Wednesday, June 27, 2012

त्यांना कोण आवाज देणार?


मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटींत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीच्या उंच्या-खोल्या मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पुर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो कि राजकीय विचार. अर्थविचार असो कि सामाजिक विचार. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. अशा अगणित विचारांच्या संदर्भ व्युहात विचारकलह निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसे घडतेही. किंबहुना तसेच घडणे अभिप्रेत असते. फक्त विचार कलह हा सृजनात्मक असावा, विध्वंसक नसावा, एवढीच काय ती अपेक्षा बाळगता येते.

वैचारिकतेशी प्रत्येकाचे एक इमान असावे असेही अभिप्रेत असते. विचार बदलु शकतात. जसे नवे जीवन दृष्टीक्षेपात येते, नवे अनुभव येतात तसे विचार बदलणे...मग ते व्यक्तिगत जीवनाबाबत असोत वा सामाजिक जीवनाबाबत, धर्मतत्वांबाबत असोत कि जीवनमुल्ल्यांबाबत. परिवर्तनशीलता हाच निसर्गाचा नियम आहे. उलट जे गतकाळालाच चिकटुन बसतात व गतकाळातील आमचे सारे काही श्रेष्ठच होते व तसेच जीवन-नियम आजही कायम असावेत असे जे मानतात त्यांना आपण सनातनी, प्रतिगामी असे म्हणतो. काळ हा नेहमीच पुरोगामी-अग्रगामी असा असतो. नवीन कालसापेक्षतेत जे नवविचार देतात, समाज विचारांना एकंदरीत समृद्ध करत नेण्याच्या कार्यात हातभार लावतात त्यांचे विचार पटले वा नाही पटले तरी एकुणातच विचारकलहातुन नवविचार निर्माण होण्याचे अनवरत प्रक्रिया सुरु होते. जेंव्हा अशी प्रक्रिया थंबते तेंव्हा अंधारयुग निर्माण झाले असे मानले जाते. भरतात काय किंवा युरोपात काय, अशी अंधारयुगे येवून गेली आहेत. समाजजीवन कोणत्याही नव-विचारचैतन्याला मुकलाय असे घडुन गेले आहे.

सॉक्रेटिसने तरुणांनाच प्रश्न विचारत वैचारिक क्रांती घडवण्याचा प्रत्यत्न केला. आपल्या विचारांशी प्रतारणा न करता त्याच्या सरकारने त्याला या कृत्याबद्दल जी शिक्षा दिली...हेमलॉक विषाचा पेला पिण्याची ती त्याने पळुन जाण्याची सहज संधी उपलब्ध असतांनाही नाकारली. तो विष प्याला आणि मरता-मरताही तत्वद्न्यानाचा नव-अनुबंध निर्माण करत. हे अतुलनीय धैर्य व स्व-विचारनिष्ठा जगाच्या इतिहासात क्वचित पाहण्यात येते. ग्रीसने जगाला ज्या अद्भुत वैद्न्यानिक, तत्वद्न्यान व साहित्याच्या देणग्या दिल्या त्याला कारण असे विचारस्तंभ होते म्हणुन!

आपण भारतीय मात्र जे मृतवत राहिलो ते राहिलोच. वेद-उपनिषदे, रामायण महाभारत..पुराणे यात अडकुन पदलो ते पदलोच. चवथ्या शतकात पृथ्वी सपाट नसुन ती गोल आहे व स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडणारा आर्यभट पुढे ब्रह्मगुप्त, परमादीश्वरादि खगोलद्न्यांनी साफ फेटाळुन लावला. तोवरच काय, पार कोपर्निकस (सतरवे शतक) येईपर्यंत पृथ्वी सपाट आहे याच भ्रमात अवघे जग राहिले. द्न्यानेश्वरांपर्यंत आर्यभटाची ही कृती पोहोचली ती शंकराचार्यांच्या मार्गे. पण जवळपास ९०० वर्षांनी द्न्यानेश्वरांनीही आर्यभटाचाच हात धरत पृथ्वी फिरते, सुर्य स्थिर आहे...पण ज्याप्रमाणे नांवेतुन जातांना आपल्याला तीरावरील वृक्ष स्थिर असुनही मागे जातात असा भास होतो तद्वतच न चालता सूर्याचे चालणे वाटते, असे म्हटले. (द्न्यानेश्वरी ४:९७-९९) पण एका गणिती सिद्धांताचे आध्यात्मीक रुपकात रुपांतर केल्याने गणिताचे...शास्त्राचे हत्या झाली आहे हे आम्हाला समजलेच नाही! पायची पाच डिजिटपर्यंतची किंमत काढणारा पहिला गणितद्न्य आर्यभटच. sin  आणि cos या गणिती संद्न्या निर्माण करणाराही आर्यभटच! खरे तर आर्यभटाचा अभिनव विचार न हेटाळता अथव अध्यात्मात घुसवत त्याला परलोकवादी सिद्धांतात बदलवत न बसता त्याची शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध प्रगती करण्याचा विविधांगी प्रयत्न झाला असता तर कदाचित भारत हाच विद्न्यानातील एक महासत्ता बनला असता. गुलामीत खितपत रहावे लागले नसते. या जाती-पातींतील व्यर्थता तेंव्हाच कळुन चुकली असती. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी.

