Tuesday, April 29, 2014

स्वातंत्र्य सर्वोपरी!

इंग्रजांशी शांततेचा तह झाल्यानंतर यशवंतरावांना खरे तर आनंद व्हायला हवा होता. इंग्रजांशी युद्धबंदी करण्याच्या बदल्यात त्यांना अन्य कोणाही संस्थानिकाला न मिळालेली सार्वभौमता मिळाली होती. पण ते अंतर्यामी अस्वस्थ होते. इंग्रजांचे पाऊल या भुमीतून पुर्णत: उखडून फेकता आले नाही...कोणीही साथ दिली नाही याची खंत होती. पुढेही आपल्याला हा लढा एकाकीच लढावा लागणार आहे याची बहुदा त्यांना पुर्णत: जाण आली असावी.

सतलज व व्यासगंगेच्या दोआबातून १५ फेब्रुवारी १८०६ रोजी व्यंकोजी भोसलेंना त्यांनी एक पत्र पाठवले. त्यातील उपहास, वेदना आणि खंत अंगावर येतात. ते मुळातुनच येथे देतो...

"राजश्री व्यंकोजी भोसले सेनाधुरंदर गोसावी यांस सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य, स्नेही यशवंतराव होळकर रामराम उपरी.

स्वराज्यात जलचरांचा प्रसार विशेष झाला. हा घडून येण्यास्तव, महाल मुलकाची आशा न ठेवती कळेल त्याप्रमाणे फौज व कंपू वाढवून, करोडो रुप्यांचे पेचात येऊन, आज दोन-अडीच वर्ष होत आली, रात्रंदिवस इंग्रजांसी मुकाबल्याचा प्रसंग घडत आला. दरम्यान राजश्री दौलतराव सिंदे यांची मेळ करून भेट घेतली. त्यांचे आपले एक विचाराने पगडीवाले सामील राहतीलच, याभावे आपल्याकडे पत्रांच्या रवानग्या होत गेल्या. मेवाडप्रांती आलियावर ताम्रांस चोहोकडून पायबंद देऊन हारीस आणावे यास्तव पंजाबापावेतो यावयाचे केले. इकडे लाहुरवाले वगैरे शीखांच्या भेटी होऊन सर्व सामल झाले. पोख्त जमाव झाल्यामुळे फिरंगी मागे पंचवीस तीस कोसांचे अंतराने येत गेले. त्यांनी पट्यालाचे मुक्कामापासून समेटाचे बोलणे लाविले. इकडील तयारी पाहून सोबत्यांनी राजेरजवाडे अनुकूल करुन दिल्लीचे सुमारे येऊन शह द्यावा, ते न करता, कारभारी दुराशेत येऊन पुन्हा त्याची एकोपा ठेऊन मेवाडात राहिले.

पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहूत. येणे करोन आज पावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता. हल्लीच्या आपसांतील चाली पाहून सर्वास आपले घर रक्षण करून जमीनदारीने असावे हे प्राप्त झाले. आपले येण्याची प्रतीक्षा होतीच. तो योग न आला. फौज सामल होईल हे कागदोपत्री श्रवण मात्र झाले; अथवा तिकडेच बंगाल्यात वगैरे बल धाडले असते तरी किती उपयोग घडता!

हिंदू धर्मास मुख्य आपले इरादे नमूद असावे ते काही दिसण्यात येईना. स्वधर्मास एक आमचा नफा, वरकडांची नुकसानी असाही अर्थ नाही. सर्वत्रांची उमेद, अनुभव व प्रत्यय पाहून अंग्रेजांकडून समेटाचे बोलणे झाले होते, त्यावरून समेट करुन घेतला. फिरंगी कूच करून माघारे दिल्लीप्रांती गेले. आमचे मुक्काम व्यासगंगा व सतलज नदीचे द्वाबात आहे. इत:पर दरकूच माळवा प्रांती यावयाचे घडेल. वरकड घरोब्याचे विचार सनातन आहेत. ते यथाक्रम चालवावे. इकडील दुसरा अर्थ मानू नये. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंती. मोर्तब."

पत्र पुरेसे बोलके असल्याने त्यावर मी अधिक भाष्य करत नाही. सारा देश सूप्त असतांना एक मनुष्य एकाकीपणे झुंजत होता, त्याला ताम्र-जलचर (इंग्रज) या भुमीवर नको होते. त्याचा लढा संपला नव्हता. माळव्यात परत येताच त्यांनी सर्वप्रथम आपली राजधानी भानपुरा या आताच्या मंदसोर जिल्ह्यातील शहरात हलवली. इंग्रज आता आपल्याला तोफा देणार नाहीत याची खात्री पटल्याने तेथे त्यांनी तोफा ओतण्याचा मोठा कारखाना काढला. घरभेदी अमिर खान वरकरणी तरी त्यांच्यासोबतच होता. मैत्र स्मरून त्याला त्यांनी टोंकची जागीर कायम केली आणि तिकडेच ठेवले. आपले मनसुबे त्यांना आता त्याच्याशी वाटायचे नव्हते. या सा-या प्रदिर्घ युद्धात यशवंतरावांची सैन्यशक्तीही कमी झालेली होती. खत्री व अमिरखानाबरोबर सैन्याचे विभाजनही झालेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती सुरु केली. जुन्या बटालियन्स मोडुन नवी रचना सुरु केली. युरोपियन युद्धतंत्रावर त्यांची हुकुमत होतीच. त्यांनी आपल्या दोन अवाढव्य पलटनींची पुनर्रचना करत मोठ्या-मध्यम व छोट्या आकारात विभाजन केले केले. देशभरातुन उत्तमोत्तम घोडे खरेदीचा सपाटा लावला. त्यांची कन्या भिमाबाई होळकर उत्कृष्ठ अश्वपरिक्षक असल्याने हे कार्य तिच्यावर सोपवले गेले. नवीन सैन्याला कठोर प्रशिक्षण दिले जावु लागले. एक लक्ष प्रशिक्षित सैन्य उभारण्याच्या दिशेने त्यांनी वेगाने वाटचाल सुरु केली. कारखान्यात रात्रंदिवस तोफा ओतायचे काम सुरु होते. मेजर माल्कम हा यशवंतरावांचा कडवा विरोधक, पण तो म्हणतो, स्वत: यशवंतराव अनेकदा फाउंड्रीत तोफा ओतायचे काम करत असत. द्धेयाशी एवढी निष्ठा कोणातही आढळुन येणार नाही. आपल्या राज्यात आल्या आल्या, खरे तर एवढी दोन-अडिच वर्षांची दौड, सततची जीवघॆणी युद्धे, जीवावरची संकटे यातुन निघालेल्या कोणत्याही माणसाने शांततेचा उपयोग काही काळ तरी विश्रांतीसाठी केला असता...पण यशवंतराव खरच अजब रसायन होते. येताच ते कामाला भिडले होते.

या मागे त्यांचे कारण होते...योजना होती.

हे लाखाचे सैन्य आणि दोनशे मोठ्या तोफा त्यांना हव्या होत्या...

कारण त्यांनी स्वत:च सरळ कलकत्त्यावर आक्रमणाची योजना आखली होती. ज्याबद्दल ते भोसलेंना सांगुन थकले होते ते कार्य आता ते स्वत:च करणार होते. त्यांना भारतात इंग्रज नको होता. देशाचे स्वातंत्र्य सर्वोपरी होते...स्वत:ची विश्रांती नाही! 

2 comments:

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...