Thursday, April 14, 2016

अस्मितांच्या बाजारात.....

भारत आधुनिक तेंव्हाच होईल जेंव्हा आम्ही भारतीय नागरिक आचार-विचार प्रगल्भ, जिज्ञासू आणि भविष्यवेधी होऊ. आम्हाला महापुरुष बोट धरुन चालवतात. पुढची दिशाही दाखवतात. काळाचा घाला कोणाला सोडत नाही. बोट सुटते. आम्ही ज्या दिशेला बोट दाखवले त्या दिशेकडे जायचा मात्र प्रयत्न करत नाही. जेथे साथ सुटली तेथेच रेंगाळत राहतो. स्मारके बनवणे अथवा जयघोषात रममान होणे हाच जणू आमच्या अनुयायी असंण्याचा एकमेव निकष बनतो. आम्ही पुढे जात नाही. आम्ही त्यांचे काम, विचार पुढे नेत नाही. अजुन वरचे मजले बांधायचे बाकी आहेत हे आमच्या गांवीही नसते. 

आम्ही स्मरण करतो म्हणजे नेमके काय करतो? अभिवादन करतो म्हणजे नेमके काय करतो? खरे तर यातुन आम्ही काहीच करू शकत नाही हेच सिद्ध करतो. म्हणून आमच्या समस्या त्याच जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत. आमच्या जातीअंतांच्या सभा वक्त्यांच्या जातीची नांवे घेतच होतात. आमचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यपुर्व काळात होता तो आजही तसाच आहे. आमच्या अर्थिक आणि जातीय विषमता यात काही बदल झालेला नाही. वैचारिक प्रगल्भता आली असावी असे वाटावे अशी सामाजिक, शास्त्रीय, आर्थिक संशोधनेही आम्ही केली नाहीत. ज्ञानाची कोठारे एका टिचकीवर आज उपलब्ध झाली पण आम्ही त्या साधनांचा गैरवापरच जास्त केला. आमचेच पंख आम्ही वांझ, खोटारड्या अस्मितांच्या लालसेपायी कापून घेतले. खरे म्हणजे जीवंत बोट जी दिशा दाखवत होते ती दिशा आम्ही सोडली आणि काल्पनिक बोटाच्या छत्रछायेत आमचे गौरव शोधत राहिलो.

गौरवात भर घालु न शकणारे नागरिक ज्या देशात होतात त्या देशाला भविष्य नसते. अभिवादन सार्थ कृतीतून होते. ज्ञान-विचार-समग्र सामाजिकतेत भर घालून होते, पोकळ आठवणी काढत आणि त्यातच रमत होत नसते याचे भान आम्हाला आजही नाही. अस्मितांच्या बाजारात महापुरुष हरवले आहेत. आम्ही दिग्भ्रमित माणसे बनलो आहोत नि त्यामुळेच स्वजातीय महापुरुषांना घट्ट कवटाळुन बसत स्वत: तर प्रतिगामी होतच आहोत, महापुरुषांनाही छोटे बनवत आहोत. त्यांच्यात अस्मिता शोधणे महत्वाचे असले तरी त्यांच्या पेक्षाही किमान दोन पावले पुढे जाण्याचे व खरी आदरांजली वाहण्याचे आपल्याला भान नाही. बाबासाहेबांना दर वर्षी जयंती नि पुण्यतिथीला अभिवादनाचे कार्यक्रम होतात. पण आमच्यात कोणती वैचारिक प्रगल्भता आली याचा आम्ही कधी विचार करणार? त्यांनी ज्या वैचारिक, सामाजिक स्वातंत्र्याकडे बोट दाखवले त्या दिशेने कधी वाटचाल करणार?

( 13.4.2016. सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूट, आंबेगांव -पुणे येथे विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बोलतांना मांडलेले विचार.)

15 comments:

  1. हिंदू समाजाची दिशाभूल
    राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’मध्ये १२ ऑगस्ट १९२७ रोजी लिहिलेला हा लेख...........

    हिंदू समाजामधील कित्येक लोकांनी संघटन व शुद्धी या चळवळी सुरू केल्या असून या चळवळींमध्ये शिकलेल्या लोकांचाच भरणा आहे. साधारण बहुजन समाज या चळवळीपासून साधारणत: अलिप्त आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याचप्रमाणे समाजसुधारकांचेही या चळवळींमध्ये फारसे अंग नाही. एकंदरीत अर्धवट विचाराच्या लोकांचेच या चळवळीमध्ये प्राबल्य आहे. जुन्या मताच्या लोकांना शुद्धीची कल्पना परकी वाटते आणि समाजसुधारणेकडे ज्यांचा ओढा आहे त्यांना समाजसुधारणेच्या द्वारेच खरे संघटन हिंदू समाजामध्ये उत्पन्न होईल आणि शुद्धीचे कारण फारसे न उरता हिंदू समाजाचे संख्याबल कायम राहून वाढेल असे वाटते, त्यामुळे ते दोन्ही पक्ष या चळवळीपासून अलग राहिले आहेत. शुद्धी संघटनांच्या चळवळीमध्ये अर्धवट लोकांची भरताड झाल्यामुळे त्या चळवळीचा व्हावा तसा उपयोग होत नाही, इतकेच नव्हे तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना ऊत येऊ लागला आहे. सध्या हिंदू-मुसलमानांमध्ये भयंकर तेढ उत्पन्न झाली आहे. तिचा फायदा काही लबाड लोक घेत आहेत. आधीच धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. जेव्हा खऱ्या धर्माची पायमल्ली होते तेव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर एकमेकांशी भांडत आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या धार्मिक वृत्तीची माणसे चार-दोन तरी सापडतील किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच धर्माचा आवेश दाखवून दुसऱ्या धर्माच्या लोकांचे प्राण घेऊ पाहतात. धर्माने माणसाला देवदूत बनविले पाहिजे; परंतु तसे न होता धार्मिक कलहामुळे धर्माच्या योगाने माणसाचे माणूसपण जाऊन त्याला पशूपणा येत आहे. अशा स्थितीत अशिक्षित गुंड मारामाऱ्या करतात. एकमेकांची टाळकी सडकतात व खून करतात आणि सुशिक्षित गुंड अल्पायासाने आपापल्या समाजात लोकप्रिय होण्याची पर्वणी साधून घेतात. अशिक्षित गुंडाच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षित गुंडांवरच आहे. कारण त्यांच्या चिथावणीमुळेच अशिक्षित लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षित गुंड जसे हिंदूंत आहेत तसे मुसलमानांत आहेत. पंडितांत आहेत तसे मौलानांमध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा सूक्ष्म विचार कोणीच करीत नाही, धर्माच्या आद्य तत्त्वांची कोणालाच पर्वा नाही. दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे. ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा व अज्ञ समजुती, यांनी प्रत्येक धर्माला ग्रासून टाकलेले असल्यामुळे धर्म व सारासार विचार यांच्यांत घटस्फोट झालेला आहे. मेलेल्या माणसांची मढी व मेलेल्या माणसांचे विचार यांच्यावरच सध्यांची रणे माजलेली आहेत. सत्य काय हे कोणीच पाहत नाही. अमका एक धर्मसंस्थापक काय म्हणाला होता आणि अमक्या एका ग्रंथात काय म्हटलेले आहे यालाच सर्व महत्त्व आलेले असून सत्य कोपऱ्यात रडत बसले आहे. अशा वेळी ढोंगी लोकांचे फावावे हे स्वाभाविकच होय. खान-मालिनी विवाह हीच एक सध्या गाजत असलेली बाब उदाहरणासाठी घेतली तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना हल्लीच्या धार्मिक कलहामुळे कसे प्रोत्साहन मिळत आहे ते दिसून येईल. या विषयावरील बाकी विचार आम्ही यापूर्वीच प्रदर्शित केलेले आहेत; परंतु शिळ्या कढीला ऊत आणण्याची खटपट अजूनही कित्येक लोकांकडून चालू असल्यामुळे त्या विषयाकडे आम्ही पुन: वळत आहोत.

