Wednesday, February 24, 2016

ईश्वरी सत्तेच्या नांवाखाली

तुकोबाने आणि अनेक संतांनी विठ्ठलाला केंद्रबिंदू मानत आपापले भावविश्व उभे केले. त्या भावविश्वातील विठ्ठल हे तुकोबाचे वास्तव होते. समजा विठ्ठल ही देवता त्या काळात नसती तर अन्य कोणतीतरी असू शकली असती, पण असती ही वस्तुस्थिती आहे. माणूस आपापल्या भावनेचा केंद्रबिंदू ठरवतो. ते केंद्र अस्तित्वात असेलच असे नाही. विविध प्रांतातील संतांनी आपली भावनिक केंद्रे त्या त्या भागातील प्रचलित देवतांना बनवले आहे. हे योग्य कि अयोग्य? हे ठरवण्याचा कोणताही मार्ग नाही.


ईश्वर आहे कि नाही याचे उत्तर धनात्मक गुरुत्वाकर्षण आहे कि नाही या प्रश्नात दडलेले आहे. हेही अस्तित्वात नाही आणि तेही नाही...(किमान आतातरी पुराव्यांवर आधारित). अमीबाला नसेल पण चिपांझी किंवा अन्य छोटा तरी मेंदू असणा-या प्राण्यांना जाणीवेच्या ’जाणीव’ भावना असतात कि नसतात हा आपण त्यांच्या जाणीवाच मुळात समजावून घेण्यास अक्षम असल्याने त्याबाबत विधान करणे धाडसाचे होईल.


परमेश्वर समाजाच्या हिताचा आहे काय कि तो केवळ व्यक्तिगत पातळीवरील ज्याच्या त्याच्या समजुतीचा विषय आहे? परमेश्वर ही संकल्पना व्यक्तीसाठी त्याच्या त्याच्या परिप्रेक्षात कोणत्या ना कोणत्या प्रमाणात उपयुक्त संकल्पना असली तरी ती सार्वजनिक एकमेवाद्वितीय संकल्पना असू शकत नाही. तीही सापेक्ष संकल्पना आहे. परमेश्वर संकल्पना नैतिकतेशी बांधील आहे असेही व्यक्तिपरत्वे दिसत नाही.


किंबहुना ईश्वर ही संकल्पना ही नैतिकतेच्या मान्य व्याख्यांच्या विरोधात जाते हे लक्षात येईल. ईश्वर म्हणजे नैतिकता नव्हे. ईश्वर मानणारे नैतिकच असतात असे नाही, अन्यथा आजतागायत अवघे जग नैतिक झाले असते. कारण मुठभर नास्तिक सोडले तर परमेश्वर मानत नाहीत असे लोक क्वचितच सापडतील.


तेंव्हा ईश्वर आणि नैतिकता याचा विचार एकत्रीत केलाच पाहिजे असे नाही. काही लोक मानतात त्याप्रमाणे भावविश्वातील अगम्य तरीही गम्य असा इश्वर असू शकतो आणि त्याचे असणे गैर नाही. नास्तिक मंडळी या ईश्वराचा निषेध करत असले तरी ती मानवी मनाला शक्ती देणारी संकल्पना आहे हे अमान्य करण्यात अर्थ नाही. ही शक्ती दुधारी तलवार तर बनणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण ईश्वर प्रत्यक्ष प्रमाणांनी सिद्ध करता आला नाही तरी तो आहे असे मानून जे काही अनिष्ट केले जाते त्याचे मात्र परिणाम मात्र दिसतात.


नास्तिकांना असे वाटते कि ईश्वर या संकल्पनेमुळे जगाचे वाटोळे झाले आहे. खरे तर ईश्वर ही संकल्पना सार्वत्रिक करण्याच्या प्रयत्नातून ही अवस्था उद्भवली आहे. उदा. एकमेव वेद...ईश्वराचे निश्वास, एकमेव अल्ला...दुसरा कोनी नाही. किंवा एकमात्र आकाशातील बाप, एकमात्र शिव किंवा एकमात्र विष्णू सर्वश्रेष्ठ बाकीचे खोटे हे करंण्यात मानवी स्वार्थ होते, तेथे परमेश्वर ही संकप्ल्पना अस्तित्वातच नव्हती असे मान्य करावे लागेल. तुकोबाचा विठ्ठल हा तसाच्या तसा जनाबाईचा, नामदेवाचा अथवा चोखोबाचा नव्हता. जो विठ्ठल सावता माळ्याचा होता तसाच तो कान्होपात्राचा नव्हता. त्या अर्थाने संत आणि भक्तपरत्वे विठ्ठल वेगवेगळे होते. ते भक्तांचे/संतांचे व्यक्तिगत भावविश्व होते. विठ्ठल तेथे कोठेच नव्हता, असुही शकत नव्हता.


ईश्वर ही संकल्पना ईश्वराच्या अस्तित्वात नसून मानवी मनात अस्तित्वात असते. त्या दृष्टीने ती सत्यच आहे असे म्हणता येईल. नियतीशरणता हा ईश्वराला मानण्यातला दुर्गूण आहे. ती जर अमान्य केली तर ईश्वर हा मानवी मनाला कोणत्याही घटकापेक्षा मोठा आधार आहे हेही एक सत्य आहे. आणि तो कोणत्या ना कोणत्या पातळीवर, अगदी नास्तिकांतही, अस्तित्वात असतोच.


