Wednesday, March 7, 2012

आर्थिक अराजक कसे माजते?

जेंव्हा आर्थिक, नैसर्गिक आणि मानवी संसाधनांच्या गुंतवणुकी या जीवनावश्यकतेच्या उत्पादनक्षेत्रांत होण्याऐवजी मानवास क्रुत्रीम सुखाचा भ्रम देणा-या तंत्रद्न्यानांत/त्या अनुषंगिक उत्पादनांत व त्यांच्या विपनण व्यवस्थेवर विशिष्ट मर्यादेबाहेर होवू लागतात तेंव्हा आर्थिक अराजकाच्या दिशेने वाटचाल सुरु होते, जी आता सुरु झालीच आहे. खरे तर प्रत्त्येक अर्थव्यवस्थेने एक संतुलन साधले पाहिजे. गुंतवणुकीच्या स्त्रोतांचे विभाजन हे जीवनावश्यक आणि मानसिक गरजावश्यक असे संतुलित प्रमाणात व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षांतील एकुणातीलच जागतीक अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहिली तर गुंतवणुक ही अन्याय्य पद्धतीने तंत्रद्न्यानाधारित...आणि त्यातल्या त्यात व्हर्चुअल जगात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि शेती/पशुपालन यांसारख्या पायाभुत क्षेत्रांतुन क्रमशा: घटत चालली आहे असे चित्र आपल्याला दिसुन येईल.

तंत्रद्न्याने ही मानवी जीवन सुखकर होण्यासाठी विकसीत व्हायलाच हवीत. त्याआधारीत उत्पादने बाजारात यायलाच हवीत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्याचा वेग आणि पुरवठा आणि ते प्रत्येकाच्या गळी उतरवण्यासाठी वापरले जाणारे मानसिक आणि पर्यायाने आर्थिक गुलामी आणनारे तंत्र विघातक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. या तंत्रद्न्यानांनी मानवी उत्पादकता, सर्जनशीलता वाढवण्यात हातभार लावला असता तर वाईट वाटण्याचे कारण नव्हते. प्रत्यक्षात ही व्हर्चुअल तंत्रद्न्याने मानवी समुहाला एकत्र आनण्याऐवजी "एकाकी" करत चालली आहेत असेच दुर्दैवी चित्र दिसते आहे. सर्वाधिक गुंतवणुकही (आर्थिक व बौद्धीक संसाधनांची) याच क्षेत्रात होतांना दिसते आहे. आणि या तंत्रद्न्यानाचा विकसीत होण्याचा वेग एवढा अचाट झाला आहे कि २-३ वर्षांत जुने तंत्रद्न्यान शिळे होवु लागले आहे. प्रत्येक तंत्रद्न्य ही गती सांभाळु शकत नाही...पर्यायाने त्यांच्यावर अनेकदा बेका-या कोसळतात...वा ससेहोलपट होत तारुण्यातच आउटडेटेड होण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यातुन ज्या मानसिक समस्या निर्माण होतील व त्याचे एकुणात समाजावरही केवढे गंभीर परिणाम होतील यावर आताच अर्थशास्त्र-मानसतद्न्यांनी विचार करत मांडणी करायला हवी. तसेच आपण कोणत्या तंत्रद्न्यानांतील प्रगतीची कास बाळगायला हवी हे समजावुन घेत नव्या तंत्रद्न्यांनीही चिंतन करत आपली प्रतिभा वापरायला हवी. परंतु जेंव्हा हे समजेनासे होत वरकरणी आकर्षक वाटणा-या , अद्भुत आर्थिक फायदे देणा-या या क्षेत्रांचा मानवी जीवनावर अस प्रभाव आहे , संमोहन आहे कि भलेभलेही त्यातुन सुटत नाहीत.

