Tuesday, January 27, 2015

ओबामा भेटीचा फायदा

ओबामांच्या भारतीय भेटीबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे. पण ती या भेटीतून भारताचा लाभ किती...खुद्द अमेरिकेचा किती यावर होण्यापेक्षा दुय्यम मुद्द्यांवर घसरली याचे कारण मोदींची अपरिपक्वता आणि आंधळ्या द्वेषांध लोकांनी उपराष्ट्रपतींना केलेले लक्ष्य. असो. मुख्य मुद्दे पाहुयात.

अणुकरार मनमोहनसिंगांनी रेटला होता व त्यासाठी केवढा धोका पत्करला होता हे सर्वांना माहितच आहे. काही बाबी उरल्या होत्या, त्या आता ओबामाभेटीत पुर्ण झाल्या. यावर अनेक तज्ञांनी अमेरिकेने त्यांचाच स्वार्थ पाहिला असा आरोप केला आहे. एक गोष्ट आपण विसरतो ती ही कि भिका-याला चोईस नसतो. अमेरिका महासत्ता आहे आणि ती प्रदिर्घकाळ तशीच राहणार या वास्तवाकडे दुर्लक्ष्य करून चालणार नाही. आपण आपला काय फायदा होतो तेवढेच पहायला हवे. त्याचा अधिकाधिक जोरकसपणे उपयोग करून घ्यायला हवा. या कराराप्रमाणे अमेरिकेने आण्विक सामग्रीची देखभाल करण्याची पुर्वअट काढून टाकली आहे आणि यामुळे भारत अगदी कोणाकडूनही, तिस-या जगाकडूनही आण्विक सामग्री खरेदी करू शकेल. अमेरिकी आणि अन्य कंपन्यांना आता आण्विक उर्जा प्रकल्प सुरु करण्यास फारशी अडचण येणार नाही. एन.टी.पी.सी., सिमेन्स, भेल वगैरे ९ भारतीय कंपन्यांना यातून चांगला लाभ होण्याची चिन्हे आहेत.

अर्थात अणूउर्जेचे विरोधक यात जे अडथळे आणतील ते पाहता हे प्रकल्प् खरेच कधी आकाराला येतील याबाबत साशंकता असणे स्वाभाविक आहे.

ओबामा भेटीचा भारताला सध्यस्थितीतील फायदा म्हणजे आंतरराष्टीय राजकारणात फार नसला तरी काही प्रमाणात दबदबा निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थात याचा लाभ आपले सरकार कसा घेते यावर अवलंबून राहील. अमेरिकेचे लक्ष भारतीय बाजारपेठेकडे आहे असे आपण नेहमी म्हणत असतो. तसे असले तरी आपल्या लोकसंख्येची क्रयक्षमता मात्र अत्यल्प अशीच आहे. ती वाढायची तर देशांतर्गत सम्पत्ती, बौद्धिक संपत्ती योजनापुर्वक वाढवण्याची गरज आहे. साधनस्त्रोतांचा देशातच वापर किंवा किमान प्रक्रिया करुनच निर्यात हे उपाय अवलंबणे अत्यावश्यक ठरणार आहे. आज लोहापासून अनेक खनिजे उकरून जहाजे भरून स्वस्तात निर्यात होतात. हे थांबवत किमान स्पोंज आयर्न वगैरे अर्ध-प्रक्रिया करुन निर्यात केला तर येथे प्रक्रिया-कारखाने व रोजगारही वाढेल. आपल्या कोळशाचा दर्जा चांगला नाही हे वास्तव आहे. त्यासाठी काय करता येईल यावर तंत्रज्ञाने शोधली जाणे गरजेचे आहे.  आता जे आण्विक उर्जा प्रकल्प येवू घातलेत त्यात भारतियांचा प्रवर्तक म्हनून सहभाग नाही. आपण बाह्य प्रवर्तक, तंत्रज्ञान व गुंतवणुकीवरच अवलंबून आहोत. हे महासत्ता होऊ घातली म्हटले जाणा-या देशाचे लक्षण नाही.