    ReplyDelete
  2. हिंदू समाजाची कशी दिशाभूल होत आहे तेही आम्हास आज दाखवावयाचे आहे. एका सुशिक्षित हिंदू स्त्रीने एका सुशिक्षित मुसलमानाशी विवाह केला. त्यामुळे वर्तमानपत्र व जाहीर सभा यांमधून एवढे मोठे काहूर माजविण्यात आले की, हिंदू समाजावर आकाश कोसळून पडले असेच एखाद्याला वाटायचे. आज दोन महिने ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय. हिंदू समाजावर या गेल्या पाच-दहा वर्षांतच किती तरी मोठे आघात झाले असतील, परंतु मालिनी-खान विवाहामुळे जेवढी खळबळ उडाली तेवढी खळबळ आतापर्यंत कशानेच उडाली नव्हती. स्वामी श्रद्धानंदांच्या खुनावर मराठी वर्तमानपत्रांत जेवढे व जितके लांब लेख आले नाहीत तेवढे व तितके लांब लेख या एका विवाहावर प्रसिद्ध झाले! पण खरोखर खान-मालिनी विवाह व श्रद्धानंदांचा खून यांची तुलना तरी होऊ शकेल काय? ज्या हिंदू स्त्रीने मुसलमानाशी विवाह केला ती कितीही सुशिक्षित व कितीही उच्च जातीची अथवा मोठय़ा घराण्यातली असली तरी ती संख्येच्या दृष्टीने एकच होय. बरे, त्या स्त्रीच्या पाठीमागे तिचे शेकडो स्त्री-पुरुष अनुयायी होते असेही नाही. म्हणजे, ती स्त्री मूळची ब्राह्मण घराण्यातली, जुन्या हिंदू घराण्यातली नव्हती ही गोष्ट बाजूला ठेवून विचार केला तरी तिच्या सदरील विवाहामुळे हिंदू समाजातील एक माणूस कमी झाला एवढेच फार तर संख्याबलाचा विचार करताना म्हणावे लागले. त्याुमळे मुसलमान समाजात एका माणसाची भर पडली असेही कायदेशीरदृष्टय़ा म्हणता यावयाचे नाही. कारण विवाह नोंदताना वर व वधू या उभयतांनी आपण कोणत्याच धर्माचे नाही असे म्हटलेले आहे. अर्थात, एका माणसाची भर न पडता मुसलमान समाजातला एक माणूस कमीच झालेला आहे. असे असताही या विवाहाविरुद्ध केवढी ओरड! आपल्यातली माणसे परधर्मात जातात व त्यामुळे आपल्या धर्माचे संख्याबळ कमी होते याबद्दलच जर या ओरड करणाऱ्या लोकांना मनापासून हळहळ वाटत असली तरी या एवढय़ा लहानशा गोष्टीला भलतेच महत्त्व न देता त्यांनी स्वधर्मसंरक्षणाचा विचार केला असता. हिंदू समाजातून दरदिवशी शेकडो माणसे परधर्मात जात आहेत. त्याबद्दल जर खान-मालिनी विवाहाबद्दल आक्रोश करणाऱ्या लोकांना खरोखर हळहळ वाटली असती तर त्रराशिक दृष्टय़ा विचार केल्यास त्यांनी शोकाकुल होऊन प्राणच सोडले पाहिजे होते! घराला मोठी भगदाडे पडली आहेत, तिकडे न पाहता एखादे लहानसे बीळ पाहून घराचा मालक जर छाती पिटून रडू लागला तर ते जितके हास्यास्पद होईल तितकाच मालिनी-खान विवाहाविरुद्ध झालेला व होत असलेला आक्रोश हास्यास्पद आहे. असल्या मूर्खपणाच्या ओरडीने भगदाडे आपोआप बंद होणार नाहीत. हिंदू समाजात ज्या मूर्खपणाच्या व घाणेरडय़ा समजुती दृढमूल झाल्या आहेत, त्यांच्यामुळे हिंदू समाज विस्कळीत व दुर्बळ बनलेला आहे. त्या समजुती व त्यांना अनुसरून असलेल्या चालीरीती यांच्याकडे लक्ष द्यावयांचे नाही आणि भलत्याच गोष्टीला नसते महत्त्व देऊन आकाशपाताळ एक करावयाचे हा कालाचा व उत्साहाचा शुद्ध दुरुपयोग होय. जो कोणी बारकाईने पाहील त्याला हिंदू धर्मातील शेकडो माणसे दर दिवशी परधर्मात का जातात ते सहज कळून येईल. कित्येक ठिाकाणी मुसलमान हिंदू लोकांच्या भेकडपणाचा फायदा घेऊन त्यांच्या बायका पळवीत आहेत आणि त्याखेरीज अेनक माणसे सामाजिक व धार्मिक जुलमाला कंटाळून आपखुशीने परधर्माचा अंगीकार करीत आहेत. अस्पृश्य मानलेल्या वर्गातील लोकांची संख्या त्यात मोठी आहे. शिवाय हिंदू समाजातील कित्येक जातींमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला बंदी असल्यामुळे उच्चवर्ण्ीय म्हणविणाऱ्या लोकांच्या घरांतल्या कैक विधवा मुसलमानांच्या बिबी होत आहेत. मग एकटय़ा मालिनीबाईच्या विवाहाविरुद्धच एवढी ओरड का? पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी पुष्कळ ब्राह्मण जेवले; तथापि स्वर्गात घंटा वाजल्या नाहीत; परंतु शुकमहर्षी राघूच्या रूपाने शिते खाऊ लागले तेव्हा शितागणिक लक्षभोजन झाले म्हणून स्वर्गात घंटा वाजू लागल्या अशी एक गोष्ट आहे. तसेच महत्त्व खान-मालिनी विवाहाला द्यावयाचे असल्यास न कळे! म्हणजे, मिस मालिनी पाणंदीकर बरोबर एक लक्ष किंवा एक कोटी हिंदू स्त्रिया, असे गणित करावे लागेल! दुसरी गोष्ट ही की, मालिनीबाईंनी जो विवाह केला तो सामाजिक चालीरीतींना कंटाळून केला नाही, जबरीमुळे केला नाही, किंवा फसवणूक झाल्यामुळे केला नाही, तो राजीखुषीने व अक्कलहुशारीने झालेला विवाह आहे. अशा विवाहाबद्दल त्या व्यक्तीला दोष देण्याचा, नावे ठेवून छळ करण्याचा समाजाला अधिकार नाही. आणि असे विवाह मधूनमधून व्हावयाचेच. अशा प्रकारे छळ झाला म्हणून ते बंद होणार नाहीत. अशा क्वचित होणाऱ्या विवाहामुळे कमी होणाऱ्या संख्याबळापेक्षा इतर कारणांनी कमी होणारे संख्याबळ किती तरी मोठे आहे. पण तिकडे लक्ष न देता अपवादभूत उदाहरणाचाच मोठा बाऊ करण्यात येत आहे.

