Sunday, August 12, 2012

सुतारांचा इतिहास


मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे लाकडी युग इसवी सनपुर्व दहा हजार वर्षांच्या आसपास अवतरले असा संशोधकांचा कयास आहे. गुहेत राहणारा मानव जेंव्हा जलाशयांजवळ रहायला येवू लागला तेंव्हा त्याला कृत्रीम निवा-यांची गरज भासु लागली. याच कळात त्याला प्राथमिक शेतीचेही ज्ञान झाले होते. सुरुवातीला त्याने निवा-यासाठी चामड्याचा वापर केला खरा, पण त्यात कायमस्वरुपी टिकावूपणा नव्हता. याच काळात लाकडाचा उपयोग करता येवू शकतो हे त्याच्या लक्षात येवू लागले. हातकु-हाडीसाठी तासलेले लाकडी दांडे वापरायची सुरुवात म्हणजे काष्ठयुगाची सुरुवात मानली जाते. आता तेच लाकुड कृत्रीम निवा-यांसाठी तो वापरु लागला. नेवासे व बुर्झाहोम येथे असे प्राथमिक निवारे मिळाले आहेत.

यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे चाकाचा. संपुर्ण मानवी जीवनात क्रांती घडवणारी ही घटना म्हणुन इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे. पहिले चाक नेमके कोठे शोधले गेले हे सांगता येत नसले तरी जगभर समांतर काळी चाकाचा शोध लावला गेला असावा. भारतीय चाके मात्र जगाच्या पुढचे पाउल होते...ते म्हणजे आरी असलेली चाके. चाकांतुनच आद्य बैलगाड्यांचा जन्म झाला. यामुळे कुंभकारांना मातीपासुन सुबक घट व अन्य उपयोगी वस्तु बनवता येवू लागल्या. आज जगाचा पुरातन इतिहास समजतो त्यात याच पुरातन मृत्तिकाभांड्यांचा मोठा हात आहे. थोडक्यात आजच्या अनेक जातींचा इतिहास हा हातात हात घालुन चालत आलेला आपल्याला दिसतो तो या परस्पर साहचर्यामुळे व सतत नवीन शोध घेण्याची प्रेरणा असल्यामुळे.

सिंधु संस्कृतीत भारतातील सुतारकामाने कळस गाठला. घराचे व नगरद्वाराचे दरवाजे लाकडापासुन बनवले जावू लागले. बैलगाड्या बनु लागल्या. आजही भारतात सिंधु काळी बनत तशाच बैलगाड्या बनवल्या जातात. नांगरणीसाठी लाकडाचे नांगर बनु लागले. समुद्रप्रवासासाठी नौका बनु लागल्या. भारतीय व्यापार भरभराटीला येवू लागला. पुढे आला वैदिक काळ. या काळातील सुतारकामाची बरीच वर्णणे मिळतात. वैदिक लोक सुताराला त्वष्टा, ऋभु तर कधी विश्वकर्मा संबोधतांना दिसतात. ऋग्वेदकाळात सुताराचा व्यवसाय अत्यंत भरभराटीला आला असल्याचे दिसते. हे काम कष्टाचे व कुशल कारागिरीचे आहे असेही उल्लेख ऋग्वेदात आहेत. बैलगाडी ते रथ ही प्रगती याच काळात झाली. लाकडापासुन अनेक गृहोपयोगी पात्रे व पेलेही बनु लागले. ऋग्वेदात उल्लेखलेले पणी हे असुर सुतारकामात अत्यंत कुशल असुन त्यांना त्वष्ट्याची संतती म्हटले आहे. बुबु नांवाचा धनाढ्य पणी हा नौका बांधण्यचा उद्योग करत असे असेही ऋग्वेदावरुन दिसते. घरांसाठी दारे, खिडक्या, खांब कसे बनवावेत यांची शास्त्रीय माहिती अथर्ववेदातील शालासव सुक्तात मिळते. म्हणजे तोवर सुतारकामाला शास्त्रीय दर्जा मिळाला होता. पुढे भृगुसंहितेत व वराहमिहिराच्या बृहत्संहितेत कोणत्या वृक्षाची लाकडे कोणत्या काष्ठकामासाठी वापरावीत यावर विस्तृतपणे विवेचन केले गेले.

कोणत्या प्रकारच्या साधनासाठी नेमके कोणते व किती जुन लाकुड वापरावे हे मनुष्य निरंतर प्रयोगांतुन शिकत गेला. लाकडी वास्तु व तटबंद्या याची रेलचेल आपल्याला इसपु चवथ्या शतकापासुन दिसु लागते. चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र या राजधानीच्या लाकडी प्रासादाचे व लाकडी तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत. या तटबंदीला चौसष्ट दरवाजे आणि पाचशे सत्तर बुरुज होते असे मेगास्थानीस या ग्रीक वकीलाने लिहुन ठेवले आहे. अशा प्रकारचे असंख्य लाकडी वास्तुंचे उल्लेख आपल्याला तत्कालीन साहित्यात मिळतात. बौद्ध जातककथेनुसार खास सुतारांचीच वस्ती असलेल्या अनेक गांवांची उदाहरणे येतात. यावरुन हा व्यवसाय केवढा भरभराटीला आला असेल याची कल्पना येते.