अमेरिकेला यात काय फायदा आहे हे गुंतवणुकदारांना मिळणा-या प्रचंड सवलतींवर व भारताच्या अन्य धोरणा-वरील परिणामांवर अवलंबून आहे. तो फायदा सज्जड असणार हे उघड आहे. अमेरिकेला भारताची गरज आहे हा अहंभाव कामाचा नसून भारताला अमेरिकेचे सहाय्य घेतल्याखेरीज गत्यंतर नाही हे अधिक खरे आहे. त्यामुळे ओबामांनी जरी स्वत:चे प्रशासकीय अधिकार वापरत करारातील अडथळे दूर केले असले तरी त्यात दिर्घकाळात अमेरिकेचाच फायदा असणार हे उघड आहे.

आधीच म्हटल्याप्रमणे भिका-याला चोईस नसतो. आज आपली स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. पण आपणही धोरणात्मक निर्णय घेत भविष्यकाळात समान तत्वावर आंतरराष्ट्रीय करार करू शकू या स्थितेला पोहोचण्यासाठी नियोजन करावे लागेल. सध्या तरी नेमका त्याचाच दुष्काळ जाणवतो आहे.

8 comments:

  1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दुसऱ्या भारत भेटीमुळं भारत-अमेरिकेतील परस्पर संबंध आणखी दृढ होत असल्यामुळं चीन बिथरला आहे. ओबामा यांची भारत भेट म्हणजे आशियात शिरकाव करण्याचा आणि भारताचा वापर करून चीनवर वचक ठेवण्याचा डाव असून अमेरिकेच्या या जाळ्यात भारतानं अडकू नये,' असा इशारा चीननं भारताला दिला आहे.

    चीन सरकारच्या 'सीसीटीव्ही' या वृत्तवाहिनीवर मोदी-ओबामा यांच्या भेटीला ब्रेकिंगचे स्थान मिळत गेल्या दोन दिवसांपासून सीसीटीव्हीवर याचा बातम्या गाजत आहेत. मोदी-ओबामा भेटीचा चीनवर कितपत परिणाम होऊ शकतो? आशियात चीनच्या वाढत्या प्रभावावर वचक ठेवण्यासाठी अमेरिकेचा हा डाव आहे का? यासारख्या प्रश्नांवर चीनमधील प्रसारमाध्यमांनी विस्तृत चर्चा सुरू आहे.

    भारताचा दुसऱ्यांदा दौरा करणारे बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ओबामांचा हा दौरा म्हणजे राजकीय गंगाजळी वाढविण्याचा प्रयत्न आहे, असं मत आंतरराष्ट्रीय संबंधांचं तज्ज्ञ प्रा. वांग येवी यांनी 'सीसीटीव्ही'शी बोलताना व्यक्त केलं आहे. इंडो-पॅसिफिकसाठी अमेरिकेनं आखलेल्या राजकीय रणनीतीनुसार भारताला आशियात खूप महत्त्वाचं स्थान असून भारताशी उत्तम संबंध ठेवल्यास हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव नियंत्रणात ठेवता येईल, असा अमेरिकेचा होरा असल्याचं मत येवी यांनी व्यक्त केलं.

    चीनमधील सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'च्या लेखातूनही चीननं भारताला अमेरिकेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मोदी आणि ओबामांच्या गळाभेटीचा प्रसंग रंगवून सांगणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या पारंपारिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेचा अंदाज येतो, अशी टीकाही करण्यात आली आहे. पाश्चिमात्य मीडिया सर्वांना एकाच प्रकारे विचार करायला लावून त्याचा जोरदार प्रचार करीत असल्याचा आरोपही चिनी मीडियानं केला आहे.

    'झिंग्वा' या चीनच्या सरकारी न्यूज एजन्सीनं अमेरिका आणि भारतामधील वैचारिक मतभेदांवर नव्याने प्रकाश टाकला आहे. मोदी आणि ओबामांच्या विचारसरणीत मोठा फरक आहे. त्यामुळं मोदी-ओबामांची ही मैत्री वरवरची असल्याचा आरोपही झिंग्वातून करण्यात आला आहे.

    चीनकडून प्रणवदांना 'सूचक' संदेश

    प्रजासत्ताक दिनानिमित्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. या संदेशात झिनपिंग यांनी शांतता आणि प्रगतीसाठी भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मोदी-ओबामा भेटीच्या पार्श्वभूमीवर झिनपिंग यांच्या या संदेशाला महत्त्व आहे.

