Thursday, November 8, 2012

एक जग:एक राष्ट्र (२)


राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे.....?

स्वातंत्र्य:समता:बंधुता या महनीय तत्वांची देणगी जगाला दिली ती फ्रेंचांनी. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीची व प्रबोधनकाळाचीही पार्श्वभुमी होती. धर्मसत्ता आणि राजसत्तांतील युती व संघर्षही जगाने या काळात पाहिले. पोपने धर्मसत्ताच सर्वोपरी असून पोपचे आदेश न मानल्यास राजांनाही धर्मातुन काढुन टाकण्याचा अधिकार आहे असे दावे सुरु केले आणि संघर्ष सुरू झाला. त्यात पोपच्या पदासाठीच धर्मांतर्गत संघर्ष सुरु झाल्याने पोपही कमकुवत बनला याचा फायदा युरोपियन राज्यकर्त्यांने उचलला. याच काळात सरंजामदारांचेही वर्चस्व जवळपास जगभर वाढल्याचे आपल्याला दिसते. सरंजामदारांशिवाय राज्यही करता येत नाही पण त्यांचे वर्चस्वही हटवता येत नाही अशा पेचात तत्कालीन राज्यव्यवस्था सापडल्याचे आपल्याला दिसते. सरंजामशाहीमुळे राज्यसत्ता दुर्बळ ठरु लागल्याने औद्योगिकरण व व्यापार यामुळे धनाढ्य बनलेल्या वर्गाला प्रबळ राज्यसत्तेची गरज भासू लागली होती. सरंजामशाहीच्या तसेच अनियंत्रित राजेशाहीच्या तत्वांनाही छेद देईल असे नवे तत्व या वर्गाला हवे होते.

अशा वेळीस राष्ट्रवादाचे तत्व पुढे आणले गेले. एक वंश, एक प्रदेश, एक धर्म, समान इतिहास, परंपरा आणि हितसंबंध या मुलतत्वांवर प्राथमिक राष्ट्रवाद अस्तित्वात आला. मध्ययुगाच्या अखेरीस युरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वरील तत्वांना सुसंगत ठरेल अशी परिस्थितीही होती. प्रादेशिक निष्ठा महत्वाच्या बनल्यामुळे मातृभुमी...पितृभुमी या उदात्त दृष्टीने आपल्या भौगोलिक प्रदेशाकडे पाहिले जावू लागले. यातुन समाजाचे अंतरंग व बहिरंगही बदलू लागले. त्यामुळे राष्ट्रवादावर उभारलेली, पण इश्वरदत्त मानली गेलेली राजसत्ता राष्ट्रनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली.

यातुन पुर्वी जी सातत्याने सीमा बदलत असनारी, प्रादेशिक अभिमानाचा विशेष जोर नसणारी व्यवस्था स्थिर होत विशिष्ट भौगोलिक सीमांतर्गतचे आपले भावनिक अधिष्ठाण असनारे राष्ट्र व त्याचा अनिवार अभिमान असा राष्ट्रवाद अस्तित्वात आला. पण सर्वच राष्ट्रे (युरोप) महत्वाकांक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय कलहांचे रुप बदलले. आपापल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संफ़्घर्ष सुरु झाला. त्यासाठी इतर राष्ट्रांचे हितसंबंध धोक्यात आले तरी चालतील ही भावना प्रबळ झाली. परस्परांत युद्धे वाढु लागली. त्यामुळे राष्ट्रभावनाही प्रबळ होत गेल्या. युद्धात हार झाली कि सामर्थवाढीचे उद्योग व पुन्हा सुडासाठी युद्धे असा क्रमच बनला. सत्ता संपादन, रक्षण आणि प्रादेशिक विस्तार ही राज्यांची प्रमूख वैशिष्ट्ये बनली.

