Thursday, December 24, 2015

बदलायचे आहे कि नाही?

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

जात्युच्छेदनाच्या चळवळी तर एक फार्स झाल्या आहेत. जातीअंत करायचा म्हणायचे आणि वक्त्यांच्या जाती जाहीरपणे सांगायच्या, कोणत्या जातींचे लोक जमलेत याचा उद्घोष करत टि-या बडवून घ्यायच्या. संघाचे लोकही असेच. आम्ही जातीपाती पाळत नाही म्हणतात आणि सर्वांच्या जातींची व्यवस्थित खबर ठेवतात. मंचावरुनही तसे उल्लेख करतात. जातीचे राजकारण नको असे मोठ्या तोंडाने लोक बोलतात आणि जातीच राजकारण करत आपल्याच जातीच्या नालायकांमागे ठाम उभे राहतात. महाराष्ट्रातून चळवळ मेली आहे हे मी ५ वर्षापुर्वीच घोषित केले होते. असल्या भाकड मनोवृत्तीचे नागरिक कसलीही सामाजिक चळवळ चालवू शकत नाहीत. यांना आजही जगण्यासाठी जातीचा आणि तिच्या खोट्या, वांझ अहंकारांचा व इतिहासाचा आधार लागतो. माणसाचे माणुसपण नेमके कशात आहे हे समजावून घेण्याची कुवत ज्या देशात नसते तो देश रसातळाला जाणार हे उघड आहे.

जाती तत्काळ नष्ट करता येत नाहीत तर किमान सर्व जातींना समान मानत त्यांचा सन्मान करायला काय हरकत आहे? प्रत्येक जात ही व्यवसायाने पडली आहे. प्रत्येकजातीने देशाच्या सांस्कृतिक व आर्थिक इतिहासात मोलाचे योगदान दिलेले आहे. या सर्वच जातींच्या सुकृतामुळे आज आम्ही येथवर आलो आहोत. आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जातीचे अहंकार का सुटत नाही? खिशात नाही आणा अन म्हणे बाजीराव म्हणा असला नपुंसक अभिमान काय कामाचा?

फुले-शाहू-आंबेडकरांचे नांव घेत जे चाललेय ते काही केल्या भुषणास्पद नाही. त्यांचे कार्य व विचार कणमात्रही पुढे नेता आले नाहीत कि त्यात भर घालता आलेली नाही. आजही सांस्कृतिक इतिहासाचे आकलन बालीश आहे. आजही तथाकथित चळवळीतले नेते "आर्य वंशीय बाहेरुनच आलेत." असे समजून त्यांच्या रणनित्या आखतात. समजा बाहेरुन आले तरी पाच हजार वर्षापुर्वी...एवढ्या जुन्या कालात्र समजा आले भारतात म्हटले तरी ते कोणत्या अंगाने परके/बाहेरचे राहतात याचा साधा विचार करायची अक्कल यांना कशी येत नाही?

संघवादी विद्वान हा तर वर्चस्वतावादाचा दांभिक व अज्ञानाचा कळस आहे. सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती कशी यावर अचाट/बेफाट आणि कास्लेही अकलेचे तारे तोडत त्यांचे काम चालू असते. आता तर पुरातत्व विभागही त्यांच्याच अखत्यारीत असल्याने उद्या काय "चमत्कार" ते घडवून आणतील याचा नेम नाही. बामसेफ/ब्रिगेडच्या ब्राह्मण द्वेष्ट्या भुमिकेने ब्राह्मण संघटित होत परशुरामाला "हिरो" बनवत वांझ शड्डू ठोकतात. तेही द्वेषाची धार वाढवायचाच प्रयत्न करतात. सनातनवाल्यांचा आचरट धार्मिक आणि खुनशीपणा कशातून येतो? या सर्वांवर कठोर अंकुश समाजाच असला पाहिजे...पण तो कोठे आहे?

वास्तवपुर्ण, तथ्यपुर्ण दृष्टीने आम्हाला जीवनाकडे पहायला कोणी शिकवलेच नाही. वांझ हरलेल्यापणाच्या गाथा सांगत कोणाचा तरी द्वेष करणारे एकीकडे बेफाम आहेत तर दुसरीकडे संस्कृतीच्या प्राचीन वैदिकपणाच्या अचाट काल्पनिककथा सांगत बसणारे जोमात आहेत. यांना जातीजातीत सोडा, पोटजातींतही समता आणता आलेली नाही. हे काय वैचारिक आणि आर्थिक प्रगती साधणार? अशांचे भवितव्य कशाच्या ना कशाच्या गुलामीत राहणे हेच असते.

