Sunday, April 19, 2015

वडारांची आशा!



वडार समाज हा भटक्या-विमूक्त समाजात मोडतो. एके काळचा नगररचना, दुर्गरचना, मंदिरे, रस्ते ते लेणी यांचे निर्माण करत इतिहास जीवंत ठेवणारा हा अत्यंत कष्टाळु समाज. जाते, पाटे-वरवंटे, उखळे अशी जीवनोपयोगी वस्तुंचे निर्माण करणारा हा समाज. औद्योगिकरणाची चाहूल भारतात लागल्यानंतर असंख्य पारंपारिक व्यवसाय नष्ट होऊ लागले, पारंपारिक कलांचा संकोच होत गेला. व्यवसायाची क्षेत्रे आकुंचित होत आता तर पार संपली आहेत. या संक्रमणामुळे समाजावर आर्थिक अवनत्या कोसळणे, आहे त्याच क्षेत्रातील दगडफोडीसारखी दुय्यम कष्टप्रद कामे उरणे अपरिहार्य होते. तसेच झाले. वडार समाजही अवनतीच्या गर्तेत फेकला गेला. त्यात या स्वाभिमानी समाजाला इंग्रजांनी सरसकट गुन्हेगारी समाज ठरवले. भारताला ४७ साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी भटक्या-विमुक्तांना मात्र स्वातंत्र्याचे पहाट उजाडायला ५२ सालापर्यंत थांबावे लागले. अजून हे समाज स्वतंत्र आहेत का याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी आहे.

वडार समाजात आर्थिक अवनतीमुळे सामाजिक दोष घुसणे अपरिहार्य होते. अज्ञान, अंधश्रद्धा आणि नवीन जगाशी नाळ जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती नष्ट झाल्याने अवनतीचे सावट गडद होत गेले असल्यास नवल नाही. या समाजाला जागृतीचा वसा द्यायला अन्य पुढारलेले समाज काय आणि सरकारही काय, कोणीच पुढे आले नाही. समाजात स्वार्थी "जातीय" नेते निर्माण झाले आणि आजही आहेत हे खरे असले तरी त्यंना खरेच समाजाचे प्रबोधन व कल्याण हवे होते काय या प्रश्नांचे उत्तरे दुर्दैवाने नकारार्थी आहेत. नेते म्हणून मिरवण्यात आणि काही फुटकळ राजकीय पदांच्या बदल्यात समाजाला विकायचे धोरणच राबवले गेले आहे. हा दोष सर्वच वंचित समाजांच्या नेत्यांमद्ध्ये आहे हे आपले दुर्दैव.

पण अशा स्थितीतही ध्येयनिष्ठेने कार्य करणारे अमर कुसाळकरांसारखे लोक दिसतात तेंव्हा दिलासा मिळतो...आशेचा किरण उगवल्यासारखे वाटते.

अमर कुसाळकर व माझा परिचय तसा फार जुना नाही. पण निगर्वी, ध्येयनिष्ठ, समाजासाठीची त्यांची तळमळ आणि केवळ भाषणे ठोकत न बसता त्यांच्या समाजासाठीच्या सकारात्मक कृत्या मला भारावून गेल्या आहेत आणि त्यामुळेच मी हा लेख लिहित आहे कि ज्यायोगे अन्य समाजांतील नेत्यांनाही थोडी तरी दिशा मिळावी. अमर कुसाळकर हे वडार समाज च्यरिटेबल ट्रस्ट चालवतात. हा ट्रस्ट फार जुना नाही. कुसाळकर स्वत: गर्भश्रीमंतही नाहीत. त्यांची आर्थिक स्थिती (त्यांनी सांगितली नसले तरी) जेमतेम असावी याचा अंदाज खर्चांची तोंडमिळवणी करतांना त्यांची जी दमछाक होते ती पाहुन कोणालाही येईल.

वडार समाज शिक्षणाच्या बाबतीत खूप मागे असुनही फेसबुकसारख्या आधुनिक साधनाचा उपयोग करत या माणसाने हजारो समाजबांधव एकत्र गुंफले. सातत्याने समाजाच्या वेदना मांडत, सकारात्मक उपक्रमही राबवले. गेल्या वर्षी त्यांनी प्रथम समाजासाठी समाजाची सखोल माहिती देणारे क्यलेंडर काढले. हे या समाजाचे ज्ञानाकडे, स्व-जाणीवांकडे पडणारे पहिले पाऊल होते. स्वत:ला समजावून घेत आपण आजच्या स्पर्धात्मक युगात नेमके कोठे आहोत हे दाखवण्याचा हा स्तुत्य अभिनंदनीय असा उपक्रम होता. त्याचे प्रकाशनही नेटके झाले. समाजातील अबोल लोकांना त्यांने बोलायला लावले.

