Wednesday, August 1, 2012

कोणत्या वर्ण-जातीचे? कोण आम्ही?


समाज म्हणुन आम्हा मराठी लोकांची समस्या ही आहे कि आम्हाला आमच्याच पाळा-मुळांबद्दल संभ्रम आहे. प्रत्येक जात ही अवकाशातुन एकाएकी टपकलेली असून, म्हणजे ब्रह्मदेवाच्या तोंडापासुन ते पायातुन, शिवाच्या तोंडातुन ते अश्रुंतुन...अशा अनेक भाकडकथा प्रत्येक वर्णीय/जातीय जोपासत आले आहेत. त्यापोटी प्रत्येक जातीने आपापले अहंकार वृद्धींगत करत एक अशी अवस्था निर्माण करुन ठेवली आहे कि त्यातुन सुटका होणे अशक्यप्राय वाटावे. खरे तर एक समाज म्हणुन प्रत्येक जातीचे समाजरचनेत, संस्कृतीत अत्यंत महत्वाचे योगदान आहे. किंबहुना परस्पर सहाय्याखेरीज कोणताही समाज जगु शकत नाही. हाही समाज परस्पर सहकार्य व साहचर्यातुनच आजवर जगलेला आहे. असे असुनही परस्परांवर कुरघोडी करत आपापल्या सामाजिक संस्था जपण्याची प्रवृत्ती प्रत्येक जातीत आहे हे आपल्या लक्षात येईल.

असे का? यामागे नेमके कोणते मानसशास्त्र आहे याचा मुलगामी शोध घेणे आता अत्यावश्यक बनले आहे. भारतीय धर्मेतिहास पाहिला तर दोन महत्वाच्या बाबी लक्षात येतात. वैदिक संस्था ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे महिमान गातो तर औपनिषदिक, जैन व बौद्ध परंपरा क्षत्रीय माहात्म्य गातांना दिसतात. बौद्ध धर्मालाही चातुर्वर्ण्य मान्य असून प्रवज्जा घेणा-यांपुरतीच समता आहे. उपनिषदे ही क्षत्रीयांनीच रचली असुन वैदिक यज्ञसंस्थेला त्यांनी प्राय: हीणवलेच आहे. म्हणजेच ब्राह्मणी विचारधारेला विरोध केला आहे. एकार्थाने भारतीय धर्मेतिहास हा प्राय: ब्राह्मण (मग ते शैव ब्राह्मण असोत कि वैदिक) आणि क्षत्रीयांनीच घडवला आहे व जेथे जेथे शक्य आहे तेथे त्यांनी आपापल्या वर्णाचेच माहात्म्य सांगण्यास कमतरता ठेवली आहे असे दिसत नाही. बुद्धाला तर आपण क्षत्रीय व त्यातल्या त्यात शाक्य क्षत्रीय असल्याचा अभिमान होता.

म्हणजेच वर्णाभिमानी आणि कुलाभिमानी अशीच एकंदरीत भारतीय धर्मांची मांडणी असल्याने तिचे रुपांतर जातीअभिमानात कसे बदलले असेल यावर मंथनाची गरज आहेच. प्रत्येक वर्णाच्या कौशल्यनिहाय व प्रदेशनिहाय उपविभाग होत जाती पडत गेल्या. आज देशात साडेसहा हजार जाती आहेत, ब्राह्मनांच्याही साडेपाचशी जाती आहेत. पण वास्तवात तपासायला गेले तर सर्व जातींची (प्रदेशनिहाय बदललेली भाषाभेदामुळेची नांवे व कौशल्ये व उपकौशल्ये) संख्या ही ५०-६० च्या वर जात नाही. एखाद्याच उपजातीतील व समान प्रदेशात राहणा-या लोकांची वांशिक वैशिष्ट्ये एकच एक आहेत असेही नाही.

यासाठी एक लिटमस टेस्ट आहे. शंभर विविध जातींच्या लोकांचे फोटो जातीनाम न देता लोकांसमोर ठेवा आणि शरीएर-चेहरा लक्षणांनुसार त्यांची जात...किमान वर्ण ओळखा असे सांगितले तर लोकांचे सुमारे ९५% अंदाज चुकतात. कोण ब्राह्मण आहे आणि कोण दलित आहे हे ठामपणे लोकांना सांगता येत नाही. तुम्हीही अशी टेस्ट घेवून पहा.   हे असे आहे याचे कारण मनुस्मृती सांगते तसे अनुलोम-प्रतिलोम विवाह हे नसुन प्रत्येक प्रदेश आपापली समान भौतीक शारीरलक्षणे बाळगत असतो. थोडेफार फरक दिसतात ते आहारशैली व व्यवसाय-पद्धतींमुळे. नंपुतीरी ब्राह्मण आणि काश्मीरी ब्राह्मण यांच्यातील शारीर-लक्षणे टोकाची भिन्न आहेत ते यामुळेच. असो. यावर नंतर आपण अधिक सखोल चर्चा करु.