कारण शुभंकर भावनांपासून कोनी अलिप्त नाही. पण शुभंकरतेच्या व्याख्येत फारक असू शकतो. व्यक्तीच्या भावनिक पातळीवर ईश्वर सार्वत्रिक आहेच...अमुकलाच एकमात्र ईश्वर म्हणून मान्य करा...असला लादलेला ईश्वर आणि व्यक्तिगत भावनिक प्रक्षेपणातील परमेश्वर यातील फरक ठळक करावा लागेल. व्यक्तीच्या ईश्वराला पर्याय देईल अशी अन्य भावनिक संज्ञा नास्तिक मात्र प्रचारात आणु पाहत नाहीत. तेही य बाबतीत वेगळ्या प्रकारचा दहशतवादच करतात.
मानवी जगाला स्नेहबंधात ठेवत कल्याणकारी भावनांना जागृत ठेवत त्याला क्रियाशील करणारी मंगलदायी ईश्वरी संकल्पना ही प्रेयच आहे आणि सामान्यजनांत ती असतेच. पण पुरोहित/मुल्ला-मौलवी त्याच भावनेचा गैरफायदा घेतात. कोणताही पुरोहित जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा ईश्वर या उदात्त संकल्पनेचा खून पडतो. 


परमेश्वरच मुळात व्यक्तिगत असल्यामुळे त्याच्याशी संवाद साधायला पुरोहिताची अथवा कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. किंबहुना ईश्वरी सत्तेच्या नांवाखाली सामान्यांचे जेवढे नुकसान केले गेले आहे ते सैतानानेही कदापि केले नसते.

23 comments:

  1. १) हे महाशय महाराष्ट्रात व देशातील इतर राज्यात गोमांस बंदी असताना, काही समाजाला गोमांस खाणे किती आवश्यक आहे हे सांगून डोकी भडकवायचे काम करीत आहेत.तसेच शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती त गाई बैल कसायाला विकणे कसे महत्वाचे आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करत असतात. ह्यामुळे उत्तर प्रदेश दादरी येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते.दंगल भडकू शकते. वेद साहित्यातील परदेशी लोकांनी दिलेले पुरावे सदर करून ब्राम्हण पूर्वी गोमांस खात होते, हे ते लिहितात. तसेच वेद, स्मृती ग्रंथांचे चुकीचे अर्थ सांगून समाज भावना भडकावत असतात.
    २) हे महाशय ब्राम्हण द्वेषातून बरेच लेख लिहित असतात. त्यात ते ब्राम्हण समाजाला नपुसंक, चालते व्हा, असे शब्द वापरत असतात. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार ह्यांच्यात ब्राम्हण समाजाबद्दल भयंकर असंतोष पसरत आहे. ह्यातून उद्या ब्राम्हण समाजावर जातीय हल्ले होण्याची शक्यता आहे.
    ३) हे महाशय हिंदू धर्माचे वेद, पुराणे, मनुस्मृती ह्यांच्याबद्दल त्यांचे चुकीचे अर्थ सांगून अतिशय हीन दर्जाची टीका करत असतात. त्यामुळे बऱ्याच हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात.
    वेद ग्रंथांचा आधार घेऊन ब्राम्हण लोक शिवाला "शिश्नदेव" म्हणजे लिंगाची पूजा करणारे शिवभक्त असा अर्थ ते देत असतात, त्यातून ते ब्राम्हण समाजाबद्दल तिरस्कार निर्माण करत आहेत. गणपतीबद्दल हि हे असेच लिहित असतात. बहुतेक हिंदू देव-देवतांचा उल्लेख ते हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठी करत असतात.
    ४) हे महाशय राजस्थान येथील कालीबांगण ह्या ठिकाणी उत्खननात इस पूर्व २६०० म्हणजे सुमारे ४६१५ वर्षापूवी एक शिवलिंग सापडले, तसेच हडप्पा, मोहोन्जो-दाडो येथे सुद्धा इतकीच जुनी अनेक शिवलिंगे सापडली आहेत असा दावा करून शिवलिंगाचे खोटे फोटो टाकत असतात. वास्तविक पाहता असा कुठला पुरावा अधिकृतपणे उपलब्ध नाही. त्यातून शिव धर्म हा पुरातन आहे असे ते सांगून वैदिक किवा ब्राम्हण लोकांनी शिव धर्माची दैवते पळवली असा दावा ते करतात. तसेच खोटी माहिती प्रसारित करून लोकांना फसवतात व लोकांच्या भावना भडकवतात. वर सापडलेली शिवलिंगे कुठे पाहायला मिळतील, कुठे ठेवली आहेत अशी विचारणा केली असता उत्तरे देण्याचे टाळत आहेत.
    त्यांनी आधी पंढरपूर हे शिवाचे स्थान असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात तणाव निर्माण झाला होता.
    ५) ह्यांना त्यांच्या ह्या उद्योगाबद्दल अनेकदा त्यांच्या ब्लॉग आणि फेसबुक वर जाऊन अतिशय चांगल्या भाषेत लेखी समज दिला तरी ते अतिशय घाणेरडे आरोप करतात. तसेच हिंदू वेद, त्यांची दैवते, धर्मग्रंथ ह्यांची अवमान कारक भाषेत निर्भत्सना करतात.
    ६) वरील विषयावर ह्या महाशयांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत व पुस्तकांचा खप वाढवण्यासाठी व त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी ते इंटरनेट माध्यमाचा गैरवापर हे करतात.
    माननीय महोदय, आपण ह्या महाशयांना समज देऊन त्यांचे हे सगळे साहित्य योग्य ती चौकशी करून सार्वजनिक संकेत स्थळावरून त्वरित काढून टाकावे हि नम्र विनंती. आपणास कसलीही माहिती मदत हवी असल्यास मला संपर्क करावा. मी कलाही हि तक्रार दिलेली होती, लेखी तक्रार द्यायची असल्यास कुठे देता येईल ते कळवावे.
    आपला कृपाभिलाषी.

