजनीय तरूण खरोखर द्न्यन-विद्न्यान-अर्थ या क्षेत्रांत झपाट्याने पुढे येतच आहेत. प्रस्थापितांशी ते त्या बळावर टक्कर घेतच आहेत. त्यांचा तो व्यक्तिगत संघर्ष त्यांना नव्या दिशा शोधायला लावतच आहे. दुर्दैव एवढेच कि त्या संघर्षाला-वेदनांना साय होण्यासाठी बहुजनीय एकही संघटना पुढे आलेली नाही. किंबहुना तो त्यांच्या कार्यक्रमातच नाही. सध्यस्थीतित एवढेच म्हणावे लागते कि बहुजनीय ज्याही प्रगतीच्या वाटा क्रमत आहेत त्या त्यांच्या स्वयंप्रेरणांनी. त्यांना प्रेरीत करणारे इतिहासात होवून गेले. वर्तमानात उरले आहेत ते दिग्भ्रमित करणारे...अकारण (म्हणजे फक्त स्वकारण) त्यांच्याच वाटेत काटे पेरणारे...

चळवळींनी बदलायला हवे. सकारात्मक व्हायला हवे. तोडफोडीऐवजी नवनिर्मानाची आस धरायला हवी...मानवी जीवनाला नवा अर्थ देण्याची क्षमता असायला हवी...अर्थात त्यासाठी स्वता या संघटनांनाच बदलावे लागेल. विचारांची दिशा विध्वंसक नव्हे तर सकारात्मक बनवावी लागेल. तरच चळवळ व्यापक होईल आणि आदरणीय होईल यावर माझा विश्वास आहे.

(मी गतवर्षी अंबेजोगाई येथे दिलेल्या व नंतरच्या काही भाषणांचा हा सारांश. उपयोग होईल कि नाही माहित नाही...पण आपला एक प्रयत्न...)

5 comments:

  1. Sanjay Sonawani एकदम परखड आणि शास्त्रशुद्ध विवेचन आहे. बहुजन समाजाचे एकच चुकते , समाज अन्यायाविरोधात पेटून उठतो खरा.. अगदी योग्य मार्गाने लढ्याची सुरुवात देखील करतो पण त्यांना तो टेम्पो टिकवून ठेवता येत नाही. प्रत्येक जण स्वतःच्ा अस्मितेचे भांडवल करून शिरजोर होण्याचा प्रयत्न करतो. परिणामी चळवळीचा मुळ उद्देश बाजूला राहून श्रेष्ठ - कनिष्ठ वाद जन्माला येतो. आणि त्यातूनच लोकोत्तर कार्याऐवजी समाजविघातकी कार्ये सुरू होतात.

    ReplyDelete
  2. महात्मा फुलेनी जी चळवळ सुरु केली होती ती अश्या मार्गाने जात असेल तर त्यांचे अनुयायी म्हणून घेणार्या आपण सर्वांचा हा पराभव आहे असे मी समजतो.

    ReplyDelete
  3. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची मागणी प्रथम कम्युनिस्टानी केली. त्याना ऐतिहासिक पुरावे कोणतेही कारण न देता वगळण्याचे स्वातंत्र्य हवे होते. तोच वारसा पुढे चालविला जात आहे

    ReplyDelete
  4. अतिशय खरे आहे. चळवळींनी सकारात्मक असावे ही अपेक्षा अत्यंत वाजवी आणि रास्त आहे. दुर्दैवाने बहुजन चळवळ ब्राम्हणांना शिव्या घालण्यापुरतीच मर्यादित होताना दिसते आहे. बहुजन चळवळींचे आजचे मुखंड जातीयवाद किंवा सामाजिक असमानता बदलण्यासाठी किती मूलगामी विचार मांडतात, हे पाहिले तर केवळ निराशा पदरी पडते. सर्व समाजांमध्ये असलेले आर्थिक, सामाजिक, वैचारिक दारिद्र्य घालवण्यासाठी काही मुलभूत स्वरूपाचे विचार कुणी मांडत आहे, हे दृश्यच पाहायला मिळत नाही. उलट, यापूर्वी कधी नव्हते एवढे जातीय ध्रुवीकरण आता होताना दिसते आहे. प्रत्येक जातीची एक सेना आहे किंवा होऊ घातलेय. मनगटावर लाल-पिवळे धागे बांधून कुणीही चार पोरे एकत्र आली की लोक घाबरतात, नव्हे त्यांना घाबरावेच लागते. असेच राहिले भविष्यकाळात येथे निव्वळ यादवी माजेल आणि भयानक जातीय दंगलींचा भडका उडालेला पाहायला मिळेल. नजीकच्या भविष्याचे हे दबा धरून बसलेले भीषण चित्र आहे.

    ReplyDelete
  5. पण तुमचे हे विचार महाराष्ट्रातल्या तलिबान्याना कधी समजणार.........

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...