Thursday, December 24, 2015

इंद्रजीत कुलकर्णी व मेधा पाटील...

इंद्रजीत कुलकर्णी व मेधा पाटील...
कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य. हे घृणास्पद कृत्य केले ते मुलीच्याच भावंडांनी. सख्ख्या बहिणीचा आणि मेव्हण्याचा गळा त्यांनी कसा चिरला असेल? कोठून येतो हा निर्दय पाशवीपणा? या भयानक हत्याकांडाची विशेष चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. माझे मित्र प्रकाश पोळ यांनी लोकसत्तातून लिहिल्यामुळे वाहिनीवर चर्चा झाली. त्या चर्चेत माझे स्नेही प्रा. हरी नरके यांनीही महाराष्ट्रीय जातीयवादाचे मर्म उलगडून दाखवले. फेसबुकवर बोटचेप्या खंती आल्या पण त्यात यातील दाहकता समजण्याएवढा पाचपोच नव्हता. म्हणजेच जातीयवादाच्या केवढ्या गहन गर्तेत महाराष्ट्र सापडला आहे यावर मंथन (झालेच तर) करण्याची आवश्यकता आहे.
सांस्कृतिक/वैचारिक लढे, वादविवाद होत राहणे हे सुदृढ समाजाचे लक्षण म्हणता येईल, पण त्यात, असल्या वादांशी काडीइतकाही संबंध नसलेल्या, कोवळ्या जीवांच्या अजरामर प्रेमभावनेला, त्यांच्या सहजीवनाच्या स्वप्नांना अशा क्रूर पद्धतीने कायमचे नष्ट करु पाहणा-या विकृतींना स्थानच असू शकत नाही. दोषेंना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असल्या मागण्या ठीक आहेत. पण मुळात असल्या घटना घडणारच नाहीत यासाठी आपापल्या द्वेषबुद्ध्यांना नष्ट करणारी सामाजिक विचारधारा आम्हाला प्रभावशाली करता येत नसेल तर महाराष्ट्राचे धिंदवडे निघतच राहणार!
प्रकाश पोळांनी अत्यंत सत्य मांडलेय...मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून कथित पुरोगामी गप्प बसले काय? जी मुलगी मेली ती तर तशाच उच्च म्हणवल्या जाणा-या जातीतील...मारणारे तिचे सख्खे भाऊ. बहिणीने उच्च असो कि तथाकथित नीच जातीतील मुलाशी लग्न केलेच कसे या प्रश्नाने त्यांचा तिळपापड व्हावा व निर्दयतेने दोन हत्या व्हाव्यात आणि मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून हे तथाकथित पुरोगामी शांत बसले असतील तर मात्र या लोकांना "फुरोगामी" म्हणणारे निंदक, संघी, योग्यच आहेत असे म्हणावे लागेल. कारण त्यांची तीच लायकी आहे.
मी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करतो.

1 comment:

  1. जाती उप जाती गटात वावरणाऱ्या लोकांमध्ये अहंकार दांभिकपणा /मिरवणेपण अँकरशिप तसेच बदनामी/बहिष्काराच्या भित्रेपणाच्या मानसिकतेमुळे माणसाचा माणूस म्हणून विचार न करता इतर भूतदया वगैरे वगळता बेटी देवाण घेवाणीवर अत्यंत कडक निर्बंध गावोगाव आहेत. त्यामुळे अशी माणसे सरळ खुनावर आलीत. मग धार्मिक सामाजिक जाणीवेच्या शिकवणीत त्रुटी आहेत किंवा कसे, हे शोधले पाहिजे. ग्रामीण व्यवस्थेमध्ये उदा.मोठे बागायतदार असो वा दुर्बल शेतकरी असोत किंवा इतर विवाह संस्थेबाबत अतिशय कठोर आहेत. नैसर्गिक रित्या दोन मनांचे अवखळपण एकत्रिकरण त्यांना या टोळी सदृश व्यवस्थेने स्पष्ट नाकारले आहे. त्यामुळे फसवी निराशा, आम्ही एकदम चांगले खानदानी असे पाखंड हे मनामनात रुजलेले दिसते. याबाबत धार्मिक व्यवस्थेचा पोटभरुपणा तसेच हतबलपणा अत्यंत मोठे मोठे तत्वज्ञान सांगणाऱ्या प्रज्ञावंतही या विषयावर उघडे पडतात. विवेकानंदही अशा विषयावर असेच हतबल झाले होते. पण मला वाटते समाजाचे बदलते मार्गक्रमण बुध्दीची अचुकता जाणीवेची क्षमता पाहता, यात पिढीपरत्वे बदल होत राहतील. मात्र या घटनेचा प्रचंड मोठया प्रमाणावर निषेध व्हावयास पाहिजे होता. माध्यमांनीही जणू ती काही बातमीच नाही असे पाहिले न पाहिल्यासारखे केले. अत्यंत गंभीरपणे चर्चा आंदोलनाचे स्वरुप या घटनेला समाज धारणेसाठी देता आले असते. एका आई बापाचा मुलगा मुलगी असे भविष्यातले आधार नक्की गेले.नव्हे घालवले. माणसे अशी हैवान होतातच कशी,अजुनही माणसातले रानटीपण शिल्लक आहेच.

    ReplyDelete

Out of Africa Theory: From Origin Story to Evolving Hypothesis

It is no longer sufficient to treat the Out of Africa theory as a settled and final explanation of human origins. Much like the “single h...