Tuesday, April 10, 2012

ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास


ढोर हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज प्रामुख्याने महाराष्ट, कर्नाटक व अल्पांश स्वरुपात गुजरातेत आढळतो. अन्यत्र कातडी कमावणा-या समाजांना वेगवेगळी नांवे आहेत. जशी उत्तरेत मोची, चमार वगैरे. ज्या ज्या भागांवर सातवाहनांनी राज्य केले तेथे तेथे माहाराष्ट्री प्राक्रुत भाषेचा प्रभाव असल्याने त्या भागांतील जातींची नांवे ही माहाराष्ट्री प्राक्रुतावरुन पडलेली आहेत. त्यामुळे येथील जातीनाम वैशिष्ट्येही वेगळी आहेत, हे आपण अन्य जातीनामांवरुनही पाहु शकतो. अन्यत्रच्या जातीनामांवर त्या-त्या प्रदेशातील भाषांचा प्रभाव असला तरी हा समाज मुळचा तसा एकच. चर्मकार समाजही याच समाजातुन विशिष्ट कौशल्यांमुळे वेगळा झाला एवढेच!

नामोत्पत्ती:

"ढोर" हा शब्द मुळात जनावरांसाठीचा नाही व अवमानास्पदही नाही हे माहाराष्ट्री प्राक्रुतावरुन स्पष्ट दिसुन येते. मुळ शब्द "डहर" असा असुन त्याचा अर्थ पाणवठे, डोह, तळी यानजीक व्यवसाय करणारे लोक असा आहे. आणि ढोर समाजाचा पुरातन कातडी कमवायचा व्यवसाय पाहता व त्यासाठी विपुल प्रमाणात पाण्याची असलेली गरज पाहता त्यांचा व्यवसाय हा मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणीच स्थिरावला असनेही सहज स्वाभाविक आहे. "डह" हा शब्द पुढे "डोह" (पाण्याचा) बनला व डोहरचे कालौघात बदललेले रुप म्हनजे "ढोर" हे होय. (आजही ग्रामीण भागात डोहाला "डव्ह वा ढव" असेच संबोधतात.) गुरे डोहांत अपरिहार्यपणे जातातच म्हणुन जातात म्हणुन गुरे-ढोरे हा शब्द प्रचलित झाला व जणु काही ढोर म्हनजे जनावरे असा चुकीचा अर्थ प्रचलित झाल्याचे स्पष्ट दिसते. यातुनच ढोर समाजाला हा शब्द अवहेलनात्मक अर्थाने वापरला गेल्याचा समज असल्याचे दिसुन येते...पण ते मुळ वास्तव नाही. डोहानिकट (वा जलाशयानिकट) व्यवसाय करणारे ते डोहर तथा ढोर होत. या समाजाचे मानवी इतिहासात अत्यंत मोलाचे स्थान आहे. या समाजाने अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीपर्यंत पुरातन काळापासुन मानवी जीवन, युद्धशास्त्र, प्रवास व एकुणातील अर्थव्यवस्थाही सम्रुद्ध करण्यात मोलाची कामगिरी केली आहे हे पुढे सिद्ध होईलच, पण भारतीय समाजातील वैदिक व्यवस्थेने त्यांच्याबद्दल क्रुतद्न्य न राहता त्यांनाच अस्प्रुष्य ठरवत क्रुतघ्नताच व्यक्त केली आहे असे स्पष्ट दिसते.

प्राचीन इतिहास:

भारतात जाती या व्यवसायावरुन पडतात ही परंपरा आपल्याला माहितच आहे. ढोर समाजाच्या व्यवसाय म्हणजे म्रुत जनावरांच्या कातड्यावर प्रक्रिया करुन ते टिकावु व उपयुक्त बनवणे हा होय. हा व्यवसाय किती पुरातन आहे? मुळात मानवाने हा शोध कसा लावला यासाठी आपल्याला इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. खरे तर हा जगातील पहिला जैव-रसायनी प्रक्रिया उद्योग होय.