पण येथे हा प्रश्न उद्भवतो कि या तंत्रद्न्यानांनी खरेच मानवी जीवन सुखकर होते आहे काय? ते खरेच आरामदायी होते आहे काय? कि नवे ताणतणाव हीच तंत्रद्न्याने व त्यांचा अनिर्बंध वापर करत मानवी जगाला नवीन संकटपरंपरेत नेत आहेत? या आधुनिक संसाधनांमुळे नैसर्गिक स्त्रोत कसे नष्ट होत प्रुथ्वीला एक नष्ट न होवु शकणा-या कच-याची कुंडी बनवतील, ही भिती क्षणभर दुर जरी ठेवली तरी मानवाची एकुणातील कार्यक्षमतेचा अंत घडवण्याच्या दिशेने आपण नेटाने वाटचाल करत आहोत. सोमवार ते शुक्रवार, आणि सकाळी दहा ते सहा-सात पर्यंतच फेसबुकी आणि ट्विटरवाले जास्त गर्दी करतात, याचा अर्थ एक आणि एकच निघतो तो म्हणजे ते आपली कार्यक्षमता ते ज्यांचे नोकर आहेत त्यांच्यासाठी पणाला न लावता व्यक्तिगत व बव्हंशी अनुत्पादक कार्यासाठी खर्च करत असतात. जेंव्हा कार्यकारी समुह आपली सर्जनशीलता व कार्यक्षमता अनुत्पादक कार्यांसाठी वाया घालवतो...त्याचाच एक अर्थ असा असतो कि तो समुह अर्थव्यवस्थेशी नकळत बेईमानी करत असतो. तंत्रज्ञानांचा उपयोग स्वक्षमता वाढवण्यासाठी करणे अभिप्रेत असता आणि त्यातून सर्जनशील अभिव्यक्ती, मग ती कार्यशैलीतील असो कि वौद्धिक क्षमतेतील, वाढत रहावी अशी अपेक्षा असता तसे कितपत घडते यावर आपल्याला विचार करावा लागेल.

प्रत्यक्षात नवीन शिकण्याची, तात्पुरत्या स्थैर्याचा भावनेतुन, जी नैसर्गिक उर्मी असायला हवी तीही गमावली जाते आहे. यातुन एक आर्थिक/मानसिक अराजक (अनार्ची) निर्माण होणार यात शंका असण्याचे कारण नाही.

तंत्रज्ञानाधिष्ठित, वरकरणी आकर्षक असलेल्या क्षेत्रांत एकुणातील गुंतवणुक झपाट्याने वाढत एकुण अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात ती कमाल पातळी गाठत आहे. या उलट शेती/पशुपालन हा मानवी जीवनाला मोठा आधार असलेला पुरातन उद्योग. परंतु जगभरातील किमान ४०% लोकसंख्या (भारतात ही ५५% आहे) जी शेती उद्योगात आहे, त्यातील एकुणातील बाह्य गुंतवणुकीचे प्रमाण मात्र १% पेक्षाही कमी आहे. जे आहेत ते फक्त अवाढव्य व्याजांनी कर्ज देनारे आहेत...गुंतवणुकदार नव्हेत. ब्यंकासुद्धा फक्त नगदी पीके घेणा-या मोठ्या शेतक-यांनाच कर्जे देतात. शेतकरी जी कर्जे घेतो ते बव्हंशी खाजगी सावकारांकडुन. ते व्याजदर हे वर्षाला किमान २४ ते ६०% एवढे असतात. त्यात बी-बीयाणी बनवणा-या कंपन्या त्यांचे शोषण करतात हे वेगळेच. म्हणजे अनेकदा ती महागडी बियाणी लागवड करुनही प्रसवतच नाहीत...उगवतच नाहीत. शेतकरी मेला तर आपण जगणार कसे हे ज्या अर्थव्यवस्थेला समजत नाही ती अर्थव्यवस्था अराजकाकडेच वाटचाल करणार हे एक प्रकारे विधीलिखितच आहे.

