Friday, January 25, 2013

मन विचारी विचारी...



त्यामुळे आता "मनाची पाटी कोरी करणे" कसे शक्य नाही हे आपल्या लक्षात आले असेल. ध्यान-धारणा-तपादिमुळे मन "कंडिशन्ड" करता येईल, परंतु पाटी कोरी करता येणार नाही. विचारशूण्यही होता येणार नाही. विचारांचा विचारही करता येणार नाही कारण त्याचेही माध्यम पुन्हा मनच असनार आहे. कोणतीही संवेदना मनाच्या सहास्तित्वाखेरीज होणार नसल्याने आणि मनाची पाटी पुसता येणेही त्यामुळेच असंभाव्य असल्याने, तसा प्रयत्न करण्यासाठीही पुन्हा मन आणि विचारांची गरज आवश्यक असल्याने, तत्वज्ञान वा अध्यात्म म्हणून ह्या आकर्षक संकल्पना असल्या तरी त्या प्रत्यक्षात येवू शकणार नाहीत, कारण दोन्ही भौतिक अस्तित्वे आहेत, आधिभौतिक नव्हेत. 



"मन म्हणजे जैव-विद्युत-चुंबकीय तरंगांची मेंदुतील सातत्याने अंतर्गत व बाह्य कारणांनी क्रिया-प्रतिक्रियास्वरुपी सातत्याने सुरू असलेल्या प्रक्रियांचा र्कुणातील समुच्चय होय, जी व्यक्तिला "स्व" ची जाणीव देते." मानसशास्त्र, शरीरशास्त्र मनाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करते. परंतू माझ्या मते, मनाची मी वर केलेली व्याख्या अधिक सत्याच्या जवळ जावू शकेल अशी आहे. मन आणि विचार हे समानर्थी घ्यावेत असे मानले जाते जे मला मान्य नाही. मन जरी विचारांचे वहन करणारे महत्वाचे कारक असले तरी दोहोंचे भौतीक स्वरूप वेगळे आहे. कसे ते आपण पुढे पाहू. मी या दोहोंवर "नीतिशास्त्र" आणि "विचारशास्त्र" या पुस्तकांत सविस्तर लिहिले असले तरी येथे अगदीच अक्यडमिक न होता मन आणि विचाराचे शास्त्रीय स्वरुप येथे दाखवू इच्छितो.

वरील व्याख्येवरून स्पष्ट होणारी पहिली बाब म्हनजे मेंदुशिवाय मन अस्तित्वात येवू शकत नाही. त्यामुळेच मन हे एक भौतिक वास्तव बनते ज्याचा केंद्रबिंदू मेंदू असतो. मेंदुत विविध भावनांची केंद्रके असतात जी परिस्थितीनुसार सुप्त, अर्धजागृत अथवा जागृत असतात. जैव-विद्युत-चुंबकीय तरंग हे तसे उपयुक्तते एवढेच क्षीण असतात. (जैव विद्युत ही १५ ते ५० मिलिव्होल्टपेक्षा अधिक तीव्रतेची क्वचित असते.) परंतू ते भौतिक तरंग असतात आणि त्यामुळेच त्यांचे अस्तित्व मनुष्याला (म्हणजे मनालाच) जाणवत राहून "स्व" विषयकची जाणीव विकसीत होत असते.

स्व विषयकची जाणीव तरंगांच्या दिशा व उत्पत्तीस्थाने जशी बदलतात तशी बदलत राहते. आपली स्वत:बद्दलची जानीव प्रसंगोपात्त बदलते वा काही जाणीवा प्रभावी होतात याचे कारण म्हणजे ज्या केंद्रकांतुन अधिक प्रबळतेने तरंगनिर्मिती होते तिचच अर्थात प्रभाव स्वविषयकच्या जाणीवांवर असणे स्वाभाविक आहे.

