Sunday, September 7, 2014

शंकराचार्य आणि हिंदू धर्म



feature size
भारतात मजबूत हिंदुत्ववादी सरकार अस्तित्वात आल्यानंतर वैदिकवादाचा उद्घोष होणार हे उघडच होतं. स्मृती इराणींनी शिक्षणपद्धतीत गौरवशाली ‘वैदिक विज्ञान’ कसं समाविष्ट केलं जाईल याचं सुतोवाच केलं तर घग्गर-हक्रा नदी हीच वैदिक सरस्वती नदी कशी याचं संशोधन करायला नवनियुक्त्या झाल्या. मग शंकराचार्य कसे मागे राहतील? मूळ धर्म कोणता हेच माहीत नसलेल्या साईबाबांची वाढती लोकप्रियता त्यांना आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांना कशी सहन होईल? ते नुसता विरोध करून थांबले नाहीत तर झारखंडमधील कर्वधा इथे भरवलेल्या धर्मसंसदेत एका महिन्याच्या आत सर्व मंदिरातील साईमूर्त्या हटवल्या जातील असंही घोषित केलं. साईबाबा हे देव नाहीत असा त्यांचा निर्वाळा आहे. अयोध्येतील राम मंदिर बनवण्यासाठीही ठराव केला गेला. याच धर्मसंसदेत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि साईभक्तात चांगलीच जुंपलीसुद्धा! हिंदुत्वाचा तमाशा म्हणतात तो हाच.

पहिला प्रश्न असा आहे की कोणालाही देव मानावं काय? सुबुद्ध नागरिक या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच देतील. मग ते राम-कृष्ण का असेनात! पण साई हिंदू की मुसलमान हा खरा कळीचा मुद्दा बनल्याने आणि बहुदा ते मुस्लिमच असल्याचा ठाम समज असल्याने एका फकिराला हिंदुंनी देवत्व द्यावं हे मानवी शंकराचार्यांना कसं सहन होणार? त्यात शिर्डी देवस्थानाकडे आणि साईबाबांच्याच नावे निघालेल्या अनेक संस्थानांकडे पैशांचा जो प्रचंड ओघ आहे ती तर मोठीच पोटदुखी ठरली असणंही स्वाभाविक आहे.

पण खरा प्रश्न हा आहे की शंकराचार्य हिंदू आहेत हे कोणी ठरवलं? ते हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करतात ते कोणत्या अधिकाराने? खरं तर आदि शंकराचार्यांनंतरची पीठं ही वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करत आली आहेत. या पीठांचं नियंत्रण हिंदू नव्हे तर काशीची विद्वत परिषद आणि भारत धर्म महासंघ करत असतात. या दोन्ही संस्था वैदिक धर्माश्रयी आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांच्या धर्मभावनांचं तुष्टीकरण करणं हाच शंकराचार्य पीठांचा ध्यास राहिलेला आहे. सर्वसामान्य मूर्तिपूजक हिंदुंना या पीठांशी सामान्यतः काहीही घेणंदेणं नसतं ही बाब इतिहासानेच सिद्ध करून दाखवली आहे. कारण त्यांच्या धर्माचा शंकराचार्यांच्या धर्माशी काहीही संबंध नाही.

आदि शंकराचार्य हे शैव आणि तंत्रमार्गी होते. त्यांनी जे चार मठ स्थापन केले ती सारी शैवस्थानं आहेत. भारतात सर्वव्यापक असलेला धर्म हा शैवांचा आहे हे देशभर खेडोपाडी पसरलेली लक्षावधी शिव आणि देवीमंदिरं पाहिली तरी सहज लक्षात येईल. उलट वैदिक धर्माचे अनुयायी अत्यल्प असून धर्मस्थानं बळकावत वैदिक झेंडे फडकावण्यापलीकडे कसलंही धर्मकार्य त्यांच्या नावावर जमा नाही. आज किमान पीठं आणि उपपीठं मिळून चारचे वाढत वाढत सोळा शंकराचार्य मिरवत आहेत. या पीठांचा इतिहास कटकारस्थानं आणि कधी खुनांनीही भरलेला आहे. जोवर नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून मिरवत होता तोवर हे शंकराचार्य नेपाळनरेशांना अभिवादन करायला नेपाळ वार्या करत असत. मालेगावच्या दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी दयानंद पांडे हाही एक स्वयंघोषित शंकराचार्य. कांचीचे जयेंद्र सरस्वती तर खुनाच्या आरोपात जेलयात्रा करून आलेले. शंकराचार्य पीठांचे वाद इस्लामकाळात मोगल दरबारात तर ब्रिटिशकाळात कोर्टकचेर्यात अडकलेले.
बद्रिकेदार येथील ज्योतिर्मठाला अठराव्या शतकापासून ते थेट १९४१पर्यंत, तब्बल १६५ वर्षं कोणी शंकराचार्यच नव्हते. कारण दावेदारांची संख्या मोठी. हा वाद ब्रिटिश न्यायालयात पिढ्यान्पिढ्या सुरू राहिला. दरम्यान दोन दावेदार शंकराचार्य बद्रिकेदारला मठाला कुंपणं घालून शेजारी शेजारी ठाण मांडून बसले. शेवटी १९४१ साली स्वामी ब्रह्मानंद सरस्वती आपला दावा पुढे रेटण्यात यशस्वी झाले. या स्वामींचं १९५३मध्ये निधन झालं. त्या काळात अफवा पसरली होती की त्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला. याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत. पण मालमत्तेसाठी मात्र अनेक दिवाणी दावे दाखल केले गेले. त्यामुळे जरी ब्रह्मानंद सरस्वतींनी संतानंद सरस्वतींची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली असली तरी त्यांना शंकराचार्य बनता आलं नाही. त्याजागी आलं करपात्रीस्वामींचं नाव… पण त्यांना शंकराचार्य होण्यात रस नव्हता. त्यापेक्षा त्यांनी अखिल भारतीय धर्मसंघाचं प्रमुखपद स्वीकारलं.

खरं तर शंकराचार्यांच्या नियुक्त्या या बाह्य प्रभावांमुळेच होतात. त्यात विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय धर्मसंघ, काशी विद्वत परिषद इत्यादी यांचाच मोठा हात असतो.

या धर्मपीठांना जोडून सात आखाड्यांचीही निर्मिती कालौघात झाली. हे दसनामी म्हणवणारे जुना आखाडा, निरंजनी, महानिर्वाणी, आनंद, अटल आव्हान, अग्नी आणि ब्रह्मचारी आखाडे शंकराचार्यांची मसल पॉवर आहेत की काय असं वाटायची स्थिती आहे. १९९८च्या कुंभमेळ्यात जुना आखाडा आणि निरंजनी आखाड्याच्या साधुंनी दंगल केली, मध्वाश्रमांच्या खोल्यांवर हल्ला करून त्यांना मारहाणही केली. त्यासाठी भाडोत्री गुंडही वापरले गेले अशा शक्यता त्यावेळी वर्तवल्या गेल्या होत्या. यामागे कारण हे होतं की मध्वाश्रमांनी १९९७ मध्ये नेपाळच्या राजांची भेट घेऊन जोतिर्मठाचे शंकराचार्यपद आपल्याला मिळावं यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला होता आणि त्यांच्या दुर्दैवाने त्याचवेळीस कांचीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वतीही तिथे पोहोचले होते. तिथे नेमकं काय झालं याचं वृत्त ‘रायझिंग नेपाळ’ने दिलं नसलं तरी मध्वाश्रमांवरील हल्ल्यांमागे अन्य दोन शंकराचार्य असल्याची चर्चा होती.

