Wednesday, November 7, 2012

एक जग:एक राष्ट्र (१)




व्यवस्थांचा धावता इतिहास...

मानवी इतिहासात पार मागे डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येते की जगभरच्या मानवी समाजांत असंख्य स्थित्यंतरे झालेली आहेत. अनेक नव्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत व त्या कालौघात कोलमडुन नव्या व्यवस्था अवतरल्या आहेत. सध्याचे मानववंशशास्त्र सांगते कि मनुष्य हा प्रथम आफ्रिका खंडात अवतरला व तेथुन तो सर्वत्र पसरला. आज तरी हा सिद्धांत मान्य असल्याने तो गृहित धरुयात. अधिक पुरातन काळी सर्वच खंड एकत्र जोडले गेले असल्याने अथवा हिमयुगात गोठलेल्या समुद्रपृष्ठावरुन चालत जाणे सहज शक्य असल्याने मानवी वितरण सर्वत्र झाले असावे असे अंदाज आहेत. मनुष्य सर्वत्र पसरला हे वास्तव मान्य करून पुढे जावूयात.

पुरातन मनुष्य ही भटकंती का करत होता? उत्तर सोपे आहे. अर्थातच अन्नाच्या शोधासाठी. आदिमानव हा प्रामुख्याने अन्नसंकलक मानव होता. अन्नासाठी एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात जाणे आवश्यक होते. तो टोळीमानव होता. सर्वच मानवी समाज टोळ्यांत विभक्त झालेला होता. पुढे तो शिकारी मानव बनला. त्यानंतर त्याला पशुपालनाचा शोध लागला आणि पशुपालक मानव भूतलावर अस्तित्वात आला. सर्वच टोळ्या पशुपालक वा शिकारी बनल्या असे नव्हे. काही अन्नसंकलकच राहिल्या तर काही शिकार हेच मुख्य उपजीविकेचे साधन मानत राहिले. त्यासाठी भटकणे भाग होते. सध्याच्या अरण्यतील शिकार संपली कि दुस-या अरण्याच्या शोधात भटकणे सुरुच होते. या काळात विशिष्ट भुमीबद्दलची ओढ अथवा मालकीहक्काची संकल्पना निर्माण होणे शक्य नव्हते. जेथे मुबलक अन्न उपलब्ध आहे त्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यापुरते मानवी टोळ्यांत संघर्षही होत. या संघर्षात जो हरेल त्याला गुलाम करणे अथवा हुसकुन लावणे आणी पराजिताच्या स्त्रीयांना मात्र ताब्यात घेणे हे सर्रास प्रकार होत असत.

त्याहीपुढच्या टप्प्यात त्याला शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध ही मानवी इतिहासातील सर्वात महत्वाची क्रांती मानली जाते. या क्रांतीने मानवी व्यवस्था व मानसिकता बदलवायला फार मोठा हातभार लावला. अर्थात सुरुवातीची शेती ही तात्पुरती व भटक्या स्वरुपाची होती. नंतर मात्र मनुष्य जलाशये, नद्या, ओढे असलेल्या व सुपीक जमीनींच्या क्षेत्रांत स्थिर होवू लागला. स्थिर झाल्याने त्याला निवा-यांची आवश्यकता भासली तसेच शेतीसाठी उपयुक्त उपकरणांच्या शोधांचीही. मानसाने आपली कल्पकता व बुद्धीमत्ता पणाला लावत लाकुड, दगड, चर्म, तांबे ते लोह ई. नैसर्गिक संसाधनांना आपल्या उपयुक्ततेत बदलवले.