    ReplyDelete
  2. संजय सोनवणी यांच्या बद्दल चा हा आलेख चितारला आहे श्री पाटसकर किंवा पाटणकर यांनी त्याचे उत्तर संजय सोनवणी यांनी दिलेले नाही ,
    द्या हो !

    ReplyDelete
  3. वास्तविक देव मानणे हि जगातील सर्वात मोठी अंधश्रदधा आहे, हे सांगायला अंधश्रदधा निर्मुलन करायला निघालेले लोक सुदधा घाबरतात. मी त्यांना विरोध करतो असे नाहि तर त्यांच्या कडुन खुप अपेक्षा आहेत.

    ReplyDelete
  4. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही . संजय सरांना हा आवाज टाकला आहे तो अविनाश पाटसकर नावाच्या माणसाने आणि त्याचे उत्तर संजयाने दिले नाही अशी चौकशी झाली आहे
    खरेतर हे अविनाश सर अतिशय उत्तम मार्गदर्शन करत असतात , भविष्य सांगण्या बाबत त्यांचे कौशल्य आहे ,आणि त्यांचे विचारही निरोगी आहेत आप्पा बाप्पा किंवा अमित,आगाशे , बेडेकर अशांसारखे अर्धवट नसतात . नीरज आणि विकास यांनी अजून सविस्तर लिहावे
    खरेतर पाटसकर सरांनी वरील मजकुराची शहानिशा करावी हि विनंती.

    ReplyDelete
  5. हे जे कोणी लिहिले आहे त्याला सगळ्या हिंदूंचा प्रवक्ता म्हणून कुणी नेमला? मी पण हिंदू आहे... माझ्या भावना अजिबात नाही दुखल्या संजय सरांचे लेख वाचून... काय पण फालतूगिरी.

    हा... काही ब्राह्मणांच्या भावना दुखल्या असतील तर त्यांनी तसे सांगावे. तो त्यांचा प्रश्न आहे किंवा त्यांचे मत आहे... त्याविषयी काही म्हणणे नाही.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  6. प्रिय नीरज,
    तुझी पाटसकर यांच्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया वाचली ,मध्यंतरी हे पाटसकर साहेब बहकल्यासारखे काहीही लिहित असायचे सुमारे १-२ वर्षे ते काहीही बोलत असत , ( उदार मनाने पाहिले तर ) परंतु त्यांच्या लिखाणात काहीतरी एक धागा अभ्यासनीय असायचा , त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर संजय सरांनी द्यायला हवे होते . पाटसकर सरांनी खुलासा केला होता की ते ब्राह्मण नाहीत. अगदी विचित्र उत्पत्ती त्यांनी सांगितली होती , असे अनेक प्रकार त्यांनी केले पाटसकर , पाटणकर साठे ही नावे अनेक जातीत आहेत . पाटसकर हे ब्राह्मण नव्हते -नाहीत

    ReplyDelete
  7. प्रिय अमित पाटणकर,
    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण जर तुम्ही अरुण शरद ह्यांची प्रतिक्रिया परत एकदा वाचलीत तर त्यात तुम्हाला मुख्यत तक्रार "ब्राह्मण विरुद्ध बोलतात" आणि कारण देताना मात्र "हिंदूंच्या भावना दुखावल्या" असे दिसेल. मूळ तक्रार कुणी केली त्याची काही कल्पना नाही, मी प्रतिक्रिया फक्त तक्रार वाचून केली.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  8. हे जे कोणी अरुण शरद आहेत त्यांनी जीवाचा आटापिटा करून जे संशोधन इथे मांडले आहे त्यातून त्यांची हिणकस आणि आग लावणारी वृत्ती दिसते. मी इतरत्र संजय सोनवानींच्या ब्लोगवर हे लिहिले आहे आणि ते त्यांनी डिलीट केलेले नाही म्हणून अरुण शरद आगलावेंना ते सापडले. वाचक खुशाल ते तिथे जाऊन वाचू शकतात त्याचा वरील लेखाशी काहीही संबंध नसताना आगंतुकपणे इथे टाकले आहे त्यातून त्यांच्या सनातनी आत्म्याच किती पोट ढवळून येतंय ते दिसते. पण अशा लोकांना बोकाळून न देणे म्हणून उत्तरे देत आहे,
    १) अभिव्यक्तीचा आणि स्वतःच्या आकलनाचा विचार केला तर गोमांस, वेद, पुराणे, स्मृती ह्यांचा अभ्यास प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा आहे. उदा अ) संजय सर ह्या आधीच्या एका लेखात म्हटले आहेत कि पुराणे ह्या खऱ्या इतिहास पुरुषांच्या कथा आहेत, नंतर त्या वाकड्या तिकड्या केल्या गेल्यात. त्या कोणी केल्या हा मुद्दाम केलेला प्रकार किवा अपभ्रंश असू शकतो प्रत्येकाची वेगळी मते आहेत, ब) एकीकडे आपण म्हणतो कि आपली संस्कृती मातृपुजक होती, दुसरीकडे महिषासुर (हा मूलनिवासी) आणि माता दुर्गा आर्य? ह्यावर वाद होतोय.. म्हणजे चर्चा तर होणारच..
    २) हाताची पाच बोटे सारखी नसतात, पण आपण ब्राम्हण म्हणून जन्माला आलो याची अरुण शरद सारखी जातीय खुमखुमी असणारी आखूड बोटे ताणून स्वतःला लांब करून घेतात त्यामुळे ब्राम्हण नसले तरी नुसते ब्राम्हणी आडनाव असणार्यांच्या कडे पहायचा समाजाचा दृष्टीकोन कलुषित होतो. म्हणजे काय हे अधिक सांगायला नको. पाटसकर ह्या अडनावाचेच घ्या.
    २) सिंधू उत्खनन विषयक लेखकाचे मला न पटणारे विचार मी इतरत्र मोकळेपणाने मांडले आहेतच. पुरावे मागणे किवा आपल्याला माहित नसेल त्या गोष्टींचे स्पष्टीकरण मागणे ह्यात मला लाज वाटत नाही. कुठलीही चर्चा आडपडदे ठेऊन का करायची? आहे तर आहे नाही तर नाही.
    ३) नीरज मी स्वतः हिंदू असल्याने आणि त्याआधी माणूस असल्याने प्रवक्ता किवा मक्तेदारी असण्याचा प्रश्नच नाही, मला माझ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक प्रश्नावर विचार करण्याचा आणि मांडण्याचा अधिकार आहे. हेकट पद्धतीने फालतूपणा इत्यादी शब्द वापरताना आपण चर्चेचे स्वरूप बिघडवत असतो हेही apan आरश्यात पाहायला हवे.

