Saturday, April 14, 2012

मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास!


Image result for salt pans in mumbai


मीठ हा आज सर्वांना अतिपरिचयामुळे अत्यंत सामान्य वाटणारा पदार्थ...पण मीठाखेरीज माणुस जगू शकत नाही...त्यामुळेच मीठाचा शोध हा मानवी संस्क्रुतीतील सर्वात महत्वाचा क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपुर्वी जेंव्हा शिकारी मानव होता त्या काळात शरीरातील मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचे प्रथम रक्त पिवून शरीरातील मीठाची गरज भागवत असे अथवा लवणयुक्त माती खात असे. पुढे उपलब्ध असेल तेथील खनीज मीठ (सैंधव) वापरात आणले गेले. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असल्याने अर्थात ते प्रचंड महाग असे. एके काळी सोन्यापेक्षाही अधिक किंमत मीठाला मिळत असे. मीठामुळे जगात अनेक युद्धे झालेली आहेत. साम्राज्ये बनली आहेत गडगडली आहेत. जगातील सर्वात प्राचीन व्यापार हा मीठाचा होता. मीठ उपलब्ध असलेल्या प्रदेशांवर स्वामित्व स्थापित करण्यासाठी घनघोर युद्धे होत असत. आपल्याला आता सिल्क रुट्स माहित आहेत, पण जगातील व्यापारी मार्ग प्रचीन काळी साल्ट रुट्स (मीठमार्ग) म्हणुन ओळखले जात. रोममद्धे तर सैनिकांना पगार मीठाच्या रुपातच दिला जात असे, त्यामुळेच आजचा स्यलरी (salary) हा शब्दही मुळच्या salt पासुन तयार झाला आहे. मीठाने खाद्य संस्क्रुतीत क्रांती तर घडवलीच पण मानवी आरोग्यही सुद्रुढ व्हायला मोलाची मदत झाली. ज्याचे मीठ खाल्ले आहे त्याच्याशी बेईमानी करणे हा नैतीक गुन्हा मानला जावू लागला, एवढे मीठाचे सांस्क्रुतीक महत्व वाढले. धर्मकार्यातही मीठ हा महत्वाचा घटक बनला. इतकेच नव्हे तर भुता-खेतांना, अभद्र प्रकारांना टाळण्यासाठीच्या तांत्रिक विधींमद्धेही मीठाला महत्वाचे स्थान मिळाले. मीठामुळे मांस-मासे ते नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी मोलाची मदत झली. म्रुतांचे ममीफिकेशन करत प्रदिर्घकाळ शरीररुपाने टिकवण्यासाठीही मीठाचा उपयोग झाला. एका अर्थाने मानवी संस्क्रुती ही मीठाच्या शोधामुळे आमुलाग्र बदलली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

मीठ हा नेहमीच जागतीक राजकीय इतिहास व्यापुन राहिला आहे. इंग्रज सरकारला हादरवून सोडनारा भारतातील महात्मा गांधींचा मीठाचा सत्याग्रह कोण विसरेल? मीठावर कर बसवला म्हणुनच! मीठ हे मानवी संस्क्रुतीच्या अत्यंत प्राथमिक काळात कर बसवले गेलेले एकमेव उत्पादन आहे. मीठांच्या खानींवर व मीठागरांवर देखरेख करायला "लवणाध्यक्षा" ची नेमनुक कशी करावी याबाबत कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही निर्देष आहेत. चीनमद्धे इसपुच्या तिस-या सहस्त्रकातील मीठावरील व्यापार, कर, मीठाचे प्रकार याबाबत सर्वात प्राचीन लेख मिळतो. याचे कारण म्हणजे मीठ हे त्या काळात गरजेपेक्षा कमी उपलब्ध होते आणि ज्याचे मीठावर स्वामित्व त्याचे साम्राज्य अशी परिस्थिती होती.