थोडक्यात शंकराचार्य पीठांचा इतिहास हा प्रेरणादायी नाही. नवव्या शतकापासून ते आजतागायत या पीठांनी भारतीय सामाजिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी कसलाही प्रयत्न केल्याचं उदाहरण नाही. धार्मिक विवादातही त्यांनी कसलीही भूमिका घेतलेली नाही. असं असताना, पूर्वपरंपरा नसताना शंकराचार्यांनी धर्मसंसद भरवावी आणि चक्क धर्मादेश जारी करावेत यामागील अन्वयार्थ लक्षात घ्यायला पाहिजे.

मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मुळात सर्वच शंकराचार्य वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करतात. या धर्मात खरं तर शिव-पार्वती-गणपती ते सर्व छोटे-मोठे देव बसत नाहीत. कारण त्यांचा साधा उल्लेखही वैदिक साहित्यात येत नाही. यज्ञ हे वैदिकांचं खरं कर्मकांड तर इंद्र-वरुणादी देवता, ज्या कोणीही सामान्य हिंदू भजत-पूजत नाहीत त्या त्यांच्या देवता. या धर्माचं सामाजिक तत्त्वज्ञान मनु ते देवलस्मृत्यांत ठासून भरलं आहे. त्या स्मृत्यांना वा त्यांच्या वेदांना अवैदिक शैवप्रधान धर्मियांनी किमान दहाव्या शतकापर्यंत तरी भीक घातल्याचं उदाहरण नाही. खरं तर भारतीय वैदिक संस्कृतीचं आचारधर्मावर कसलंही सावट नाही. पण खुद्द आदि शंकराचार्यांचे मठ बळकावणारे, आदि शंकराचार्यांनाही वैदिक शिक्का मारणारे अन्य केवढी सांस्कृतिक उचलेगिरी करू शकले असतील याची कल्पना येते. वैदिकांनी बुद्धाला विष्णुचा दहावा अवतार घोषित करत त्या धर्मालाही ओहोटी लावली. शेकडो शैवस्थानांचा ताबा घेण्यासाठी ऋग्वेदातील रुद्र आणि शिव एकच असं सांगत तीही लुबाडणूक करण्याचा चंग बांधला. हे कार्य अत्यंत पद्धतशीरपणे केलं गेलं. साईबाबा देव नाही असं म्हणताना त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की साईप्रमाणेच शिवादी अगणित पुरातन देवताही वैदिक देव नाहीत. तरीही वैदिक माहात्म्य जोपासणं हा त्यांचा उद्योग असल्याने त्यांना हिंदू धर्माचे प्रतिनिधी मानता येत नाही आणि तसं प्रतिनिधित्व हिंदुंनी त्यांना दिलेलं नाही. काशी विद्वत परिषद ही वैदिकांची सर्वोपरी संस्था असून त्याच्या कारभाराची माहिती सामान्य हिंदुंनाही नसते हेही उल्लेखनीय आहे.

यातून हिंदू धर्माचं अपार नुकसान झालं हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. सहिष्णू असलेल्या हिंदुंना कट्टर बनवण्याचं कार्य रा. स्व. संघाच्या स्थापनेपसून जसं सुरू झालं तसतसं शंकराचार्यही आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी पुढे सरसावलेले दिसतात. आता हिंदुत्ववादी सरकार आल्याने वैदिक अजेंडा पुढे सरकवणं सोपं जाईल असं त्यांना वाटलं असल्यास नवल नाही आणि अवैदिक हिंदुंना स्वतंत्रपणे एकत्र बांधेल असं धर्मपीठही दुर्दैवाने अस्तित्वात नाही. त्यामुळे आचरणातील व्यवहार धर्म अवैदिक असला तरी वैदिक वर्चस्ववादामुळे समाज-धार्मिक समस्या सुटण्याऐवजी जटिल बनल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, जातिंतील वैदिकांच्या अनुकरणातून आलेली वर्णव्यवस्थेतील उतरंडीची कल्पना, अस्पृश्यता, स्त्रियांना मंदिर प्रवेश इत्यादी याबाबत वैदिक कधीही निर्णय घेणार नाहीत. कारण हे लोक आपल्या धर्माचे नाहीत याबाबतचं असलेलं त्यांचं स्पष्ट भान. सामान्य हिंदू त्यांना वैदिकांचे तारणहार वाटतात. त्यांचं धर्मज्ञान वाढावं हा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना वैदिक-भ्रमी बनवणं त्यांना सोयीचं आहे. त्यामुळे त्यांचा वर्चस्ववाद कायम राहतो हे सर्व अवैदिक हिंदुंनी लक्षात घेतलं पाहिजे.

धर्मसंसदेची ही नवीन संकल्पना पुढे घातक बनण्याची शक्यताच अधिक आहे. साईबाबांना अथवा कोणाला काय मानावं याचं व्यक्तिस्वातंत्र्य या देशाच्या घटनेने दिलं आहे. जोवर हे स्वातंत्र्य लोकोद्रपवी बनत नाही तोवर त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ऊठसूट फतवे काढणार्या मुल्ला-मौलवींवर सातत्याने ताशेरे ओढणार्यांनी तोच कित्ता गिरवावा याचा अर्थ एकाच घटनेपुरता घेऊन चालणार नाही. व्यक्तिगत जीवनावरही हे फतवे कट्टरतावाद्यांमार्फत आघात करू शकतात याचं भान आपल्याला असायला हवं.

भाजप सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाची ही एक फलश्रुती आहे. धर्ममार्तंडांचं वाढणारं स्तोम आणि त्यावर होणार्या जहालवादी चर्चा या देश कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे याची चिन्हं दर्शवत आहे. शालेय अभ्यासक्रमापासून त्यात बदलांचे संकेतही आहेत. शिक्षक दिनाला देशभरातील सर्वच शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं/पाहिलंच पाहिजे हा केंद्र सरकारचा अध्यादेश तर अधिकच भयावह आहे. हुकूमशाही देशातच असले आदेश निघू शकतात. पंतप्रधानांना भाषण करायला कोणी अडवलेलं नाही. पण त्यातून जो ‘सक्ति’चा संदेश जातो आहे तो घटनेला धरून आहे काय यावरही आपल्याला चर्चा करावी लागणार आहे, जमेल तसा निषेध करावा लागणार आहे. यामुळे याच दिवसाचं स्वप्न पाहणार्या कट्टरतावाद्यांचं फावणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी नसले तरी स्वयंघोषित आचार्यांप्रमाणे तसं मानत हिंदुंच्या धर्मजीवनात हस्तक्षेप करण्याचा वैदिक धर्ममार्तंडांना कसलाही अधिकार नाही हेच सर्व हिंदुंनी त्यांनाही बजावून सांगण्याची वेळ आली आहे.

