Sunday, April 27, 2014

भरतपुरचे युद्ध...महायुद्ध!

जनरल लेकने २८ डिसेंबरला, हाती काहीच आले नाही आणि निष्कारण हानी तर झाली हे बघुन, डीग सोडले. या युद्धात होळकरी सैन्याला काहीच फटका बसला नव्हता पण लेकचे मात्र २२७ सैनिक ठार झाले होते. ज्या तोफा हाती आल्या त्या यशवंतरावांनी कर्नल मोन्सनकडुनच जिंकलेल्या होत्या...त्यामुळे गेलेला माल परत आला एवढेच समाधान. यशवंतराव आता भरतपुरच्या किल्ल्यात आहेत आणि भरतपुरच्या जाटाने यशवंतरावांना पाठिंबा दिला आहे ही आता त्याला चिंतेत टाकणारे बाब होती. त्याने मग राजकीय खेळ्याही सुरु केल्या व भरतपुरचा मार्ग धरला. हा यशवंतराव मोन्सनप्रमाणे असाच खेळवत दुरवर नेउन खात्मा तर करणार नाही ना अशीही भिती त्याला होतीच. पण त्याने यावेळीस तसे झाले तरी पर्यायी बटालियन्स ऐन वेळीस मदतीला येतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती.

२ जानेवारी १८०५ ला तो भरतपुरच्या किल्ल्याबाहेर पोहोचला. सात जानेवारीला लेकने किल्ल्यावर तोफांचा भडिमार सुरु केला. पण किल्ल्याच्या अभेद्य भिंती बुलंद राहिल्या. किल्ल्यावरुन यशवंतरावांचे तोपचीही प्रतिकार करत होते. किल्ल्याजवळ येवुन सुरंग लावायची इंग्रज सैन्यात हिम्मत होत नव्हती एवढा तिखट प्रतिकार होत होता..

सतत भडिमाराने दोन दिवसांनी किल्ल्याच्या एका तटाचा काही भाग कोसळला, पण त्याचा फायदा लेकला मिलण्याच्या आतच होळकरी सैन्याने तो लगोलग बुजवुनही टाकला. यामुळे लेक हतबुद्ध झाला. नऊ जानेवारीला मात्र किल्ल्याला पुन्हा भगदाड पाडण्यात लेकला यश आले. होळकरी लोकांनी ते बुजवायच्या आतच हल्ला करण्याची तयारी लेकने केली. सैन्याच्या दोन तुकड्या त्याने हल्ला करत किल्ल्यात घुसण्यासाठी पाठवल्या. पण येथे मात्र होळकरी सैन्य तटाबाहेर येवुन आवेशाने इंग्रजांवर तुटुन पडले. तटापर्यंतही एकही सैनिक पोहोचु शकला नाही. इंग्रज सैन्य पळु लागले. होळकरी सैन्याने पाठलाग करत पळत्यांची कतल केली. या लढ्यात लेकचे स्द्वेना, क्रोसवेल व मेटल्यंड हे अधिकारी ठार झाले व चारशेपेक्षा अधिक सैनिक ठार झाले. ही इंग्रजांच्या द्रुष्टीने खुपच मोठी हानी होती. होलकरी सैन्यातील फक्त २२ वीर या युद्धात ठार झाले.

हा लेकला खरे तर इशारा होता. पण लेकही आता जिद्दीला पेटला होता...कारण त्याचे संपुर्ण भविष्य या युद्धाच्या निकालावर अवलंबुन होते. यशवंतराव हा भारतातील इंग्रजी साम्राज्याआड आलेला एकमेव काटा होता...आणि त्याचे निखंदन होण्यावरच इंग्रजांचे राज्य निर्माण होणार कि फक्त कलकत्त्यावरुन व्यापार करत बसावे लागणार हे ठरणार होते. त्यामुळे त्याचे सर्वशक्तीनिशी हल्ले सुरुच राहिले. जोवर किल्ल्याची भिंत पडत नाही तोवर लेकला आत घुसता येणे व समोरासमोर युद्ध करता येणे अशक्य होते. किल्ल्यावरुन होणा-या तोफांच्या भडिमारात त्याचे रोज नुकसान होतच होते.

