Thursday, January 29, 2015

भाषेचे मूळ


पुरा-इतिहासातील काही बाबी गंमतीशीर आहेत. उदाहरणार्थ भाषेची जाण उपजत असल्याने प्रत्येक माणसाने पुरातन काळीच एकतर स्वत: नवीन ध्वनी, शब्द, अर्थपुर्ण शब्द याची रचना केलीय व आपापल्या टोळीसमुहातील सांगातींशी त्यांच्या रचनांना आदानपुर्वक नवीन रुपे दिलीत. अर्थ दिलाय. अर्थ हा व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. अर्थ हा  नेहमीच, व्यक्तिपरत्वे परिमाणे, तीव्रता बदलली तरी सामुदायिकच असतो. शब्द निर्मिती कदाचित व्यक्तिगत असू शकते, अर्थनिर्मिती मात्र सामुदायिक बाब असते.

बरे, साठ -सत्तर हजार वर्षांपुर्वी माणुस कसा होता? त्याचे सामुदायिक जीवन कसे होते? त्या काळी माणूस टोळ्यांनी अन्नाच्या शोधात भटकत असे हे सर्वमान्य आहे. निएंडरथल माणुस सम्मिश्रणाने म्हणा कि त्याहून वेगळी विकसीत आजच्या माणसाच्या पुर्वजाची होमो सेपियन जात अवतरली म्हणून म्हणा, लयाला गेला. हे खरे असले तरी त्यालाही बोलता येत होते असे त्याच्व्ह्या अवशेषांवरुन आधुनिक मानवशास्त्र मान्य करते. मग तीच क्षमता होमो सेपियन्समद्धे होती हे अमान्य करायची आवश्यकता नाही.

बरे, त्याच्यात बोलायची क्षमता होती म्हणजे काय? तर त्याला बोलण्यासाठी आवश्यक असलेली गळ्यातील व्होकल कोर्डची रचना त्याच्यात अंतर्भुत होती. आता आवाज...विविध ध्वनी निर्माण करण्याची यंत्रणा असली कि विविध ध्वनींना त्याने विविध अर्थ देणे, निसर्गातील अनेकविध आवाजांची नक्कल करत त्या आवाजांवरुन ते आवाज निर्माण करणा-या प्राण्यांना ओळखणे. त्यांना त्याच नांवावर आधारीत नांवे देणे ही प्रारंभिक प्रक्रिया माणसाच्या उदयकाळाच्या लगोलग सुरु झाली असणे स्वाभाविक आहे. पण त्याहीपेक्षा जगण्यासाठी लागणा-या घडामोडींचे वर्णन करणारे शब्द आधी निर्माण होणे स्वाभाविक आहे.

बरे, शब्द आणि अर्थ एकाच टोळीत निर्माण झाले असतील काय? तेवढी क्षमता मानसाला अजून विकसीत करायची होती. त्या काळात टोळ्या अन्नाच्या आणि शिकारीच्या शोधात भटकत असत. या भटकंतीत अन्य टोळ्याही संपर्कात येणे स्वाभाविक आहे. सर्वच टोळ्या एकमेकांशी संघर्ष व लढाया करत असत्या तर आज मुळात पृथ्वीतलावर माणूस शिल्लकच राहिला नसता. म्हणजेच परस्परसहकार्य, संघर्ष, लढाया, तटस्थपना हे सर्व गूण सर्वच टोळ्या परस्पर संपर्कात आल्यावर वापरणे स्वाभाविक होते. हे घडत असतांना आद्य काले ते एकमेकांत संवाद कसा करत असतील? संतापाचे-द्वेषाचे शब्द जसे वापरले जात असतील तसेच प्रेमाचे-स्नेहाचे शब्दही वापरले जात असतील. एकमेकांचे स्व-विकसीत शब्द जसे स्विकारले जात असतील तसेच दिले जात असतील. याला आपण शब्दसांस्कृतिक विनिमय म्हणु शकतो. भले तो रागाने असो कि प्रेमाने असो.

