Saturday, July 2, 2016

जातिसंस्थेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन

***राघव काळे***
पुस्तकाचे नाव : जातिसंस्थेचा इतिहास
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशन : प्राजक्त प्रकाशन, पुणे.
मूल्य : 220 रुपये
संपर्क ः 9890956695


भारतीय जातिसंस्थेच्या निर्मितीबाबत अनेक सिध्दान्त आहेत. आक्रमक आर्यांनी एतद्देशियांना हरवून त्यांच्यावर जातिसंस्था लादली, ब्राह्मणांनी स्वार्थासाठी जातिव्यवस्था निर्माण करून मनुस्मृतीद्वारे जातीच्या बेडया कायम केल्या, ते जातिसंस्था आदिम असून ती आधीपासून अन्याय्य व विषमतामूलक होती असे मानणारा विचारप्रवाह एकीकडे आहे, तर जातिसंस्थेचे समर्थन करत वर्णसंस्थेचेच पुढील रूपांतर म्हणजे जातिसंस्था असे मानणाराही एक विचारप्रवाह आहे. या विचारप्रवाहांतील संघर्ष हे हिंदूंच्या समग्र व्यवस्थेतील सध्याच्या सामाजिक कलहांचे कारण बनले आहे. त्यात जातिअंताचे काय, हा प्रश्न चर्चेत असला तरी निरुत्तरित राहतो आहे.
संजय सोनवणी यांचे 'जातिसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक मात्र वर उल्लेखलेल्या मतप्रवाहांना पुरता छेद देते. धर्म-समाज-अर्थ-मानववंश इत्यादी शास्त्रांची कास धरत त्यांनी जातिसंस्थेच्या उगमाच्या आजवर प्रचलित असलेल्या सर्व सिध्दान्तांना सुरुंग लावत सर्वस्वी नवा सिध्दान्त मांडला आहे व जातिसंस्थेकडे नव्याने पाहण्याची नजर दिली आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. सोनवणी हे एक बहुजनहितैषी संशोधक लेखक असले, तरी बहुजनवाद्यांच्या मांडणीलाही आव्हान देणारे त्यांचे हे संशोधन आहे. त्याच वेळीस हिंदू समाजात वर्चस्वतावाद जपणाऱ्या काही गटांनाही या पुस्तकामुळे धक्का बसणे स्वाभाविक आहे.
सोनवणी यांनी पुढील सूत्रात या पुस्तकाची मांडणी केली आहे -
  1. माणसाची जसजशी प्रगती झाली, नवे शोध लागले, तसतसे नवे व्यवसाय निर्माण झाले. व्यवसाय म्हणजेच जाती. व्यवसायांचा शोध मुळात मानवी इतिहासात सावकाश व क्रमबध्द रितीने लागला असल्याने जाती आदिम होत्या या मतात कसलेही तथ्य नाही. यासाठी उदाहरणार्थ ते म्हणतात, लोखंडाचाच शोध लागला नाही, तर लोहार कोठून येणार? वस्त्रांचाच शोध लागला नाही, तर विणकर कोठून येणार?
  2. जाती (म्हणजेच व्यवसाय) हे कोणालाही कोणावर लादता येणे शक्य नसून लादणाऱ्यांनीच सारे शोध लावले आणि कोणी कोणते काम करायचे हे ठरवले असे होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे जाती कोणी बनवल्या व इतरांवर लादल्या, हे मत समाजेतिहासाच्या आधारावर टिकत नाही.
  3. इतिहासात नवीन जाती जशा निर्माण झाल्या, तशाच व्यवसायच नष्ट झाल्याने अनेक जातीही नष्ट पावल्या. त्या कशा, हेही ते अशा अनेक जातींची ससंदर्भ माहिती देत जातिव्यवस्था अपरिवर्तनीय व बंदिस्त होती हे मत कसे चुकीचे आहे, हे सिध्द करतात.
  4. जातिव्यवस्था अपरिवर्तनीय बनायला दहाव्या शतकानंतरची बदलती राजकीय व आर्थिक स्थिती, श्रेणी व्यवस्थेचा अंत आणि 1022पासून भारतात सर्वत्र लागलेल्या दुष्काळाच्या रांगेला कारण ठरवतात. प्राप्त स्थितीत तरून जायला निर्माण झालेली गावगाडयाची पध्दत विषमतेला धर्मापेक्षाही कशी कारणभूत ठरली, हेही स्पष्ट करतात.
  5. वर्णांना व जातींना एकत्र समजत सामाजिक विश्लेषण केल्याने जाती-वर्णांप्रमाणेच अनादी व अपरिवर्तनीय समजल्या गेल्या, असे स्पष्ट करत सोनवणी एक अत्यंत धाडसी सिध्दान्त मांडतात व तो म्हणजे वर्णव्यवस्था ही वैदिक धर्मातील अंतर्गत व्यवस्था असून जातिव्यवस्था ही अवैदिकांची, म्हणजे वेदपूर्व धर्म पाळत राहणाऱ्या लोकांची व्यवस्था आहे. त्यांच्या मते हे दोन्ही धर्म आजही वेगळे असून वैदिक (म्हणजे जन्मजात वेद व वेदाधिकार असलेले) आणि अवैदिक (म्हणजे त्यांच्या मते हिंदू) हे दोन धर्म एकत्र समजले गेल्याने हा जातीय गोंधळ निर्माण झाला आहे. पाश्चात्त्य विद्वानही वर्ण व जात या दोहोंचा इंग्लिश अनुवाद 'कास्ट' असाच करतात व ते चुकीचे आहे, हे ते दाखवून देतात.
थोडक्यात, जातिसंस्थेचे हे सर्वस्वी नवे आकलन आहे. जातिअंताची दिशाही ते देतात. आपले मुद्दे अधिक स्पष्ट व्हावेत म्हणून जवळपास चौदा जातींचा इतिहासही देतात. अगदी ब्राह्मण या वर्णाचाही इतिहास ते देतात. वैदिक व हिंदू हे दोन धर्म वेगळे आहेत हा त्यांचा सिध्दान्त मात्र वादळी ठरू शकतो. किंबहुना हिंदू धर्माच्या सध्याच्या रचनेला विपरीत तडा देऊ शकतो व भावी प्रगतीच्या मार्गात खीळ घालू शकतो. तो कोणाच्या पचनी पडणे शक्य नाही. वैदिक धर्म व पौराणिक धर्म यांच्या मिश्रणाने आजचा हिंदू धर्म बनला आहे अशी सर्वच विद्वानांची मान्यता असताना सोनवणी वैदिक-अवैदिकतेवर भर देतात, ही या पुस्तकातील मोठी त्रुटी आहे.
असे असले, तरी सोनवणींनी या पुस्तकाद्वारे जातिसंस्थेबाबत असंख्य भ्रम दूर करण्याचे अमोल कार्य केले आहे, यात शंका नाही. खरे तर हे संशोधन खूप पूर्वीच झाले असते व अधिकाधिक लोकांपर्यंत गेले असते, तर आजची जातकलहांची तीव्रता कमी झाली असती असे वाटल्याखेरीज राहवत नाही. समाजातील जातीय द्वेष आणि विखार थांबवायचे असले, तर मुळात जाती बनल्याच कशा हे समजून घेतल्याखेरीज गत्यंतर नाही. अत्यंत सखोलपणे, ठिकठिकाणी संदर्भ देत सोनवणी आपल्याला जातिनिर्मितीच्या प्रवाहात खेचून घेतात. भारताच्या संस्कृतीच्या घडणीत सर्व जातींचे बरोबरीचे योगदान कसे आहे, हेही ते दाखवून देत कोणतीही जात उच्च अथवा कनिष्ठ नाही, हेही ते बरोबर बिंबवतात. यामुळे जाती नष्ट झाल्या नाहीत, तरी सर्व जाती परस्परांचा आदर तरी करतील हा सोनवणींचा आशावाद खरा होऊ शकेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हे संशोधन करत असतांना सोनवणींनी अनेक विद्याशाखांचा उपयोग केला आहे, याची प्रचिती पुस्तक वाचताना येते. पूर्वसुरींच्या दिग्गजांच्या मतांना खोडून काढण्यात ते अनमान करत नाहीत. पुराव्यांचे बळ असल्याने ते हे सहज करू शकले.
जातिव्यवस्थेसारख्या संवेदनशील विषयांवरील रूढ प्रमेयांना धक्का देणारे, स्वप्रज्ञेने केलेले संशोधन जाहीरपणे मांडण्याएवढा निर्मळ काळ आज नाही. असे असतानाही सोनवणी यांनी अत्यंत तर्कनिष्ठतेने वस्तुनिष्ठ संशोधन करत पुराव्यांसहित ठामपणे आपली मांडणी केली आहे. हे पुस्तक नुसत्या अभ्यासकांसाठी नव्हे, तर चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता व सामान्य वाचक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

