Sunday, June 30, 2013

आजची शिक्षणपद्धती....







 

सोशल एज्युकेशन मुव्हमेंटतर्फे आज एकदिवसीय भारतीय शिक्षण संगितीचे आयोजन   करण्यात आले होते. या संगितीचे बीजभाषण मी दिले व त्यानंतर दिवसभर प्रचलित शिक्षणपद्धती व त्यातील गुणावगुणांची व समस्यांची चर्चा झाली. या संगितीत महाराष्ट्रभरातून ३२ शिक्षणतज्ञ व विचारवंत निमंत्रीत होते. माझ्या बीजभाषणातील खालील काही संक्षिप्त मुद्दे:
१. आजची शिक्षणपद्धती ही पाठांतराधारीत असून त्यात आकलनाधारीत कलप्रधानता नाही. विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक प्रतिभेला वाव देण्यासारखे तीत काहीही नाही. हुशार आणि ढ या अवैज्ञानिक संकल्पनाना वाव देणारी ही पद्धती भावी नागरिकांच्या ज्ञानपुर्ण घडणीत सर्वात मोठा अडथळा आहे. स्वतंत्र प्रतिभेचे तज्ञ घडविण्याऐवजी नोक-या मागणा-यांचे हात वाढवणारी ही शिक्षण पद्धती असून ती नाकारली पाहिजे.
२. शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानार्थी आणि आधुनिक बनवण्यासाठी असले पाहिजे. आधुनिक साधने असणे आणि आधुनिक अग्रगामी विचारसरणी यातील फरक लक्षात घेतला तर आजची शिक्षनपद्धती ही माणसाला आधुनिक करत नसुन जातीयवादी, प्रांतवादी, भाषावादी, परंपरावादी बनविण्यातच अग्रेसर आहे. आधुनिक विचारांच्या अभावात दिले जानारे शिक्षण कुचकामी असून भारताचा ज्ञानात्मक विकास तीमुळे होत नाही. त्यामुळे प्रचलित शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम आणि परिक्षापद्धती यात आमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल.
३.  शिक्षणपद्धतीत मूल्यशिक्षणाच्या अभावामुळे गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून भ्रष्ट मानसिकता/अनैतिकता यांचा विस्फोट झाला आहे. मूल्यशिक्षण शिक्षणपद्धतीत अनिवार्य केले पाहिजे. शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवे.
४. शिक्षिताची एकुणातील उत्पादकता (म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जाणा-या शिक्षिताची आकलनक्षमता, निर्णयक्षमता आणि प्रत्यक्ष कार्य यातील काळ-काम-वेग यात गुणात्मक वाढ) वाढली पाहिजे...परंतू ती तशी न होता घटत चालली आहे.
५. आम्ही कोणत्याही क्षेत्रात जागतीक पातळीवर दखल घेतले जाईल असे ज्ञान निर्माण न करू शकण्याचे कारण म्हणजे आम्ही मुळात शिक्षणपद्धतीच्या माध्यमातुनच ज्ञाननिर्मितीच्या क्षमता मारून टाकत आलो आहोत व ती पद्धत बदलली नाही तर पुढेही करत जाणार आहोत. ज्या विषयांत रुची नाही त्या विषयांचे मार्क आणि ज्या विषयात रुची आहे त्या विषयातील मार्क सब घोडे बारा टक्के या घाऊकतेने घेतले जात असल्याने आवडीच्या विषयांसाठी अधिक वेळ देता येणे, त्यातील तज्ञता मिळवणे शक्य होत नाही आणि येथेच विद्यार्थ्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा खून पडतो.
६. शिक्षणपद्धतीचा उपयोग सरकारे तसेच विशिष्ट विचारांचे समर्थक आपापल्या विचारांची बौद्धिके विद्यार्थ्यांवर थोपण्यासाठी करीत असतात. सत्ता बदलल्या कि अभ्यासक्रमांत ढवळाढवळी केल्या जात असतात. शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे व ती तशीच राहिली पाहिजे परंतू शिक्षणपद्धती आणि अभ्यासक्रम हे मात्र स्वायत्त मंडळाच्या हाती सोपविले पाहिजे. त्यात शासकीय अथवा कोणत्याही खाजगी अथवा संघटनांची ढवळाढवळ असता कामा नये.
७.  शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. शिक्षणाचे होत असलेले खाजगीकरण, भारतात येऊ पाहणारी विदेशी खाजगी विद्यापीठे हे सारे शासन यातुन हात काढून घेत असल्याचे लक्षण आहे. कोणत्याही स्थितीत बालवाडी/नर्सरी ते कोणत्याही प्रकारचे उच्च शिक्षण ही शासनाचीच जबाबदारी आहे. म्हणुन शिक्षणाच्या खाजगीकरणाला कडाडुन विरोध केलाच पाहिजे.
८. शिक्षक/प्राध्यापक यांचा एकुणातील दर्जा खालावत जात आहे. विद्यार्थ्यांना झापडबंद करता करता तेही झापडबंद होत चालले आहेत. त्यांच्यातही ज्ञान आणि नवनिर्मितीची आस नाही अथवा इच्छाही नाही. हे बदलण्यासाठी व्यापक प्रबोधनाच्या मोहिमेची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमात विचारवंत आयु. शुद्धोदन आहेर, समीर मोहिते, प्रा. विजय मोहिते, प्रा. दीपिका खाले, प्रा. प्रवीण यादव, प्रा. साव, प्रा. अभ्यंकर ई. उपस्थित होते.  