    ReplyDelete
  9. वरील लेखाच्या अनुषंगाने, बरेच लोक असा समज करून घेतात कि देव आहे म्हणजे त्याने मला परीक्षेत कॉप्या पुरवायला पाहिजेत. नाही पुरवल्या तर तो अस्तित्वातच नाही. विस्तृत विचार हाच कि आपण जे जीवन जगतो ती एक परीक्षाच असते. परीक्षा घेणारे आकाशातील ग्रह आहेत कि आपले आजूबाजूच्या लोकांशी असलेले संबंध आहेत, त्यांचा स्वभाव आपला निसर्ग, आपली माती ह्या सगळ्यांनाच देव असे संबोधले तर सर्वांचा अभ्यास व आलेख काढायची संशोधक वृत्ती असेल तर काहीतरी निष्कर्ष निघतो. मानव पराधीन व एक परीक्षार्थी आहे हे स्पष्ट होते. ह्या परीक्षेत पास कसे व्हायचे त्यासाठी कुठे इलेक्टिव घ्यायचे हे आपण ठरवायचे. उत्तम शिक्षक मिळाला तर आनंदच आहे नाहीतर आनंदी-आनंद! असा शोध घेणे हे निरंतर चालू असते, मानव संपेपर्यंत हा शोध चालूच राहणार आहे. गौतम बुद्धांनाही तात्कालिक ज्ञान प्राप्ती झाली पण हि प्रक्रिया संपणार नाही. कारण ज्ञानही काळसापेक्ष असते.

    ReplyDelete
  10. प्रिय भावांनो,

    लेखाचा विषय काय? आणि तुम्ही लिहिताय काय? धोडे तारतम्य बाळगा, अखेर तुम्हाला झाले आहे तरी काय? विषयाला धरून लिहित चला! उगीच नसते फालतू वादविवाद नकोत.