असे असतांनाही समाजाला वर्ण आणि जात यांत सांगड घालाविशी वाटते याचे कारण आपल्याला आपल्याच मानसिकतेत शोधावे लागते. शुद्र गणल्या गेलेल्या समाजांनाही आपले मुळ ब्राह्मण व क्षत्रीय वर्णांतच का शोधावे वाटते? वैश्यांत का नाही? किंवा जे नंतर पंचम वर्णात ढकलले गेले त्यांना किमान शुद्र वर्णात आपले स्थान का शोधावे वाटत नाही?

यावर विचार करणे क्रमप्राप्त आहे. भारतीय धर्म हेच मुळत ब्राह्मण वा क्षत्रीय श्रेष्ठत्वाच्या कल्पनांवर आधारीत आहेत, हे वास्तव आपल्याला विसरता येत नाही. धर्मकल्पना या नेहमीच मानवी मनावर अधिराज्य गाजवत असतात. ब्राह्मण विरुद्ध क्षत्रीय हा संघर्ष आपण पुरातन कालापासुन पाहु शकतो. एकीकडे परशुराम हा क्षत्रीय निर्दालक म्हणुन पुढे आणला जातो वा क्षत्रीय हे तत्वज्ञानात व सत्तेत श्रेष्ठ असून ब्राह्मण क्षत्रीयांचे महत्वाचे उपांग आहे असे प्रतिपादन होत असते. या सर्वात वैश्य व शुद्रांना अधिबहुतिक असे स्थानच नाही. प्रा. नरके म्हनतात त्याप्रमाणे शुद्र शंबुकाची हत्या ब्राह्मणांनी सांह्गितल्याने क्षत्रीय रामाने केली. यात कोणा वैश्य वा शुद्राची साक्ष काढली गेलेली दिसत नाही. थोडक्यात धर्म ही क्षत्रीय व ब्राह्मनांची मक्तेदारी झाल्याने वैश्य व शुद्र आपले पुरातन मुळ हे पतीत ब्राह्मण वा पतीत क्षत्रीयत्वात शोधु लागले असे मला दिसते.

यासाठी मला महाराष्ट्रातील एका महत्वाच्या घटनेकडे लक्ष वेधावेसे वाटते. कृपया त्यातुन वेगळा अर्थ काढु नका. अशा सवयी महाराष्ट्रात वाढत चालल्या आहेत म्हणुन. शिवाजी महाराज ९६ कुळी मराठा होते याबाबत कोणाचे दुमत नाही. माहाराष्ट्री ब्राह्मणांनी मराठा हे शुद्रच असल्याने त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही असे घोषित करुन खुद्द महाराजांना अडचणीत आणले. पण शेवटी महाराजांनी आपल्या मंत्र्यामार्फत आपण सिसोदिया वंशीय राजपुत क्षत्रीय असल्याचे वंशावळींमार्फत सिद्ध केले व राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा करुन घेतला.  

येथे मला अल्पमतीनुसार पडनारा प्रश्न असा आहे कि मराठा ही जात मुळची राजपुत होती तर त्यांनी मराठा हे ज्ञातीनाम नेमके का व कसे घेतले? महराजांनी समजा हरवलेला ज्ञातीइतिहास परत मिळवला तर अन्य मराठा समाजाने मग स्वत:ला राजपुत क्षत्रीय असे म्हणायला सुरुवात केली काय? छ. शाहु महाराजांना पुन्हा वेदोक्ताचा लढा का लढावा लागला? हे प्रश्न मी उपस्थित करत आहे कारण हेच प्रश्न बव्हंशी अन्य जातेयांनाही लागु पडतात. उदा. अहिर लोक, मग कोणत्याही जातीचे असोत, स्वत:ला क्षत्रीय समजतात. क्षत्रीय समजणारे धनगरही आहेतच. देवांगन कोष्टी ते दैवज्ञ सोनार स्वत:ला ब्राह्मण मुळाचेच समजतात. अनेक जातींनी उपनयनाचा अधिकार भांडुन मिळवला आहे.