    ReplyDelete
  3. महाराष्ट्रातील बरीचशी वर्तमानपत्रे म्हणजे ‘अज्ञ लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने’ आहेत. लोकांना कोणत्या मुद्दय़ावर मूर्ख बनवून आपल्या पत्राचा खप वाढविता येईल याचे या धूर्त पत्रकारांनी एक शास्त्रच बनविले आहे आणि आपल्या लेखनकलेचा त्याच कामी ते उपयोग करीत असतात. हे लेखक मोठे धार्मिक वृत्तीचे, प्रामाणिकपणे जुन्या समजुतीचे आहेत, असे मुळीच नाही. त्यांच्या काळजाला हिंदू पुरुषांनी युरोपियन स्त्रियांशी लग्ने केल्यास मुळीच धक्का बसत नाही. मद्यमांसाची तरफदारी करणाऱ्या लोकांनाही ते सत्पात्र ब्राह्मण आणि हिंदू समाजाचे पुढारी समजतात. धर्माच्या नावावर होणारे अनाचार व अत्याचार त्यांना बिनदिक्कत खपतात. ‘न लोक:पारमार्थिक:’ म्हणजे साधारण लोक स्वत:च्या बुद्धीने व बारकाईने विचार करणारे असतात हे त्यांना पक्के ठाऊक असते व त्यामुळे धर्माभिमानाच्या ढोंगाखाली ते स्वार्थ साधू शकतात. सरकारच्या विरुद्ध लिहिले तर पीनलकोडचे १२४ (अ) कलम आणि मुसलमानांच्या विरुद्ध लिहिले तर १५३ (अ) कलम आपल्याला लागू होईल म्हणून सरकारच्या किंवा मुसलमानांच्या वाटेला न जाता, लोकांना मूर्ख बनवून फुकटची लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग ते शोधून काढतात. एखादी संस्था चांगल्या रीतीने चालत असली तर ते यांच्याने पाहवत नाही. तिच्याविषयी अज्ञ लोकांत गैरसमज उत्पन्न करावयाचा हेच यांचे शतकृत्य! हिंदू संघटन व शुद्धी यांच्याविषयी खरोखरच जर यांना कळकळ असती तर हिंदू समाजाच्या इमारतीला जी भगदाडे पडली आहेत ती बुजविण्याकडे यांनी लक्ष दिले असते. परवा नागपूर येथे हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्याने सर शंकरन् नायर यांनी केलेला उपदेश हिंदू समाज लक्षात ठेवील तरच खरे हिंदू संघटन अस्तित्वात येईल. जातिभेद निराकरण व अस्पृश्यतानिवारण ही जोपर्यंत झाली नाहीत तोपर्यंत संघटनांच्या व शुद्धीच्या गप्पा व्यर्थ आहेत. पण खान-मालिनी विवाहाविरुद्ध सारखी ओरड करणारे लोक या प्रश्नांवर कधी कळकळीने लिहितील तर शपथ! कारण त्यांना पक्के ठाऊक आहे की, अशा विषयांवर लिहिले तर अज्ञ लोकांना ते आवडणार नाही आणि आपल्या पत्रांच्या प्रती अधिक खपणार नाहीतच, पण असलेला खप मात्र कमी होईल! लोकांना मूर्ख किंवा माथेफिरू बनविणे सोपे असते, पण शहाणपणा शिकविणे सोपे नसते. जर या लेखकांना आपल्या लेखनकौशल्याची घमेंड असेल तर त्यांनी अशा विषयांवर लेख लिहून आपल्या पत्राची लोकप्रियता थोडी तरी वाढवून दाखवावी. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे एकीकडे ढोंगीपणा आणि दुसरीकडे विचारशून्यता यांच्यामुळे मूर्खपणाला व निष्कारण माथेफिरूपणाला उत्तेजन मिळते. अशा मूर्खपणामुळे हिंदू समाजचा फायदा न होता उलट तोटाच होईल. एक तर यामुळे समाजाची दिशाभूल होते, योग्य उपायांकडे दुर्लक्ष होते आणि गैरमुत्सद्दीपणामुळे हिंदूंच्या प्रतिपक्षाचा मात्र फायदा होतो. खान-मालिनी विवाहावर टीका करताना कित्येक पदवीधर लेखकांनी गटारे उपसलीच, पण कित्येक पदवीधर वक्त्यांनी जाहीर सभांत अश्लील ध्वनी काढून आपल्या मनोवृत्तीच्या क्षुद्रतेचे जाहीर प्रदर्शन केले आणि आपल्या उच्च शिक्षणाला काळिमा आणला! शिवाय या घाणेरडय़ा चळवळींत गैरमुत्सद्दीपणाचेही प्रदर्शन झाले. या लोकांना शुद्धीची जर खरोखर कळकळ असती तर मि. व मिसेज खान यांना हिंदू समाजात आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले असते. कदाचित थोडय़ा वर्षांनी ते प्रयत्न यशस्वी होऊन मि. खान हे हिंदू निदान ब्राह्मो तरी झाले असते.