प्राचीन काळी मंदिरे ही लाकडांपासुन बनवली जात असत. एवढेच नव्हे तर देवमुर्त्याही लाकडाच्याच असत. भारताचा मानबिंदु असलेले सोमनाथाचे मंदिर कुमारपालाने जीर्णोद्धार करण्यापुर्वी (इस. नववे शतक) चंदनी लाकडाचे होते हेही लक्षात ठेवायला हवे. मौर्यकालात बव्हंशी मंदिरे लाकडीच होती व अनेक मंदिरांचे अवशेषही सापडलेले आहेत. (बैराट या राजस्थानातील गांवात असे एक भव्य मंदिर सापडले आहे.) नंतर दीर्घकाळ टिकावीत म्हणुन दगडी मंदिरे व प्रासाद बांधायला सुरुवात झाल्याने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही. लाकडाने शस्त्रास्त्रे ते दैनंदिन जीवन व्यापुन टाकले.

सुतार हा शब्द सुत्रधार या शब्दावरुन बनला अशी व्युत्पत्ती दिली जाते. ही व्युत्पत्ती ठीक वाटते. कारण लाकडावर काम करत असतांना सुत्राने (सुताने) मापे घेत खुणा कराव्या लागत असत. मग ओबडधोबड अशा लाकडापासुन कलाकृती जन्म घेत. भारतातील अनेक प्राचीन काष्टशिल्पे कलेचे अजोड नमुने मानले जातात.  

पण काष्ठपुराण येथेच संपत नाही. लाकडापासुनचे पहिले यंत्र, ते म्हणजे हातमाग व चरखे सुतारांनीच वीणकरांच्या सहाय्याने विकसीत केले. त्यामुळे वस्त्रोद्ध्योगात एक अभुतपुर्व क्रांती झाली. भारत हा जगाला वस्त्रे निर्यात करणारा श्रेष्ठ देश बनला. अत्यंत गुंतागुंतीची संरचना असनारे माग बनवणे ही एकार्थाने, प्राथमिक का असेना, भारतीय औद्योगिक क्रांतीच होती असे म्हटले तरी वावगे ठरु नये.

सुतारकामाच्या व्यवसायात प्राचीन काळी कोणीही कुशल कारागिर प्रवेशु शकत होता. किंबहुना त्यामुळेच सुतारकामाची विविधांगी प्रगतीही झाली. सुतारकामात विविध कलासंप्रदायही त्याचमुळे निर्माण झाले. यात काश्मिरी, बंगाली, उडिया, माहराष्ट्री, केरळी अशा विविध शैल्या बनत गेल्या. सुतारकामात अनेक वंशीय प्रवेशले व त्यांच्या पुढे पोटजाती बनत गेल्या. मुळात सुतार ही जात नव्हती. सुतारकाम हे अत्यंत कौशल्याचे काम होते. त्यात कष्टही होतेच. पण प्रचंड मागणीमुळे अनेक लोक त्या व्यवसायात पडत राहिले. भारताच्या विविध भागांत सुतारांना वेगवेगळी नांवे आहेत. सुत्रधार, सुत्तार, सोहळे, मिस्त्री, बाडिग, बढई, थवी ही काही नांवे होत. सुतारांत अहीर, गुजर, पांचाळ, मेवाड, पंचोली, कोकणी इ. पोटभेद आहेत ते स्थानांमुळे व वंशामुळेही पडलेले आहेत. पुरातन काळी रथकार अशी सुतारांची एक स्वतंत्र जात होती...पण पुढे रथ उपयोगातुन गेल्यामुळे ही पोटजात अन्य पोटजातींत मिसळुन गेल्याचेही दिसते.

एक जात म्हणुन सुतार ज्ञातीचा उगम दहाव्या शतकानंतर होवू लागला. कोणताही व्यवसाय वंशपरंपरागत बनु लागला कि असे होणे स्वाभाविक असते. सुतारांना जरी त्वष्टा वा विश्वकर्म्याचे वंशज मानले गेले असले तरी वैदिक व्यवस्थेने त्यांना शुद्र वर्णात ढकलले. हाही समाज बव्हंशी शैव असून चामुंडा, महामाया, वेराई इ. त्यांच्या कुलदेवता आहेत. काही सुतार स्वामीनारायण पंथातही गेले आहेत. गुजरात व कर्नाटकातील सुतार ब्राह्मणी पद्धतीने मुंजही करुन घेतात. अनेकदा स्वत:च पौरोहित्यही करतात. महाराष्ट्रातील देशी सुतारही अलीकडे ब्राह्मणांसारखी गोत्रे लावू लागले आहेत. लग्नापुर्वी ते मुलाची मुंजही करुन घेतात.