शब्दसमूह हा असा विकसीत होत जाणे स्वाभाविक आहे. बरे हा विकास, शब्द जसा एकाने उच्चारिला तसाच्या तसा दुसरे स्विकारतात असे नाही. प्रत्येकाचे शब्दोच्चार सामर्थ्य हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. आकलनावरही आहे. आणि तोच शब्द पुढच्या पिढ्या वेगळ्या वातावरणात, परिप्रेक्षात कसा अर्थ लावत कसा उच्चारितात हेही अनेक सापेक्ष बाबींवर अवलंबून आहे. पुन्हा असा अर्थबदल/उच्चारबदल झालेला शब्द पुन्हा अनेक ठिकाणी, टोळ्यांच्या भिन्न ठिकाणी भिन्न परिप्रेक्षात संक्रमित होतच राहिल्यामुळे, मूळ शब्द (म्हणजे आपण आता त्याला धातू म्हणू किंवा मूळ म्हणजे रुट म्हणू) जरी मुलभुत स्वरूप टिकवून असला तरी त्याचे अर्थसंदर्भ, उच्चारसंदर्भ आणि गर्भितार्थ तसेच राहतील याची शाश्वती नाही.

आद्य काळात भाषा नव्हती. कारण व्याकरण नव्हते. केवळ ध्वनी, काही शब्द आणि हावभाव होते. ही शाब्दिक संपत्ती देवाणघेवाणीनेच वाढत राहिली. गरजेतून नवीन शब्द किंवा ध्वनीही निर्माण केले गेले. विशेषत: धार्मिक संदर्भात काही ध्वनी कसे गुढ मानले गेले हे आपण पाहू शकतो. टोळीजीवन हे मुलत: टोळी अस्मिता आणि शुभाशूभ संकल्पनांशी निगडित होते.  टोळीची ओळख म्हणून देवके अथव टोटेम्स आली. शुभाशूभ संकल्पनांमुळे पवित्र विरुद्ध अपवित्र अशी आपसूक इष्टानिष्टाची वाटणी झाली. वाईटाला नांव दिले गेले तसेच चांगल्यालाही. ही विकासशिलता काही हजार वर्षांची आहे. ही चांगल्या-वाईटाची नांवे वेगवेगळ्या अर्थांनी, समजुतींनी आणि स्वतंत्र दैवत/दानवकथांनी विविध टोळ्यांत स्विकारली गेली. आदानप्रदानाने वैभव प्राप्त करत गेली. असूर व देव हा शब्द अनेक संस्कृत्यांत वेगवेगळ्या ध्वनीछटांसह व अर्थबदलांसहही आढळतात याचे कारण हे वाटप फार फार पुर्वीच झालेले होते.

परंतू माणुस पशुपालक बनला तसा त्याच्या संस्कृतीचा पहिला टप्पा सुरु झाला. शब्दांना व्याकरण याच काळात गरजेचे झाले. जीवनव्यवहार फक्त जगण्यापुरता न उरता त्यापारच्या दैवतशास्त्रावरही तर गेलाच पण स्वामित्वाच्या नैसर्गिक भावनांना वाट करून देणारा ठरला.

या टोळ्या भटक्या होत्या हे खरे आहे. परंतू या टोळ्यांचे आधीचे अमर्याद क्षेत्रांत असणारे भटकेपण चाळीस हजार वर्षांपुर्वीच आपापल्या ज्ञात क्षेत्रांपर्यंत झाले. प्रादेशिक जाण तेंव्हाच निर्माण झाली. चिपांझ्यांतही ती असते, ते आपापली क्षेत्रे ठरवून घेतात आणि सीमांवर राखणही करत असतात. प्राण्यांमद्ध्ये असलेली ही जाण माणसांतही नसेल तरच नवल!