या स्थिरतेमुळे भुमीवरील मालकीची संकल्पना विकसीत झाली. परंतु कोणती जमीन कोणाची व का हे ठरवण्यासाठीचे कसलेही नियम आरंभी नव्हते. त्यामुळे त्यात व्यवस्था आणने भाग होते. यातुनच आरंभिक गणसत्ता अस्तित्वात आल्या. टोळीसत्ता ते गणसत्ता हा प्रवास मानवाने केला तो त्याच्या तातडीच्या निकडीपोटी. त्यामुळे आपले जीवित, वित्त, भुमी आणि स्त्रीया याच्या रक्षणाची हमी त्याला मिळनार होती. ही सुरक्षा दोन पातळीवरची...स्वगणांतर्गतची आणि गणबाह्यही...होती. अर्थत हे गण टोळ्यांतुनच निर्माण झाले असल्याने अल्पसंख्य असत. स्थिरतेचा एक तोटा म्हनजे लोकसंख्येची वाढ. त्यामुळे अधिकाधिक उपजाऊ भुमीची गरज भासणे स्वाभाविक होते. त्यातून गणांत युद्धे होत असत व गणांतील सर्वच लढु शकणारे लोक युद्धांत भाग घेत असत. या युद्धांत अनेक गण नष्टही होत वा गुलाम बनवले जात. बौद्ध जातकांत दास हा एक वर्ग आहे. तो पराजित गणांतील गुलाम केला गेलेला वर्ग होय. जगभर अशी स्थिती निर्माण झाली. ग्रीकांनी जी नगरराज्ये बनवली ती एकार्थाने (सर्वस्वी जशीच्या तशी नसली तरी) गणराज्येच होती. गणांना आपापल्या गणांचा केवढा अभिमान असे हे आपण पुन्हा बौद्ध जातकांत पाहू शकतो. शाक्य गण हा सर्वात श्रेष्ठ आहे अशी शाक्य गणाची धारणा होती. सिंधु संस्कृतीही ग्रीकांप्रमाणेच नगरराज्यांची बनली असावी असा अदमास काढता येतो. अर्थात त्यासाठी सबळ पुरावा नाही.

गणराज्ये अथवा नगरराज्यांतुनच पुढे राजा व राज्य ही संकल्पना माणसाने विकसीत केली. निवडक ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याने कारभार करणारा राजा हा ईश्वराचे प्रतीक बनून सत्ताधारी बनवला गेला ते कारभाराच्या सुलभतेसाठी. गणराज्यव्यवस्था निर्णयप्रक्रियेत अडचणीची ठरु लागणे व अतिरिक्त महत्वाकांक्षा यातुन राजव्यवस्था आकाराला आली असे ढोबळमानाने म्हणता येते. ही एकार्थाने अल्पनियंत्रीत एकव्यक्तिकेंद्रीत व्यवस्था असते. राजा ही सर्वोच्च व्यक्ती असते. मुलकी अधिकारी, सैनिक व सैनिकी अधिकारी त्यांच्या मार्फत तो सत्ता गाजवत असतो. निर्णयप्रक्रियाही वेगवान असते. अधिकचे प्रदेश जोडुन घेण्यासाठीची आक्रमकता हा राज्यांचा मुलभूत हेतू असतो. गनराज्यव्यवस्था हळुहळु संपत गेली आणि राजेशाहीने त्याची जगभर जागा घेतली. (अपवाद आहेत. जगात आफ्रिका, आशिया ते अमेरिका खंडात अद्यापही टोळीव्यवस्थाच प्राधान्याने होती.)