मला अनेकदा प्रश्न विचारला जातो तो हा कि गतकाळाची एवढी चर्चा का? मला वाटते ती आवश्यक आहे, कारण इतिहासाकडे डोळे उघडुन पाहिले नाही तर आपल्याला आपल्या चुका कदापि कळणार नाहीत. वर्तमानाचे आकलनही असेच धुसर होत जाईल मग भविष्य काय असणार? आपण इतिहासाकडे जातीय द्रुष्टीने व धार्मिक अहंकारांच्या भावनांतुन पाहतो. पुर्वीही तसेच घडत होते. रामकथा जैन व बौद्ध धर्मियांनी आपापल्या सोयीने पुन्हा लिहुन काढली. वैदिकांनीही बालकांड आणि उत्तरकांड घुसवत आणि मुळ कथेत सोयिस्कर घालघुसड करत रामकथेची वाट लावुन टाकली. महाभारताचे तर विचारुच नका! आम्ही सत्याचे बुरुज अंधविश्वासाच्या गहन धुक्यात गडप करुन टाकले. आमची बुद्धी आजही तशीच चालत आहे हे अजुन एक दुर्दैव. एकेक जात आपल्या प्राचीनत्वाच्या नव्या मित्थकथा निर्माण करत नवी पुराणे लिहित आहेत. कोणाचीही चिकित्सा कोणालाही नको आहे. भावना दुखावतात. दंगे-धोपे होतात...हिंसक हल्ले होतात.

मग टोळ्या करुन राहणा-या हिंसक आदिमानवात आणि या आधुनिक आदिमानवांत फरक तो काय? अशी कोणती मानसिक प्रगती त्याने केली आहे? होत्या त्याच मानसिकतेत राहत ज्या विचारव्युहांत आपण अदकलो आहोत त्यामुळे वरकरणी आपण एक "विचारकेंद्रबिंदु" आहोत असे वाटले तरी त्या बिंदुत्वात एक महत्वाचे न्यून राहते ते हे कि पुढे जाण्याचा मार्ग खुंटला असतो. होतो तेथेच...आहो तेथेच आणि अजरामर तिथेच अशी अवरुद्धविचार स्थिती निर्माण होते.

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

इतिहासाचे अन्वेषन करत रहावेच लागणार आहे. त्याखेरीज आम्हाला आमच्या मुर्खपणाचे रहस्य समजणार नाही. ते रहस्य जोवर समजणार नाही तोवर आम्ही आपापली खुरटी शिस्ने मिरवीत "जय अमुक... जय ढमुक" करण्यात आणि आम्ही केवढे संवेदनाशील आहोत हे तोडफोडी करुन सिद्ध करण्यात धन्यता मानत राहु.

शेवटी ज्यांना गटार-विचार-व्युहात कसलेही स्वत:चेही तत्वद्न्यान नसतांना रमायचे आहे त्यांना कोण आवाज देणार? समाजिक मागासपणा एक वेळ दूर होईल, पण या बौद्धिक मागासपणाचे आपण काय करणार?

7 comments:

  1. वस्तुनिष्ठ, माहितीपूर्ण आणि दिशादर्शक लेखन

    ReplyDelete
  2. मनात घोळत असलेल्या अनेक विचारांना मूर्त स्वरुपात वचतोय … thank u sirji.