भारतात फार पुर्वी हिमालयाच्या भागात नैसर्गिक खानींतुन मिळनारे मीठ तेवढे माहित होते. पुढे समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवायचा शोध इसपुच्या ५००० वर्षापुर्वी लागला असे गुजरातेतील ढोलवीरा येथे झालेल्या उत्खननातुन दिसते. समुद्राच्या (सिंधु) पाण्यापासुन निर्माण केले गेले ते सैंधव असे असंख्य उल्लेख आपल्याला आपल्या पुरातन साहित्यांतुन आढळतात. अर्थात समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवण्याचा शोध मत्स्यमारी करणा-या लोकांनीच लावला. जमीनीवर आलेले समुद्राचे खारे पाणी वाळले कि मीठाची स्फटिके मिळतात आणि ते खाद्यसंस्क्रुतीत उपयुक्त ठरते हे निरिक्षण कामी आले आणि मीठाचीच शेती करण्याची पद्धत शोधली गेली.

भारतात मीठाचा अमोलिक, सर्व मानवी जीवनाला आवश्यक आणि उपकारक असा शोध कोलीय समाजाने लावला. सर्वप्रथम हा शोध लागला तो कच्छ प्रांतात, मग हळु हळु जेथे जेथे अनुकुल किनारे व वातावरण होते तेथे हा मीठशेतीचा उद्योग विस्तारत गेला. कोळी समाजातील जी कुटुंबे मीठशेतीकडे वळाली त्यातुनच आगरी समाजाचा उदय झाला. आगर या प्राक्रुत शब्दाचा सरळ अर्थ आहे बाग वा शेत. नारळी-पोफळींच्या बागांबरोबरच जेथे मीठ "पिकवले" जात होते त्याला अर्थातच मीठाची बाग... मीठागर म्हटले जाणे स्वाभाविक होते. या आगर शब्दातुनच "आगरी" या शब्दाचा उगम झाला असल्याचे स्पष्ट दिसते. याचाच दुसरा अर्थ असा कि कोळी व आगरी हे मुळचे एकच! कोळी व आगरींचे मुळचे ऐक्य सांगणारी एक पुराणकथाही येते. अगस्ती मुनीच्या आंगले आणि मांगले या दोन पुत्रांपासुन क्रमश: आगरी आणि कोळी समाज निर्माण झाले अशी ही कथा सांगते. त्यातील पुराणकारांचा मित्थकथा बनवण्याचा हव्यास सोडला तरी हे दोन समाज आधी एकाकार होते हे पुराणकारालाही माहित होते हे स्पष्ट होते अणि ते खरेही आहे.

कोळी समाज देशभर आढळतो. या समाजाचेही मुळ रुप काय हेही येथे पाहणे आवश्यक आहे. या समाजाचे मुळ हे "कोलीय" या भारतातील अतिप्राचीन अशा मानवगणाकडे जाते. भारतात प्राचीन कालापासुन अनेक मानव गण वावरत होते, त्यापैकी हा एक. हा पुरातन मानवी घटक देशभर विखुरलेला होता, भारतात कोलीय (कोलीयक) नांवाची अनेक गांवे नेपाळ, राजस्थान, झारखंड, ओरीसा ते केरळ-तमिळनाडुपर्यंत आढळतात व ती त्यांच्या देशव्यापी अस्तित्वाची कल्पना देतात. कोलीय हे फक्त मत्स्यमार नसुन ते वीणकर ते क्रुषिकार्यही करणारे होते. त्यातील समुद्रकिनारी वसलेल्यांनी सागरी मत्सोद्योगही होवू शकतो याचा अंदाज घेत पहिल्या नौका बांधल्या व सागरी मासेमारी सुरु केली. जाळ्यांचा शोध त्यांना उपयुक्त ठरला कारण ते कुशल वीणकरही होते. हे शोध त्यांच्या अन्नाच्या, भरणपोषणाच्या निकडीमुळेच लागले. पुढे काही शतकांतच प्रत्यक्षानुभवामुळे समुद्राच्या खारट पाण्यापासुन मीठाचे उत्पदन होवू शकते हा शोध लागला. या शोधांतुन नव्य अन्नोद्योग तर सुरु झालाच, पण त्यांच्याच नौकाशास्त्रातुन पुढे विदेश व्यापार सुरु झाला. अर्थात प्राथमिक निर्यात होणारे उत्पादन होते ते म्हनजे मीठ व खारवले गेलेले मांसान्न. पुढे त्यातुन बलाढ्य अशी भारतीय आरमारे सुद्धा उभी राहिली. मुळात हा समाज दर्यावर्दी असल्याने नौकानयनाच्या शोधाचे श्रेयही याच समाजाला द्यावे लागते. नौकानयनामुळे नुसते मीठच नव्हे तर अन्यही उत्पादने निर्यात होवू शकत होती. भारतात दहाव्या शतकापर्यंत जी सम्रुद्धी दिसते त्याचे मुलकारण या नौकानयनात साधल्या गेलेल्या प्रगतीत आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