    मधुसूदन

    ReplyDelete
  11. ईश्वराची कल्पना ही माणसाच्याच डोक्यातून निघालेली कल्पना आहे. हजारो वर्षांपूर्वी मानव प्रगत होत गेला तसे त्याला ह्य सृष्टीचे खेळ अचंबित करीत असणार. त्यामुळे त्याला एकप्रकारे मदतकारक ठरणाऱ्या सूर्य, चंद्र व पाऊस यांना देवता मानले – पृथ्वीला माता मानले. त्यातूनच पुढे पुढे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या देवादिकांच्या कपोलकल्पित कल्पना रचल्या जाऊन त्यातून धर्माची-वर्णाची उतरंड रचण्यात आली. एवढेच नाही तर स्वर्ग, पुनर्जन्म, कर्मकांड, इत्यादींना जन्माला घालून ह्य साऱ्याला अतिशय किचकट, क्लिष्ट व भयावह स्वरूप देण्यात आले. त्यातून मग हिंदू धर्माच्या कर्मकांडात्मक किचकटपणाला शह देण्याकरिता गौतम बुद्धासारख्या धीरोदात्त मानवाचा जन्म झाला. त्यांनी स्वर्ग, पुनर्जन्म, कर्मकांड, देव या साऱ्यांच्या मुळावरच घाव घालून मानवजातीला उपकारक अशा नवीन धर्मतत्त्वांना जन्माला घातले.
    एकंदरीत काय तर सर्व धर्म व त्यातून निर्माण केले गेलेले ईश्वर मानवाचीच निर्मिती आहे. धर्माचे मूलतत्त्व काय तर प्रगती व नियमन करणे. पण इतिहासाकडे पाहू जाता ते मूलतत्त्व बाजूला राहून सगळीकडे धर्माच्या नावाखाली पक्षाभिमान, प्रांताभिमान यांचीच कीड लागलेली दिसते. त्या किडीतून बाहेर पडावयाचे असेल तर ‘मानवता’ हाच धर्म मानला पाहिजे. अर्थात मानवता धर्म मानून त्यातही काही विकृती निर्माण होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. आज तरी धर्माच्या नावाखाली मानवतेला काळिमा फासणारी कृष्णकृत्येच अधिकाधिक राबवली जात असल्याची दृश्ये दिसत असून आतंकवादाची भयंकर उत्पत्ती झाल्याचे भयानक ‘दृश्य’ दिसत आहे.
    यावर उपाय एकच की आम्ही आता ह्या भाकड प्रकारातून बाहेर पडून पूर्णत: विज्ञाननिष्ठेकडे वळले पाहिजे. विज्ञाननिष्ठाच माणसाला सुखी करू शकेल. त्याकरिता ‘मानवतावाद’ हाच आमचा नारा, हेच आमचे आराध्य दैवत असले पाहिजे. जितक्या लवकर आम्ही धर्म व ईश्वरापासून आमची सुटका करून घेऊ तितक्या लवकर आम्ही सुखाकडे मार्गक्रमणा करीत राहू. वैदिक काळात ज्ञानाच्या दृष्टीने इतक्या उच्चस्थानी असलेला भारत आज ह्य स्तराला येण्याचे कारण म्हणजे आमची धर्म व ईश्वर ह्यबद्दलची विकृत व विनाशकारक कल्पना- अनेक पुनर्जन्म, स्वर्ग, पाप, पुण्य, इ. कल्पनांमधून बाहेर पडून ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ या कारण व परिणाम अशा विज्ञाननिष्ठ भूमिकेप्रत आले पाहिजे. वेगवेगळे धर्म निर्माण करून व त्यांच्यात भांडणे लावून मानवजातीला दु:खाच्या खाईत लोटण्याचे ईश्वराला प्रयोजनच काय?

    ReplyDelete
  12. वैदिक काळात आपण ज्ञानाच्या बाबतीत फार उच्च पथावर पोचलो होतो असे आपण म्हणता म्हणजे आपण वैदिक वादी आहात , धिक्कार असो आपला , वैदिक ब्राह्मण अत्यंत आत्मकेंद्रित होते आणि शैव धर्म हाच मुळचा खरा धर्म होता हे संजय सरांचे तत्वज्ञान आपणास माहित नाही ? कमाल आहे !बौद्ध धर्मात महायान हीनयान आणि वज्रयान असे भेद का होते ?
    जैन धर्मात सुद्धा श्वेताम्बर दिगंबर असे भेद का ? मुसलमानात शिया सुन्नी अहमदिया असे भेद का ?
    अकबराचा दिने इलाही का अंत पावला ?
    विज्ञान हाच आपला धर्म का होत नाही याची कारणे काय आहेत ?
    खरेतर धर्म हि कल्पना कालबाह्य झाली आहे असे आपण का म्हणत नाही ? विज्ञान हाच आजचा धर्म असे म्हानायाचीही गरज नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. आपण वैदिक वादी आहात??????????????????????????????????????

      Delete
    2. पृथ्वीवरील निसर्गसृष्टी आणि मानवी जग यांच्यामागे जर खरेच कुणी एक ईश्वर असेल तर सबंध जगाचा तो एकच ईश्वर असेल. नाही का? प्रत्येक धर्माचा वेगळा असे अनेक ईश्वर जगात किंवा जगामागे असणे असे तर काही शक्य नाही. मग अशा त्या सर्वसमर्थ प्रेमळ ईश्वराने जगात एवढे धर्म, पंथ, संप्रदाय का निर्माण केले? किंवा का निर्माण होऊ दिले? वेगवेगळ्या धर्मपंथांचे व वेगवेगळ्या श्रद्धांचे लोक अतिरेक करून एकमेकांचा छळ करतील, एकमेकांचे जीव घेतील, हे त्या ईश्वराला कळले नाही का? धर्माच्याच नावाने जगात दंगे, कत्तली आणि अत्याचार सातत्याने होत आहेत हे त्याला दिसत नाही का? की त्यासाठी तो स्वत:ला जबाबदार धरत नाही? ‘मरू देत या मूर्ख मानवजातीला’ असे त्याला वाटते की काय? की जगात सुख आणि न्याय निर्माण करावा असे त्याचे उद्दिष्टच नाही. बरे जगात पूर, वादळे, अपघात, भूकंप, सुनामी अशा नैसर्गिक दुर्घटना व दंगे, युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्ती सातत्याने येतच राहतात. त्यात पापी आणि पुण्यवंत सारखेच भरडले जातात, ते कसे? बरे आता दुसरा मुद्दा. जगनिर्माता व सांभाळकर्ता असा कुणी ईश्वर असेलच, तर त्याने प्रत्येक धर्माच्या प्रेषितांना, धर्मसंस्थापकांना वेगवेगळी व उलटसुलट माहिती का दिली? वेदान्तिक ऋषीमुनींना त्याने सांगितले की, माणसाला ‘अनेक पुनर्जन्म’ घ्यावे लागतात व माणसाच्या दु:खाचे कारण त्याच्या पूर्वजन्मातील संचित पाप-पुण्यात आहे. याउलट पश्चिम आशियातील प्रेषितांना त्याने स्पष्ट सांगितले की, ‘माणसाला एकच जन्म असतो’ व ‘माणसाला जे दु:ख सोसावे लागते त्याचे कारण सैतान नावाची एक दुष्ट व अमर शक्ती अस्तित्वात आहे तिच्या कारवायांत आहे’. खरेच का त्या लोकांना पुनर्जन्म नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतातल्या लोकांनाच जन्म, मृत्यू व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन:पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वत: ईश्वराने ऋषी-प्रेषितांना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामाऱ्या होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगातील सगळे धर्म व त्यातील सगळे ईश्वर, जे मानवजातीने स्वत:च निर्माण केलेले आहेत ते व त्यांची आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाही तर या धर्मापासून व ईश्वरांपासून या मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.