    ReplyDelete
  2. प्रजासत्ताक दिनापेक्षा यावेळी त्यासाठी आलेल्या पाहुण्याचीच चर्चा जास्त आहे. अर्थात, हा पाहुणा आहेच तसा महत्त्वाचा. एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून खूप मोठी आणि नामवंत हस्ती आली, तर तिला तिथे आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व्यक्तीचाही भाव वधारतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आमंत्रण स्वीकारून ओबामांनी मोदी करिष्म्यावर आंतरराष्ट्रीय शिक्कामोर्तब केले.

    भारतात प्रजासत्ताक दिनाला पाहुणा म्हणून दरवर्षीच एखादा राष्ट्रप्रमुख येत असतो. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा हे केवळ एक राष्ट्राध्यक्ष नसून ते सर्व अर्थांनी महासत्तेचे प्रतिनिधी आहेत. त्याचमुळे, यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त एरवी जे राष्ट्रीय चिंतन होते, त्याऐवजी केवळ ओबामांचीच चर्चा सुरू आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने कच्चा तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात पाडल्या. त्याने भारतीय रुपयाचा भाव वधारला, बँकांनी व्याजदर कमी केले. त्या आनंदात ओबामांच्या आगमनाची भर पडली आहे. ४५ हजार सुरक्षा रक्षक आणि १५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे ओबामा यांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. प्रजासत्ताक दिनाचे संचलन जिथे आज होईल, त्या राजपथाच्या दोन किलोमीटर परिसरातील सर्व उंच इमारतींच्या गच्चींवर सुरक्षा यंत्रणा बसवून 'परिंदाभी पर नही मारेगा' याची काळजी घेतली आहे.

    भारत-अमेरिका संबंध या दौऱ्यामुळे अधिक दृढ होतील, अशी सरकारी वक्तव्ये ऐकू येत आहेत. वास्तवात अशा पाहुण्यांचे येणे-जाणे आणि त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय धोरणांचा फारसा संबंध नसतो. त्यामुळे, ओबामा आले तसे जातील, तरीही दोन देशांमधील वादाचे मुद्दे, आपल्या प्रजासत्ताकापुढील प्रश्न कायम राहतील.

    भारतासारख्या महाप्रचंड देशात लोकशाही तगली व जगली, तर पाकिस्तानात लष्कराचाच वरचष्मा राहिला. पाकला आपला देशही एकसंध ठेवता आला नाही, ही वस्तुस्थिती भारत-पाक संबंधात कायम अडचणीची ठरत आली आहे. पाकपुरस्कृत अथवा पाकिस्तान जाणीवपूर्वक ज्यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करतो, अशांची दहशतवादी कृत्ये ही आता भारताचीच डोकेदुखी नाही. अमेरिका, युरोपातील देशांनाही त्याची झळ बसत आहे.

    पाकमध्येही सतत घातपाती कृत्ये घडत आहेत. तरीही अमेरिकेला याविषयी खंबीर भूमिका घेऊन पाकिस्तानची कोंडी करावी, असे वाटत नाही. आर्थिक संकटांवर मात करूनही भारताने गेल्या दशकभरात प्रगतीचा वेग कायम राखला. त्यामुळे, अमेरिका भारताकडे मुख्यतः बाजारपेठ म्हणूनच पाहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मेक इन इंडिया' मिशन आणि ओबामांचे 'सेल इन इंडिया' धोरण यांचा ताळमेळ कसा बसतो ते आता पाहावे लागेल. राजपथावर भारताचे लष्करी वैभव पाहताना त्यात रशियन शस्त्रास्त्रांचे मोठे प्रमाण पाहून ओबामांच्या कपाळावर नक्कीच आठी उमटेल. अमेरिकेचा भारताशी असलेला केवळ सात टक्के शस्त्रास्त्रव्यापार वाढवणे हाही ओबामांचा एक अजेंडा आहे. अणुउर्जेसंबंधीची सामग्री परदेशातून विकत घेताना, त्यासंबंधीच्या अपघाताची जबाबदारी विक्रेत्या कंपनीने घ्यावी अशी अट भारतीय कायद्यात आहे.

