Wednesday, July 1, 2015

तर आम्ही पुरोगामी कसे?

मुंबईत पाच आठवड्यांपुर्वी झालेल्या भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मी म्हणालो होतो कि...

"आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर जाऊन बोला. तुम्ही शहाणे आणि खरे असाल तर समोरच्यांपैकी किमान दोन लोक तरी तुमचे विचार समजावून घेतील. दोनाचे चार आणि चाराचे आठ व्हायची प्रक्रिया त्यातुनच सुरु होईल. समतेचे विचार ख-या समतावादी आचरणातुनच जातात. विचार हे सर्वांसाठीच असतात. तुमचे विचार पक्के असतील तर कोणाहीपुढे कधीही तुमचे विचार मांडता आले पाहिजेत. सत्याचा तोच महिमा आहे. कोणी संस्कृतीचे अपहरण केले असे आपण म्हणतो तेंव्हा फक्त आरोप करुन चालत नाही तर पुराव्यानिशी तसे सिद्ध करावे लागते. आमचा सांस्कृतिक अभ्यासच मुळात नगण्य आहे....मग नुसते आरोप करुन आमची संस्कृती काय होती आणि अशी का झाली हे कसे समजणार? आम्हाला अभ्यास नको आहे. आम्हीच जातीयवादी आहोत, वक्त्यांच्या जाती व माझा प्रवर्ग सांगितला जातो आहे....आणि आम्ही जाती नष्ट करायची स्वप्न पाहतोय. हा विरोधाभास आम्हाला समजावून घ्यावा लागेल. जाती नष्ट करायच्या नसतील तर नका करु...किमान जातींतील समता तरी आधी आणाल? पण आम्हाला तेही करायचे नाही. मग आम्ही समतावादी आहोत हे म्हणायचा आम्हाला काय अधिकार? बुद्ध, बाबासाहेब, फुले, शाहुंना अभिवादन करायचा काय अधिकार? आम्ही गेल्या वर्षी हीच अभिवादने करतांना जिथे होतो तिथेच आजही आहोत आणि पुढच्या वर्षीही तिथेच राहणार असू तर आम्ही पुरोगामी कसे?

"संस्कृतीची अपहरणे झाली आहेत. पुरातन वारसा नाकारायच्या नादात आम्हीच आमचेच व्यास-वाल्मिकी ते कालिदास नाकारत गेलो आहोत. आम्ही सारेच नाकारायच्या नादात आम्हाला संस्कृतीच नव्हती हेच उरबडवेपण करून सांगत आहोत. पण सिंधू संस्कृती आज समजते ती तत्कालीन कुंभारांच्या मृद्भांड्यामुळे, शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे, गवंड्यांच्या शिस्तबद्ध बांधकामांमुळे, मुर्तीकारांच्या रचनांमुळे आणि अलंकार बनवणा-या कारागिरांच्या कुशल कारागिरीमुळे. आम्हाला ही संस्कृती समजते ती देशोदेशी व्यापार करणा-या तत्कालीन साहसी, दर्यावर्दी व्यापा-यांमुळे आणि त्यांना लागणारी शिडाची भव्य जहाजे बनवणा-या सुतारांमुळे. या वैदिकांचे साहित्य आम्हाला आमचा इतिहास सांगत नाही. आमचा इतिहास प्रत्यक्ष पुराव्यांनी सामोरा आहे....शाब्दिक नाही...आणि प्रत्यक्ष जे असते तीच संस्कृती असते....लेखनात चो-या, प्रक्षेप होऊ शकतात....प्रत्यक्ष वास्तवदर्शी वस्तुंत नाही. आमचा इतिहास निर्माणकर्त्यांचा आहे...लेखनिकांचा नाही हे आपण समजावून घेतले पाहिजे.

"सांस्कृतिक अपहरण झाले आहे हे खरे मानले तरी आमचे काय होते हे शोधायची आमची तयारी नाही. किंबहुना सारे काही नाकारायचेच ठरवले असेल तर मग आज आम्हाला आमची संस्कृतीच नाही हेही मान्य करावे लागेल. बरे, तेही ठीक आहे असे समजू. पण मग आम्ही नवी संस्कृती घडवायला तरी तयार आहोत काय? नाही. संस्कृती ही अर्थकारण, सत्ताकारण आणि त्याहीपेक्षा मोठे म्हणजे ज्ञानकारण यातून साकार होते. अर्थकारण म्हणावे तर आमचा डोळा गेला बाजार नोक-यांवर. सत्ताकारण म्हणावे तर ते आजही भिकेच्या तुकड्यांवर. आणि ज्ञानकारण....ते तर आम्हाला आजही दुरचे स्वप्न झाले आहे. त्याच्या अभावात संस्कृतीचे पुनर्रचना अशक्य आहे, याचे भान आम्हाला जर येत नसेल तर आमचे कसे होणार यावर आम्हीच नीट विचार केला पाहिजे."