      Delete
    3. निनावी महाराज मी वर लिहिले आहे कि ज्ञान हे काळ-सापेक्ष असते तसेच ते परिस्थिती सापेक्ष असते. त्या त्या काळात साधू -संत, धर्म संस्थापक ह्यांना जे ज्ञान मिळाले ते त्यांनी समाजाला दिले. भले ते अर्धवट असेल. पण त्यांचा भूमिकेत जाऊन ते समजून घेणे ह्यातही मोठे विज्ञान आहे. उगाच त्यांचे उणेदुणे काढणे म्हणजे विद्वत्ता होत नाही. तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि जीवनमान बदलले. तरी माणूस जनावरासारखा जगत आणि मरत असेल तर तुम्ही एक पंथ काढा आणि दाखवून द्या कि माणूस अगदी नीट जगतोय. आहे का तयारी?

      Delete
  13. ईश्वरवादी म्हणजे ‘आस्तिक’ लोक असे मान्य करतात की, ईश्वराला कुणी कधी पाहिलेले नाही. परंतु जगात जे अनेक चमत्कार दिसतात, त्यांच्यामागचे कारण म्हणून त्यांना ईश्वर मानावा लागतो. आता प्रत्यक्षात घडते ते असे की विज्ञान संशोधनाने एखाद्या चमत्कारामागची भौतिक कारणपरंपरा कळली की त्या भोवतीचे ‘गूढ वलय’ नाहीसे होते. परंतु त्याच्याही मागे एखादे कारण उरते व त्याच्यामागे कसला तरी ईश्वर असू शकेल असे वाटू लागते. असे करत करत अंतिमत: काय हाती लागेल ते माहीत नसले तरी सगळे चमत्कार, साक्षात्कार आणि त्यांच्यामागे आपण उभा केलेला ईश्वर, अशा सर्व घटकांनी ‘चिकित्सेच्या कसोटीला’ तोंड दिलेच पाहिजे, असे आम्हाला वाटते. शिवाय ईश्वर जर खरोखरच अस्तित्वात असेल तर केव्हा तरी तो चिकित्सकांच्या कसोटीत पास होईलच की! मग अज्ञेयवाद्यांनी किंवा नास्तिकांनी त्यांच्या तर्कबुद्धीच्या सहाय्याने केलेल्या उलटतपासणीला ईश्वरवाद्यांनी घाबरून जाण्याचे किंवा आक्षेप घेण्याचे कारणच काय? हिंदू धर्मात (मनुष्याला सर्वच सजीवांना) ईश्वराचा अंश मानलेले आहे; म्हणजे ईश्वर व मनुष्य यात अद्वैत लेखले गेले आहे. आता मनुष्य जर खरेच ईश्वराचा अंश असेल तर त्याने म्हणजे ईश्वराने स्वत:ची चिकित्सा करायला का हरकत असावी? पण ईश्वरचिकित्सा करण्यात एक जी मोठी अडचण आहे ती अशी की, तपासलेला प्रत्येक पुरावा, ईश्वराचे अस्तित्व-दर्शक नसून त्याच्या विरोधी म्हणजे नास्तिक-दर्शक आहे असे आढळून आले तर अखेरीस ईश्वर नाकारावा लागतो आणि त्यामुळे अनेकांची मोठी पंचाईत होते. ‘आपल्या मनबुद्धीला पटण्याजोगा सार्वत्रिक पुरावा उपलब्ध नाही, त्याअर्थी ईश्वर अस्तित्वात नसावा, नाही’ असे म्हणण्याची अनेकांची तयारी नसते. कारण त्यामुळे ‘आपण समाजात नास्तिक ठरू’ अशी भीती त्यांना वाटत असते. दुसऱ्या काही जणांना अशी भीती वाटते की जर कसला तरी ईश्वर खरोखरच अस्तित्वात असेल आणि आपल्या चिकित्सेतील चुकीमुळे, आपण त्याला नाकारू तर तो आपल्याला कडक शिक्षा करील. आणखी काही जणांना असेही वाटत असते की, ईश्वरकल्पना जनमनात जागृत ठेवणे, हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे. त्यामुळे ते कुठल्या तरी कथापुराणात वर्णिलेला किंवा कुणी तरी केव्हातरी सांगितलेला गूढ अनुभवच खरा मानतात. तर्कबुद्धीला ते नकार देतात आणि ‘ईश्वर तर आहेच’ असे म्हणत, ईश्वर अस्तित्वाचा व त्याच्या कर्तृत्वाचा प्रचार करीत राहतात. ईश्वरचिकित्सा करणे मान्य ठरविले तर एक ‘गृहीतकृत्य’ म्हणून आपणाला ‘ईश्वर आहे व तोच अंतिम सत्य आहे’ असे मानता येईल. पण त्यानंतर असे काही अंतिम सत्य अस्तित्वात आहे की नाही हे आपल्या तर्कबुद्धीने आपल्याला तपासावे लागेल. जगात अनुभवास येणाऱ्या अगणित सत्य घटनांच्या आधारावर तर्काच्या सहाय्याने हा शोध करायचा आहे. सर्व घटना ही विभागीय सत्ये आहेत. ही सत्ये सुंदर असतील किंवा असुंदर असतील; सुखकारक असतील किंवा दु:खदायक असतील; न्याय्य असतील किंवा अन्यायकारक असतील; पण ती जशी असतील तशीच आपण समजून घ्यायची आहेत. कसलाही अभिनिवेश न बाळगता समजून घ्यायची आहेत आणि त्यावर तर्कबुद्धीचे हत्यार वापरून त्यांतील तथ्य शोधायचे आहे. अशाप्रकारे आपण चिकित्सेद्वारे सत्यशोध करू शकतो. ईश्वरचिकित्सेची आवश्यकता आहे ती अशा सत्यशोधासाठीच होय. चिकित्सकाने आपल्या प्रतिपादनात जर सांभाळून शब्दयोजना केली असेल आणि तरीही, अशी ईश्वरचिकित्सा केल्यामुळे, कुणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर ‘माझ्या भावना दुखविल्या गेल्या’ असे म्हणणाऱ्याचेच, काही तरी चुकत आहे, असे म्हणावे लागेल. तशी आपल्याकडे आस्तिक, धार्मिक भावनांचे अती लाड करण्याची रीतच आहे असे मला वाटते.

