Monday, January 21, 2013

हातचे सोडुन पळत्यामागे लागणा-या सरकारला कोण समजावणार?


प्रश्नोपनिषद (४)


केंद्रीय योजना आयोगाच्या २००७ च्या महाराष्ट्र विकास अहवालानुसार सध्याचे उपलब्ध जलसाठ्यांचे व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्त्यांसाठी निधी मिळवण्यापेक्षा नवीन प्रकल्पांसाठी केंद्र सरकार ते जागतीक ब्यंकेकडुन निधी उपलब्ध करुन घेणे अधिक सोपे असल्याने नवे प्रकल्प वेगाने मंजूर केले जातात पण त्यांच्या भविष्यातील देखभालीबाबत करायला हवी ती तरतूद केलीच जात नाही. अलीकडेच झालेल्या जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणातून ही बाब अधोरेखित झालेली आहे. जुने धरणप्रकल्प सोडा, पारंपारिक जलस्त्रोतांची विल्हेवाट आम्ही कशी लावली आहे व अत्यंत कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येणे शक्य होते व आजही आहे यावर आपण येथे विचार करणार आहोत. समोर बरीचशी उत्तरे असतांना तिकडे दुर्लक्ष करत "आग रामेश्वरी-बंब सोमेश्वरी" या थाटात राज्याचा कारभार कसा चालला आहे यावरही यातून थोडफार प्रकाश पडेल.

सध्य महाराष्ट्रात ७४७ प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. पैकी जवळपास ३०% प्रकल्प आता निधीअभावी रद्द करण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षांत जवळपस ७२ हजार कोटी रुपये विविध नव्या प्रकल्पांवर खर्च करण्यात आले आहेत. प्रकल्पांचे वाढत गेलेले तथाकथित खर्च हा विवादास्पद मुद्दा बराच चर्चिला गेला आहे, त्यामुळे त्यावर येथे भाष्य न करता जुन्या काळापासून उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांचे आम्ही काय केले आहे यावर येथे चर्चा करायची आहे.

विदर्भात जरी कोकणाखालोखाल पाऊस पडत असला तरी विदर्भाचे पाणी-संकट कधीहे कमी झालेले नाही. उलट ते वाढतच चालले आहे. अत्यंत महत्वाकांक्षी असा गोसी (खुर्द) प्रकल्प हा खरे तर राष्ट्रीय प्रकल्प. या प्रकल्पाचा खर्च सोळा हजार कोटींपर्यंत जावून पोहोचला आहे. राष्ट्रीय प्रकल्प असल्याने ९०% खर्च केंद्र सरकारच करणार होते. पण १९९५ साली असलेले मुळचे ४६१.१९ कोटींचे बजेट सोळाहजार कोटींवर कसे गेले हा यक्षप्रश्न कधी सुटील असे वातत नाही. पण तेही महत्वाचे नाही. महत्वाचे हे आहे कि या प्रकल्पाला आताच गंभीर तडे जावू लागले आहेत व हा प्रकल्प अत्यंत असुरक्षीत बनलेला आहे. म्हणजे हा प्रकल्प कागदोपत्री जरी २.५० हजार हेक्टर जमीनीची सिंचन क्षमता दाखवत असला तरी भविष्यात किती खरी सिंचनक्षमता वाढवणार आहे हा एक प्रश्नच आहे.

पण...हे सगळे उद्योग करण्याची व एवढे पैसे उधळण्याची मुळात काय गरज होती? कारण तिनशे वर्षांपासून गोसी खुर्द प्रकल्प भिजवील त्याच्या निम्म्या क्षेत्राला भिजवण्याची क्षमता असनारी पारंपारिक व्यवस्था अस्तित्वात आहे हे कोणीच वेळीच लक्षात घेतले नाही.

