Saturday, April 16, 2016

वैदिक-हिंदू वाद का?

कालपरत्वे समाज-संस्कृती अभ्यासाचे आकलन नवीन पुराव्यांच्या प्रकाशात बदलत जात असते. म. फुलेंच्या काळात सिंधू संस्कृती सापडलेलीच नव्हती त्यामुळे भारतीयांनी एवढ्या प्राचीन काळी केवढी भौतिक उंची गाठली होती हे समजणे शक्य नव्हते. शिवाय त्य कालात आर्य-आक्रमण सिद्धांत व "प्रगत आर्यांनी" येथील रानटी लोकांना कसे गुलाम बनवले, जातीव्यवस्था लादत शूद्र स्थान दिले याचेच वारे प्रबळ होते. त्यामुळे एतद्देशीय शुद्रातिशूद्र आणि आक्रमक परकीय आर्य अशी वैचारिक मांडणी होणे स्वाभाविक होते.

लो. टिळकांनी तर आर्यांचे मूळ आर्क्टिक प्रदेशात शोधले व अभ्यासपुर्ण ग्रंथ सिद्ध केला. किंबहुना आर्य हा भारतीय सांस्कृतिक संघर्षाचा एक कळीचा मुद्दा बनला. द्रविडांनी तर स्वतंत्र द्रविडस्थान मागितला व आर्य भाषांविरुद्ध बंड पुकारले. मुलनिवासीवादही यातून जन्माला आला. बाबासाहेबांनी आर्य-अनार्य हा संघर्ष वांशिक नसून धार्मिक होता असे नि:संदिघ्ध सांगुनही त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. आदिवासी विद्वानही आक्रमक आर्यांने सिंधू संस्कृतीतील लोकांना पिटाळले म्हणून ते अरण्यात-गिरीकंदरांत रहायला गेले म्हणून आदिवासी बनले असे सिद्धांत मांडतात.

खरे तर आर्यवादाचे पाप युरोपियनांचे. सेमेटिक वंशाशी सांस्कृतिक-धर्मिक नाळ तोडायची म्हणून त्यांनी आर्य सिद्धांताला जन्म दिला. हा वंशश्रेष्ठतावाद हिटलर-मुसोलिनीने आत्यंतिक टोकाला नेला. यातून युरोपियन विद्वान अर्धवट शहाणे झाले. त्यांनी आर्यवंशऐवजी "आर्यभाषा गट" व ही आद्य भाषा बोलणा-यांचे आद्यस्थान या शोधयात्रेत बदलवले. लेबल बदलले पण छुपा वांशिक श्रेष्ठतावादाचा गंड गेला नाही. त्यांना उत्तर म्हणून एतद्देशिय तलागेरी, कल्याणरमणादि विद्वान आर्य भारतीयच असून त्यांनी युरोपापर्यंत जात आर्यभाषा पसरवल्या हे सिद्धांत मांडायला व वैदिकवाद्यांना वर्चस्ववादी बळ द्यायला सुरुवात केली. या वर्चस्वतावादाच्या संघर्षात आपण इतिहास आणि संस्कृतीचे हनन करत आहोत हे या अतिउत्साह्यांच्या लक्षात आले नाही.

एतद्देशिय व विदेशी विद्वानांच्या मते आर्य कोण तर ते ज्यांनी वेदांची व वैदिक धर्माची निर्मिती केली. त्यांना आपण वैदिक आर्य म्हणूयात. या वैदिक आर्यांनीच सिंधू संस्कृतीची निर्मिती केली असे ठासून सांगितले जायला लागले. थोडक्यात या देशात जेही काही आहे ते सर्व वैदिक आर्यांनीच निर्माण केले असा त्यांचा एकुण मतितार्थ. प्रत्यक्षात ऋग्वेद तर सोडाच पण ब्राह्मण ग्रंथांतही वैदिक लोक नागरी संस्कृतीचा भाग असल्याचे दिसत नाही. त्यांना भाजलेल्या वीटा माहित नाही. सिंधू संस्कृतीतील मुद्रांपासून ते स्नानगृहे, धान्याची कोठारे, अलंकार निर्मितीचे कारखाने, विदेश व्यापार, बंदरे ई. या कशाकशाचा त्यांना सुगावाही असल्याचे दिसत नाही. सिंधू संस्कृतीचे अवर्षनांमुळे झालेल्या -हासाचे व नागरी संस्कृती सोडत ग्रामीण संस्कृती स्विकारायचा प्रवासही कोठेही साधा ध्वनितही होत नाही. ते घग्गर नदीला सरस्वती समजतात. समजोत. पण पर्जन्यमान बदलल्याने बारमाही वाहणारी नदी शेकडो वर्षांच्या काळात (इसपू १७५० ते इसपू १५००) कशी क्रमश: आटत मोसमी बनली याचेही विवरण वेदांत अथवा ब्राह्मण ग्रंथांत नाही. वैदिकांना एवढी प्रिय, अंबीतमे, नदीतमे नदी एवढ्या बदलातून जाते याबाबत काहीएक विधान नाही. छोटीमोठी युद्धे नोंदवणा-या ऋग्वेदात व उत्तरकालीन ग्रंथांतही या प्रचंड बदलाचे पुसटसेही चिन्ह नाही. या बदलाने सिंधू संस्कृतीच्या लोकजीवनाची दिशाच पालटली. जुन्या संस्कृतीची मोडतोड झाली. हा बदल त्याच संस्कृतीच्या निर्मात्यांच्या साहित्यात जराही येत नाही याचे कारण हे लोक मुळात त्या संस्कृतीचे निर्माते सोडा, भागही नव्हते आणि त्या संस्कृतीला ओळखतही नव्हते हे आहे.