खरं तर देवदेवतांच्या जंजाळातून सुटत जात मोकळा श्वास घ्यायची शक्यता निर्मण करण्याऐवजी असे वैदिक फतवे निघत गेले तर सर्वसामान्य अजूनच जिद्दीने देवदेवतांना कवटाळत जातील याचंही भान असलं पाहिजे. देवाला सार्या सृष्टीचा निर्माता, शक्ती मानतात, त्यालाच भिक्षेकरी मानत दान देणारे कोणत्या मनोवृत्तीचे म्हणावेत? याला देवधर्म म्हणत नाहीत. साईबाबा आजीवन फकिरीत जगले आणि प्रेमाचा संदेश देत राहिले. त्यांनाच सोनेरी मुकुट, सिंहासन देणारे धर्मविकृत नाहीत तर काय आहेत? सर्वांनी यावर चिंतन केलं पाहिजे. धर्म हा मानवी जीवन श्रद्धेचं मनोबळ घेत सर्वच उपेक्षित-वंचितांचं जीवन सुकर करण्यासाठी असतो… देवतांना श्रीमंत करत जाण्यासाठी नव्हे हे आपल्याला समजायला हवं!
- संजय सोनवणी

(कलमनामात नुकताच प्रकाशित झालेला माझा लेख.)

32 comments:

  1. great ! fantastic !

    ReplyDelete
  2. सर ,
    आपण विषय जबाबदारीने मांडला आहे- अभिनंदन !
    भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू या जगण्याला एक प्रचंड अडगळ म्हटले आहे ते अगदी खरे आहे
    आपल्या धर्मात - मग त्याला कोणतेही नाव द्या - खूपच स्वातंत्र्य आहे - त्यामुळे सर्वाना आपापल्या मताप्रमाणे अर्थ लावायची मोकळीक आहे
    व्यक्तीशः साई बबाना काहीही म्हटले तरीही माझे काहीही बिघडत नाही - उद्या कुणी त्यांना डुक्कर म्हटले तरी काहीच फरक पडत नाही - कारण साई भक्त हे काहीतरी मागायला जात असतात - इथेच सर्व गाडे फसते -मग मनात , नवस , गंडेदोरे असा पोरखेळ सुरु होतो

    जशी पाच कोसावर भाषा बदलते तसेच धर्माचे आहे !
    इथे बसून आपण कल्पनाही करू शकत नाही अशा श्रद्धा आपल्या शेजारच्या प्रांतात मनोभावे जोपासल्या जात असतात त्यात खरेखोटे पणाचा प्रश्नच नसतो इतक्या त्या श्रद्धा घट्ट असतात ,

    त्यात कोणताही शंकराचार्य ढवळा ढवळ करू शकत नाही - मग ती मांढरदेवी असो किंवा यमाई असो -वाघजई असो किंवा वेतोबा असो - तिथे सत्ता असते ती फक्त त्या पंचक्रोशीतील समजुतींची ! श्रद्धांची किंवा अंधश्रद्धांची ! आज असे नाही पहिल्या पासूनच अध्यात्म हे सामान्य माणसा पर्यंत कधी सर्वार्थाने पोचलेच नाही - मग ते रामदास असोत , तुकाराम वा ज्ञानेश्वर असोत , नाहीतर नामदेव असोत -प्रपंचातल्या समस्याना सोडवायला सामान्य माणूस वेगळीच वाट धरतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि तिथेच पुरोहित वर्गाचे बेलगाम राज्य सुरु होते !

    महम्मद पैगम्बराचा अंत कसा झाला ? ते मुळातच वाचण्यासारखे आहे ! एका ज्यू स्त्रीने विषप्रयोग केल्याने तो मेला असे स्पष्ट उल्लेख आहेत - आज कितीही पुरावे सादर केले तरीही मुसलमान हे मानणार नाहीत - हो ना ? महम्मदाचे वडील तर पागान देवांचे पुजारी होते आणि कुराणात तर मक्केचा उल्लेखही नाही !असे कितीतरी विरोधाभास पेलत आपल्या श्रद्धा आपण कुरवाळत असतो !
    बुद्धाचा अंत सडलेले डुकराचे मांस खाउन झाला ! हे किती द्धाकादायक आहे नाही का ?

    तसेच वैदिक आणि शैव धर्माचे झाले आहे - कितीही अंतर्विरोध असला तरीही आता हे खोलवर रुजलेले संस्कार पुसले जाणार नाहीत - शंकर , गणपती , ब्रह्मदेव , विष्णू - यांची पुराणे आणि पुराण कथा यातून अशी काही गुंफण झाली आहे की त्यावर संपूर्ण आयुष्य खर्च केले तरी ही मते पुसली जाणार नाहीत - वैदिक धर्म हा हिंदू धर्म नाही हे सत्य आहे , आणि हिंदू हा धर्म आहे का ?तो तरी एकहाती तळागाळा पर्यंत एकजीव झाला आहे का ? गावकीचे देव वेगळे त्यांचे हट्ट वेगळे त्यांचा कोप आणि तोडगे वेगळे - नंतर तथाकथित हिंदू धर्माचा नंबर लागतो -
    मग आपल्याला काय करता येईल ?
    आपण काहीही करायच्या पूर्वी - जनसामान्य काय म्हणतात ? बहुजन काय म्हणतात ? सुशिक्षित वर्ग काय म्हणतो ?
    आता हेच उदाहरण घ्या - सार्वजनिक गणपतीमुळे सर्व समाज दावणीला बांधला जातो आहे - कर्कश्य आवाज आणि वाहतुकीची प्रचंड गैसोय यामुळे कुणाही सुजाण नागरिकाला या उत्सवात कोणतीही सुंदरता जाणवत नाही - तरीही धर्माच्या नावाखाली हा गदारोळ चालत असतो - एक प्रकारचे ब्ल्याक्मेलिंग चालू असते - सूज्ञ लोक सरळ शेवटचे काही दिवस बाहेत ट्रीपला निघून जातात -कारण या लोकाना विरोध शक्यच नसतो !
    तीच कथा आषाढी वारीची आहे - त्यातला प्राण कधीच हरवला आहे - राहिलेला सांगाडा दरवर्षी ओढला जातो !
    खरे पाहता आज सर्व सामान्य माणसाला धर्म हे जोखड वाटते आहे - त्याला असे साधुसंत हवे आहेत की एका हाताने मी देतो , दुसऱ्या हाताने झटपट मला दसपट परत द्या - त्यामुळे फकीर वृत्तीच्या साई बाबाना सोन्या रुपयाच्या मखरात कैद केले जाते - अक्कलकोट आणि शेगावही याबाबतीत मागे नाहीत -
    पुण्याला शंकर महाराज मठात तर सिगारेट पेटवून ती मठात पेटती ठेवलीजाते - इतका बिनडोकपणा मी कुठेच पाहिला नाही ! नवस फेडायचे हे पाप अजबच आहे !
    कोणत्याही धर्मात आखीव मजबूत चौकटी आखायचा प्रयत्न झाला की त्या पद्धतीलाच कीड लागते - -वक्फ बोर्डाच्या जमिनी असोत किंवा शंकराचार्य असोत - मूळू ऊद्देश कधीच फसलेले आहेत आणि उरलेली ओढाताण ही अशी धार्मिक फजिती निर्माण करत आहे -
    आपला धर्म हा हिंदू आहे का ? वैदिक प्रवृत्तीने तो गिळंकृत केला आहे का ? हे प्रश्न फार किरकोळ आहेत कारण त्यात कोणालाच रस नाही !
    तिरुपतीला लागणाऱ्या रांगा काय सांगतात ? मी असे व्यसनी चोर पाहिले आहेत , जे तिरुपतीला पार्टनर करून दरवर्षी तिथली वारी करतात !