ही व्यवस्था म्हणजे मालगुजारी तळी. आज विदर्भात नोंदली गेलेली ६८६२ मालगुजारी तळी आहेत. त्यांच्या महत्वाकडे वलण्यापुर्वी आपण मालगुजारी पद्धत म्हणजे काय हे समजावून घेवूयात. मालगुजार म्हणजे ब्रिटिश काळातील मध्य भारत प्रभागातील (सेंट्रल प्रोव्हिन्स) जमीनदार. १९३६ पर्यंत जवळपास ९७% जमीनी या जमीनदारांच्या ताब्यात होत्या. या जमीनदारांनी तिनशे वर्षांपुर्वीपासून सिंचनासाठी राजस्थानी स्थपती व कामगार वापरुन या तलावांची बांधणी सुरु केली. १८३१ पासून हळुहळु इस्ट इंडिया कंपनीने मालगुजारी पद्धत (शेती) आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली असली तरी मालगुजारांनी त्यांचा कडवा विरोध केला. १९५२ मद्ध्ये भारत सरकारने मालगुजारी शेतीपद्धत पुर्णतया बंद केली. महाराष्ट्रात आलेल्या गोंदिया, चंद्रपूर, नागपुर, भंडारा या सध्याच्या जिल्ह्यात  वर उल्लेखिलेल्या संख्येने मालगुजारी तळी आहेत.

तज्ञांच्या मते ही सर्व तळी पुनर्वापरात आणली तर १.२८ लाख हेक्टर जमीनी ओलिताखाली येवू शकतात. २००८ साली विदर्भ वैधानिक विकास मंडळाने (Vidarbha Statutory Development Board) राज्य सरकारला एक अहवाल सादर केला होता. मालगुजारी तळ्यांची दुर्लक्षामुळे सध्या दुरवस्था झाली असून ही तळी तातडीने दुरुस्त करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा असे सुचवले होते. बव्हंशी तळी गाळाने भरुन गेलेली, बांध ढासळलेले, कालवे बुजलेले अशी अवस्था. तळी गाळाने भरुन गेल्याने अतिक्रमणेही वाढलेली. बोर्डाने बोर्डाने असेही सुचवले होते कि या तळ्यांमुळे मत्स्योद्योगास प्रोत्साहन मिळून स्थानिक रोजगारही वाढेल व पाणीपट्टीच्या रुपात उत्पन्नही वाढेल व एकुणात या दुरुस्त्या केल्यामुळे राज्य सरकारचा फायदाच होईल.

यासाठी किती निधी हवा होता? फक्त १५६० कोटी रुपये! गोसी खुर्दचे १६ हजार कोटी कोठे आणि हे १५६० कोटी कोठे? असो. पण जलसंपदा मंत्रालयाला त्याच्याशी काय घेणे? गोसी खुर्द प्रकल्प (तुटका-मुटका का होईना) झाला कि विदर्भाचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि या भागातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील या दिवास्वप्नात ते मशगुल! असो. खरी बाब पुढेच आहे. २००८ चा अहवाल वाचुन निर्णय घ्यायला सरकारला २०११ साल उजाडावे लागले.

बरे निर्णय काय घेतला? निधी दिला का? तर नाही! राज्य शासनाने जलतज्ञ मधुकर किंमतकरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्स्यीय समिती नेमली व मालगुजारी तलावांचे वास्तव तपासायला सांगितले! किंमतकरांनी मालगुजारी तलावांची उपयुक्तता तपासून पहायला एक अत्यंत चांगली पद्धत वापरली. त्यांनी गेल्या पाच वर्षात वेतनासह मालगुजाती तळ्यांवर केला गेलेला खर्च व उत्पन्न तपासून पाहिले.