    ReplyDelete
  4. सर शंकरन् नायर यांच्या नागपूर येथील भाषणात असा एक उल्लेख आढळतो की, मद्रास इलाख्यामध्ये रोमन कॅथोलिक पाद्री आपल्या धर्मातल्या तरुणींशी हिंदूंनी लग्ने लावावी अशासाठी प्रयत्न करीत; हेतू हा की, ते हिंदू लोक आपल्या धर्माच्या जाळ्यात अडकावेत, मि. व मिसेस खान यांच्याविरुद्ध एवढा गवगवा करण्यात आला नसता, मिसेस खान यांच्यावर शिव्याशापांची लाखोली वाहण्यात आली नसती आणि हिंदू समाजात त्या उभयतांना प्रेमाने वागविण्यात आले असते तर त्यांना आत्मसात करणे हिंदू समाजाला शक्य झाले असते. एखाद्या हिंदूने मुसलमान स्त्रीशी विवाह केला असता तर ‘श्रद्धानंद’ प्रभृती संघटन शुद्धीवादी पत्रांची हरकत नव्हती, असे त्यामधील लेखावरून दिसते. तेवढाच प्रश्न असेल तर उद्या एखाद्या खदिजा बिबीशी किंवा फातिमा बिबीशी एकादा पंत किंवा राव लग्न लावील व फिटाफिट होऊन जाईल. मग त्याबद्दल आक्रोश कशाला? गांधीजींचा विचार करताना ज्याप्रमाणे माझ्या मनात अगदी सहजपणे ‘महात्मा’ हे अभिधान तरळू लागते, त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करताना तितक्याच स्वाभाविकपणे ‘परमपूज्य’ हे अभिधान मनात येत असते. बाबासाहेबांना परमपूज्य म्हणताना मनात कोणताही संकोच निर्माण होत नाही. ह्य़ाचे पहिले कारण हे की, ज्या दलित समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी एक जन्मसिद्ध कर्तव्य म्हणून त्यांच्यावर येऊन पडली, त्या दलित समाजात बाबासाहेबांच्या पूर्व अगर नंतर योग्यतेने त्यांच्या जवळपास येऊ शकेल असा कोणताही नेता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, दलित समाजाची अस्मिता जागृत करण्यासाठी त्यांच्या कार्याचा जसा सर्वत्र परिणाम झाला, तसा दलितांची अस्मिता जागवणारा परिणाम इतर कुणाच्या कार्यातून होण्याचा संभव नव्हता. हे अस्मिता जागे करण्याचे काम बाबासाहेबांनी ह्य़ा देशातील लोकशाहीला, राष्ट्रवादाला आणि ह्य़ा देशाच्या अस्मितेला कोणताही धक्का लागू न देता ज्या सामर्थ्यांने पार पाडलेले आहे त्याचा अंदाज घेतल्याच्या नंतर कोणत्याही प्रामाणिक देशभक्ताची मान उपजत नम्रतेने खाली वाकलीच पाहिजे. आणि तिसरे म्हणजे, बाबासाहेबांनी जो ज्ञानाचा अग्नी आपल्या जीवनात अखंड प्रज्वलित ठेवला, त्याचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या पुतळ्याकडेसुद्धा ताठ मानेने पाहणे स्वतला ज्ञानाचे ठेकेदार मानणाऱ्या सवर्ण हिंदूंना शक्य नाही. बाबासाहेबांचा विचार करताना ह्य़ा सगळ्याच बाबी एकत्रितपणे मनात वावरत असतात.

