Saturday, April 26, 2014

दिल्लीवर स्वारी!


दिल्लीचा बादशहा या काळात इंग्रजांच्या ताब्यात होता. हवी तशी शाही फर्माने इंग्रज त्याच्याकरवी काढून घेत त्यामुळे यशवंतरावांनी वारंवार एकत्र येण्याची हाक देउनही अन्य रजवाडे प्रतिसाद देत नव्हते. मोन्सनवरील एवढ्या अशक्यप्राय विजयामुळेसुद्धा अन्य सम्स्थानिकांचे डोळे उघडले नव्हते. एकटा यशवंतराव इंग्रजांना माती चारु शकतो, जर आपण सारे एकत्र झालो तर काय होऊ शकते याचे त्यांना भान नव्हते. तरीही यशवंतराव आशावादी होते. शिंदेंशी असलेले हाडवैर विसरुन त्यांनाही ते संग्रामात सामील होण्याची आवाहने करत होते.

मोन्सनवरील विजयानंतर आता पातशहा शाह आलम (२) याला इंग्रजांच्या तावडीतून मूक्त करण्याचा अत्यंत धाडसी बेत यशवंतरावांनी आखला. पातशहाला सोडवायचे व त्याच वेळीस शिंदे-भोसलेंच्या मदतीने इंग्रजांची राजधानी कलकत्ता जिंकायची आणि इंग्रजांना येथुन गाशा गुंडाळायला भाग पाडायचे हा त्यांचा मनसुबा होता...

भारताच्या इतिहासातील एक दुर्दैवी भाग म्हणजे पातशाही फर्मानांना आलेले अवाजवी महत्व. पातशहा कितीही दुर्बळ, मुर्ख असला तरी ती नष्ट करावी आणि नवी केंद्रीभूत व्यवस्था आणावी असा विचार कोणीही केला नव्हता. त्या मानसिकतेचे सर्वकश चिंतन पुढे आपल्याला करावे लागणार आहे. १८५७ पर्यंत पातशाही फर्मानांचे महत्व इंग्रजांनीही अबाधित ठेवले हेही विशेष. भारतीय जनतेवर बहुदा तख्ताचे अद्भूत गारुड होते. भारतीयांच्या दृष्टीने तीच केंद्रीय सत्ता होती, मग स्थानिक राजवट कोणाचीही आणि कशीही असो. अगदी नाण्यांवरसुद्धा एका बाजुने पातशाही छाप असायचा. पुढे यशवंतरावांनीच दोन्ही बाजुला स्वत:चेच छाप असलेली नाणी पाडून पातशाही केंद्रीय सत्तेलाही आवाहन दिले होते. पण त्याबद्दल पुढे.

मोन्सनच्या भिषण पराभवामुळे इंग्रज गळाठुन गेला आहे तोवर दिल्लीवरच झंझावाती स्वारी करुन, दिल्ली जिंकुन पातशहाला मुक्त करावे हा अत्यंत धाडसी निर्णय यशवंतरावांनी घेतला. यामागे पातशहाला सोडवून आपल्या ताब्यात घेता आले तर नवी फर्माने काढून सर्व राजे-रजवाड्यांना स्वातंत्र्ययुद्धात सहभागी करून घेता येईल अशी यशवंतरावांची रास्त कल्पना होती. ती वास्तवात आली असती तर यशवंतरावांचा संघर्ष एकाकी राहिला नसता.