खर्च झाला होता ७४. ६६ कोटी रुपये तर हा खर्च वजा जावून उरलेले उत्पन्न होते ६९.३५ कोटी रुपये. म्हणजे दुरवस्थेतही मालगुजारी तळी फायदाच देत होती. दुरुस्त्या केल्यानंतर फायद्यात, सरकारच्या व जनतेच्या फायद्यात भरच पडली नसती काय? वर स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणात वाढला नसता काय? किंमतकर समितीने हे पाहून जे उपाय सुचवले ते असे: बांध आणि कालव्यांची दुरुस्ती करणे, नवे कालवे बनवणे, तळ्यांतील गाळ काढणे, अतिक्रमणे तातडीने हटवणे व या भागातील पीकपद्धती बदलणे. पण या शिफारशी शासन दरबारी धूळ खात पडल्या आहेत. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार आजवर फक्त २३ मालगुजारी तळ्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

म्हणजेच पुरातन स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, कारण त्याला वेळ व खर्चही अत्यंत कमी लागेल, हे करण्यापेक्षा गोसी खुर्द सारखे पांढरा हत्ती ठरलेले प्रकल्प हातात घेणे व त्यांची रचनाही सदोष असणे हे आपल्या शासकीय मानसिकतेचे दिवाळे निघाल्याचे लक्षण नाही काय? खरे तर सध्याची मालगुजर तळी तातडीने दुरुस्त करत वापरात आनण्याची गरज तर आहेच पण त्याच वेळीस याच पद्धतीने अन्य भागांतही त्यांची नव्याने उभारणी करायला हवी तर विदर्भाचे जलसंकट कायमसाठी नष्ट होवू शकते. पण येथे एवढ्या कमी खर्चात काम होणार म्हटल्यावर कोणाचा रस राहणार आहे? खायला मिळुन मिळुन किती मिळणार?

अशीच बाब कोकणात घडते आहे. स्थनिक लोकांनी विकसीत केलेली, डोंगराळ भागातील "दारचे पाणी" ही ती पद्धत. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात पाण्याची नेहमीच भ्रांत असते. ती सोडवण्यासाठी अत्यंत कल्पकतेने राबवली जाणारी ही पद्धत. श्रीमती परिणिता दांडेकर यांनी कोकणाचे सर्वेक्षण केले त्यात त्यांनी या व्यवस्थेबद्दल विस्ताराने लिहिले आहे. दारचे पाणी म्हणजे झ-यांचे पाणी ओळीने सरासरी सात टाक्यांत जमा केले जाते. त्यात पहिले टाके हे देवाचे टाके असते. त्यातेल पाणी धार्मिक कार्याखेरीज वापरले जात नाही. ते टाके भरुन ओसंडणारे पानी क्रमाने एकामागुन एक टाक्यात साठवले जाते. हे पाणी पिण्यासाठी तसेच सिंचनासाठीही वापरले जाते. आज कोकणात अनेक खेड्यांत, वाडीवस्तीवर ही योजना राबवली जाते. या टाक्यांची स्वच्छता ग्रामस्थच ठेवत असतात. खरे तर शासनाने कोकणात अशा व्यवस्थेला उत्तेजन द्यायला हवे. गुढगे-पेंडारी गांवांतील ही जलव्यवस्था आदर्श मानली जाते. पण वसिष्ठी नदीजवळ होत असलेल्या शिपयार्डसमुळे तसेच १२०० मेग्यव्यट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे मोठ्या प्रमानावर वृक्षतोड झालेली असून त्यामुळे असे पारंपारिक हक्काचे जलस्त्रोत हिरावले जाण्याचा धोका आहे असेही दांडेकरांनी नमूद केले आहे.

कोकणात मोठी धरणे होवू शकत नाहीत. डोंगराळ भाग असल्याने कालवे काढता येत नाहीत. सर्वाधिक पाऊस पडुनही बव्हंशी पाणी पुन्हा समुद्रात वाहून जाते. लोक मात्र उन्हाळ्यात तहानलेले राहतात. अशा स्थितीत शासनाने या पारंपारिक जलस्त्रोतांचे संवर्धन करायला नको काय?