    -शरद

    ReplyDelete
    Replies
    1. कराकी ईश्वरचिकित्सा कोण नाही म्हणतंय. नुसती आजची चिकित्सा करू नका. ३०० वर्षे मागे जाऊन चिकित्सा करा. जेव्हा २ इंचापेक्षा मोठी जखम भरून येण्यासाठी औषधे नव्हती तेव्हा लोक तलवारीचे वार झेलून त्यातून बरे कसे होत असतील? असाध्य रोग, संतती झाली नाही तर पेशव्यांपासून थोर मराठे देवळादेवळात जाऊन नवस बोलायचे ह्याचे हजारो पुरावे आहेत. ani te safal jhalet. आजही बहुजन समाज त्यांच्या देवाशी कृतज्ञता पाळतो. म्हणून तुम्ही आम्ही इथे दिसतो. आपण खरेच चिकित्सा करणार असाल तर अशा एखाद्या देवळात जाऊन लोकांच्या मुलाखती घ्या. त्यात लोकांना किती यश अपयश आलेले आहे हि माहिती गोळा करून मग बोला. ३०० ते २००० वर्षापूर्वी लोक काय करत होते ते शोधा. कृपया ह्यात फक्त बहुजन दैवते घ्या, उगाच स्वामी, समर्थ,आबा-बाबा असले फुटकळ उचलून आणू नका. नुसते इथे इकडून तिकडून आणलेले विचार मांडू नका. ते तर कोणीही पोरगे करू शकते. आयुर्वेदिक औषधे अशा असाध्य रोगावर किवा जखमांवर काहीही करू शकत नाहीत, वाटल्यास ३ इंच स्वतःला कापून घ्या आणि आयुर्वेदिक औषधे घ्या बघा वाचताय का ते? मुस्लिम अल्ला तरी का बनला मुस्लिमांना जगवण्यासाठी बनला. जगण्याच्या धडपडीत मानवतावादाच्या सीमा पुसट होत जातात. मुस्लिमांनी जगाला लुटले पण स्वतःला जगवण्यासाठी लुटले, मग ते चूक का? त्याचा काटकोनी धर्म चुकीचा कसा? त्यांच्या धर्तीत काही पिकत नाही mhanun त्यांनी अक्रमने करून अन्न मिळवणे चूक का? मानवतावादाच्या दृष्टीने त्यांची अतिरेकी कृत्ये हि बरोबर ठरतात पण धर्माच्या आणि देवाच्या दृष्टीने चुकीची ठरतात. मग अतिरेकाला तुम्ही चांगले म्हणाल का? म्हणा. मनावतेपेक्षा आणि विज्ञानापेक्षा म्हणून धर्म आणि देव श्रेष्ठ आहेत.

      Delete
    2. ३०० वर्षे मागे जाऊन चिकित्सा करा. जेव्हा २ इंचापेक्षा मोठी जखम भरून येण्यासाठी औषधे नव्हती तेव्हा लोक तलवारीचे वार झेलून त्यातून बरे कसे होत असतील? असाध्य रोग, संतती झाली नाही तर पेशव्यांपासून थोर मराठे देवळादेवळात जाऊन नवस बोलायचे ह्याचे हजारो पुरावे आहेत.----------------------------------------> हा अविनाश पाटसकर नावाचा माणूस खूपच अंधश्रद्धाळू आहे, काय म्हणावे याला? का काही म्हणूच नये?

      -शरद

      Delete
    3. हम्म... शरद, ३००० वर्षांची उत्तरे आधी द्या कोण काय ते बघू पुढे, आज वाढलेली लोकसंख्या, निसर्गाचा विनाश, अण्वस्त्रवाद हा विज्ञानवाद्यांनीच लादलाय त्याचेही बोला थोडे! ३०० वर्षापूर्वीचे लोक आणि आजचे लोक ह्यांची तुलना करायला स्वतःची बुद्धी वापरायला लागते.