9 comments:

  1. पुस्तक उत्तमच असणार आहे याबद्दल दुमत नाही, नुसत्या परिक्षणावर प्रतिक्रिया लिहिणे अवघडच! पण काही प्रतिवाद मनात उत्पन्न होतात,जातींचा विचार केला तर तीन मुख्य गट दिसतात, एक वैदिक ब्राह्मण दुसरे लढणारे व तिसरे बलुते सांभाळणारे, वरील पुस्तकात ब्राह्मण व बलुतेदार ह्यांचाच विचार केलेला दिसतोय, तिसरा शेती करणारा व प्रसंगी युद्ध करणारा वर्ग दिसतच नाही, तो जातीयतेच्या दृष्टीने महत्वाचा असून दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते, शिवाय ह्याच वर्गात जातीयता म्हणजे वंश,उत्तम बियाणे म्हणजे उत्तम पीक, चान्गला वळू म्हणजे उत्तम गाय बैल हे व्यवहार्य जाती घडवणारे विचार पूर्वी आले व जातीचे 3 प्रमुख गट बनले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असो पुस्तक वाचूनच अधिक प्रतिक्रिया देता येईल,

    ReplyDelete
    Replies
    1. पुस्तकात सविस्तर यावर लिहिलेलं आहे

      Delete
    2. पुस्तकात सविस्तर यावर लिहिलेलं आहे

      Delete
  2. It may be Very +ve book.
    It is necessary to recheck/revise every theorm/invention while it may be old/new by every generation. Thanks.