    ReplyDelete
  5. कनिष्ठांच्या अंत:करणात पिढय़ान्पिढय़ा संगोपनाने श्रेष्ठ वर्गाच्या पूज्य बुद्धीची पाळेमुळे इतकी खोल जातात की, कालांतराने ज्यांना एकदा पूज्य मानण्याची मनाला सवय झाली, ते त्या आदरास पात्र नसले तरी त्याचा अपमान किंवा धिक्कार करणे तर राहोच, पण त्यांना सर्वासारखे लेखण्याचेदेखील धैर्य त्यांना होत नाही. ते सांगतील ते ऐकण्याची, वागतील तसे वागण्याची आणि नेतील तिकडे जाण्याची त्यांना सवय लागते.. उलटपक्षी श्रेष्ठ लोकांची स्तुती होत गेल्यामुळे त्या स्तुतीस आपण सर्वस्वी पात्र आहोत अशी त्यांची भावना होते व कालांतराने ती भावना अंगात मुरली म्हणजे आपण परमपूज्य आहोत असे स्वत:चे ठाम मत करून घेतात आणि लोकांनी आपण होऊन मान दिला नाही तर त्यांना दंडून त्यांच्याकडून तो घेण्याचा ते प्रयत्न करतात. लोकशाही केवळ बाह्य़ स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात अस्तित्वात यावी अशी आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करावयास हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण घटनात्मक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गाना दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी घटनात्मक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्या वेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठय़ा प्रमाणात केले जात होते; परंतु जेव्हा घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा अघटनात्मक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल.

    ReplyDelete
  6. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट, त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्टय़ा अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढय़ा लवकर जाणीव होईल, तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६) – नरहर कुरुंदकर (आकलन)

    ReplyDelete
  7. तत्त्वज्ञ बाबासाहेब!


    गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता.

    ‘‘तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोडय़ाशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठय़ा आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय.’’ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर २४ सप्टेंबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रासच्या (आताचे चेन्नई) पार्क टाऊनमध्ये मद्रास इलाखा शेडय़ुल्ड कास्ट्स फेडरेशनच्या जाहीर सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त केले होते. शेकडो वर्षे शोषण म्हणजेच जीवन ठरलेल्या समाजासाठी हे विचार दिशादर्शक होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या उंबरठय़ावर देश उभा होता, अनेकांना खुणावणारे स्वातंत्र्य आणि बाबासाहेबांना दिसणारे स्वातंत्र्य यात महद्ंतर होते. त्यांना समताधिष्ठित समाजरचनेसाठी शोषितांनाही तयार करायचे होते. त्यांच्यामध्ये प्राण फुंकायचे होते आणि ते करण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे बाबासाहेब. त्यांनी ते तसे केलेही, म्हणून तर आज एकविसाव्या शतकात समताधिष्ठित राज्यघटनेची फळे तुम्हा-आम्हांला चाखायला मिळताहेत. धर्माचे अधिष्ठान बाजूला ठेवून समताधिष्ठित लोकशाहीचा केलेला जाणीवपूर्वक स्वीकार आणि त्याला दिलेले राज्यघटनेचे अधिष्ठान यामुळेच आज देशाची मान जगात उंचावलेली दिसते. बाबासाहेबांनी दलितोद्धाराचे केलेले महत्कार्य आणि त्यांचे राजकारण याबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसते. मात्र त्यांनी धम्माच्या संदर्भात केलेल्या कार्याचा विचार फारशा बारकाईने होताना दिसत नाही. ज्या समाजाच्या संदर्भात बाबासाहेबांनी हे महत्कार्य करून ठेवले त्या समाजातील नेत्यांनाही आताच्या जमान्यात त्याचे फारसे मोल राहिलेले दिसत नाही.

    ReplyDelete
  8. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता. तत्त्वज्ञानाचा पाया पक्का असेल तर आपल्याला प्रगतीची मोठी उडी घेता येते, हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. त्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे घेतली, सर्व धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला आणि मग जाणीवपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो करण्यापूर्वी त्यांनी महाबोधी जर्नलमध्ये १९५० साली मे महिन्याच्या वैशाख अंकात लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा विश्लेषणात्मक लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यातून बाबासाहेबांचा दृष्टिकोन पुरता स्पष्ट होतो. या लेखातून बाबासाहेब आणि त्यांची भूमिका एकूण पाच टप्प्यांत अभ्यासकांना समजून घेता येते. सर्व धर्मसंस्थापकांसोबत बुद्धाची केलेली तुलना, हिंदू व बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या पुनरुज्जीवनावर बाबासाहेबांचा असलेला गाढ विश्वास, इतर धर्माशी केलेली बौद्ध धर्माची तुलना आणि बौद्ध धर्माच्या प्रगतीचे संभाव्य तीन टप्पे असे हे पाच विश्लेषणात्मक मुद्दे आहेत. यातूनच नंतर बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक आकारास आले. यामध्ये बाबासाहेब सर्व धर्मसंस्थापकांबरोबर बुद्धाची तुलना करतात आणि त्याने सांगितलेले तत्त्व हे समानता आणि नैतिकतेवर आधारलेले असल्याने का स्वीकारार्ह आहे, ते सांगतात. त्यावर अधिक विचार करून बाबासाहेबांनी दिलेला हा पाया समजून घेऊन आपण पुढे जाणे आवश्यक होते. पण देवत्व नाकारणाऱ्या गौतम बुद्धांना ज्याप्रमाणे आपण देवत्व बहाल केले त्याचप्रमाणे बाबासाहेबांनाही आपण बोधिसत्त्व करून जबाबदारीतून आपण स्वत:ची मुक्तता करून घेतली. एकदा का देवत्व बहाल केले की मग आपण विचार करण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतो.

