Wednesday, November 5, 2014

आपण कोणती कृती करतो?

महाराष्ट्राचे पुरापर्यावरण पाहिले तर याच भुमीवर एकेकाळी पानथळ जमीनी मोठ्या प्रमाणावर होत्या. पाणघोड्यासारख्या पाण्यातच हुंदडणा-या अनेक प्रजाती येथे निवास करत होत्या हे कोणाला सांगुनही खरे वाटणार नाही. भरभराटीला आलेली आपली सिंधू संस्कृती केवळ पर्जन्यमान क्रमश: कमी होत गेल्याने तिला उतरती अवकळा लागली. शेतीवर परिणाम झाला. अर्थकारण ढासळले आणि त्याबरोबरच कलांतही अवनती झाल्याचे अवशेषांवरुन दिसते. नंतर पुन्हा परिस्थिती बदलली असली, तरी सन १०२२ पासून भारतात राष्ट्रव्यापी दुष्काळांची रांग लागलेली दिसते. सन १०२२, १०३३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमानावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...तेही पुरते ठप्प झाले. मोठ्या प्रमानात पशू संहार झाल्याने धनगर-गोपालही अवनतीला पोहोचले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही, पैसे असले तरी अन्न उपलब्ध नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते. थोडक्यात द्वितीय महायुद्धानंतर जशी एक महामंदी आली होती त्यापेक्षाही भिषण अशी महामंदी भारतात या दुष्काळांनी आणली.

दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. बारावे शतक ते १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता.  समग्र अर्थव्यवस्था भुइंसपाट करणा-या या दुष्काळाने निर्मानकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल!

विसाव्या शतकातील महामंदीनंतर त्यातून बाहेर पडायला खुप आटापिटा करावा लागला. पण आपल्या देशात पारमार्थिक भान ब-यापैकी असले तरी अर्थभानाची वानवाच असल्याने जे मार्ग शोधले गेले ते समाजाला जगवू शकले तरी उत्थानाप्रत कधीच नेवू शकले नाहीत. बलुतेदारी/अलुतेदारी पद्धत भारतात दहाव्या शतकानंतर आलेल्या आर्थिक अवनतीमुळे समाजाला स्विकारणे भाग पडले. या पद्धतीने समाज जगवला असला तरी कितीही कौशल्ये दाखवली तरी आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सोय या पद्धतीत नव्हती. बाजारपेठा गांवपातळीवर स्थिर झाल्याने स्वतंत्र संशोधने करणे, उत्पादकता वाढवणे याची उर्मी असणेही शक्य नव्हते. जातीव्यवस्था बंदिस्त व्हायला हेही एक कारण आहे...कारण कोणालाच स्पर्धाही नको होती. स्पर्धात्मकता संपते तेथेच अर्थोत्थानही खुंटते हे कोणाच्याही लक्षात आले नाही. इस्लामी आक्रमण व सत्तांनी त्या अवनत्यांत भरच घातली.

बलुतेदारीत प्रत्येक उत्पादक/सेवा आदात्याचे बलुते सारखे नव्हते. स्थानिक गरजांनुसार ते ठरवले जाई. थोडक्यात बलुत्यात उतरंड होती. आर्थिक स्थान त्यामुळे अधोरेखित होत असे. ही एक सक्तीची व्यावसायिक विषमताच होती जी जातीय विषमतेला बळ देणारी ठरली. त्यात उत्पादकता वाढवत प्रगती साधण्याची सोयच नव्हती. फक्त जगण्याची हमी होती. सामाजिक अध:पतन त्यातुन तर झालेच पण पुर्वीची सांस्कृतीक मोकळीक आणि मुक्त आत्मोद्गारही गमावला गेला.

आर्थिक दृष्ट्या विकलांग समाज मानसिक आणि म्हणूनच ऐहिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपली मानसिकता आजही बदललेली आहे असे नाही. एके काळचे निर्माणकर्ते आज नोक-यांच्या हव्यासात गुरफटले आहेत. त्यांची मानसिकता बदलावी यासाठी प्रयत्न होत नाहीत. प्रयोगशीलता हरपलेली आहे. जे प्रयोग करतात त्यांच्यापासून शिकत पुढे जायची आकांक्षा बाळगली जात नाही. लाटेवर वाहत जाणे हा आपला स्वभावधर्म बनला आहे कि काय? स्वतंत्र मार्ग बनवत पुढे जायचे साहस आमच्या अंगी येत नाही तोवर आम्ही "स्वतंत्र" आहोत हे म्हणायचा आपल्याला अधिकार नाही.

इतिहास इतिहास करत असतांना, राजारजवाड्यांच्या इतिहासात रमत असतांना, खो-ट्या-ख-या विजयगाथांचे गायन केले जात असतांना आम्हाला पर्यावरणीय व म्हणूणच त्यासोबतच वाटचाल करणारा आर्थिक इतिहासही माहित असला पाहिजे. पण तो नसतो म्हणून आम्ही पाण्याबद्दलही आज तेवढेच बेपर्वा आहोत. तेवढीच बेपर्वाई आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेबाबतही दाखवत आहोत. आणी केवळ म्हणुणच आमचे खरे आर्थिक उत्थान होत नाही असे म्हणावे लागते.

निसर्ग बदलत असतो. हा बदल अत्यंत सावकाश आणि सहजी लक्षात येण्यासारखा नसतो. पावसाळी प्रदेशापासुन ते निमपावसाळी भुप्रदेशापर्यंत महाराष्ट्राने वाटचाल केली आहे. भविष्यात अजून काय बदल घडतील याचे भाकित वर्तवता येणे अशक्य आहे. पण गेल्या काही वर्षात पाऊस सरासरी गाठत असला तरी त्याच्या नियमिततेत फरक पडत चालला आहे. अशा स्थितीत पीकांचेही नियोजन भविष्यात बदलावे लागणार आहे. त्यापासून धडा घेत माणसालाही बदलावे लागणार आहे. पर्यावरण बदलु शकते...त्याबरोबर आपण बदलतो कि असेच आडमुठे राहत, गतकाळापासून काहीही न शिकत नव-विनाशाप्रत जातो हे आपण आज काय विचार करतो...कोणती कृती करतो त्यावर अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...