त्यात स्वत: यशवंतराव किल्ल्याबाहेर आपला तळ ठोकुन बसले होते. लेकच्या तळांवर ते अचानक हल्ले चढवुन वेढा उठवण्याची शर्थ करत होते. लेकला आपली छावणी त्यामुळे बदलावी लागली व रक्षणासाठी अधिक तुकड्यांची व्यवस्था करावी लागली.

भरतपुरच्या किल्ल्याभोवती ३०-४० फुट रुंदीचा पाण्याने भरलेला खंदक होता. हा खंदक शिड्या व लाकडी फळ्या टाकुन ओलांडुन किल्ल्याच्या दोन नंबरच्या दारावरच हल्ला करण्याची योजना लेकने आखली. तत्पुर्वी त्याच्या टेहळ्यांनी या द्वारावरील सुरक्षा, होलकरांचे तेथील बळ याचा पुरता अंदाज घेतला होता. हे दार पडले तर आत सर्वशक्तीनिशी घुसुन होळकरांचा पराभव करण्याची त्याची योजना ह्पोती. लेफ्ट. कर्नल मेक्रायकडे या आक्रमणाचे नेत्रुत्व दिले गेले. या दाराकडे शत्रुचे लक्ष जावु नये यासाठी दुस-या बाजुने किल्ल्यावर भडिमार सुरु केला.

कर्नल मेक्रायने खंदक ओलांडायचा प्रयत्न सुरु केला. खंदकावर शिड्या अंथरुन लाकडी फळ्या टाकल्या. तोवर होळकरांकडुन एक गोळीही झाडली गेली नाही. जणु त्या द्वाराच्या रक्षणासाठी कोणी नव्हतेच!

पण होळकरी सैन्याने अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी खंदकाच्या वरच्या बाजुला छोट्या बांधात भरपुर पाणी अडवुन ठेवले होते. जसे इंग्रजी सैन्य फळ्यांवरुन खंदक ओलांडायला झेपावले तसे त्यांनी अचानक पाणी सोडले आणि एकाएकी खंदक ओसंडुन वाहु लागला....फळ्या व त्यावरील माणसे त्या लोंढ्यात गटांगळ्या खात वाहुन गेले. एकच अफरातफर माजली. ईंग्रजी सैन्य या अनपेक्षीत प्रकाराने हबकुन गेले. त्यातुन ते सावरतात न सावरतात तोच अचानक बंदुका त्यांच्यावर वर्षायला लागल्या. इंग्रज धदाधड कोसळु लागले. जगले वाचले ते पळत सुटले.

या हल्ल्याच्या नादात इंग्रजांना आपले ५०० सैनिक तर गमवावे लागलेच पण लेफ्ट. कर्नल मेक्राय आणि अन्य दोन अधिकारीही ठार झाले. हा लेकला अजुन एक जबरी फटका होता. यशवंतरावांची युद्धनीति त्याला अजुन समजायची होती. गनीमी कावा कशाला म्हनतात हेही शिकायचे होते.
त्यात आता खुद्द यशवंतराव आपल्या निवडक सैनिकांच्या तुकडीसह किल्ल्याबाहेर पडुन लेकच्या छावण्यांवर हल्ले करु लागले होते हे आपण पाहिलेच. लेकने हा वेढा उठवावा व येथुन निघावे अशी त्यांची योजना होती. यशवंतरावांनी दुरद्रुष्टीने अमिरखानाला बुंदेलखंडात पाठवुन दिले. अमिरखानने तिकडे बुंदेलखंड (आता इंग्रजांच्या अखत्यारीत) पुरता उध्वस्त करुन लुटायला सुरुवात केली. ही सारी लुट त्यालाच मिळणार असल्याने तो उत्साहात होता. आणि यशवंतरावांपासुन घरभेदी दुर गेल्याने आपल्या योजना गुप्त ठेवता येवु लागल्या होत्या.