याचा अर्थ असा कि ब्राह्मण व क्षत्रीयच धार्मिक व सामाजिक परिप्रेक्षात श्रेष्ठ मानण्याची सर्व-सामाजिक मानसिकता आहे म्हणुनच आपापल्या जातीची नाळ ब्राह्मण वा क्षत्रीयाशी भिडवण्याची परंपरा आहे. याचे कारण मुळात भारतीय धर्म हे ब्राह्मण वा क्षत्रीय निर्मित असल्यामुळे तर नाही? वैश्यांचे भारतीय धर्मांत उघड म्हनता येईल असे योगदान दिसत नाही. शुद्रांनी वेळोवेळी धर्मकल्पनांत बदल व तेही स्वत: शुद्रच आहोत हे मान्य करत रुढ धर्मकल्पनांशी प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुकाराम म्हणतात "देवा बरे झाले, मला कुणबी केले अन्यथा दंभेची मी मेलो असतो..." पण शुद्र असल्याचा अभिमान कोणत्याही वैश्य व शुद्र विचारवंत वा संताने केला नाही. दंभ करणा-यांविरुद्ध वर्चस्वतावाद शुद्रांनी माजवला नाही. त्यामुळेच कि काय एक खरे विद्रोही रुप समतेच्या चळवळीला यायला हवे होते ते आले नाही. ते आपल्या दुर्बल व शरणागत मानसिकतेतच वावरत राहिले. म्हणुन शुद्रांची समता थोडीफार का होईना...शुद्रांपुरतीच मर्यादित राहिली. इतर वर्णीयांनी त्या समतेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

कारण मुळातच शुद्रांना क्षत्रीय व ब्राह्मण श्रेष्ठत्व मान्य होते. ज्यांना कोणी क्षत्रीय मानत नव्हते त्यांनी क्षत्रीयत्वाच्या सनदा मिळवल्या. जे वर्णव्यवस्थेत ब्राह्मण नव्हते त्यांनी स्वयंघोषित ब्राह्मणत्व मिळवले...आजही अनेक जाती त्या प्रयत्नांत आहे. वर्णव्यवस्थेचे खुळ भारतीय मानसिकतेत बसलेले आहे. इतिहासात पहायला जावे तेथे त्यांची उदाहरणे मिळतात. पण वैश्य वा शुद्रत्व मिळावे यासाठे मात्र अखिल भारतीय समाजव्यवस्थेच्या इतिहासात एकही उदाहरण मिळत नाही.

याचाच अर्थ असा कि वैश्यत्व व शुद्रत्व हे कधीही पूज्य वा स्वीकारणीय आहे असे मान्य न करता केवळ हे कर्मविपाक सिद्धांतामुळे नशीबी आले आहे असे जरी समाजाने मान्य केले असले तरी क्षतत्रीयत्व वा ब्राह्मणत्व नेहमीच प्रेय राहिले आहे.

मुळात ही मानसिकताच दोषार्ह आहे. पण ती आहे व होती हे अमान्य करता येत नाही.

या मानसिकतेवर आपण अधिक मंथन करायला हवे. कोणताही पुरोगामी आजचा जाती/वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकारातुन मुक्त नसेल तर मग हा प्रश्न अधिक गंभीर होतो. वरवरच्या विचारांना काहीएक अर्थ नाही.

कृपया यावर सर्वांनी विचार करत प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.

4 comments:

  1. 'आपल्या पुर्वजांचा इतिहास लढवैय्या व गौरवशाली होता, त्यातून प्रेरणा घेऊन जातीव्यवस्थेविरुध्द लढले पाहिजे', या उद्देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी 'हु वेअर दी शुद्राज' हा ग्रंथ लिहीला. परंतू मुळ उद्देश सफल न होता लोक आपल्या जातीचाच इतिहास कुरवाळत बसले आहेत.

    ReplyDelete
  2. I m maratha... But totally agree with u....Ruturaj deshmukh- 96 Kuli maratha.

    ReplyDelete
  3. शिवराय हे गवळी जातीचे होते हे रा. चि. ढेरे यांनी सप्रमाण सिद्ध केले असल्याचे कॉ. शरद पाटील सांगतात. माहाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठा अशी व्याख्या तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी केली. ''96 कुळी मराठा व मराठा गण राज्य'' हे माझे संशोधनपर पुस्तक लिहून तयार असले तरी प्रकाशकाअभावी पडून आहे.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...