कारण हा शोषित समाज, जो ख-या जीवनव्यवस्थेचा आधार आहे तिकडे पुर्णतया दुर्लक्ष करणारी अर्थव्यवस्था याच वर्गाचा आपली हक्काची बाजारपेठ म्हणुन उपयो०ग करुन घेते, अनुपयुक्त उत्पादनेही गळी उतरवली जातात. पण याच बाजारपेठेतील घटकांची अर्थव्यवस्था सबल करण्यासाठी, त्यांची क्रयशक्ती कशी वाढेल यासाठी त्यात गुंतवणुकीचा मार्ग मात्र चोखाळत नाही, तेंव्हा जो क्रमश: एक रोष निर्माण होत चालला आहे तो विघातक ठरणार आहे. एक परंपरागत पण मानवोपयोगी अर्थव्यवस्था आणि दुसरी फोफावणारी, चमकदार पण तशी मानवी जीवनाला विघातक अशी असंतुलित अर्थव्यवस्था या संघर्षात ही नवी अर्थव्यवस्था कधी ना कधी कोसळणार हे उघड असले तरी तिचे कोसळणे हे असंख्य राष्ट्रांना कायमचे दरिद्र करुन सोडेल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. एकट्या ग्रीसमुळे जागतीक अर्थव्यवस्थांना झटका बसला होता आणि याचे कारणच मुळात पायाविहीन अर्थव्यवस्थेत आहे जे या नव्या जगाच्या मुळावर येत आहे.

आपण अत्त्यंत परस्परविरोधी मुल्ल्ये असना-या अर्थव्यवस्थेच्या काळात आलो आहोत. सर्वसाधारण समाजाचा ओढा या तंत्रयुगाच्या लाटेकडे पराकोटीचा आकर्षित झाला आहे...होत आहे कारण तेथील आर्थिक प्रगतीचा वेगही अचाट आहे. . जी मंडळी इंजिनियरींग, केमिकल्स वा मेडिकल शाखांत आहेत त्यांनाही मानसिक नैराश्य येवु शकेल अशी ही वरकरनी स्थिती असली तरी खरे नैराश्य याच उच्च व्हर्च्युअल तंत्रद्न्यान क्षेत्रात आहे. कारण तेथील बदलाचा वेग हा नुसता स्तिमित नव्हे तर भयभीत करणारा आहे. यातुन जे या बदलांशी वेगाने जुलवुन घेवू शकतात ते टिकतात. जे तो वेग सधत नाहीत त्यांची गच्छंती व आर्थिक अधोगती अटळ असते आणि त्याचाही वेग आता वाढु लागणार आहे. आणि हीच परिस्थिती ग्राहकांचीही आहे. एका नव्य तंत्रद्न्यानाशी ते जुळवुन घेतात न घेतात तोच नवे तंत्रद्न्यान येवुन आदळत असते. त्याचा मोह व्हावा अशी परिस्थिती मार्केटिंग तंत्रद्न्यानाने निर्माण केलेली असतेच. आपण जुनाट ठरु नये म्हणुन ते नवे तंरद्न्यान, मग वापर, वा गरज असो अथवा नसो, घेतले जाते. हा असा व्हर्चुअल अर्थनीतीचा फंडा आहे.

पण यातुन वरकरणी अर्थव्यवस्थेचे जे चित्र दिसु लागते ते मात्र भ्रामक असते. कारण गुंतवणुकीचे स्त्रोत हे शाश्वत विकासाच्या कामी न येथा भ्रामक मायाजालाच्या कारणी लागतात...पण तेच स्त्रोत हे अंतत: सामाजिक रचनेचाच पाया विस्कळीत करत आहेत हे लक्षात कोण आणि कधी घेणार?