सह्याद्रीच्या कड्यांतुन जे घाट निर्माण केले गेले ते पुरातन मीठमार्गच होते. वंजारी समाज या मार्गांनी मुख्यत्वाने मीठच जनावरांवर लादुन घाटावरील मीठाचे दुर्भिक्ष असणा-या प्रदेशात भटकत रहात मीठ पुरवत असत. या समाजाचाचेही भारतीय संस्क्रुतीला महान योगदान आहे.

सिंधु संस्क्रुतीपासुनच (इसपु ४२००) भारताचा जागतीक व्यापार सुरु झाला होता. लोथल या क्रुत्रीम बंदराची सिंधुकाळातील पुरातन निर्मिती हा कोलीय समाजाने निर्माण केलेला आश्चर्याचा अद्भुत असा नमुना आहे. कोकणातली चेउल सारखी अनेक प्राचीन बंदरे (इसपु २२३) आजही या समाजाच्या सागरव्यापाराची आणि विजिगिषु व्रुत्तीची साक्ष देतात. इजिप्त, सुमेर, अरबस्तान व अन्य युरोपीय देशांशी त्यांचा व्यापार होत होता. मीठ हे अर्थातच महत्वाचे उत्पादन होते व त्याच बरोबर अन्य भारतीय वस्तुही आपसुक निर्यात होवू शकल्या. यामागे कोळी-आग-यांची अपार कल्पकता होती. साहस होते. भारतातुन सोण्याचा धुर निघत होता असे आपण मानतो, जे सत्यही आहे, पण जर मुळात हे शोध लावलेच गेले नसते तर?

कोकणातील आरंभीच्या सत्ता याच समाजाच्या होत्या. कुडा-मांदाड येथील लेण्यातील शीलालेखात तत्कालीन स्थानिक सत्ताधा-यांचा उल्लेख येतो. ते आगरी कोळीच आहेत. इसवीच्या सहाव्या शतकात तर आगरी-कोळी  यांची कोकणावर संयुक्त सत्ता होती. (संदर्भ: बोंबे प्रेसिडेन्सी ग्यझेट-कोलाबा जिल्हा आणि एच. डी. सांकलिया) किंबहुना नंतरच्याही सत्ता यांच्या मदतीखेरीज या भुभागावर राज्यच करु शकल्या नाहीत असेच इतिहास सांगतो.

सातवाहन काळापासुन (इसपु २२०) महाराष्ट्राचे लष्करी आरमारही बलाढ्य बनल्याचे दिसते. यात खरा हातभार कोळी-आगरी लोकांचाच होता. हे आरमार एवढे बलाढ्य होते कि सातवाहनांनी आगरी-कोळी बांधवांच्या मदतीने श्रीलंकेचाही पराभव करत तेथवर सत्ता पोहोचवली. एवढेच नव्हे तर सातवाहनकालीन व आजच्या मराठीचे मुळ असलेल्या माहाराष्ट्री प्राक्रुताच्या मुळ रुपाला आगरी बांधवांनी आपल्या आगरी भाषेत कटाक्षाने जपलेले दिसते.