यशवंतराव वेगाने निर्णय घेणे आणि ते अंमलात आणने यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी तशी वेगाने चालही केली. आपले सैन्य तात्काळ पुनर्गठित केले. जवळपास ६० हजार घोडदळ, १५ ते १६००० पायदळ तसेच १९० ते २०० तोफाही त्यांच्यासोबत आल्या. याच वेळीस त्यांनी अजून एक चाल केली. दिल्लीला जात असता त्यांनी व्यंकोजी भोसलेंना पत्र पाठवुन शिंदेंना सोबत घेत त्यांना कलकत्त्यावर स्वारी करण्याच्या सुचना दिल्या. तेंव्हा इंग्रजांची राजधानी कलकत्त्याला होती. भोसलेंच्या पराक्रमी सैन्याच्या तो पायाखालचा प्रदेश. एकाच वेळीस दिल्ली आणि कलकत्त्यावर आक्रमणे झाली तर इंग्रजांचा पराभव निश्चितच होता. भोसलेंनीही त्याबरहुकुम चाल करतो असे यशवंतरावांना लिहिले खरे, पण दुर्दैवाने शेवटपर्यंत त्यांनी कसलीही हालचाल केली नाही. (नंतर यशवंतरावांनी भोसल्यांना जे पत्र पाठवले ते अंगावर शहारे आणील इतके हृदयविदारक आहे.)

दिल्लीकडे जातांना त्यांनी प्रथम मथुरेवर हल्ला केला. हल्ला होताच तेथील इंग्रज लगोलग शहर सोडुन पळुन गेले. यशवंतरावांनी मथुरेतुन खंडणी गोळा केली व आपल्या इमानी पराक्रमी सैनिकांचे पगार भागवले.

८ आक्टोबर १८०४ रोजी त्यांनी दिल्लीला वेढा घातला. तोफांचा भडीमार सुरु केला. लेफ्ट. कर्नल ओश्टर्लनी व लेफ्ट. कर्नल बर्न हे तेंव्हा दिल्लीचे रक्षण करत होते. इंग्रजांनी यशवंतराव पार दिल्लीवर हमला करेल याची कल्पना केली नव्हती. त्यामुळे ते पुन्हा गडबडुन गेले. सावरताच त्यांनीही प्रतिकार सुरु केला. दिल्लीच्या तटबंदी तशा भरभक्कम. यशवंतरावांनी वेगवेगळ्या आघाड्यांवरुन दिल्लीचा पाडाव करण्याचे प्रयत्न सुरु केले. एकच धुमश्चक्री उडाली. यशवंतराव आपल्या मुक्ततेसाठी आले आहेत ही वार्ता पातशहाला समजताच त्याच्याही स्वातंत्र्याच्या आशा जाग्या झाल्या. खास दरबार भरवुन त्यांनी यशवंतरावांच्या यशासाठी मन्नती मागितल्या व यशवंतरावांना "महाराजाधिराज राज-राजेश्वर अलिजाबहाद्दुर" असा किताब बहाल केला.

इकडे यशवंतरावांची जंग सुरुच होती, वेढ्याचा गच्च फास दिल्लीभोवती त्यांनी आवळला होता.

जनरल लेकला हे व्रुत्त मिळताच तो जमेल तेवढे सैन्य घेवुन दिल्लीच्या रोखाने मथुरामार्गे निघाला.

यशवंतरावांच्या युद्धकौशल्याचा अनुभव ताजा असल्याने सरळ मार्गाने या माणसाला परास्त करता येणार नाही याचे भान त्याला होते. तो अत्यंत कुटील नीती खेळला.

दिल्ली जिंकनार याचा यशवंतरावांना आत्मविश्वास होता. दिल्लीच्या अभेद्य तटबंद्या ढासळू लागल्या होत्या. त्यात दिल्लीच्या रहिवाशांनीही आतून यशवंतरावांना मदत पुरवणे सुरू केले होते. इंग्रजी सैन्य घयकुतीला आले होते. लेकची मदत आली तरच दिल्ली राखता येईल अशी परिस्थिती बनली होती.

पण...

भारतिय इतिहासात असे "पण" खुपदा आले आहेत. स्वातंत्र्याच्या संध्या हातातोंडाशी येवून निसटलेल्या आहेत.