असे असले तरी महाराष्ट्रातील सुतारांचे अहीर व कुणबी यांच्याशी वांशिक साधर्म्य आहे. यावरुन एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यामुळे निर्माण झालेली ही एक जात आहे असे म्हणता येते.

अलीकडे हा व्यवसाय फर्निचर व लाकडी शिल्पे/मुर्ती यांपुरता मर्यादित झाला असुन महाराष्ट्रात राजस्थानी सुतारांचीच चलती आहे. रेडीमेड फर्निचरमुळे पारंपारिक उद्योगावर कुर्हाड कोसळलेली आहे. परंपरागत बैलगाड्या, नांगर, लाकडी चाके...पार अदृष्य होवू लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. या समाजाने आता नव्या दिशा धुंडाळायला सुरुवात केली असुन परंपरेच्या जोखडातुन मुक्त होण्याचा ध्यास बाळगला आहे. अडचण आहे ती या समाजात ऐक्याचा अभाव आहे. त्यामुळेच कि काय राजकीय प्रतिनिधित्वापासुन हा समाज वंचित राहिलेला आहे. पोटजातींत वाटुन राहिल्यामुळे कसलाही समाजाला फायदा न होणारे पोटजातीय सवते सुभे निर्माण झालेले आहेत. एक दिवस त्यांचे ऐक्य घडुन येईल व त्यांचे पुरातन वैभव आधुनिक परिप्रेक्षात परत मिळेल अशी आशा आहे.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

13 comments:

  1. Sutar samajacha gouravshali itihas pudhe aanlyabaddal dhanywad..

    ReplyDelete
  2. संतोष :
    माझे सुधा माझ्या पांचाल सुतार जातीवर संशोधन चालू आहे ,माहिती मिळताच नक्की देईन .. तुमचा नंबर द्या इथे ...

    ReplyDelete
    Replies
    1. मला ही आवडेल. 9822026969

      Delete
    2. माहिती वाचून मनाला खुप आंनद झाला .👏👏

      Delete
  3. सुतार समाज हा पांचाळ समाजाचा एक भाग अलीकडच्या काळात मानला जाऊ लागला आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातील सुतार समाजाचा अभ्यास केल्यास असे दिसुन येते की याठिकाणी लिंगायत व खतावनी असे सुतार समाजाचे दोन पंथ आहेत. लिंगायत म्हणजे शाकाहारी विठ्ठल वारी व पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती करणारे,आश्चर्याची गोष्ट अशी की सांगली सातारा कोल्हापूर भागातील प्रत्येक गावातील सुतार समाजात परंपरागत भजनी विशेषतः मृंदग व तबला वादनाची कुंटुबे आहेत. या कुंटुबियाची गावागावात एक संस्कृती निर्माण झाली आहे. परिसरातील जोतिबा डोंगर,खंडोबा, ही या कुळांची कुलदैवते आहेत येडूरचा वीरभद्र कुळस्वामी असणारी सुतार कुंटुबिय अतिशय कठिण नियम असणारे आहेत ते शस्त्र पुजन करतात या कुटुंबियांना परपंरागत शस्त्र चालवायला शिकवले जाते.हे हरी लिंगायत असुन ब्राह्मणांप्रमाने सर्व विधी करतात.
    खतावनी समाजामध्ये मांसाहार केला जातो वा निषिद्ध मानले जात नाही.
    कर्नाटकातील शिरसिंगी हे सुतार समाजाचे पवित्र ठिकाण मानले जाते व चैञ अमावस्येला सर्व सुतार बांधव दर्शनासाठी जात असतात..
    आज सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाचे हे संस्कार सगळीकडे सारखेच पहावयास मिळतात.
    सातारा जिल्ह्यातील दिक्षित क्षीरसागर हे आडनावे पहायला मिळतात. तर कोल्हापूर भागात महामुनी वेदपाठक या आडनावाची समाज आहे. कर्नाटकात बडिगेर आडनाव असणारा समाज आहे बडिगेर म्हणजे कानडी सुतार.
    काही गावात सुतार समाजाला पाटीलकीचा मान आहे आजही बर्‍याच गावात पाटील पांचाळ असा उल्लेख केला जातो.
    पर्यावरण हानी जंगलतोड समस्या पर्यायी लोखंड यामुळे समाज आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. परपंरागत व्यवसाय,कमी शिक्षण, अशिक्षित पार्श्वभूमी, शेतीकामाचा अनुनभव, अत्यल्प भूक्षेञ,व्यसन,समाजाची गळचेपी भावना,या दृष्टचक्रात अडकलेला समाज आजमितीस एकञ येऊन,व्यवसायाच्या आगळ्या संधी, सुशिक्षित समाज,संघटन भावना,व्यसनमुक्ती, जंगम मालमत्ता, एकञीकरण विकास या गोष्टींना महत्त्व देऊन समाज विकास घडवने गरजेचे आहे.