थोडक्यात शिकारी माणूस भटका असला तरी त्याची भटकंती स्वत:च्या ज्ञान भुगोलापर्यंत मर्यादित झाली. तत्पुर्वी जमा झालेल्या स्वस्विकृत (उधारी) आणि स्वनिर्मित शब्द/व्याकरण भांडवलावर त्याची स्वत:ची भाषा विकसीत होवू लागली. त्याची संस्कृती ही कधी स्वनिर्मित तर कधी अनुकरणातून निर्माण होवू लागली. अलंकार, दगडी हत्यारे, कातड्यांची वस्त्रे, गुहा-निवारे, दफनाच्या पद्धती ते तात्कालिक वसाहती यातून जगभर ही आद्य संस्कृती निर्माण झालेली दिसते.

या आद्य संस्कृतीचा प्रसार कसा झाला? ती कोणा एका टोळीने निर्माण केली होती कि ती जागतिक सामुदायिक प्रक्रिया होती? प्रसार झाला असेल तर कोठुन कोठे आणि नेमका कसा हे समजायला आप्ल्याकडे नेमकी कोणती साधने आहेत? एकाच काळात वेगवेगळ्या द्फनपद्धती का सापडतात? वेगवेगळी मृद्भांडी का सापडतात? मृद्भांडी बनवायची कला कोणी शोधली? उत्तरेतील कि दक्षीणेतील लोकांनी? युरोपातील कि आशियातील लोकांनी? हे मुर्ख प्रश्न आहेत कारण मुळात त्यांना उत्तरच असू शकत नाही. कोणतेही बाब कोठेही, कोणत्याही तथाकथित भाषिक टोळीत शोधली गेलेली असू शकते आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतींनी अनुकरण, उपयुक्तता लक्षात घेउंन, केले जाउ शकते. आजही ते होते. गरजा पुर्ण करण्याची साधने कोणी तरी शोधते व झपाट्याने ती पसरतात, स्थानिक कच्चा माल व आवडी यानुसार त्यांची वेगवेगळी प्रारुपे अवतरतात.

त्यात वावगे काही नाही.

आता लाल भांडी, काळी भांडी कि तपकीरी भांडी आनि ती कोणत्या संस्क्रुतीची यावरचा वाद मात्र विनोदी आहे. जणू काही भांडी बनवयची पद्धत बदलली कि नक्कीच तेथे कोणी अन्य प्रभावी मानवगट आला पाहिजे ही धारणा! आहे त्या मानवी समुदायांत नाही आवडी-निवडी-उत्पादनपद्धती बदलू शकत? कोणाचे तरी अनुकरण नसू का शकत? आज ते होत नाही काय? मग आदिम काळात अशा पद्धती बदलल्या, त्यांच्या धर्मकल्पनांत फरक पडला, सुधारणा झाली म्हनून दफनपद्धती बदलल्या असतील असा विचार आम्ही का नाही करत?

आम्ही तसा विचार करत नाही कारण आम्ही आमच्या पुरातन पुर्वजांच्या वर्तनांतून आम्हाला हवा तसा इतिहास शोधत आमचे वर्चस्ववादी सिद्धांत लागू करू पाहतो.

असो. भाषांचे नेट (जाळे) कसे बनते? परस्पर-संबब्ध भुभागांतील लोकांच्या भाषांत काही शब्द समान असणे, व्याकरणात कोठेतरी ताळमेळ असणे यात नवल नाही. समान भूगोल असतांनाही काही भाषांत अंतराय असणे, विभेद असणे, अगदी वेगळा भाषिक गट असणे वा वाटने हेही स्वाभाविक आहे. भारतातील उत्तरेतील भाषा आणि दक्षीणेतील भाषा हे याचे व्यापक  उदाहरण तर खुद्द उत्तर भारतात अस्तित्वात असलेल्या उरांउ, मुंडा, कोल वगैरे अत्यंत वेगळ्या भाषाही येथे एक उदाहरण म्हणून घेता येतील.