राजेशाही नेहमीच उन्मुक्त महत्वाकांक्षेला जन्म देते. आक्रमकता ही साम्राज्यवादात बदलते. राजेशाही व्यवस्थेकडुन साम्राज्यवादाकडे जगानेही प्रवास केला. भारतात नंद घराण्याने साम्राज्यवादाचा पाया घातला. बिंबीसाराने प्रथम साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली. (इसपु. ४९९). पुढे नंद, चंद्रगुप्त मौर्य, अशोक, सातवाहनादि राजांनी साम्राज्ये स्थापन केली. एकार्थाने साम्राज्य या संकल्पनेचा विकास भारतातच आधी झालेला दिसतो. चीनमद्धे पहिला सम्राट क्विन शि ह्युंगाई झाला तो सनपुर्व २२१ मद्धे. यानंतर ज्याला आपण जागतीक परिप्रेक्षातील साम्राज्यवादाची सुरुवात प्रथम अलेक्झांडर द ग्रेटने सुरु केल्याचे पाहतो. संपुर्ण जग जिंकुन ग्रीकांच्या अंमलाखाली आनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. पुढे साम्राज्यवादाची धुरा लोकशाहीवादी रोममधील ज्युलियस सीझरने उचलली. परंतु तो हयातीत सम्राट बनू शकला नाही. (मृत्यु-इसपु ४४) परंतु खरे साम्राज्य काय असते हे जगाला दाखवून दिले, व संपुर्ण पृथ्वी नसली तरी जगातील एकमेव अवाढव्य साम्राज्य बनण्याचा रोमनांनी सन्मान पटकावला. उत्तर आफ्रिका, युरोपचा बराच भाग, मध्यपुर्व ते आशिया खंडाचाही बराचसा भाग रोमनांनी अंकित केला. हे साम्राज्य प्रदीर्घकाळ (चार शतके) टिकले पण त्याचा
अंतर्गत ओझ्यानेच पुढे अंतही झाला. या साम्राज्याच्या अंताची विविध कारणे आहेत, परंतू आपण पुढे चर्चेच्या ओघात त्याबद्दल बोलुयात.

जगात पुढेही अनेक भागांत अनेक साम्राज्ये निर्माण होत गेली. खलिफात अथवा इस्लामी साम्राज्ये सातव्या शतकापासून जगभर सत्ता स्थापन करण्यासाठी स्पर्धेत उतरली. तेराव्या शतकात भारतातही इस्लामी साम्राज्य स्थापन झाले. सोळाव्या शतकापासून इंग्रज, फ्रेंच, स्प्यनिश व डचही साम्राज्यस्थापनेच्या कामाला लागले. सर्वाधिक यश अर्थातच इंग्रजांना मिळाले. जवळपास विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्रजांनी जगाच्या बहुतांश भागावर राज्य केले.

हिटलरही संपुर्ण जगावर नाझी (थर्ड राईश) साम्राज्य गाजवण्याच्या महत्वाकांक्षेने झपाटलेला होता. पण विसाव्या शतकात सर्वांचीच साम्राज्ये मिटली व एक नवी जागतीक व्यवस्था आकार घेवू लागली.

टोळीव्यवस्थेतुन गणराज्य व्यवस्था अथवा नगरराज्य व्यवस्था, त्यातुन राजेशाही व नंतर साम्राज्यशाही असा प्रवास जगाने केला. या प्रदिर्घ काळात कोणत्याही गणाची, राज्याची, अथवा साम्राज्यांची सीमा सुनिश्चित अशी नव्हती. त्यांत वारंवार बदल घडणे अपरिहार्य होते. मानवी भावना या आपला प्रदेश, भाषा, संस्कृती व धर्माशीच अधिक घट्ट राहिलेल्या आपल्याला दिसतात. पण त्यातही एकवाक्यता होती असे म्हनता येणार नाही. म्हणजे धर्मांतरे मोठ्या प्रमाणावर झाल्याने धर्म हाच सर्वांना जोडनारा एक समान धागा सर्वांसाठी होताच असे नाही. धर्मांतरितांना धर्मातील मुळ लोक समानता प्रदान करणे शक्य नव्हते हे आपण भारतातील अशरफ (उच्च) आणि अजलफ (हीण) मुस्लिम अशा वाटणीतुन सहज बघु शकतो.अमूक प्रदेशाची अमुक एक व अविकृत अशी संस्कृती आहे ही भावना असली तरी तसा दावा कोणत्याही संस्कृतीला करता येणार नाही एवढी सांस्कृतीक सरमिसळ पुरातन काळापासुन व्यवस्था बदलांमुळे व बदललेल्या राज्यव्यवस्थांमुळे झालेली आहे.