वडार समाजातील महिला या पुरुषाच्या बरोबरीने कष्ट करणा-या. त्यांची अवस्था तर अधिकच दयनीय. परंतू त्यांचाही मेळावा घेत शेकडो महिलांना एकत्र आण्झत त्यांनाही कुसाळकरांनी बोलते केले, समस्यांवर त्यांनेच उहापोह केला हे एक मोलाचे कार्य. खरे तर पुढारलेल्या समाजांतही हळदी-कुंकवापलीकडॆ महिलांचे कार्यक्रम होत नाहीत, पण कुसाळकरांनी सामाजिक जाणीवांसाठी जो हा उपक्रम राबवला त्याची नोंद इतिहास नक्कीच घेईल.

मुक, अबोल, शिक्षणात मागे असलेल्या या समाजात नवप्रतिभा नाहीत असे नाही. पण अभिव्यक्तीची माध्यमे कोठे आहेत? आपली साहित्य संस्कृतीही जे भाषिक आणि सांस्कृतीक मापदंड पाळत साहित्यिकांनाही वेठीला धरते तेथे नुकत्याच रांगु लागलेल्या प्रतिभांना कोण संधी देणार? कुसाळकरांनी यंदा "वडार समाज" दिवाळी अंक प्रकाशित करायचे ठरवले. हा उपक्रम तडीला नेणे सोपे नव्हते. पण या माणसाची जिद्द अचाट. दणदणीत अंक प्रकाशित केला. चपराकचे संपादक घन:शाम पाटील यांनी त्यांना मोलाचे तांत्रिक सहकार्य केले. या अंकाचा प्रकाशन सोहोळाही झाला. पुण्यात प्रथमच अन्य पुढारलेल्या समाजांतील पण सा-या महाराष्ट्राचे असे ज्येष्ठ-श्रेष्ठ डा. श्रीपाल सबनीस आणि डा. सदानंद मोरे यांनी या समाजाबद्दल तळमळीने जी भाषणे केली त्याला तोड नाही. कुसाळकरांच्या आणि म्हणूनच वडार समाजाचा हा विलक्षण गौरव आहे...

पण दुर्दैवाने समाजच मागे पडतो याचे चित्रही कार्यक्रमाच्या वेळीस स्पष्ट झाले. समाजाची उपस्थिती नगण्य म्हणता येईल अशी होती. कुसाळकर उदास होते. त्यांनी भाषणही आटोपते घेतले. पण त्यांनी उदास-निराश होण्य़ाचे कारण नाही. आज जर आपले समाज मागे असतील तर त्याला आपणच जबाबदार आहोत याची जाणीव या निमित्ताने झाली हे महत्वाचे आहे. परिवर्तन आणि प्रबोधन या अशा बाबी आहेत ज्या अत्यंत सावकाश होतात. ब्राह्मण समाजाने आगरकर, लोकहितवादींसारख्या महनियांनी समाजाची तळमळ बाळगत, नवविचारांचे बोधामृत देत झोपलेल्या समाजाला जागे करायचा प्रयत्न केला तरी त्या काळात त्यांची घोर उपेक्षाच झाली आहे. पण आजचे बदल व्हायला त्यांनी जीवाचा केलेला आटापिटा होता हे विसरुन चालत नाही. कुसाळकरांचेही तसेच आहे. आज तुमची पर्वा समाज करणार नाही...पण तो बदलेल तोही तुमच्यामुळेच हे लक्षात ठेवा!

कुसाळकरांनी आता समाजासाठी मासिकही सुरु केले आहे. ते प्रबोधनासाठी माध्यम हातात असणे आवश्यक असतेच.

कुसाळकर वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठ पाईक.. त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक नैतिकतेची प्रबळ भावना आहे. ते भावनिकही आहेत. भावनिक माणसेच क्रांत्या घडवतात. ते समाजनिष्ठुरांचे, व्यावहारिक लोकांचे काम नाही. समाज हवी तेवढी साथ देत नाही. समाज लबाडांमागे, खोट्या आश्वासनांमागे धावण्यात धन्यता मानतो हे सर्वच समाजांचे दुर्दैव आहे. त्यामुळे प्रसंगी निराशा येणे सारे व्यर्थ वाटणे स्वाभाविक आहे. वडार समाजाला शिक्षण, आरोग्य, राजसत्ता, अर्थसत्ता यात अजून प्रचंड मजल मारायची आहे. समाजातील अज्ञान, व्यसनाधीनता दूर सारत, सामाजिक न्यूनगंडाला दूर सारत प्रबळ आत्मविश्वासाने नव्या जगात "आम्हीही आव्हान निर्माण करु शकतो" या आत्मविश्वासाप्रत न्यायचे आहे. कुसाळकरांसारखे निस्पृह सामाजिक कार्यकर्ते त्यात यशस्वी व्हावेत हीच माझी भावना आहे.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...