वैदिकांनी जरी पुढे सिंधुबंदी नामक अत्यंत अनिष्ट प्रकरण पुढे आणले असले तरी नौकानयन या समाजाने सुरुच ठेवलेले दिसते. त्याचाच उपयोग सोळाव्या शतकात छ. शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार उभारायला झाला. याचा दुसरा अर्थ असा कि हा समाज वैदिक संस्क्रुतीच्या प्रभावात कधीच आला नाही. त्यांनी समुद्रबंदीचा फतवा मान्य केला नाही. पुढे सरखेल कान्होजी आंग-यांच्या रुपाने इतिहासाला एक महानायक मिळाला. आगरी-कोळी समाजाचे आरमारी युद्धतंत्र त्यांच्या काळात कळसाला पोहोचले. समुद्राचीच संगत पुरातन कालापासुन असल्याने सागरी किल्ल्यांची संकल्पनाही याच समाजाने खुप आधी विकसीत केली होतीच. हे आधीचे सागरी किल्ले बनवले गेले ते सागरी चाच्यांना तोंड देण्यासाठी व व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांचा उपयोग स्वराज्याला केवढा झाला हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आजच्या सर्वच सागरी किल्ल्यांच्या निर्मितीचे खरे श्रेय आगरी-कोळी समाजालाच द्यावे लागते ते यामुळेच. पण पुढे नानासाहेब पेशव्याने आंग्र्यांचे आरमार बुडवण्याची घोडचुक केली आणि इंग्रज-पोर्तुगीजांना मोकळे रान मिळाले हा दुर्दैवी इतिहासही येथे विसरता येत नाही.

कोळी हे कोलीय या गणाचे लोक. हे कोलीय कोण होते, याचाही विचार येथे करायला हवा. कोलीय वंश जरी भगवान बुद्धांमुळे आज माहित असला तरी त्या वंशगटाचा उगम हा सिंधुपुर्व संस्क्रुतीतच आढळतो. व्यास-वाल्मिकी हे आद्य महाकवी याच कोलीय समाजाने दिले हेही येथे आवर्जुन नमुद करुन ठेवतो. सिंधुकालीन नौका (ज्या तशाच प्रकारे आजही सिंध प्रांतात बनतात) बनवण्याची रीत या कोलीय लोकांनीच शोधली. कोलीय वंश हा मुळचा शैव मात्रुसत्ताक पद्धती पाळनारा समाज होय. त्यांची स्वतंत्र गणराज्ये होती व ती त्यांच्या वंशाच्या नांवानेच ओळखली जात असत. मुळचे कोलीयच असल्याने व विशिष्ट भागांतच एकवटल्याने पुरातन मात्रुसत्ताक पद्धतीचे अंश आजही आगरी समाजाने जतन केले आहेत. अन्य समाजगटांपेक्षा वैदिक संस्क्रुतीचा पगडा दूर ठेवण्यात त्यांना यश आले ते त्यामुळेच! त्यांच्या देवता प्रामुख्याने मात्रुदेवताच असून (उदा. एकवीरा, मंबाई, गोराई, इ.) त्यांच्यात हुंडा देणे-घेणे पुर्णतया अमान्य आहे. एवढेच नव्हे तर समाजाची पंचायत ही फक्त देवीमंदिरासमोरच भरते. घरातील आर्थिक व्यवहार हे आजही सर्वस्वी स्त्रीयांच्याच हाती असतात. गणसत्ताक पद्धतीचेही त्यांनी अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपलेले वैशिष्ट्य असे कि आगरी खेड्यांत आगरी सोडुन अन्य माणुस औषधालाही सापडत नसे. आगरी पंचायतच सामाजिक निर्णय एकत्रीतपणे घेत असे. बाह्य सत्तांना त्यात जवळपास प्रवेशच नव्हता.

नदी-तळी येथील मासेमारी मानवाला पुरा-पाषाणयुगापासुन येत होती. पण समुद्रातील मासेमारी अत्यंत धाडसाची अशीच होती. ज्या  गणाने सामुद्रिक मासेमारीचा शोध लावला व अन्नाची गरज भागवु लागला तो सागरकिनारे हेच आपल्या वास्तव्याचे ठिकान ठरवणार हे उघड आहे. पुढे तोही उद्योग बनला. आणि मीठाचा शोध लागल्यानंतर जो भाग मीठशेतीस योग्य आहे तेथेच त्यांची वस्ती आढळणे स्वाभाविक असेच आहे. त्यामुळेच कि काय महाराष्ट्रात व गुजराथेतही (जेथेही मीठशेती करता येणे शक्य होते तेथे) त्यांच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरातत्वीय पुरावे आढळतात आणि तेथेच ते आजही एकवटलेले दिसतात. त्यामुळे महिकावतीच्या बखरीतील आगरी समाज हा बिंबराजाबरोबर मुंगी-पैठणवरुन आठशे वर्षांपुर्वी कोकनात आला ही कथा आपोआपच बाद होते. कारण मीठ बनवणे हा आगरी समाजाचा पुरातन कालापासुनचा व्यवसाय होता. बिंब राजाने कोकणात आक्रमण केल्यानंतर त्यांना सैनिक म्हणुन गरज संपल्यानंतर मीठागरे बनवून दिली व तेच आगरी हे मत कोणत्याही पुराव्यांवर टिकत नाही. ते मानले तर मीठाचा शोध तेराव्या शतकात बिंबराजाने लावला असे म्हनावे लागेल!