जेंव्हा जवळपास दीड लाख वर्षांपुर्वी मानव हा शिकारी मानव होता, भटका होता, नग्न रहात होता, त्या काळात मानवाला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातड्याची उपयुक्तता लक्षात आली. थंडी-पावसापासुन रक्षण करण्यासाठी (लज्जा रक्षणासाठी नव्हे...कारण तो विचार तेंव्हा मानवाला शिवलाही नव्हता.) पांघरण्यासाठी व क्रुत्रीम निवारे बनवण्यासाठी आपण कातडे वापरु शकतो हे लक्षात आल्यावर मानवाने शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी जपायला सुरुवात केली. परंतु वातावरणाच्या प्रभावामुळे कातडे फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर माणसाने आपली प्रतिभा कामाला लावुन कातडे टिकावु कसे करता येईल यासाठी शोध सुरु केला. सुरुवातीची हजारो वर्ष प्रथम मानव जनावराचीच चरबी चोळुन कातड्याला मऊ व टिकावु ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्याने तशी कातड्याची कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चरावु कुरणांच्या शोधात सतत भटकता असल्याने प्रक्रिया पद्धती शोधणे वा प्रक्रिया करत बसणे यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पण मनुष्य जसा शेतीचा शोध लागल्यावर स्थिरावु लागला व शिकार कमी झाल्याने कातड्याची मुबलकता कमी झाली तेंव्हा मात्र कातड्यावर प्रक्रिया केली तरच कातडे दीर्घकाळ टिकावू करता येईल हे त्याच्या लक्षात आले.

सरासरी इसवी सनाच्या दहा हजार वर्षांपुर्वी, म्हनजे जेंव्हा या वैदिक धर्माचा उदयही झाला नव्हता, तेंव्हा असंख्य प्रयोग करत त्याने नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थ वापरत अभिनव पद्धती शोधुन काढली...व ती म्हणजे कातडी कमावण्याची कला. भारतात बाभुळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ व अन्य तेलादि रंजक द्रव्ये वापरत कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापुर्वी सात हजार वर्षांपुर्वीच शोधण्यात आली. प्रचारित होवून ती भारतभर एक-दोन शतकातच देशभर पसरत वापरात आली. (युरोपात मात्र ओक व्रुक्षाची साल कातडी कमावण्यासाठी वापरली जाई व ते कातडे तेवढे टिकावुही नसे.)

कातडी कमावणे हे अत्यंत शिस्तबद्ध रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट श्रुंखला असलेले किचकट व कष्टदायी काम आहे. आज या उद्योगात अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणाने होत असल्या तरी प्राथमिक प्रक्रिया या मानवी श्रम-सहभागाशिवाय होत नाहीत. प्राचीन काळचा विचार केला तर मग हे काम एके वेळीस रासायनिक प्रक्रिया वेळोवेळी क्रमाने करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची व अंतत: त्याला अंतिम उत्पादनाचे रुप देण्याची कारागिरी करण्यास किती सायास पडत असतील याची आपण कल्पना करुनच थक्क होतो.

आता येथे कोणी प्रश्न विचारु शकतो कि मुळात ही यातायात का? एक तर जनावराचे कातडे सोलुन काढले कि ते वाहुन आपल्या उद्योगस्थळापर्यंत वाहुन नेण्याचा, स्वच्छ करण्याचा...वरकरणी घाण वाटनारा उपद्व्याप...मग एवढ्या रसायनी प्रक्रिया करतांना येणारा उग्र व घाणेरडा वास, चुन्याची-मीठाची प्रक्रिया करतांना हात-पायांवर होणारे परिणाम...हे सारे सहन करत का केला? याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवी समाजाची कातडी वस्तुंची निर्माण झालेली अपरिहार्य गरज. त्यामुळेच या व्यवसायात पुर्वी प्रचंड सुबत्ताही होती. समाजात हजार वर्षांपुर्वीपर्यंत सन्मानही होता. ऋग्वेदात चर्मकारांबद्दल आदरार्थीच उल्लेख मिळतात.

खुद्द गावाच्या वेशीआत हा उद्योग, अगदी समजा प्राथमिक प्रक्रिया डोह वा अन्य जलाशयांजवळ केल्या, तरी उर्वरीत प्रक्रिया वेशीआत कोणी करु देणे शक्य नव्हते, कारण चर्माचा वास प्रक्रिया पुर्ण झाल्याखेरीज जात नाही. त्यामुळे त्यांना आपली वसतीही आपल्या उद्योगस्थानानिकट ठेवणे भाग पडले असे दिसते. परंतु त्याचाच पुढे समाजाने गैरफायदा घेवून या समाजालाही अस्पृश्य ठरवून टाकले गेले. खरे तर या व्यवसायाखेरीज मानवी जीवन सुसह्य होवूच शकत नव्हते. चर्मप्रक्रिया उद्योग तसा जगभर, व तोही प्राचीनच काळापासुन अस्तित्वात असला तरी तिकडे अशी अमानवी वागणुक या उद्योगातील लोकांना दिली गेल्याचे एकही उदाहरण मिळत नाही. परंतू भारतीय समाज हा कृतघ्न असल्याने या व्यवसायींना मात्र अमानुष वागणुन दिली गेली हे येथे विसरता येत नाही.