      Delete
    4. हम्म... शरद, ३००० वर्षांची उत्तरे आधी द्या कोण काय ते बघू पुढे, आज वाढलेली लोकसंख्या, निसर्गाचा विनाश, अण्वस्त्रवाद हा विज्ञानवाद्यांनीच लादलाय त्याचेही बोला थोडे! ३०० वर्षापूर्वीचे लोक आणि आजचे लोक ह्यांची तुलना करायला स्वतःची बुद्धी वापरायला लागते.-------------------------------------->Anonymous March 6, 2016 at 7:51 PM खूपच अंधश्रद्धाळू आहे, काय म्हणावे याला? का काही म्हणूच नये?

      -शरद

      Delete
  14. सगळे मंदिरातील पुजारी लुटतात म्हणून ओरड करत असतात. पण तुम्ही लुटले जाता म्हणून ते लुटतात हे ओरडनार्यांना कळत नाही. गरीब बहुजन जेव्हा कुलदैवत वारीला जातात तेव्हा शिधा बरोबर घेऊन जातात. त्यांच्या बायका आपल्या बायका मॉलमध्ये आणि आपण बार मध्ये जितके पैसे उधळतो त्यापेक्षा फारच कमी पैसे खर्च करतात. प्रत्येक ठिकाणी भरपूर काटकसर करणारी हि पिढी आहे. दोन हात आणि एक मस्तक व देवावर श्रद्धा असणारी हि लोक, आयुष्यात किती भरडले गेले तरी देवावरिल विस्वास तसूभरही कमी होत नाही, आणि आपण शिकलेले शी किती घाण आहे, पुजार्याने लुटले, देव खोटाच हा शिक्का देऊन वाकड्या तोंडाने माघारी येतो तसे ते गरीब येत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि परत परत येण्याच्या जिद्दीने माघारी जातात. कधीकधी अडाणी नक्की कोण हाच प्रश्न पडतो.

    ReplyDelete
  15. माणसांचा एकमेकांवर बऱ्याच विचार व्यवहारात, नातेसंबंधात भौतिक साधनसंपत्ती वाटप किंवा आपल्याला अनुकूल (स्वत:च्या सोयीचेच)असे आवड नावड सोय जोपासतांना अनेकदा यश, अपयश,विरोध,निराशा असुरक्षिता/तणाव जाणवतो. त्यातूनच निर्माण होणाऱ्या अविश्वासामुळे आपले सोयीचे मन (मग त्यात बॅलन्स्ड विचार असतीलच असे नाही असे ममत्व ते मातेचे असो किंवा अन्य)निसर्गातील अज्ञात परंतू बदलाचा अनुभव देणाऱ्या अशा नैसर्गिक शक्तींचा ईश्वर म्हणून आधार शोधून आपले समाधान किंवा नैराश्य नष्ट होण्याची अपेक्षा केली जात असल्याने ईश्वर भावना ही सिध्द करता येण्याजोगी असो किंवा नसो निसर्ग नियमांशी तिचे तादात्म्य करुन जपली जाते. मग ती विज्ञान किंवा चिकित्सेत येणे अथवा नाही पण ती मानसिक गरज भागविली जाते.मग तीला सांस्कृतीक व्यावहारीक मानसिक अधिष्ठान जगाच्या प्रत्येक खंड तसेच उपखंडात वेगवेगळया रुपाने नावाने संस्कृतीतील कालपरत्वे होणाऱ्या बदलाने मिळते. एक जुना सोपा व सर्वसाधारण मानवाला सहज सवयी पडणारा मार्ग म्हणून अस्तित्वात आहे. मग त्यात एकेश्वर वाद असो वा इतर. आता हे एका बाजूने तर याउलट याचेही वास्तविक सत्यान्वेषण करणारेही विचार आहेत. त्यामुळे संजय सरांना हा लेख चांगला बॅलन्स्ड झालेला आहे. अभिनंदन.

    ReplyDelete
  16. संजय सर ,
    मी आनंद पाटसकर ,
    मी आपला ब्लोग नव्याने वाचू लागलो आहे,फेसबुक वर आपले विचार वाचतो,परंतु ब्लोग वर जास्त सविस्तर प्रतिक्रिया वाचायला मिळतात.आपल्या लेखनात अनेक विषय असतात त्यातील वैदिक शैव धर्माबद्दल वाचायला आवडते. मी स्वतः शैव भक्त आहे आणि त्याबद्दल सर्व प्रकारचे वाग्मय मला वाचायला आवडेलंइ शिवलीलामृत वाचले आहे.अक्कलकोट स्वामी शिवलिंग जवळ बाळगत असत.
    आपण किंवा अजून कोणी शंकराची काही पुस्तके सांगू शकाल का ?त्यामुळे माहितीपर काही वाचायला मिळाले तर आनंद होईल.
    आपले संभाजी वरचे पुस्तक आता प्रकाशित होणार आहे , ते जर पुण्यात प्रकाशित झाले असते तर आनंद झाला असता , तरीही त्या ठिकाणी कसे जायचे ते आपण कळवाल का ?बहुतेक आळंदी वरून मार्कल असे पोचायचे आहे का ?
    आपला नम्र ,
    आनंद पाटसकर

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...