तीच बाब उर्वरीत महाराष्ट्राची. पार यादव काळापासून महाराष्ट्रात सार्वजनिक उपयोगासाठी बारव बांधण्याची परंपरा आहे. जवळपास १५ हजार बारव महाराष्ट्रात होते. आज त्यातील असंख्य बुजले आहेत, नष्ट झाले आहेत अथवा स्वच्छता व देखभालीच्या अभावी त्यातील पाणी वापरता येण्याच्या पलीकडॆ गेलेले आहे. खरे तर या दुरुस्त्यांसाठी फार मोठ्या खर्चाची गरज नाही. पण त्यांच्या पुनर्वापरामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट कितीतरी कमी होवू शकते...पण ट्यंकर सम्राटांनाच गबर करायचे धोरण असल्यावर दुसरे काय होणार? शासनाला उपलब्ध जलस्त्रोतांच्या दुरुस्त्यांपेक्षा पांढरे हत्ती ठरणारे, जनतेच्या पैशांची विल्हेवाट लावणारेच प्रकल्प हवे असल्यास महाराष्ट्राची आर्थिक वाढ कदापि होणे शक्य नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे!



12 comments:

  1. संजय साहेब,
    अत्यंत महत्वाच्या समस्येवर आपण बोललात. खरच ही तळी विदर्भाला वरदान ठरु शकतात. पण आजच्या घडीला बहुतांश तळी अतिक्रमणात गेलेली आहेत. अतिक्रम हटविणे सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल. पण ते जर केले,तर विदर्भाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघालाच म्हणा.आमच्या रानात सुद्धा मी असेच एक तेळे पाहत आलो आहे. लोकबिरादरीच्या तीन-चार कि.मी. आधी असेच एक तळे होते. त्या तळ्याची पार फोडून रस्ता तयार करण्यात आला आहे. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही तळ्याची पार आजही तशीच उभी आहे. तळ्याच्या आत मात्र दहा बारा मिटर उंच झाडे वाढली आहेत. त्याच प्रमाणे पेरमिली या गावात असेच एक तळे आहे. ते मात्र वापरात आहे. येचिली नावाच्या गावीसुद्धा असेच एक तळे आहे. ते सुद्धा वापरात आहे. मेडपेल्ली-तालवाडा रस्त्यावर असेच एक तळे आहे. पण त्या तळ्याचे पाणि शेताला देतात की नाही शंका आहे. उन्हाळ्यात मात्र हे तळे सुकून जाते. एटापल्ली-डुम्मे मार्गावर असेच एक मालगुजारी तळे आहे. काळजी न घेतल्यामुळे हे तळे जानेवारीतल सुकून जाते.

    अहेरीला मात्र राजे धर्मराव महाराजानी (धर्मरावबाबा आत्रामांचे आजोबा) बांधलेले तळे आहे. ही आमच्या कोअर रानातली मला माहित असलेली तळी.

    या व्यतिरिक्त बोड्डी नावाचा गाव पातळीवर अन मोठ्या शेतक-याचं वयक्तीक पाणि सिंचन करण्याचं साधन आजही आमच्या रानात प्रचलित आहे. आमच्या कुडकेल्लीत किमान पंधरा-वीस बोड्ड्या आहेत. या बोड्ड्यांचे पाणि जाने पर्यंत असते.

    एम. डी. रामटेके

    ReplyDelete
  2. प्रश्न : हे सगळे उद्योग करण्याची व एवढे पैसे (सोळाहजार कोटीं)उधळण्याची मुळात काय गरज होती?
    उत्तर : एवढ्या कमी खर्चात काम होणार म्हटल्यावर कोणाचा रस राहणार आहे? खायला मिळुन मिळुन किती मिळणार?

    ReplyDelete
  3. ग्रेट ,
    छान
    सुंदर
    पाणीच पाणी चहूकडे
    गेला संजय कुणीकडे.
    खाली पाणी वर पाणी ,
    पुढे पाणी मागे पाणी .
    जात पाणी पात पाणी .
    धर्म पाणी कर्म पाणी.
    मी महिन्यासाठी राखून ठेवा !