सिंधू संस्कृती शिव, मातॄदेवता, वृक्ष व विविध शेतीउपयोगी पशू पुजत होते हे उत्खनित पुराव्यांवरून स्पष्ट आहे. ऋग्वेदात या धर्मकल्पनांचे अस्तित्व नाही. किंबहूना ते लिंगपुजकांचा द्वेष करत. ते मुर्तीपूजा निषिध मानत. त्यांचे इंद्र-वरुणादि देव हे अमूर्त असून यज्ञाच्या माध्यमातून त्यांना हवी देत संतुष्ट करणे हे त्यांचे कर्मकांड. यजुर्वेदात स्पष्ट म्हटले आहे, "ना तस्य प्रतिमा अस्ति". म्हणजे देवाची प्रतिमा असू शकत नाही. थोदक्यात वैदिक धर्म अथवा वैदिक आर्यांचा सिंधू संस्कृतीशी काही संबंध नव्हता. ऋग्वेदाचा भुगोल अभासला असता तो दक्षीण अफगाणिस्तानातील असून अवेस्त्याचा भुगोल आजच्या उत्तर अफगाणिस्तान आहे हे स्पष्ट दिसते. ज्या नद्यांचा वारंवार ऋग्वेदात उल्लेख आहे त्या सर्व अफगाणिस्तानातील आहे. गंगा-यमुनेचा उल्लेख फक्त एकदाच येतो. तोही उत्तरकालीन ऋग्वेदात...त्यांना माहित असलेल्या नद्यांची नांवे त्यांनी त्यात नोंदली आहेत. त्यांनी नोंदलेल्या टोळ्या, म्हणजे पर्शू (पर्शियन) तुर्वसू (तुराणी), गांधार (गांधार), पख्त (पख्तून), पार्थव (पार्थियन) इत्यादि) या सर्व प्राचीन पर्शियातील आहेत. इतकेच नव्हे तर खुद्द जरथुश्ट्र ऋग्वेदात उल्लेखला आहे आणि गाथांतही वैदिक लोकांची नांवे आहेत. याचे कारण एकच व ते म्हणजे हे लोक निकट राहत होते, त्यांच्यात धार्मिक व म्हनून राजकीय संघर्ष होता. या संघर्षाचे प्रतिबिंब पुरेपूरपणे दोन्ही धर्मांच्या धर्मग्रंथात पडले आहे. 

म्हणजेच वैदिक धर्म हा मुलभारतीय नाही.

तसेच त्यांचे आक्रमण झाले याचाही पुरावा नाही. विदेघ माथवाच्या कथेनुसार काही लोक भारतात आले व त्यांनी येथे धर्मप्रसार केला हे स्पष्ट होते. धर्मप्रसार ही पुरातन काळापासून आजतागायतपर्यंत नवी बाब नाही. बौद्ध धर्मही प्रचारित होत पार ब्यक्ट्रियापर्यंत गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेतच.