5 comments:

 1. आप्पा - अतिशय सुंदर !अभिनंदन !
  बाप्पा - तुझ्या एक लक्षात येतंय का ? आपली तिखट लिहिण्याची पद्धत संजयाने दिट्टो उचलली आहे बोलण्यासाठी , हेही गमतीदार आहे . , पण काहीही म्हण , बोललाय अगदी बरोब्बर !
  आप्पा - आपली मोहंजो दारोची टिमकी वाजवली हे पण अगदी बरोब्बर आणि वैदिकांचीपण हजेरी घेऊन टाकली हेपण बरे झाले . त्याच्याशिवाय शांती लाभत नाही आमच्या संजयला !
  बाप्पा - झोप लागत नाही !
  आप्पा - जगात हा एकाच माणूस असा आहे की जो कोणताही विषय सिंधू संस्कृती आणि वैदिक अशा दोन्ही मुद्द्यांवर नेउन टेकवतो . त्याचे श्रोतेपण माना हलवणारेच असतात .
  बाप्पा - गंगेत घोडे न्हायले म्हणतात ना ते दुष्ट वैदिक , अगदी तसेच हे शैव लोक सिंधूत घोडे न्हायले असे म्हणतात ! असे असावे . संजयला भाषणाला बोलावतात कोण आणि का ?
  आप्पा - त्या कार्यक्रमाला गर्दी फारच होती ना ?
  बाप्पा - असेल असेल , आपण समजत जाऊ . नेहमी चांगले विचार करायचे आपल्याला संजयनेच शिकवले ना ?
  आप्पा - मोहन्जो दारोतले बैल दूध द्यायचे आणि गायी नांगरणी करायच्या , कारण ते स्त्री सत्ताक राज्य होते असा शोध संजयने लावला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला . भाषणाचा विषय होता , हमाल चळवळ आणि नवरात्र !
  बाप्पा - म्हणजे ?
  आप्पा म्हंजे वाघाचे पंजे कुत्र्याचे कान शुभ मंगल सावधान !
  आप्पा -मी नाही समजलो ! कशाचा कशाला मेळं नाही ! हीच तर संजयची जिद्द आहे . उद्या पुण्यातील पहिला प्लेग असा भाषणाचा विषय असेल तरी संजय बोलायला उभा राहिला की वैदिक आणि सिंधू संस्कृती येणारच , लोक त्याला विनोदी वक्ता म्हणतात ते काय उगीच नाही . असो
  बाप्पा - समाजासाठी काहीतरी करतोय ना ? मग ठीक आहे !
  आप्पा - खरेतर त्याने पुरुष सूक्ताच्या विरोधात स्त्रीसूक्त लिहावे !
  बाप्पा - खर रे खर , कित्ती कित्ती विचार करतोस रे आप्पा तू संजय बद्दल !
  आप्पा - मग ? माझा लाडका आहे तो !

  ReplyDelete
 2. पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्‍या सह्या निर्माण केल्या. ज्यांनी या सह्या आपल्या प्रतिसादात वापरल्या ते प्रतिगामी आहेत का? तर नाही त्यांच्यातल्याच अनेकांनी 'स्त्रियांचे कपडे' टाइप अनेक धाग्यांवर पुरोगामी म्हणता येतील अशा स्वरूपाची मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे माझ्या मनात जे वैचारिक मंथन झाले त्याचे हे प्रकटन आहे. (मंथनाचे थोडे कारण 'माझी मते अशी का?' याबाबत अन्य सदस्याकडून झालेली विचारणा हेही होते)

  पुरोगामी म्हणजे काळानुरूप पुढे जाणारी विचारसरणी अशी ढोबळ व्याख्या केली तरी काळानुरूप पुढे* अशी निश्चित दिशा विचारसरणीला असते का? म्हणजे २५ वर्षामागे अशी विचारसरणी समाजात होती. सध्या अशी आहे म्हणजे आणखी २५ वर्षांनी अशी असणार असे सांगता येते का? तर तसे काही नसते. मग पुरोगामी (पुढे जाणारी) विचारसरणी कशाला म्हणतात/म्हणावे?