खोटे अहंकार बाळगत कोणीही बदलू शकत नाही. उद्याचे सूर्य यांना अप्राप्यच राहणार. माणसांचे मुडदे पडत राहणार. दुस-या जातीत लग्न केले म्हणून कोवळ्या पोरांचे छळ होतच राहणार...ठारही मारले जाणार. वाळीत टाकण्याची एक जुनी पद्धत होती, ती आताहे वेगवेगळ्या थरांत , अगदी वैचारिक - साहित्यिक क्षेत्रातही कटाक्षाने पाळली जाते. अघोषित बंद्या पालल्या जातात. हा समाज निघृण आहे हे वास्तव मान्य करत जे काही थोडके लोक उरलेत त्यांना नैराश्य येत तेही हार मानतील अथवा परिस्थितीशरण होतील असे वातावरण आहे.

बदलायचे आहे कि नाही? 

3 comments:

  1. संजय सर,
    तुमच्या ब्लोगवर अनेक वेळा विचारांच्या पताका टांगल्या जातात , त्याचा विषयाशी काहीही संदर्भ नसतो ,समान नागरी कायदा या लेखानंतर मधु कांबळे यांनी प्रचारकी थाटात , डॉ आंबेडकर आणि धर्म निरपेक्षिता तसेच मधु दंगले यांनी असेच काहीतरी कंटाळवाणे लिहिले आहे.आप्पाबप्पा यांनी असेच मुलीचा huf मधला हक्क याबद्दल लिहिले आहे.
    संजय सर आपण असले लिखाण का प्रतिबंधित करत नाही , त्या ऐवजी आपण इतरांचे लिखाण सेन्सॉर करता याचा खेद होतो. आम्हाला प्रश्न पडतो की बौद्ध लोकांचे समाजात किती प्रमाण आहे आणि काही लोकांनी सांगितल्या प्रमाणे ते काही लाखात आहे , म्हणजे बौद्ध आणि त्याचा विचार हा
    भारतातून पूर्ण फेकला गेला आहे, गौतम बुद्ध ही सिम्बोलिक दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात मांडायची शोभेची वस्तू बनली आहे. अशावेळी त्याला दलित म्हणवून त्या विचाराना आपण कशासाठी महत्व देता ? संपूर्ण भारतात बौद्ध तत्वज्ञान पराभूत झाले आहे .जपान चीन कंबोडिया,थायलंड ,श्रीलंका यानाही अहिंसा बाजूलाच ठेवावी लागते.
    मूळ विषय सोडून लिहिणार्या लोकाना आपण सेन्सॉर करावे आणि आप्पाबप्पा सारख्या माणसाना बंद करावे . नुकतेच त्यातल्या एकाचे मरण ओढवले असे वाचले ,म्हणजे सुंठीवाचून खोकला गेला असेच या बाबत बोलायला पाहिजे

    ReplyDelete
  2. संजय साहेब तुम्ही नोंदविलेल्या सर्व गोष्टींचे मूळ धर्म व ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यात आहे. प्रत्येक माणसाला जन्मत: आपल्या जन्मदात्याचा धर्म प्राप्त होतो आणि तेव्हापासूनच तो लोककथात अथवा धर्मग्रंथातले ईश्वर , भगवान, अल्ला अथवा गॅाड यांनी केलेले चमत्कार खरे मानत असतो. माणसाने स्वत:ला बदलायचे ठरविले तर सर्व श्रघ्दा तर्कशुद्ध पद्धतीनेच तपासल्या जाव्या. पण श्रघ्दा गेली तर मानवी जीवनातून ईश्वर आणि धर्म सुध्दा नाहीसे होतील अशी भीती अनेकांना ज्यांचा स्वार्थ यांत दडलेला असतो त्यांना वाटते. पण हे सत्य आहे की ईश्वर आणि धर्माशिवाय समृध्द मानवी संस्कृती आणि सुखी जीवन शक्य आहे. तसे झाले तर उत्तम पण त्यासाठी मानवतावादाचा स्वीकार होणे आवश्यक आहे. जगातील मानवाच्या समस्यांची पूर्तता ही ईश्वर कल्पना हे थोतांड आहे असे मान्य करून व ते सर्वांना पटेल अशा प्रकारे प्रचार करूनच होऊ शकते यांत शंका नाही.
    एकदा ईश्वरकल्पना व धर्म नाकारण्यात आला की सर्व समाज सर्व समस्यांचा विचार वेगळ्या प्रकारे करायला शिकेल व जातीव्यवस्था आणि इतर तत्सम कल्पना समाजातून आपोआप गळून पडतील. हे सर्व कठीण असले तरी सार्वत्रिक शिक्षणातून करणे अशक्य नाही. असे बदल घडवून आणायची क्षमता सामाजिक क्रांतीमध्येच आहे. बदलायचे आहे किंवा नाही ? प्रश्न साधा वाटला तरी त्याचे उत्तर बहुसंख्य लोकांतर्फे 'होय' असणार यांत शंका नाही.
    संजय साहेब तुम्हाला पुढाकार घेणे शक्य आहे काय ?

    ReplyDelete
  3. आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जातीचे अहंकार का सुटत नाही? खिशात नाही आणा अन म्हणे बाजीराव म्हणा असला नपुंसक अभिमान काय कामाचा? -->Excellent Sir!!

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...