    ReplyDelete
  3. मनातले विचारच मांडले आहेत. तथापि, ही सृष्टीच परिवर्त्नशील आहे.मानवी आयुष्य भौतिकतेने गतिमानच असते. रानटी अवस्थेतून उत्क्रांत असलेल्या मानवाचा भौतिक संसधाने, सुरक्षा, टोळीअवस्था, त्यातून निार्माण झालेल्या चालिरिती याचा प्रचंड पगडा नव्त्याहे त्यांच्या जीवनव्यवस्थेचा भाग असल्याने त्या त्या उपखंडातील लोकांवर अजुन आहेच. त्या त्या लोकांत निर्माण झालेल्या जाणकार सुज्ञ लोकांनी बऱ्याच धर्मात या विचारांची सरमिसळ वैयक्तिक अनुभवाने कधी सापेक्ष कधी निरपेक्ष रितीने मांडलेली वाटते. आपण थोडं गुगलवर अलबैरुनीवर तसेच इतरांवर किलक करुन बघा, जे काय जाणवेल ते अनुभवा विचार करा.
    मनासंदार्भात भारतात जैन बौध्द धर्मामध्येही बराच भर आहे. किंबहुना त्यांनी तर ज्ञान व त्यासाठी जाणीव व तिचा विकास हेच निसर्ग, सृष्टीतत्व समजून घेण्याचेच नव्हे विचार व्यवहार व मानव-निसर्ग संबंध साधन समजले आहे. परंतू याकडे समजून घेणे तर लांब पण केवळ वरवरच्या अभ्यासाने पुर्वग्रहित विचाराने बऱ्याच विचारवंत जे कुरुंदकर असो किंवा आणि कोणी या क्षेत्रात यापध्दतीने विचार व्यक्तत तसेच दिशादिर्ग्दशन करण्यात सोनवणी सरांच्या विचाराच्या चिकित्सेच्या दिशेकडे पोहचत नाहीत.भक्तीमार्ग जरी सर्वांसाठी सोपा वाटला तरी भ्रमाचे भोपळे निर्माण होऊन नव्याने त्या जुन्या ठेकेदारांना आर्थिक साधनेच उपलब्ध होतात.भक्तीमार्ग अन्वेषणासाठी फारसा उपयुक्त नाहीच. निदान मला तरी वाटत नाही.त्यातून साहित्य काव्य निर्माण होऊ शकते पण वस्तुस्थितीवर सोल्यूशन्स फारशी निघत नाहीत. निघते ते तात्कालिक उपयोजितच असते. शेवटी जग हे गरजवंतांचे प्रक्टिकल असते. त्यामुळे परिवर्तनसापेक्ष जग असणारच फक्त साधने कधी जुनी कधी नवी. यामागे चरितार्थ चालविणे संपत्ती जमविणे पुढच्या पिढयांची सोय करणे त्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करुन धर्म व्यवस्था व इतर व्यवस्था जशी लँडलार्ड वर्गाचे राजकारण, व्यापारीवर्गाचे नफयातील जागरुकता तसेच श्रीमंती ही नेहमी व्यवहार पातळीवर जागृत असते.
    नव्या पिढीला आता तर धर्मव्यवस्थाच नव्हे तर political saturation असण्याने तेसुध्दा खुपच जुनाट व नकोनको वाटते. जर इतिहासाचे अन्वेषण आवश्यकच आहे तर मानवाचेही मनाच्या जाणीवा विकसित होत राहिल्या तर तो स्वत:चेही वेळोवेळी अन्वेषण, वागण्याची चिकित्सा करणार भारतीय राज्य घटनेने वेळोवेळी विज्ञानाधारित चिकित्सेचीच जनतेला शिकवणे दिलेली आहे. त्यामुळे सोनवणीसरांच्या चिंतनात नव्या, तसेच जगाला मार्गदर्शक असणाऱ्या वैभवशाली भारताच्या जाणीवा ओतप्रोत भरलेल्या आहेत. मनापासून आपणास प्रणाम. अभय

    ReplyDelete
  4. ___/\_____ दंडवत
    अगदी माझ्या मनात चाललेल द्वंद्व इथे वाचतोय

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...