पण हा भेद का आहे? हा भेद एखादा मानवी समूह अन्य मानवी समुहांपासून आपापल्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक संकल्पना जतन करण्यासाठी जाणीवपुर्वक अन्य मानवी समुदायांपासुन दूर राहिला तर काय होईल? नागरी संस्कृती आणि परंपरागत आदिम संस्कृतीचे चाहते यात हा भेद राहणारच. म्हणजेच त्यांची संस्कृती भाषिक संस्कृतीसह वेगळी राहणार हे उघड आहे. आदिवासींची भाषा ही आदिम (प्रोटॊ) असते कारण आपल्या भाषेत, मर्यादित गरजा असल्याने, विशेष विकासाची गरज त्यांना भासत नाही. उत्तर-दक्षीण भाषांचे जे गट पडले आहेत त्याला भौगोलिक कारणेच अधिक आहेत. अन्यथा तथाकथित इंडो-आर्यन लोकांच्या भाषांचा गेल्या साडेतीन हजार वर्षांत प्रभाव पडत त्या आर्यन गटाच्या उपभाषा झाल्या असत्या.

भाषेचे मूळ कोणी बदलत नाही. त्याचे स्वरूप बदलत नाही. भाषा प्रवाही असतात हे खरे पण त्याचा मूळ गाभा आदिमच असतो. आक्रमकही फारतर भाषेचे वरकरणी स्वरुप बदलू शकतात. सतराव्या शतकातील शासकीय मराठी ही फारशीने प्रभावित असली तरी ती मराठीच आहे हे आपल्याला कळते. शब्दार्थ बदलतात. शब्दही बदलत जातात. पण मुळ गाभा बदलत नाही. जगभर हे झालेले आहे, वेगवेगळ्या पद्धतीने.

मराठी भाषा संस्कृतातून निघाली कि संस्कृत मराठीतून निघाली, कि संस्कृत पालीतून विकसीत झाले कि शौरसेनीतून कि गांधारीतून? खरे तर हे कोणताही भाषाविद सांगू शकनार नाही, कारण भाषा ही जशी मानवी समुदायाची उपजत निकड आहे, तशीच तो जो भौगोलिक क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राचीही. राहुरकर म्हणतात, आधी भाषा प्राकृतच असते, परंतू काव्य, साहित्य यासाठी शब्दांना अधिक परिष्कृत केले जाते. तिलाच आपण संस्कृत म्हणतो. शुद्ध भाषा सर्वात आधी कालत्रयी अवतरू शकत नाही. भाषांची सुरुवातच मुळात मोडकी-तोडकी आणि प्रदिर्घ काळात विकसनशील होत जाते. त्यात समान भुगोल असलेल्या भागांतील सांस्कृतिक नव्य शोधांची देवाण-घेवाणही होत जाते.

भाषा ही आक्रमक लादू शकत नाहीत (स्थानिक भाषांच्या संदर्भात) हे भारताने गेल्या साडेआठशे वर्षांचा गुलामीनेही पाहिले आहे. वरकरणी बदल कोणत्याही भाषेचा आत्मा बदलत नाहीत. त्याला आपण सांस्कृतिक जेनेटिक्स म्हणू शकतो. भाषिक उत्क्रांती ही सातत्याने होणारी बाब असते. शब्दांचा एका संस्कृतीकडून दुसरीकडे प्रवास अनेक कारणांनी होवू शकतो. विशेषत: तांत्रिक शब्द, नात्यांची संबोधने, झाडा-झुडपांची नांवे ई. ही सर्वस्वी स्वतंत्र निर्मिती नसते.

आणि म्हणूनच इंडो-युरोपियन भाषागटाचा अथवा सेमेटिक भाषा गटांचा सिद्धांत कोणा मुळ टोळ्यांच्या कोठूनतरी कोठेतरी विखुरण्याला देता येत नाही. भाषांचे सातत्यपुर्ण परिवर्तन मान्य असले तरी त्याचे क्रेडीट एखाद्याच विस्थापित मानवी समुदायाला देणे म्हणजे अकलेचे दिवाळे काढणे होय!