    ReplyDelete
    Replies
    1. बुद्धाचा अंत सडलेले डुकराचे मांस खाउन झाला ! हे किती द्धाकादायक आहे नाही का ?-------------------------->?????????????????????????

      Delete
    2. महम्मद पैगम्बराचा अंत कसा झाला ? ते मुळातच वाचण्यासारखे आहे ! एका ज्यू स्त्रीने विषप्रयोग केल्याने तो मेला असे स्पष्ट उल्लेख आहेत - आज कितीही पुरावे सादर केले तरीही मुसलमान हे मानणार नाहीत - हो ना ? -------------------------->?????????????????????????

      Delete
    3. बुद्धाचा अंत डुकराचे सडलेले मांस खाऊन झाला हे सत्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध लोकांनी भिक्षा म्हणून जे दिले ते कोणताही राग-लोभ न करता, जिभेचे चोचले न करता भक्षण करायचे. या बद्दल त्रिपिटकात एक स्वतंत्र सूत्र आहे. बुद्धाच्या अन्ताबद्दल जे महापरिनिर्वाण सूत्र आहे, त्यात त्यांना जे भोजन वाढले गेले त्यातील पदार्थ सूकर मद्दव होता असे म्हटले आहे. याचे दोन-तीन अर्थ आहेत. सूकर म्हणजे पाली भाषेत डुक्कर. म्हणून डुकराच्या माणसाची भाजी असा एक अर्थ. दुसरा म्हणजे जंगलातील डुक्कर जो कंद खातात त्याची भाजी. तिसरा अर्थ म्हणजे सूकर मद्दव नावाची पालेभाजीच त्या काळी खायचे. ज्याने त्रिपिटक वाचले आहे, ज्याने बुद्ध अनुभवला आहे त्याला या गोष्टी म्हणजे 'ध'चा 'मा' केल्याचे लक्षात येतात.

      Delete
    4. Buddha ani Mohammad Paigambar yanchya vishsi anamikane kucheshtene lihile aahe, yalach mhanatat brahmani sadskya dokystun aalele kidake vichar. Dusaryanna badanam karayala vaparalele he brahmani shadyantra ahe, Ayala konihi bhik ghalanar nahi!

      Delete
    5. बुद्ध आणि मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अनामिकाने कुचेष्टेने लिहिले आहे, यालाच म्हणतात ब्राह्मणी सडक्या मेंदूतून आलेले किडके विचार. दुसऱ्या धर्मांना बदनाम करायला वापरलेले हे ब्राह्मणी षड्यंत्र आहे, याला कोणीही भिक घालणार नाही!

      Delete
  3. खऱ्या अर्थाने सुसंस्कृत पणा आला की सर्व थांबेल अशा भ्रमात राहणे सुद्धा धोकादायक आहेच !
    पण आपण परत परत वैदिक आणि शैव हा गुंता चिवडत बसण्याची चूक करत आहात - त्याने प्रश्न संपणार आहेत का ?
    उद्या सर्व वैदिक नष्ट झाले आणि त्यांचे वाग्मय नष्ट झाले तर ? मूळ प्रश्न संपणार आहेत का ? मूळ प्रश्न माणसाच्या मनोवृत्तीचा आहे - सुजाणतेचा आहे .
    भक्ती आणि श्रद्धा हा जोपर्यंत देण्याघेण्याचा व्यवहार ठरत जातो तो पर्यंत मनःशांती कशी लाभणार ? मग तो विचार वैदिक असो वा शैव - पिंडीवर वाहिलेले बिल्वपत्र आणि विष्णूपदावरचे
    तुलसीपत्र वाहण्याच्या भूमिका काय आहेत तेच खरेतर महत्वाचे आहे !
    त्याची सुरवात स्वयंपाक घरातून - स्त्रियांपासून होते - म्हणून त्याना सुजाण करणे हेच महत्वाचे आहे !

    ReplyDelete
  4. "हिंदुंच्या धर्मजीवनात हस्तक्षेप करण्याचा वैदिक धर्ममार्तंडांना कसलाही अधिकार नाही.."

    आणि

    " त्यांनाच सोनेरी मुकुट, सिंहासन देणारे धर्मविकृत नाहीत तर काय आहेत? सर्वांनी यावर चिंतन केलं पाहिजे."

    यालाच म्हणतात "साप भी मरे और लाठी भी न टुटे."

    ReplyDelete
  5. प्रिय संजयजी,
    आपके द्वारा मुझ पर मोदी समर्थक होने का आरोप लगाने की फिर से एकबार जोखिम लेकर भी मुझे कहना है कि आपका यह लेख आपके द्वारा जानबूझकर “कहीं की ईंट कहीं का रोड़ा भानुमती के कुनबा जोड़ा” वाली कहावत का बेहतरीन नमूना है. आप थोड़ा भी स्वामी स्वरूपानंद सरस्वती के इतिहास बारे में जानकारी ले लेते तों शायद उन्हें मोदी सरकार से जोड़ने और पाठ्यक्रम में बदलाव का विषय यहाँ एक साथ नहीं लाते.
    स्वामी स्वरूपानंद मोदी को हराने के लिए वाराणसी में खम ठोक कर बैठे थे. उन्होंने जिंदगी में कभी भाजपा का समर्थन नहीं किया है. वे सदा नेहरु परिवार के समर्थक रहें है.
    वे सारी जिंदगी विश्व हिंदु परिषद के विरोध में कांग्रेस समर्थित राजनीति करते रहें है. दिग्विजयसिंह जैसे कांग्रेसी उनके अनन्य भक्त है.
    उन्होंने साईबाबा वाला मामला पहले कभी नहीं उठाया और आज वे जानबूझकर समाज में तनाव फ़ैलाने के लिए यह मुद्दा उठा रहें है. कोई भी कांग्रेसी उनके इस बयान के विरोध में बयान नहीं दे रहा है. वे भाजपा को इस मुद्दे में घसीट कर उसे परेशान करना चाहते है. इसीलिए कोई भी भाजपा का नेता उनका विरोध या समर्थन दोनों ही करने से बच रहा है. केवल साध्वी उमा भारती ने पहले उनका विरोध किया और बाद में उनके इरादे समझ कर वे भी खामोश रह गयी.
    वे जानबूझकर अपने कार्यक्रम भाजपा शासित राज्यों में कर रहें है ताकि समाज में फैले तनाव को निपटाने में सरकार कोई तों भी गलती करे और वे उसे घेर सके. क्यों नहीं वे महाराष्ट्र की कांग्रेसी सरकार के राज्य में यह कार्यक्रम करते है? कौन रोक रहा है उन्हें यहाँ आने से? साईबाबा मध्य प्रदेश में है या यहाँ पर?
    रामजन्मभूमि का मुद्दा वे आज पहली बार उठा रहें है, उन्होंने आज तक इस मुद्दे का विरोध किया है.
    बावजूद इसके आपको स्मृति ईरानी और उनको एक साथ बिठा रहें है, आपका उद्देश्य केवल आप जान सकते है, किंतु इससे केवल सत्य का अपमान होता है.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
    Replies
    1. दिनेशजी, कोणते शंकराचार्य कोणत्या पक्षाला समर्थन देतात हे मला माहित आहे. तो प्रश्न अप्रस्तूत असून शंकराचार्य नेमक्या कोणत्या धर्माचे प्रतिनिधित्व करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. साईप्रश्नात अन्य शंकराचार्यांची भूमिका काय हाही प्रश्न होताच. हा विषय राजकारणाचा नसून देशातील धर्मकारणाचा आहे आणि धर्मवादी सरकार आल्यानंतर भागवतांपासून अन्य सर्वच वैदिक-धर्मवादी ज्या जोशात आले आहेत त्यांना कसे रोखायचे हाही आहे. तुम्ही मोदीसमर्थक असण्या-नसण्याचा संबंध नाही. पण जे समर्थक आहेत ते सारेच "विकासवादी" असून "धर्मवादी" आजिबात नाहीत असे समजण्याची चूक आपणाकडून होऊ नये एवढेच.