समाजाला योगदान

या उद्योगाचे मानवी जीवनाला नेमके काय योगदान आहे हे प्रथम आपण पाहुयात, त्याशिवाय ढोर समाजाचे महत्व समजणार नाही. कातडी कमावल्यामुळे (विविध प्राण्यांची कातडी कमावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात.) पादत्राणे, घॊड्यांचे जीन, लगाम, बैलगाड्यांसाठी बैलांच्या टिकावु व मजबुत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राने, हस्त-बचावक, चामडी चिलखते, ढाली बनवता येवू लागल्या व युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी व अगदी ग्रंथ लेखनासाठीही चामड्याचा वापर होवू शकला. (अशा हजारो चामड्यावर लिहिलेल्या ज्युंच्या धार्मिक लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना येथे सापडल्या आहेत.) एके काळी तर चामड्याचे तुकडे हेही चलन म्हणुनही वापरात होते. शेतीसाठीची अनेक अवजारे ते जलस्त्रोतासाठी लागणा-या मोटी चामड्यापासुन बनु लागल्या. त्यामुळे शेती उत्पादन वाढायला मदत झाली. फ्यशनमद्धे आजही कातडी वस्तु प्रचंड मागणीत असतात. अगदी ग्रंथांच्या बांधणीतही कातड्याचा उपयोग अगदी अलीकडेपर्यंत केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे, मद्याचे बुधले (ढोर समाजात यातही स्पेश्यलिस्ट असणारी पोटजात आहे व तिला "बुधलेकरी" म्हनतात.) कमावलेल्या चामड्यापासुनच बनत होते. गृहसजावटीतही विविध प्राण्यांच्या चामडी वस्तुंना प्राधान्य मिळाले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

थोडक्यात चर्मोद्योगाने मानवी जीवनाला सुसह्य व उच्चभ्रु बनवण्यात मोलाचा हातभार लावला.
पण या चर्म-वस्तुंचा सर्रास उपयोग करणा-यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले व ज्यांनी (चर्मकारांनी) त्यापासुन आपल्या कलेचे दर्शन घडवत मानवोपयोगी वस्तु बनवल्या, त्यांना मात्र अस्प्रुष्य ठरवले. मेलेल्या जनावराच्या चामड्याची पादत्राणे वापरतांना, मंदिरांत वा संगीतात रममाण होतांना चर्मवाद्यांचाच प्रामुख्याने वापर करतांना, अश्वारोहन करतांना त्या चामड्याच्या वाद्या हातात धरतांना, चामड्याचे कंबरपट्टे वापरतांना, कातड्याच्याच पखालींतील पाणी पितांना वा चामड्याच्याच बुधल्यांतील तेल खाण्यात वापरतांना कोणालाही शरम वाटली नाही...पण...असो.

तर हा समाज आद्य जैव-रसायनी प्रक्रियेचा शोध लावत मानवी जीवनात अत्यंत मोलाचा हातभार लावणारा, भारतीय अर्थव्यवस्थेलाही पुरातन काळापासुन हातभार लावणारा समाज आहे. उदा. सिंधु संस्क्रुतीतुन निर्यात होणा-या मालात मीठ व कातडी वस्तुंचे व नंतर मणी-अलंकारांचे फार मोठे प्रमाण होते. ढोर समाजातुनच चर्मकार समाजाची उत्पत्ती झालेली आहे हे महाराष्ट्रीय समाजेतिहासावरुन स्पष्ट दिसुन येते. आजही भारत प्रक्रिया केलेली कातडी निर्यात करणारा जगातील तिस-या क्रमांकाचा देश आहे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. फक्त आता याच मुळ समाजाचा - ज्याने या सर्वच प्रक्रियेचा आद्य शोध लावला त्याचा स्वत:चा वाटा घटलेला आहे...कारण औद्योगिकरण व त्यासाठी लागणा-या या समाजाकडे असलेला भांडवलाचा अभाव.