6 comments:

  1. अशा प्रकारचे चिंतन करताना पावलोपावली अनेक तलम विचारांची आवर्तने सुरु होतात
    पहिला पशुपालक माणूस अपघाताने झाला असेल का निरीक्षणाने ?कोणते पशु माणसाळले तर फायद्याचे आहे आणि कोणते घातक आहे ? पक्षी पालन काय फायदे देते ?
    दूध हे पहिले अन्न आहे का ? गोपालन आणि शेतीचा शोध हा तर चमत्कारच आहे असे अनेक विचार मनात येतात . नवीन फळे चाखताना अनेकजण मृत्यू पावले असतील नाही का ?त्या आधारावर ते निरीक्षण मनात साठवत ठेऊन परंपरा रुजल्या असतील
    आपण अतिशय उत्तम प्रकारे विषय फुलवला आहे त्याबद्दल अभिनंदन
    दोन टोळ्या आपापसात का लढल्या असतील ? वाटेकरी वाढले म्हणून ? कोणती विचारधारा त्यांना हत्याराचा वापर करण्यास प्रवृत्त करत असेल ? आत्म गौरव , भीती का चढाओढ ?
    संजय सरांनी एक फार मोठा विषय आपल्या स्वाधीन केला आहे , त्यात आपण मन मानेल तितके चिंतन करू शकतो . टोळ्या बनल्या त्याच मुळी कोणाचे तरी वैयक्तिक प्रभुत्व मान्य करत ?तिथेच रक्षण आची कल्पना आली आणि त्यातूनच भलेबुरे ठरवणारे निर्माण झाले ?
    शब्द शब्दसमूह आणि भावना यांच्या परंपरेतूनच भाषा निर्माण झाली असावी
    देव ही कल्पना तर त्या काळात फार दूरची असेल असे वाटते , कारण ही कल्पना अस्तित्वासाठी अगदी अनावश्यक आहे असे वाटते . ती चैनीचा विषय वाटते .
    दुष्काळ वगैरे गोष्टी तितक्याशा गंभीर नसतील कारण माणूस अजून स्थिर झाला नसेल ,
    माणूस मृत झाल्यावर माणूस रडू कधी लागला असेल ?सहवासाची ओढ म्हणजे काय ?

    ReplyDelete
  2. nice Blog ....
    Submit your blog in our blog directory 4 more visitors
    www.blogdhamal.com

    ReplyDelete
  3. अतिप्राचीन काळी मनुष्यप्राण्याच्या शरीरातल्या इतर संस्थांसमवेत मज्जासंस्था, श्रवणसंस्था,कंठ, ओठ,जीभ,दात,नाक ह्या अवयवांची अतिआश्चर्याची उत्क्रांती झाली, आणि त्यायोगे तोंडाने तर्‍हेतऱ्हेचे आवाज (ध्वनी) करणे आणि दुसऱ्या प्राण्यांनी/मनुष्यांनी केलेले आवाज (ध्वनी) ऐकणे ह्या गोष्टी मनुष्यप्राण्याला शक्य झाल्या. त्या उत्क्रांतीच्या आणखी पलीकडे माणसाच्या मेंदूची उत्क्रांती अशी की विशिष्ट आवाजांना विशिष्ट मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके करण्याची कल्पना माणसाला सुचली. त्यानंतरचा माणसाच्या बुद्धीचा टप्पा म्हणजे वेगवेगळ्या मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके ठरलेल्या शब्दांना विशिष्ट रित्या वाक्यांच्या साखळ्यांमधे बांधून सभोवतीच्या माणसांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची माणसाला सुचलेली कल्पना. मुख्य म्हणजे विशिष्ट आवाजांच्या साखळ्यांच्या प्रतीकांद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्याकरता माणसांच्या "टोळ्यां"मधे प्रतीकांसंबंधात सर्वसंमतता अनिवार्यतः असावी लागणार होती आणि असावी लागते!

    वर म्हटलेली "टोळ्यां"मधली शब्द आणि भाषेचे व्याकरण ह्यांबाबतची सर्वसंमतता गरजेपायी हळूहळू कशी तयार झाली असावी ही कल्पना खूप मनोरंजक आहे. कारण कुठल्याही "टोळी"मधली ती सर्वसंमतता कुठल्याही काळी टोळीतल्या अग्रणींच्या सभा भरवून टोळ्यांनी ठरवल्या नव्हत्या! कालौघात वेगवेगळ्या भाषांमधले व्याकरण हळूहळू ठरत गेले, वेगवेगळे शब्द प्रचारात आले, काही शब्दांचे अर्थ बदलले, काही प्रचलित शब्द अप्रचलित झाले. भाषांमधले शब्द आणि व्याकरणसुद्धा, दोन्ही गोष्टी कालौघात अनिवार्यतः हळूहळू बदलत असतात.