    ReplyDelete
  4. संजयजी,
    आपले सध्याचे लेखन अजिबात समाजोपयोगी नाही.
    कविता नाटक हे आपले क्षेत्र नाही.
    कुणाचे कौतुक किंवा रसग्रहण करण्याइतके आपण महान नाही.
    तसे कुणी आपले कौतुक पण केलेले दिसले नाही .

    पाणी या विषयावर चिखल होण्याइतके आपण लिहिले आहे.
    पण ते अजिबात कसदार नव्हते.

    आपले कार्य क्षेत्र जात पात आहे असे दिसते.
    कारण त्याशिवाय इतिहासाच्या नावाखाली पांचट चर्चा करण्यात वेळ खर्च करणे -
    हा तुमचा आणि आमचा -हा आपला छंद दिसतो आहे.तो कसा पुरा होणार ?

    काही वर्षे आपण लिखाण बंद करावे असे सुचवणे समयोचित ठरेल .
    अनिता पाटील जशी ब्लोग ची जबाबदारी दुसऱ्या वर सोपविते तसेच आपण पण करू शकता.

    ReplyDelete
  5. संजयजी,
    आपण आयुष्यात एका परक्या जीवाला अनाथ जीवाला शिक्षण देवून मोठे करण्याचा आनंद घेवून बघा.
    त्या श्रम साफल्यात स्वर्ग सुख असते.
    आपण कुणासाठी लिहितो ?
    अगदी आत आपल्या आत्म्याला विचारून बघा. आपण आपलेच समाधान म्हणून लिहित असतो.
    बाकी समाज प्रबोधन वगैरे म्हणजे थापा.!आपण आपल्याशीच चक्क खोटे बोलत असतो.
    गाडगेबाबा आठवा.बाबा आमटे बघा.!
    तुम्ही संत नाही असे तुम्ही नक्कीच म्हणाल.पण ब्लोग लिहिणे यात पण एक आत्मा प्रौढी असतेच असते !
    ते करण्यापेक्षा सकस भरीव समाजकार्य करावे.त्यात आपणास जास्त समाधान मिळेल .
    एक झाड जगवणे हे एक जीव जगावाण्यासारखे आहे.!
    एक मानवी जीव जगवणे वाढवणे हे एक कुटुंब सुसंस्कृत करण्यासारखे आहे !.
    एक कुटुंब संस्कारित करणे हे एक समाज प्रबोधीत करण्यासारखी आहे !
    सुरवात करायला वात बघावी लागत नाही.
    त्यात अमुल्य आनंद आहे.
    ईश्वर सेवेचा ,ईश्वर भेटीचा आनंद आहे !

    ReplyDelete
  6. संजय सर,,
    हे असेच जर चालणार असेल तर कठीणच आहे !.
    सर्वाना नम्र विनंती की तुम्ही विषयाला धरून लिहा.
    फार त्रासदायक होते हे असे वाचणे !
    हा एक विचारमंच आहे याचा अर्थ असा नव्हे की ,
    कुणीही काहीही लिहावे.
    आज तुम्ही सांगताय एक जीव दत्तक घ्या ,
    उद्या सांगाल की
    दारात एक म्हैस दत्तक घ्या.कारण शेतकरी दुष्काळात सापडलाय !
    हे औषध पण नाही आणि रोगाचे अचूक निदान्पण नाही .
    संजय सर अचूक निदान करत आहेत , अर्थपूर्ण संवाद करत आहेत त्यात अशी
    खीळ घालणे उचित नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लोगवर काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, कदाचीत माझे मनोबल खच्ची करण्यासाठी, उपद्रवी प्रतिक्रिया देत असतात. पण हे आजचे नाही. मी तिकडे दुर्लक्ष करतो. ज्याची जशी योग्यता तसे ते लिहिणार. लोकांनीच कोणाची योग्यता काय हे ठरवावे. लेखातील उणीवा काढल्या वा तात्विक चर्चा केली तर मलाच काय, वाचकांनाही आवडते...पण...असो.

