Wednesday, August 7, 2013

झुंजीमागील झुंज

१९९७
त्या काळात महाराष्ट्रात मुलुखमैदान तोफेप्रमाणे धडाडत असलेल्या श्री. गो. रा. खैरनारांच्या आत्मचरित्राचे हक्क मी मिळवले. तेंव्हा ते पूर्ण लिहून झालेले नव्हते. जे लिहिले गेले होते ते वाचल्यावर त्याला संपादनाची गरज आहे हे लक्षात आले. श्री. अरुण बेलसरे या ज्येष्ठ पत्रकारांवर मी संपादनाची जबाबदारी टाकली. त्यांच्या वारंवार मुंबईत भेटी होत. काम तसे वेगात पुर्ण झाले. बेलसरेंची एक चांगली सवय होती...ते जे बदल सुचवत ते खैरनारांना मान्य आहेत याचा पुरावा म्हणुन त्यांची स्वाक्षरी बदलेल्या भागावर घेऊन ठेवत. कारण खैरनार कितीही आदरणीय व्यक्तिमत्व असले तरी त्यांचा बेफामपणा कधी कधी पुराव्यांच्या मर्यादा ओलांडुन धावत. या काळात माझ्या त्यांच्याही काही भेटी झाल्या. या गृहस्थांना प्रसिद्धीचा अतोनात सोस आहे हेही लक्षात आले. आत्मचरित्रात काय आहे हे ते आगाऊच पत्रकारांना सांगून मोकळे होत. श्री. मोबिन पंडित हे पत्रकार त्यांच्या निकटचे होते. बहुतेक बातम्यांची "निर्मिती" तेच करत. याच काळात मी एका रोमहर्षक खंडणी प्रकरणातून चाललो होतो. त्यामागे पुण्यातील एक मोठा गुंड होता. चाळीस लाखाची नक्त मागणी होती...मी कसला देतोय? पार माझ्या कार्यालयात माझ्यावर रिव्हाल्वर रोखण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. कार्यालयात भयाचे सावट होते. हे मी मोबिन पंडितांना सहज बोललो...दुस-या दिवशी बातम्या झळकल्या..."खैरनारांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार म्हणुन सेनेच्या प्रकाशकाला खुनाच्या धमक्या..." झाले...दुस-या दिवसापासून गनम्यन रवी गायकवाड माझ्या दिमतीला आला. तब्बल दोन वर्ष तो माझ्यासोबत होता. मित्रच झाला. असो. पण सेनेचा यात काही संबंध नाही हे पंडितांना सांगुनही त्यांनी तो खुलासा प्रसिद्ध केला नाही. यात खैरनारांची प्रसिद्धी झाली एवढेच.

एकदा ते माझ्या कार्यालयात आत्मचरित्राच्या निमित्ताने आले होते. योगायोगाने त्याच सायंकाळी माझ्या "The Matallions" या मराठीतील "आभाळात गेलेली माणसं" या कादंबरीच्या अनुवादाचे प्रकाशन होते. मी त्यांना निमंत्रण दिले. ते येतील अशी अपेक्षा नव्हती. पण ते म्हणाले, "जमल्यास येइल, पण व्यासपीठावर बसणार नाही." मी म्हणालो..."ठीक आहे."

सायंकाळी खैरनार कार्यक्रमाच्या ठिकाणी खरेच आले. प्रेक्षकांत बसले. प्रास्तविक उरकते न उरकते तोच त्यांची चिट्ठी आली. "मला व्यासपीठावर बसायचे आहे...पण मी बोलणार नाही." म्हटलं ठीक आहे. त्यांचा पुकारा केला. ते आले. बसले. माझे मनोगत झाले. परत बसलो. वक्त्यांची भाषणे सुरु झाली. काही वेळाने ते म्हणाले..."मला बोलायचे आहे." मला आनंदच वाटला. म्हटलो...ठीक आहे. अध्यक्षीय भाषनाआधी त्यांना बोलायला सांगितले. खैरनार म्हणाले..."मी कादंब-या वाचत नाही. कादंब-या लिहिणे...वाचणे हा मुर्खपणा आहे. मीही वाचत नाही...तुम्हीही वाचू नका..." एवढे बोलून ते आपल्या आत्मचरित्राबाबत बोलू लागले. असो.