युद्ध ऐन भरात असतांना यशवंतरावांचा जीवलग मित्र, सल्लागार आणि मुख्य सेनानी भवानी शंकर खत्री हा इंग्रजांना फुटला. तो अचानक आपल्या अखत्यारीतील सैन्य घेऊन चालता झाला. त्यामुळे वेढा ढीला पडला. यशवंतरावांच्या सैन्याचे मनोधैर्य या अनपेक्षित घटनेमुळे गारद झाले. या जीवलग मित्राने केलेल्या विश्वासघातामुळे यशवंतरावांना मोठा मानसिक धक्का बसणे स्वाभाविक होते. त्यांच्या सैन्याचीही यात हानी होऊ लागली.  दिल्लीचा वेढा आता पुढे सुरु ठेवण्यात अर्थ उरला नव्हता. त्यात जनरल लेक जवळ येवुन पोहोचला होता. पण तरीही त्याची यशवंतरावांच्या आहे त्या सैन्यावर आक्रमण करण्याचे धाडस त्याला झाले नाही.

पण यशवंतरावांनी वेढा उठवला. अजुन काही फितुर होण्याची आशंका त्यांना वाटत असावी. ऐन युद्धाच्या भरात पुन्हा असे काही खाले तर त्याचे परिणाम अंगलट येणार होते. हातातोंडाशी आलेली जित त्यांना फितुरीमुळे सोडावी लागली.

भवानी शंकरला इंग्रजांनी काय आमिषे देवून फोडले याचा तपशिल माल्कम वा अन्य इंग्रजी साधनांत मिळत नाही. पण ही फोडाफोड करण्यासाठी इंग्रज आधीपासून प्रयत्नांत असावेत.

  आजही तुम्ही जुन्या दिल्लीत गेलात तर चांदणी चौकाजवळ भवानी शंकर खत्रीची हवेली उभी आहे...तिला आजही ओळखले जाते "निमक हराम कि हवेली" म्हणुन, एवढा दिल्लीवासियांच्या मनात खत्रीचा तिरस्कार आजही भरलेला आहे. दिल्लीच्या स्वातंत्र्याचा रस्ता हा भारताच्या स्वातंत्र्याचा रस्ता होता जो या स्वार्थलोपुपामुळे बंद झाला.

वेढा तर उठवला, याचा अर्थ त्यांनी माघार घेतली नव्हती. ते खचले वा निराश झाले नव्हते. ग्रीक मित्थकथेतील महावीर ऒडीसियसप्रमाने अविरत संघर्षाला ते नेहमीच सिद्ध राहिले होते. त्यांनी भरतपुरच्या महाराजा रणजितसिंगांना भेटुन त्यांना या युद्धात सामील करुन घेण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. ते डीगच्या दिशेने निघाले. जनरल लेकला त्यांना अडवण्याचीही हिम्मत झाली नाही. याबद्दल त्याला कंपनी सरकारने नंतर खुप धारेवर धरले होते.

यशवंतरावांनी दिल्ली सोडल्यानंतर दोआब अक्षरशा: उद्वस्त करत ते अयोद्धेच्या नबाबाला येवुन भेटले. पण नबाबाने इंग्रजांची साथ सोडायला नकार दिला. अन्यत्र ते अजुनही पत्रे पाठवतच होते. अगदी भोसले व शिंदेंनाही. पण उपाय लागला नाही. दिल्लीवर स्वारी करण्याआधीच त्यांनी भोसलेंना शिंदेंसह कलकत्त्यावर स्वारी करावी अशी आळवणी केली होती. तसे झाले असते तर इंग्रजांची फौज दुभंगली असती. अत्यंत वेगळ्या आघाड्यांवर त्यांना लढता येणे अशक्य झाले असते. पण ते व्हायचे नव्हते.

भारताला हा फंदफितुरीचा, विश्वासघातांचा शाप कधीपासून लागलाय कोण जाणे?

कि पारतंत्र्यात राहण्यातच लोकांना आणि मुत्सद्दींना आपली सोय वाटत होती?

2 comments:

  1. अतिशय ओघवत्या शैलीत लिहलेले आहे.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...