    ReplyDelete
  9. दु:खमुक्तीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाने नंतरच्या टप्प्यात सामान्य माणसाला दोन महत्त्वाच्या गोष्टी बहाल केल्या, त्या म्हणजे सत्याचे दोन प्रकार, पारमार्थिक व प्रापंचिक. प्रत्यक्ष प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो हे सामान्य माणसाला पटवून दिले. याची सुरुवात प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुनापासून होते. या तत्त्वज्ञानाला नंतर ज्ञानशास्त्राचे अधिष्ठान देण्याचे काम दिङ्नाग आणि धर्मकीर्ती यांनी केले. बाबासाहेबांचे कार्यही काहीसे याच मार्गाने समांतर जाणारे आहे. एका बाजूला ते सामान्य शोषित माणसाला कळेल असा संदेश नव्हे, तर प्रगतीचा मंत्र देतात- ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा मंत्र देताना बाबासाहेब एकदम प्रॅक्टिकल असतात, तर या साऱ्याला नैतिकतेचे अधिष्ठान असू द्या हा संदेश ते धम्माच्या विश्लेषणातून देतात. एकाच वेळेस ते प्रॅक्टिकल उपाय सांगतात त्या वेळेस ते प्रपंचच सांगत असतात आणि धम्म आचरणाच्या मार्गातून ते परमार्थही सांगतात. पण नेमके हेच समजून घेण्यात आपण सारे कमी पडलोय, असे आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर वाटते. बाबासाहेबांचे काम हे तत्त्वज्ञासारखेच आहे. ज्ञानदेवांनी ज्याप्रमाणे गीतेचे सार सामान्य माणसासाठी मराठीत आणले त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी सामान्य माणसाला कळेल अशा शब्दांत एकाच वेळेस प्रपंच आणि परमार्थही सांगितला. त्यांचे स्वत:चे आयुष्य हेदेखील त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा लोकांसमोर ठेवलेला नेमका आदर्शच होते. त्यांनीही सारे काही झगडून आणि संघर्षांच्याच मार्गाने मिळवले. शिक्षणाचे हत्यार वापरले. जे लोकांना सांगितले ते त्यांनी आधी करूनही दाखवले. म्हणूनच तर बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवरील धर्मातराच्या वेळेस लाखोंच्या संख्येने अनुयायी लोटले होते. कारण केवळ प्रगतीचे तत्त्वज्ञान सांगणारा नव्हे तर ते आचरणात आणणारा एक उंच आदर्श समाजासमोर उभा होता. बाबासाहेबांच्या बाबतीत शिक्षण म्हणजे काही एकच विषय नाही. त्यांनी अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, राजकारण, इतिहास अशा अनेकानेक विषयांत प्रावीण्य संपादन केले होते. आताच्या भाषेत बोलायचे तर बाबासाहेबांची शैक्षणिक कारकीर्द ही आंतरशाखीय पद्धतीची होती. किंबहुना म्हणूनच ते वेगवेगळ्या विषयांचा विचार आणि विश्लेषण इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करू शकले. जे शिक्षणाच्याच बाबतीत तेच संघर्षांच्याही बाबतीत. संघर्षही कुणाशी केला तर स्वातंत्र्यलढय़ात संपूर्ण देशासाठी पूजनीय ठरलेल्या गांधीजींशी. तोही एकदा नव्हे तर अनेकदा. संपूर्ण देशभरात सवर्णाच्या रोषाला सामोरे जावे लागले तेही अनेकदा. त्या काळी गांधीजींच्या विरोधात बोलणे सोपे तर नक्कीच नव्हते. अखेरीस ऐतिहासिक पुणे करारावरच्या स्वाक्षरीने बाबासाहेबांना दलितांचे नेतृत्व अधिकृतरीत्या मिळाले. मग महायुद्धाच्या वेळेसही मतभेद झाले. गांधीजी सांगत होते की, कोणत्याही एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून त्यांना गुलामीत ठेवण्याचा अधिकार नाही. त्या वेळेस बाबासाहेब सांगत होते, त्याचप्रमाणे कोणत्याही एका जातीला दुसऱ्या जातीला हीन लेखण्याचा आणि त्यांच्यावर आपली मते लादण्याचा अधिकार दुसऱ्या जातीला नाही. बाबासाहेबांनी जे सांगितले ते स्वत:च्या आयुष्यात करूनही दाखवले.

    ReplyDelete
  10. जे बुद्धतत्त्व त्यांनी आदर्श म्हणून स्वीकारले त्याची प्राणपणाने जपणूकही केली. आपल्यासाठी वेगळा आणि इतरांसाठी वेगळा नियम त्यांनी होऊ दिला नाही. म्हणूनच राज्यघटनेच्या ३६८ व्या अनुच्छेदाद्वारे त्यांनी त्यात काळानुरूप बदल करण्याची तरतूदही करू दिली. त्याच वेळेस धर्मनिरपेक्षता व समाजवादी असा शब्दप्रयोग राज्यघटनेत करण्याविषयीही चर्चा झाली. त्याही वेळेस बाबासाहेब म्हणाले होते की, प्रजासत्ताकाला विशेषणे लावणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्यासारखेच आहे. भविष्यात एकाच मतप्रणालीचे लोक सत्तेवर येतील असे नाही. तेव्हा त्यांचा अधिकार मर्यादित करणारी विशेषणे कशासाठी वापरायची. बाबासाहेबांनी व्यक्त केलेल्या या मतातून ते किती उदारमतवादी होते हेच दिसते. हे उदारमतवादी धोरण आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञानातून आलेले दिसते. स्वत: गौतम बुद्ध सांगतात की, माझे तत्त्वज्ञान मी सांगितले म्हणून स्वीकारू नका, पटले तरच स्वीकारा. पटले तरच स्वीकारा असे सांगताना ते नाकारण्याचा आपला माणूस म्हणून असलेला हक्क गौतम बुद्ध अबाधित ठेवतात. विरोधकांनाच संपवा, हिच इच्छा प्रबळ असलेल्या सध्याच्या काळात हा उदारमतवाद किंवा ही सहिष्णुता खूपच महत्त्वाची ठरावी. बाबासाहेबांकडे आलेल्या त्या उदारमतवादाचे मूळ या बौद्ध तत्त्वज्ञानात आहे. बाबासाहेब शोषणासाठी कारणीभूत राहिलेल्या हिंदू धर्मावर कडक ताशेरे ओढतात, पण हिंदूंना संपवून टाका, असे ते कधीही म्हणत नाहीत. पण दुर्दैवाने आपण बाबासाहेबांचा हा उदारमतवादही समजून घेण्यात कमी पडलो! बाबासाहेबांच्या आता साजऱ्या होत असलेल्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने तरी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा समजून घेण्याचा प्रयत्न करू यात, तेही नसे थोडके!