पण समस्या निर्माण झाली ती आर्यवादामुळे, वर्चस्वतावादामुळे. येथील वैदिक हे बव्हंशी धर्मांतरित आहेत. काही तर बनावट वैदिक आहेत कारण का तर प्रतिष्ठा वाढते. वैदिक वर्णव्यवस्थेने निर्माण केलेले ते समाजमानसशास्त्रीय संकट आहे. वेद, यज्ञ याला एवढी प्रतिष्ठा मिळाली ती त्यातील गुढानेच नव्हे तर डामडौलाने. मुलात यज्ञ हे साधे होते. पण धर्मप्रसारासाठी यज्ञ हे पार बारा बारा वर्ष चालवणारे बनवले गेले. नवीन गोष्टींचे आकर्षण सर्वांनाच असते. अनेक लोक वैदिक बनले ते यामुळे, त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णात जाण्याचा अट्टाहास अधिक होता. पण पुढे अनेक कारणांनी यज्ञ थांबले. गौतम बुद्धाने खरे तर वैदिक धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण पुढे बौद्ध परंण्परागत तंत्रप्रधान शैवधर्माचेच अनुकरण करू लागल्याने वैदिकांनाही परंपरागत लोक-दैवतांना शरण जाण्याखेरीज पर्याय राहिला नाही. प्रश्न आर्थिक...जगण्याचा असतो. यज्ञ परवडणारे वा करून घेऊ इच्छ्घिणरे राजे-धनिकच यज्ञांना "रामराम" ठोकू लागल्यावर पोटार्थी सांग्रसंगित यज्ञ करणा-या वैदिकांचे काय होणार?

धर्मांतरितच असल्याने त्यांनी सोडलेल्या दैवतांची पूजा-अर्चा स्विकारणे मानसिक व धर्मदृष्ट्या त्यांना किती जड गेले असेल याची आपण कल्पना करू शकतो.

मग त्यांनी जी शक्कल लढवली त्याला तोड नाही. शिवाला रुद्राभिषेक सुरु केला. तेही पुरे पडेना म्हणून ऋग्वेदातील विष्णू समोर आणत पराक्रमी अवैदिक पण लोकप्रिय राजांना विष्णुचे अवतार ठरवले. हिंदू (शैव) देवता पुजतांना पुरुषसूक्त (ज्याचा कोणत्याही दैवताशी काही संबंध नाही)  म्हणायला सुरुवात केली. हा धार्मिक व्यभिचार नव्हता असे कोण म्हणेन?

बरे, हरकत नाही. पोट भरण्यासाठी अशी नाटके करावी लागतात असे समजू. पण येथे ही समस्या झाली कि पोट जाळतांना स्वत:चा वांझ श्रेष्ठतत्वतावादही जपला गेला. तो जपण्यासाठी पुरेपुर काळजीही घेतली गेली. म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथांना जाणुन घेण्याचा मार्गच बंद केला. वेदाज्ञा-वेदप्रामाण्य नांवाखाली जे वेदातही उल्ल्लेखलेही नाही त्याचा धाक निर्माण केला.

हे लोक परके नव्हते. येथीलच होते. स्वार्थासाठी ते सांगत गेले आणि येथलेच...आपलेच म्हणून लोकही विश्वास ठेवत गेले. तसेही भारतीय लोक "इश्वरी संविधान" येते तेंव्हा गप्पच बसतात, निमुटपणे स्विकारतात. येथल्याच लोकांना ती मानसिकता माहित कशी नसेल?

आणि आजही वैदिक आर्यांचा (येथील किंवा बाहेरील) नंगानाच अशुद्ध विद्वत्तेच्या नांवाखाली चालुच आहे. ज्या देवता वैदिक नाहीत त्या देवतांच्या पुजा-अर्चनाबाबत हे लोक नियम बनवत धार्मिक हुकूमशाही निर्माण करत आहेत. त्यांनी त्यांचे यज्ञ त्यांना हव्या त्या पद्धतीने करावेत. मुर्तीपुजाच मुळात अवैदिक असल्याने आणि ब्राह्मण हे वैदिक धर्माज्ञेप्रमाणे फक्त यज्ञ करण्यास (पूजा नव्हे) पात्र असल्याने त्यांनी अवैदिक देवतांचे पुजारपण करून स्वत:चा धर्म बुडवू नये. करायचेच असले तर ते पुजारपण अवैदिक पद्धतीनेच करा. तुमचे वैदिक नियम घुसडायचे काम नाही. तुमचा धर्म बुडवता ते ठीक आहे...आमचा बुडवू नका.