      Delete
  6. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे , आपण मला मदत कराल अशी आशा आहे
    असे मानले की वैदिक आणि हिंदू हे वेगळे आहेत आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वैदिकांनी हिंदू धर्म मार्तंड बनून हिंदू धर्मात अधिक्षेप करण्याचा उद्योग अनेक पिढ्या चालवला आहे - असा जर प्रश्न असेल तर तो सोडवणे अगदीच सोपे नाही का ?
    अशा समस्या एका क्षणात सुटल्या पाहिजेत असे आपणास वाटत नाही का ?
    माझ्यामते तोडगा असा आहे -
    जे हिंदू आहेत त्यांनी वैदिकाना वगळून आपली नवी गादी निर्माण करावी
    त्यावर नेमणूक फक्त हिंदू पुरस्कार करणारेच करतील , वैदिक विचारांच्या लोकाना त्यात मागच्या दारानेही प्रवेश मिळणार नाही याची दक्षता घ्यावी - इतके केले की विषयच संपतो -
    मुद्दा आहे इतकासा - आणि वारंवार त्याची किती भडक मांडणी केली जाते की हिंदू इतके कमजोर कसे असेच वाटू लागते
    आद्य शंकराचार्य हे हिंदू होते का वैदिक ? जर वैदिक असतील तर मरेनात का ! त्यांच्या नादाला लागायचा प्रश्नच नाही !- आपला धर्म आपण सांभाळू असा विचार करणे जास्त योग्य नाही का ?
    आपण म्हणत आहात की आद्य शंकराचार्य हे शैव आणि तांत्रिक होते - मग आपणास असे म्हणायचे आहे का कि शैव धर्माची खुर्ची वैदिकांनी बळकावली आहे ?पण आद्य शंकराचार्य जरी शैव असले तरी ते वेद प्रामाण्य मानतच नव्हते का ?याचा खुलासा आपण केलात तर बरे होईल !
    शैव आणि हिंदू जर वेगळे असतील तर हिंदू धर्माचे काय होते त्याची काळजी करायचे आपणास काहीच कारण नाही !
    शैव म्हणजेच हिंदू नाही ना ? का हो ? नक्की काय ?
    आद्य शंकराचार्यांनी ते स्वतः शैव असूनही ब्रह्मसूत्र , तैतरेय , केन , ऐतरेय आणि मांडुक्य उपनिषदावर टीका लिहिली ,भगवत गीतेवर भाष्य केले याचाच अर्थ ते वेदांचा अभ्यास करत होते आणि त्यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धांत मांडला -
    बौद्ध तत्वज्ञानाचा त्यांनी पराभव केला आणि त्याना अभ्यासक प्रच्छन्न बौद्ध म्हणत असत - वेअदन्तचा पुरस्कार करणारे आद्य शंकराचार्य हे हिंदू होते का नाही ?. आणि त्यांनी गोकर्णाला शैव तत्वज्ञांनी नीलकंठ चा वाद विवादात पराभव केला तो कसा काय ?
    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः हा जगप्रसिद्ध श्लोक कोणाचा आहे ?भज गोविन्दम हा संदेश कुणाचा आहे ?

    ReplyDelete
    Replies
    1. दहाव्या शतकापुर्वी अवैदिक शैव ब्राह्मण आणि वैदिक ब्राह्मण अशे स्पष्ट सीमारेखा होती. नंतर ती पुसली गेली व सारे ब्राह्मण वैदिकाश्रयी झाले. (वैदिक संस्कृतीचा इतिहास, लक्ष्मणशास्त्री जोशी) असो. वेद आणि वेदोक्ताचा जन्मजात अधिकार असलेले सारे वैदिक धर्मीय असून जे नाहीत ते अवैदिक आहेत त्यामुळे दोघांना वेगळे कसे करायचे, पार मिसळून गेलेत वगैरे युक्तीवाद काहीही कामाचे नाहीत.

      Delete
    2. शिल्लक आहेत ते अवैदिक अवैदिक शैव ब्राह्मण कारण पूर्वीसारखे यज्ञ होत नाहीत. गोमांस खाल्ले जात नाही. तर आपण एवढा त्रागा का करून घेत. द्वेषाचे राजकारण होतेय. आणि समाजाच्या उन्नतीसाठी किवा अवनतीसाठी एकटे (गेली कित्येक वर्षे अस्तित्वात नसलेले ) वैदिक ब्राम्हणाच जबाबदार असा शोध लावायचा प्रयत्न होतेय. बहुतेक ते दुर्लक्ष करतात किवा त्यांना प्रतिकार करायची शक्ती नाही किवा इच्छा नाही

