Thursday, August 1, 2013

मग इच्छामरण का नको?


मानवी जीवनव्यवहारांना सर्वच पातळ्यांवर व्यापून वावरत असलेला मृत्यू हा नेहमीच तत्वज्ञ-संशोधकांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. जगातील सर्वच धर्म अंतत: मृत्यूविषयीच्या भयातून निर्माण झालेले आपण पाहू शकतो. मृत्युनंतर काय याबाबत मार्गदर्शन नाही असे जगात अपवादात्मक धर्म आहेत. बव्हंशी तत्वज्ञाने अंतत: मृत्यूभयावर विजय मिळवत, असुरक्षित जीवनाला आध्यात्मिक पातळीवर सुरक्षिततेचा आभास कसा मिळु शकेल हे दर्शवण्यासाठी तत्वज्ञांचे बव्हंशी लेखन झाले आहे हेही आपल्या लक्षात येईल. किंबहुना नीतिशास्त्राचीच उपज ही आदिम मानवी भयावर मात करण्यासाठी झाली आहे. विज्ञानही मनुष्य अमर जरी नसला तरी त्याचे एकुनातील आयुष्य कसे वाढेल या प्रयत्नांत आहे. स्वत: अमर नसलो तरी देवता अमर्त्य आहेत ही श्रद्धा बव्हंशी धर्म व्यक्त करतात व त्यांच्या पूजा-प्रार्थनांनी अंतिम मोक्ष, साल्वेशन, निब्बाण इ. प्राप्त होइल अशी आशाही दाखवतात.

म्रुत्यू कोणाला सहसा नको असतो. किंबहुना तो कसा लांबविता येईल असाच प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. महाभारतात यक्षप्रश्नांत यक्ष युधिष्ठिराला विचारतो कि "यच्चयावत विश्वात सर्वात मोठा विनोद कोणता आहे?" यावर युधिष्ठिर जे उत्तर देतो ते खूप मार्मिक आहे. तो म्हणतो, "प्रतिक्षणी मनुष्य कोणा-न-कोणा जीवाला मरतांना पाहत असतो...पण आपण स्वत: मात्र मरणार नाही यावर त्याचे श्रद्धा असते...आणि हाच सर्वात मोठा विनोद आहे."

जीवांच्या जैविक प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू असे आपण मानतो. ही अपरिहार्य घटना नैसर्गिक वृद्धापकालाने जशे घडुन येते तशीच ती युद्धांत, नैसर्गिक प्रकोपांत, अपघातांत, खूनादि घटनांतही घडुन येते. किंबहुना अनिश्चित असणे हेच मृत्युचे भय वाटण्याचे मोठे कारण असते. फाशीची शिक्षा झालेल्यालाही आपण नेमके कधी टांगले जाणार आहोत हे माहित नसते. काहीतरी चमत्कार घडेल आणि आपण वाचू ही अजरामर आशा प्रत्येकाच्याच मनात जीवित असते. मृत्युच्या छायेखाले जगणा-यांचे जीवन भयचकित करते. अना फ्र्यंकची (Anna Franc) डायरी हादरवून सोडते ती यामुळेच.

असे असले तरी आत्महत्याही घडत असतात. स्वत:चे जीवन स्वत: संपवणे हा नुसता कायदेशीर नव्हे तर नैतीक/धार्मिक गुन्हा मानला जातो. जन्माला आल्यानंतर व्यक्ति ही स्वतंत्र उरत नसून ती एकुणातील समाजाशी उत्तरदायि असते असा भाव त्यामागे आहे. व्यक्तीवर समाज गुंतवणुक करत असतो. त्यात शिक्षण ते साधनसामग्रीतील त्याच्यावर खर्च होणारा हिस्सा त्याने आपल्या परीने भर घालत चुकता करावा अशीच "लेन-देन" भावना त्यामागे असते. त्याला नैतिक अधिष्ठाण चिकटवले जाते हा भाग मानवी व्यावहारिकतेशी सुसंगतच आहे.