3 comments:

  1. दिनांक ३१-०३-२०१६ च्या लोकसत्तामधील “ भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र” हा लेख वाचला. वेदकाळापासून निरनिराळ्या समूहांच्या देवतांचे वैदिक देवतांशी ऐक्य दाखवून किंवा वेदांमध्ये बहुजनांचे देव स्थास्पित करून त्यांना वेदांत स्थान देण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु आहे. बहुजनांच्या या देवतांचे आर्यीकरण झाल्याने सर्वच गटांमध्ये एकप्रकारचे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाले. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अगदी शक शक-कुषाणांच्या सुर्यालाही पंचायतनात स्थान दिले गेलेले आहे. त्यामुळे येथील पत्येक समूहाला आपण एका विशाल सांस्कृतिक समूहाचे एक घटक असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे स्वत:च्या वैशिष्ट्यांची जपवणूक करूनही एकात्मकतेची भावना अनुभवता येऊ लागली.त्यामुळेच भारतात कोणताही विशिष्ट धर्म निर्माण न होताही येथे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाल्याचे श्री मोरे यांना वाटते.
    बारकाईने बघितल्यास वेदोपनिषदांवर आधारित मूठभरांचा वैदिक धर्म आणि बहुजनांचा लोकधर्म हे वेगवेगळेच असल्याचे दिसून येते. विठोबा, खंडोबा, ज्योतिबा, मातृरुपातील विविध देवता या आहेत बहुजनाच्या देवता. वेदांमधून या देवतांचा आढळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु पुरोहितशाहीच्या वर्चस्वाच्या काळात पुराणांच्या माध्यमातून लोकदैवतांचे वैदिक देवतांशी ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला यासाठी अनेक भाकडकथा निर्माण करण्यात आल्या. लोकदेवतांच्या प्रत्येक स्थानाचे स्थानमाहात्म्य रचण्यात आले आणि अशा स्थानमहात्म्याचा संबंध कोणत्यातरी पुराणांशी जोडण्यात आला. मग ते स्थानमहात्म्य त्या पुराणात असो वा नसो. या स्थानमहात्म्याच्या निमित्ताने अनेक व्रतवैकल्ये निर्माण करण्यात आले. थोडक्यात पुरोहितांनी बहुजनांच्या लोकप्रिय देवतांचा आधार घेवून बहुजनसमाजावर आपली पकड मजबूत केली. बहुजनसमाज आपसूक या जाळ्यात अडकत गेला. त्यालाही आपण या परंपरेचे अनादिकालापासून भाग आहोत असे वाटू लागले. यालाच मोरे भारताचे सांस्कृतिक ऐक्य मानतात. या सांस्कृतिक ऐक्यामुळे बाकी काय झाले माहित नाही, पण पुरोहितांचे भवितव्य मात्र निश्चित झाले. एवढेच नव्हे तर पुरोहितशाहीची भरभराट झाली. कदाचित या सांस्कृतिक ऐक्याचा उद्देशच तसा असावा.
    हे सांस्कृतिक ऐक्य निर्माण करणाऱ्यांना येथील जातीव्यवस्था मात्र दिसली नाही. ज्या समाजात या जातिव्यवस्थेमुळे अनेकांना पशूपेक्षाही हीन जीवन वाट्याला आले होते त्या समाजातील सांस्कृतिक ऐक्य काय कामाचे? अनेक राज्यांमध्ये विभागलेल्या या देशातील प्रजा आपल्या राजाशीही नाते प्रस्थापित करू शकली नव्हती. (याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा.) त्यामुळेच परकीय आक्रमणांच्या वेळी या सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या प्रजेने कोणतेही राज्य वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा सांस्कृतिक ऐक्याचे गोडवे कशासाठी गायचे? असंख्य देव, रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था या सांस्कृतिक बाबी समान असणारा हा समाज तथाकथित एकत्वाची बढाई मारत असला तरी या बाबींनी या समाजाला चैतन्यहीन करून टाकले आहे.
    धार्मिकदृष्ट्या तरी हा समाज एक होता काय! शैव आणि वैष्णव यांच्यातील पराकोटीचा संघर्ष, बौद्धांचा व जैनांचा झालेला जीवघेणा छळ या बाबी शेषराव मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य ते दाखवितात तेवढे मोहक नाही, हेच सिद्ध करतात.
    मोऱ्यांच्या सांस्कृतिक ऐक्याला एक भारत प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटीशांची वाट का बघावी लागली, या प्रश्नांचे उत्तरही द्यावे लागेल. सर्वांना समान असणाऱ्या मागास रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, धर्मव्यवहारपद्धती या सारख्या बाबींनी भारतीयांमध्ये समानता निर्माण केलेली आहे. थोडक्यात या सांस्कृतिक ऐक्याचा आधार अशा बाबी ठरलेल्या आहेत. परंतु हे ऐक्य मनांचे नाही. बाहेरून बघणाऱ्यांना भारतीय समाजात एक प्रकारची समानता दिसत असली तरी भारतीयांमध्ये मात्र असंख्य भेदांची बजबजपुरी माजलेली आहे, हे स्पष्ट आहे.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...