      Delete
  7. संजय सर
    माझी अडचण हीच आहे की आपणास स्पेसिफिक शंका विचारली की आपण स्पेसिफिक उत्तर देणे टाळता किंवा आपल्या हातून राहते हे मात्र खरे
    आद्य शंकराचार्यांनी गोकर्ण येथे नीलकंठ या शैव विचारवंताचा वादामध्ये पराभव केला म्हणजे आद्य शंकराचार्य शैव नव्हते , पण आपण मात्र त्यांना शैव म्हटले आहे - ते कसे ?
    ब्रह्मसूत्र आणि त्यांचे इतर लिखाण हे असेच दर्शवते की आद्य शंकराचार्य हे वैदिक होते . मग आपण त्यांना कसे शैव ठरवत आहात ते समजले नाही - म्हणजे ते अवैदिक शैव ब्राह्मण पण ठरू शकत नाहीत - तर फक्त वैदिकच असू शकतात हेच सत्य असावे असे वाटते - आपण आम्हास याबाबत मार्ग दर्शन कराल का ?त्यांचा काळ इ स ७८८ ते ८२० असा धरला जातो , म्हणजे ते आपण म्हणता त्या काळाच्या पूर्वीचे म्हणता येतात ?आपण म्हणता तो काळ
    दहाव्या शतका नंतरचा आहे असेही आपण म्हणता !
    सारे ब्राह्मण वैदिकाश्रयी झाले असे आपण म्हणता - तसे का झाले असावे ?अशी कोणती भुरळ ब्राह्मणाना पडली असेल ?अचानक आपली सर्व शैव परंपरा सोडून त्यांनी वैदिक मते का मान्य केली असतील हे एक गूढच आहे वैदिक राजे याला कारणीभूत असतील का ?यथा राजा तथा प्रजा या न्यायाने कदाचित स्वार्थापोटी सर्व पुरोहित वर्ग वैदिक झाला असेल का ?
    आज झालेले नवबौद्ध जसे गणपती उत्सवात तन्मयतेने नाचतात , ३१ डिसेम्बरला नववर्ष साजरे करतात , - पण तरीही त्यांचे धर्मांतर अबाधित राहते - हे जसे - तसे तर हे वैदिक होणे नसेल ना ?
    हा काळ फारच गोंधळाचा वाटतो - त्यामुळे आपली स्पेसिफिक मते कळली तर आवडेल
    आजही जन्मानेच हे नवबौद्ध स्वतःला बौद्ध समजतात - हे पण विचार करण्यासारखे आहे - त्यांच्या लग्नात निळा रंग उधळतात हे पण समजून घेतले पाहिजे - म्हणजेच चालीरीती जुन्याच पाळायच्या , फक्त रंग बदलायचा - असेच नाही का ?
    खरेतर अभ्यासाने ठरवून जर आपले नाव निवडणुकीसाठी योग्य ठरते त्यावेळेस प्रत्येकाने आपापला धर्म निवडावा असे आपल्या घटनेने सुचवले पाहिजे आज सर्व धर्म हिंदू मुसलमान शीख , जैन बौद्ध ख्रिश्चन हे जन्मानेच त्या त्या धर्माचे ठरतात - तसेच जातीसुद्धा ! डॉ आंबेडकर याना हे नजरेआड का करावेसे वाटले - केवळ जन्माने मी अन्त्यज म्हणून मी धर्मच बदलतो - या त्यांच्या विचारापेक्षा त्यांनी जर धर्म आणि श्रद्धा निवडायचा अधिकार एलेक्शनला वय योग्य ठरण्याच्या काळात सुजाण नागरिकाला दिला असता तर काय दिसले असते ? एकाच घरात चार धर्माचे लोक आत्म निर्णयाने एकत्र राहताना दिसले असते !
    पुराणकाळी जसे घडत होते - कि जन्माने जो ज्या जातीचा तसेच त्याचे कुटुंब धरले जात असे ते यामुळे टाळता आले असते

    ReplyDelete
    Replies
    1. आजही जन्मानेच हे नवबौद्ध स्वतःला बौद्ध समजतात - हे पण विचार करण्यासारखे आहे - त्यांच्या लग्नात निळा रंग उधळतात हे पण समजून घेतले पाहिजे - म्हणजेच चालीरीती जुन्याच पाळायच्या , फक्त रंग बदलायचा - असेच नाही का ?-------------------->?????????????????????????

      Delete
    2. आज झालेले नवबौद्ध जसे गणपती उत्सवात तन्मयतेने नाचतात , ३१ डिसेम्बरला नववर्ष साजरे करतात , -----------------> Saaf khotaa aashaawaad! Mee Gauri Ganapati aadi konatyahi debates maananaar naahi kinvaa tyaanchi upaasanaa karanaar naahi ashi pratidnyaa ghenaare ase karatil he sambhavat naahi!

      Delete
    3. साफ खोटा आशावाद! मी गौरी-गणपती आदी कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही अशी प्रतिज्ञा घेणारे लोक, असे काही करतील हे संभवत नाही!

      Delete
  8. आपण म्हणता तसे वारकरी चमत्कार मानतात का नाही ?ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली असेच ते मानतात ना ? त्यांचे हे अज्ञान दूर करायचे कोणी ? दामाजीपंत ,विसोबा खेचर एकनाथ
    यांच्या चमत्कारांबद्दलही असेच म्हणायचे का कि ब्राह्मणांनी याना देवत्व चिकटवले आहे ?

    ReplyDelete
  9. कोणाचेही आणि कसलेही चमत्कार हे अमान्य करण्याच्या लायकीचेच असतात. मग ते ज्ञानेश्वर असोत, की तुकाराम असोत, की रामदास असोत, की साईबाबा असोत, कोणीही विवेकनिष्ठ माणूस कदापि चमत्काराला मान्यता देणार नाही!

    ReplyDelete
  10. श्रीमान शर्माजी ,
    आपने जो कहा है वह सच है
    ईलेक्शनके पहले ऐसीही बात सामने आई थी - एक महात्मा जोरशोरसे गुप्त धनके लिये जमीनमे खुदाई करानेपर अडे हुए थे , उस वख्त भा ज पा ने और वसुंधरा राजे ने बहुतही अच्छा संयम दिखाया था , ये सब षड्यंत्रकी बाते कॉंग्रेसके दिग्विजयसिंग इत्यादी लोगोंकी रहती है
    एक बात स्पष्ट है कि लोगोंको कुछभी बतानेकि जरुरत नही है लोगोने जो करना था वह करके दिखाया है और भाजपा कोभी कोई नये बदलाव करनेकी जरुरत नही है , ना तो वह उनका ध्येय रहा है - सालेय शिक्षांके माध्यमसे वह समाज सुधार नही करना चाहती यह स्पष्ट है
    संजय सोनावणी जैसे भाडेके तट्टू पालके कोन्ग्रेस यह अपप्रचार करनेमे विश्वास रखती है
    वैदिक अवैदिक मामलेमे संजय साब इतने डूब गये है कि उनको राष्ट्रीय भलाई किसमे है यहभी पता नही चलता यह दुखकी बात है

    ReplyDelete
  11. संजय सोनवणी यांचे अशा प्रकारचे लिखाण अगदीच ठिसूळ असते- त्याना शैव आणि वैदिक गोंधळातून ब्राह्मणांवर शरसंधान करायची प्रचंड आवड आहे खरेतर त्यांनी
    ब्राह्मणाना ( पुरोहितांना ) रोज लाखोली वाहिली तरी ती मते तरीही बहुजन समाज त्याना मानतो हे सत्य आहे - खरेतर हि दुःखाचीच गोष्ट आहे
    गाडगे महाराज पितरांबाबत खूप आग्रही असत , खूप टीका करत , पितर कुठे असतात ? स्वर्ग कुठे आहे असे थेट प्रश्न ते विचारत असत त्यांच्या विचारण्यात एक गोडवा असे , आणि हाच गोडवा खरी जागृती करत असतो - त्याने बहुजन समाजाची मने जिंकली जातात - पण मग हि विचारधारा आचरणात का येत नाही ?- हाच खरा प्रश्न आहे - गाडगे महाराज यांची स्वच्छता मोहीम , अंधश्रद्धा जागृती , याना खास ग्रामीण स्पर्श होता त्यामुळे ते मुळातच घाव घालत असत - पण आजकाल जादुतोने , कारणी चेटूक यांनी परत जोर पकडला आहे - वास्तुशास्त्र या नावाने परत अंधश्रद्धा परत घरात प्रवेश करते आहे -त्याचा मुकाबला करायचा सोडून संजय सोनवणी आचरत सारखे शैव वैदिक करत बसतात - त्याने काहीच साधत नाही ! तो एक डोंबारी खेळ ठरतो खेळ ठरतो - त्यासाठी संजय सरांनी आत्म परीक्षण केले पाहिजे - आधुनिकतेच समर्थन हा हमखास मार्ग आहे - त्यासाठी कुणाचीतरी बाजू घेत - ब्राह्मणांनी फसवले , खरे मूळ हे शैव आहे आणि वैदिक हे समाज विघातक आहे असे सांगायचीही गरज नाही - आधुनिकता या सर्वाना दूर सारते - अगदी मुळासकट उपटून फेकून देते - इतिहास हेच सांगत असतो असे मला वाटते - संजय आता हा गचाळपणा बंद करून आधुनिक विचार मांडत समाज सुधारणा करून या समाजाला अन्र्मुख करतील अशी आशा करुया !