    ती बदलण्याचा आग्रह ओबामा करतील, असे म्हटले जात आहे. राजकीय उलथापालथ, सत्ताबदल आणि विविध विचारांचा संघर्ष झाला तरी भारतीय प्रजासत्ताकाच्या मूळ ढाच्याला तडा जात नाही, हे भारताने अनेकदा दाखवून दिले आहे. अध्यक्ष ओबामांच्या उपस्थितीत मोदी यांच्या कारकिर्दीतला पहिलाच प्रजासत्ताक दिन वाजत-गाजत साजरा होत असताना 'प्रजा-सत्ताक' या शब्दातील प्रजा म्हणजे देशातील सर्व धर्मांचे, जातींचे, पंथांचे नागरिक असा होतो, हे मात्र पुन्हा एकदा अधोरिखित केले पाहिजे.

    ReplyDelete
  3. काल सकाळी आम्ही दिल्ली विमानतळावर (आटोरिक्षामधून) उतरलो. विमानाशी पोचतो तो काय! तमाम राजशिष्टाचार लाल गालिच्यावर पायदळी तुडवून साक्षात श्रीश्री नमोजी आमच्याआधी हजर होते. (आमचे नमोजी अगदी कुण्णाकुण्णाचे ऐक्‍कत म्हणून नैत!) विमानाच्या उघड्या दरवाजातून बराकभाई अने श्रीमती मिशेलबेन बाहेर आले. ‘इकडे तिकडे लक्ष न देता पायरी पहा, तेवढ्यात मेलं अडखळाल,’ अशा आशयाचे काही तरी मिशेलबेन बोलल्या असाव्यात! कारण तात्काळ त्यांचा हात धरून बराकभाई जपून जिना उतरू लागले!

    ...सर्वात पुढे जाऊन नमोजींनी घाईघाईने बराकभाईंची गळाभेटही घेतलीन! (आम्ही आपले राहिलो मागे!) सुमारे चार मिनिटे झालेली ही गळाभेट अखिल जगताने दूरचित्रवाणीवर किमान अडीचशे वेळा पाहिली. तथापि, उभयतांमध्ये या वेळी झालेल्या संवादाचा कोणालाही पत्ता लागला नाही! खास वाचकांच्या सोयीसाठी आम्ही हा संवाद येथे देत आहो! वाचा!!

    नमोजी : (नेहमीच्या प्रसन्न वृत्तीने) आवो आवो, बराकभाई! केम छो?...तमे केम छो मिशेलबेन? प्रवास मां काई त्रांसदी? आवो...पधारो म्हारो देस!

    बराकभाई : कसं काय नमोभाऊ! झाला का नाश्‍टा?

    नमोजी : अरे शूं वांत करे छे! छेल्ला वखत तमने तो ‘केम छो?’ केला होता? आजे एकदम घाटी मराठी मां? हाहाहा!!! घाटी माणस जेवा भेटेल, तवा ‘जमला के’ विच्यारते! होहोहो!!

    मिशेलबेन : (खुलासा करत) त्या ‘केम छो’ वरून तुमच्या महाराष्ट्रातलेच लोक रागावले होते नं? कुणी तरी मि. चुलतराज म्हणून होते, त्यांनी ‘मराठीत बोला’ असं संतापून सांगितलं होतं. म्हणून मीच ‘ह्यांना’ सुचवलं या वेळी मराठीत बोला म्हणून!

    नमोजी : (विषय बदलत) अरे, च्यालसे, च्यालसे! (हात पसरत) एटला आव्या छे, तो ज्यरा जादू नी झप्पी तो आपो ने!

    बराकभाई : (धीर करून पुढे होत) हो-हो..म्हंजे...का नाही? (गपकन पकडून नमोजी त्यांच्या पाठीत धपाटे घालतात)...आय!- आय!!- आय!!!!..हळू हो!!

    मिशेलबेन : (‘तरी-मी-म्हणत-होते!’ नजरेने बघत) दुखलं नं? फार अंगचटीला जाऊ नका, असं सांगत होते तुम्हाला!

    नमोजी : (सपशेल दुर्लक्ष करीत) अरे, शेकहेंड तो करोऽऽ!! (फोटोग्राफरला खूण करत) ए, डिक्रा, फोटा पाड रे!! च्यालो, बराकभाई, पोज आपो!

    मिशेलबेन : (बुचकळ्यात पडत) काय म्हणाले हो ते?

    बराकभाई : फोटोसाठी हसा म्हणतायत!..अहो, तिथे बघून हसू नका! क्‍यामेरा हा इकडे आहेऽऽ!! अयाईग्गं!

