Sunday, August 18, 2013

अभिंत जगण्याचे!

मित्रांनो,
अनंत आव्हाने आणि
समस्यांच्या उद्रेकात कसेबसे
श्वास घेण्याचा प्रयत्न
करत असतो आम्ही.

शोधत असतो विरंगुळा
तप्त सुर्याच्या सावलीत
गात अनंताची गीते
जी आमच्याच
आकलनात आलेली नसतातच कधी.
(पण ते अनंत मात्र गवसल्यासारखे उगाचच वाटत राहते हेही खरे!)

हुरहुर, गमावलेल्या क्षणांच्या
आठवणी धुसर
आणि
मनाच्या तप्त तव्यावर
तडतडणा-या
बालपणीच्या सुखांची
स्निग्ध घुसमट
आणि तरीही
निर्विकल्प जगत जातो आम्ही...

जीवनाच्या आणि
मृत्युच्या
सांदडीत चेमटलेलो आम्ही
भ्रमांच्या भ्रामक जीवन घोटाळ्यांत
सैल लटकलेलो आम्ही
कधी फास घट्ट होईल
हे माहित नसता
दुस-यांना फासात
जखडवणारे आम्ही...

आम्ही करुण स्वरात गात असतो
जीवनगाणे
केवढे उदासवाने
अन
भेसूर...बेसूर
का बरे?

कोठे गेले ते सळसळते उदयचैतन्य?
कोठे गेले ते जीवनमुक्तीचे उन्मुक्त गान?
कोठे गेल्यात लेकाच्यांनो
तुमच्या सळसळत्या जीवन उर्म्या?
कोठे गेले ते तुमचे ते वादळांना धीर देणारे शब्द
आणि
मृतांना जीवनदानाचे ध्यास?

हरवलेल्या श्रेयांना शोधण्याची
पुन्हा पुन्हा
वेळ यावीच का बरे?

चला...उठा...
उध्वस्त करुयात
या जीव गुदमरवणा-या
भावनिक भिंती
स्वागत करायला
चिरंतन सौहार्दांचे
नवनिर्मितीचे
आणि
अभिंत जगण्याचे!


No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...