      Delete
  7. आप्पा : नमस्कार बाप्पा.
    बाप्पा : नमस्कार ! काय विशेष आप्पा ?
    तुमचे ते संजयराव सोनावणी साहेब थंड लेखक झालेले दिसतात.
    आप्पा : आमचे वगैरे म्हणू नका हो बाप्पा , अहो हे सगळे लेखक सारखेच !.हा बेटा जातीपातीवर सारखा उडत असतो ! बहुत मजा येतो ! मस्त लिहितो ,
    घसा खरवडून ओरडत असतो.-, आहे मात्र इमानदार .एकाही ब्राह्मणाला सोडत नाही ,
    लंबी रेस का घोडा है ,आपला माणूस आहे बर का बाप्पा .
    बाप्पा : पण त्यांना वाचक कुठे भेटतात हल्ली ?.एक तो सांगलीकर आहे ,दुसरे ते रेव्होल्युशन वगैरे विनोदी उमेदवार आहेत ,पण ते म्हणजे लहान लहान मुलेच वाटतात -
    एक तो प्रोफेसर तो पण हाफ चड्डी वाला दिसतो असे वाटतंय ! अजून एक तो नरके मास्तर -
    दुसरे सगळे वैतागतात हो यांचे लेख बघून . सारखे बिचारे मनुवादी आणि फुले फुले असे बोलत असतात आपापसात .
    आप्पा : आयडिया ,म्हणजे ते बाल गंधर्व थेटरात लागतात न खेळे पुण्याला ,
    मी अत्रे बोलतोय , मी यांव बोलतोय नि त्यांव बोलतोय तसेच ना ? मी संजय लिहितोय ! मी संजय बोलतोय ! -
    महाभारतात होता म्हणे एक संजय - पहिला त्या काळातला टी . व्ही वरचा बातम्या सांगणारा म्हणे ,
    त्याला सारखे लढाईत कौरवांची सगळी नावेच आठवत नसत - त्यानेपण आयडीया सारखे नंबर दिले सगळ्याना १ ते १०० ,
    ८८ ने भीमाची गदा पळवली ,५७ ने अर्जुनाला च्यात घातली,४२व्याने ८८व्याला जखमी झाल्यावर हॉस्पिटलात नेले.
    बाप्पा : संभाजी बागेत हास्य क्लबात तरी बोलवा यांना - काय आप्पा, कशी आयडीया आहे ?
    लोक पोट धरून धरून हसतील तरी सकाळी सकाळी यांच्या तत्वज्ञानाला नी आयादियाना !.पुणेकराना तेव्हढीच फुकट मज्जा ! पुणेकरच ते !