मेंदुतील केंद्रके अंतर्गत कारणांपेक्षा बाह्य घटनांना (मग त्या जीवनव्यवहारातील असोत कि दिवस-रात्र, अन्य प्रारणे जसे भुचुंबकत्व, अवकाशीय तारकीय प्रारणे इ.) प्रतिसादात्मक स्वरुपात अधिक उद्दीपीत होतात. या उद्दीपनांच्या वारंवारितेचा प्रभाव मानवी स्वभावाची, विचारांची जदन-घदन करण्यात हातभार लावत असतात...कारण जसे केंद्रकांच्या चुंबकीय उद्वेलनामुळे मनावर परिणाम होतो तसाच या उद्वेलनांचा केंद्रकांवरही परिणाम होत असतो. काही परिणाम व्हायला दीर्घकाळ लागतो तर काही तात्काळही होतात. परंतु या प्रक्रियेत सातत्य असते. या प्रक्रियेतील गती, मनुष्य केवढ्या कोलाहलजन्य परिस्थितीत आहे त्यावर अवलंबून असते. मनुष्य हाही एक भौतीक अस्तित्व आहे. मनही भौतिक अस्तित्व आहे. त्यामुळे बाह्य घटकांचा, सर्व प्रकारच्या भौतिक प्रारणांचा त्याच्यावर परिनाम होत असून जी प्रतिसादात्मक जैव-विद्युत चुंबकीय प्रारणे मेंदुतून बाहेर पडतात त्यांचेही बाह्य विश्वात प्रक्षेपण होत असते.

मानवी मनाची सापेक्ष स्थिरता ही बाह्य प्रेरणा किती तीव्रतेच्या आहेत यावर अवलंबून असते असे म्हनायला हरकत नाही. पुर्वी ऋषि-मुनी तपादि साठी अरण्यात जात असत कारण तेथे बाह्य प्रेरणांचे सापेक्ष अस्तित्व कमी गोंगाटमय असते. परंतु शुण्य प्रारण-गोंगाटाची परिस्थिती विश्वात अशक्यप्राय असल्याने, मनाची "शुण्यावस्था" गाठता येणे अशक्य आहे.

त्यामुळेच मनावर विजय, मनाची शुण्यावस्था, मनापार जाणे अशा अध्यात्माने निर्माण केलेल्या संज्ञा अशास्त्रीय आहेत हे आपल्या लक्षात येईल. कारण या भावनाही शेवटी मनामुळेच बनत असतात.

फक्त गोंगाटाच्या तीव्रता स्थिती-स्थान बदलाने व विचारांनुसार कमी-जास्त करता येवू शकतात.

मग आता प्रश्न निर्माण होतो तो हा कि विचार म्हणजे नेमके काय?

"विचार हे मनाने स्मृतिकेंद्रांत साठवलेल्या माहितींचे अंतर्गत वा बाह्य घटनांना दिलेले प्राथमिक प्रतिसादात्मक भौतिक विद्युत-चुंबकीय प्रक्षेपण असते. ते मन अभिव्यक्त करण्याची सुचना देत नाही तोवर भौतिक तरंगस्वरुपातच असून ते तुलनेने मनापेक्षा क्षीण शक्तीचे असतात व मेंदुत साठवले जात असतात. एका अर्थाने मनाचे दुय्यम स्वरुप म्हनजे विचार होत. य विचारांच्या तुलनात्मक क्षीणतेमुळे विचारांचे सापेक्ष अस्तित्व अल्पायू असते.

"मनाने साठवलेल्या माहितीपैकी ज्या भागावर स्वयंवेद्य इच्छेने मन केंद्रित होत मेंदुतील विविध केंद्रकांशी समन्वय साधत वारंवारितेने उद्दीपन करते तेंव्हाही विचार तरंग जन्माला येतात व माहितीचे रुपांतर विचारांत करतात. या विचारांचे सापेक्ष आयुष्य दीर्घ असते व हे विचार मनालाही घडवण्यात हातभार लावत असतात. जसे मनाला आहे तसेच विचारांनाही भौतिक अस्तित्व असते."