त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा दिवस आला. कार्यक्रम मुंबईत...दादरला. य. दि. फडके अध्यक्ष...त्यांच्याच संमतीने निवडलेले. कार्यक्रम चांगला चालला होता. य.दि. बोलायला उठले. पहिले माझ्यावर घसरले...कारण मी यदिंना आधुनिक भिष्माचार्य असे माझ्यामते आदरापोटी संबोधले होते. त्यानंतर ते खैरनारांवर जे घसरले ते घसरलेच. प्रेक्षकांत सन्नाटा. खैरनारांची चुळबुळ. यदिंचे भाषण झाल्यावर त्यांना प्रत्युत्तर द्यायची उबळ आलेली. पण अध्यक्षीय भाषनानंतर कोणालाही बोलता येत नाही...आमचाही नाईलाज झाला. दुस-या दिवशीची वृत्तांकने अर्थातच यदिंच्या वक्तव्यांनी भरलेली होती. आत्मचरित्र खपाच्या दृष्टीने पार झोपले.

खरे तर प्रकाशन समारंभात पुस्तकाची अशी निंदा करने योग्य नव्हते. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होणे टाळु शकत होते. नवजात बाळाचे नांव ठेवण्याच्या कार्यक्रमात..."हे पोरगेच कुलक्षणी आहे..." असे अवलक्षण करू नये याचे भान ज्येष्ठांनी ठेवायला हवे होते. अर्थात खैरनारांनी नेमकी हीच चूक माझ्या कार्यक्रमात केली होती. आपल्याही बाबतीत असे घडू शकते याचे भान त्यांना नव्हते. असो.

त्यानंतर पुस्तक खपेना म्हणुन खैरनार अजुन अस्वस्थ झाले. त्यांनी वृत्तपत्रातून माझ्यावर तोफ डागली..."प्रकाशकाने अत्यंत महत्वाचा व स्फोटक मजकूर जाणुन-बुजून वगळला आहे..." आता मी अस्वस्थ झालो. पण खंडनी प्रकरण आता एके ४७धारी Body Guard असतांनाही थांबायचे नांव घेत नव्हते. पोलीस तक्रार झाली होती. तीन गुंड अटक करण्यात आले होते. (हा किस्सा सविस्तर नंतर कधीतरी अवश्य लिहिल...कारण ती संपुर्ण घटनाच स्फोटक आहे.) यात अडकल्याने मी प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडलो नाही. जो भाग वगळला होता तो बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिगत चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा होता व त्यासाठी त्यांच्याकडे एकही पुरावा नसल्याने त्यांच्या अनुमतीनेच तो भाग वगळला होता. असो.

या पुस्तकाचे इंग्रजी व मराठी  हक्क मी दीड लाख रुपये व १००० प्रती मोफत देवून घेतले होते. हे मानधन फारच जास्त असले तरी ते हे पैसे ट्रस्टच्या नांवाने समाजकार्यासाठी घेत आहेत असे मला माझे मित्र संजय नहार यांनी सांगितल्याने मी खळखळ केली नव्हती. पण मराठीचा कद्रुपणा कसा थांबनार? रविप्रकाश कुलकर्णी यांनी लोकप्रभातून "एवढे कोठे मानधन द्यायचे असते का?" असा प्रश्न मला नेहरू-गांधीजींचा हवाला देवून विचारला. म्हटलो...धन्य आहे. याच महोदयांनी नंतर मी टीव्ही., होर्डिंग्जमधून पुस्तकांच्या जाहिराती केल्या याबद्दलही झोडले होते.

तर हा आहे "एकाकी झुंज" मागील झुंजीचा इतिहास.

http://www.bookganga.com/eBooks/Book/5583567725330868805.htm?Book=Ekaki-Zunja

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...