Thursday, January 12, 2012

पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ

(खालील लेख हा ताज्या साप्ताहिक लोकप्रभामद्धे प्रसिद्ध झाला आहे.)

पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ
संजय सोनवणी

१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्ष होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबदल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील.

१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्षे होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबद्दल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील. विजयाचे श्रेय घ्यायला सारेच येतात, पण पराजय हा नेहमीच पित्रुत्वहीन असतो असे म्हणतात ते खरेच आहे. उलट एकमेकांवर दोषारोप करण्याची अहमहमिका लागते. त्यातून सत्य हाती लागतेच, असे नाही. कोणाचा तरी बळी चढवून सारे खापर त्याच्या माथी मारून मोकळे होणे ही सामान्यांची रीत झाली, पण इतिहास संशोधनात त्याला थारा नसतो.
अब्दाली पाचव्यांदा चालून आला. खरे तर मराठय़ांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा २३ एप्रिल १७५२ रोजीच केला होता. त्यानंतरही १७५६ मध्ये अब्दाली चौथ्यांदा चालून आला होता. मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी तिकडे फिरकलेही नाहीत. एका अर्थाने तो करारभंग होता. पाचव्यांदा अब्दाली चालून आल्यानंतर मात्र स्वत: भाऊसाहेब पेशवा आणि विश्वासरावांनी उत्तरेकडे मोहीम काढावी, यामागे नेमके काय कारण होते?
बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी िशदेंचा झालेला अपघाती मृत्यू हा एका अर्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. उत्तरेत जरी िशदे-होळकरांमुळेच मराठी सत्ता फोफावली असली, तरी कोणत्याही सरदाराला डोईजड होऊ देऊ नये म्हणून त्यांना आपापसात भांडत ठेवण्याचे तंत्र पेशव्यांनी याही बाबतीत वापरले होते. त्यातल्या त्यात पेशव्यांची माया िशद्यांवर अधिक होती. दत्ताजींच्या बुराडी घाटावरील मृत्यूमुळे आपण काहीतरी करतो आहोत हे दाखवणे पेशव्यांना गरजेचे होते, पण या मोहिमेचे नेतृत्व द्यायचेच होते तर रघुनाथरावांकडे, कारण त्यांना उत्तरेचे राजकारण व भौगोलिक स्थिती माहीत तर होतीच, पण िशदे-होळकरांमधील ताणतणावही माहीत होते.
पण भाऊंची नियुक्ती झाली. भाऊ दिल्ली गाठेल तोवर अब्दाली पूर्वीप्रमाणेच परभारे निघून जाईल असा नानासाहेबांचा आणि खुद्द भाऊंचाही होरा असावा. अन्यथा भाऊंची एकुणातील चाल एवढी संथ झाली नसती. सोबत हजारो यात्रेकरूंचे जत्थे घेत वेगाने कूच करण्यापेक्षा तीर्थयात्रांवरच अधिक भर दिला नसता. पावसाळ्यापूर्वीच त्याला सहज यमुना गाठता आली असती आणि अब्दालीला भिडण्याचे अत्यंत वेगळे मार्ग आणि अनुकूल अशी युद्धभूमीही ठरवता आली असती.