    मिशेलबेन : (फणकाऱ्याने) इश्‍श! मला काय म्हायती? (नाक मुर्डत) तुम्हीही जरा वाहावत जाता हं! कित्ती जोरात धपके घातलेत एकमेकांच्या!..नस्ती थेरं!! आणि शेकहॅंड तरी कितीवेळा करायचा याला काही मर्यादा! शी:!!

    नमोजी : (अघळपघळपणाने) अरे बेन, असा काय बोलते! आ तो म्हारा बॅस्ट फ्रॅण्ड छे!! एटलु स्वागत तो करवुज पडसे ने!..आ तो बस झांकी छे, पिक्‍चर हवे बाकी छे! हाहाहा!!!

    बराकभाई : (चेहरा कसाबसा हसतमुख ठेवत) काढा पिक्‍चर लौकर आणि जाऊ द्या आम्हाला हॉटेलवर! रात्रभर प्रवास करून दमलोय!

    नमोजी : (अच्छे दिनांच्या सुखस्वप्नात)...आगळ त्रण दिवस मां बऊ धम्माल आवीश! तमे चिंता ना करो, मिशेलबेन!..त्रण दिवस हुं छूं ने बराकभाईने साथे! ओके?

    बराकभाई : (खोल आवाजात कळवळत) अहो, ऐकलंत का?..महानारायण तेल आणलंय का तुम्ही सामानात? हॉटेलवर गेल्यावर पाठीला चोळून शेकत पडीन म्हंटो जरा!! चला, बसा गाडीत!

    ...आणि ती सुप्रसिद्ध ‘बीस्ट’ मोटार निघाली! असो!!

    ReplyDelete
  4. अर्थव्यवस्थेने मोठी झेप घ्यायची, तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात आणि वाईटपणा घ्यायची तयारी असावी लागते. ओबामा आपल्या प्रजासत्ताक दिनासाठी आले यामुळे हरखून न जाता, ते आल्यामुळे आपली कोणती कामे होणार आहेत आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना भुलून होणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा वापर देशासाठी कसा होणार आहे, याचे भान ठेवणे बरे. ते नसेल, तर बदलास प्रत्यक्ष सुरुवात केव्हा होणार हा प्रश्न कायम राहील..
    एखाद्या दरिद्रीनारायणाच्या घरी पहिल्यांदाच त्याचा धनाढय़ नातेवाईक आल्यावर ते गरीब कुटुंबीय आणि गाव ज्याप्रमाणे हरखून जाते त्याप्रमाणे सध्या भारतवर्षांचे झाले आहे. त्यामुळे आपल्या प्रजासत्ताक दिनास जगातील एकमेव महासत्तेचे प्रमुख बराक ओबामा आले या अप्रूपातच एक मोठा वर्ग आनंद मानताना दिसतो. या दृष्टांतात फरक इतकाच की यातील अमेरिका हा धनाढय़ नातेवाईक असला तरी भारत हा दरिद्रीनारायण राहिलेला नाही. परंतु याची जाणीव भारतास आहे किंवा काय हा प्रश्न आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना हा प्रश्न अधिकच उठून दिसतो. एक प्रकारचे उन्मादी वातावरण देशाच्या सामाजिक, राजकीय वातावरणात भरून राहिलेले असून हे वास्तवाचे भान नसणे हेच या दिनी देशासमोरील मोठे आव्हान आहे. या आव्हानाची जाणीव आजच्या दिनी करून घेणे हे विचारी समाजाचे कर्तव्य ठरते.
    आपला समाज सध्या दोनच गटांत विभागलेला दिसतो. त्यातील एकास भारत हा महासत्ता झालाच आहे आणि आता आपण करण्यासारखे काही उरलेले नाही असे वाटू लागले आहे तर दुसरा नकारघंटेच्या नादातच मग्न आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या मते जगात दोनच वर्ग आहेत. अमेरिकेच्या बरोबर असलेले आणि विरोधात असलेले. भारतीय समाजात सध्या असेच वातावरण आहे. नरेंद्र मोदी यांचे दैवतीकरण करणारे आणि त्यांना दैत्य रूपात पाहणारे. मोदी यांचा उदय झाल्यानंतर या प्रकारच्या वृत्तीत विशेष वाढ झाली असून मोदी आले म्हणजे जणू सर्वच समस्या मिटल्या असे सर्वानी निमूट मान्य करावे असा यातील आहे रे गटाचा आग्रह आहे. त्यामुळे मोदी सरकारातील त्रुटी दाखवणे हे या वर्गाच्या मते देशद्रोहाइतके गंभीर मानले जाते. त्याच वेळी नाही रेवादी मोदी यांच्या आगमनामुळे देश कसा रसातळाला जाऊ लागला आहे, याच्या दंतकथा रचण्यात मग्न आहेत. हे नाही रेवादी स्वत:स पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष मानतात आणि मोदी यांचे दैत्यीकरण हे आपले दैवी कर्तव्य आहे, असे त्यांना वाटते. परिणामी मोदी यांचे दैवतीकरण करणारे आणि हे दैत्यीकरणवादी अशीच समाजाची वर्गवारी झाली असून आपला तोल घालवून बसलेल्या माध्यमांमुळे या दरीत उत्तरोत्तर वाढच होताना दिसते. प्रौढ समाजनिर्मितीसाठी हे दोन्हीही वर्ग तितकेच घातक आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही दरी अधिकच गंभीर भासत असून सत्य या दोन्हींच्या मध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी आकडेवारीचा आधार घेणे सयुक्तिक ठरावे.