    ReplyDelete
  11. आंबेडकरांची राष्ट्रवादाची संकल्पना

    राष्ट्रीयत्व म्हणजे समाजातील परस्परांविषयीची आपुलकीची भावना. ती समाजात निर्माण होण्यासाठी सांविधानिक न्यायाची तत्त्वे आधारभूत ठरतात, असे डॉ. आंबेडकर मानत. त्यांच्या राष्ट्रवादविचारांचे वैशिष्ट्य स्पष्ट करणारा विशेष लेख......

    सध्याच्या राजकीय चर्चाविश्‍वात राष्ट्रवाद आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मुद्दे मध्यवर्ती बनले आहेत. अनेकांना राष्ट्रवादाबद्दल खूपच भावनिक ममत्व आहे; पण हा राष्ट्रवाद कशावर आधारित असतो, हे ठरवणे खूपच कठीण आहे. "भारतमाता की जय‘सारख्या घोषणाबाजीच्या कृतीला राष्ट्रवाद मानले जात आहे आणि त्या घोषणाबाजीलाच चिकटून राहून, त्यावरूनच राष्ट्रवादाची पडताळणी होत आहे. असे का घडते आहे, हे समजावून घ्यायला हवे. काही राजकीय नेते त्यांची विशिष्ट राजकीय विचारसरणी घेऊन पुढे जाताना ठराविक पद्धतीच्या आणि त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीच्या राष्ट्रवादाचाच पुरस्कार करताना दिसताहेत.
    वसाहतवादाच्या काळापासून आपल्याकडे याविषयी चर्चा सुरू आहे. ब्रिटनमध्ये एक धर्म, एक संस्कृती अशी स्थिती असल्याने त्याच विचारांचा प्रभाव भारतातही पडला. ब्रिटनमध्ये एकात्मता आहे, ती त्यामुळेच असे मानले जात होते. तथापि, त्या देशाची स्थिती आणि भारताची यात महदंतर आहे. तरीही स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही एक धर्म-एक संस्कृती हेच राष्ट्रवादाचे आधार असल्याचे मानले गेले. त्यामागे हिंदू समाजाच्या एकत्रीकरणावरच भर होता. परंतु, या एकीकरणाच्या प्रक्रियेत परिघावरच्या अनेक जाती-जमातींची वैशिष्ट्यपूर्ण ओळख पुसण्याचा प्रयत्न होत होता. वसाहतवादी काळातील राष्ट्रवादाच्या चर्चेत फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे नेते होते, की त्यांनी युरोपातील राष्ट्रवादाची साचेबद्ध संकल्पना नाकारली. समान भाषा, समान धर्म, समान संस्कृती आणि समान वंश यामुळे एकत्र आलेल्या लोकांमुळे राष्ट्र बनते, या समीकरणाची त्यांनी चिकित्सा केली. आपल्याला राष्ट्र घडवायचे आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. त्या वेळेपासून आजतागायत केंद्रिकृत व एकसाची विचार मांडला जात असल्याने डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता प्रकर्षाने जाणवत आहे. याचे कारण स्वातंत्र्योत्तर भारतात समाजातील काही घटकांना दडपण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.

    ReplyDelete
  12. म्हणूनच या संदर्भात राज्याची भूमिका महत्त्वाची ठरते. राज्यातील शाळांमधून भारताच्या घटनेचा सरनामा म्हणण्यास सुरवात झाली आहे, ही अलीकडच्या काळात दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. राष्ट्रवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुरू असलेल्या वादावर संविधान हे योग्य उत्तर आहे. सध्या देशभक्ती हे साधन बनू लागले आहे. मणिपूरसारख्या राज्यात "लष्कर विशेषाधिकार कायदा‘ (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्‍ट) लागू केला गेला, हा थेट राज्यघटनेच्या सरनाम्याचे उल्लंघन आणि राज्यात अनागोंदी निर्माण करण्याचा नमुना आहे. कसल्याही हिंसाचाराचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचे प्रशासकीय व राजकीय व्यवस्था समर्थन करू शकत नाही किंवा त्याला कायदेशीर रूप देऊ शकत नाही. अनेक लोक दारिद्य्रावस्थेत दिवस काढत आहेत, ही एक मोठी समस्या आहे. दुःखाचे निवारण करणारी संस्था म्हणून राज्याने त्याचा "राजधर्म‘ दाखवून दिला पाहिजे. "भारत एक विलक्षण राष्ट्र आहे आणि त्याचे राष्ट्रवादी आणि देशभक्तही विलक्षण आहेत. आपल्या बांधवांना माणूस म्हणून वागणूक दिली जात नाही, हे जो डोळसपणे पाहू शकतो तो खरा राष्ट्रभक्त आणि देशभक्त...‘ असे निरीक्षण डॉ. आंबेडकर नोंदवतात. ते पुढे लिहितात, "राष्ट्रीयत्व म्हणजे करुणाभाव आणि स्वअस्तित्वाचे भान. राष्ट्रवाद म्हणजे "स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीच्या भावनेतून नि आकांक्षेतून एकत्र बांधल्या गेलेल्यांची इच्छाशक्ती...‘

    परंतु, अशी एकत्रित इच्छाशक्ती निर्माण करण्याऐवजी राजकारणी वर्गाला त्यांच्या राष्ट्रवादाच्या "ब्रॅंड‘चा प्रसार करण्यात रस आहे. ज्या देशात समाजातील इतर घटकांवर, नागरिकांवर होणारे अत्याचार, हत्या, बलात्कार एक सामान्य घटना म्हणून पाहिले जातात, मग तिथे राष्ट्रीयत्वाची भावना कशी काय असू शकते? शेवटी राष्ट्रीयत्व म्हणजे आपुलकीच असते. द्वेष आणि रागाच्या आधारावर ती निर्माण करता येऊ शकत नाही. याउलट एकात्मता आणि सांविधानिक न्यायाची तत्त्वे आपुलकी निर्माण करतात. एक नाते निर्माण करतात. त्यातून राष्ट्र निर्माण होऊ शकते. सवर्णांकडून दलित समाजाला दडपले जात असताना राष्ट्रभावना निर्माण तरी कशी होणार? खरे तर घटनेने समानता आणि स्वातंत्र्याच्या हक्कांची हमी दिली आहे; पण प्रत्यक्षात घटनेतील या मूलभूत तत्त्वाबद्दल जनजागृती केली जात नाही. कलाकारांच्या स्वातंत्र्यावरही अनेकदा गदा आली. सांविधानिक मान्यता असलेल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्याची व्याप्ती वाढली आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार देशाला खऱ्या अर्थाने देश बनवू शकत नाही. स्वच्छतेच्या सोयीसुविधा, शिक्षणाची सुविधा, आरोग्य सुविधा आणि महिलांचा सन्मान या चार घटकांवर विकासाची परिभाषा पडताळून पाहिली पाहिजे.