टोळीव्यवस्था, गणराज्य/नगरराज्य व्यवस्था व साम्राज्यव्यवस्था हा प्रवास जवळपास प्रत्येक आधीच्या व्यवस्थेच्या नाशातुन घडत गेला. त्यामुळे नवीन अभिनव व्यवस्था निर्माण होणे स्वाभाविकच होते व तशी ती झालीही. तिला आपण आज "राष्ट्र" व्यवस्था म्हणतो. याचा अर्थ राष्ट्र (नेशन) ही संकल्पना आधी उदयाला आली नव्हती असे नाही. चवदाव्या शतकात समान भाषा बोलणारे, एकाच समान कायद्यांतर्गत येणारे म्हणजे नेशन अशी व्याख्या करत प्यरिस विद्यापीठात विद्यार्थ्यांची "नेशन" म्हणुन विभागणी करण्यात आली. आधुनिक अर्थाच्या "राष्ट्र" या संकल्पनेचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीमुळे झाला. विसाव्या शतकापर्यंत ही संकल्पना जगभर स्वीकारली गेली.

असे असले तरी राष्ट्र म्हणजे नेमके काय? राष्ट्राची निर्मिती नेमकी कशी होते? नेमक्या कोणत्या मुलतत्वांनी मिळुन राष्ट्र बनते? इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा, वंश, प्रादेशिकता व सामाजिक तत्वज्ञानाचा त्यात नेमका कसा प्रभाव असतो? असे अनेक प्रश्न राष्ट्र व राष्ट्रभावना या संकल्पनेशी जोडले गेले आहेत व त्यावर एकोणिसाव्या शतकातील अर्न्स्ट रेनानपासून ते कार्ल मार्क्सनेही सैद्धांतिक उपपत्त्या मांडल्या आहेत. त्यावर आपण पुढील भागात चर्चा करुयात.  

3 comments:

  1. संजय,
    विषय पुढे वाढवताना खालील बाबींचा संदर्भ वजा खुलासा आपण द्यावा असे सुचवावेसे वाटते
    १: राष्ट्र हि संकल्पना रुजताना समाज हा भाषेमुळे सुद्धा कसा एकजीव झालेला असतो आणि भाषेचे समाज एकरूप करण्यातले ,
    त्याला एक स्वतंत्र अस्तित्व देण्यामध्ये काय स्थान असते ते सांगाल का ?
    २ : धर्म अन देश यांचे काय नाते आहे ? एकाच देशात अनेक धर्म नांदणे हे प्रगतीचे लक्षण मानायचे का?
    सुसंस्कृतपणाचे द्योतक मानायचे का ? मग अनेक देश पण धर्म एक हे कशामुळे ?भौगोलिक - प्रादेशिक अस्मितेमुळे ?
    ३ :पाकिस्तानचा द्वी राष्ट्र वाद आणि धर्म एक असतानाही पूर्व पाकिस्तानने स्वतंत्र " बांगला देश " ची निर्मिती करणे यात नेमकी कुठली अस्मिता भारी ठरली ?
    ४ : स्वतंत्र बंगला संस्कृती मुले पश्चिम बंगाल सहित महाबंगला देश कल्पना किंवा त्याच तत्वावर "महापंजाब देश "-पाकिस्तानी आणि इंडियन पंजाब एकत्र धरून -
    असा विचार का रुजत नाही .-म्हणजेच भाषिक मूल्यापेक्षा धार्मिक मुल्ये देश बांधणीत श्रेष्ठ ठरतात का ?

    ReplyDelete
    Replies
    1. फार चांगले प्रश्न आहेत आगाशेजी. पुढील भागांत मी त्यांची उत्तरे शोधण्यचा व देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.

      Delete
  2. उत्कर्ष होत गेला तसा मानवी समाज बांधणी करू लागला भारतीय खनडात क्रुतु नियमाने संस्कृती विकसित होऊन स्थिरता आली जीवनशैली विकसित झाली त्यातून नियम व आचरण शैली तयार झाली अनुभवातून वैद्यकीय व नैसर्गिक गोष्टी समजून शहरे वसली व स्थायिक झाले त्यातून जो कामकरतो त्यातून वर्ण व्यवस्था तयार झाली त्यात ते सुखी होते प्रत्येक कला गुणांना वाव होता मोनोपॉली होती त्यातून त्या कलेत तरबेज झाली पण ज्या टोळ्यांनी कधी कामच केलं नाही ते शूद्र का म्हणू नये

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...