    ReplyDelete
  5. दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची अर्थव्यवस्था चीनला मागे टाकेल असे भाकीत केल्यापासून तर मोदीवादींचे भानच हरपलेले दिसते. ते परत येण्यासाठी दोन अर्थव्यवस्थांमधील फरक उपयोगी ठरेल. भारताच्या परकीय चलन गंगाजळीने शुक्रवारी ३२ हजार २०० कोटी डॉलर्सचा विक्रमी टप्पा गाठला. इतका डॉलरसाठा आपल्याकडे आतापर्यंत कधीही नव्हता. परंतु त्याच दिवशी चीनकडील या परकीय चलनाचे मूल्य तीन लाख ८० हजार कोटी डॉलर्स इतके आहे. म्हणजे भारतीय गंगाजळीच्या किमान ११.५ पट. भारतीय अर्थव्यवस्थेचा जेवढा आकारदेखील नाही त्यापेक्षा अधिक चीनची केवळ श्रीशिल्लक आहे, हे आपण लक्षात घेतलेले बरे. आपली परकीय चलनाची गंगाजळी चीन, जपान वा सौदी अरेबिया यांसारख्या देशांपेक्षाही कमी आहे, हे आपण विसरून चालणार नाही. या वाढत्या परकीय चलन गंगाजळीचे श्रेयदेखील आपले नाही. जागतिक बाजारात तेलाचे भाव कमी झाल्यामुळे तेल आयातीचा आपला खर्च कमी झाला असून त्यात आपला काही वाटा नाही. म्हणजे तेलाचे भाव वाढले तर ही गंगाजळी आटणार यात शंका नाही. भारताचे मागासपण केवळ आíथक नाही. ते सामाजिकदेखील आहे. सामाजिक निर्देशांकांच्या बाबत आपण दक्षिण कोरिया, मलेशिया वा अगदी व्हिएतनाम आदींपेक्षाही मागे आहोत. आपल्या देशात जन्मणाऱ्या बालकांतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक जन्मत:च कुपोषित असतात आणि भारतीय अशिक्षित महिलांची संख्या जगातील अशा महिलांपेक्षाही अधिक आहे. जगातील एकूण लोकसंख्येपकी साधारण २० टक्के या आपल्या देशात राहतात आणि जगात प्रातर्विधीच्या किमान सोयीविना राहणाऱ्या लोकांपैकी ६० टक्के भारतीय आहेत. हे सर्व चित्र बदलायचे तर पायाभूत सोयीसुविधांत प्रचंड गुंतवणुकीची गरज आहे. पण गुंतवणूकदार भारतात येण्यास तयार नाहीत. कारण प्रत्येक परदेशी गुंतवणूकदार म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच आहे आणि ती या महान देशास गिळंकृत करण्यासाठीच येथे आली आहे, असा बावळट समज आपल्यातील अनेकांचा असतो. आपलेच आपल्याबाबत मोठे गरसमज असून त्यामुळे आपली अर्थव्यवस्था बंदिस्त आणि मागासच राहिलेली आहे. या सव्वाशे कोटींतील २० टक्क्यांपेक्षा अधिकांच्या डोक्यावर छप्परदेखील नाही. अशा वेळी महासत्तापदापासून भारत कांकणभरच दूर आहे असे मानणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताचे स्थान केवळ उझबेकिस्तान देशाच्या जवळ आहे. या निर्देशांकात भारत १४२ व्या स्थानावर असून आपण त्यातल्या बरे आहोत ते पॅलेस्टाइनपेक्षा. ही बाब काही अभिमान बाळगावी अशी खचितच नाही. या सगळ्यास तोंड द्यावे तर आव्हान आहे ते बेरोजगारीचे. भारत सध्या जगातील सर्वात तरुण देश आहे. २५ ते ६५ या वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. याचा सार्थ अभिमान बाळगायचा तर या सर्व तरुणांच्या रोजगाराचे काय हा प्रश्न उरतो. देशातील विद्यापीठांतून बाहेर पडणाऱ्या सळसळत्या तरुण हातांना काम द्यावयाचे असेल तर दर महिना किमान १२ लाख इतके नवे रोजगार तयार व्हावयास हवेत. या लक्ष्याच्या जवळपासदेखील आपण नाही, याकडे कसे दुर्लक्ष करणार? अशा वेळी केवळ ओबामा आले याचा आनंद किती मानायचा याचा विचार करणे गरजेचे आहे. माझे काम होणार असेल तर मी चपराशासदेखील मुजरा करीन, असे रिलायन्स उद्योगाचे संस्थापक धीरुभाई अंबानी म्हणत. अमेरिका आंतरराष्ट्रीय व्यापारउदिमात याच धोरणाचा अवलंब करते. तेव्हा ओबामा भारतात आले ते याच धोरणाचे पाईक या नात्याने. जवळपास ६५ कोटींची मध्यमवर्गीय बाजारपेठ जगात अनेकांना खुणावत असून आपल्या संदर्भातील हे आकर्षण अधिक मोठे आहे. तेव्हा स्वत:विषयी उगाच भ्रम बाळगण्यात अर्थ नाही याचे भान असलेले बरे. तेव्हा हे सर्व बदलणे हे खरे आव्हान मोदी यांच्यासमोर आहे. ते पेलायचे तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात आणि वाईटपणा घ्यायची तयारी असावी लागते. तशी ती आहे हे अद्याप तरी मोदी यांनी दाखवलेले नाही. मोदी आमूलाग्र बदल करू शकतात या केवळ भावनेवरच हे आशादायी वातावरण टिकून असून त्या बदलास प्रत्यक्ष सुरुवात केव्हा होणार हा प्रश्न आहे.
    या प्रश्नाच्या दृष्टिकोनातूनच प्रजासत्ताक दिनाकडे पाहावयास हवे. तसे पाहिल्यास ठळकपणे जाणवणारी बाब म्हणजे भारताची अवस्था कोणत्याही शहरातील रस्त्याप्रमाणे आहे. या आणि अशा शहरांतील रस्त्यांची कामे कधीही पूर्ण होत नाहीत आणि रस्तेही उत्तम होत नाहीत. तेथील, काम चालू रस्ता बंद ही पाटी आपल्या देशाच्या भाळावरही आहे, हे या प्रजासत्ताक दिनी विसरून चालणार नाही.