असे असले तरी स्वेच्छामरण हा पुरातन काळापासून चालत आलेला एक मार्ग आहे. स्वेच्छेने देवतांना बळी जाणे, बळी म्हणुन विकले जाणे याबरोबरच जीवंत समाधी घेणे, स्वत:ला पेटवून घेणे अथवा जलसमाधी घेणे असे अनेक मार्ग अगदी अलीकडच्या कालापर्यंत आपल्याला पहायला मिळतात. सती प्रथेतही अनेक स्त्रीयांनी स्वेच्छेने सती जाणे स्वीकारले आहे हेही एक वास्तव आहे. पुरातन काळी आपण अशा अगणित घटना पाहू शकतो. इच्छामरणाचे वरदान वगैरे भाकड भाग बाजुला काढला तरी भीष्मांनी स्वत:च मृत्यू स्वीकारला. द्रोणानेही तसेच केले. गांधारी, कुंती व धृतराष्ट्र यांनीही वणव्यात स्वत:ला जाळुन घेतले. कृष्णाचा मृत्युही जवळपास याच श्रेणीत जातो. यांतील सत्य अथवा रुपकात्मता काहीही असो, स्वेच्छामरणाचे आकर्षण समाजांत या ना त्या पातळीवर वावरत होते एवढे तरी आपण निश्चयाने म्हणू शकतो आणि स्वेच्छामरणांना (आत्महत्या नव्हे) सामाजिक/सांस्कृतीक विरोध असल्याचे दिसत नाही.

"आपले जीवन तृप्त झाले आहे अथवा आपले लौकिक कार्य संपले आहे या भावनांनी विचारपूर्वक केलेला निर्णय व त्याची अंमलबजावणी म्हणजे स्वेच्छामरण" असे आपण वरकरणी म्हणु शकतो. पण त्रुप्तता अथवा लौकिक कार्य हे शब्द फसवे असून केवळ भावनिक असू शकतात हेही उघड आहे. ज्ञानेश्वरांनी आपले लौकिक कार्य संपले असे घोषित करुन समाधी घेतली हे आपण जाणतो. आपले लौकिक कार्य संपले आहे हे वयाच्या चोविसाव्या (त्यांच्या समाधीसमयीच्या वयाबाबत गोंधळ आहे...पण ते तरुणच होते एवढे स्पष्ट दिसते.) वर्षी ठरविणे म्हणजे स्वार्थाचा भाग आहे कि आध्यात्मिक त्रुप्तीतून आलेला तो निर्णय आहे? आपण त्याबाबत भाष्य करू शकत नाही. पण इच्छामरण हे सर्वच स्थितीत योग्यच असते असे सरसकट म्हणता येणार नाही.

प्रायोपवेशन, संथारा हेही मार्ग इच्छामरणासाठी वापरले जातात. सावरकरांनी प्रायोपवेशन करून आपले जीवन संपवले होते. जैन धर्मात आजही वृद्धापकाळी संथारा घेत जीवन संपवले जाते. यासाठी तरी कायद्याचा अडसर दिसून येत नाही. परंतू दुस-यांच्या मदतीने पण स्वेच्छेने मरण स्वीकारणे याला कायद्यात मान्यता नाही. हा एक विरोधाभास आहे असे मला वाटते.

गेल्या शतकापासून मानवी जीवन अत्यंत गतीमान झालेले असून प्राचीन नैतिक जाणीवा पराकोटीच्या बदललेल्या आहेत. एकुणातील स्थिर समाजव्यवस्थाच ढवळुन निघाली असून मानवी नातेसंबंध नवीन मित्या धारण करत आहे व त्यातील गतीशास्त्रही विस्मित करनारे आहे. कुटुंबपद्धती पासून ते स्त्री-पुरुषसंबंधांत नवे ताण-तणाव प्रत्यही निर्माण होत असून कायदा अथवा समाजशास्त्रही त्यावर फारसा सुखकर तोडगा काढू शकलेले नाही हे आपण रोजच पाहतो. काळ बदलला नसून माणसे बदलली आहेत कारण काळ घडवणारी मुळात माणसेच आहेत. असे असले तरी जीवनातील व्यामिश्रता आता समाजकेंद्रीत न होता व्यक्तिकेंद्रीत झाल्याने एक भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