येथे अमिरखानाबाबत थोडे सांगायला हवे. खत्रीप्रमाणेच अमिरखानानेही इंग्रजांशी हातमिळवणी केलेलीच होती, पण त्याने यशवंतरावांबरोबरच राहुन इंग्रजांना आतुन मदत करावी असा त्यांच्यात करार झाला होता. त्या बदल्यात त्याला टोकची जहागीर कायमस्वरुपी देण्याचे वचन इंग्रजांनी दिलेले होते. थोडक्यात अमिरखान हा दुहेरी भुमिका निभावु लागला होता. यशवंतरावांवर फरुकाबादेत झालेला हल्ला व डीगच्या लढाईत हाती-तोंडी आलेले यश हरपवायला अमिरखानाने मोठा वाटा उचलला होता. सेनापतीच फितुर असेल तर दुसरे काय होणार? अमिरखान हा लालची निघाला. दोन्हीकडुन जे मिळेल ते मिळवायची त्याची नीति होती. यशवंतरावांनी त्याच्या याच स्वभावाचा फायदा घ्यायचे ठरवुन ती ब्याद दुर पाठवली. इंग्रजांना काही सैन्य बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी पाठवावे लागणार होते व लक्षही विचलीत होणार होते. आणि तसे झालेही.

त्यामुळेच २१ जानेवारी ते २० फ़ेब्रुवारी या प्रदिर्घ काळात लेकने किल्ल्यावर एकही हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला नाही. बुंदेलखंडात त्याला काही सैन्य पाठवावे लागले व पर्यायी बटालियन्स व दारुगोळा येण्याची वाट पाहणे व नव्या योजना आखत बसणे त्याच्या नशीबी आले. यशवंतराव मात्र किल्ल्याबाहेरील आपल्या तळावरुन लेकच्या तळावर छापे घालुन त्याला हैरान करतच होते.

इंग्रजांवर किल्ल्याबाहेर येवुन सर्वशक्तिनिशी हल्ला करता येणे शक्य असतांनाही यशवंतरावांनी तसे का केले नाही असा प्रश्न काही नरवणेंसारखे इतिहासकार उपस्थित करतात. वस्तुस्थिती ही आहे कि अमिरखान इंग्रजांना मिळालेला आहे व वरकरणी आपल्यासोबत असल्याचे नाटक करतो आहे हे यशवंतरावांना कळुन चुकले होते. त्यात इंग्रज वकील खुद्द जाट राजा रणजितसिंहास भेटुन यशवंतरावांचा पाठिंबा काढुन घेण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत आहेत हेही त्यांना समजलेले होते. जाट राजा बदलु नये अशी आशा असली तरी प्राप्त स्थितीत काही सांगता येत नव्हते. शिवाय ते अजुन काही राजे आपल्या बाजुने मदतीला उभे राहतील व ठिकठिकाणी इंग्रजांविरुद्ध युद्धे सुरु करता कशी येतील या प्रयत्नांतही होते. त्यामुळे लेकला दमवत रहायचे आणि मगच निर्णायक लढाई करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असने स्वाभाविक होते. आपले कमीत कमी नुकसान होवुन त्यांना लेकची जिरवायची होती. आजवर सर्वाधिक नुकसान तर लेकचेच झालेले होते. त्याउलट यशवंतरावांची हानी अत्यल्प होती.

लेक वाट पहात होता ती किल्ल्याला भगदाडे पाडु शकतील अशा दारुगोळ्याची व अधिक बटालियन्सची. ती पोहोचताच त्याने अंतिम संघर्षाचा पवित्रा घेतला. बाजुने उंच मचाने बांधुन त्यावर तोफा चढवल्या. त्यामुळे तोफगोळ्यांचा भडिमार किल्ल्याच्या आत पोचुन प्रचंड हानी करता येणार होती. सर्व तयारी झाल्यानंतर २० फेब्रुवारीला मात्र त्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याने प्रचंड दारुगोळा वापरला. तोफगोळे किल्ल्याच्या आत जसे वर्षले जात होते तसेच तटावरही. ३-४ तासांच्या सलग भडिमारानंतर किल्ल्याला मोठे भगदाड पडले. लेकने क्यप्टन टेलरच्या नेत्रुत्वाखाली सैन्याला किल्ल्यात घुसण्याचा आदेश दिला. इंग्रज सैन्य जोरकस चाल करुन पुढे सरकले.