होळकरांनी भाऊंना एक तर चंबळेपारच स्वत: थांबून खडे सन्य पुढे पाठवावे हा सल्ला दिला होता. तो अत्यंत योग्य असाच होता. एक तर बाजारबुणगे आणि यात्रेकरूंमुळे वाटचाल धीमी राहणार आणि शत्रूला सावध होत त्यानुरूप युद्धनीती ठरवायला वेळ मिळणार हे गनिमी काव्यात व वेगवान हालचाली करण्यात पटाईत असलेल्या मल्हारराव होळकरांखेरीज कोणाला कळणार होते? िशद्यांची बाजू अनुभवी दत्ताजींच्या मृत्यूमुळे कमकुवत झाली होती. अशा वेळीस भाऊंनी खरे तर मल्हाररावांचा सल्ला मानायला हवा होता. खडे सन्य त्यांच्या कुमकेस द्यायला हवे होते आणि युद्धाच्या निकालाची वाट पाहायला हवी होती किंवा खडय़ा सन्यासह स्वत:ही पुढे जायला हवे होते.
पण भाऊंचा बहुधा युद्धच टळेल यावर अधिक विश्वास असल्याने त्यांनी मल्हाररावांचा अनुभवी सल्ला ऐकला नाही. यत्रेकरू आणि बुणग्यांचे दोन लाखांचे लेंढार सोबत घेतच पुढे जायचे ठरवले. खरे तर पानिपतच्या शोकांतिकेच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल होते.
मल्हाररावांनी नजिबाला हाती पडूनही जीवदान दिले ही चूक पानिपत युद्धात भोवली असे सर्वसामान्यपणे शेजवलकरांसहित इतिहासकार म्हणत असतात. नजिब हा कट्टर अश्रफ इस्लामच्या मागे शाह वलीउल्लाहसारख्या कडव्या जिहादी मुस्लिम विचारवंताच्या कह्यात होता असेही मानले जाते. त्याच्यामुळेच अब्दालीने पाचवी स्वारी केली असाही प्रवाद आहे. मल्लिका जमानी या महंमदशहा पातशहाच्या बेगमेने अब्दालीला स्वत: निमंत्रण धाडले होते हा इतिहास मात्र सोयिस्कररीत्या विसरला जातो.
खरे तर तत्कालीन उत्तरेतील राजकारण समूळ बिघडलेले होते. जेव्हा नजिब पातशहाचा वजीर होता आणि त्याला पकडले गेले त्या वेळी औरंगजेबाच्या वारसात पराकोटीची राज्यतृष्णा आणि घोडी-कुरघोडीचे-कटकारस्थानांचे साम्राज्य होते. वजीरपदासाठी गाझिउद्दिन ते शुजा कोणत्याही स्तराला जाऊ शकतील असे वातावरण होते.
शुजाउद्दौलाला मराठय़ांनी दुखावून सोडले होतेच. अशा राजकीय स्थितीत नजिबाला ठार मारले असते तर मराठय़ांबद्दलचा उरलासुरला विश्वास उत्तरेत नष्ट झाला असता. १७५६-५७ मधील ही राजकीय परिस्थिती होती. अशा स्थितीत त्या परिस्थितीत नजिबाला अभयदान देणे आवश्यक होते आणि मल्हाररावांनी ते दिले. नजिब खली आहे याची जाण मल्हाररावांना नव्हती असे नाही. त्यांनी दत्ताजी िशदेंना जून १७५८ च्या पत्रात ‘नजिबास हाती धरून भागीरथीस पूल बांधून अयोध्या, ढाका, बंगलापर्यंत मोहीम करावी.. हे न करता नजिब खान याचे पारिपत्य कराल तर पेशवे तुम्हास धोतरे बडवावयास लावतील..’ अशा अर्थाचे म्हटले आहे. या पत्राचे अनेक मसुदे असल्याने हे पत्र खरे की खोटे हे ठरवायला मार्ग नाही. पण ते खरे आहे असेच समजले तर या पत्रातून दोन बाबी स्पष्ट होतात.
पेशव्यांचा मल्हाररावांवर विश्वास नव्हता तसाच होळकरांचाही विश्वास पेशव्यांवर नव्हता. तसे पाहता त्या परिस्थितीत फक्त नजिबच ‘खली’ होता का? रघुनाथरावांमुळे कुंभेरीचा वेढा झाला आणि होळकरांचा मुलगा खंडेराव मारला गेला. िशद्यांनी परस्पर तह करून होळकरांना दुखावले. जाट काय, रजपुत काय, शुजा काय.. मराठय़ांनी आततायी राजकारण करून दुखावले नाही असा एकही समाजघटक मराठय़ांसाठी उरलेला नव्हता. यासाठी