    ReplyDelete
  13. केवळ "माता‘ म्हणून केलेला उल्लेख देशातील महिलांना सन्मान मिळवून देऊ शकत नाही. आपण "आम्ही भारतीय आहोत‘ असे अभिमानाने सांगू शकू अशी सर्व आदर्श स्थिती फक्त घटनात्मक तरतूदी आणि न्याय प्रत्यक्षात आणू शकतात. ज्यांच्याकडे हे सर्व पूर्वीच आहे त्यांना तसे म्हणण्यात काहीच अडसर वाटत नाही; पण जे घटक असमानतेचा सामना करत आहेत त्यांना याचा कधीही अभिमान वाटणार नाही. म्हणूनच डॉ. आंबेडकर म्हणाले होते, "धर्म, संस्कृती आणि वंशाच्या आधारावर राष्ट्रनिर्मिती होऊ शकत नाही. केवळ एकमेकांत मिसळून गेलेल्या आशा-आकांक्षांच्या माध्यमातूनच राष्ट्रनिर्मिती होऊ शकते. सर्व आघाड्यांवर घटनात्मक न्याय पोचतो आहे काय, हे पाहण्याची जबाबदारी राज्याची आहे. यात आलेले कोणतेही अपयश अनागोंदीला जन्म देऊ शकते आणि अनागोंदीमुळे प्रजासत्ताक भारताच्या नागरिकांना दुःखच सहन करावे लागेल.‘ बाबासाहेबांची ही जी राष्ट्रवादाची प्रागतिक कल्पना आहे, तिचा अवलंब करणे हेच अंतिमतः देशाच्या हिताचे आहे.

    ReplyDelete
  14. anonymous वर असलेले सर्व खरे आहे. परंतू त्यापलिकडे आपल्याला जाता येत नाही काय, आंबेडकरी चळवळीने आता साठच्या दशकाच्या मानसिकतेतून बाहेर पडावे. नाहीतर नवीन पिढया कोणालाही माफ करणार नाहीत. बाबासाहेबांच्या नावाच्या कमाईवर आणखी किती दिवस चालणार.केवळ ब्राहमण विरोध हेच जर या चळवळीचे इंधन असेल तर काही खरे नाही. आता नव्याने संस्कृती,निर्माण करतांना जुने नवे इतर धर्मातील असे जे काही मानवतेसाठी उपयुक्त आहे. त्या सर्वांचा प्रामाणिक स्वीकार करुन किंवा बळकट सकस समाज धारणेसाठी किंवा बुध्द धम्माचा विवेकवादी विचार प्रसार वाढविण्यासाठी कलात्मक, संगीत ज्ञान ध्यान,अशा वेगवेगळया सामाजिक सांस्कृतिक विकासातूनच होणार आहे. किंवा ते सर्वांना digest होणार आहे. खास करुन स्त्रीया बालके ही तर केवळ तत्वज्ञानापेक्षा समन्वयवादी उच्च दर्जाच्या सांस्कृतिक मार्गांनी बुध्द धर्माचे वेगवेगळया कारणांनी अविकसीत राहिलेले अंग पुन्हा एकदा वैभवशाली भारताची रचना ठरणार आहे. ज्यायोगे प्रत्यक्ष्‍ा ज्ञान, कारुण्य समत्व निरपेक्षत्व/साक्षीभाव वैज्ञानिक दृष्टीकोन देणाऱ्या बौध्द धर्माचे खऱ्या अर्थाने Exploration ठरेल. यामध्ये कुठलेही Branding नसेल. सर्वांना याचा स्वाभाविक स्वीकार करणे शक्य होईल. यावर कुणाच्या मालकीचा हक्क आणि हटटाचा रंगाचा प्रश्नच येत नाही. हा सहज स्वाभाविक नैसर्गिक प्रवृत्तीला मानवणारा मानव जीवन विकासाचे प्रक्षेपण असा मार्ग आहे. मुळात हा मार्ग/धर्म प्रॅक्टिसचा आहे. म्हणजेच प्रशिक्षित होऊन आचरणाचाच आहे. ज्याचा अनुभव आपल्याला प्रत्येक मनुष्य /प्राणी मात्राच्या प्रत्येक कृतींच्या जाणीवेच्या संवेदनेच्या सहजीवनातूनच येणे शक्य आहे. हा रेडमेड भक्तीमार्ग नाही हा सतत विचारांची चिकित्सा करुन त्यात बदलशील असलेला जीवनमार्ग आहे. हा सर्वांनाच लागू आहे. काळाच्या कसोटीवर सध्या सुरु असलेल्या विविध प्रश्नांवर उत्तर शोधतांना नव्याने उदाहरणे हवीत. संजय सरांनी म्हटल्याप्रमाणे केवळ संदर्भावर किंवा मागील घटनांवर सारखे भाष्य करीत राहणे हे वैदिक काय आणि इतर याप्रमाणेच झाले. नवे संदर्भ नवे संशोधनपर विचार, मग ते अनुभव असो किंवा नव अनुभवी असो जशी नव्याने कविता चिंतन अपेक्षित आहे.सलग उतारे वाचणारे आपल्या सवडीआवडी अनुभवाने वाचतीलच पण एवढे बाबा वाक्यंम प्रमाणंम नको.अभय वांद्रे,मुंबई

    ReplyDelete
  15. प्रिय अनामिक
    अत्यंत सुंदर, विवेकी, बुद्घिवादी आणि सत्य माहिती दिल्या बद्दल खुप—खुप आभार!!!

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...