यातुनच प्रजेचाही राज्यव्यवस्थेत वाटा असला पाहिजे या भावनेतून राजसत्तेचे एकहाती नियंत्रण कमी करत लोकशाहीची स्थापना अपरिहार्य वाटु लागली. शासन हे प्रजेचे प्रजेतर्फे चालवले जाणारे असावे कारण राजा नव्हे तर प्रजा सार्वभौम आहे या तत्वाचा प्रभाव वाढत होता. इंग्लंडमद्धे अशा रीतीने लोकशाहीची स्थापना झाली. लोकशाहीसोबतच राज-सत्ता, हुकुमशाही सत्ता, लष्करी सत्ताही काही राष्ट्रांत होत्या वा तशा सत्ता आनण्याचे प्रयत्नही सुरु होते. उदा. नेपोलियनने फ्रांसमद्धे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.

हे सारे होत असले तरी म्हणुन साम्राज्यवाद संपला असे नव्हे. माणसाला मानवी स्वातंत्र्याबद्दल अजून खूप शिकायचे होते. आजही शिकला आहे असे नाही. सम्राटांचा साम्राज्यवाद जावून आता राष्ट्रांचा साम्राज्यवाद सुरु झाला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढणारे उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती तसेच आपल्या देशाला लागणारी स्वस्त साधनसामुग्रीही स्वस्तात व सातत्याने मिळवण्याची गरज होती. त्यातुन वसाहतवाद पुढे झेपावला. आफ्रिका, आशिया, अमेरिकादि खंडांवर यूरोपियनांनी कब्जा मिळवत वसाहतवादी साम्राज्ये स्थापन केली. अमेरिकेने पहिले स्वातंत्र्ययुद्ध छेडुन स्वातंत्र्य मिळवले व एक नवीनच राष्ट्र संकल्पनेचा पाया घातला. त्याबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत त्यामुळे येथे एवढेच.

पहिले महायुद्ध हे वर्चस्ववादाच्या भावनेने गाठलेल्या टोकाचे फळ होते. या युद्द्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वामुळे अनेक छोटे प्रदेश अस्मितेच्या बळावर राष्ट्र म्हणुन उदयाला आले. ही छोटी राष्ट्रे आर्थिक व लश्करी दृष्ट्या कमकुवत असल्याने यूरोपातील अंतर्गत संबंध तणावाचे बनू लागले. यातुन राष्ट्रवाद सौम्य न होता टोकाचा वाढत गेला. जर्मनीत नाझी तर इटलीत फ्यसिस्ट पक्षांची सरकारे केवळ अतिरेकी राष्ट्रवादाच्या परिणती होत्या. त्यात साम्यवादी सत्तांचाही उदय रशियाच्या रुपाने झाला होताच. शासनाची पद्धत कोणतीही अस्ली तरी राष्ट्रवाद हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा मुलभुत गाभा होता. त्यातुनच विनाशक दुसरे महायुद्धही घडले. जगाचा नकाशा बदलला. आजवर जागतीक घडामोडींपासून अलिप्त असनारे "स्वतंत्र जग" अमेरिका या युद्धात पडले व त्यातुनच एक बलाढ्य जागतीक सत्ता
म्हणुन उदयाला आले. या युद्धातुन नवी राष्ट्रे निर्माण झाली. बव्हंशी स्वतंत्र होवून तर इस्राएलसारखी नवनिर्मिती म्हणुन.

हा सिलसिला पुढेही चालु राहिला. साम्यवादी जग विरुद्ध भांडवलशाहीवादी जग असा नवा संघ्र्ष सुरु झाला. त्यातुनहे अनेक राष्ट्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण करत अमेरिका व रशियाने जगाचा नकाशा स्थिर राहु न देण्याचा निर्धार केला. भारतानेही ७१च्या युद्धातुन बांगलादेशाची निर्मिती घडवली. पुढे सोव्हिएट रशियाही कोलमडला व पुन्हा अनेक राष्ट्रे स्वतंत्रपणे जगाच्या नकाशावर आली....

सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याची आकांक्षा असणारे, त्यासाठी संघर्ष करणारे अनेक समाजगट जगात आजही आहेत. तज्ञ म्हनतात त्याप्रमाने प्रत्येक राज्य हे राष्ट्र राज्य आहे असे नाही व त्याशी सहमत व्हावे लागते. लष्करी अथवा पोलिसी बळावर अशी स्वातंत्रे नाकारली जातात. एका अर्थाने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राज्यात समतेचे व स्वातंत्र्याचे मूलतत्व पाळतेच असा दावा करता येत नाही.

या राष्ट्रांच्या इतिहासावरुन स्पष्ट दिसते कि ब-याचशा राष्ट्राची सीमा ती राष्ट्रे म्हणुन स्थापन झाली तेंव्हापासुन तशीच राहिली आहे असे म्हणता येत नाही. भारतानेही राष्ट्र म्हणुन असलेली सीमा स्थापनेपासून दोनदा गमावली आहे. विभाजनवादी संकल्पना बाळगणारे खलिस्तानवादी असोत कि काश्मिर असो...भारतात अस्तित्वात आहेतच. त्यासाठी त्यांचा संघर्षही सुरु आहेच. जगात अनेक ठिकाणी असे घडते आहे व जगाची शांतता अधुन-मधुन ढवळुन निघते आहे. व याचीच परिणती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात अविश्वासाचे व असुरक्षिततेचे वातावरण वाढत आहे...आणि लष्करी शक्ती हरप्रकारे वाढवण्याच्या प्रचंड स्पर्धेत सारीच मानवजात आज पडली आहे. यातून तिसरे महायुद्ध होईल कि काय अशी भिती वारंवार व्यक्त होत असते...ती भिती अनाठायी आहे असे म्हनता येत नाही. याचे कारण म्हणजे गेल्या शतकात धार्मिक मुलतत्ववादाचा उदय आणि त्याच वेळीस बलाढ्य राष्ट्रांचा लष्करी शक्तीमुळे उदयाला आलेला सर्वाधिकारीपणा. मानवी मूल्यांची व्याख्या बलाढ्यांनीच करणे हा पुरातन नियम आजही लागू होतो आहे. आखाती देशांत निर्माण केला गेलेला संघर्ष या वर्चस्वतावादाचीच अनेकांपैकी एक परिणती होती.

अशा स्थितीत आज "राष्ट्र" या संकल्पनेची अपरिहार्यता मुळात आहे काय यावर विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय व तो कोठुन येतो आणि या संकल्पनेची मानव जातीला आज उपयुक्तता आहे काय हेही समजावून घेण्याची आवश्यकता आहे. "राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे..." असे काही विचारवंतांना का वाटते तेही समजावुन घ्यायला हवे.

(क्रमश:)

3 comments:

  1. संजयजी,
    आपले लेख सुंदर आहेत.
    काळाचा इतका मोठा पल्ला इतक्या लहान पाटीवर या एका विषयासाठी अखंडपणे मांडणे फार कठीण काम आहे.
    त्यात गमतीचा भाग म्हणजे हाच विषय भारता पुरता घेतला कि वर्ण आणि जाती यांच्या भोवऱ्यात माणूस अर्धमेला होतो.
    ग्रीकांचा समकालीन चंद्रगुप्त घेतला कि कौटिल्य आला,ब्राह्मणत्व आले - आपल्याकडील नंद साम्राज्य आणि त्यापूर्वीची ग्रामराज्ये,
    राम कृष्ण ऐतिहासिक मानले तर , आणि त्यांच्या वरचे देवत्वाचे पापुद्रे हलकेच काढून आत डोकावून पहिले तर फार मोठे दुवे सापडतील!
    विनाकारण या देवांना फरफटत "आम्ही तुमच्यापेक्षा जुने " म्हणून तुमच्यापेक्षा महान - असे इतरांना सांगायचा हा प्रकार बंद केला पाहिजे !.
    भारत हा शतकानुशतके मुसलमान आक्रमणात पराभवाच्या सावलीत वाढलेला देश असल्यामुळे आणि कुणीही यावे आणि टप्पल मारून जावे
    असे इतिहास सांगत असल्यामुळे -
    आपल्या मनोवृत्तीत ही महानतेची सल कायम जाणवते ! आणि यातूनच असा विचार मनात चमकून जातो कि आपण म्हणता त्याप्रमाणे
    जातपातिचे स्तोम माजण्याचे एक कारण असे असेल का कि बळजबरीने धर्मांतर झाले तरी जात तीच राहावी !
    बाटून मुसलमान झाला तरी तांबोळी हा तांबोळीच राहील-कासार हा कासारच राहील- पराभूत धर्म मार्तंडानी रुजवलेला हा उपाय असेल का की -
    घाबरू नका -तुम्हाला तुमच्या जातीपासून कुणीच तोडू शकत नाही - अगदी त्यांचा अल्लापण !

    कुठलीही व्यवस्था राबविताना काही सामाजिक संकेतही निर्माण होतात -
    फक्त दिवसा लढाई - समोरासमोर - करणे -या गोष्टी राम-कृष्ण-सिकंदर - नेपोलियन अश्या काळात सर्वत्र दिसतात.
    पण कृष्णाला व्याधाने मारले म्हणजे काय ? तर नवीन विचारांचे जे लोक आले
    त्यांनी हे सूर्योदय सूर्यास्ताचे नियम उधळून यादवांवर हल्ले केले.
    येशूने तलवार हातात घेतली नाही पण पैगंबराने घेतली. तो स्वतः काबाचा पुजारी असून आणि तिथले ३६५ देव फोडून त्याने नवीन धर्माची घोषणा केली.
    ग्रीक आणि रोमन देव त्यांच्या बरोबर संपले ! पण नवीन तयार झाले.
    मूर्तीपूजा नाकारणाऱ्या धर्मात सुद्धा पूजा विधींचे प्रस्थ चालूच दिसते.ताबूत,दर्गे या निमित्ताने हे असे दिसते !
    जैन आणि बौद्ध तर बोलायलाच नको !

    राष्ट्र हि कल्पना थोर लोकांनी मांडली त्या वेळेस त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे आसन स्थिर करणे हे एकच ध्येय असेल का
    असा संशय येतो.कारण आपण मांडले आहे त्या प्रमाणे ,
    एक वंश, एक प्रांत , एक भाषा, समान प्रदेश आणि समान परंपरा आणि समान हितसंबंध यामुळेच प्राथमिक राष्ट्रवाद निर्माण झाला हे पटण्या सारखे आहे .
    धर्म तोच पण पंथ वेगळा हि सुद्धा प्रस्थापित धर्मांतील अंतर्गत क्रांतीच म्हणावी लागेल.
    लिंगायत असो कि वारकरी पंथ असो.शीख असोत कि आर्य समाज असो.
    एक प्रकारे पाहिले तर बुद्ध आणि जैन विचार हे पण प्रस्थापित विचारांच्या विरुद्ध झालेल्या वैचारिक घुसमटीतूनच निर्माण झालेले आहेत हे नाकारता येत नाही.
    आश्चर्याचा भाग मात्र असा आहे की कुणाही एका पंथाने व धर्माने असे मांडायचे धारिष्ट दाखवले नाही कि देव हि केवळ कल्पना आहे ! थोतांड आहे !
    अजूनही काही नवीन विचारवंताना पुजारी नकोत - ब्राह्मण नकोत - पण देव हवेत .मराठा,कुणबी, माळी ,धनगर,तेली -सगळ्यांना !
    म्हणजेच अजूनही राष्ट्र या कल्पनेत ईश्वर या संकल्पनेचा हिस्सा फार मोठा आहे.अजूनहि अमेरिका म्हणतेच कि वुई बिलीव्ह इन गौंड !