आगरी समाजाचे मानवी संस्क्रुतीवर फार मोठे उपकार आहेत. हा खरा संशोधक व निर्माणकर्ता समाज होय! मिठाचा इतिहास म्हनजे आगरी समाजाचा इतिहास होय...या समाजाचा इतिहास वैदिक संस्क्रुतीपेक्षाही पुरातन म्हणजे किमान सात हजार वर्ष एवढा प्राचीन आहे. सर्वांनीच त्यांचे मिठ खाल्ले आहे. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्क्रुती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो हे या निमित्ताने लक्षात यावे!

-----संजय सोनवणी




10 comments:

  1. hevdi mahiti navti khup chan lihile gele ahe

    ReplyDelete
  2. kaahee varshapuevee market madhe 50paisyala 1Kg ha mithacha dar hota. Mithagar jithe asate tithe tar ajun dekhil 1/2 kg meeth uchaloon anale taree mithagar malak complaint karat nahit. pan TATA(no.1) aani sarakarane Iodine yukt meeth sakteche karun sayra janatelaa CHATA lavalyat

    ReplyDelete
  3. my so many friends are from Agri community, if they read above article then they will happy.. many thanks

    ReplyDelete
  4. उत्कॄष्ट लेख........पण खर तर आगरी संस्कृती हीच वैदीक संस्कृती.........एकविरा आईची [रेणुका मातेची] संस्कृती........!

    ReplyDelete
    Replies
    1. Lekh atishay aavadala. anek varshapasun karlyala jaato aahe, tithe asalelya Buddha leni baddal aamachya aagari samajat barecha gairsamaj aahet. te ya lenyana pandav leni mhanatat, shikun motha zalyavar kalal ya lenyancha aani pandavancha kahi sanbandh nahi, mag prashna padala ithe ekvira aai aali kashi, kaahi varshanpurvi Aagari samaj prabodhinine mofat vatalele Balasaheb thakare yanche pita, prabhodhankar thakare yani lihilele "devalancha dharma aani dharmachi devale" he pustak vachal tyatun kalal ki ekvirechi puja hi sadharan pane 1919 sali suru zali. Aagari samaj ha vaidik samaj nahi, karan aagari samaj ha kadhihi vedpathan karit nahi, kadhihi munj karit naahi. aagari samaj ha sadhya vaidik sanskrutichya prabhavat yet aahe. Nana Dharmadhikari sarakhe lok aagari samajala vaidik dharmachya prabhavat yet aahet. Aagari samajache ekata tiger Di.ba.Patil he nastik aahet aani tech kharya arthane aagari samajache sudharak aahet.

      Delete
  5. Khup chhan lekh ahe.
    manatil gairsamaj dur zale.dhanyavad.
    aajpasun tya ekvira devvibddalsudha adar vadhala. Pan tethil aghori prathebddal chintit ahe. Ekandarit lekh bharpurach avadla.

    ReplyDelete
  6. Lekh Khupach Chan Ahe Agari Samajabaddal Khup Changali Mahiti Milali Tasech Ha Samaj Ha Purankathenusar Ka Hoina Mahan Agasti Rishinsi Jodla Gela Ahe ya Baddal Khupach AAnand Zala

    ReplyDelete
  7. खरंच खुप सुंदर आग्री समाजा बद्दल तुम्ही ही माहिती सांगितली आहे आणि खराच खुप ग्रेट आहे आग्री समाज

    ReplyDelete
  8. सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  9. Sudhar lekh aahe
    Mi majhya website var upload karto

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...