    ReplyDelete
  12. संजयाच्या लिखाणाचा बहुजन समाजावर काय परिणाम होतो आहे ?
    शून्य -
    कारण त्याची मांडणी किचकट आहे
    त्याला आपण किती अभ्यासू आहोत हे सांगायची लहर येते , म्हणून तो एकदम कुठेतरी भरकटत जातो
    नरहर कुरुंदकर यांचे लिखाण किती अर्थगर्भ असायचे ते वाचून मनुष्य अंतर्मुख होतो - त्याउलट संजय गर्दी जमविण्यासाठी आणि हमखास टाळ्या घेण्यासाठी लिहितो आणि बोलतो असा समज होतो ही त्याची शोकांतिका आहे -
    त्याला खरेतर इतिहास हा विषय समजलाच नाही असे सांगावेसे वाटते - कारण त्याची गाडी एकसारखी पुरोहित वर्गावर घसरत असते -( तेपण एक समाजकार्य आहेच ) हा पुरोहितवर्ग एक बिझनेस करणारा वर्ग आहे - बहुजन समाजात थोड्या फरकाने हेच काम वैदू, कुडमुडे जोशी , अंगात येणाऱ्या सुवासीनी, करत असतात - त्यांना पूरक असे वागणारे काही कैकाडी आणि वासुदेव आहेत आज शहरात असे फिरस्ते अनेक वेळा दिसतात - घरोघरी फिरत , माणसाचा अभ्यास करत हा फिरता वर्ग गिर्हाईक हेरत समाजाला उल्लू बनवत फसवत असतो - थोडेफार भविष्य सांगायचे , मग तुमच्यावर देवीचा कोप झाला आहे - त्यावर तोडगा आहे - असा तो आपल्या घरात घुसून स्वतःचा धंदा वाढवत असतो - हे सर्व बहुजन असतात - आणि फसणारे पण बहुजनच असतात - हे विशेष ! जसे फेंगशुई आणि वास्तुशास्त्र आज लोकप्रिय होत आहे तसेच हा वर्ग समाजात अंधश्रद्धा पसरवत , कधीकधी गुन्हेगारीही करत असतो पुरोहित आणि हा कुडमुड्या यात तत्वतः काहीही फरक नाही !
    गाडगे महाराज यांचा वारसा पुढे चालला नाही हे आपले दुर्दैव आहे ! सरकारी योजनेतून होणाऱ्या सुधारणा मोहिमांपेक्षा अशा समाज सुधारणा शतपटीने मनात घर करून खरे संस्कार करतात !

    ReplyDelete
  13. हिंदू म्हणवणारे सर्व लोक इतके पक्के रूढीवादी असतात की त्यांच्यात काहीही बदल होत नाही , वर्षानुवर्षे , पिढ्यानपिढ्या चाकोरीबद्ध जीवन ते जगात असतात - आपल्या व्यवसायात ने नवे विचार स्वीकारतात , घराबाहेर सर्व समाजात एकरूप होताना धर्माच्या भिंती विसरतात , पण उंबरठ्याच्या आत त्यांचे विश्व वेगळे असते - खाजगी श्रद्धा या अंधश्रद्धा आहेत का डोळस श्रद्धा आहेत , हे तपासण्याची काहीच सोय नसते - बाहेरून आल्यावर पाय धुणे हे ते स्वच्छता जपण्यासाठी करत नाहीत तर बाहेरील वाईट विचार घरात येऊ नयेत न्हाणून हि मोर्चे बांधणी असते
    हिंदू स्त्रिया जी व्रत वैकल्ये करतात ती का ? आपल्या कुटुंबाचे भले होण्यासाठी !
    पांढरे बुधवार , गजलक्ष्मी व्रत , श्रावणातले आणि मार्गशीर्षातले गुरुवार , अष्टलक्ष्मी पूजन अशी अनेक व्रते लोकप्रिय झाली आहेत , नेहमीचे पंचायतन असतेच , पण हे अथोडे जास्तीचे असते - याला उपाय काय ? हे कधी थांबणार ?
    हीच तऱ्हां बौद्ध आणि जैन समाजात आहे , शीखांमध्ये आणि ख्रिश्चनांमध्ये आहे
    खरा आधुनिक विचार हा शाळा कॉलेज पेक्षा घरातून रुजला पाहिजे !म्हणजे अशा शंकराचार्यांची आपल्याला गरजच राहणार नाही - त्यांचे मठही नकोत , विचार तर त्याहून नकोत , कारण आधुनिक विचार हे आपल्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत - देव नाही हे शिकवून समजणार नाही त्यासाठी आपल्याला चिंतन झाले पाहिजे , वैचारिक चर्चा तर होताच नाहीत , पूर्वी वसंत व्याख्यानमाला आणि अनेक भासाने होत असत , पण आज त्यांच्या श्रोत्यांची संख्या रोडावली आहे !
    हा बदल धोकादायक आहे - संजय सर्व समाजात सामाजिक जाणीवा जागृत होण्यासाठी प्रयत्न करू शकतील असे वाटते - त्यांनी जर नवीन विचार देताना इतिहास थोडा बाजूला ठेवला तर सोन्याहून पिवळे ! कारण त्यांचा इतिहास फक्त ब्राह्मण हे समाजाचे वैरी कसे आहेत हेच शिकवतो -

    ReplyDelete
  14. माझ्या सर्व वाचकांना मला काय म्हणायचे आहे ते बरोबर समजते आहे. काहींना ते दाखवायचे नसते एवढेच. वैदिक-अवैदिक धारांमधील वैदिकांचा संसर्ग हा हिंदू समाजव्यवस्थेला घातक ठरला आहे. आदि शंकराचार्यांना वैदिक ठरवणा-यांना प्रथम हे माहित पाहिजे कि ब्रह्मसूत्र हे वैदिक साहित्य नाही. दुसरे म्हणजे ब्राह्मण वैदिकच असतात असे मी मानत नाही. अनेक ब्राह्मणेतर जातीही कडव्या वैदिक असतात हेही तुम्हाल माहित असले पाहिजे. वैदिक तत्वज्ञानाचा पराभव हेच भारतीय समाजव्यवस्थेच्या भल्यासाठी आवश्यक आहे..

    ReplyDelete
  15. वैदिक तत्वज्ञानाचा पराभव होणे ही काळाची गरज आहे!

    ReplyDelete
  16. Agodarach paraabhut tatwadnyaan aahe he waidik tatwadnyaan, ajun kiti paraabhut karaayache?

    ReplyDelete
    Replies
    1. अगोदरच पराभूत तत्वज्ञान आहे हे वैदिक तत्वज्ञान, अजून किती पराभूत करायचे?