जबाबदार होते ते पेशव्यांचे परस्परविरोधी आदेश. संजय क्षीरसागर यांनी आपल्या पानिपत युद्धाबद्दलच्या विश्लेषक पुस्तकात या प्रवृत्तीवर सखोल प्रकाश टाकलेला आहेच. अशा अस्थिर स्थितीत कोणीतरी स्थानिक, बलाढय़ पण एतद्देशीय मुस्लिमांना परका अशा मुस्लिम सत्ताधाऱ्याला उपकृत करून हयात ठेवणे राजकीय निकड होती, असेच म्हणणे क्रमप्राप्त ठरते. नजिबाला जिवंत ठेवून मग जी अटकेपार स्वारी झाली हे सर्वस्वी मल्हाररावांचे व िशद्यांचे कर्तृत्व होते, राघोबादादा त्या यशाचे एक केवळ सहभागी होते.. पण राघोभरारी.. अटकेपार झेंडा इत्यादी विशेषणे बहाल करून मराठी इतिहासकार / कादंबरीकार हे विसरतात की अटकेपार झेंडा लावून राघोबादादा एक कोटीचे कर्ज का करून आले? जो प्रांत आधीच अब्दालीने लुटून हरवून फस्त केला होता तोच प्रांत पुन्हा ताब्यात घेत जाण्यात पका मिळण्याची मुळात शक्यताच नव्हती. राघोबादादांवर कर्ज झाले ते अटळच होते. उलट नानासाहेब पेशव्यांनी ते समजावून न घेता त्यांच्यावर अन्यायच केला एवढेच म्हणता येते.
थोडक्यात १७५७-५८ मधील नजिबाला जिवंत सोडण्याचा निर्णय आणि १७६० मधील दिल्लीतील वेगाने बदलत असलेली चढ-उतारांची स्थिती, गाझिउद्दीन या वजिराने खुद्द पातशहाचाच केलेला खून, जाटाची संभ्रमित भूमिका यातून पुन्हा अब्दालीला बोलवण्याची चाल, शुजाची कुंपणावरच्या सरडय़ासारखी भूमिका.. िशद्यांनी शुजावरच आक्रमण करून खंडणी वसूल करण्याचा पेशव्यांच्या आज्ञेने घेतलेला निर्णय..
येथे एक महत्त्वाचे लक्षात घ्यायची बाब म्हणजे, अब्दाली पाचव्यांदा चालून आला तेव्हा भाऊंची अब्दालीवर स्वारी करण्यासाठी नियुक्ती होण्यापूर्वीच म्हणजे १३ मार्च १७६० रोजी अब्दाली व मराठय़ांत तह घडून आला होता. आणि हा तह केला होता मल्हारराव होळकर व िशद्यांनी हाफिज रहमत खानच्या मध्यस्तीने. या तहानुसार नजिबचा प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवून त्याच्या मार्फतच अब्दालीला परत पाठवावे. सूरजमल जाटानेही या तहासाठी सहकार्य केले होते. नजिबाला जिवंत ठेवण्याचा असा लाभ झाला होता.. पानिपत युद्ध होण्याचे काहीएक कारण उरलेले नव्हते.. पण तेवढय़ात भाऊ उत्तरेकडे रवाना झाला आहे, हे कळताच नजिब घाबरला आणि छावणी उठवून परत जायला निघालेल्या अब्दालीला त्याने थांबवले. त्यामुळे करार फिसकटला. तरीही होळकरांनी तहासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले. १२ जून रोजी होळकर लिहितात, ‘गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमत खान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी (बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजिब खानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले.’ (मराठी रियासत - खंड ४) याबाबत पानिपतचे इतिहासकार-कादंबरीकार का मूग गिळून गप्प असतात, हे समजत नाही. थोडक्यात भाऊंच्या आगमनाने झालेला तह फिसकटला.