पण हा प्रयत्न पुरता अयशस्वी झाला. या सैन्यावर ज्या आवेशाने होळकरी सैन्याने प्रतिहल्ला चढवला त्याला तोड नाही. तोफा, बंदुकांचा अजस्त्र भडिमार सुरु झाला. भगदाडातुन इंग्रज आत जावु शकले नाही पण त्या भगदाडातुन होळकरी सैन्य बाहेर आले आणि इंग्रज सैन्यावर तुटुन पडले. इंग्रजी सैन्याला माघार घ्यावी लागली. या युद्धात पुन्हा त्यांचे ५-६०० सैन्य गारद झाले. लेकला हा मोठा झटकाच होता. कारण या पराभवामुळे सैन्याचे मनोधैर्यच खचले होते.
दुस-या दिवशी लेकने आपल्या सैन्याच्या परेडसमोर भाषण दिले. सैन्याचे मनोधैर्य उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तोही फार मोठा सेनानी होता. त्याचे नेत्रुत्वगुण अद्भुत होतेच. त्याने त्याच्या सैन्याला कालचा पराभव विसरुन नेटाने आज यश मिळवण्यासाठी आवाहन केले. सैनिकांत पुन्हा प्राण संचारला.

लेकने त्या दिवशी उरली सुरली सर्व शक्ती पणाला लावुन हल्ला केला. पण होळकरी सैन्याने जो भिषण प्रतिकार केला त्याला जागतीक इतिहासात तोड नाही. किल्ल्याच्या तटावरुन तोफा, बंदुका, रोकेट्स, एवढेच काय पण दगडधोंड्यांचांही एवढा जबरदस्त मारा केला कि त्यात लेकचे अर्ध्याहुन अधिक सैन्य गारद झाले. साडेचार तास चाललेल्या या भिषण युद्धात होळकरी सैन्याने जी अमित पराक्रमाची शर्थ केली ती कोठेही अन्यत्र आढळत नाही. या युद्धात जे उरले सुरले सैन्य होते ते वाट फुटेल तिकडे पळत सुटले. जे घायाळ होवुन रणांगणावर पडले होते त्यांना उचलुन नेण्याची शुद्धही इंग्रजी सैन्याला राहिली नाही. खरे तर इंग्रजी सैन्य हे अशा शिस्तीसाठी प्रसिद्ध होते...पण दुस-यांदा त्यांची शिस्त मोडली होती. त्या घायाळांवर होळकरी सैन्याने कसलीही दया दाखवली नाही. त्यांना किल्ल्याबाहेर पडुन होळकरी सैनिकांनी ठार मारले. लेकला असा पराभव आजतागायत स्वीकारावा लागला नव्हता. लेकचे यशवंतरावांना जिंकण्याच्या प्रयत्नाच्या नादात ३२९२ सैनिक ठार झाले. त्यात १०३ युरोपियन होते. क्यप्टन टेलर, लेफ्ट. कर्नल डोन, क्यप्टन ग्रांट हेसुद्धा या युद्धात ठार झाले. यशवंतराव अजिंक्यच राहिले.

या युद्धातील अभुतपुर्व विजयामुळे यशवंतरावांना पुढे भारताचे नेपोलियन म्हणुन युरोपियन जगतात ओळखले जावू लागले.

या युद्धाने जगज्जेत्या शत्रुचे कंबरडे मोडले होते. त्यांचा गर्व चकनाचुर झाला होता...त्याचा मानहानीकारक पराभव झाला होता......आता इंग्रज देशाबाहेर हाकलणारच ही उमेद जागी होणे स्वभाविक होते.

पण...

या पण आणि परंतुंनी यशवंतरावांच्या जीवनात थैमान घातले होते.

2 comments:

  1. Someday I will have ample of money and will produce a movie on the life of Maharaja Yashwantrao Holkar ! Already started investing .

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...