    ReplyDelete
  4. कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते. म्हणून मराठी भाषा इथून सुरुवात झाली असे म्हणता येत नाही.
    भाषेचा कालखंड या प्रमाणे आहेत.
    वेदपुर्वकालीन भाषा – इ. स. पू. ५००० च्या पूर्वी
    वैदिक, ब्राह्मण, सौत्र उपनिषदे -इ. स.पू. ५००० ते इ. स.पू. १०००
    पाणिनीय संस्कृत- -इ.स.पू. १००० ते इ. स. पू.२००
    पाली -इ.स.पू. ६०० ते इ. स. पू. २००
    महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, पैशाची -इ. स. पू. २०० ते इ.स. २००
    अपभ्रंश -इ.स.पू. ४०० ते इ.स. ७००
    मराठी, गुजराथी, हिंदी, इत्यादी -इ.स. ७०० च्या दरम्यान
    मराठी भाषा आर्य भाषाकुळात उत्पन्न झाली असे समजल्या जाते. वेदपुर्वकालीन भाषेची कल्पना वेदसमकालीन वाङ्मयावरुन ठरवावे लागेल. येथील मूळ लोकांची भाषा कोणती होती हेही सांगणे जरा अवघडच आहे. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या भाषेचे नाव काय होते या बद्दल मतभेद आहेत, इंडो-युरोपियन, इंडो-जर्मन, इंडो क्लासिक, आर्यन, इत्यादी इत्यादी. तरीही आर्यांची भाषा आर्यन हे जरा बरोबर वाटते. वेदभाषेत देव, शाल,अग्नी, पशू, पितृ, नृ, रै, गौ इत्यादी शब्द वेदपूर्व भाषेत हेच शब्द देवह, शालाह, अग्नय,पशव,पितर, नर-नार, रय-राय,गव-गाव असे आहेत. प्राकृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. अतिप्राचीन काळात ती आर्याची एक बोली भाषा असावी. सुशिक्षित वर्गाची भाषा वैदिक तर सर्वसामान्याची भाषा प्राकृत असावे. वैदिक भाषेत अनेक प्राकृत शब्दात आढळतात. जसे, वक= वक्र, वहू=वधू, मेह=मेघ, पुराण= पुरातन, चन्दिर=चंद्र , इंदर= इंद्र,मरन्द= मकरंद. त्यानंतर पाणिनीय संस्कृत भाषेची अवस्था येते. महाकवी व्यास, वाल्मिक यासारख्या कवींनी या भाषेला प्रगल्भता आणली. कालिदास, भवभूती, दण्डी, बाण, शंकररामानुज, इत्यादी लेखकांनी ही भाषा समृद्ध केली. वैदिक संस्कृत ही पाणिनीय संस्कृतपेक्षा इराणमधील ‘अवेस्ता’ भाषेशी अधिक जवळची वाटते. इंडो-इराणियन भाषा गटात वैदिक संस्कृत आणि इराणमधील अवेस्ता या भाषांचा समावेश होतो.
    पुढे प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाल्याच्या खुणा या प्राकृत भाषेत दिसत असल्या तरी प्राकृत भाषा ही एकच होती असे समजण्याचे काही कारण नाही.ती सामान्य लोकांची बोलीभाषा असावी. ती बोली ज्या ज्या प्रदेशात बोलल्या जात असावी त्या प्रदेशावरुन त्या त्या भाषेला ती नावे मिळाली असावी. महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, अवन्तिका, प्राच्या, इत्यादी प्राकृत भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात. समाजात वावरणारे वेग-वेगळे घटक वेगवेगळी प्राकृत भाषा बोलत असत असे नाट्यशास्त्रात सांगितले आहे म्हणतात. पद्याची भाषा महाराष्ट्री, शौरसेनीभाषा राजस्रिया व दुती बोलत, दरबारात काम करणार्या स्रिया या मागधी बोलत. कोळसे विकणारे पैशाची, सैनिक,राजपुत्र व्यापारी अर्धमागधी बोलत. विदुषक आणि इतर पात्र प्राच्य भाषा, तर मोळी विकणारे शाबरी अशी वेगवेळी भाषा समाजातील विविध घटक बोलत असत.