दै. हिंदु मद्धे अलीकडेच शेतक-यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात एका सर्वेक्षणाचे व्रुत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार नगदी (उस, कापुस, द्राक्षे, हलद इ.) उत्पादने घेणा-या शेतक-यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण एकुण शेतकरी अत्महत्त्यांमद्धे ८०% आहे असे निरिक्षण नोंदवले होते. त्यात महाराष्ट्रातील शेतक-यांबद्दलचे निरिक्षण सामाविष्ट आहे कि नाही हे स्पष्ट नसले तरी ते सर्वेक्षण मान्य करता येत नाही. कोरडवाहु शेतक-यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे असे आपल्याला दिसेल. याचे एकमेव कारण म्हणजे पाण्याचे प्रादेशिक समन्यायी वितरण केले जात नाही. शेतीसाठीच उपयुक्त ठरतील अशी किफायतशिर बाजारपेठ ते कर्जवितरणाची हमी सरकार देत नाही. उर्वरित समाजाला या मुलभुत समस्येचे आकलन नाही. "शेती स्वेच्छेने करा" असा वावदुक सल्ला काही नेते आजकाल देऊ लागले आहेत. पण शेती स्वेच्छेने जी केली जाते ती फार फार तर उसासारख्या तशा जमीनीसच विघातक व पाणीपिऊ पीकांची. त्यातही भावाची मारामारी दरवर्षीची ठरलेली आहे. साखर कारखान्यांना प्यकेजेस देऊन सरकारी तिजोरी रिकामी होतेच आहे. आणि दुसरीकडॆ, केवळ असंघटित आहे म्हनून शोषला जाणारा शेतकरी सर्वात मोठ्या प्रमाणावर आहे पण त्याला प्रोत्साहन मिळेल, शेतीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा मिळतील अशी मात्र सोयच नाही. तो शेती दुसरा पर्यायच नाही म्हणून करत असेल तर त्याला दोष द्यायचा कसा? ही शेतीतीलच विषमतेची स्थिती अराजकाची नाही असे कोण म्हणेल?

आणि अधिकाधिक लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि ती उत्पादक कार्यांसाठीच गुंतवली जाईल असे जर आर्थिक धोरणच, सरकारचे आणि समाजाचेही, तर आर्थिक अराजकाची ती नांदी आहे असे समजून चालावे. 

शाश्वत अर्थव्यवस्था ही समतोल संस्कृती घडवण्यात हातभार लावते तर कृत्रीमतेच्या पायावर असंतुलित वितरणावर आधारीत अर्थव्यवस्था मात्र संस्कृतीच्याच नाशाला आणि सामाजिक स्वास्थ्याच्या अहिताला जबाबदार ठरत असते हे लक्षात ठेवायला हवे. मानसिक आंदोलनांवर अर्थशास्त्र चालु नये, पण सध्या तसे घडते आहे. प्रत्येक व्यक्ती आपले आर्थिक निर्णय हे भावनिक होत घेत चालले आहेत कारण तशाच आकर्षक माहितीचा सातत्याने त्यांच्यावर मारा होत आहे. वास्तवाकडे लक्ष वेधत समाजाला साक्षर करणे हा सध्याच्या माध्यमांचाही हेतुही नाही. आणि सरकारला यातील गांभिर्य अद्याप समजलेले नाही.

पण याच गतीने आपण जात राहिलो तर या अराजकाचे परिणाम एवढे भयंकर असतील कि सर्वप्रथम जागतीक "आर्थिक दुष्काळ" पडेल. आजच्या अन्य क्षेत्रांतील गुंतवणुकींचे मुल्य शुन्य झालेले असेल. कारण ती गुंतवणुकच शाश्वत नाही. शाश्वत अर्थव्यवस्थेच्या अभावाच्या अवस्थेत कोण टिकणार? या प्रश्नावर आताच चिंतन करायला हवे.
--संजय सोनवणी
९८६०९९१२०५

4 comments:

  1. सुंदर विश्लेषण! बहुजन लेखकांनी इतिहास काळातून बाहेर पडून वर्त्मान काळाती व भविष्य काळात उद्भवू शकणा-या प्रश्नांचा वेध घ्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी तुमचा हा लेख दिशा देणारा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे महावीर भाऊ.

      Delete
    2. Awesome ! You also have one article written earlier on world economy. Your deep though process and compassion for the society's most weakest and least represented people is amazing.
      May be you should have an english blog ! Marathi blog won't give you the kind of audience your article deserves.
      Thanks once again for a wonderful article.

      Delete
    3. Thanks Niraj ji. Sure I will try to translate my some writings in English.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...