आधुनिक विज्ञानाने मानवी जीवनमान वाढले आहे हे खरे आहे पण ते आरोग्यदायी असतेच असे नाही. शारीर व्याधी ते दोन पिढ्यांतील संघर्षमुळे उतारकाळ हा त्रूप्त नव्हे तर वेदनादायक (शारीर आणि मानसिक पातळीवर) बनत चालला आहे. एकाकीपणा, थकलेली वा व्याधीग्रस्त गात्रे, भावनिक आधारांची कमतरता तर कोठे होणारा छळ यातून खुप मोठा वर्ग आज चालला आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत असली तरी ती पुरेशी नाही. ती व्यवस्था व उपचार परवडु न शकणारा तर फार मोठा वर्ग आज अस्तित्वात आहे. अलीकडेच (मे १३) गुजराथमधील एका मराठी दांपत्याने मुलगा व सुनेकडून होणा-या छळाला कंटाळून जिल्हाधिका-याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. अशी असंख्य प्रकट-अप्रकट प्रकरणे नित्यश: घडत असतात. याचा निर्वाह नेमका काय हा आपल्या समाजशास्त्रज्ञांसमोरील मुख्य प्रश्न असला पाहिजे.

व्याधीग्रस्त, दुर्लक्षित अवस्थेत, सृजनशीलतेचा अस्त झाल्यानंतर अपमानित जीवन अन्यांच्या मेहरबानीवर जगणे व तसे जगायला नैतिक व कायद्याचा विचार करून भाग पाडणे हीच अनैतिकता आहे असे म्हणता येते.  कोणत्याही सामाजिक संस्था अशा समस्या पुर्णपणे हाताळू शकत नाहीत कारण अशा घटनांचा विस्फोट होत आहे हे आपल्या लक्षात येईल. अशा परिस्थितीत इच्छामरणाचा निर्णय विचारपुर्वक घेतला जात असेल तर त्याची अंमलबजावणी होण्यास काय हरकत असावी?

इच्छामरण घेऊ इच्छिणा-यावर दडपण आणून असे निर्णय घ्यायला भाग पाडले जाऊ शकते असा एक आक्षेप यावर घेतला जातो. मला वाटते त्याची आधी शहानिशा करत अशा निर्णयांना अपवाद म्हणुन मान्यता द्यायला हवी. किंबहुना भविष्यात ती द्यावीच लागेल.  आत्महत्येचा निर्णय हा क्षणिक भावनिकांतून घेतले जातात. इच्छामरणाचे तसे नाही. आत्महत्या करण्याचे धैर्य सर्वांत नसते. त्यांना वैद्यकीय सहायतेने शांत मरण देता यायला काय हरकत आहे? एखाद्याला तो यातनांतून जात असतांनाही जगायला भाग पाडणे हेच खरे अनैतिक आहे. त्यावर आपल्याला नव्याने चिंतन करायला हवे...

2 comments:

  1. "आत्महत्येचा निर्णय हा क्षणिक भावनिकांतून घेतले जातात. इच्छामरणाचे तसे नाही. आत्महत्या करण्याचे धैर्य सर्वांत नसते. त्यांना वैद्यकीय सहायतेने शांत मरण देता यायला काय हरकत आहे? एखाद्याला तो यातनांतून जात असतांनाही जगायला भाग पाडणे, हेच खरे अनैतिक आहे."

    खुप छान विवेचन केले आहे.

    मी पुर्णपणे सहमत आहे.

    ReplyDelete
  2. ' व्याधीग्रस्त, दुर्लक्षित अवस्थेत, सृजनशीलतेचा अस्त झाल्यानंतर अपमानित जीवन अन्यांच्या मेहरबानीवर जगणे व तसे जगायला नैतिक व कायद्याचा विचार करून भाग पाडणे हीच अनैतिकता आहे असे म्हणता येते. …. …. आत्महत्येचा निर्णय हा क्षणिक भावनिकांतून घेतले जातात. इच्छामरणाचे तसे नाही. आत्महत्या करण्याचे धैर्य सर्वांत नसते. त्यांना वैद्यकीय सहायतेने शांत मरण देता यायला काय हरकत आहे? एखाद्याला तो यातनांतून जात असतांनाही जगायला भाग पाडणे हेच खरे अनैतिक आहे.'
    पहिल्या प्रथमच भाऊ, तुमच्या विचारांशी १०० % सहमत आहे. जगात येण्याची वेळ निश्चित करता येत नसली तरी जाण्याचा निर्णय घेण्याचा, वेळ ठरवण्याचा अधिकार काही जणांना निश्चितच आहे. जेव्हा जीवनात करण्यासारखे काही शिल्लक राहतच नाही आणि जगण्यासाठी वातावरण ( सामाजिक / कौटुंबिक अर्थाने ) जर अनुकूल नसेल तर अशा व्यक्तीवर जीवन जगण्याची सक्ती करण्यात काय अर्थ आहे ?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...