भाऊंनी शेवटपर्यंत शुजा आपल्या बाजूने येईल यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. खरी मदार त्याच्यावरच ठेवली. तो कसा मराठय़ांच्या पक्षात येणार? खरे तर तत्कालीन स्थितीत शुजाच डोके ताळ्यावर असणारा राजकारणी माणूस होता असे म्हणावे लागते. तो तसा कोणाच्याच बाजूने राहिला नाही.. पण अब्दालीला नतिक बळ देण्यात आणि मराठय़ांचे नाक ठेचण्यात तो यशस्वी झाला, हे आपण उत्तर-पानिपत प्रकरणातही पाहू शकतो. असो.
मुळात पानिपत ही युद्धभूमी ठरली ती काही भाऊंची इच्छा नव्हती. अत्यंत अपघाताने आणि कुरुक्षेत्राच्या तीर्थयात्रेची आस लागलेल्या यात्रेकरूंच्या आणि स्वत:च्याही इच्छेखातर भाऊंच्या सन्याला सोनपतजवळ आले असता समजले की अब्दालीने यमुना ओलांडले आहे. तेव्हा जे ही सारी सेना पळत सुटली ती ठेपली पानिपतला. ही मराठी सन्यासाठी अत्यंत प्रतिकूल युद्धभूमी होती. त्याचा फटका सर्वार्थाने कसा बसला हे सर्वानाच विदित आहेच.
गनिमी कावा अयोग्य होता?
पानिपतच्या सपाट प्रदेशात गनिमी कावा अयोग्य होता म्हणून होळकरांनी नजिबाशी गनिमी काव्याने लढण्याचा दिलेला सल्ला अनुपयुक्त होता, असे मत शेजवलकरांनी व्यक्त केले आहे. क्षीरसागर म्हणतात त्यानुसार गनिमी कावा म्हणजे नेमके काय हेच आपल्या इतिहासकारांना माहीत नाही. िशदे-होळकर उत्तरेत ज्याही लढाया लढले त्या बव्हंशी गनिमी काव्याच्याच होत्या. शत्रूवर अचानक अनेक दिशांनी हल्ले चढवणे, संभ्रमित करणे आणि शत्रूची पुरेशी हानी करून निसटून जाणे हा गनिमी काव्याचा मूलमंत्र. खरे तर अब्दालीही गनिमी काव्यात वस्ताद होताच. होळकरांचे ऐकले असते तर अब्दालीला हूल देऊन पानिपतची छावणी सोडता आली असती.. पराभवही करता आला असता. अर्थात त्यामुळे युद्धाचा अंतिम निर्णय मराठय़ांच्याच बाजूने लागला असता असे नसले तरी जेवढी हानी झाली तेवढी तरी नक्कीच झाली नसती.
भाऊसाहेबांची मुख्य मदार होती ती इब्राहीम खान गारद्याच्या पलटणींवर. त्यामुळे अनुभवी िशदे-होळकरांचा सल्ला मानण्याच्या मन:स्थितीत भाऊ नव्हतेच. बरे गोलाची रचना करत कादंबरीकार ठसवतात तसे उरलेसुरले अन्न पोटात ढकलून १४ जानेवारी १७६१ रोजी ‘जिंकू किंवा मरू’ या आवेशाने मराठा सन्य अब्दालीवर तुटून पडायला निघाले’ म्हणणे हे खरे नाही. ते व्यर्थ उदात्तीकरण आहे. कारण आदल्याच रात्री झालेली मसलत.. ‘गिलच्यांचे बळ वाढत चालले, आपले लष्कर पडत चालले. बहुत घोडी मेली. मतब्बर खासा पाय-उतारा झाला. तेंव्हा एक वेळ हा मुक्काम सोडून बाहेर मोकळे रानी जावे, दिल्लीचा राबता सोडून दुसरीकडे जावु; पण झाडी मोठी मातब्बर. मार्ग नाही यास्तव दिल्लीच्याच रस्त्याने जावयास मार्ग उत्तम; परंतु गिलचा जावु देनार नाही. यास्तव बंदोबस्ताने निघावे.’
ही मसलत म्हणजे भाऊंचा अद्यापही लढायचा विचार नव्हता तर सुरक्षित पलायन करायचे होते. पाश्चात्त्य गोलाची रचना हीच मुळात सुरक्षित पलायनासाठी असते. हे पलायन यशस्वी झालेही असते, परंतु नेमक्या त्याच दिवशी धुक्याने दगा दिला. नेहमी पडणारे व सकाळी १०-११ पर्यंत असणारे धुके त्या दिवशी पडलेच नाही, त्यामुळे मराठय़ांचा पलायनाचा प्रयत्न अब्दालीच्या खूप लवकर लक्षात आला.. व युद्धालाच तोंड फुटले. पुढचा इतिहास माहीत आहेच.