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी यांचा सगळा पसारा सदासर्वदा वैदिक हे हिंदू नाहीत हे सांगण्यासाठी असतो
    १००० वर्षे मुसलमान इथे राहिले आणि तरीही आपले झाले नाहीत त्यांनी आपला सवता सुभा निर्माण केला आणि त्यावर त्यांचा ओरडा चालू असतो , की आम्ही उरलेला हिंदुस्तान जिंकून घेऊ ! आणि इथे आलेले वैदिक अवैदिक आणि तत्सम अनेक पंथ एकत्र येऊन जो हिंदू धर्म झाला आहे त्यात मात्र संजय सर अभद्रपणे वैदिक अवैदिकांचा वाद निष्कारण करत असतात .
    आज बहुजन समाजात ज्या ज्या अंधश्र्द्धा आहेत त्या कोणामुळे ? बहुजन समाजात अंधश्रद्धा कोण पसरवते ? जर ब्राह्मण आणि बहुजन समाज यांचे धार्मिक विचार वेगळे झालेले आहेत तर मग बहुजनांना अजूनही अंधश्रद्धांशी जखडून कोण ठेवत आहे ?सर्व थोर समाजसुधारकांनी आधीच जर बहुजन समाजाला ब्राह्मणांच्या जोखडातून सोडवले आहे तर मग फारच छान त्यांचे जीवन झालेले असणार ! मग तरीही हजारो लाखो महिला सर्व श्रावण श्रद्धेने साजरा करतात , आषाढ पासून भाद्रपद संपेतोवर हिंदू हा जे धार्मिक जीवन जगात असतो ते वैदिक का अवैदिक ते तो पारखत बसत नाही . आपले सर्व सण हे या मातीतले आहेत - तिथे वैदिक अवैदिक असे काहीही नाही . श्री राघव काळे यांनी फार सुंदर मते मांडली आहेत.
    कोण करते ? आज प्रत्यक्ष शनी शिंगणापूरला चित्र काय दिसते ?अजूनही कोणीही स्त्री चौथर्यावर जात नाही ! कोणामुळे ? वैदिक त्यांना अडवत नाहीत . तिथले पुजारी वैदिक नाहीत . महालक्ष्मीचेही तसेच आहे . सुशिक्षित लोकांना धर्माचे अवडंबर आणि पथ्यपाणी यात काहीही गम्य नाही हा सागाआआआला मामला स्त्रियांशी निगडीत असतो व्रते आणि सणवार मुख्यत्वे आपल्याकडे स्त्रियाच सांभाळून असतात . त्यांना ना वैदिक अवैदिकात रस आहे ना हिंदू धर्माची घडण कशी झाली ते अभ्यासण्यात कौतुक आहे . संजय सरांची अवस्था रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी अशी आहे.
    बघूया त्यांना हे लिखाण लोकांसमोर देण्याची बुद्धी होते का ? नाहीतर आपलीच टिमकी वाजवत बसण्यात त्यांना आणि त्यांच्या मित्रांना आनंद वाटतो ? श्री टाटास्कार यांनी अगदी योग्य रीतीने मुद्दे मांडले आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे तसेच श्री काळे यांनीही संजय सरांशी दाखवलेले मतभेद कौतुकास्पद आहेत .

    ReplyDelete
  4. संजय जी तुम्ही वैदिक हे हिंदू धर्मापासुन वेगळे आहेत असे सांगतात. ह्यावर मला काही प्रश्न पडले आहेत . ्पहिला प्रश्न असा की दोन्ही धर्म जर वेगळे आहेत तर दोघां मध्ये सगळे देव सारखेच कसे काय ?दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या वाचनानुसार वेदांना मानणा-यां किंवा न मानणा-या लोकांच्या पंथां बद्दल आहे.तो असा की मूळ वैदिक एकेश्वर वादी आहेत.्दुसरे स्वत:ला वैष्णव असे समजतात,जरी विष्णू हे ३३ देवां पैकी एक असले तरीही.तुमच्या म्हणण्या नुसार जे अवैदिक आहेत त्यात शैव आणि शाक्त देखिल येतात.आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की हे सर्व संप्रदाय सोडले तर एक ’स्मार्त’ नावाचा संप्रदाय ही येतो. हया संप्रदायाचे अनुयायी केवळ दत्तात्रयांनाच मानतात.जे की ब्रह्मा,विष्णू आणि महेशा चे रूप मानल्या जाते.हे पाहिल्यावर वैदिक आणि अवैदिक हे हिंदू धर्माचेच भाग आहेत असे वाटते.तुमचे ह्यावर मत ऐकायला आवडेल.

    धन्यवाद.

    एकनाथ निलंगेकर.

    ReplyDelete
  5. विश्लेषण व मांडणी छान आहे.

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...