7 comments:

  1. कार्ल मार्क्स च्या भांडवल मधल एक वाक्य आठवतंय " आजवर विद्वानांनी जगाचा अर्थ निरनिराळ्या पद्धतीने लावला आहे मुद्दा आहे तो ते बदलण्याचा " शल्य वाटायला लागलय मला कि हे सार मला कळत असून मी काहीच करत नाहीये पण मला पुन्हा एकदा जाग केल्याबद्दल संजय सर धन्यवाद !

    ReplyDelete
  2. शिक्षणपद्धतिचा 'खेडे' हा केंद्रबिंदू का करू नये ? अजूनसुद्धा ७० % लोकांची उपजीविका शेती हीच आहे.शेतीचे प्रश्न आजची शिक्षणपद्धती कुठे सोडवत आहे ? ............आजची शिक्षणपद्धती ही पाठांतराधारीत असून त्यात आकलनाधारीत कलप्रधानता नाही. विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक प्रतिभेला वाव देण्यासारखे तीत काहीही नाही...........एकदम समर्पक..........मूल्यशिक्षण शिक्षणपद्धतीत अनिवार्य केले पाहिजे. शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवे. ..............नक्कीच वरील गोष्टीचा अंतर्भाव शिक्षणात झाला पाहिजे.

    ReplyDelete
  3. संजय महाराजांचा विजय असो !



    आपली लेखनाची धाटणी जरी विचार करायला लावणारी असली तरी त्यांची मांडणी अतिशय पुस्तकी झाली आहे

    त्यामुळे ती निःश्चितच दुर्बोध झाली आहे आणि थोडी हास्यास्पद पण !

    पहिला मुद्दा असा मांडला असता तर अधिक वाचनीय झाला असता आणि कौतुकाची बाब म्हणजे त्या पुढील सर्व वाक्य अतिशय सुबोध आणि वाचनीय - अगदी तळा गाळा तल्या लोकाना समजतील अशा भाषेतील आहेत ,मग हे पहिलेच वाक्य इतके बोजड का ?

    "आजची शिक्षण पद्धती पाठांतरावर भिस्त ठेवणारी असल्यामुळे विषय समजून घेण्याकडे त्यांचा जास्त करून कल नसतो - -" असे काहीतरी जास्त समर्पक वाटले असते



    संजय सर ,

    आपल्याकडे म्हणाल तसे लेखणी चालवायचे सामर्थ्य असताना मांडणीतला बोजडपणा जपण्याचा हा अट्टाहास कशासाठी ?

    दुसरा मुद्दा वाचताना असे जाणवते की आजचे शिक्षण ही केवळ अडथळ्याची शर्यत ठरत आहे , नाईलाज म्हणून त्यातून जावे लागते - त्यातून आत मनाच्या गाभाऱ्यात कुठल्याच तत्वांची भक्कम स्थापना होत नाही -जी कदाचित आपल्याला "आमुलाग्र" बदलातून अपेक्षित आहे पण काय हो ,आजच्या जागतिक स्पर्धेच्या काळात आपण मातृभाषेतून शिकण्याचा आग्रह धरणे किती योग्य आहे ? आपल्या देशाच्या इंग्रजी भाषेतून व्यवहार करण्याच्या ताकतीमुळे आपणास जगात नोकरीसाठी जास्त इतर देशांच्या तुलनेत मागणी असते .