  जनरलाइज्ड बोलायचे तर आधुनिक ज्ञान उपलब्ध होण्यापूर्वीच्या निकषांवर आधारलेले मत (समाजनियम) योग्य आहे की अयोग्य आहे याचा पुनर्विचार करून लिबरल निकषांवर अजूनही योग्यच असलेले मत स्वीकारणे अयोग्य असलेले मत/ नियम धिक्कारणे. समजा मला ब्राह्मणांनी मांसाहार करायला हरकत नाही असे सांगायचे आहे तर मी म्हणतो, 'मनुस्मृतीत ब्राह्मणांनी मांस खाल्लेच पाहिजे/खायला हरकत नाही असे अमुक तमुक श्लोकात लिहिले आहे.' असे सांगणे हे जुनाट विचारसरणीचे म्हणता येईल कारण जस्टिफिकेशन म्हणून मी जुन्या ग्रंथाचा आधार देत आहे. मांसाहार करण्याने काही जीवशास्त्रीय नुकसान होत नाही असे अभ्यासांती आढळले आहे म्हणून मांसाहार चालेल असे सांगत नाही.

  मी वर लिबरल निकष हा आणखी एक शब्द वापरला आहे. लिबरल म्हणजे तरी काय. माझ्यापुरती याची व्याख्या सर्वांना मनःपूत वागण्याची समान मुभा इथून सुरुवात करून समाज हा समाज म्हणून अस्तित्वात रहावा इतपतच बंधने प्रत्येकाच्या वागणुकीवर आणावीत अशी विचारसरणी.

  मी लिबरल/पुरोगामी विचारसरणीचा आहे याचा अर्थ या 'फर्स्ट प्रिन्सिपल' पासून सुरुवात करून प्रत्येक नियमाचा विचार करतो. एखादा नियम करताना तो समाज अस्तित्वात रहावा यासाठी अत्यावश्यक आहे का हा प्रश्न सर्वात आधी विचारतो. आणि तो नियम नसता काही लोक जे वागतात ते इतरांना त्रासदायक असते काय? घातले जाणारे कुंपण जितके मोठे ठेवता येईल तितके ठेवणे हा माझ्या विचारसरणीचा उद्देश असतो.

  हे झाले नव्याने केल्या जाणार्‍या नियमाबाबत. पण आपण आज नव्याने समाज उभारत नाही आहोत. समाज आधीच अस्तित्वात आहे. आणि कुंपणे भरपूर प्रमाणात घालून झालेली आहेत. तेव्हा शक्य तेथे/आवश्यक तेथे ढुशा मारून कुंपण मोठे करण्याचा प्रयत्न ही देखील माझी पुरोगामित्वाची व्याख्या. प्राथमिक निकष पुन्हा तोच. समाज धोक्यात येईल का?

  आता मी अस्तित्वात असलेल्या प्रत्येक नियमाविषयी असा विचार करतो का? तर नाही जेव्हा एखादा नियम चर्चेत येतो तेव्हाच मी असा विचार करून माझे मत ठरवतो. समलैंगिकतेचा प्रश्न असाच अचानक समोर आला. त्यावर माझे काहीही मत नव्हते. तो समोर आल्यावर (एका सदस्याकडून खरडीतून विचारणा झाल्यावर) मी त्याच्यावर वरील निकषानुसार विचार केला. आणि समलैंगिक असण्याने समाजाचे अस्तित्व धोक्यात येत नसल्याने त्यावर असलेले कायद्याचे बंधन जाणे योग्य अशा निष्कर्षाप्रत मी आलो.

  'त्या' सहीत लिहिलेले समलैंगिकांचे उदात्तीकरण हा भाग तत्कालिक रागात लिहिला गेला असावा असे वाटते. कारण 'यापुढे समलैंगिक होणे हे प्रत्येकाचे ध्येय असायला हवे' असे लिबरल लोकांचे म्हणणे नव्हते.

  पुन्हा समाज धोक्यात येणे याची व्याख्या निश्चित नाही. माझी व्याख्या फार मोकळी आहे. समाज करून राहण्याने माणसाचे जीवन एकटे राहण्यापेक्षा सुखी होते. तेवढ्याच प्रमाणात समाज अस्तित्वात राहिला तरी पुरे अशी माझी व्याख्या.

  हे माझे मुक्त चिंतन आहे.

