Sunday, January 20, 2013

एक कवि मौन तोडतो तेंव्हा..."अक्षरमौन"





मराठी कविता कोठे चालली आहे असा प्रश्न विचारला तर "कोठेही नाही" असेच उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे अपवादात्मक कवि आहेत, नाही असे नाही, पण ते लोकांपर्यंत फारसे पोहोचतही नाहीत. बरेचसे लोकप्रिय कवि हे प्रामुख्याने "मैफलीचे कवि" आहेत. हमखास टाळ्या घेणा-या कडव्यांची अथवा ओळींची पेरणी केली कि लोक खूश होतात हे अशा घोटून तयार झालेल्या व "जमलेल्या" कवींना चांगलेच माहित असते. त्यासाठी ते विषययही जाणीवपुर्वक निवडतांना दिसतात. विद्रोही कवि, अनाकलनीय कवि, ग्रामीण जीवन चितारणारे कवि, मध्यमवर्गीय संवेदनांना हमखास कुरवाळुन यशाची शिखरे गाठणारे कवि या भाऊगर्दीत हरवलाय तो जीवनाकडे समग्रतेने पाहत, जीवनविषयक चिंतन करत विचारप्रवण करणारा कवि.

महाराष्ट्रात कवींची कमतरता नाही. कमतरता आहे ती चौकटीबाहेर झेपावणा-या कवींची. आपला विद्रोहही शेळपट असतो आणि प्रेमभावनाही उथळ. ग्रामजीवनाचे आकलनही, ते जीवन जगलेले कवीही, एवढ्या स्टिरिओटाईप पद्धतीने मांडत जातात कि वाचणारा हवालदिलच व्हावा! मध्यमवर्गाचे तर विचारायलाच नको! मुळात हा वर्ग आज एवढा संभ्रमित आणि आकुंचित होत स्वकोषमग्न होत चाललाय कि त्याला झंझोडून जागे करण्याऐवजी त्याच्या जगाला तशा निरुपयोगी संवेदनांनाच कुरवाळण्याचा उद्योग कवि लोक करत राहतात. कवितेपासून लोक का दूर चालले आहेत, लोकप्रिय म्हणवले जाणारे कवीही त्यांच्या अपवादात्मक उत्तम कविता वगळता सहसा नीट का वाचले जात नाही याचा विचार करतील ते कवि कसले?

पण अधून मधून अपवाद येतात व त्यांचे दखल घेत त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. संतोष देशपांडे असेच अपवादात्मक कवि.

मी एकदा लिहिले होते कि "जेंव्हा खूप काही सांगावेसे वाटते तोच क्षण असतो मौनात जायचा." मौन हे असे दाटलेल्या हृदयांचे असते...पण जेंव्हा तेही जडशीळ होते तेंव्हा आपसूक जलभरल्या मेघाप्रमाणे शब्दांतुन झरू लागते...आणि त्यातून निर्माण होते "अक्षरमौन". संतोष देशपांडे या नव्या पण ताकदीच्या कवीचा पहिला काव्यसंग्रह "अक्षरमौन" त्यांच्या प्रगल्भ चिंतनाच्या काव्यमय आविष्काराची एक सुखद मैफल बनते ती त्यामुळेच!

"स्वप्नं संगती रंगत भरती
तरी जाणवे कमी कशाची?
मौनामधल्या नि:शब्दांचे
अर्थ घेऊन नीज उशाशी"

अशा गहि-या तत्वमंडित पण भावगर्भतेने ओथंबलेल्या शब्दांची उधळण करत जाणारा हा काव्य संग्रह. संतोष देशपांडे यांची ही प्रसिद्ध झालेली पहिलीच काव्यकृती, पण त्याला नवखेपणाची झालर नाही. सहसा कवी लोक चौकटीतल्या कवितांत रमलेले आढळतात. तीच ती प्रेमकाव्ये अथवा शहरी मनाला रिझवू पाहनारी ग्रामकाव्ये याचा नाहकचा सोस देशपांडेंना नाही. उलट जीवनविषयक चिंतनाचे काव्यरुप प्रारूप त्यांनी अत्यंत सहज आणि तरीही थेट पोहोचणा-या शैलीत मांडलेले आहे. या कवीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कवितेतील गेयता, जी अपवाद वगळता मराठी कवितेतून हद्दपार व्हायला लागली आहे.

"शब्दांचा डोलारा
आता नको आहे
खोल खोल वाहे;
अर्थ जेंव्हा...!"

अशा अल्प ओळींतून कवि शब्दांकडुन नि:शब्दाकडे जाण्याची, अर्थपूर्ण मौनात रमण्याची आंतरीक आस अभिव्यक्त करतो. तत्वगर्भ कवितांची आपल्याकडे अत्यंत वानवा असतांना देशपांडेंचा हा कवितासंग्रह. त्यांच्याकडुन अधिक सखोलतेची, मानवी जीवनाचे निगूढ संदर्भ उलगडू पाहणारी, वाचकाला विचारप्रवण करणारी, सम्रुद्ध करणारी अजून कविता यावी ही अपेक्षा.

अक्षरमौन
कवि: संतोष देशपांडे
कोन्टिनेंटल प्रकाशन
किंमत: रु. ८०/-  

1 comment:

  1. संजयजी, अत्यंत आभारी आहे. इतिहासापासून समाजकारणापर्यंत, उद्योगापासून संशोधनापर्यंत आणि साहित्यातील बहुतेक साऱ्या प्रातांमध्ये मुक्त मुशाफिरी करणाऱ्या आपल्यासारख्या प्रतिभावंताने माझ्या कवितांवर केलेले भाष्य आणि त्यानिमित्ताने एकूणच परिस्थितीवर टाकलेला प्रकाश प्रवाही व प्रभावी आहे. अक्षरमौनच्या प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक डॉ. द.भि. कुलकर्णी म्हणाले होते, की कवीचे शब्द ओऴखतो तो रसिक..मात्र त्याच्या शब्दांमागे दडलेले मौन ज्याला उलगडते, तो खरा रसिक. कवितांच्या माध्यमातून रसिकांच्या मनाला हात घालणे कदाचित सोपे, मात्र कवितांचे रसग्रहण वा परीक्षण करतानाच कवी व रसिक या दोन्ही घटकांना वास्तवाचे भान आणून देणे अत्यंत कठीण बाब. ती साधली, त्या आपल्या चतुरस्त्र प्रतिभेला सलाम. पुनश्च एकदा आभारी.
    - संतोष देशपांडे

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...