      Delete
  17. संजयजी
    आपण म्हणता की रिग्वेदात परालौकिक जीवनावर काही भाष्य नाही पण खाली दिलेले यमसुक्त पहा मंडल 10 सूक्त 14 अनुवादसहित।।
    य॒मो नो॑ गा॒तुं प्र॑थ॒मो वि॑वेद॒ नैषा गव्यू॑ति॒रप॑भर्त॒वा उ॑ । 
    यत्रा॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ परे॒युरे॒ना ज॑ज्ञा॒नाः प॒थ्याख्प् अनु॒ स्वाः ॥ २ ॥ 
    यमः नः गातुं प्रथमः विवेद न एषा गव्यूतिर् अप-भर्तवै ओं इति 
    यत्र नः पूर्वे पितरः पराईयुः एना जजानाः पथ्याः अनु स्वाः ॥ २ ॥ 
    सर्वांत प्रमुख जो यम त्यालाच आमचा गगनमार्ग माहित आहे. ज्या ठिकाणीं आमचे पूर्वज वाडवडील परलोकी गेले, ज्या मार्गानुसार ते उत्पन्न झाले आणि जो आपला मार्ग ते अनुसरले व ज्या मार्गाने परलोकी गेले, तो मार्ग, ती आमची जागा कोणी हिरावून घेऊं शकणार नाही. २
    मात॑ली क॒व्यैर्य॒मो अङ्गि॑रोभि॒र्बृह॒स्पति॒रृक्व॑भिर्वावृधा॒नः । 
    यांश्च॑ दे॒वा वा॑वृ॒धुर्ये च॑ दे॒वान् स्वाहा॒न्ये स्व॒धया॒न्ये म॑दन्ति ॥ ३ ॥ 
    मातली कव्यैः यमः अङ्गिरः-भिः बृहस्पतिः ऋक्व-भिः ववृधानः 
    यान् च देवाः ववृधुः ये च देवान् स्वाहा अन्ये स्वधया अन्ये मदन्ति ॥ ३ ॥
    कव्यांबरोबर मातली, अंगिरसांबरोबर यम आणि ऋक् स्तोत्र प्रिय पितराबरोबर बृहस्पति जेथें आनंदनिर्भर होतो; तसेच ज्यांची अभिवृद्धि विबुधगण करतात आणि जे विबुधगणांना संतुष्ट करतात, त्यांच्यामध्यें पहिले म्हणजे दिव्यविबुध हे स्वाहाकाराने आणि दुसरे म्हणजे पितृगण हे स्वधेने तल्लीन होतात. ३
    इ॒मं य॑म प्रस्त॒रं आ हि सीदाङ्गि॑रोभिः पि॒तृभिः॑ संविदा॒नः । 
    आ त्वा॒ मन्त्राः॑ कविश॒स्ता व॑हन्त्व् ए॒ना रा॑जन् ह॒विषा॑ मादयस्व ॥ ४ ॥ 
    इमं यम प्र-स्तरं आ हि सीद अङ्गिरः-भिः पितृ-भिः सम्-विदानः 
    आ त्वा मन्त्राः कवि-शस्ताः वहन्तु एना राजन् हविषा मादयस्व ॥ ४ ॥ 
    यमराजा या कुशासनाकडे ये आणि त्यावर आरोहण कर. अंगिरांच्या समवेत असणार्‍य़ा कवींनी म्हटलेले प्रशंसा-मंत्र तुजला येथें घेऊन येवोत. हे राजा, या हविर्भागाने तूं आनंदित हो. ४
    अङ्गि॑रोभि॒रा ग॑हि य॒ज्ञिये॑भि॒र्यम॑ वैरू॒पैरि॒ह मा॑दयस्व । 
    विव॑स्वन्तं हुवे॒ यः पि॒ता ते॑ऽ॒स्मिन् य॒ज्ञे ब॒र्हिष्या नि॒षद्य॑ ॥ ५ ॥ 
    अङ्गिरः-भिः आ गहि यजियेभिः यम वैरूपैः इह मादयस्व 
    विवस्वन्तं हुवे यः पिता ते अस्मिन् यजे बर्हिषि आ नि-सद्य ॥ ५ ॥ 
    पूज्य आणि नाना प्रकारचीं रूपें धारण करणार्‍या अशा अंगिराऋषीसह, हे यमराजा, येथें आगमन कर आणि आनंदित हो. तुझ्यासह तुझा पिता जो विवस्वान् त्यालाहि या यज्ञांत कुशासनावर आरोहण करवून मी आहुति अर्पण करीत आहे. ५

    अङ्गि॑रसो नः पि॒तरो॒ नव॑ग्वा॒ अथ॑र्वाणो॒ भृग॑वः सो॒म्यासः॑ । 
    तेषां॑ व॒यं सु॑म॒तौ य॒ज्ञिया॑नां॒ अपि॑ भ॒द्रे सौ॑मन॒से स्या॑म ॥ ६ ॥ 
    अङ्गिरसः नः पितरः नव-ग्वाः अथर्वाणः भृगवः सोम्यासः 
    तेषां वयं सु-मतौ यजियानां अपि भद्रे सौमनसे स्याम ॥ ६ ॥ 
    अंगिरा ऋषि, आमचे पूर्वज नवग्व आणि अथर्वभृगु हे सोमप्रियच आहेत; तर अशा पूज्य पितरांना मान्य होऊन आम्हीं त्यांच्या कल्याणकारक अनुग्रहबुद्धीच्या आश्रयाखालीं राहूं असे कर. ६

    प्रेहि॒ प्रेहि॑ प॒थिभिः॑ पू॒र्व्येभि॒र्यत्रा॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ परे॒युः । 
    उ॒भा राजा॑ना स्व॒धया॒ मद॑न्ता य॒मं प॑श्यासि॒ वरु॑णं च दे॒वम् ॥ ७ ॥ 
    प्र इहि प्र इहि पथि-भिः पूर्व्येभिः यत्र नः पूर्वे पितरः पराईयुः 
    उभा राजाना स्वधया मदन्ता यमं पश्यासि वरुणं च देवम् ॥ ७ ॥ 
    मृताच्या जीवात्म्या तूं पुढें जा, ज्या मार्गानी आमचे वाडवडील परलोकी गेले, त्या आमच्या पूर्वजांच्या मार्गानीं तूं खुशाल जा. म्हणजे ज्या ठिकाणी दोघे प्रभुराज स्वधेनें आनंदित होऊन वास करीत आहेत, तेथें त्यांना म्हणजे यम आणि वरुण अशा दोघांनाही पाहशील. ७ याबद्दल काय म्हनाताल?

    ReplyDelete
    Replies
    1. पाटसकरा ही काय वायफळ बडबड चालविली आहेस?

      Delete
    2. अरे, पाटसकरा त्या यम आणि यमीच्या संवादाबद्दल जरा बोल! ऋग्वेद मंडल १०.१०.

      Delete
    3. ह्या ब्लोगवर दुसर्याचे उधार उसने घेऊन दिवाळी करणारेच जास्त आहेत.. नुसत्या उंचच उंच उड्या.. माकडाची गोष्ट आठवते का? हनुमान एकदा पवात्याची बी दाबून उडवून दाखवतो आणि सगळी माकडे त्यापेक्षा उंच उडी मारायची स्पर्धा करायला लागतात. सगळ्या जेवणाचा सत्यानाश होतो. तसे झालेले आहे इथे.. मारा उड्या आणखी उंच.. वाट तुमचीच लागणार त्यात. शेवटी उपाशी राहणार तुम्हीच..

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...