    ज्ञान आणि माहिती दोन वेगळ्या गोष्टी आहेत शाळेतून आपल्याला माहिती मिळते का ज्ञान ?किंवा दोन्ही थोडे थोडे ?अनेक विषयातले नियम उपनियम यांची जंत्री उच्च शिक्षणात सुद्धा एक प्रकारे पाठच करावी लागते .सि ए असो वा एम बी ए - त्यात ज्ञान किती आणि माहिती संकलन किती असते हा संशोधनाचा विषय आहे - चर्चेचातर आहेच

    मेडीकल शाखेत आपण कसे मराठी शिक्षण देणार ?तीच गोष्ट कोम्पुटर ची -

    इंग्रजीला उच्च शिक्षणात पर्याय नाही हे सत्य आपण मान्य केलेच पाहिजे !नाहीतर प्रचंड गोंधळ होईल .

    थोडक्यात तांत्रिक शिक्षणात इंग्रजी हि महत्वाची ठरते .-अंतर राष्ट्रीय न्यायालयात आपली काश्मीरची किंवा पाणी वाटपाची बाजू आपण कोणत्या भाषेत मांडणार त्यासाठी मातृभाषा किती उपयोगाची ठरेल . ?

    कल्पना करा - मराठी किंवा कानडी असे दोन सर्जन रुबी होल मध्ये कसे करतील रोगनिदान ?याची भाषा त्याला येत नाही !

    सुप्रीम कोर्टात माराठी आणि तेलगु माध्यमातून शिकलेले वकील पंजाबीतून शिकलेल्या न्यायाधीशाला कसे सांगतील आपली बाजू ?एक भाषा हे सूत्र कुठे न कुठे तरी वापरावेच लागते - अशा वेळी इंग्रजी शिवाय पर्याय नाही .

    आणि आपापल्या अस्मिता जपताना पर्याय म्हणून आपल्याला जागतिक माध्यम म्हणून इंग्रजीचा स्वीकार करावाच लागतो !

    टाळ्या मिळवण्या पुरते मातृभाषेचे गुणगान ठीक आहे पण त्याला मर्यादा आहेत !

    आणि मातृभाषेत सुद्धा शुद्धलेखनाबाबत संजय सरांचे विचार फारच ठिसूळ आहेत - हे पण हरकत घेण्या इतपत गंभीर आहे -बहुजन बहुजन म्हणत जर आपण भाषेची शिस्त जे व्याकरण तेच जर विसरू लागलो , उच्चार स्वातंत्र्य घेत आनी पानी करू लागलो तर कसे होणार आपल्या भाषेच्या दर्जाचे ?

    आणि अशा वेळी पुण्याचे उच्चार खरे का खानदेशी मराठी खरी हे बुद्धिभेद करणारे मुद्दे उकरून वितंडवाद घालण्यात संजय महाराज यांचा कुणी हात धरू शकणार नाही !

    म्हणून थोडक्यात त्यांचे बोलणे लिहिणे यात सुसंगतता नसते हेच खरे !


    पुढे पुढे आपली मांडणी अत्यंत ओघवती झाली आहे या बद्दल अभिनंदन !

    त्यात अर्थ किती तो स्वानुभवाचा भाग झाला आहे आजकाल !

    संजय महाराजांचा विजय असो !

    पुन्हा एकदा !