होळकर आधीच पळून गेले?
मल्हारराव होळकरांवरचा मुख्य आक्षेप म्हणजे विश्वासराव पडल्याचे कळताच होळकर तेथून निसटले आणि सुरक्षितपणे दिल्लीला जाऊन पोहोचले. होळकरांची थली सांगते की भाऊंच्याच आदेशाने त्यांनी रणांगण सोडले. महादजी िशदेही याच सुमारास निसटले. पवारांनीही तोच मार्ग पत्करला. त्याला कोणी पलायन म्हणत नाही. परंतु होळकरांबाबत इतिहास नेहमीच कृपण राहिलेला आहे.
वास्तव असे आहे की भाऊंचा मुळात युद्धाचा बेत नव्हता. सुरक्षितपणे निसटणे हेच त्यांचे ध्येय होते. गोलाची रचना त्यासाठीच केलेली होती. िशदे होळकरांची त्या गोलात डाव्या बाजूला नियुक्तीच मुळात अब्दालीने त्याही बाजूने हल्ला केला तर समर्थपणे परतवता यावा यासाठी. मुळात गोलाला आघाडी-पिछाडी अशी भानगडच नसते.. ज्या दिशेने गोल पुढे जातो ती आघाडी. अनपेक्षितपणे युद्ध झाल्याने व हानी व्हायला लागल्यावर किमान महत्त्वाचे सरदार व त्यांचे सन्य वाचले पाहिजे, त्यासाठी त्यांनी तरी संधी मिळताक्षणी निसटावे, असे भाऊला वाटणे हा त्यांच्या धोरणाचाच भाग होता. अन्यथा होळकरांसोबत निसटून जाण्यात भाऊंचे बालमित्र आणि सरदार नाना पुरंदरेही कसे असले असते? आणि आता ही या सरदारांची निसटून जायची वेळ ही माध्यान्ह नसून सायंकाळची साडेचार ते पाच ही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन रणधुमाळीच्या वेळी हे सारेच सरदार निसटले हा दावाच निकाली निघतो. युद्धाचा परिणाम अनुकूल दिसत नाही हे लक्षात येताच भाऊंनी असा आदेश बजावला असणे स्वाभाविक आहे. त्यानुसार िशदे, होळकर, पवार व अन्य अनेक सरदार तेथून निसटून गेले. ते निसटले म्हणून पानिपतानंतर मराठे पुन्हा उत्तरेत आपली सत्ता कायम ठेवू शकले हे येथे विसरता येत नाही.
एवढेच नव्हे तर स्वत: भाऊही पानिपतावर पडला याचा एकही विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. जनकोजी िशदेंबाबतही असेच म्हणता येते. काशीराजाची बखर याबाबत जो वृत्तांत देते तोच मुळात अविश्वसनीय आहे. भारताचार्य चिं. वि. वैद्य यांचाही असाच अभिप्राय असून भाऊ त्या युद्धात पडले नाहीत, असाच निष्कर्ष त्यांनी ‘दुर्दैवी रंगु’मध्ये तळटिपेत नोंदवला आहे. ‘भाऊ भगा’ असाच समज पानिपतच्या रहिवाशांचा आहे.
थोडक्यात पानिपतच्या अपयशाबाबत आज कोणावरही खापर फोडून मुक्त होता येणार नाही. त्याकडे एक दुर्दैवी आणि अदूरदर्शीपणाचा अटळ परिणाम म्हणूनच पाहावे लागते. संजय क्षीरसागरांसारखे ताज्या दमाचे संशोधक त्याचे तटस्थ मूल्यांकन नव्याने करत आहेत ही एक स्वागतार्ह घटना आहे. होळकर-िशद्यांनी मार्च १७६० मध्ये केलेला तह फिसकटला नसता तर पानिपतची शोकांतिकाही मुळात घडलीच नसती.
response.lokprabha@expressindia.com

2 comments:

  1. It will help everybody to know the reality about 'panipat'...

    Thanks...

    ReplyDelete
  2. मस्त सर......

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...