१८५७ पासुन जसे याही क्षेत्रात औद्योगिकरण आले तसे क्रमश: या समाजाचे महत्व कमी होवू लागले. सामाजिक उतरंडीत तर तत्पुर्वीच झाले होते. गांवोगांवी हिंडुन कातडी विकत घेत चर्मप्रक्रिया करणा-या कारखान्यांना पुरवणा-यांची संख्या वाढली. त्यामुळे या स्थानिक कुटीरौद्योगावर अवकळा यायला लागली. त्यात जन्मजात अस्प्रुष्यता लादलेली असल्याने स्वातंत्र्योत्तर काळात ही मंडळी भान येवून या व्यवसायापासुन फटकुन रहायला लागली. नवे रोजगार, तेही न मिळाल्यास अगदी शेतमजुरीही करु लागली. मुळात हा समाज पुरेपुर शैव. यांच्यातही मात्रुसत्ता पद्धती सर्रास आहे. या समाजातच ककय्या या महान वीरशैव संताचा फार मोठा प्रभाव असुन महाराष्ट्रातीलही असंख्य समाजिय स्वत:ला ककय्या म्हणवून घेतात...किंबहुना हीच फार मोठी पोटजात बनलेली आहे.

या मुळ डहर (ढोर) शैवजनांची लोकसंख्या भारतात २००१ च्या जनगणनेनुसार सुमारे ८२ हजार होती...आता ती सव्वा ते दीड लाख एवढी असेल. या समाजातुन आता अनेक विद्वान, शास्त्रद्न्य ते संगणक तद्न्य पुढे येवू लागले आहेत. राजकारणात म्हणावे तर सुशिलकुमार शिंदे व त्यांची कन्या देशप्रसिद्ध आहेतच. याचाच अर्थ असा कि या समाजाने आपला व्यवसाय जरी आधुनिकिकरणाने हिरावला असला तरी जिद्द सोडलेली नाही. खरे तर सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या समाजासाठी खुप काही करायला हवे होते अशी अपेक्षा असायला हरकत नाही...पण याचा दुसरा अर्थ असाही आहे कि त्यांनी स्वजातीयांचाच, अन्य नेते पाहतात, त्याप्रमाणे स्वार्थ पाहिला नाही.

असो. जेही पायात प्रथम बाहेर जातांना चपला-जोडे घालतात, ओरिजिनल चामडी वस्तुंचा (जसा अमेरिकन स्त्रीयांना मिंक कोट घालण्यासाठीचा महाभयंकर शौक आहे) हव्यास बाळगतात...ज्यावर आपली सभ्यता व श्रीमंती ठरवतात, त्यांनी लक्षात घ्यावे कि हे सारे उपकार डहर उर्फ ढोर समाजाचे आहेत. जेथे स्वत:ला पवित्र समजणारे ऋषि-मुनी (अगदी आजचे बाबा-बुवाही) सिंह ते म्रुगाजीनावर (याच व्यावसायिकांनी कमावलेल्या चर्मावर) बसुन जगाला उपदेश करत असत तेही याच समाजाचे ऋणी असले पाहिजेत. ते चर्म मात्र स्पर्श्य होते...आणि ते बनवणारे कलाकार-उद्योजक मात्र अस्पर्श्य, असे कसे बरे?

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

7 comments:

  1. Very informative artical. Thank you for writing on 'Dhor' Caste. Many of 'Dhor' people don't know much about the caste origin, sant kakkayya and much more... Many people hate name of caste 'Dhor', hence they say 'we are kakkayya'. This artical will change view of people looking towards 'Dhor' caste. I want to put this artical or a para of this artical on my blog. Hence I request you, permit me to do so. Thank you.
    Motisagar Sonawane

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Sure you can publish this article on your site. Also this article will be soon published in daily navshakti.

      Delete
  2. Can u send me this article @ my e mail id (rahul.ingale72@gmail.com) n thanx 4 the info

    ReplyDelete
  3. N if u have info abt dhor cast pls send me article.

    ReplyDelete
  4. chan aahe ha lekha aani aaj mala kalal ki mi dhor manaje kay te....dhanyawad amaple likhas kharach sangrahi thevanyasarakhe...aahe .
    shashikant s sherkhane
    9920908474..

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या सर्वस्वी शुभेच्छा! समाजाने आत्माभिमानाने प्रेरीत होवून अनंत प्रगती साधावी...सर्वांनाच एक आदर्श घालून द्यावे...

      Delete
  5. I've never read anything before this article. Such a Knowledgeable lines. lots of people knows about their religion/cast history, i also exited to know what is "DHOR" and what is the history of "KAKKAYA MAHARAJ" but its so rare. After reading this article i got my history.

    ThanQ.......

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...