    आप्पा : आपल्या वेळी कशा छान छान गोष्टी असायच्या - बाल अरुणी पाणी अडवायचा - पाण्याचा प्रश्न ठेवतच नसे तो .दिसला झरा की झोपला मस्त ! ,
    म्हणजे आजच्या इरिगेशन मधल्या आफिसर सारखाच ! फक्त हे पगारी झोपतात आणि पाणी अडवत नाहीत हाच काय तो फरक .
    किती मस्त लोक भेटले त्या लहानपणात ! बकासुर भराभर गाडाभर भात खायचा ,पुतना मावशी , राम कथेत तो मारीच राक्षस एकदम हरीणाच व्हायचा -
    किती छान - पण या लोकांनी तिथेपण सगळे ढवळून काढलय -
    अमका असुर , तमका बहुजन म्हणे - एक म्हणे राक्षस नाहीच ,तो म्हणे ब्राह्मण ! खर सांगू का , अहो हे सर्व जे भेटले आपल्या बाल्यावस्थेत ,
    ते नंतर कधीतरी आले का आपल्या आयुष्यात ?.- नाही .
    बाप्पा : लागलास का तू पण बाप्पा , त्या संजय सारखाच बोलायला !
    आप्पा : अरे ते जाऊ दे तू निघालास तरी कुठे लगा लगा इतक्या सकाळी ?
    बाप्पा : सांगू नकोस कुणाला , अरे सकाळी त्या नाक्यावर मस्त शहाळ्याचे पाणी मिळते .छान पितो बघ २ - ३ ग्लास .
    दिवसभर छान वाटते .नळाच पाणी काय कधी येते कधी जाते . जेवण आणि इतर गोष्टीना कागदच आणले आहेत .जेवण झाल्यावर एकदा समोरच्या इराण्याकडे पाणी पिवून येतो.
    तो बिचारा अजूनतरी फुकट पाणी पाजतोय ,बघू,किती दिवस असे काढायचे आहेत ते !.त्याला म्हटलं की बाबारे ,
    तुझ्या देवासमोर अथर्वशीर्ष म्हणत जाईन हवे तर फुकटात , पण पाण्याला नाही म्हणू नकोस !
    आप्पा : मग ?
    बाप्पा : नुसता हसला तो - म्हणाला -अहो साहेब आम्ही काय देणार - आहे ते सगळे तुमचेच आहे.आम्ही तर इथे पाहुणे आलोय .आपण सगळेच पाहुणे नाही का साहेब इथले !
    उगीच भांडत बसतो आपापसात !आम्हलाबी तिकडून हाकलून लावलं आमच्याच बिरादरीतल्या लोकांनी ,म्हणून तर आम्ही या देशात आलो , जाऊ दे ,नको त्या आठवणी !
    आप्पा : काय रे बाप्पा , तुझे डोळे का रे ओलावले ? अरे ती त्यांच्या धंद्याची स्टाइल आहे - त्यात ते ओरिजनल नाहीत ना - आपल्यासारखे -
    आपण म्हणजे काय १०० टक्के ओरिजिनल -सगळ्यात आधीचे ! बाकीचे सगळे ते आर्य नि ऋषी आपल्यानंतर -काय ? रांगेत आपला नंबर नेहमी पहिला बर का ! बाकी आपल्या मागे !.

    ReplyDelete
  8. सर,
    आपले मनोधैर्य कधीही खचणार नाही.
    आपले लिखाण हे अजिबात कोणावर वैयक्तिक डूक धरून केलेले नसते.
    त्यामुळे सर , आपणास आपल्या विचार समाधीतून लक्ष विचलीत करण्यासाठी जे कुणी
    खोडसाळ पणा करत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच उत्तम उपाय आहे.
    सर आपण कृष्णावर कधी लेख-मालिका करणार आहात ?

    ReplyDelete
  9. संजय जी ,
    आपली व्यथा आपण सहजपणे नी अचूकपणे मांडली आहे.आपल्या संयमित आवाहनाला आमचे सक्रिय अभिवादन !
    आणि सहकार्याचे सशक्त आश्वासन !
    जगात नाठाळ लोकांची कमी नाही.कधी कधी अभ्यासू लोकांचा पराभव होतो की काय इतके हे नाठाळ लोक प्रभावी होतात.
    पण आपण धीर सोडणार नाही ही खात्री आहे. नाहीतर हा व्याप आपण वाधावालाच नसतात !
    आपण थोडा बदल म्हणून इतर स्फुट विषयावर लिहिले तर बरे होईल असे वाटते.
    असे म्हणतात ना की कामातील बदल ही पण एक विश्रांतीच असते.!
    या बाबतीत चिंतनाचा विषय थोडासा बदलून बघाल का ?
    जसे की आजचे रामदेव बाबा आणि त्यांचे व्यापार विश्व - एक अभ्यास.
    अम्वे सारख्या कंपन्या आणि त्यांचीकार्य पद्धती !- एक अभ्यास.
    पोष्टाच्या बचत योजना आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग. - जातवार निरीक्षण .
    पैगंबराचे विचारविश्व आणि श्रीकृष्ण वासुदेवाचे विचारविश्व - दोघांनीही प्रस्थापित नीतीनियम मोडीत काढत जेत्याचे राजकारण कसे केले .
    - येशू आणि बुद्ध ! असा एकत्र अभ्यास !
    हे विषय आपणास अपेक्षित वैचारिक विश्रांती देतील .!
    दुसरा महत्वाचा मुद्दा . दुसरे कुणी गाय मारील म्हणून आपण वासरू मारू नये असे माझी आई सांगत असे ते आठवले.
    लोकांनी विचित्र कल्पना वापरत आपली खिल्ली उडवण्याचा अपार नि अथक प्रयत्न केला तरी आपण अनुल्लेखाने त्यांना मारावे !