  ReplyDelete
 3. स्वतःला 'पुरोगामी' विचारांचे म्हणवणाऱ्या माझ्या तथाकथित मित्रांना.... मैत्रिणींना.... माझे इतकेच सांगणे आहे कि, केवळ चार-चौघात आलो कि पुरोगामित्वाचे डोस देणे व मनातून वा घरात त्याच जुन्या बुरसटलेल्या विचाराचे पाईक असणे असे दुटप्पी वागणे आता बंद करा. बाहेर आल्यावर आम्ही कसे पुरोगामी विचाराचे? हे ओढून ताणून दाखवायचे नि घरात लग्न व शुभ कार्य असले कि, मुहूर्त पहायचे, पत्रिका बघायच्या, मंगळ-अमंगळ पहायचे, घरा-गाड्यांवर लिंबू-मिरच्या टांगायच्या तसेच केवळ ब्राह्मण वा खालच्या जातीतला आहे म्हणून समोरच्याला शिव्या घालताना स्वतः मात्र आपण 'क्षत्रिय किंवा वैश्य' (शेवटी चातुर्वाण्याचेच भाग) असल्याचा अवास्तव अभिमान बाळगायचा यालाच दुटप्पीपणा म्हणतात हे लक्षात घ्या. अशाने तुमच्या पुरोगामित्वाचा बुरखा टराटर फाटला जातो हे तुमच्या गावीही नसते; पण आम्हाला ते दिसते, जाणवते. ऐकिवात असलेला दुतोंडी साप मी प्रत्यक्षात पाहिलेला नाही परंतु अशा लोकांकडे पाहिल्यास ते खरेच अस्तित्वात आहेत याची जाणीव होते.

  कुणी केवळ अमुक जातीचा वा धर्माचा म्हणून त्याचा राग वा कौतुक करू नका. आम्हाला ब्राह्मण विरोधी ठरवणाऱ्या महाभागांच्या लक्षात आले असेल कि नसेल हे आम्हाला माहित नाही, परंतु डॉ. दाभोलकर हे सुद्धा ब्राह्मण होते. परंतु त्यांच्या हत्येने आम्हाला झालेले दु:ख आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. कारण दाभोलकर सर हे ब्राह्मण होते कि आणि कोणत्या जातीचे? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. पुरोगामी विचार स्वीकारलेला किंवा 'जुने जाऊ द्या मरणा लागुनी..." म्हणत आधुनिकतेची कास धरून त्याप्रमाणे चालणारा, चांगले बदल घडवून आणणारा माणूस हा 'आमचा' असतो... तोच सर्वांना 'आपला' वाटू लागतो. त्याला कोणती जात नसते, कोणता धर्म नसतो.. तो केवळ 'माणूस'च असतो... तुमच्या आमच्या सारखा..!!

  तेव्हा 'पुरोगामी' होणे म्हणजे काय..?? तर माणसाला 'माणसाची' ओळख देऊन त्याला 'माणसासारखे' वागवणे होय, समानतावादी व विज्ञानवादी बनणे होय. कुणाचा जाणूनबुजून द्वेष करणे नव्हे..!!!!

  ReplyDelete
 4. "मी भारतीय", अत्यंत उत्तम विचार. विचारकलहातुन आपण पुढे जातो. द्वेष हे काही जगण्याचा पाया होऊ शकणारे तत्व नाही...जे बनवतात ते विनाशाप्रत जातात.

  आप्पा-बापा...तुम्ही कोण आहात हे माहित नसले तरी चिरपरिचित आहात. तुमची शैली कधी कधी राग आणते हे खरेच आहे, पण मला तुम्ही अनेकदा जागेही करता. आता तुम्ही म्हणालात कि प्लेगवर संजयला बोलायला सांगितले तरी तो ते सिंधू संस्कृतीपर्यंत नेवून ठेवीन. खरे आहे. सिंधू संस्कृतीच्या जलवायुमान बदलाच्या काळात प्लेगची साथ येउन हजारो लोक मेले होते. आता म्हणा, "बघा, मी नव्हतो म्हणालो?".....पण हे मी नाही तर जोनाथन मार्क केनोयेर हा सिंधू स्थळांवर प्रचंड काम केलेला पुरातत्वविद म्हणतो. (आता तुमची पुढील प्रतिक्रिया अपेक्षितो....)

  ReplyDelete
  Replies
  1. आप्पा - संजयला आनंदाने मिठी मारावीशी वाटते .
   बाप्पा -खरच , कडकडून भेटावेसे वाटते .
   आप्पा - पण ,
   बाप्पा - संजय म्हणेल अहो आजोबा , काय हे स्वतःच्या कवळीचा तरी विचार करा , कडकडून मिठ्या कसल्या मारता ? आम्हाला काही चोईस आहे की नाही ?
   आप्पा - खरच की रे , आपल्या मिठीने लोकाना त्रास होईल असे आपले वय झाले हे लक्षातच येत नाही आपण आपल्या शुभेच्छा देऊया ! संजय मनापासून शुभेच्छा . असेच विचार सांगत जा , आयुष्याच्या शेवटच्या वळणावर खूप बरे वाटते . असे वाचले की !
   बाप्पा - आमचे आशीर्वाद म्हणजे शबरीची बोरे समजून गोड मानून घे
   बाप्पा - हे मात्र खवचट पणे नाही बर का .

   Delete