मन आणि विचारांच्या आपण ज्या व्याख्या पाहिल्या त्यावरून एक बाब अधोरेखित झाली असेल व ती म्हणजे मन आणि विचारांना स्वतंत्र जैव-विद्युत-तरंगमय भौतिक अस्तित्व आहे. ते मेंदुतून व मेंदुतील न्युरोन्समुळे निर्माण होते. आणि आइन्स्टाईन यांच्या उर्जाअक्षयतेच्या सिद्धांतानुसार निर्माण झालेले तरंग (कितीही क्षीण व अल्पायू असले तरी) नष्ट होवू शकत नाहीत.

मन आणि विचार वेगळे ठरतात ते त्यांच्या, परस्परावलंबी व तरंगमय असले तरी, स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांमुळे. त्यामुळे मनुष्याच्या विचारांप्रमाणे मन अथवा मनानुरुप विचार चालतीलच असे नाही. हा अनुभव प्रत्येकाने जीवनात घेतलेला असतोच.


त्यामुळे आता "मनाची पाटी कोरी करणे" कसे शक्य नाही हे आपल्या लक्षात आले असेल. ध्यान-धारणा-तपादिमुळे मन "कंडिशन्ड" करता येईल, परंतु पाटी कोरी करता येणार नाही. विचारशूण्यही होता येणार नाही. विचारांचा विचारही करता येणार नाही कारण त्याचेही माध्यम पुन्हा मनच असनार आहे. कोणतीही संवेदना मनाच्या सहास्तित्वाखेरीज होणार नसल्याने आणि मनाची पाटी पुसता येणेही त्यामुळेच असंभाव्य असल्याने, तसा प्रयत्न करण्यासाठीही पुन्हा मन आणि विचारांची गरज आवश्यक असल्याने, तत्वज्ञान वा अध्यात्म म्हणून ह्या आकर्षक संकल्पना असल्या तरी त्या प्रत्यक्षात येवू शकणार नाहीत, कारण दोन्ही भौतिक अस्तित्वे आहेत, आधिभौतिक नव्हेत.



3 comments:

  1. संजय जी ,
    आपले मनापासून अभिनंदन !
    जेंव्हा कधी आपण भेटाल त्यावेळेस (खास या लेखासाठी ) आपणास विनम्र अभिवादन करण्याचा माझा हक्क मी राखून ठेवत आहे.
    अहो -इतके सुंदर आजकाल कुणीही आपला वेळ खर्च करून लिहित नाही - विशेषतः बहुजनांसाठी !
    आणि नेमके हेच अशा ब्लोग वरून अभिप्रेत आहे - ते आपण मांडले या बद्दल त्रिवार अभिनंदन !
    आता लोकांनी - अगदी आप्पा बाप्पानेसुद्धा यात मनमोकळेपणे सहभाग घ्यावा !आपली शैली नि मर्यादा न सोडता-

    नाही समजले तरी , सर्वानी परत परत याचे मनन करावे - जिथे समजणार नाही तिथे लेखकाला चाट किंवा मेल ने विचारावे.
    त्या शंकांचा पिच्छा पुरवावा.
    विषय किचकट असला तरी लिखाण अप्रतीम - आणि समाजमन घडवण्यासाठी अशी अभ्यासाची तयारी प्रत्येकाने करायला काय हरकत आहे ?
    इतर लोकांचे भडक लेख आणि असे सकस लेख यातला मुख्य फरक हा आहे की संजय सर नेमकेपणे अध्यात्म आणि विज्ञान यांची नकळत सांगड घालत आहेत ,
    काही गोष्टी अनावधानाने तोडल्या जोडल्या जात आहेत !
    हवे ते ठेवत नको ती टरफले फेकून देत आहेत .
    आपल्या कन्डीशंड मनाला खुल्या हवेतील निर्मळ विचारांचा दिलासा देत आहेत.
    अभिनंदन !