    ReplyDelete
  2. संजयजी
    याबाबतीत अजून एक सांगावेसे वाटते की ,
    साधारणपणे सार्वजनिक जीवनात एखादी गोष्ट सुरु झाली कि बंद होणे जवळ जवळ अशक्य !
    याचे चांगले उदाहरण आपला सार्वजनिक गणेशोत्सव .मुळ उद्देश पाहिला तर हा उत्सव कधीच कालबाह्य झाला आहे.
    तरीही तो सगळ्या लोकांकडून ,सर्व माध्यमाकडून, राजकीय थरातून,जोपासला जातो आहे.वेगवेगळी नावे देत,अनेक फुसकी कारणे देत तो जिवंत आहे.
    याचे प्रमुख कारण - आजचे सर्व गोष्टींचे व्यापारीकरण ! .
    राष्ट्र ही कल्पना आपल्याला आवडो वा न आवडो , ती जागतिक बाजारीकरणाच्या सोयीसाठी जगवली जाईल.
    कुठलीही बाजारपेठ अशी एक् गठ्ठा मिळणार असेल तर हे नवीन व्यापारीकरणाचे मक्तेदार त्याला खत पाणी घालणारच .
    एखाद्या घटनेच्या गांभीर्या बद्दल किंवा विचारांच्या मूल्यांबाबत त्यांना काहीही सोयर सुतक नाही.
    उपयोग असेल तर ते देश टिकवतील नाहीतर फुटीरतेला सुद्धा खत पाणी घालतील.
    कारण त्यांचे यश मोजण्याचे मापदंड सर्वस्वी वेगळे आहेत.
    धर्म आणि संस्कृती या कल्पना विकल्या जातात तो पर्यंत त्याला महत्व - नाहीतर ती अडगळ !
    दिवाळी -लाडू,कपडे-आकाश कंदील ,दिवाळसण ,भाऊबीज यातील मांगल्याशी त्यांना काहीच घेणेदेणे नसते.
    मदर डे ,टीचर डे ,व्हालेन्तायीन डे ,रोझ डे यांनी बाळसे धरल आहे ते त्यामुळेच !
    मराठी अस्मितेचेही तेच आहे ,फक्त ते आपल्याला कळत नाही इतकेच !
    तिकडे तमिळ अस्मिता , इकडे गुज्जू अस्मिता -पलीकडे पंजाबी -त्या पलीकडे काश्मिरी असा हा खेळ आहे .

    हे अपरिहार्य आहे का ?हे टाळता नाही का येणार ?
    हे अपरिहार्य आहे असे मला वाटते.
    एक प्रकारे ते जागतिक आणि अनंत वाणिज्य सत्य - इटर्नल ट्रुथ -सांगत असतात.
    पूर्वी प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडलेली होती आता ती बिझनेसशी जोडलेली आहे.आता धर्म आयटेम झाला आहे - इवेन्ट !
    त्यामुळे राष्ट्र किंवा राष्ट्रवाद हा उत्स्फुर्ततेचा मुद्दा च नाही आणि त्या बद्दल चर्चा करणेही अनावश्यक आहे .
    सर्व भावनांच्यात भ्रष्टाचार बळावला आहे.असे काही "अण्णा" लोक म्हणतील पण तो स्वप्नाळूपणा ठरेल.
    अनादी काळापासून हे असेच चाललेले आहे फक्त ते इतक्या उघड्या वागड्या स्वरूपात आपल्या समोर येत नव्हते इतकेच !

    ReplyDelete
  3. सोनवणी साहेब, तुमचे ऐतिहासिक कार्य संपले आहे असे देखील काही विचारवंतांना का वाटते तेही समजावून घ्यायला हवे.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...