    ReplyDelete
  5. प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे....

    १) वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
    २) मध्ययुगीन प्राकृत – पाली, महाराष्ट्री शौरसेनी इत्यादी
    ३)महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा
    ४)हिंदुस्थानातील सध्याच्या रुढबोली.
    वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.
    मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-
    १) वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स. ५०० – ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.
    २) संस्कृत पासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.
    ३) प्राकृतापासून मराठी भाषा निर्माण झाली असे मत आहे. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून याचेही नेमकेपणाने उत्तर मिळत नाही. संस्कृत,प्राकृत, अपभ्रंश या भाषेचे थोडे थोडे गूण दिसतात. पण याच प्राकृत पासून मराठी जन्माला आली असे म्हणता येत नाही. प्राकृत भाषेपासून आधुनिक बोली तयार झाल्या आहेत जश्या शौरसेनीपासून हिंदी, सिंधी. गुजराथी भाषा अपभ्रंशी पासून, तर बंगाली मागधी पासून. मराठी भाषेच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचे सर्व रुपे स्वीकारलेली दाखविता आले पाहिजे. मराठीचे संदर्भात असे दिसते की, नामविभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून तर आख्यात -विभक्ती क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात.
    मराठी भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरुन त्या प्राकृत भाषेपासून मराठी निर्माण झाली असे समजले जाते.
    १) पाली या या प्राकृत भाषेतील काही गोष्टी मराठी भाषेत दिसतात.बर्या च शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रुपे पाली भाषेत जशी आढळतात. तशी ती मराठी भाषेत दिसतात.
    पाली : तृण, प्रावृष,पीडन,गूड
    मराठी: तिण, पाऊस, पिळणे, गूळ
    पाली भाषेतील ळ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय दुस-या भाषेत नाही.
    ‘ळ’ हा वैदिक भाषेत आहे म्हणतात पण संस्कृत भाषेत नाही. ‘ळ’हा वर्ण द्रविडी भाषेतून मराठीत आला आहे.
    २) पैशाची भाषा :
    पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान,
    मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य
    पैशाच्या भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाच्या आणि काही प्राकृत भाषेत ‘ण’ नाही
    ३) मागधी भाषा
    मागधी भाषेच्या काही खुणा मराठी भाषेत आढळतात. मागधी भाषेत ‘र’ आणि ‘स’ या बद्दल ‘ल’ आणि ‘श’ वर्ण येतात. ‘ष्ट’ बद्दल ‘स्ट’ आणि ‘स्थ’ बद्दल ‘र्थ’ येतो. जसे, मिसळ =मिशळ /मिश्र, केसर = केशर.
    प्राकृत अर्धमागधीचे बरेच विशेष मराठी भाषेत आढळतात. अर्थमागधीची रुपे माहाराष्ट्रीशीही जुळतात. दीर्घ स्वर र्हास्व करण्याची प्रवृत्ती मराठीने अर्थमागधी भाषेतून उचलली आहे. जसे, कुमर= कुमार
    महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये मराठीत दिसतात, महाराष्ट्रीय आख्यात विभक्तीचे बरेच प्रकार ही महाराष्ट्री भाषेतून स्वीकारली आहे. जसे, हत्तीस= हत्तिस्स, आगीस = अग्गिस, करीन = करिस्सामो, करिशिल = करिस्सासि.
    ‘मी’ या सर्वनामाची सर्व रुपे महाराष्ट्रीच्या रुपाशी जुळतात. जसे अहस्मि = मी, आम्मि = मज, मए= मिया, म्या, मझतो = मजहुनि, मज्झ = मज. अनेकवचनी रुपे, अम्हे= आम्ही, अहमसुंतो = आम्हाहुनी, अहम= आम्हा.
    अपभ्रंश भाषा :अपभ्रंश ही अभिरांची भाषा होती. आभीर जमात गुजरात, कोकण, विदर्भात स्थायिक झाली.
    मराठी काव्यात असणारी अन्त्य ‘यमक पद्धती’ अपभ्रंश भाषेपासून मराठीने स्वीकारली आहे.
    संस्कृत भाषेपासूनही मराठीने काही बाबी स्वीकारल्या आहेत.
    १) ऋ, ई, औ, हे वर्ण संस्कृतमधे आणि मराठी भाषेतही आहेत. प्राकृत भाषेत हे वर्ण नाहीत.
    २) ड; त्र ही अनुनासिके संस्कृतमधे आहेत. ते मराठीत आली.