    ReplyDelete
  6. आप्पा -माननीय बराक ओबामा यांनी घटनेतील २५ क्रमांकाच्या कलमाकडे दृष्टी टाकत जे वक्तव्य केले आहे ते देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळा ढवळ करण्यासारखेच नाही का ?
    बाप्पा - अरे ते तर आहेच , पण एका सरकारी समारंभात एक कुत्रे धावत होते आणि हुलकांड्या देत होते , शिष्टाचाराच्या बाबींबाबत मोदी आणि त्यांचे मित्र अगदीच अनभिज्ञ आहेत हे सिद्ध झाले , आपले उपराष्ट्रपती यांनी प्रोटोकोल समितीत काम केले आहे त्यामुळे त्यांचे कौतुकच केले पाहिजे
    आप्पा - प्रत्येक भेटीचे रीतीरिवाज असतात आणि सलामी घेण्याचा मान फक्त राष्ट्र्पतीचाच असतो तिथे पंतप्रधानांनी सलामी घ्यायची नसते . ते बावळट गणले जाते
    बाप्पा - मी भारतीय सांगतात की चीनची गंगाजळी आपल्या कितीतरी मोठी आहे , पण त्यांचा आकार पण प्रचंड आहे चीनशी दुष्मनी करणे योग्य नाही हे जरी खरेअसले तरी त्यांना चाप लावणेही आवश्यक आहे तसेच सर्व युरोपीय हे इस्ट इंडिया कंपनी सारखे असतात हे मी भारतीय यांचे म्हणणे १०० टक्के सत्य आहे
    आप्पा - काही गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत आणि अशा अनेक गुप्त गोष्टी असतील , कदाचित पाकिस्तानचे तुकडे करायचा घाटही घातला जाइल ?कारण पाकिस्तानचा कायमचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे हे मत जोर पकडत आहे मोडी कदाचित पुढची निवडणूक त्या लातेवरच जिंकतील किंवा इंदिराजींच्या प्रमाणे युद्ध करून २/३ मेजोरीटी मिळवतील
    बाप्पा - आणि एक संघिष्ट हुकुमशहा जन्माला येईल
    आप्पा - काळाच्या उदरात काय काय लपले असेल काय माहित ?
    बाप्पा - पण मी भारतीय यांनी उत्तम विचार मांडले आहेत
    आप्पा - कधी कधी तरुण पिढीचा ब्राम्निरास झाला तर काय होईल असे वाटू लागते आणि त्याचे एका प्रचंड लाटेत रुपांतर झाल्यास काय होईल असे वाटू लागते - त्या लाटेला तरुण रक्ताला कसे वापरायचे रक्तरंजित क्रांतीतर होणार नाहीना ?
    बाप्पा - नाहीरे , ते शक्य नाही , आपण महासत्ता होण्याची संधी १० वर्षा पूर्वीच घालवली आहे खरी स्पर्धा चीन आणि अमेरिकेतच आहे त्याचा फायदा घेत युरोपियन देश आणि भारत दोघेही बलवान होऊ शकतात , पण आपण आधीच इतके पोखरलेले आहोत , की आपला पराभव आपणच करत असतो .
    आप्पा - आरक्षण , जातपात आणि त्याचे अति कौतुक आणि चर्चा , समाजातील मागासले पणा , अंधश्रद्धा आणि घरवापसी सारखे कार्यक्रम राबवण्याची इर्षा यामुळे ओबामासारखे बाहेरून येणारे आपल्याला शिकवून जातात आणि ख्रिश्चन लोकांच्या सुरक्षिततेबद्दल जणू अबोलपणे खडे बोल ऐकवतात . इस्ट इंडियाचा इतिहास अगदी नेमके हेच सांगतो .