    श्री. ज्ञानदेव हणमंत सुतार.
    मु.पो.भडकंबे.
    ता. वाळवा, जि.सांगली.
    पिन कोड 416302.
    मोबाईल क्रमाक्र 7385400228,8007921434.
    ईमेल dhs97131011@gmail.com


    धन्यवाद. ..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान माहिती दिलीत

      Delete
  4. साहेब,खुप छान माहीती मिळाली. 9822026969- सनिल सुतार.

    ReplyDelete
  5. खूप चांगली माहिती कळली तुमच्या मुले .......आणि कॅमेन्ट मध्ये ज्ञानदेव सुतार यांनी त्यांचे विचार खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहेत

    ReplyDelete
  6. सुतार समाज यांची कुलदैवत सांगा

    ReplyDelete
  7. पांचाळ समाज हा मुळातच ब्राम्हण समाजात येतो.पांचाळ समाजाचा उल्लेख वेदात आढळून येतो.पांचाळ समाजाला विश्वाब्राम्हण हा शब्द वापरलेला आहे. पांचाळ समाजात पाच उपजाती आहेत. पांचाळ लोहार, पांचाळ सुतार, पांचाळ सोनार, पांचाळ पाथरवट, पांचाळ तांबटकार. पांचाळ लोहार ,तांबटकार व पाथरवट हे महाराष्ट्रात कमी आढळून येतात.इतर पाथरवट,लोहार आढळून येतील पर त्यांचा पांचाळाशी काहीही संबंध नाही. ब्राम्हणोत्पति मार्कंडेय हा ग्रंथ एका कट्टर ब्राम्हणाने लिहीला आहे.त्या ग्रंथात पांचाळ ब्राम्हणोत्पति प्रकरण आहे,ते वाचावे. पांचाळ विश्वाब्राम्हण समाजात पाच ऋषी गोत्र आहेत. सानग, सनातन, अहभुत, प्रत्न व सुपर्ण हे गोत्र आहेत.तसेच पाच अडनाव आहेत.दिक्षित, महामुनी,पंडीत, धर्माधिकारी,वेदपाठक हे अडनाव आहेत.पांचाळ समाजाचे महान लेखक व पंडीत बाळशास्त्री क्षीरसागर यांनी पांचाळ विश्वाब्राम्हण समाजावर एक पुस्तक लिहीलेल आहे.त्या पुस्तकात पांचाल समाजाचा पुर्ण उल्लेख आहे. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून सांगू शकतो की पांचाल समाज हा ब्राह्मण समाज आहे. पांचाल समाजात लग्नाआधी बटुंची मुंज होते.पांचाल समाजाचे वारकरी संप्रदाय मध्ये सर्वात जास्त योगदान आहे.मी काही तुम्हाला पांचाल समाज जन्मलेल्या संताची नावे सांगतो. 1)गोविंदप्रभू (गुंडमदेव)राऊळ,2) महर्षी चांगदेव, 3)भोजलिंग महाराज,4)नरहरी सोनार,5)विसोबा खेचर शास्त्री,6)तुका ब्रह्मानंद,7)जळोजी महाराज,8)मळोजी महाराज,9)जगद्गुरू मौनेश्वर, 10)वीर ब्रम्हेंद्र स्वामी,11)जैयमल दास अशी अनेक महान संत पांचाळ समाजात जन्मली.पांचाळ समाजातील उपजाती आपापसात विवाह करतात.

    ReplyDelete
    Replies
    1. पांचाळ म्हणजे पाच समाज त्यामध्ये पांचाळ सुतार , पांचाळ सोनार , पांचाळ लोहार ,त्वष्टा,शिल्पकार यामध्ये सोनार स्वतःला दैवज्ञ ब्राम्हण समजतात तर सुतार मय ब्राम्हण समजतात पण हे ब्राम्हण मध्ये येत नाहीत. यावरून देवज्ञ सोनार आणि पेशवे यांच्यात चांगला संघर्ष झाला आहे इतिहासात, वैदिक व्यवस्थेने यांना योग्य स्थान दिले नाही.पांचाळ सुतार आणि सोनार यांच्यात कर्नाटक मध्ये विवाह होतात महाराष्ट्रात हे प्रमाण कमी आहे.

      Delete
  8. अतिशय सुंदर लेख आहे.

    ReplyDelete

“पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

          भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्...