    ReplyDelete
  2. सर,
    मेंदू हा एक मानवी शरीराचा अवयव आहे .आणि त्याच्या कार्याच्या एका ठराविक पद्धतीला मन म्हणता येईल.
    एक ठार वेडा आणि एक समाधिसुख अनुभवणारा यात फरक काय ?
    एक अनियंत्रित आणि एक नियंत्रित स्वयंशासीत वेडेपणा असा का तो फरक आहे ?
    आपल्याकडे चित्तशुद्धी हा शब्द काय सुचवतो ? मनशुद्धी ? - म्हणजेच विचार करण्याची सुनियोजित निरोगी पद्धती ?
    तर्कशुद्ध जे जे ते ते सर्व श्रेष्ठ ? चित्तशुद्धी चा मनाच्या निकोप पणाशी कितपत संबंध येतो ?
    ज्ञानेश्वर माउली " मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण " म्हणतात त्यातले प्रसन्नत्व आणि सिद्धी यांचा अर्थ काय धरावा ?

    अगदी अलिप्तपणे जर पाहिले तर , हुतात्मा ज्या इर्षेने त्याच्या राष्ट्रप्रेमाला भगवतभक्तीच्या समांतर मानतो ,
    ते राष्ट्रप्रेम हि संकल्पना पण क्षणभंगुर ठरू शकते .कालौघात निकामी ठरू शकते.
    कुटुंबपद्धती हीच जर , एक सोय म्हणून माणूस नावाच्या जनावराने निर्माण केली असे मानले तर
    आई,आणि इतर नाती सुद्धा कालबाह्य होऊ शकतात.

    संभोगाची इच्छा फक्त पुनरुत्पादन या निसर्ग निर्मित कर्तव्याशी निगडीत आहे का वासना हीपण विचारांची आणि भावनांची संयुक्त उत्पत्ती आहे ?

    भावनांचा जन्म विचारातून होतो की विचार हे भावनांचे कृतीपूर्व सक्षम विकसित रूप आहे ? भावना ( वासना ) , विचार आणि कृती अशी साखळी मानता येईल का ?
    भावना हा केमिस्ट्री शी निगडीत आहे - तसे असेल तर - त्या फक्त इंजेक्शन आणि औषधे यांनी नियंत्रित होतील का ?
    मनुष्याच्या सर्व क्रिया अशा नियंत्रित करता येतील का ?
    वात्सल्य मग ते एखाद्या सिंहिणी चे असो किंवा स्त्री चे - ते एक वास्तव आहे का एक दुबळेपणा आहे ? ते निसर्गचक्राशी सुसंगत आहे ? तर मग ते उत्क्रांतीचा भाग बनते.
    नाहीतर माणसाच्या शेपटीसारखे उत्क्रांतीतून उरलेली ऐतिहासिक खूण ठरते .मग वात्सल्य वर्तमानातील लुडबूड ठरते - काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या मानवी मनाच्या छटा तात्कालिक असतात का चिरंतन असतात - अपरिहार्य असतात का ? त्या मानवी प्रगतीला कारक आहेत का मारक आहेत !
    मानवी मनाची प्रगती म्हणजे काय ? ते एक वैश्विक सत्य असू शकते का ?
    संस्कृती जीवनमूल्ये ठरवतात का आपली जीवनमूल्ये संस्कृती घडवतात ?

    माणूस निसर्गतः सर्वात अशक्त जनावर धरला जातो.त्यालाच तीक्ष्ण विचारशक्ती देण्यात निसर्गाचा काय हेतू असावा ?

    ReplyDelete
  3. तत्त्वज्ञान व अध्यात्म ह्या आकर्षक संकल्पना आहेत व त्या प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत असे म्हणून तुम्ही फार थोर अशा पूर्वसूरींना आव्हान दिले आहे. इतका मोठा विषय खंडन मंडन पद्धतीने हाताळला गेला तर तुम्ही सर्वांचे कसे खोडले हे कळेल व त्यात तुम्ही यशस्वी झालात तर भारतातील सर्वौच्च परंपरा मोडीत काढल्याचे कार्य तुमच्या नावे जमा होईल.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...