    ReplyDelete
  6. ३) अनेक संस्कृत शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत. त्यात तत्सम आणि तद्भव शबांदाचा समावेश आहे.
    मराठी ज्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाली त्यासाठी एक दीर्घ कालखंड गेला असणार. पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, वगैरे प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. आधुनिक भाषा निर्माण झाल्यावर प्राकृत भाषेतून ग्रंथ निर्मिती होत होती इ.स. ११०० पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले असावेत. निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शैरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलल्या जाऊ लागली.
    मराठी भाषेची उत्पत्ती पाहण्यासाठी काही शिलालेख, ताम्रपट आणि अन्य मराठी भाषेचा उल्लेख असणारी काही साधने यांच्या आधारे आपण मराठी भाषेचा निर्मिती काळ शोधण्याचा प्रयत्न करतो.
    आणि अभ्यासकांना मराठीचा पहिला शिलालेख सापडला तो म्हणजे १) उनकेश्वराचा शिलालेख इस. १२८९ ला. आणि त्याहीपेक्षा मागे जातांना श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.स. ६८० च्या ताम्रपटात ‘पन्नास, आणि प्रिथवी’ हे शब्द आहेत म्हणून मराठीची सुरुवात माननारे अभ्यासक आहेत पण भाषातज्नाचे त्यावर एकमत होत नाही त्याचबरोबर ‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे हे त्या दोन ओळीत सांगितले आहे.
    ”सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला !
    मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !!
    मराठी भाषा सुंदर कामिणीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे. ‘कुवलमाला’ या ग्रंथाचे लेखक उद्योतनसुरी यांच्या ग्रंथात १८ भाषेंचा उल्लेख येतो ही अठरा भाषा बोलणारी माणसे कशी आहेत त्याचा उल्लेख त्यात येतो. पण केवळ ‘मराठा’ या उल्लेखाने मराठा म्हणजे मराठी बोलणारे असे म्हणणे जरा घाईचे होईल. प्राकृत भाषा बोली भाषा म्हणून लोप पावल्यानंतर देशीभाषा सुरु झाल्या या देशभाषा गुप्त राजांच्या काळात होत्या.
    सारांश, मराठी भाषेबाबत असे म्हणता येते की, मराठी भाषा ही कोणत्याही एका भाषेपासून सुरू झालेली नाही. महाराष्ट्री आणि अपभ्रंश भाषेचे उपकार मराठी भाषेवर अधिक आहेत. नारदस्मृतीत देशभाषांचा जो उल्लेख आहे तो ‘मराठी’ असा लक्षात घेतला तर मराठीचा उत्त्पत्तीकाळ इ.स. सनाच्या ५ व्या शतकापर्यंत मागे नेता येतो. प्रत्यक्ष मराठी वळणाचे शब्द इ.स. ६८० पासून शिलालेख आणि ताम्रपटात सापडतात.
    पण आज तरी मराठी रुपाचे पहिले वाक्य इ.स. ९८३ चे ‘ श्री चावुण्डराजे करवियले’ हेच आहे.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...