    ReplyDelete
  7. संजय सोनवणी यांचा लेख विचारणा गती देणारा आहे आणि मी भारतीय यानी तर सविस्तर मत प्रदर्शन करत अतिशय अंतर्मुख केले आहे आणि खरोखरच आपण काळाने दिलेली एक संधी वाया घालवत आहोत का ? असा विचार करायला भाग पाडले आहे
    कधी जाती जातीतले तणाव तर कधी धर्माचा पगडा तर कधी अंधश्रद्धा , तर कधी राजकीय नेत्यांची आरक्षण किंवा तत्सदृश मुद्दे उगाळून प्रजेला वेठीस धरण्याचे आणि समाजात फूट पाडण्याचे प्रकार पाहिले की आपली आपल्याला लाज वाटते आणि अगदी मूलभूत प्रश्न मनात येतो की खरोखरच आपण एक देश आहोत का ?
    एकपक्षीय सत्तेमुळे आपल्या विचारांना भ्रष्ट करायचे काम आपल्या लोकशाहीने उत्तम तऱ्हेने केले आहे आणि न भरून निघणारे नुकसान केले आहे
    प्रत्येक सवलती आणि विचार मांडताना फोडा आणि झोडा हाच सिद्धांत वापरत राज्य भोगल्यावर एक देश ही कल्पना कशी नांदणार ?भाषावार प्रांत रचना हातर विषप्रयोगाच झाला आहे आपल्या भारत मातेवर . यातूनच प्रत्येक प्रांत हा देश बनून फुटून निघण्याचा धोका निर्माण झाला आहे
    आज नान्नावीन प्रांत जन्माला घालूनही आपण विघातानाला आमंत्रण देत नाही ना ?

    ReplyDelete
  8. मिशेल :साखरेचे पोते सुईने उसवले
    बराकरावांनी मला पावडर लावून फसवले

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...