    ReplyDelete
  4. आतापर्यतच्या शिक्षण पध्दतीमुळे साधा बँकेचा चेक भरता येऊ नये,व्यवहार कौशल्य, अनुभव याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लहान वयातच बऱ्याच विद्यार्थी वर्गाचे बेबंद वागणे,टवाळखोरी, वेळचे नियोजन नसणे, राजकीय पक्ष, संघटनांच्या राजकारणाच्या दबावासाठी,वापरासाठी रिकामे मनुष्यबळ निर्माण करणे. नंतर त्यांचा भ्रमनिरास होणे. तसेच हटटीपणा, अतिशय राग, खोटे बोलणे बलात्कार, खुन,शिक्षणात रस नसणे इ. राज्यघटना,गुन्हया संदर्भातील भारतीय दंड विधान पोलिस कायदे याबाबत अजिबात जाणीवा विकसित केल्या जात नाहीत.त्या जर वेळेवर शिक्षणात रुजवल्या तर नक्कीच वर उल्लेखिलेले प्रकार मोठया प्रमाणात कमी करता येतील. भारताच्या लोकांना अजुन रस्त्याने अजुन नीट चालतासुध्दा येत नाही. हातवारे छाती पुढेमागे करीत चालतात. सार्वजनिक जीवनात कसे वागावे कसे बोलावे याबाबतचे सुध्दा प्रात्यक्षिक तसेच परीक्षा असाव्यात.व्यक्तिगत वागणूक टूफिकसेन्स,शिस्त, व्यायाम,जुन्या संकुचित धारणा,जात, समाजाचा खोटा अभिमान,नाटकीपणा इ. बराच प्रकाश टाकता येईल.मग प्रत्यक्ष ज्ञानाचे आवडीचे शिक्षण तेही ताजेतवाने होऊन, आकलन व्हायला भविष्य घडवायला उपयोगी ठरणार.यामुळे एक सक्षम भारतीय नव्हे तर जागतिक दर्जासाठीचे नागरिक तयार निश्चितपणे करता येईल. अभय, वांद्रे, मुंबई

    ReplyDelete
  5. तुम्ही म्हणताय ते सगळे खरे आहे हो पण बदल कोण घडवणार. आपल्या एका तरी मंत्र्याला पुढील ५०-१०० वर्षे बघायची सवय आहे का? एक शिवाजी, पहिला बाजीराव आणि अलीकडे यशवंतराव चव्हाण वगैरे सोडले तर किती चांगले लोक आपले शासक झाले? ब्राह्मणांची सद्दी मोडायची म्हणून अनेक खेळ खेळले गेले त्यातून आजची शिक्षण परिस्थिती उद्भवली असे माझे स्पष्ट मत झाले आहे. खरे म्हणजे शरद पवार पण चांगले आहेत पण त्यांचे काही सांगताच येत नाही. राखीव जागा आणि त्यावरून झालेले राजकारण ह्याने सगळ्याची वाट लावली आहे. बर ज्यांच्यासाठी जागा ठेवल्या त्यांना किती फायदा झाला हा प्रश्नच आहे. आता बाकीचे पण सगळे असल्या जागांच्या मागे लागले आहेत. मुळात कुठलीही गोष्ट स्वस्तात आणि फुकट मिळाली की त्याची किंमत जाते हेच खरे. तसेच राखीव जागांचे झाले आहे. मुळात नोकरी मिळवण्यासाठी आधी नोकरीची जागा तयार झाली पाहिजेल. त्याबद्दल काय करायचे ह्याचा उहापोह कोण करणार. असो. फार काही सुधारणा होईल असे काही वाटत नाही. आहे हे असेच चालू राहणार.

    ReplyDelete
  6. ही परिस्थिती केवळ गेल्या पाच दशकातील महाराष्ट्रातील ब्राम्हण द्वेषी राजकारणाचा परिणाम आहे . पण तथ्य कोण स्विकारणार?

    ReplyDelete
  7. मातृभाषा शिक्षणात असावीच पण इंग्रजीपण बोलता येईल असेच भाषेचे वर्ग तयार करावेत. अन्यता इंग्रजी व्याकरण व निबंध एवढेच मराठी विद्यार्थ्याला मार्क मिळवून देतात. इंग्रजी बोलणे कोणी शिकवतच नाही किंवा तसे वातावरणही तयार करत नाहीत. मराठी विद्यार्थ्याची हे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. मला वाटते शिक्षकांनी केवळ व्याकरण शिकविण्यात व विद्यार्थींनी शिकण्यात शालेय आयुष्य घालवले. अहेा इंग्रजी नाही तर आता अरबी फेंच्र जर्मनही शिकवा. युनोच्या सहाही भाषा देण्याचा प्रयत्न शिक्षण पध्दतीतून व्हावा. हव तर एखादा विषय कमी शिकवा. पुढच्या वषी शिकवा. शाळेत गेल्यावर पहिला तासभर योग/ध्यान श्वसन प्रकार शिकवा. मुले बऱ्यापैकी चितएकाग्र होतील. श्वासाच्या आयामामुळे व्यसन व इतर प्रश्नावर बऱ्यापैकी काम करतायेईल. पण लक्षात कोण घेतोय. मुलांकडे मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून शिक्षण पध्दतीत विचारच केला गेलेला नाही.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...