    ReplyDelete
  10. सर,
    पाणी अडवा पाणी जिरवा या योजना जर रोजगार हमी योजनेतून राबवता आल्या तर बरेच काम आपल्याला पाण्याचा जलस्तर वाढवण्याच्या दृष्टीने करता येईल .आम्हाला असे वाटते की खेड्यातील दुष्काळग्रस्त भागात नेमकेपणाने काही योजाना आखून तिथले लोक कायमचे शहरात स्थलांतरीत होणार नाहीत हे प्रथम पाहिले पाहिजे.कारण आज पावसावर अवलंबून असलेली शेती कसणारा शेतकरी गावगाडा सोडून शहरात मोलमजुरी करायला तयार झाला आहे.जर हे गणित अशा शेतकरी वर्गाला सोपे वाटत गेले तर गावेच्या गावे ओस पडतील.शहरात झोपडपट्ट्या वाढतील.सर्व लोकसंख्या निरीक्षणे ,सर्वे आणि मदतीचे होणारे वितरण या सर्वासाठी अशा संकलीत माहितीची गरज असते.तीच जर खोटी ठरत गेली तर अजून हाहाःकार माजेल.! योजना आखताना खोटी आधार म्हणून वापरली जाइल.आणि योजना पुन्हा अयशस्वी होताना दिसतील !
    सध्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण वाढत आहे.त्यात असा मूलतः फेरबदल होत गेला तर आणि दुष्काळामुळे संघटीत आणि असंघटीत श्रमिक वर्गाची जातीवर आधारीत स्थालांतरानी जर ससेहोलपट झाली तर
    प्रांत रचनेचे चित्र विचित्र दिसेल .
    आपण केलेले विश्लेषण अप्रतीम आहे.

    ReplyDelete
  11. संजय सर,
    आपण करत असलेल्या विषय मांडणीपूर्वीच्या अभ्यासाला किती कष्ट घ्यावे लागतात याची वाचकाना कल्पना नसेल असे वाटते
    मॉल संस्कृतीमुळे घराघरातून एकमेकांशी वागण्याच्या पद्धतीतपण झपाट्याने बदल होत आहेत.आचार आणि विचार पद्धती आणि
    एकमेकांचे आदर व्यक्त करण्याचे नियम धुसर होत आहेत. मी माझ्या डोळ्यांसमोर अनेक तरुण
    मुलामुलींना त्यांच्या हातून नकळत का होईना ,पण ज्येष्ठ लोकांचा होणारा पाणउतारा दाखवून दिला आहे !

    आजचा ज्वलंत प्रश्न चर्चेला घेऊन आपण जनजागरण चालवलेले आहे त्याला शुभेच्छा !

    आपण घेतलेले विषय हे सवंग लोकप्रियतेच्या चौकटीत बसणारे नसल्यामुळे हि हलक्या दर्जाची लेखन सहन
    करण्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागत असेल.पण हा नेत संस्कृतीचा विशाल महासागर - त्यात कुठल्या शिंपल्यात काय असेल कसे कळणार ?
    आपण करत असलेल्या परिश्रमाला सलाम !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...